वाघनखांचा संभ्रम्

शिवाजी महाराजांचे वाघनखे भारतात, महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न चालू असून, सुरक्षेची खात्री पटताच याबाबत प्रक्रिया सुरू होईल. गेल्या आठवड्यात ही बातमी मी सर्वप्रथम आमच्या पुणे मिररमध्ये छापली. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

आता शिवाजी राजांची वाघनखे म्हणताच मराठी माणसांच्या डोळ्यापुढे अफझलखानाचा कोथळा काढतानाचे शिवराय नाही आले, तर दुसरे काय येणार. तरीही दुर्दैवाने हे वाघनखे आता परदेशात आहेत. पण या वाघनखांच्या इतिहासाबाबत आणि ती तीच आहेत का, याबाबत शंका येण्यासारखी परिस्थिती आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांच्यामते अफझलखान वधात वापरलेली वाघनखेच होते. मात्र सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांच्याशी मैत्री करून ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱयाने ती ब्रिटनला नेली. त्याच्या वारसदारांनी ते विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, लंडनला दिले. खुद्द या संग्रहालयाच्या पीआरओने मला पाठविलेल्या इ-मेलमध्ये कदाचित शिवाजीचे असलेले वाघनखे आमच्या संग्रहालयात आहेत, असे म्हटले आहे. म्हणजे इथेही संभ्रम आहे.

बाबासाहेब पुरंदरे अमेरिकेला गेलेले. मात्र यासंबंधात त्यांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये एक लेख लिहिला होता. इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर यांच्या मते, शिवाजी महाराजांनी अफझलखानाला वाघनखांनी नव्हे, तर तलवारीने मारले होते. कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभूषषण ग्रंथात ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांची वाघनखे आहेत, याचेही ठोस पुरावे नसून, नंतरच्या बखरींनी वाघनखांचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले. त्यात विकिपेडियावर शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे म्हणून जे छायाचित्र आहे, ते म्हैसूरचे असल्याचे त्या फलकावर लिहिले आहे.

ते छायाचित्र पाठवून विचारणा केली असता, विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाने ते छायाचित्र खरे आहे अथवा नाही, याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. मात्र मूळ वाघनखांचे छायाचित्र मला पाठविल्याचा मेल पाठविला. पण त्यात छायाचित्राची लिंक नाही. संग्रहालयाच्या संकेतस्थळावर शोध घेतला असता वाघनखांचे (टाईगर क्लॉ) एक वेगळेच छायाचित्र दिसते. मात्र त्यात महाराष्ट्र किंवा शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. असा हा घोळ आहे. त्यामुळे एवढी मोठी बातमी देऊनही मी अद्याप संभ्रमात आहे.

Comments

वाघनखे

म.टा.तील लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद आणि लेखातील माहितीबद्दल धन्यवाद. संभ्रम आहे खराच.

विकिवरील चित्र हे १८ व्या शतकातील वाघनखांचे असून आपल्याला ब्रिटीश संग्रहालयाने पाठवलेल्या छायाचित्रापेक्षा या छायाचित्रात नखांच्या कडेने एक लहानसा खंजीर आहे असे दिसते. कदाचित तलवारींप्रमाणेच, वाघनखांचे वेगवेगळे प्रकार असावेत का? आणि उपलब्ध असणारी वाघनखे महाराजांचीच याचा ठोस पुरावा कसा मिळवायचा?

पुरावा

इतिहासात पुरावा शोधण, तो सापडण, त्याचे अन्वयार्थ लावण हे खरंच् किचकट काम आहे. भवानी तलवार, वाघनख, दादोजी कोंडदेव .......
असो! राजकिय भांडवल करायला मात्र इतिहास हे शस्त्र आहे.
प्रकाश घाटपांडे

+१

१००% सहमत. इतिहासावरुन राजकारण नवीन इतिहास घडवण्यासाठी. उद्या असे अनेक मुद्दे येतील आणि जातील. भारतीयांनी त्यांचा खरा इतिहास लिखीत स्वरुपात न लिहिण्याचे हे सगळे परीणाम.

खरा इतिहास?

भारतीयांनी त्यांचा खरा इतिहास लिखीत स्वरुपात न लिहिण्याचे हे सगळे परीणाम.

