बदलता काळ

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात महत्वाचे योगदान करणार्‍या दोन व्यक्तिंचे काल निधन झाले. पहिले, सिद्धहस्त लेखक श्री. रविंद्र पिंगे व दुसरे ख्यातनाम वादक व ऍरेंजर, श्री. श्यामराव कांबळे. दुर्दैवाने आजच्या म. टा. च्या संस्थळावर ह्या दोघांच्या निधनाचा कसलाही उल्लेख माझ्या निदर्शनास आला नाही. कुठेतरी आतल्या पानावर चार ओळी असतील तर ते माझ्या नजरेतून सुटले असण्याची शक्यता आहे. पण अशा रितीने कुठल्यातरी आतील पानावर चार ओळींवर बोळवण व्हावी, किंवा तेही नव्हे, अशा ह्या दोन्ही व्यक्ति खचितच नव्हत्या. काळ बदलत असतो, वगैरे सर्व खरे आहे. पण काल- परवापर्यंत ज्यांनी आमची जीवने समृद्ध केली, त्यांची अशी सरसकट उपेक्षा व्हावी, हे व्यक्तिशः मला व्यथित करून गेले.

Comments

श्रद्धांजली

आजच्या छापील लोकसत्तामधेतरी श्री. रविंद्र पिंगे यांची बातमी मुख्यपृष्ठावर आहे.. जालावर अजून पाहिले नाहि.
असो दोघांनाहि माझी नम्र श्रद्धांजली

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

मटा!

आजच्या(१८/१०/२००८) मटामध्ये रविंद्र पिंगे ह्यांच्या निधनाची बातमी मुखपृष्ठावर आहे. मात्र शामराव कांबळे ह्यांच्या निधनाची बातमी कोणत्याही पानावर दिलेली दिसत नाहीये जे खरेच आश्चर्यजनक आणि तितकेच शोचनीय आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अमिताभसाठी

अमिताभसाठी रेखाचं देवाशी भांडण अशा बातम्या मुखपृष्ठावर छापणार्‍या वर्तमानपत्राकडून अधिक अपेक्षा करणे रास्त नसावे. :)

काळ बदलला आहे आणि बदलत्या काळानुसार म.टा.चा दर्जा घसरला आहे हे उमजून घेणे अधिक योग्य वाटते.

बाकी, महाराष्ट्रातील दोन रत्ने निखळल्याचे वाईट वाटले.

सहमत

लेखात व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत आहे. वाचकांना कायम चटपटीतच वाचायला हवे असते, असा समज करून घेऊन बातम्या देणे हे नवीन धोरण वृत्तपत्रांनी स्वीकारले आहे, हे उघड आहे. ह्या गोष्टीशी असहमत असणारा वाचकवर्ग बहुमतात आहे की नाही ते माहीत नाही पण निदान तो सरसकट दुर्लक्ष करता येईल इतकाही लहान नसावा. या भावना संपादक/चालक-मालकवर्गापर्यंत परिणामकारकपणे पोचवायच्या असतील तर त्यासाठी काय करावे लागेल, याचाही विचार व्हायला हवा. वाचकांच्या पत्रव्यवहारातून काही फार साध्य होईल का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

भरतकुमार राऊत

या भावना संपादक/चालक-मालकवर्गापर्यंत परिणामकारकपणे पोचवायच्या असतील तर त्यासाठी काय करावे लागेल, याचाही विचार व्हायला हवा. वाचकांच्या पत्रव्यवहारातून काही फार साध्य होईल का?

म.टा.त वापरल्या जाणार्‍या इंग्रजाळलेल्या मराठीवरून कोणा वाचकांनी तक्रार केली होती आणि भरतकुमार राऊत यांनी उडवाउडवीचे धोरण स्वीकारले होते आणि नंतर दुर्लक्ष केले असे संकेतस्थळांवरच मागे वाचनात आले होते असे वाटते, नेमके आठवत नाही. चूक असल्यास कोणी सुधारून द्यावी आणि बरोबर असल्यास हा प्रकार कधी आणि कुठे घडला त्याचा दुवा दिला तर बरे होईल.

