बदलती मराठी - १
'लोकसत्ता'च्या लोकरंग पुरवणीमध्ये 'जय मराठी' नावाचा एक खुसखुशीत लेख आला आहे.
त्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवा. आणि तुम्हीही असे मजेदार प्रश्न विचारा.
प्रश्न १- खालील परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या.
एका मराठी वाहिनीवर एक खाण्या-पिण्यासंबंधीचा कार्यक्रम चालू आहे. मालिकांमध्ये चमकणारी एक तारका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेबरोबर बाहेर जेवायला जाते आणि गप्पा मारते, असं दृश्य आहे. बोलता बोलता सूत्रसंचालिका त्या तारकेला म्हणते, ``अगं तू डाएटवर आहेस की काय? काही घेतलं नाहीस. तुझी प्लेट तर खालीच आहे.'' ती तारका घाईघाईत उद्गारते, ``नाही, तसं काही नाही, घेते ना!''
दृश्य दुसरे- कार्यक्रम हाच. संचालिका हीच. समोरचे तारे-तारका बदललेले. संचालिका तारकेला म्हणते, ``मी ऐकून आहे, रेसिपीजची आवड आहे तुला, तू एक छानशी रेसिपी सांग पाहू.'' मग ती (माजी) तारका- जी स्वतःची ओळख एक मराठी लेखिका म्हणूनही करून देते- ती लापशी रव्याच्या शिऱ्याची कृती सांगते. मग सूत्रसंचालिका- ``वॉव्! कशी दिसते ही डिश? हाऊ डज् इट्् लूक्?'' ती तारका- `इट्् लुक्स सो यम्म्म्मीऽऽ ना!
प्रश्न १- हा कार्यक्रम कुठल्या वाहिनीवर सुरू असेल? (मराठी वाहिन्या चार-पाचच आहेत, म्हणून पर्याय दिलेले नाहीत.)
प्रश्न २- पहिल्या दृश्यात जेव्हा सूत्रसंचालिका `प्लेट खालीच आहे', असं म्हणते तेव्हा प्लेट नक्की कुठे असेल? (योग्य पर्याय निवडा)
(अ) टेबलाच्या खाली (आ) टेबलक्लॉथच्या खाली (इ) तळमजल्यावर (ई) यापैकी नाही.
प्रश्न ३- दुसऱ्या दृश्यात लापशी रव्याच्या शिऱ्याची `यम्म्मी' कृती सांगणाऱ्या तारकेचे नाव काय? (ती बालसाहित्य लेखिकाही आहे म्हणे)
प्रश्न ४- रेसिपी या मराठी शब्दाचा अर्थ काय?
(अ) खाद्यपदार्थाचे वर्णन (आ) खाद्यपदार्थ बनविण्याची कृती (इ) तयार खाद्यपदार्थ
प्रश्न ५- कार्यक्रमाची सूत्रसंचालिका कोण असेल? (एका महान- दिवंगत- मराठी साहित्यिकाची नात असल्याचं ती आÆभमानाने सांगते- यावरून ओळखा)
प्रश्न ६- मराठी वाहिनीवरचा मराठी कार्यक्रम म्हणवून घेण्यासाठी कार्यक्रमात मराठी भाषेचे प्रमाण नक्की किती असावे, असे तुम्हाला वाटते?
(अ) ७५% (आ) ५०% (इ) २५% (ई) १०% (उ) यापैकी नाही; फक्त `मी मराठीच' असा ढोल पिटला की पुरे!
प्रश्न २- खालील शब्दांचे अर्थ सांगा. व्याकरणदृष्टया ते शब्द नक्की काय आहेत (म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण इ.) हे सांगता आल्यास बारा गुण अधिक.
‡ सृजनता ‡ वैविध्यता ‡ सादरीकरण ‡ सौंदर्यता ‡ सौंदर्यीकरण ‡ साशंकता
प्रश्न ३- खालील वाक्यांचे अर्थ ससंदर्भ स्पष्ट करा.
