मंगेश....!

एक नम्र निवेदन : उपक्रमाच्या दिवा़ळी अंकात हा लेख पाठवायची माझी मनापासून इच्छा होती. परंतु दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर कोण मंडळी आहेत, या प्रश्नाचं उत्तर मला उपक्रमाकडून मिळालं नाही. सबब, इच्छा असूनही उपक्रमाच्या दिवाळी अंकात मला हा लेख देता आला नाही! म्हणून तो मी येथे देत आहे. उपक्रमाच्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध करता आला असता तर मला अधिक आनंद वाटला असता.. असो.

राम राम मंडळी,

तानपुरा, तंबोरा...!

आपल्या भारतीय संगीताचा आधार...!

आपलं भारतीय अभिजात संगीत हे अक्षरश: तानपुर्‍याच्या चार तारांवर उभं आहे असं म्हटल्यास ती अतिशोयोक्ति ठरू नये...

या वाद्याचा इतिहास काय, जन्म केव्हा, याबद्दल मला माहीत नाही. परंतु गेली २५ वर्ष तरी मी हे वाद्य हाताळतो आहे, या आधारावर तानपुर्‍याविषयी ढोबळ असे माहितीप्रद चार शब्द लिहू इच्छितो म्हणून या लेखाचे प्रयोजन..!

ही माहिती मला पं अच्युतराव अभ्यंकर, किराणा गायकीचे दिग्गज पं फिरोज दस्तूर, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांच्याकडून मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मिरज या बीनकारांच्या माहेरघर असलेल्या शहरातील काही कारागिरांकडूनही मला या वाद्याविषयी, विशेष करून याच्या ट्युनिंगविषयी खूप काही शिकायला मिळालं आहे. हा लेख लिहितांना मी या सर्वांचे ऋण व्यक्त करू इच्छितो...

१) तानपुर्‍याच्या खुंट्या.

तानपुरा लावताना (ट्यून करताना) सर्वप्रथम या खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल (उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,) त्या स्वरात लावण्याकरता या खुंट्यांचा वापर केला जातो..

२) तानपुर्‍याचा भोपळा.

तानपुरा या वाद्याचा जो आवाज असतो तो आवाज येण्याकरता हा भोपळाच अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. तानपुर्‍याची तार छेडल्यावर त्यातनं जो टणकार उमटतो तो टणकार या पोकळ भोपळ्यात घुमतो आणि एका घुमार्याच्या स्वरुपात हा आवाज आपल्याला ऐकू येतो..

तानपुर्‍याकरता लागणार्या भोपळ्यांची विशेष मशागत केली जाते. त्यानंतर ते भोपळे ७५ टक्के कापून त्यातील मगज बाहेर काढला जातो व ते रिकामे भोपळे कडकडीत उन्हात वाळवले जातात..

३) घोडी किंवा ब्रिड्ज.

ह्याला तानपुर्‍याचा प्राण म्हणता येईल. तानपुर्‍याच्या तारा ह्या खुंटी ते भोपळ्याची मागील बाजू, अश्या बांधलेल्या असतात. त्या तारा ह्या घोडीवरून गेलेल्या असतात. तार छेडल्यानंतर तारेतून टणकार उत्पन्न करण्याचं काम ही घोडी करते.

४) जवार आणि मणी.

जवार किंवा जवारी हिला तानपुरा वादनात अनन्यसाधारण महत्व आहे. आपण जर वरील चित्र नीट पाहिलंत तर त्यात तानपुर्‍याच्या तारा आपल्याला घोडीवरून गेलेल्या दिसतील आणि घोडीच्या मधोमध तारेच्या खाली आपल्याला एक बारील दोरा दिसेल. तानपुर्‍यातून गोळीबंद व गोलाकार आवाज येण्याकरता हा दोराच अत्यंत महत्वाची भूमिका निभावतो. त्याकरता तानपुर्‍याची घोडी कानसेने, पॉलिश पेपरने एका विशिष्ठ पद्धतीने घासावी लागते. ह्यालाच तानपुर्‍याची 'जवार काढणे' असे म्हणतात. हे अत्यंत कठीण काम आहे. ही जवार अतिशय सुपरफाईन पद्धतीने काढावी लागते. त्यामुळे दोरा तारेतून आत सरकवल्यावर घोडीच्या मध्यभागी एका विशिष्ठ ठिकाणी अडतो आणि बरोब्बर त्याच जागेवर तार छेडली असता घोडीतून गोलाकार, गोळीबंद असा टणकार उत्पन्न होतो. हा दोरा घोडीच्या एका ठराविक जागी असतांनाच तानपुर्‍यातून सुरेल व मोकळा टणकार ऐकू येतो. ह्यालाच "जवारी लागली" असे म्हणतात.

