पॅकेज डील ऑफ विपश्यना (भाग - २)

दुसरी गोष्ट म्हणजे शरीर, भावना, मन आणि मनाचे घटक (ऑबजेक्ट्स ऑफ माइंड) या मनसमृद्धीच्या चार आस्थापना. या आस्थापनांच्या पायावर आधारित, वर सांगितलेल्या श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करण्याच्या सोळा पद्धतींचं चार भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आलंय. पहिल्या भागात शरीर हे सतर्कतेचं लक्ष्य मानलं आहे. यात पूर्ण जाणीवेने केलेला श्वासोछ्वास आपल्याला शरीराचं सखोल निरीक्षण करायला लावतो. दुसऱ्या भागात सतर्कतेचं लक्ष्य भावना आहेत. म्हणजे पूर्ण जाणीवेनं केलेला श्वासोछ्वास आपल्याला भावनांकडे बघायला लावतो. दु:ख भावनांचं निराकरण करायला लावतो आणि सुख आणि आनंद भावना उत्पन्न करतो. तिसऱ्या भागात सतर्कतेचं लक्ष्य मन आहे. यात आपण आपल्या मनातल्या घडामोडींकडे लक्ष्य देतो. चांगल्या घडामोडी वाढीस लावतो आणि वाईट मोडून काढतो. आणि चौथ्या भागात मनाचे घटक (ऑबजेक्ट्स ऑफ माइंड) सतर्कतेचं लक्ष्य आहेत. म्हणजे पूर्ण जाणीवेनं केलेला श्वासोछ्वासाबरोबर आपण मनाच्या घटकांचं निरीक्षण करतो. कशाचं तरी प्रेम किंवा कशाचा तरी तिरस्कार यातील "कशाचं तरी" हा मनाचा एक घटक आहे. अशा सर्व घटकांचा विकास चौथ्या भागात करता येतो.

म्हणजेच थोडक्यात, आनापान सती आणि सतिपठ्ठणातून आपण चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करतो. ध्यानाचे दोन भाग असतात. थांबवणं (समथा) आणि निरीक्षण करणं (विपश्यना). थांबवणं याचाच अर्थ चित्त विशिष्ट ठिकाणी एकाग्र करणं. त्याला इकडे तिकडे पळू न देणं. आणि मग अशा एकाग्र चित्ताद्वारे संपूर्ण आणि सखोल निरीक्षण करणं. आनापान सती सूत्रानुसार संपूर्ण जाणीवेतून श्वासोछ्वास करणं आणि संपूर्ण सतर्कतेनं शरीर, भावना, मन किंवा मनाचे घटक बघण्याचा सराव आपण करतो. याचाच दुसरा अर्थ असा की आनापान सती आणि सतिपठ्ठण सूत्रांचा चांगला अभ्यास ही विपश्यनेची पूर्व तयारी आहे. दुर्दैवाने दहा दिवसांच्या विपश्यना कोर्समध्ये सतिपठ्ठणाचा उल्लेखही नव्हता आणि आनापान सती म्हणजे नाकाच्या शेंड्याजवळ श्वासावर लक्ष्य केंद्रित करणं असं सांगून तीन दिवसात आनापान सती उरकून टाकण्यात आलं. आनापान सती सूत्राला महायानवादात कमी महत्त्व असतं थेरवादात नाही.

सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की मरकळच्या ज्या विपश्यना केंद्रात मी हा कोर्स केला त्या केंद्रातल्या शिक्षकांना सुद्धा इतर बुद्ध तत्त्वज्ञानाबद्दल फारशी माहिती नव्हती. साधकाला शिक्षकाबरोबर तात्त्विक, बौद्धिक चर्चा करायला परवानगी नाही. मग शिक्षकाचं काम फक्त विशिष्ट वेळेला विशिष्ट कॅसेट (शिक्षकाकडच्या कॅसेटवर कितव्या दिवशी किती वाजता वाजवायची हे ठरवून दिलेले निर्देश लिहिलेले असतात) टेपरेकॉर्डर मध्ये घालणे व 'प्ले'चं बटण दाबणे एवढंच असतं! दहा दिवसाच्या या कोर्समध्ये बुद्ध तत्त्वज्ञानाची तीन अंग आहेत असं सांगितलं गेलं. शील, समाधी आणि प्रज्ञा. यापैकी पाच यम-नियम पाळले की शील ही पायरी गाठली गेली, त्यानंतर तीन दिवस नाकाच्या शेंड्याच्या त्रिकोणाजवळ श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करता आलं की समाधी ही पायरी गाठली गेली आणि उरलेल्या सहा दिवसात प्रज्ञेचा सराव करायचा असं सांगण्यात आलं!!