‡ आता सौंदर्याची भीती कशाला?
‡ अडचण साबणात नाही, घासणीत आहे
‡ हे डोळे काचेसारखे नाजूक, त्यांना साबणाच्या अश्रूंनी का रडवावं?
‡ समस्या चल हट
‡ किटाणांपासून दहापट सुरक्षा
‡ थुंकू नका! नाहीतर दंड रु. २००/-
प्रश्न ४- खालील संवाद नीट वाचा. त्यातील अधोरेखित केलेल्या शब्दांवरून हे ओळखा, की संवाद म्हणणाऱ्या व्यक्तीला नक्की काय म्हणायचे आहे. (पर्याय दिलेले आहेत)
१) ``तुम्ही कधीपासून माझा पाठपुरावा करताय?''
(अ) माझा पिच्छा पुरवताय (आ) माझा पाठलाग करताय (इ) मला पाठिंबा देताय (ई) बातमीसाठी तपशील गोळा करताय.
२) ``तुम्ही मला भरीला पाडू नका. त्याचे परिणाम वाईट होतील. तुमचं काम तुम्ही करा. `त्यातच तुमची भलाई आहे'.
(अ) त्यातच तुमचं मोठेपण आहे (आ) त्यातच तुमच्या जीवनाचं सार्थक आहे (इ) त्यानेच तुमचं कल्याण होईल (ई) त्यातच भलं आहे.
३) `माझ्या नादी लागलेल्यांचं तळपट होईल'.
(अ) माझ्या कट्टर अनुयायांचं तळपट होईल (आ) माझ्या विश्वासू सहकाऱ्याचं तळपट होईल (इ) माझ्या अंगचटीला येणाऱ्यांचं तळपट होईल (ई) माझ्याशी वाद घालणाऱ्यांचं तळपट होईल (ड) माझ्या कामात विघ्न आणणाऱ्यांचं तळपट होईल.
प्रश्न ५- हिंदी की मराठी ते ओळखा. (राज ठाकरे यांची मदत घेतली तरी चालेल.) तिसरीच कुठली भाषा वाटली, तर तसे नमूद करा.
‡ पाणी उकळण्याच्या झंझटीपासून मुक्ती!
‡ माझी साथ द्या.
‡ स्वर्गीय अमुक अमुक यांचा जयंती सोहळा संपन्न.
‡ या संकटांचा मुकाबला मी एकटा करू शकत नाही. माझी मदत करा.
‡ या पालकाच्या पानांना आधी धुवून घ्या मग या पानांना बारीक कापा.
प्रश्न ६- खालील संवाद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या.
माझी मुलगी एका मैत्रिणीला खेळायला घेऊन घरी आली. ती चिमुरडी आमच्याकडे पहिल्यांदाच आली होती. मी, ``तुम्ही दोघी आतल्या खोलीत खेळा. तो कोपऱ्यातला चेंडू घेऊन जा हवा तर.''
चिमुरडी - `चेंडू? म्हणजे काय?'
माझी मुलगी - `चेंडू म्हणजे बॉल'.
दोघी आत गेल्या. थोडया वेळाने खेळून झाल्यावर...
मी - `तुम्ही दोघी ताटली घेऊन या. एकेक खाऊ देते.'
चिमुरडी - `ताटली म्हणजे?'
मी - `ताटली म्हणजे छोटी थाळी'.
चिमुरडी - `थाळी म्हणजे काय?'
तेवढयात माझी मुलगी दोन ताटल्या घेऊन आली. चिमुरडी - `यांना तर आम्ही डीश बोलतो.'
(डी दीर्घ तिनेच म्हटलेला.)
खाऊन झाल्यावर चिमुरडी निघाली.
मी, `आता तू रविवारी ये हं!'
चिमुरडी, `रविवारी म्हणजे?'
माझी मुलगी, `म्हणजे सण्डेला'.
