द उकिम्वी रोडः आफ्रिकेतील सायकलप्रवासाचे स्मरणटिपण

The Ukimwi Road ह्या पुस्तकाविषयी लिहिण्यापूर्वी मनामध्ये विचार येऊन गेला की मराठीत अशा प्रकारचे लेखन कोणी केले आहे. अनिल अवचटांचे 'पूर्णिया' आणि नंतर सामाजिक प्रश्नांबाबत केलेल्या प्रवासांची वर्णने हे ठळकपणे आठवणारे उदाहरण. दि.बा.मोकाशी यांची 'अठरा लक्ष पावले' आणि 'पालखी', मिलिंद बोकील यांचे 'समुद्रापारचे समाज' ही मला आणखी आठवणारी उदाहरणे . हे लेखन वगळता ज्याला - दुसरा बरा शब्द आठवत नसल्याने - तळागाळातल्या लोकांना भेटण्याची, त्यांची आयुष्ये जवळून बघण्याची आणि त्यावर लिहिण्याची उर्मी असलेले लेखक मराठीत फारच कमी आहेत. अर्थात या पुस्तकांच्या वाचकांची संख्याही इतर साचेबद्ध प्रवासवर्णनांच्या मानाने फारच कमी आहे हेदेखील दुर्लक्षित करता येणार नाही. असो.

The Ukimwi Road हे Dervla Murphy यांचे पुस्तक केनिया-युगांडा-टांझानिया-मालावी-झांबिया-झिंबाब्वे ह्या आफ्रिकेतील देशांत ३००० मैलांच्या सायकलप्रवासाचे वर्णन. मर्फी यांनी १९६४ पासून त्यांच्या जगावेगळ्या -सायकलवरून किंवा पायी केलेल्या - प्रवासांच्या हकीकती पुस्तकांच्या माध्यमातून सांगितल्या आहेत. याव्यतिरिक्त उत्तर आयर्लंडमधील प्रश्न, ब्रिटनमधील वंशवाद, अणुऊर्जा या विषयांवरही लेखन केले आहे. त्यांच्या इतर प्रवासांपेक्षा या प्रवासाचे कारण थोडे वेगळे आहे. जानेवारी १९९२ मध्ये त्यांना थोडासा एकटेपणा हवासा वाटत होता. थोडी विश्रांती घ्यावी असे वाटत होते. अर्थात त्यांची विश्रांतीची कल्पना ही केनिया ते झिंबाब्वे हा प्रदेश सायकलप्रवास करून 'निष्काळजीपणाने भटकणे' अशी आहे! विशेषतः 'संपर्काच्या साधनांचा अभाव असलेल्या या देशांमध्ये हवा तो निवांतपणा मिळेल आणि भटकणेही होईल' हे त्यामागचे एक कारण. याआधी त्यांनी आफ्रिकेतील इथिओपिया, मादागास्कर, कॅमेरून वगैरे देशांना या अगोदर (सायकलवर!) भेट दिली होती. आता विश्रांतीच्या निमित्ताने बाकीच्या देशांनाही भेट देण्यासाठी लेखिकेने वयाच्या साठाव्या वर्षी हा प्रवास केला. (नंतर पुढे वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी सैबेरियात सायकलप्रवासाचा प्रयत्न केला! तिथे अपघात झाल्याने सायकलऐवजी इतर वाहनांनी प्रवास करावा लागला!)