इथे

त्याविषयी झालेली चर्चा इथे पाहा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

क्रिकेट, सिनेमा आणि क्राईम

भारतातील सर्व माध्यमे 'क्रिकेट, सिनेमा आणि क्राईम' या तीन 'सी' मागे पागल झाली आहेत. या तीन गोष्टींनी बहुसंख्य भाग व्यापलेला असतो.


वाचकांना कायम चटपटीतच वाचायला हवे असते, असा समज करून घेऊन बातम्या देणे

'महाराष्ट्र टाईम्स' वरील 'मोस्ट इमेल्ड कंटेंट' बघितल्यास वाचकांना काय हवे आहे हे लक्षात येईल. ;)

मात्र मराठी वृत्तपत्रांमध्ये काम करणारी मंडळी (फुटकळ) इंग्रजी बातम्या आणि लेखांचे फक्त अनुवाद करुन देत आहेत हे सहज लक्षात येते. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये ज्याप्रमाणे 'जे जे देशी ते ते हिणकस' असे मानून साहित्य संमेलने, नाट्य संमेलने, संगीत महोत्सव, पुस्तक प्रदर्शने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले जाते. त्याच पावलांवर पाउल टाकून मराठी वृत्तपत्रे चालली आहेत असे दिसते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

नक्की कल्पना नाही पण

वाचकांच्या पत्रव्यवहारातून काही फार साध्य होईल का?

वृत्तपत्रात नियमित लिहिणारी आणि अश्या लोकांची दखल घेणारी अशी दोन्ही प्रकारची लोकं आहेत.

मी पण एकदा लिहिले होते भारत कुमारना. त्यांनी वर क्रिकेटची बातमी आणि खाली "ऑलिंपिक खेळांकडे कसे दुर्लक्ष होते" असे दोन अग्रलेख लिहिले होते. मी त्यांना पत्र लिहिले होते की ज्या दिवसापासून तुम्ही वर ऑलिंपिक खेळाविषयी आणि खाली क्रिकेट खेळाविषयी अश्या क्रमाने अग्रलेख छापाल त्या दिवसापासून ऑलिंपिक खेळाचे भवितव्य उज्ज्वल आहे ;)
_______________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

बातमी होती

रवींद्र पिंगे यांच्या निधनाची बातमी मटाने त्याच रात्री दिली होती. हा त्याचा दुवा.

काळ बदलला आहे आणि बदलत्या काळानुसार म.टा.चा दर्जा घसरला आहे हे उमजून घेणे अधिक योग्य वाटते.
हेच खरे आहे. सर्वच मराठी वर्तमानपत्रांची वाटचाल याच दिशेने सुरु आहे. इथे मटाची भलामण करण्याचा प्रयत्न नाही, परंतु एकूणच माध्यमांतील प्रवाहाबाबत मी बोलतोय. आज मटा ज्या दिशेने जात आहे त्याच मार्गावरून अन्य वर्तमानपत्रे जाणार आहेत, हे मी सहा वर्षे भाषिक वर्तमानपत्रांमध्ये घालविली असल्याने सांगू शकतो. एका मोठ्या वर्तमानपत्रात कामाला लागताना तुम्ही मराठीत कुशल असाला, मात्र भविष्याच्या दृष्टीने इंग्रजीचा सराव करा. कारण पंचवीस वर्षांनंतर मराठी वर्तमानपत्रे नसतील असे वर्तमानपत्राच्या मालकाने सांगितले होते.
वाचकांची पत्रे जागा भरण्यापलिकडे कोणत्याही कामाची नसतात, असा अनुभव आहे. सध्या वर्तमानपत्रे वाचकांऐवजी ग्राहकांना महत्त्व देतात. त्यामुळे त्यांचा आणि जाहिरातदारांचा दबावगट निर्माण होणे, हाच त्यावर उपाय आहे.

