तेलही गेले... (भाग १)
(काही दिवसांपूर्वी मी वैश्विक शेकोटी नावाचा एक लेख लिहिला होता. या लेखात जमीन आणि तेल या दोन नैसर्गिक संसाधनांच्या गैरवापराबद्दल सर्वसाधारण माहिती आणि त्या गैरवापरातले धोके दाखवायचा प्रयत्न केला होता. आता प्रस्तुतची लेखमाला नैसर्गिक तेल आणि वायू यांच्या उत्पादनातली वाढ, घट आणि कालांतराने समाप्ती या विषयावर. )
मराठीत एक म्हण आहे "तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे"... आता लवकरच ही म्हण शब्दशः खरी ठरण्याची वेळ येऊन ठेपलीये. सतत भरभराट, सतत समृद्धी, औद्योगिक प्रगती, वेगानं जवळ येणारं जग या साऱ्या संकल्पनांना लवकरच तिलांजली देण्याची वेळ आता जवळ येतीये. आणि हे असं झालं तर कदाचित तुम्हा आम्हाला परत एकदा खेड्यात, जंगलात आदिमानवासारखं राहण्याची पाळीही येण्याची शक्यता आहे. हे सारं वाचायला कल्पनाविलास वाटेल पण दुर्दैवानं हे वास्तवाच्या अगदी जवळ आहे. जगातल्या काही अति उच्च शिक्षित, विचारी, बुद्धिवंत अशा भूगर्भ आणि भौतिक विज्ञानातल्या शास्त्रज्ञांनी अभ्यासाअंती काढलेलं हे एक महाभयानक अनुमान आहे. हा अभ्यास आहे एका प्रचंड जागतिक घडामोडीचा ज्याला इंग्रजीत 'पीक ऑईल' असं म्हणतात. मराठीत याला नक्की काय म्हणतात हे मला माहिती नाही पण आपण 'तेल पराकोटी' असं आपल्या सोयीसाठी याला नाव देऊ.
लाखो वर्षांपूर्वी एका विशिष्ठ भूगर्भीय घडामोडीत कोट्यावधी समुद्रीय जीवजंतू मारले गेले. आज आपल्याला मिळत असलेलं तेल आणि वायू या उर्जा याच जीवाश्मांपासून मिळतायत. भूगर्भ शास्त्रज्ञांनी खोदून खोदून या पृथ्वीतलावरचे जवळ जवळ असे सर्व मोठे तेल आणि वायू साठे शोधून काढले. आणि वेड लागल्यासारखं दोन्ही हातानी मानवानं हे साठे ओरपायला सुरवात केली. तेल आणि वायूचे हे साठे अमर्याद नाहीत याचं भानच मानवाला उरलं नाही.
साधारणपणे मागची शंभर सव्वाशे वर्षं आपण तेल विहीरींमधून तेल उपसतोय आणि वापरतोय. तेल हा मानवाच्या जीवनातला सर्वात सोपा आणि सर्वात स्वस्त उर्जा स्त्रोत आहे. तेल याचा अर्थ नुसतंच आपल्या गाड्यांमध्ये भरायचं पेट्रोल किंवा डिझेल नव्हे तर याचा अर्थ फार मोठा आणि समर्पक आहे. उर्जा निर्माण करण्यासाठी लागणारं तेल आणि वायू, लोकांची किंवा सामानाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी लागणारी तेलं आणि वायू आणि अन्न पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणारी उर्जा हे सर्वात मोठे प्रकार यात मोडतात. अन्न पदार्थांच्या निर्मितीतही शेत नांगरण्यापासून, किंवा रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या निर्मितीपासून ते शेवटी तयार धान्य किंवा त्यापासून केलेली उत्पादनं जगभरात सगळीकडे तुमच्या दारात पोहोचवण्यापर्यंत संपूर्ण साखळीचा समावेश आहे.
कल्पना करा उर्जेशिवाय आपलं सर्वसाधारण जीवनमान चालू शकेल? उर्जेशिवाय फक्त तुमच्या घरातले दिवेच जातील किंवा तुमच्या बिल्डींगची लिफ्ट चालणार नाही असं समजू नका तर तुमचं सगळं जीवनमानच ठप्प होईल. पाणी येणार नाही, मलनिःसारण केंद्रं चालणार नाहीत, तुमच्या घराच्या आसपासचा कचरा उचलला जाणार नाही. रोगराई पसरेल, औषधं मिळणार नाहीत.... लाखो लोक मरण पावतील...