चिमुरडी - ``ओके. पण मी मम्मीला विचारून येईन, कारण सण्डेला डान्स प्रोग्रॅमची रिहर्सल आहे. क्लासच्या टीचरनी गर्ल्सना ब्लू कलरचे ड्रेसेस घालून आणि बॉइज्ना यलो कलरचे शर्ट घालून बोलावलंय शार्प टेन थर्टीला; ...बाय!''
प्रश्न १- हा संवाद कसा वाटतो?
(अ) काल्पनिक (आ) अतिशयोक्त (इ) सत्य घटनेवर आधारित
प्रश्न २- या संवादातील चिमुरडीची मातृभाषा कोणती असेल?
(अ) इंग्लिश (आ) मराठी (इ) इतर कुठलीही भारतीय
प्रश्न ३- या चिमुरडीला मी कोण वाटले असेन?
(अ) परग्रहावरील व्यक्ती / प्राणी (आ) अनेक वर्षे परदेशात राहून आलेली व्यक्ती (इ) डोकं फिरलेली व्यक्ती
तर ही प्रश्नपत्रिका पूर्ण सोडविता आल्यास जरूर कळवा.
Comments
खो खो !!
कर्णा ! जबरदस्त !! या लेखकाला माझा शिसानविवि ! :-)
लेखिका आहे
लेखिका आहे. लेखक नव्हे ;)
नावावरून तरी वाटते. अर्थात नावावरून लेखक की लेखिका हे मराठी संकेतस्थळांवर तरी कळत नाही बॉ. ;)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
प्रश्न ५
कार्यक्रमाची सूत्रसंचालिका कोण असेल? (एका महान- दिवंगत- मराठी साहित्यिकाची नात असल्याचं ती आÆभमानाने सांगते- यावरून ओळखा)
याचे उत्तर मृणाल कुलकर्णी असावे असे वाटते. अर्थात यावरून च्यानल कोणता हेही कळेल.
मिलिंद गुणाजीची बायको ईटीव्हीवर रेसिप्यांचे कार्यक्रम करते. (प्रशांत दामले कुठे करतो? झी की ई?)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आणि उत्तरे देणारी निशिगंधा वाड?
'मी मराठी' - 'मृणाल कुलकर्णी' आणि 'दावत' (दावत आहे ही खाआआआआस!) हे तर नक्की.
बालसाहित्यिका (माजी) नटी म्हणजे निशिगंधा वाड असावी.
निशिगंधा वाड
तिचे मराठी एवढे वाईट नाही. तिच्या एकदोन मुलाखती पाहिल्यात. चांगली बोलायची तेव्हा.
साहित्यिक नट्यांमध्ये अजून अश्विनी भावे, सोनाली कुळकर्णी या आठवतात पण ह्या दोन्हीही नसाव्यात
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मृणाल कुळकर्णी
मागे भारतात गेले असताना दावत बघण्याचा योग आला. त्यात तिच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले की "क्या बात है" असे मानही न हलवता म्हणते ते पाहून थकले.
क्या बात है
ही मालिका बघताना मलाही हेच जाणवले.
----
दावत?
क्या बात है!
हो
कार्यक्रम दावतच आहे.
----
कारण
'मेजवानी' आणि 'आम्ही सारे खवय्ये' ही नांवे आधीच घेतली आहेत.
आपला,
(शब्ददिवाळखोर) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हे संवाद
डोळयाला पट्ट्या आणि कानात बोळे घालणार्यांना हे संवाद अतिशयोक्त वाटू शकतील -
माझे उत्तर अ, आ,इ नाही. ईईई - "नैसर्गिक".
अशा प्रकारच्या प्रश्न माझ्या दाक्षिणात्य भाचीने गेल्या महिन्यात आमचं इंग्रजीत घुसडलेले तुळू शब्द पाहून विचारला होता -
आर यू फ्रॉम डिफरन्ट कंट्री?
संक्रमण काळ.
सध्याचा काळ हा मराठी भाषेसाठी संक्रमण काळ असावा. काही काळाने कोणी सावरकर जर जन्माला आला तर मराठीचा हा प्रवाह परत शुद्ध करेल अशी आशा वाटते. अन्यथा आपली भाषा चक्रधराच्या ळीळा सारखी दुर्बोध होत जाईल.