वा! मार्मिक

वाचकांची पत्रे जागा भरण्यापलिकडे कोणत्याही कामाची नसतात,

सध्या वर्तमानपत्रे वाचकांऐवजी ग्राहकांना महत्त्व देतात

डीडी राव, अत्यंत मार्मिक वाक्ये.. पटले.

बाकी, मटा चा मी गेले एक तप वाचक होतो आता अगदी असह्य झाल्यावर गेल्या महिन्यात लोकसत्ता चालु केला आहे. त्यातही बातम्या यथातथाच असतात पण पुरवण्यातून निदान काहि चांगले लेख काहि ललित लेखनही वाचायला मिळते हा हेतू

'पुढारी'च्या जालावरील बातम्यांवरून महाराष्ट्राशी थोडीशी जवळीक साधून आहे असे वाटते मात्र तो मुंबईत मिळत नाहि :(

(मुंबईत मराठी भाषेत एकहि महाराष्ट्राचे "वृत्तपत्र" निघते यावरून विश्वास उडालेला) ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

वाचकांचा पत्रव्यवहार

वाचकांचा पत्रव्यवहार हा प्रकार कसा चालतो त्याचे नेमके वर्णन नेमाड्यांनी केले आहे. चांगदेव पाटील हा माठूराम महाविद्यालयात असताना माठूराम यांना कुलगुरू होता यावे यासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी 'दैनिक समाजवाद' हे माठूरामचे वर्तमानपत्र आणि 'पुण्यामुंबईकडची वर्तमानपत्रे' यांत माठूरामसमर्थक वेगवेगळ्या नावाने पत्रांचा भडिमार करतात आणि सामान्य जनतेला त्यात तथ्य वाटू लागते.

अर्थात वेगवेगळ्या नावांचा हाच प्रकार काही मराठी संकेतस्थळांवरही दिसतो. (आणि सामान्य जनतेला त्यात तथ्यही वाटते.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

:-)

अर्थात वेगवेगळ्या नावांचा हाच प्रकार काही मराठी संकेतस्थळांवरही दिसतो. (आणि सामान्य जनतेला त्यात तथ्यही वाटते.)

नुसते तथ्यच नाही, टिनपाट लेखांना भरघोस प्रतिसाद मिळवून देण्याचा हा हल्ली एक ऑफिशिअल मार्ग आहे असे आम्ही ऐकून आहोत. :-)
----

लोकसत्ता.

त्यातही बातम्या यथातथाच असतात पण पुरवण्यातून निदान काहि चांगले लेख काहि ललित लेखनही वाचायला मिळते हा हेतू

लोकसत्ताची रविवार पुरवणी बर्‍याच अंशी वाचनीय असते हे खरेच. त्यामानाने सकाळच्या सप्तरंग पुरवणीत खास असे वाचायला काही नसते. आणि दोन्ही वर्तमानपत्रातील शेवटच्या पानावरील केसरीचे अर्धपान जाहिरात लेख वाचून कंटाळा आला आहे.

ग्राहक आणि वाचकांची पत्रे वगैरे सोडाच, आजकालची वृत्तपत्रे केवळ जाहिरातदारांची झालेली आहेत.

-सौरभ.

जिओ कर्णराज जिओ

अर्थात वेगवेगळ्या नावांचा हाच प्रकार काही मराठी संकेतस्थळांवरही दिसतो. (आणि सामान्य जनतेला त्यात तथ्यही वाटते.)

भले शाब्बास !