तीन दिवसात आनापान सती उरकल्यानंतर, तिसऱ्या दिवशी रात्री शिक्षकांनी "टुमॉरो मॉर्निंग एट नाईन ओ क्लॉक, गोएंकाजी विल गिव्ह विपश्यना" असं धीर गंभीर आवाजात सांगितलं. जर विपश्यना म्हणजे अंतर्मुखता, तर 'टु गिव्ह विपश्यना' या वाक्प्रयोगाला काही अर्थ आहे का? चौथ्या दिवशी हा विपश्यना देण्याचा कार्यक्रम दीड दोन तास चालला होता. सुरवात नाकाच्या शेंड्यापासनंच झाली. इथून मग लक्ष टाळूवर केंद्रित करायला सांगण्यात आलं. या ठिकाणी काय काय संवेदना जाणवतायत ते बघायला सांगण्यात आलं. कुठल्या प्रकारच्या संवेदना जाणवू शकतात यांची जणू एक सहस्र नामावलीच म्हणून दाखवण्यात आली. हे सगळं एकदा इंग्रजीत आणि तेच परत सगळं हिंदीत. टाळूवरून मग संपूर्ण डोक्यावर. तिथंही सहस्र नामावली म्हणून दाखवण्यात आली. तिथून मग चेहरा... परत सहस्र नामावली. असं करत करत शरीराच्या प्रत्येक भागावर क्रमशः लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आलं. हे चालू असताना कॅसेटवर गोएंकाजींचं अखंड बोलणं चालू होतं. आणि बोलणं म्हणजे हेच "झनझनाहट, फनफनाहट, सुरसुराहट... " वगैरे वगैरे असली संवेदनांची सहस्र नामावली. आता एवढ्या मोठ्या आवाजात तुमच्या समोर काहीतरी बडबड चाललेली असताना, चित्त कुठल्याही एका विशिष्ट गोष्टीवर केंद्रित करणं शक्य तरी आहे का? त्यामुळे मी डोळे मिटून नुसताच बसून होतो.

आणि माझ्या मते खरी मेख इथेच आहे. कारण "विपश्यना देण्याच्या" या कार्यक्रमात तुम्ही मनानं जर सहभागी व्हायचं नाही असं ठरवलंत आणि तटस्थ भूमिकेतून सगळ्या गोष्टी बघितल्यात तर दोन मुद्दे तुमच्या लक्षात आल्यावाचून राहत नाहीत. एक, या 'झनझनाहट, फनफनाहट... 'मध्ये तत्त्वज्ञान काहीही नाही आणि दोन हा मास ऱ्हिप्नॉटिझमचा उत्कृष्ट खेळ आहे. माझ्या शंकेला पुष्टी देणाऱ्या आणखी काही गोष्टी लक्षात आल्या. ही विपश्यना देण्याचा समारंभ असलेली विशेष काळजीपूर्वक हाताळण्यात येत होती. बाकी सर्व कॅसेट शिक्षकांच्या पिशवीत असायच्या परंतु ही कॅसेट लोखंडी कपाटात कुलुपात ठेवली होती. विपश्यना देण्याचा कार्यक्रम चालू असताना शिक्षक आणि धम्मसेवक, प्रत्येक साधक डोळे बंद ठेवून सांगितल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करतोय का नाही यावर लक्ष ठेवत होते. इतर ध्यानाच्या वेळांमध्ये मात्र शिक्षक किंवा धम्मसेवक डोळे बंद करून स्वतःसुद्धा ध्यान करत राहायचे. (एक दोनदा पहाटेच्या ध्यानकालात मी शिक्षकांना डोळे बंद करून डुलक्या घेतानाही बघितलं!! ) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विपश्यना देण्याचा कार्यक्रम उरकल्यानंतर मी शिक्षकांकडे जाऊन ही विपश्यनेची कॅसेट विकत मिळू शकेल का असं विचारलं. यावर "ही कॅसेट बाहेर देता येत नाही" असं उत्तर मिळालं. का?? हे तंत्र जर बुद्धाकडून पिढ्यांपिढ्यांद्वारे गुरुजींपर्यंत पोहोचलंय आणि गुरुजी तर धम्मचक्र चालत राहावं म्हणून हे कार्य करतायत तर विपश्यनेची ही कॅसेट विक्रीला का नाही??

आणखी एक विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे गोएंकाजींचं जे साहित्य (पुस्तके, कॅसेट्स वगैरे) सर्वांना उपलब्ध आहे त्यात कुठेही चौथ्या दिवशी 'दिल्या' जाणाऱ्या विपश्यनेच्या तंत्राची एवढीशीही माहिती दिलेली नाही. म्हणजे जगासमोर येणाऱ्या साहित्यात फक्त तत्त्वज्ञान आणि तंत्र मात्र कोर्समध्ये ऐकण्यापुरतंच! तेसुद्धा साधकांना फक्त तिथंच आणि त्याच वेळेला ऐकता येणार. घरीही नेता येणार नाही किंवा त्यावर नोट्सही काढायला परवानगी नाही. हे सगळं काही पटत नाही.

- क्रमश:

 
^ वर