अभारतीयांनही त्यांचा लिहून ठेवलेला इतिहास खरा आहे की नाहि याची शाश्वती नाहिच.
तसेच कोणाचा इतिहास कीती आणि कधीपासून जतन करून ठेवायचा? समजा उद्या तुम्ही काहि ऐतिहासिक कार्य केलेत तर तुमचा कितीसा वैयक्तीक इतिहास जपलेला आहे? एखादि व्यक्ती प्रसिद्ध झाल्यांनंतरचा इतिहास लिखित स्वरूपात असण्याची शक्यता जास्त आहे पण त्या आधीच्या काळाचे काय?

अर्थात याचा अर्थ इतिहास लिखित स्वरूपात जतन करूच नये असा होत नाहि.

प्रस्तुत विषयावर,
जर शिवरायांच्या काळात वाघनखे हे शस्त्र अस्तित्त्वात होते कि नाहि वगैरे संशोधन चालु असेल तर माहित नाहि अन्यथा शिवाजींनी वाघनखे वापरली का, ती कोठे आहेत या गोष्टींपेक्षा मला शिवरायांची नीती अनुकरणीय वाटते... त्यांचा अफजलखानाचा कोथळा काढणं शौर्याचं वाटतं.. त्याकामी काय वापरले ही केवळ उत्सुकता! त्यास याहून महत्त्व देऊ नये अश्या मताचा आहे.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

बरोबर

प्रस्तुत विषयावर,
जर शिवरायांच्या काळात वाघनखे हे शस्त्र अस्तित्त्वात होते कि नाहि वगैरे संशोधन चालु असेल तर माहित नाहि अन्यथा शिवाजींनी वाघनखे वापरली का, ती कोठे आहेत या गोष्टींपेक्षा मला शिवरायांची नीती अनुकरणीय वाटते... त्यांचा अफजलखानाचा कोथळा काढणं शौर्याचं वाटतं.. त्याकामी काय वापरले ही केवळ उत्सुकता! त्यास याहून महत्त्व देऊ नये अश्या मताचा आहे.

हे विचार सर्वात महत्वाचे आहेत आणि मी पुर्णपणे सहमत आहेच. पण मागे एका चर्चेत आले आहे त्या प्रमाणे उद्या शिवाजी महाराज ही इतिहास न राहता कथा बनुन जाईल. इतिहासाचा पुरावा मागणे हे हल्ली राजकिय वादांचे एक शस्त्र झाले आहे. इतिहास लिखित स्वरुपात जतन करणे अथवा पुरावे जपणे हे नव्या पिढीला पटण्यासाठी आहे. नाहितर राम हा अल्लाच होता आणि बिन लादेन हा इश्वराचा अवतार होता असे म्हणणे झाले.

अवांतरः आत्ताच्या भारतात हवे तसे पुरावे तयार करणे फारसे अवघड नसावे. :)

इतिहास् आणि राजकारण

वाघनखांचे अनेक् प्रकार असल्याचे मला स्वत्:ला या बातमीसाठी माहिती घेतानाच आढळले. यासंदर्भातील एक दुवा इथे मिळेल्. ही सुद्धा माहिती चांगली आहे. वाघनखे म्हणून् सांगितली जाणारी अनेक् शस्त्रे सध्या आहेत् परंतु ते शिवाजी महाराजांचीच असल्याचा कोणताही पुरावा नाही. बेडेकर यांचे तेच् म्हणणे आहे.

आपल्या सामाजिक जीवनातील अन्य सर्वच गोष्टींप्रमाणे इतिहासाचे राजकीय भांडवल केले जात् आहे, यात नवल ते काय? महाराष्ट्राला इतिहासाची जरा जास्तच आवड असल्याने (आठ्वा ते आचार्य् अत्रे यांचे सुप्रसिद्ध बोल: इतरांना केवळ भूगोल आहे, महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास् आहे!) राजकारणी त्यावरच जास्त् लक्ष केंद्रीत करणार्, हे ओघाने आलेच.

राहता राहिला आपण घ्यावयाच्या काळजीचा प्रश्न! याचसंदर्भात चर्चा चालू असताना माझा एक् सहकारी म्हणाला, "किल्ले केवळ नेता आले नाहीत म्हणून इंग्रजांनी इथे ठेवले." त्यावर मी म्हणालो, "त्यांनी नेले असते तर अधिक सुस्थितीत राहिले असते." यावर अधिक बोलायची गरज् आहे?

किल्ले

राहता राहिला आपण घ्यावयाच्या काळजीचा प्रश्न! याचसंदर्भात चर्चा चालू असताना माझा एक् सहकारी म्हणाला, "किल्ले केवळ नेता आले नाहीत म्हणून इंग्रजांनी इथे ठेवले." त्यावर मी म्हणालो, "त्यांनी नेले असते तर अधिक सुस्थितीत राहिले असते." यावर अधिक बोलायची गरज् आहे?

महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांची आताची विदारक स्थिती इंग्रजांनीच करून ठेवली आहे. काही किल्ले दुरुस्तीच्या पलिकडे गेले आहेत. पण काही किल्ल्यांची तटबंदी महादरवाजे शिल्लक आहेत. कालच एक बातमी वाचली. टप्प्यटप्प्याने किल्ले निवडून त्यांची निगा राखण्यासाठी एक आराखडा तयार केला गेला आहे. त्यामध्ये गिरिभ्रमण संस्थांचा आणि गिरिप्रेमींचा सहभाग आहे. त्या बातमीमध्ये काही जणांचे फोन नंबर दिले आहेत. या कामी मदत करू इच्छिणार्‍यांनी आणि आस्था असणार्‍यांनी त्यांना संपर्क करावा.

सरकारतर्फे चाललेले प्रयत्न तोकडे आहेत हे खरे असले तरी "शिवनेरी" किल्ल्याला भेट देऊन पुरातत्त्व खात्याच्या कामाचा आढावा घ्यावा. तेथे काम चांगले केले आहे. पण राजगडला कोणत्या बिल्डरला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे यावरून स्थानिक आणि सरकारमध्ये मतभेद आहेत. रायगडावरही डागडुजी झाली आहे. किमान पुढची पडझड न होण्यासाठी.

महाराष्ट्रातील किल्ले राजस्थान किंवा परदेशातील किल्ल्यांप्रमाणे लाकडी कोरीवकाम केलेले नाहीत. मुख्यतः हे डोंगरी किल्ले असून त्यांचा वापर युद्धात झालेला आहे. इतर प्रदेशातील किल्ल्यांशी तुलना करताना कोणत्या भूमीवर युद्धे झाली हाही मुद्दा लक्षात घ्यावा.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

वाघनखे

सभासद बखरीत प्रस्तावनेवसे वाचल्याचे वाटते की शिवाजीराजांनी कट्यार किंवा छोटी तलवार वापरली आणि खानाचे पोट आडवे चिरत नेले. वाघनखे वापरून असे करता येइल का याची मलाही शंका होती. पण खरोखर् राजांनी खानाला कसे मारले हे राजांना आणि खानालाच ठाऊक.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

इतिहास् आणि आस्था

इतिहास आणि ऐतिहासिक वास्तुंबाबत आपली आस्था दाखविणारी ही प्रातिनिधिक चित्र. पहिलं चित्र पुढारीतील दोन महिन्यांपूर्वीच्या बातमीचं. सिंहगडाच्या आधुनिकीकरणाच्या आराखड्यातून शिवरायांची सनदच वगळणारे सरकारी खाते, तसंच शनिवारवाड्याच्या उरल्या सुरल्या अवशेषांमध्ये निसर्गाच्या गरजा भागविणारा एक नागरिक. शनिवारवाड्यातील छायाचित्र तर परवाच घेतलेले आहे.

गडकिल्ल्यांच्या विकासासाठी आराखडा तयार झाला आहे, हे वाचून बरे वाटले. रोहिडगडावरील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तेथील ग्रामस्थांनी स्वतःच श्रमदान केले होते, ही बाब येथे उल्लेखनीय. मात्र तेव्हाही त्यांना मदतीसाठी खूप कष्ट झाले होते. त्यासंबंधातील किमान दोन बातम्या तर मीच संपादित केलेल्या आठवतात.

युद्धामध्ये झालेल्या किल्ल्यांच्या दुरवस्थेबाबत सहमत. मात्र त्यानंतरही आपण त्याबाबत काहीच केलं नाही, याचं शल्य मोठं आहे. सासवड येथे मी सुमारे दीड महिन्यांपूर्वी गेलो असताना तेथील जुन्या राजवाड्याचा उपयोग मुतारीसाऱखा करताना लोक आढळत होते. याचं समर्थन होऊच शकत नाही.

सभासद बखरीत प्रस्तावनेवसे वाचल्याचे वाटते की शिवाजीराजांनी कट्यार किंवा छोटी तलवार वापरली आणि खानाचे पोट आडवे चिरत नेले. वाघनखे वापरून असे करता येइल का याची मलाही शंका होती. पण खरोखर् राजांनी खानाला कसे मारले हे राजांना आणि खानालाच ठाऊक.
बाकी याबाबतीत काहीच दुमत नाही. सध्यातरी हा संभ्रम दूर होण्यासारखा असल्याचे वाटत नाही.

