मुख्यमंत्र्यांस पत्र....
महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी नुकताच आपला व्यक्तिगत ई-मेल पत्ता सर्वसामान्यांना खुला केला. या निमित्ताने त्यांना हे ई-पत्र पाठविण्याचा योग आला. दैनिक 'सकाळ' आणि 'लोकमत' प्रकाशित झालेलं हे पत्र आपल्या समोर ठेवत आहे.
मा. मुख्यमंत्री महोदय,
यांस सप्रेम नमस्कार!
कामानिमित्त आम्ही सध्या परराज्यात आलो आहोत, पण मन मात्र महाराष्ट्र सोडत नाही. आजच्या ह्या परिस्थीत सरकार, प्रशासन आणि आम्ही सामान्य यांच्यामध्ये कमालीची दरी असल्य़ाचे जाणवते. तुमचा व्यक्तिगत ई-मेल पत्ता सबंध राज्यवासीयांना खुला करून ही पोकळी भरून येण्यास थोडीफार मदत व्हावी हा जर या मागचा हेतू असेल तर सर्वप्रथम तुमचे मन:पूर्वक आभार अन् अभिनंदन!
नुकतेच दूरचित्रवाणीवर आपले विचार ऐकले. आपण म्हणता त्याप्रमाणे सामान्य जनतेला मुख्यमंत्री कोण आहे, याच्याशी देणेघेणे नाही; त्यांना हवी आहे सुरक्षितता, विश्वास अन विकास. पण 'कारभारी तसा कारभार' आणि 'कणखर नेत्तृत्व' हे मुद्दे तर प्रत्येक निवडणूकीच्या प्रचार मोहिमेत अगदी टॉपवर असतात. शिवाय हा एवढा लोकाभिमुख आणि पारदर्शीपणाचा प्रयत्न (आमची समजूत) सरकारचा मुख्य प्रतिनिधि म्हणून आजतागायात कोणत्या राज्यकर्त्यांनी दाखविलेला आहे.
आमच्या दैनंदिन जीवनातील भेडसावणारया समस्या, सरकार आणि प्रशासनाकडून असलेल्या रयतेच्या किमान अपेक्षा हे सर्व तुम्हाला ठाऊक असणारच. पण तरीही आमच्या परीने, जमेल तेवढं आपल्यासमोर पाठवण्याचा आम्ही सर्व कसोशीने प्रयत्न करू. साधारणपणे शासनकर्त्यांचे चित्र समोर आणले तर दिसतात त्यांच्या त्या विराट सभा, उद्गघाटणे, भाषणे, पक्षकारण, अथक प्रवास (दिल्लीवारया, परदेश दौरे आणि महाराष्ट्रही). अशा या आणि नानाविध व्यापांतून तुमच्या इन्बॉक्स पासून तुमच्यापर्यंत आमचा हा ई-मेल कसा पोहोचणार या बाबत कमालीचे कुतूहल आहे.
वाढता दहशतवाद, भ्रष्टाचार, आर्थिक मंदी, शेतकरयांच्या आत्महत्या, प्रांतवाद, वीज, रस्ते, वाहतूक, प्राथमिक आरोग्य आणि शिक्षण, कायदा-सुव्यवस्था,अशा अनेक बाबी आपल्या ह्या महाराज्यात नको तेवढ्या महा-जटील होऊ लागल्या आहेत. ही आव्हाने सोपी आहेत असेही नाही. आपल्या सारखेच आम्ही काही जणांनीही MBA चे धडे गिरवले आहेत. एखाद्या राज्याचे वा देशाचे 'पॉलिटिकल एन्विरिओन्मेंट' आणि त्याचा 'सोशिओ-इकॉनॉमिक डेव्हलपमेंट' शी असलेला संबंध ह्याच्या केस-स्ट्डीज वाचताना नकळत भविष्यातील वैभवी महाराष्ट्राचीही स्वप्ने पडू लागतात. देशाला नेहमीच एक दिशा देणारया ह्या राष्ट्राला लोकसहभागाबरोबर नितांत गरज आहे ती सकारात्मक अन एकत्रित राजकीय इच्छाशक्तीची.