माझा प्रश्न : सध्या मराठी भाषा ही जास्त गढुळ कोण करत् आहे.
१. वर्तमानपत्रे २. दुरदर्शनाच्या वाहिन्या ३. मराठी माणसाची उदासिन आणि न्युनगंडाची भावना.
प्रश्नांची उत्तरेही द्या
प्रश्नांची उत्तरेही द्यावीत असे मी आवाहन करतो.
(आवाहक) आजानुकर्ण
याचबरोबर काय आवडले काय नाही तेही कळवा.
उदा. ही वाक्ये मला फार आवडलीत. वाचल्यापासून हसतच आहे.
या पालकाच्या पानांना आधी धुवून घ्या मग या पानांना बारीक कापा.
सौंदर्याची भीती कशाला.
आपला,
(निवडक) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बरं!बरं! खाली वाचा
मला आवडलेला प्रश्न -
माझे उत्तर पुन्हा ईईईईईई
खाली प्लेटा आम्ही ड्रावरमधल्या र्याकमध्ये ठेवतो, ती तिथेच असावी.
किंवा सूत्रसंचालिका किंचित चुकली असेल. तिला 'प्लेट खालीची आहे' असे म्हणायचे असेल. होतं असं कधीतरी त्यात तिची खाल उधेडण्यासारखं काही नाही. ;-)
प्लेट खाली आहे
अहो प्लेट खाली आहे म्हणजे ती रिकामी आहे. तुमच्यासारख्या झंटलमण लोकांना येवढं शिंपल मराठी कळत नाही?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हे आवडलं
तुमच्यासारख्या झंटलमण लोकांना येवढं शिंपल मराठी कळत नाही?
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
असा मी असामी
(आजकाल दुर्मिळ झालेल्या) हुशार वाचकांच्या लक्षात आले असेल की वरील वाक्य हे धोंडो भिकाजी जोशी हे मास्टर शंकरच्या हेडमाष्टरीण बाईंना (आपली सरोज खरे) भेटायला गेले असता तिथल्या शिपायाने म्हटलेल्या वाक्यावरून घेतलेले (ढापलेले!) आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
कर्णा
किंचित दुरुस्ती
(आपली सरोज खरे) असे नाही
आ'व'ली सरोज खरे! (ओष्ठशलाका आड येते ना! ;)
चतुरंग
दुर्मिळ
चाणाक्ष वाचक तितकेही दुर्मिळ नाहीत म्हणायचे.
आवला,
(चाणाक्ष) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
जय मराठीच्या लेखिका
या लेखाच्या लेखिका नावावरून अस्मादिकांची फार जवळची मैत्रिण (१ली ते दहावी शाळेतला शेवटचा बाक) असण्याची शक्यता वाटते. तशी एका नावाची अनेक माणसे असू शकतात पण लेखनाच्या विषयावरून आणि अमराठी नवरोबांवरून (हे ही दाक्षिणात्यच) पुष्टी मिळते असे वाटते. :-)
मेघना पूर्वी झी न्यूजची मुख्य वार्ताहर होती.
असो, इमेल करून विचारायला हवे.
खो खो खो....
'जागा ग्राहक जागा' पण असलाच एक प्रकार आहे. थोडक्यात काय तर हिंदीतला 'जागो ग्राहक जागो' पेक्षा मराठीतला ग्राहक आधीच जागा होऊन बसलेला आहे. नक्कीच आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
आता सौंदर्याची भीती कशाला ने आमचे बापूस लई चिडतात. ;-)
अजून एक किस्सा सांगतो. माझी आई ज्युनि. कालेजात राज्यशास्त्र शिकवते. पेपरात अण्वस्त्र बंदीवर टीप (की टिप?) लिहा असा प्रश्न असताना अनेकांनी अन्न वस्त्र कसे आवश्यक आहे सांगून बंदी मोडून काढण्यासाठी तावच्या ताव लिहले होते. मग शुद्धलेखनाबद्दल बोलायलाच नको, नाही का?
