ऍमेझॉन किंड्ल : पुस्तकांच्या जगात एक नवे पाउल

ऍमेझॉन या कंपनीने किंडल हे नवीन यंत्र नुकतेच बाजारात आणले आहे. किंडल हे एखाद्या पुस्तकाच्या आकाराचे हातात सहज धरता येईल असे यंत्र आहे. याच्या सहाय्याने तुम्ही हवे ते पुस्तक, हवे तिथून डाउनलोड करून लगेच वाचू शकता. याची यंत्रणा वायरलेस असल्याने मोबाईलप्रमाणेच कुठूनही संपर्क करता येतो. एका वेळी तुम्हाला साधारण २०० पुस्तके साठवता येतात. याखेरीज वर्तमानपत्रे, अनुदिन्या, विकी, शब्दकोश हे सर्वही मोफत उपलब्ध आहे. याविषयीची चित्रफित इथे बघता येईल.

सध्या हे फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे पण लवकरच इतर ठिकाणीही यायला हरकत नाही.

Comments

सुंदर

जनसामान्यांच्या आवाक्यात येणे नजीकच्या भविष्यकाळात अवघड. न जाणो कदाचित मोबाईल तंत्रज्ञानासारखे लोकप्रिय व परवडणारे झाल्यास दहा वर्षात आमच्याही खिशात येईल.
प्रकाश घाटपांडे

तंत्रज्ञान

याची सध्या किंमत $३५९ आहे. तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने होणारी प्रगती आणि यात आणखी कंपन्या उतरल्या तर किंमत कमी होणे सहजच शक्य आहे.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

मराठी

मराठीची पुस्तके मिळु लागली तर फार चांगले होईल. एकतर महागड्या किमतीमुळे वाचकाची इच्छा असूनही
पुस्तके विकत घेता येत नाही. भविष्यात अशी सोय झाली तर फार चांगली गोष्ट होईल. पण पुढे सर्व 'इ' पुस्तकेच प्रकाशित करावी लागतील. मग प्रकाशकांचे काय ? लेखकांना पैसे कसे मिळतील ?

असो, किंडल यंत्राची माहिती दिल्याबद्दल आभार !!!


अवांतर : उपक्रमच्या मालकासाठी : वाचलेले सर्वच प्रतिसाद पुन्हा नवे प्रतिसाद म्हणून दिसत आहेत. काही तरी तांत्रिक गडबड दिसत आहे. जरा लक्ष द्या राव !

-दिलीप बिरुटे

गैरसमज

किंडलमध्ये पुस्तके डाउनलोड करता येतात पण याचा अर्थ ती फुकट आहेत असा नाही. :-) पुस्तक डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ऍमेझॉनवरून ते विकत घ्यावेच लागेल. त्यामुळे हे पैसे लेखक/प्रकाशक यांच्यापर्यंत पोचतीलच. अर्थात छापील पुस्तकापेक्षा याची किंमत कमी आहे किंवा कसे याबद्दल कल्पना नाही.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

किंडल $$$

काही महिन्यांपूर्वी कुठल्यातरी पुस्तकाची किंमत ऍमेझॉनवर बघताना 'हेच पुस्तक किंडलवर् स्वस्तात उपलब्ध आहे' असा मजकुर दिसल्याने ह्या किंडलची माहिती काढली. सर्वप्रथम असले काहीतरी उपकरण निघालेले पाहुन खूप कुतुहल वाटले पण किंमत बघीतल्यावर चांगलाच विरस झाला. आजकाल बर्‍यापैकी लॅपटॉप ४०० डॉलर्स मध्ये मिळत असताना किंडलची किंमत इतकी का ते कळले नाही. शिवाय ह्यावर पुस्तके देखिल फुकट मिळत नाहीत. बाजारभावापेक्षा थोडी स्वस्तात इतकीच (म्हणजे तो खर्च वाचला असेही नाही). वर्तमानपत्र वाचण्यासाठी देखिल त्याची वेगळी वर्गणी भरावी लागते. तेव्हा सध्यातरी हे प्रकरण भलतेच खर्चिक वाटते.

सहमत

सहमत आहे. सध्याची किंमत बघता विकत घेणे फारसे आकर्षक नाही. पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मोबाईलसारखी याचीही किंमत काही काळाने कमी होईल असे वाटते. सध्या फक्त वाचनाच्या जगात एक नवीन तंत्रज्ञान म्हणून कूतूहल आहे.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

किंडल

कुंपणीच्या लायब्ररीच्या कृपेने दोन-एक महिन्यांपूर्वी हे उपकरण आठवडाभर वापरून पाहता आले. यामागची संकल्पना चांगली आहे, यात प्रश्नच नाही पण किंमत जरा जास्त आहे. शिवाय सध्या ढिगाने उपलब्ध असणारी पीडीएफ फॉर्मॅटमधली इ-बुक्स यावर चढवता येत नाहीत. वाचताना आवडलेला परिच्छेद, ओळी इ. 'बुकमार्क' करून ठेवण्याची सोय उत्तम आहे; मात्र पाने पुढे मागे करताना दोन्ही हातांचा वापर आवश्यक आहे - ही बाब काही ग्राहकांना खटकू शकते.

अर्थात हे अशा स्वरूपाच्या उपकरणाचे पहिलेच प्रारूप (मॉडेल) असावे. भविष्यात पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्रेही याच ढाच्यात येऊ लागतील.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहमत

अर्थात हे अशा स्वरूपाच्या उपकरणाचे पहिलेच प्रारूप (मॉडेल) असावे. भविष्यात पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्रेही याच ढाच्यात येऊ लागतील.

सहमत आहे. नंतर यात सुधारणा होऊन किंमतही वाजवी स्वरूपाची असेल असे वाटते. यातील आणखी एक फायदा म्हणजे दोनशे पुस्तके घरात ठेवायला जितकी जागा लागेल तीही वाचते.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

मुद्रित पुस्तकाची मजा

ऍमेझॉनवर मीही काही दिवसांपूर्वी हे यंत्र बघितलं होतं आणि नेहमीसारखाच त्याच्या वेगवेगळ्या फीचर्समुळे स्तिमितही झालो होतो.

तरीही मला वैयक्तिक रित्या असं वाटतं की हाडाचे वाचक तरीही मुद्रीत पुस्तक वाचणंच जास्त पसंत करतील, कारण ते मनसोक्त करता येतं. म्हणजे उदाहरणार्थ लोळत, लोळत किंवा एखादं चांगलं संगीत ऐकता ऐकता किंवा प्रवासात किंवा बीअर पिता पिता छापील पुस्तक वाचताना जी मजा येते आणि तास न तास असं जे वाचन करता येतं ते सारं या यंत्रानं असं मनसोक्त करता येईल असं वाटत नाही.

- मिलिंद

सहमत

सहमत आहे. काही पुस्तकांना नुकतीच छपाई केल्याचा जो सुगंध असतो त्याच्यापुढे सर्व शनेल फिके पडतात. कदाचित आणखी काही पिढया गेल्यावर लोकांना याची जास्त सवय होईल.

अवांतर : गुटेनबर्गने छपाईचा शोध लावल्यानंतर त्या काळातील लोकांना पहिल्यांदा छापलेली पुस्तके वाचताना कसे वाटले असावे?

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

 
^ वर