"जगातील इतर मोठे देश चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत- आणि आम्ही अद्याप आमच्याच देशातील गावांपर्यंतही पोचू शकलेलो नाही. काही देश चंद्रापर्यंत जाऊन परतही आले आहेत आणि आता इतर ग्रहांवर प्रवास करण्याच्या योजना करत आहेत. मात्र आम्ही अजूनही गावांपर्यंत पोचण्याचे प्रयत्न करत आहोत. (दिवसेंदिवस बाकीचे जग जवळ येत आहे आणि) आफ्रिकेतील गावे दूर दूर जात आहेत." पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखिकेने हे टांझानियाच्या संस्थापकांचे हे अवतरण दिले आहे. फक्त दळणवळणाच्याच नाही तर संपर्काच्या सर्वच साधनांचा बोजवारा उडालेल्या देशांत एका गोऱ्या-परदेशी, इंग्लिशशिवाय दुसरी भाषा न येणाऱ्या, आजीबाईने पॅंट-शर्ट घालून सायकलप्रवास करणे ही फार धोकादायक गोष्ट आहे असे अनेकांनी प्रवासापूर्वी आणि प्रवासातही बजावले. विशेषतः सायकलवर खाकी रंगाची पॅंटशर्ट घालून जाणारी व्यक्ती ही स्त्री आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. कदाचित परदेशी सैनिक समजून कोणीतरी हल्लाही करील किंवा जिथे थोडीफार वस्ती आहे तिथे सायकल गायब होईल (आणि जिथे कमी वस्ती आहे किंवा अजिबात नाही तिथे सायकलस्वारही कायमचा गायब होण्याची शक्यता आहे) असेही इशारे मिळाले. अर्थातच बाईंनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.

प्रवासाच्या पहिल्याच दिवशी नैरोबीमध्ये प्रचंड दुष्काळ आणि एका स्थानिक आंदोलनाशी लेखिकेची ओळख होते. आंदोलनाचे पुढे दंगलीत रूपांतर होते आणि त्या गडबडीत त्यांनाही थोडा मार लागतो. पुढे बिअर पिण्यासाठी एका गावात थांबल्यावर तिथे आफ्रिकेतील एड्सचे पहिले दर्शन होते आणि देश-संस्कृती कसलेही बंधन न बाळगता या रोगाने सगळा प्रदेश कसा पोखरून काढला आहे याचे विदारक दर्शन होत राहते. प्रवासात भेटलेल्या जवळपास प्रत्येकाचेच नातेवाईक, जवळचे मित्र एड्सने मृत्युमुखी पडलेले आहेत. आफ्रिकेतील लोकांच्या जीवनशैलीला जुळणारी उत्तरे शोधण्याऐवजी केलेल्या पाश्चात्य मलमपट्टीमुळे ही जखम अधिकच चिघळत चालली आहे. आफ्रिकेतील समाजात असलेल्या श्रद्धा-अंधश्रद्धा यांमुळे एड्ससारख्या प्रश्नाने विक्राळ स्वरूप धारण केले आहे. त्यांना प्रवासात भेटलेल्या आफ्रिकेतील काही लोकांच्या मते हा रोग ही आफ्रिकेत छावणी करून राहिलेल्या ब्रिटिश सैनिकांची या भागाला मिळालेली 'देणगी' आहे. तर काहींच्या मते पाश्चात्यांना आफ्रिकी लोकांची भीती वाटत असल्याने त्यांनी केलेल्या जादूटोण्याचा हा एक प्रकार आहे. युरोप अमेरिकेत या रोगावर उपाय मिळाला आहे, मात्र ते लोक मनापासून आफ्रिकेचा द्वेष करत असल्याने ही औषधे आफ्रिकेत येऊ देत नाहीत अशीही काहींची समजूत आहे. ह्या राजकीय-सामाजिक मतमतांतराबरोबरच पारंपरिक अंधश्रद्धांमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. पौगंडावस्थेतून बाहेर पडलेल्या पुरुषाने जर लैंगिक संबंध ठेवले नाहीत आणि वापर झाला नाही तर लिंग गळून पडते किंवा खराब होते. तसेच स्त्रियांनी लैंगिक संबंध ठेवले नाहीत तर योनीमार्ग वापराअभावी आपोआप बंद होतो ही समजूत आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर आहे.