-सौरभ
============
'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'
जागा ग्राहक जागा
हे तर मला 'पाणी आई पाणी' असा पाण्यासाठी टाहो फोडण्याच्या धर्तीवर जागेसाठी फोडलेला टाहो असेच वाटते.
असो. अण्वस्त्र खासच!
झांझीबार! झांझीबार !! आणि खाल उधडणे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
....."मला वाटतं ते वाक्य "तुझी प्लेट तर खाल्लीच आहे." असं असावं. बरोबरच आहे - डाएटवर आहे, काही घेतलं नाही, मग इतकी भूक लागते की काहीही न सुचून प्लेट खाल्ली जायचीच!"
....हा श्री.वेडा मुलगा यांचा उपप्रतिसाद फारच आवडला. शेवटचे कंसात टाकलेले:
"(सोपे पर्याय उपलब्ध असताना अवघड पर्याय काढू नये. असो.)"
..हे वाक्य म्हणजे तर सर्वांवर कडीच आहे.वा! छानच!! उत्तम विनोदी लेखन करण्याचे गुण श्री. वेडा मुलगा यांच्या अंगी निश्चित आहेत.
*****
प्रियाली यांना 'खाली' शब्दावरील कोटी चांगली साधली आहे." उधडणे'' हे कियापद मात्र माझ्या वाचनात आले नव्हते.
उधेडना
मराठीत उधेडणे असे क्रियापद नसावेच :-) सोलणे असे असावे पण परभाषिक शब्द घुसडायचे झालेच तर हिंदीतील उधेडना मराठीत उधडणे होऊ शकेल.
उधेडना
उधेडना म्हणजे सोलणे नव्हे तर, उसवणे, विसकटणे, विखुरणे, उधडणे. तसेच उखडना म्हणजे उखडणे, उखळणे(=ढळणे, सुटणे, उकरणे), विचलित होणे, हटणे, विलग होणे किंवा शिवण उसवणे(=उधेडना)
मराठीत उधडणे म्हणजे उसवणे, फाडणे, धुडकावणे.
प्रियालींचा 'खाल उधेडना' अगदी योग्य प्रयोग आहे. --वाचक्नवी
वाचनीय
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आजानुकर्ण यांनी उद्धृत केलेला लेख आणि त्यावरचे (म्हणजे खालचे) एकापेक्षा एक वरचढ प्रतिसाद हे सगळे वाचनीय आहे.बर्याच दिवसांनी इतके उत्तम विनोदी लेखन वाचले.श्री. सौरभदा यांचे अण्वस्त्र आणि अन्नवस्त्र हे सुद्धा निखळ विनोदी आहे.
* श्री. आ'कर्ण सुचवतात :"तुम्ही असे प्रश्न लिहा" .पण हे सोपे नाही. त्या लेखिकेने लिहिले आहेत तसे प्रश्न आणि उत्तरपर्याय लिहिणे सोपे नसावे.(मी प्रयत्न करून पाहिला. पण काही चांगले सुचले नाही.) श्री.वेडा मुलगा, सौरभदा, प्रियाली ही मंडळी मनावर घेतील तर चांगले प्रश्न काढू शकतील.
सहमत आहे.
श्री. यनावाला यांनी उद्धृत केलेले एकापेक्षा एक वरचढ प्रतिसादाचे निरिक्षण आणि श्री. यनावाला सुचवतात की, श्री.वेडा मुलगा, सौरभदा, प्रियाली ही मंडळी मनावर घेतील तर चांगले प्रश्न काढू शकतील. या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. :)
-दिलीप बिरुटे
(यनासरांच्या कोड्यांचा वाचक फॅन)
पुरवणी प्रश्नपत्रिका
खालील वाक्ये वाचा आणि काहीच करु नका. जमलं तरच प्रश्नांची उत्तरे द्या!
१) बोंबला! दुसर्यांदा पीसी हॅंग झाला. चल ’परत रिस्टार्ट’ कर.!