जमिनीत काही अंतरावर खोदकाम केल्यावर जसा छानसा पाण्याचा झरा लागतो, अगदी तीच उपमा "जवारी लागण्याला" देता येईल! :)

हा दोरा जरा थोडासा जरी आपल्या जागेवरून हालला तर तारेतून मोकळा टणकार उत्पन्न न होता बद्द आवाज ऐकू येतो. जवारीच्या जागी उत्पन्न झालेला टणकार पोकळ भोपळ्यात घुमून त्या भोपळ्यातनं अतिशय सुंदर असा गोलाकार ध्वनी ऐकू येतो...!

वर उल्लेख केल्याप्रमाणे तानपुरा कारागिरीत पिढ्यान पिढ्या असलेले मिरजेतील काही कारागीर, दस्तूरबुवा यांच्याकडून मला जवारी काढण्याचे धडे मिळाले हे माझं भाग्य! काही वेळेला अण्णांकडूनही मला उत्तम जवारी कशी असावी, कशी लावावी, तानपुरा कसा गोळीबंद बोलला पाहिजे, कसा मिळून आला पाहिजे याबाबत थोडंफार शिकायला मिळालं आहे!

घोडीच्या पुढे दिसणारे मणी हे तानपुर्‍याच्या फाईन ट्युनिंगकरता वापरले जातात. स्वरांचे सूक्ष्म फरक या मण्यांच्या साहाय्यानेच सुधारले जातात.

५) तानपुर्‍याचे लागणे.

अरे देवा! हा तर खूप म्हणजे खूप मोठा विषय आहे आणि याबाबत अधिकारवाणीने काही लिहिणे ही माझी पात्रता नाही! उत्तम तानपुरा लावणे ही आयुष्यभर करत रहायची साधना आहे.

असो, इथे फक्त ढोबळ मानाने इतकंच लिहू इच्छितो की तानपुर्‍याच्या पहिल्या तारेवर रागानुसार मंद्र पंचम, किंवा मंद्र शुद्ध मध्यम, किंवा मंद्र शुद्ध निषाद लावला जातो, मधल्या दोन तारांना 'जोड' असं म्हणतात आणि या तारांवर मध्य षड्ज लावला जातो आणि शेवटची तार ही खर्जाची असते आणि त्यावर खर्जातला षड्ज (मंद्र षड्ज) लावला जातो. शेवटची खर्जाची तार ही नेहमी तांब्याची असते आणि इतर तीन तारा या स्टीलच्या असतात.

वर उल्लेखलेल्या गुरु मंडळींकडून थोडाफार तानपुरा लावायला शिकलो आहे, त्याची एक झलक आपल्याला इथे पाहता येईल..

असो,

तर मंडळी, असं हे एक ढोबळ तानपुरा आख्यान! उत्तम जवारीदार तानपुरा लागणे आणि त्यावर त्याच तानपुर्‍याशी मिळताजुळता, एकरूप होणार स्वर मानवी गळ्यातून उमटणे ह्याला मी तरी केवळ अन् केवळ "देवत्वा"चीच उपमा देईन..

सुरेल तानपुर्‍याइतकेच सुरेल बाबुजी!

स्वरभास्कर तानपुरा जुळवताहेत...!

मंडळी, असं म्हणतात की तानपुर्‍यात ईश्वर वास करतो. काही ठिकाणी अशीही मान्यता आहे की तानपुरा हे शंकराचं रूप आहे! ह्यातला आध्यात्मिक किंवा खरंखोटं, हा भाग सोडून द्या कारण या लेखाचा तो मुख्य मुद्दा नाही. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या लहानपणीची एक आठवण या निमित्ताने जाता जाता सांगाविशी वाटते...