आफ्रिकेतील मोडकळीस आलेल्या समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेवर टिप्पणी करताना लेखिकेने साम्राज्यवादाला थेट जबाबदार ठरवले आहे. युरोपिअन वसाहतवादामुळे या भागाचे मोठ्या प्रमाणावर झालेले शोषण, स्वतःची वेगळी समृद्ध जीवनपद्धती असणाऱ्या केनियातल्या मसाईसारख्या टोळ्यांनी गोऱ्या आक्रमणाला विरोध केल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले शिरकाण, मसाईंसारख्या शक्तिशाली टोळ्या वरचढ होऊ नयेत म्हणून संख्येने कमी असणाऱ्या टोळ्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे दिल्याने या भागाचा बिघडलेला सामाजिक तोल, विविध टोळ्यांमधील भांडणांचा स्वतःच्या साम्राज्यविस्तारासाठी फायदा करून घेणाऱ्या युरोपियन राष्ट्रांनी उभे केलेले इदि अमीनसारखे भस्मासुर या सर्व घटनांचे संदर्भ पुस्तकात वारंवार येत राहतात. "आफ्रिकेमध्ये संहारक शस्त्रांची निर्मिती होत नाही. जर पाश्चात्यांना आमचा खरंच इतका कळवळा असेल तर तेथील कंपन्यांकडून येणारी विध्वंसक अस्त्रे बंद होण्यासाठी ते प्रयत्न का करत नाहीत. आमचे धनुष्यबाण विषारी असले तरी त्यामुळे होणाऱ्या संहाराला मर्यादा आहे. मात्र या आयात होणाऱ्या आधुनिक हत्यारांमुळे प्रचंड संहार होत आहे." हा एका वृद्धाचा प्रश्न मोठा बोलका आहे.

या सर्व प्रकारात पारंपरिक जीवनपद्धतीवर आक्रमण झाल्याने नव्या युगात रूढ अर्थाने जगण्याला नालायक ठरलेल्या या टोळ्यांतील पुरुषांना पोटापाण्यासाठी स्थलांतरे करावी लागली. जोडीदार सोबत नसल्याने दुसरे लैंगिक सोबती शोधावे लागले आणि त्यातून एड्सचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. त्यात भर म्हणजे जनजागृतीसाठी आणि पाश्चिमात्य धर्तीच्या शिक्षणप्रसारासाठी आलेल्या मिशनरी लोकांनी धर्मप्रसार करताना ख्रिश्चन धर्माची काही अत्यंत जुनाट आणि आफ्रिकी जीवनशैलीच्या अगदी उफराटी तत्त्वे येथे रुजवली आहेत. निरोध किंवा तत्सम वस्तूंचा वापर करण्याला प्रतिबंध ही त्यातलीच एक घातक पद्धत. मुले ही देवाची भेट असल्याने त्यांना नाकारू नका त्याऐवजी जीवनशैलीत बदल करा अशी शिकवण ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी दिली. आफ्रिकेत खरे तर बहुपत्नीत्त्वाची पद्धत होती मात्र धर्मप्रसारकांनी प्रचलित केलेल्या ख्रिश्चन धर्मातील एकपत्नीव्रतामुळे बाहेरख्याली व असुरक्षित संबंध जास्त फोफावत आहेत असे लेखिकेचे निरीक्षण आहे.

या प्रवासातील आवडलेल्या अनुभवांविषयी कितीही लिहिले तरी कमीच आहे. तरी एक नमुना देण्याचा मोह अनावर होतो.

"दुसऱ्या दिवशी सकाळी माझा रस्ता एका दलदलीसमोर जाऊन संपला तेव्हा मोठीच अडचण आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल असल्याने पुन्हा काही मैल मागे जाऊन एखाद्या वस्तीवर रस्त्याची चौकशी करावी लागणार. मी मागे वळले तर एक म्हातारा माणूस माझ्या मागेच उभा असल्याचे मला दिसले. त्याच्या वेशभूषेवरून तो आफ्रिकेतील एखाद्या जमातींपैकी एक आहे हे स्पष्टपणे कळत होते. त्याने गळ्यात तांब्यांची मोठमोठी कडी घातली होती. त्याच्या उजव्या हातात एक भाला आणि डाव्या हातात चामड्याने मढवलेली ढाल होती. एक परदेशी स्त्री या भागात सायकलवरून फिरत आहे हे त्याला माहीत असावे. त्याने काहीही न बोलता त्याच्या हातातला भाला माझ्याकडे दिला आणि सायकलीचा ताबा घेतला. नंतर माझ्या बुटांकडे बोट दाखवले. मी ते काढून हातात घेतले. समोरच्या घोटाभर चिखलातून चालताना त्या भाल्याचा उपयोग आधारासाठी काठीसारखा करायचा होता. कदाचित फक्त सायकलीने मला ती दलदल ओलांडणेही शक्य झाले नसते. साधारण अर्ध्या मैलभर तो चिखल तुडवल्यावर पायवाट आली. सायकल बाजूला ठेवून त्याने माझ्या हातातून भाला परत घेतला आणि काहीही न बोलता तो आल्या वाटेने मागे परतला. मी या रस्त्याने येत असताना त्याने पाहिले असावे आणि या अनोळखी बाईला इथे नक्कीच मदत लागेल हे पाहून तो माझ्यामागे आला असावा हे स्पष्टपणे कळत होते." रानटी समजल्या जाणाऱ्या टोळ्यांकडून लेखिकेला असे अनेक अनुभव आले आहेत.