पण चेंबुरचे शरद भागवत, फोर्टचे ज्ञानेश्वर गावडे, चारकोपची माया भाटकर आणि माझे बोरिवलीकर मित्र श्री. विश्वनाथ कांबळी, रंगनाथ दीक्षित ही माणसे सिंहाप्रमाणे चांगले विचार लोकांकडे पोहोचावेत म्हणून नित्यनेमाने वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहित असतात.
_______________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

काही मजकूर संपादित. सदस्यांवर चिखलफेक करण्यासाठी उपक्रम हे साधन नाही याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ

अजून एक निरीक्षण..

काही दिवसांपूर्वीच धारपांचे निधन झाले. सकाळच्या पहिल्या पानावर एक छोटीशी बातमी होती. पण त्यानंतर त्यांच्या (निधनानंतर का होईना) एकूण कारकीर्दीचा आढावा घेणारा एखादा लेख वाचायला मिळेल अशी आशा होती. पण असा लेख वाचायला मिळाला नाही. (अशावेळीच आपल्या आवडत्या लेखकाच्या जीवनाबद्दल माहिती मिळते हे दुर्दैव)
त्यानंतरच काही दिवसात गंगाधर गाडगीळांचे निधन झाले. गाडगीळांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या इतर लेखकांनी सांगितलेल्या आठवणी, जीवनचरित्र असे विविध लेख छापून आले.
धारपांबद्दलही असा एखादा लेख वाचण्याची इच्छा होती. दोन्ही लेखकांचं थोडेफार वाचन मी केलं आहे आणि त्या त्या विषयात दोघेही त्याच ताकदीचे लेखक आहेत. तरीही असा दुजाभाव व्हावा याचे वाईट वाटले. निदान निधनावेळी तरी अशा गोष्टी होऊ नयेत असे वाटते. प्रदीप यांनी म्हटल्याप्रमाणे त्या त्या लेखकाशी संबंधित व्यक्ती, नातेवाईक, चाहते अशांना हा अनुभव व्यथित करणारा ठरु शकतो.

-सौरभदा

खरे आहे

म. टा. ची पातळी अत्यंत घसरलेली आहे हे कोणालाही मान्य व्हावे..

दोघांनाही आदरांजली. रविंद्र पिंग्यांची लिहीण्याची शैली आवडत असे. मोजके पण सहजपणे एखाद्याचे गुणवर्णन करणारे असे छोटेखानी लेख ते लिहीत. पु. ल. आणि सुनीताबाईंबद्दलचा एक लेख अजून चांगलाच स्मरणात आहे.

श्यामराव कांबळे यांच्याबद्दल मात्र आधीपासून कसलीच माहिती नसल्याचे वाईट वाटले.

मटा


१. सकाळ २. लोकसत्ता ३. सामना ४. पुढारी ........१००००००००००००००००००. मटा

मागे शरद कोर्डेंनी वृत्तपत्र दर्जा मतचाचणी घेतली होती त्या मी दिलेला प्रतिसाद. सकाळ-लोकसत्ता एकसारखे आहेत. एक राष्ट्रवादी आणि एक राष्ट्रीय.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

लोकसत्ता

सकाळ-लोकसत्ता एकसारखे आहेत. एक राष्ट्रवादी आणि एक राष्ट्रीय.

अग्रलेखाचा विचार केल्यास लोकसत्ता सोनीयावादी आहे :-)

विकासराव सांभाळून

विकासराव,

कुमारशेठ

सांभाळून. आमचे लाडके कुमार केतकर काही काळासाठी अमेरिकेत आहेत. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

:-)

पाहुणचार कर रे नीट त्यांचा.

ऑन अमेरिकेच्या वर काय लिहीले आहे?

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

सुस्वागतम्!

धन्यवाद!

मा. कुमार केतकरांचे सहर्ष स्वागत!

या अमेरिकेत त्यांना पैशाच्या मागे लागलेले "मध्यमवर्गीय, उच्चवर्णिय, भारतातील संघपरीवाराला लागून असलेले हिंदुत्ववादी " भारतीयांच्या व्यतिरीक्तपण, अनेक भारतीय भेटतील अशी आशा करतो :-)

 
^ वर