लतादिदींना लहानपणी अगदी थोडा म्हणजे अगदी थोडा काळ त्यांच्या वडिलांकडून - मास्टर दिनानाथरावांकडून गाण्याचं शिक्षण मिळालं. मास्टर दिनानाथ नेहमी लतादिदींना म्हणत,

"तो तानपुरा आहे ना, तो मंगेश आहे बरं का! त्यावर नेहमी श्रद्धा ठेव, तो तुला निश्चित प्रसन्न होईल...!

सर्व उपक्रमीना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

-- तात्या अभ्यंकर.

Comments

साभार..

पहिलं, सहावं, सातवं आणि आठवं चित्र आंतरजालावरून साभार...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

प्रस्तावना

उपक्रमाच्या दिवा़ळी अंकात हा लेख पाठवायची माझी मनापासून इच्छा होती. परंतु दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर कोण मंडळी आहेत, या प्रश्नाचं उत्तर मला उपक्रमाकडून मिळालं नाही. सबब, इच्छा असूनही उपक्रमाच्या दिवाळी अंकात मला हा लेख देता आला नाही! म्हणून तो मी येथे देत आहे. उपक्रमाच्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध करता आला असता तर मला अधिक आनंद वाटला असता.. असो.

मराठी संकेतस्थळे म्हंटलं की हे सगळ चालायचंच! लोकशाहीप्रणीत स्थळ काढतो सगळे पारदर्शक ठेवतो म्हणणार्‍यांना तरी ते कुठं जमलय? तेव्हा तुमच्या ह्या माहितीपूर्ण लेखाला सदर प्रस्तावना अनावश्यक वाटली.

सहमत

सहमत. पण .... आता काय लिहायचं? समजुन घ्या. :)





:)

मराठी संकेतस्थळे म्हंटलं की हे सगळ चालायचंच!

हो ना! पण मी कुठे काय तक्रार केली आहे? मी फक्त निवेदन दिले आहे...

लोकशाहीप्रणीत स्थळ काढतो सगळे पारदर्शक ठेवतो म्हणणार्‍यांना तरी ते कुठं जमलय?

अगदी खरं आहे! फक्त काही संस्थळांवर लोकशाही असो वा नसो, परंतु संपादक मंडळी कोण आहेत, खरडफळ्याची संपादक मंडळी कोणं आहेत याची तरी निदान माहिती आहे! :)

तेव्हा तुमच्या ह्या माहितीपूर्ण लेखाला

सदर लेख आपल्याला माहितीपूर्ण वाटल्याबद्दल धन्यवाद. आमचे लिहिण्याचे कष्ट सार्थकी लागले म्हणायचे! :)

सदर प्रस्तावना अनावश्यक वाटली.

प्रत्येकाची मतं! मी आपल्या मताचा आदर करतो...!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सहमत

सहमत आहे. इथे 'यस मिनिस्टर' आठवले. :)
"It's another one of those irregular verbs, isn't it? I give confidential briefings, you leak, he is being prosecuted under Section 2a of the Official Secrets Act."

--
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

सहमत

लोकशाहीप्रणीत स्थळ काढतो सगळे पारदर्शक ठेवतो म्हणणार्‍यांना तरी ते कुठं जमलय? तेव्हा तुमच्या ह्या माहितीपूर्ण लेखाला सदर प्रस्तावना अनावश्यक वाटली.

कोलबेरपंतांशी सहमत आहे.

यालाच आमच्याकडे "स्वत:च ठेवायचं झाकून" या शब्दप्रयोगांनी सुरु होणारी म्हण वापरली जाते.

बाकी लेख अंमळ माहितीपूर्ण वाटला.

आपला,
(माहितगार) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दिवाळीच्या शुभेच्छा

लेख चांगला उतरला आहे. तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा!

तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल (उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,) त्या स्वरात लावण्याकरता या खुंट्यांचा वापर केला जातो..