'तेल पराकोटी' ही संज्ञा तेलाच्या संपण्याबद्दलची माहिती देणारी संज्ञा नाही तर तेलाच्या उच्चतम उत्पादनाविषयी माहिती देणारी संज्ञा आहे. प्रत्येक तेल विहिरीतून दिवसाला विशिष्ठ प्रमाणात तेल उत्पादन होतं. या तेल उत्पादनाच्या प्रमाणाचा ग्राफ जर काढायचा झाला तर तो घंटेच्या आकाराचा दिसतो. याचा दुसरा अर्थ असा की कुठच्याही तेल स्त्रोतातून मिळणाऱ्या तेलाच्या प्रमाणात विशिष्ठ काळपर्यंत वाढ होत जाते. ही वाढ एका उच्चतम पातळीपर्यंत जाऊन पोहोचते आणि तिथून नंतर हे उत्पादनाचं प्रमाण घटत घटत जाऊन शेवटी त्या स्त्रोतातून मिळणारं तेल संपून जातं. तेल उत्पादनाची ही उच्चतम पातळी म्हणजेच 'पीक ऑईल' किंवा 'तेल पराकोटी'. असाच ग्राफ तेल विहीरी असलेल्या एखाद्या प्रदेशाचा किंवा राष्ट्राचा किंवा संपूर्ण जगाचाही काढता येतो. अगदी किरकोळ फरकानं या प्रत्येक ग्राफचा आकार घंटेच्या आकाराचाच दिसतो. खाली दिलेलं चित्र बघितल्यावर हे चटकन तुमच्या लक्षात येऊ शकेल.
याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या तेल विहीरींतून मिळणाऱ्या अंतिम तेल उत्पादनाच्या प्रमाणात फरक असतो. हे प्रमाण सहसा EROEI (energy returned on energy invested) या संज्ञेनं दाखवलं जातं. याचा अर्थ असा की एक पिंप शुद्ध तेल मिळवण्यासाठी किती उर्जा खर्च करावी लागते हे प्रमाण. पन्नास वर्षांपूर्वी काही अशा तेल विहिरी होत्या की जिथं एक पिंप तेलाच्या खर्चात जवळपास ४०० पिंप तेल उत्पादन व्हायचं. आज सरासरी हेच प्रमाण १ : ८ च्या आसपास आहे. याचा दुसरा आणि सरळ अर्थ म्हणजे सहज सोप्या रीतीनं मिळणारं, उच्च EROEI चं आणि चांगल्या प्रतीचं तेल आणि वायू आता संपून गेलंय. आणि म्हणूनच अजूनही नवनव्या तेलविहिरी सापडतायत पण तरीही जागतिक पातळीवर तेलाच्या उत्पादनाचं सरासरी प्रमाण उतरंडीला लागलंय. जागतिक पातळीवर आपण 'तेल पराकोटी' नुकतीच पार केली आहे आणि आता घसरण चालू झाली आहे.
आणि दुसऱ्या हाताला आपली तेलाची गरज मात्र प्रत्येक दिवशी वाढतेच आहे. बेबंद वाढणारी लोकसंख्या, पाश्चिमात्य देशांमधली ऐश्वर्याची धुंदी, त्यांचं मोठमोठ्या गाड्यांचं, वातानुकूलन यंत्रणांचं, हॉलिडे पॅकेजेसचं आणि 'गिव्ह अवे एअर फेअर्स'चे चोचले आणि दिवसागणीक वाढत जाणारी माणसाची भोगवृत्ती आणि चीन, भारत अशा देशांची औद्योगिक भरभराटीची हाव - हे सारंच शेवटी उर्जेचा वापर (खरंतर गैरवापर) अमर्याद वाढण्यातच फक्त रुपांतरीत होतंय.