तुमचा पीसी किती वेळा हॅंग होतो? परत रिस्टार्ट करण्यावर तुमचे काय मत आहे?
२) अय्या, फंडू जीन्स आहे यार! आणि वरचा टॉप कोणत्या कलरचा घेतलास?
तुम्ही कोणत्या रंगाचा वरचा टॉप वापरता? वरचा टॉप न वापरता नुसता टॉप वापरत असाल तर तसे सांगा.
३)साधा कॉमन सेन्स नाहीये तुला?
म्हणजे नक्की काय? कॉमन सेन्स असेल तरच या प्रश्नाचे उत्तर द्या.
अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न:
एका प्रसिद्ध वाहिनीवरच्या प्रसिद्ध गाण्याच्या कार्यक्रमातले अचाट आणि भयंकर सुंदर प्रतिक्रियांचे त्या त्या परीक्षकाला अभिप्रेत ( ह्यातलं प्रेत मला फार आवडतं) असलेले अर्थ सांगा.
१) "काय सॉल्लिड गायलायस तू"
अ- तू दगडासारखं गायलास.
ब- टिकाऊ गायलास.
क- द्रवरुप किंवा वायूरुप गायला नाहीस म्हणून सॉलिड गायलास.
२)"कीप इट अप"
अ- ते वर ठेऊन दे ;-)
ब- चालू दे तुझं रडगाणं
क- तू चालू आहेस!
३) आज तू इतकी स्वीट दिसत आहेस ना!
अ- गोडगोडुली दिसत आहेस.
ब- काही परप्रांतीय लोकांच्या दुकानात मिळणार्या स्वीट्स सारखी दिसत आहेस.
क- मला तुझा वीट आला आहे. सखेद, सस्मित यासारखा सवीट.
४)फुल थ्रोटेड सिंगींगच मला हवे होते.
अ- गळ्याशी आलेले गाणे
ब- बेंबीच्या देठापासूनचे गाणे
क- ग(ल्ला)ळाभरु गाणे
५)हायर नोट्स तेवढे क्लिअर लागले नाहीत.
अ- लोअर नोट्स क्लिअर लागले
ब- तुलाना 'नी' मिळणार नाही
क- तुझ्याकडे किती नोटा आहेत?
संदर्भासाठी उपरनिर्दिष्ट (व्व्वा!) कार्यक्रम सोमवारी आणि मंगळवारी रात्रौ ;-) संबंधित वाहिनीवर बघता येईल.
आणि आता एक दृक चाचणी!
खालील चित्र नीट बघा.
या हॉटेलात तुम्ही जाणार का नाही जाणार? जाणार असल्यास का आणि जाणार नसल्यास का जाणार नाही?
-(कूल डूड)सौरभदा
============
'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'
मंथली बेसिकवर जेवण मिळेल
"मंथली बेसिकवर जेवण मिळेल" अशी पाटीही काही दिवसांपूर्वी पुण्यात बघितली होती. तिची आठवण झाली.
बेसिक!
धन्य.
असे हवे होते !
"मंथली बेसिसवर लंच / डिनर मिळेल" असे हवे होते!
नशीब!
आम्ही एका मेसच्या पाटीवर 'येथे J1 मिळेल' असे वाचले होते. आता बोला!
आपला,
(A1) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हा हा हा
हा हा हा सही! संध्याकाळी ह्या हाटेलाच्या बाहेर "J1 रेD आहे " अशी पाटी पण लावतात का हो?
१३ मेरा ७
१३ मेरा ७ अश्या सायकल पाट्या फार प्रसिद्ध होत्या.
मात्र मला फार आवडलेली खालील मजकुराची पाटी अर्थातच आमच्या गावात बघायला मिळाली होती. नंतर कुठे पाहायला मिळाली नाही.
A३० का जाऊ?