हे ४/५, १/२ काळी-पांढरी वगैरे फारसे कळले नाही. थोडे विस्ताराने यायला हवे होते.

तानपुर्‍याला कोणता भोपळा लागतो? लाल का? मग तो सपाट नसतो, त्याला शिरा असतात त्या तासून घेतल्या जातात की सपाट भोपळाच येतो.

अवांतरः

उपक्रमाच्या दिवा़ळी अंकात हा लेख पाठवायची माझी मनापासून इच्छा होती. परंतु दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर कोण मंडळी आहेत, या प्रश्नाचं उत्तर मला उपक्रमाकडून मिळालं नाही. सबब, इच्छा असूनही उपक्रमाच्या दिवाळी अंकात मला हा लेख देता आला नाही! म्हणून तो मी येथे देत आहे. उपक्रमाच्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध करता आला असता तर मला अधिक आनंद वाटला असता.. असो.

संपादन मंडळावर मंडळी आहेत हे कशावरून? हे संपूर्ण संकेतस्थळ केवळ एकानेच अस्तित्वात आणलं असा माझा समज होता तर काही चांगले लेख एकत्र गुंफणारा अंक ते स्वतःच तयार करू शकतात असे वाटत नाही का? :-) त्यामुळे हे अनावश्यक वाटले. त्यापेक्षा असा चांगला लेख विश्वासाने सुपूर्त केला असता तर बरे वाटले असते. असो.

:)

भारताबाहेरचे भोपळे वापरले जातात का? भारताबाहेर सुद्धा भोपळे मिळतात पण तिथे का नाही बनत?
बाकी प्रियालींचे सगळे मुद्दे रास्त वाटले. खास करुन संपादना बद्दलचे.

अवांतरः पाकिस्तानात लोकशाही असो वा हुकुमशाही. जे चालायच ते चालतंच. उगाच कोणत्या महामंडळावर कोण आहे ते सांगुन पाकिस्तानाचा हिंदुस्थान थोडाच होतो. असो, शेवटी पाकिस्तान सुद्धा एक देश आहे. तिकडे काही का चालेना?
हा प्रतिसाद संपादित होण्यास माझा कोणताही विरोध नाही.





:)

संपादन मंडळावर मंडळी आहेत हे कशावरून? हे संपूर्ण संकेतस्थळ केवळ एकानेच अस्तित्वात आणलं असा माझा समज होता तर काही चांगले लेख एकत्र गुंफणारा अंक ते स्वतःच तयार करू शकतात असे वाटत नाही का? :-) त्यामुळे हे अनावश्यक वाटले.

प्रियालीजी,

आपल्या खरडवहीत वरील प्रश्नाचा खुलासा केला आहे...

धन्यवाद! :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

विषयांतर..

येथील विषयांतर टाळण्याकरता नम्र निवेदनाविषयीची उत्तरे संबंधित सभासदांना यापुढे खरडवहीतून अथवा व्य नि द्वारे दिली जातील..

असो,

आपला,
(शिस्तशीर) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

चांगला लेख

तानपुर्‍याची ओळख करून देणारा लेख आवडला.

एक शंका :
मंद्र सप्तकातला निषाद म्हणजे मध्य सप्तकातल्या षड्जाच्या लगेच खालचा सुर ना?

सा.(चौथी तार) -- म./प./-/नि.(पहिली तार) सा,सा (जोड)
असा मंद्र सप्तकातून मध्य सप्तकापर्यंत जाणारा सुरानुक्रम बरोबर आहे ना?

असे असल्यास समजले. नाहीतर तानपुर्‍यात निषाद लावण्याबद्दल मला जरा अज्ञानमूलक कोडे पडले आहे.

छान लेख

लेख खूप आवडला. खरेच खूप माहितीपूर्ण आहे.

यूट्यूब वरच्या तुमच्या बाकीच्या चित्रफितीही यानिमित्ताने पाहिल्या. छान आहेत!

तात्याचा मोठेपणा.

तात्या स्वत एक संकेतस्थळाचे प्रवर्तक आहेत. इतका माहितीपूर्ण लेख आपला / परका असा भेदभाव न करता त्यांनी मोठ्या आणि खुल्या मनाने उपक्रमवर टाकला याबद्दल मला त्यांचे कौतुकच करावेसे वाटते.