त्यामुळे थोडक्यात एका बाजूला तेलाचं उत्पादन आता उतरंडीला लागलंय आणि दुसरीकडे आपली तेलाची गरज वाढत चाललीये. याचा परिणाम म्हणजे इथून पुढच्या काळात तेलाच्या किंमती प्रचंड वाढत जातील. त्यामुळे आर्थिक मंदी येईल, तेलाची गरज त्यामुळे थोडीशी कमी होईल. याचा परिपाक म्हणून तेलाच्या किंमती परत खाली येतील. पण किंमतीतली ही घट फार मोठा काळ टिकणारी नसेल. तेलाच्या किंमतींमधली ही चढ उतार आणि आर्थिक मंदीची ही चक्र - या साऱ्या रोलर कोस्टर राईडमध्ये आपण सगळेच आता स्वार झालो आहोत. आर्थिक मंदी आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या तेलाच्या किंमतीतल्या पडझडीच्या पहिल्या जीवघेण्या आवर्तनात सध्या आपण फिरतोय आणि चक्कर यायला सुरुवात झाली आहे...
- क्रमश:
Comments
वाचत आहे
पुढचा भाग लवकर येउ दे.
उत्तम
माहितीपूर्ण लेख.
मात्र शंका अशी आली की या बेल कर्वच्या टोकावर आपण उभे आहोत हे सिद्ध करण्याइतपत पुरावे मिळाले आहेत काय? पुढे ऊर्जेचे स्रोत सापडणे शक्य नाही. किंवा आहे त्या स्रोतांमधून अधिक ऊर्जा मिळवणे शक्य नाही वगैरे.
अगदी नजीकच्या काळात जागतिक पातळीवर तेलाचे उत्पादन कमी होण्याचे कारण तेलाच्या घसरत्या किमती आहेत असे वाचले आहे. ओपेक किंवा तत्सम संघटनांनी तेल मिळत नसल्याने आता कमी करत आहोतत असे म्हटल्याचे वाचले नाही.
प्रत्येकाने जबाबदारीने वागावे व ऊर्जेचा वापर कमी करावा हे म्हणणे अगदी पटण्यासारखे आहे.
लेख आवडला. पुढील भागासाठी शुभेच्छा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
उत्तरं
धन्यवाद.
तुमच्या शंका रास्त आहेत. मी काही या विषयातला फार मोठा तज्ञ नाही. पण मला खात्री आहे की पुढच्या भागांमधे तुमच्या शंकांची उत्तरं नक्की मिळतील. न मिळाल्यास परत इथे चर्चा करुच.
मिलिंद
मस्त लेख
मस्त लेख आहे. आपण फारतर आजची गोष्ट उद्यावर ढकलण्याची काळजी घेउ शकतो. :) पण हेच जर निसर्गचक्र आहे असे म्हटले तर? मुद्दा थोडा अवांतर आहे, पण रामायण-महाभारतात ज्या प्रकारच्या हानीचे/युद्धाचे वर्णन आहे, त्यावरुन मला असे अनुमान काढावेसे वाटले की मानवाने शोध लावले, भोगवाद वाढवला. लोकसंख्या वाढवली आणि हजारो/लाखो वर्षांनी परत तेच करतो आहोत. हे निसर्ग चक्र चालतच राहणार. याचा अर्थ आपण या विषयांमधुन अंग काढुन घ्यावे असे नाही. अथवा हे मुद्दे महत्वाचे नाहीत असे मुळीच नाही. पण जर खोलवर विचार केला तर अनेक प्रश्न आहेत जे काही शतकांनी अथवा सहस्त्रकांनी फिरुन फिरुन समोर येत राहतील. माणुस आदिमानवा कडुन बोगवादाच्या परमोच्च बिंदुला जाऊन परत जंगलातच जाईल. मला वाटतं की वरची आकृती तेल उत्पादना इतकीच मनुष्य-निसर्ग चक्राला सुद्धा लागु आहे. लोकसंख्येचा वापर उर्जा निर्मीतीसाठी केल्यास आजचे मरण उद्यावर जाईल एवढेच समजते आहे.
निसर्गचक्र
मी तुमच्याशी बर्याच प्रमाणात सहमत नाहीये. निसर्गचक्र ही कल्पना म्हणून ठीक आहे पण त्याला शास्त्रीय आधार कधी वाचल्याचं आठवत नाही. मी स्वतः वैयक्तिकरित्या अगदीच निराशावादी नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की अगदी गळ्याशीच येईल तेव्हा काहीतरी मार्ग निघेलच. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. त्यामुळे जेव्हा तेलाची विहीर अगदी कोरडीच पडेल तेव्हा न्यूक्लीअर एनर्जी किंवा थर्मल एनर्जी वगैरे असा काहीतरी तोडगा सापडेल. अर्थात यालाही तार्किक बैठक फारशी नाही, हा फक्त आशावाद आहे.