असो. आफ्रिकेतील प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे आणि तितकेच क्लिष्ट आहेत.मात्र त्या सर्वांना जोडणारा समान धागा आहे तो वसाहतवादी पिळवणुकीमुळे उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था, धर्मप्रचाराच्या नावाखाली समाजरचनेत झालेली ढवळाढवळ, आफ्रिकेतील रूढी परंपरा यांना समजून न घेता शोधलेली पाश्चात्य धाटणीची उत्तरे आणि या सर्वांमुळे गोंधळून गेलेला, आणि आता एड्सने पोखरलेला आफ्रिकी समाज यांचा. या सर्वांचे नेमके चित्रण या पुस्तकात होते.

The Ukimwi Road

"Certainly Economists are the most dangerous animals on earth, skilled at making situations look so complicated that only their own solutions can solve the problems they themselves created" अशी अनेक ठिकाणी लेखिकेची लेखणी विलक्षण बोचरी आहे तर "हॉटेलात झोपताना ढेकणांपासून बचाव करावा की पिसवांपासून याचा विचार करत असताना मला डासही चावत आहेत हे बराच वेळ लक्षातच आले नाही" अशी काही ठिकाणी अतिशय प्रसन्न आणि नर्मविनोदी आहे. मात्र एकंदरीत हे हलकेफुलके प्रवासवर्णन नाही. लेखिकेने वास्तवतेला रंजक भाषेत सादर केले असले तरी विषयाचे गांभीर्य कोठेही कमी होऊ दिलेले नाही. तिने वेळोवेळी दिलेले अनेक पुस्तकांचे दिलेले संदर्भ, निवडक उतारे, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चर्चांनंतर विस्ताराने मांडलेले स्वतःचे मत - फुल टिल्ट या पुस्तकाच्या तुलनेत या पुस्तकात मर्फी यांनी स्थळवर्णनांपेक्षा संवाद आणि स्वतःची मते यावर जास्त भर दिला आहे - यामुळे हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन न राहता हा प्रदेशाचा एक विश्वासार्ह ताळेबंद झाले आहे. आफ्रिकेतील समाजरचना, शिक्षणव्यवस्था, आरोग्यसेवा, विवाहसंस्था अशा अनेक गोष्टींबाबतची लेखिकेची सगळीच मते पटण्यासारखी नसली तरी ती विचार करायला लावतात. विशेषतः एकंदर विकासाबद्दलची लेखिकेची टोकाची मते आणि आदिवासी किंवा 'अविकसित'जीवनशैलीबाबतचे तिचे रोमॅंटिक वाटावे असे आकर्षण थोडेसे जाणवते मात्र ते पूर्वग्रह गृहीत धरूनही हे पुस्तक फार वाचनीय आहे यात शंका नाही.

पुस्तकाच्या नावाबाबत थोडे अधिक. Ukimwi हा स्वाहिली भाषेतील शब्द एड्स या रोगासाठी वापरला जातो. त्याचा शब्दशः अर्थ आहे Slim Disease असा. या संपूर्ण प्रवासाला 'एड्स रस्ता' असे नाव लेखिकेला द्यावेसे वाटते यावरूनही आफ्रिकेतील या प्रश्नाच्या भयावहतेची कल्पना यावी. पुस्तकाचे बाजूला दाखवलेले मुखपृष्ठ आणि डोक्यावर पाणी घेऊन जाणारे रेखाटन असलेले मलपृष्ठ दोन्ही अतिशय अप्रतिम आहेत.