असाच मोठेपणा आपल्यातील मतमतांतर ठेवत / राखत सर्वांनीच दाखवला तर मराठीचे पाऊल पुढेच पडेल यात काय शंका?

धन्यवाद,

कलंत्रीसाहेब, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... :)

तात्या.

--
अवघा रंग एक झाला,
रंगी रंगला श्रीरंग!

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अजब न्याय

तुम्ही आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. धन्यवादाच्या प्रतिसादा पेक्षा एखादा अभ्यासपुर्ण/माहितीपुर्ण प्रतिसाद वाचायला आवडला असता.
बाय द वे, तंबोरा, सतार आणि तत्सम वाद्यांमध्ये काय फरक असतो? पाश्चात्यांना भोपळा उपलब्ध असताना त्यांनी गिटार का बनवले असावे? तंतु वाद्यांबद्दल सविस्तर आणि अभ्यासपुर्ण आणि त्याच त्याच लोकांची छायाचित्रे सोडून इतर लोकांची सुद्धा छायाचित्रे असलेला लेख वाचायला नक्की आवडेल.

काही मजकूर संपादित.

छान लेख..

माहितीपूर्ण होता.
पण चित्रे थोडी अजून स्पष्ट हवी होती.

-सौरभ.

आभार/उत्तरे...

सर्व प्रतिसादींचे मन:पूर्वक आभार...

काही उत्तरे देण्याचा हा एक प्रयत्न -

हे ४/५, १/२ काळी-पांढरी वगैरे फारसे कळले नाही. थोडे विस्ताराने यायला हवे होते.

यांना पट्ट्या किंव स्केल असे म्हटले जाते. स्त्रियांची सर्वसाधारणपणे काळी ४/५ ही पट्टी असते तर पुरुषांची काळी १ किंवा २ ही पट्टी असते. पूर्वीचे काही गवई जसे सवाईगंधर्व, रामभाऊ मराठे, अब्दुलकरीमखासाहेब यांची पट्टी पांढरी ४ असे..

तानपुर्‍याला कोणता भोपळा लागतो? लाल का? मग तो सपाट नसतो, त्याला शिरा असतात त्या तासून घेतल्या जातात की सपाट भोपळाच येतो.
भारताबाहेरचे भोपळे वापरले जातात का? भारताबाहेर सुद्धा भोपळे मिळतात पण तिथे का नाही बनत?

वरील प्रश्नांची उत्तरे मला माहीत नाहीत. तानपुर्‍याच्या भोपळ्यांच्या बाबतीत जी माहिती मला मिरजेच्या कारागिरांकडून मिळाली आहे तेवढीच फक्त मी लिहिली आहे.

एक शंका :
मंद्र सप्तकातला निषाद म्हणजे मध्य सप्तकातल्या षड्जाच्या लगेच खालचा सुर ना?

हो.. याला षड्जाच्या खाली 'अर्धा स्वर' असेही म्हणता येईल..

सा.(चौथी तार) -- म./प./-/नि.(पहिली तार) सा,सा (जोड)
असा मंद्र सप्तकातून मध्य सप्तकापर्यंत जाणारा सुरानुक्रम बरोबर आहे ना?

पहिली तार मंद्र शुद्ध मध्यम/पंचम/शुद्ध निषाद, दुसरी व तिसरी (जोड) मध्य सा, व चौथी खर्ज सा.

यूट्यूब वरच्या तुमच्या बाकीच्या चित्रफितीही यानिमित्ताने पाहिल्या. छान आहेत!

अनेक आभार...

बाय द वे, तंबोरा, सतार आणि तत्सम वाद्यांमध्ये काय फरक असतो?