आपला,
(रोमिओ) आजानुकर्ण
लहानपणी एका मैत्रिणीने काकांना लिहिलेल्या पत्रात प्रिय काका असे लिहिले होते. तेव्हा सवयीप्रमाणे आम्ही चूक शोधून तिथे तीर्थस्वरूप हवे हे सांगताना ती.स्व. लिही असे सांगितले. तिने ३० व असे लिहिले.
आपला,
(स्मृतीरमण) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बदलती मराठी
- (कीसकाढू) टग्या - हा सुद्धा बदलत्या मराठीचा नमुना का? :)
खालील शब्द ओळखा
J1 हा जर मराठी शब्द असेल तर खालील शब्द कोणते?
काल१
माल१
बोळ१
आणि हे कोणते?
८१
६०१
प्रतिसाद एक नूर डिश्क्लेमर दसनूर
प्रतिसादापेक्षा डिस्क्लेमर आवडला.
माहितीपूर्ण वाटला. ;-)
नोटा
तुझ्याकडे किती नोटा आहेत?
नोटा आवडल्या. एका प्रकारच्या नोटा तर सर्वांनाच आवडतात :)
काही परप्रांतीय लोकांच्या दुकानात मिळणार्या स्वीट्स सारखी दिसत आहेस.
परप्रांतिय का बुवा? चिबंमि/काह इ. ना विसरलात का? :)
बाकी याच धर्तीवर ऐकलेले काही :
पिवळा पीतांबर
मागची ब्याकग्राउंड
त्या शब्दाखाली अंडरलाइन करा :)
सचिनच्या शॉटचा मी परत रिप्ले पाहिला.
----
ह्मम्........
चिबंमि/काह आहेतच पण परप्रांतीय लोकांच्या दिसायला भारी असतात. भरपूर रंगीबिरंगी ;-)
-(बंगाली मिठाई प्रेमी) सौरभदा
=============
'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'
विषय?
परप्रांतीय लोकांच्या दिसायला भारी असतात. भरपूर रंगीबिरंगी ;-)
मिठाया की ...? ;-)
----
शांतं पापं...
मला तरी मराठीच आवडतात. आपल्याकडे एवढ्या चांगल्या असताना उगाच कशाला दुसरीकडे जा?
संदर्भानुसार/आवडीनुसार अर्थ घ्या असं चित्तंनी पुढे म्हटलंच आहे. ;-)
आजचा नवीन सुविचार
"मनी वसे ते प्रतिसादात दिसे" ;-)
-(चार हात लांब राहणारा, चार हात न झालेला) सौरभ.
===========
'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'
बंमि
बंमि ह्या पांढऱ्या व्हैट्ट किंवा तत्सम शेडच्या असतात. इतर उत्तर भारतीय मिठाया रंगीबेरंगी असतात असे वाटते
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
+१
१०००००००% सहमत.
मलाही बंगाली आवडतात.
(बंगालीप्रेमी) सुनीलदा
वा वा..
वा वा..
मासिक मेंबर्स आणि चित्त यांनी सांगीतलेले महिन्याच्या बेसिक वरच्या पाट्या आवडल्या.
--लिखाळ.
भटारखान्याची संचालिका
मावशी असेल तर मावसोबाचे मटण मिळणे दुरापास्त नसावे.
स्पेशलयुक्त
जेवणानंतर 'स्पेशलयुक्त' चहा मिळणार असेल तर नक्की.
मौसाहारी
या 'मौसाहारी' वर 'मावशीचा हरी = मौसाहारी' अशी एक पाचकळ कोटी सौजन्याची ऐशीतैशी नामे नाटकात ऐकली होती त्याची आठवण झाली.
प्लेट खाली असणे
मराठीत "प्लेट 'खाली' असणे" चा अर्थ "प्लेट 'रिकामी' असणे"देखील होतो असे म्हटल्यासही चूक नाही. वर्हाडात-विदर्भात 'रिकामा' ह्या शब्दासाठी 'खाली' हा शब्द सर्रास वापरतात.
मी
मी खाली आहे याचा अर्थ काय घ्यावा? :)
संदर्भानुसार घ्यावा.
संदर्भानुसार घ्यावा, काढावा.