'वाचलेच पाहिजे' या यादीत हे पुस्तक अवश्य असू द्या.

Comments

सुंदर परीक्षण

अविकसित देशांना डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरण्याच्या विकसित मनोवृत्तीचे परिणाम आहेत.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

असेच म्हणतो

वसाहतवादाचे परिणाम कुठे कुठे आणि कसे कसे दिसणार आहेत कोणास ठाऊक?





डम्पिंग ग्राउंड

आफ्रिकेतील देशांचा वसाहतकालीन वापर हा केवळ डम्पिंग ग्राउंड म्हणून नाही तर त्यापेक्षाही अधिक वाईट रीतीने करण्यात आला. उदा. मुंबई हे बंदर कोण्या पोर्तुगीज युवराजाने इंग्लंडच्या लग्नानिमित्त राणीला आंदण दिल्याचे भारतीय इतिहासात आहे. इथे युगांडा हा आख्खा देश आंदण देण्यात आला होता. अर्थात आफ्रिकेतील लोकांबाबत बाहेरील लोकांना काहीही कळण्याचा मार्ग हा केवळ या प्रदेशाची फेरी करून आलेल्या युरोपियन लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांमार्फतच जेव्हा होता तेव्हा आफ्रिकेबाबत (रानटी वगैरे) जबरदस्त पूर्वग्रह निर्माण झाले असणार.

लेखिकेने तिने वाचलेल्या अशा वसाहतकालीन प्रवासाबाबतच्या एका पुस्तकातील उतारा दिला आहे ज्यात "हे रानटी मसाई लोक एवढे भयंकर आहेत की ही शेती आमच्या मालकीची असूनही ते त्यांची गाईगुरे शेतात घुसवतात. इतकी वर्षे जिथे गाईगुरांना चारले तेथे आता शेती होत आहे आणि (त्यामुळे) जमिनीला एक मालक आला आहे हे त्यांना कळत नाही की ते मुद्दाम तसे करत आहेत.) " अशा अर्थाचे वाक्य आहे. यावर लेखिकेने फार खोचक टिप्पणी केली आहे. "जर बोटावर मोजण्याइतपत वर्षे शेती केल्याने त्या जमिनीला मालक मिळतो आणि हजारो वर्षे त्या जमिनीवर गुरे चारणारे मसाई लोक मात्र त्या जमिनीचे मालक नव्हते".

याशिवाय मसाई लोकांच्या (हे लोक केनियात संख्येने सर्वाधिक होते) शिरकाणाची आणि विच्छेदाची अनेक उदाहरणे दिली आहेत. आज केनियात बांधलेले अम्युजमेंट पार्क किंवा पर्यटनकेंद्रे ही या लोकांची साफसफाई करून घेऊन मग बांधली आहेत. मसाई (व इतर) लोकांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्या भागाला सर्व बाजूंनी आग लावणे वगैरे अमानुष प्रकार केल्याचे पुस्तकात दिले आहे.

अर्थात हे केवळ आफ्रिकेतच झाले असे नसून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही अशाच पद्धतीने नेटिवांना संपवण्यात आले आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दुर्दैवी

"जर बोटावर मोजण्याइतपत वर्षे शेती केल्याने त्या जमिनीला मालक मिळतो आणि हजारो वर्षे त्या जमिनीवर गुरे चारणारे मसाई लोक मात्र त्या जमिनीचे मालक नव्हते".

सुन्न झालो. पुस्तक वाचलेच पाहिजे.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

'वाचलेच पाहिजे'

'वाचलेच पाहिजे' या यादीत हे पुस्तक अवश्य असू द्या.