ही सर्व 'तंतूवाद्य' या प्रकारात मोडणारी वाद्य असली तरी इतर तंतूवाद्य आणि तंबोरा यात खूप फरक आहे. तंबोरा हे केवळ गायक/वादकाला आधार स्वर पुरवणारे वाद्य आहे. त्यावर एखाद्या रागाची अथवा गाण्याची अभिव्यक्ति करता येत नाही. परंतु सतार, सरोद, व्हायोलीन ही स्वतंत्र अभिव्यक्ति करणारी वाद्ये आहेत. यावर स्वतंत्र वादन करता येते. तांत्रिक दृष्ट्याही सतार, सरोद इत्यादी वाद्ये तंबोर्‍यापेक्षा वेगळी आहेत. या वाद्यांचे तारा, तराफे यात पुष्कळ फरक आहे इतकंच सांगू इच्छितो. विस्तृत माहिती माझ्यापाशी नाही.

पाश्चात्यांना भोपळा उपलब्ध असताना त्यांनी गिटार का बनवले असावे?

मुळात गिटार आणि तंबोरा ह्या वाद्यांच्या वादनातच सतार, सरोदप्रमाणे बराच फरक आहे. गिटार या वाद्यातही एखादी ट्यून तिच्या अंगभूत लयीसकट जशी वाजवता येते तसे तंबोर्‍यात करता येत नाही.

पण चित्रे थोडी अजून स्पष्ट हवी होती.

काही चित्रे आंतरजालावरून साभार घेतली आहेत आणि तानपुर्‍याची चित्रे मी माझ्या भ्रमणध्वनीचा वापर करून घेतली आहेत. माझ्या भ्रमणद्वनीद्वारे काढण्यात आलेल्या प्रकाशचित्रांना तांत्रिक मर्यादा असल्यामुळे ही चित्रे आपल्याला अस्पष्ट वाटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही..

असो, यथाशक्ति उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तिगत रोख असलेले प्रश्न टाळले आहेत..

सर्वांचे पुन्हा एकदा आभार...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

व्वा !!!

तानपुर्‍याची ओळख करून देणारा लेख आवडला.

तात्या स्वत एक संकेतस्थळाचे प्रवर्तक आहेत. इतका माहितीपूर्ण लेख आपला / परका असा भेदभाव न करता त्यांनी मोठ्या आणि खुल्या मनाने उपक्रमवर टाकला याबद्दल मला त्यांचे कौतुकच करावेसे वाटते.

असाच मोठेपणा आपल्यातील मतमतांतर ठेवत / राखत सर्वांनीच दाखवला तर मराठीचे पाऊल पुढेच पडेल यात काय शंका?

द्वारकानाथ यांच्या मताशी सहमत आहे.

-दिलीप बिरुटे
(तात्याच्या लेखनाचा फॅन )

धन्यवाद,

प्रतिसादाबदल धन्यवाद बिरुटेसाहेब,

आपला,
(कोकणातला) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

काही मजकूर संपादित. व्यक्तिगत संवादासाठी कृपया खरडवहीचा वापर करावा.

छान माहिती

या लेखावरून तंबोर्‍याबद्दल थोडक्यात पण चांगली माहिती मिळाली.
तानपुरा लावताना (ट्यून करताना) सर्वप्रथम या खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल (उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,) त्या स्वरात लावण्याकरता या खुंट्यांचा वापर केला जातो..
असे लिहिले आहे, याबद्दल एक शंका आहे. बहुतेक गायकांना आपापल्या आवाजाचे वेगळे तंबोरे आणतांना पहातो. खुंट्या पिळून पट्टी बदलता येतात काय? त्याला मर्यादा असाव्यात.

मर्यादा..

बहुतेक गायकांना आपापल्या आवाजाचे वेगळे तंबोरे आणतांना पहातो. खुंट्या पिळून पट्टी बदलता येतात काय? त्याला मर्यादा असाव्यात.

खरे आहे. पट्टी बदलता येण्याकरता, ऍडजस्ट करण्याकरता खुंट्यांचाच वापर केला जातो. परंतु त्यालाही मर्यादा आहेतच. लेखात म्हटल्याप्रमाणे काळी ४/५, १/२, काळी ३/पांढरी ४ इत्यादी पट्ट्यांचे तानपुरे वेगवेगळे असतात व ते त्या त्या पट्ट्यातच लागू शकतात.

आपला,
(पुलंच्या भाषेतला 'पट्टी'चा गवई!) तात्या. :)

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

छान

छान

 
^ वर