मिलिंद
पिढ्या
माझा काही दावा नाहीये. पण असे वाटुन जाते की जो काही इतिहास आपण जाणतो तो खुप पिढ्यांचा नाही. अगदी सरासरी आयुर्मान ७५ पकडले आणि माझ्या मागे १० पिढ्या म्हटले तरी ७५० वर्षांचा इतिहास मला ठाऊक नाही तसेच माझ्या बद्दल माझ्या पुढच्या १० व्या पिढीला माहित असेच असे नाही. आपण जर पृथ्वीच्या निर्मीतीपासून इतिहास मांडायचा म्हटलं तर १०००-२००० वर्षे सुद्धा खुप छोटी आहेत नाही का? असो, विचार आले मनात ते लिहिले. विषयाशी सुसंगत नाहीत, पण अगदीच वेगळे देखील नाहीत. कुठेतरी सांगड बसते आहे असे वाटते.
अपेक्षा
सोप्या भाषेत विषय समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. येणार्या भागांत (विषयांतर होणार नसल्यास) नजिकच्या भविष्यात तेलाधारित आंतरराष्ट्रीय राजकारणाचा कल काय राहिल याचे विवेचन जाणून घ्यायला आवडेल.
जयेश
आंतरराष्ट्रीय राजकारण
धन्यवाद.
पुढच्या भागांमधे यावर थोडीशी चर्चा येईल.
मिलिंद
माहितीपूर्ण
माहितीपूर्ण लेख. लेखातील मुद्यांशी आणि प्रतिसादांशी सहमत आहे.
मला इथे एक वेगळा मुद्दा मांडावासा वाटतो. हा थोडा निराशाजनक वाटू शकेल. हा मुद्दा खोडून काढून यामधून आशावादी चित्र दाखवल्यास आनंदच होईल.
सध्या आपल्याला भेडसावणार्या समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. वैश्विक शेकोटी, आत्ताची तेल-समस्या, प्रदूषण, जंगलांची बेसुमार कत्तल, अनेक दुर्मिळ जाती-प्रजातींचे निर्मूलन, आफ्रिकेतील काही देशांमधील आत्यंतिक गरीबी. हे काही चटकन आठवलेले मुद्दे. यात बरीच भर घालता येईल.
या समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने काही करायचे असेल तर यातल्या एखाद्या समस्येवर लक्ष केंद्रीत केले तर अधिक उपयोगाचे होईल का? कारण होते काय की आज आपण एका समस्येवर चर्चा करतो, उद्या तितक्याच गंभीर दुसर्या समस्येवर. समस्या भरपूर आहेत पण त्यावर चर्चा करणार कमी आणि प्रत्यक्षात काही करणारे आणखी कमी. मग असे वाटते की वैयक्तिक पातळीवर एकटा माणूस कुठे कुठे पुरा पडणार? या समस्या अशा आहेत की यांच्यासाठी आयुष्य खर्ची घातले तरी पुरेसे नाही. आणि बरेचसे लोक त्यांचे आयुष्य यासाठी देत आहेत. आणि बाकीचे लोक आहेत ते कदाचित या रोज मरे त्याला कोण रडे असे म्हणून येणार्या समस्यांबद्दल उदासीन झाले आहेत.
इथे परत एकदा स्पष्ट करतो की लेख आणि प्रतिसादांमधील सर्व मुद्दे मान्य आहेत. प्रश्न नेमके काय आणि कसे करता येईल याचा आहे.
----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
चांगला लेख
हा लेख देखील चांगला आहे.
वर इतर प्रतिसादात आलेल्या मुद्यांना एकत्रीत प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो:
सर्वप्रथम विकीपिडीयावर खालील छान बेल कर्व्ह मिळाला:
आता तेल खरेच संपत आले आहे का?
पुनरपी जननम् पुनरपी मरणम् पद्धतीने हे रामायणाच्या कालापासून होत आले आहे आणि असेच चालू राहील का?
म्हणून हे आजचे मरण उद्यावर जाणारे विज्ञान समजावे का?
म्हणून गळ्याशी येईल तेंव्हा काहीतरी उपाय निघेल असे न म्हणता, तेलाला पर्याय शोधण्याला आता पर्याय नाही असे म्हणावेसे वाटते.