सहमत

वरील सर्वाशी सहमत आहे. पण असे लोक असणे नवीन आहे का? किमान अज्ञानापोटी इतिहास माहीत नसणार्‍यांकडून होणारी उपेक्षा किंवा उपहास थांबवता आला तर उत्तम आहे.

या कामी तुम्ही प्रत्यक्ष हातभार लावताय हे पाहून आनंद झाला.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

सहमत

सहमत आहे. किल्ले, ऐतिहासिक वास्तू यांच्याबद्दलची अनास्था प्रसिद्ध आहे. चित्राबद्दल बोलायचे झाले तर जोपर्यंत सर्व ठिकाणी (स्वच्छ?) स्वच्छतागृहे होत नाहीत तोपर्यंत हे बदलेल असे वाटत नाही. मुद्दा परत तिथेच येतो. आपण आणि सार्वजनिक स्वच्छता यांचे इतके वावडे का असावे? घराचा केर काढून घर टापटिप केल्यावर तो केर खिडकीतून रस्त्यावर टाकताना निर्माण होणारी विसंगती लक्षात येत नसेल का? असो. स्वच्छतागृहे हा एक मुद्दा झाला. सर्व किल्यांवर अमर + ज्योती आणि याच्याभोवती बदाम आणि बाण काढणार्‍यांचे काय?

----

रिलायन्सच्या ऍड

सर्व किल्यांवर अमर + ज्योती आणि याच्याभोवती बदाम आणि बाण काढणार्‍यांचे काय?

इतकेच नाहि तर रिलायन्सच्या ऍडमध्ये या बदामवाल्यांचे ग्लोरिफिकेशन चालू आहे. :(

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

हेच

हेच म्हणणार होतो.

समर्थन?


सासवड येथे मी सुमारे दीड महिन्यांपूर्वी गेलो असताना तेथील जुन्या राजवाड्याचा उपयोग मुतारीसाऱखा करताना लोक आढळत होते. याचं समर्थन होऊच शकत नाही.


यात आपली संवेदनशीलता दडलेली असल्याने अशी वस्तुस्थिती का झाली ? याचा आढावा घेतला तर तो आपल्याला कदाचित पटणार् नाही व ते समर्थन वाटेल. पण बाकी ऐतिहासिक् वास्तु जतन करण्याच्या जागृतीतील आपले योगदान आवडले व पटले.खर तर या जतनात देखील रेव्हिन्यु दडलेला आहे. पर्यटन विभागाला ते समजेल तेव्हा ना!
प्रकाश घाटपांडे

वाघनखे

शिवाजीने अफझलखानास कसे मारिले यासंबंधी विविध मते आहेत. सभासद विचवा(वाकडी कट्यार) आणि वाघनख म्हणतो. खाफीखान विचवा म्हणतो. पोवाड्यात वाघनखांचा उल्लेख आहे. परमानंदांच्या शिवभारतात ' शिवः कृपाणिकाग्रेण कुक्षावेव तम् अस्पृश्ययत्'(अध्यय् २१ श्लोक ३९) म्हणजे शिवाजीने खानास तलवारीने मारिले असे म्हटले आहे. शिवभारत हा समकालीन ग्रंथ असल्यानेतो प्रमाण मानणे इष्ट ठरेल.

-संदर्भ : कृष्णाजी अनंत सभासद विरचित शिव-छत्रपतींचे चरित्रा {सभासद बखर} संपादकः र. वि. हेरवाडकर. व्हिनस प्रकाशन पुणे.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

धन्यवाद

आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अभिजित, शेवटचा जो मुद्दा आहे, तोच आता मी ग्राह्य मानला आहे. 'शिवभारत' हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या समकालीनच नव्हे तर त्यांच्या आज्ञेवरून लिहिला असल्याचे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे तोच प्रमाण मानून तसा इतिहास लिहावा, एवढीच अपेक्षा. म्हणजे ऐतिहासिक पुरुषांच्या नावाने होणार्‍या भावनिक राजकारणास आळा बसेल.

बरोबर आहे

अवांतरः सभासद बखर ही सुद्धा राजाराम महाराजांनी सांगीतल्यावरून लिहिली गेली होती. बखरीतील घटना बखरकाराने आठवून लिहिल्या आहेत. त्यामुळे काही वेळा कालानुक्रमाच्या चुका आहेत. तसेच काही महत्त्वाचे प्रसंग गाळले गेले आहेत किंवा आटोपले आहेत. सभासद बखर ही मराठीतली पहिली बखर मानली जाते. बखर चंदी येथे लिहिली गेली साधारण जुलै १६९७ मध्ये.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

 
^ वर