सरकार-प्रशासन आणि सामान्य नागरिक यांमधील पडदा दूर झाला, तुम्ही-आम्ही एक झालो, हितकारी उपक्रम यशस्वी रीतीने पार पडले तर स्वप्नातील महादेश फार दूर नाही. 'रयतेचं राज्य', 'जनतेच्या हाकेला ओ देणारं शासन' ही तर उभ्या जगाला असलेली आपल्या शिवराय़ांच्या शिवभूमीची जुनी ओळख.
या लोकशाहीत पुन्हा एकदा अवतरावी 'शिवशाही' हीच आमची मायबाप सरकार कडून आशा....
याकामी तुम्हास आणि तुमच्या तमाम मंत्रिमंडळास सदैव यश मिळो या हार्दिक शुभेच्छा!
जय महाराष्ट्र!!!
आपला,
सुनील चोरे, (पुणे)
Comments
कुतुहल
आम्हाला अजिबात कुतुहल् नाही कारण आमची खात्री आहे कि अशी पत्रे ही लिहिणार्याच्या मानसिक समाधानासाठी असतात. ही पत्रे मुख्यमंत्री थोडेच वाचणार असतात. त्यांच्या पी ए/ असिस्टंट पीए वाचतात. आपल्या पी आरओ ला देत असावेत. आपला निवडणूक अजंड्यावर त्याचा वापर करतात. त्याचे फार फार तर छापील उत्तर देण्याची व्यवस्था करु शकतात. व्यावहारिक रित्या एक मुख्यमंत्री काय काय वाचणार ?
मग लिहुच नये का? असे मात्र नाही. कारण इतर वाचतात.त्यातुन जनजागृती होत असते. यात अनेक वाक्य लिहुन किंवा वाचुन गुळगुळीत झालेली असतात. पण त्याला इलाज नाही.
पारतंत्र्यात देखील अशी स्वातंत्र्याबद्द्ल स्वप्ने पडायची . काय झाल स्वातंत्र्य मिळाल्यावर?
प्रकाश घाटपांडे
इनबॉक्स फुल आहे
आजच एका वाचक महिलेचा फोन आला होता. दोन दिवसांपासून ती मुख्यमंत्र्यांच्या खासगी पत्त्यावर पत्र पाठविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मेल जातच नाही. कदाचित इनबॉक्स फुल असावा. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र पोचेलच कशाला
ठीक आहे
नेते आणि जनता यांच्या संवादाची सुरूवात म्हणून पत्र चांगले आहे. पण " सरकार-प्रशासन आणि सामान्य नागरिक यांमधील पडदा दूर झाला, तुम्ही-आम्ही एक झालो, हितकारी उपक्रम यशस्वी रीतीने पार पडले तर स्वप्नातील महादेश फार दूर नाही. " हे कसे करायचे?
शिवाय मी असे काहीसे वाचले की सगळे नेत्यांना नावे ठेवतात, पण खरे नियंत्रण हे प्रशासकीय अधिकार्यांचे (आय ए एस ) असते. आणि त्यांना बदलीखेरीज विशेष शिक्षा बहुदा होत तरी नाहीत किंवा झालेल्या कळत तरी नाहीत. या सर्वाला मुख्यमंत्री काय करू शकतील? असे बदल करण्यासाठी जी इच्छाशक्ती लागते ती कोणाकडे आहे?
http://www.mid-day.com/news/2008/dec/061208-Kiran-Bedi-blames-IAS-Mumbai...
कृपया हे प्रश्न तुम्हालाच उद्देशून आहेत असे समजू नका. आपल्या हातात पत्र लिहीणे आहे तर ते आताच्या घडीला ते तरी करू म्हणून करत असलात तर चांगलेच आहे. फक्त ते चुकून कोणी वाचलेच, तर त्यातून मिळणारा संदेश हा संदिग्ध नसावा, असे सुचवावेसे वाटले. तो स्पष्ट आणि कळेल असाच असावा.