नक्की! पुस्तकाची इतक्या सुंदर शब्दांत ओळख करून दिल्याबद्दल आभार. त्यातहि वयाच्या साठाव्या वर्षी सायकलवरून भटकंती करणार्‍या लेखिकेला सलाम! त्या वयात नुसती भटकंती करायची तरी ताकद सर्व इच्चुकांना(ज्यात मीही आलो) मिळो हीच सदिच्छा!

बाकी, तुमच्या हा लेख वाचूनच अस्वस्थ वाटतंय तर लेखिकेने ते प्रत्यक्ष पाहिल्यावर कसं झालं असेल विचारहि करवत नाहि

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

साठाव्या वर्षी

वयाच्या साठाव्या वर्षी सायकलवरून भटकंती करणार्‍या लेखिकेला सलाम

अगदी सहमत. वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी ७० व्या वर्षी सुद्धा सैबेरियात हा (अपयशी) प्रयत्न केला.

प्रत्यक्ष पाहिल्यावर कसं झालं असेल विचारहि करवत नाहि

हाच विचार माझ्या मनातही आला. चटईवर शेजारी झोपलेल्या आपल्या दोन मरणासन्न एड्सग्रस्त मुलांच्या शेजारी बसलेल्या आईच्या भेटीचा प्रसंग फार अवघड आहे. विशेषतः परदेशी व्यक्ती आली आहे म्हटल्यावर काहीतरी वैद्यकीय मदत मिळेल या आशेने क्षणभर उजळलेल्या चेहरा आणि नंतर झालेला अपेक्षाभंग.. किंवा
अनेक म्हाताऱ्या माणसांच्या सर्व बायका आणि सर्व मुले या रोगाने गेली आहेत असे ठायी ठायी दिसत राहते. .. हे वाचायलाही फार भयानक वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चांगली ओळख

पुस्तक वाचनीय दिसते आहे.
धन्यवाद.

सुंदर लेख

लिहून ह्या पुस्तकाचा आढावा घेतल्याबद्दल धन्यवाद.

हे पुस्तक वाचलेच पाहिजे, असे ठरवून टाकले आहे.

छान ओळख

छान ओळख करून दिली आहे. पुस्तक वाचलेच पाहिजे.

असेच म्हणतो

पुस्तक ओळख आवडली. पुस्तक मिळवुन वाचण्याचा नक्की प्रयत्न करेन.

लेख आवडला

आफ्रिकेतील समाजव्यवस्था आणि राजकारण या सर्वालाच साम्राज्यवाद कळत-नकळत कारणीभूत आहे. एड्सप्रमाणेच इबोला/ एबोला या भयंकर रोगाच्या प्रसाराबद्दलही मध्यंतरी वाचले होते. अंधश्रद्धा, गैरसमजूती, शासकीय यंत्रणेची अपुरी सोय, आफ्रिकेची भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती अशा अनेक बाबी या रोगाच्या प्रसारास कारणीभूत असाव्यात.

जनजागृतीसाठी आणि पाश्चिमात्य धर्तीच्या शिक्षणप्रसारासाठी आलेल्या मिशनरी लोकांनी धर्मप्रसार करताना ख्रिश्चन धर्माची काही अत्यंत जुनाट आणि आफ्रिकी जीवनशैलीच्या अगदी उफराटी तत्त्वे येथे रुजवली आहेत.

हम्म! विचार करण्याजोगा विषय आहे आणि याहूनही विचार करण्याजोगी गोष्ट म्हणजे, मूठभर मिशनरी येऊन जर संपूर्ण समाजाचे धर्मांतर करत असतील आणि तो समाज ते निमूटपणे स्वीकारत असेल तर त्या समाजाची नेमकी निकड किंवा धर्मांतरामागील अपरिहार्यता काय असावी? - जीव वाचवणे?

स्वागत

एकसलग वाचला जावा असा लेख उक्रमावर बर्‍याच दिवसांनी वाचला. स्वागत.

धन्यवाद

हे पुस्तक वाचलेच पाहिजे. मिळवण्याचा प्रयत्न करतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

प्रतिसादाबद्दल आभारी आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकाबद्दचे आपले मत अवश्य कळवावे ही विनंती.

आपला,
(वाचक) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर