विन्स्टन चर्चिल यांनी भारताला सुखासुखी स्वतंत्र होऊ दिले असते का?
येथे सुरुवातीलाच कबूल केले पाहिजे की ब्रिटनचे श्री. विन्स्टन चर्चिल हे माझे आवडते व्यक्तिमत्त्व नव्हे. व्यक्ती हुशार होती, दुसर्या महायुद्धाच्या काळात त्यांनी ब्रिटनचे धीराने नेतृत्व केले याबद्दल त्यांचे विशेष कौतूक वाटते. पण आंतर्राष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत, किंवा मनुष्यजातीच्या उत्कषाबाबत त्यांचे जे काय विचार होते, ही त्यांची मते अनुकरणीय नव्हेत, अशी माझी धारणा आहे. त्यामुळे उपक्रमावर चर्चिलच्या एक-दोन उक्ती वाचल्या की त्यांच्या उलटच विचार माझ्या मनात बळावतात.
पैकी एक तर चर्चिल यांची उक्तीही नाही : "तुम्ही तरुणपणी उदारमतवादी (लिबरल) नसाल तर तुम्हाला काळीज नाही , तुम्ही वय वाढल्यावर स्थितिरक्षणवादी (कॉन्झर्व्हेटिव्ह) नसाल तर तुम्हाला डोके नाही." चर्चिल हे तरुण वयापासून (विशीत होते तेव्हापासून) हुजूर पक्षाचे जास्तीत जास्त कॉन्झर्व्हेटिव्ह सदस्य होते. त्यांनी असे कुठले वाक्य म्हटल्याचा काहीही पुरावा नाही - तितके तरी चर्चिल तर्कशुद्ध होते. हे वाक्य फ्रेंच राज्यक्रांतीच्या कोण्या विरोधकाने म्हटले आहे, बहुधा.
पण चर्चिलचे हे वाक्य वाचले, "A fanatic is one who can't change his mind and won't change the subject." आणि वाटले या माणसाला हे वाक्य म्हणण्याचा काय हक्क पोचतो? खाली चर्चिलच्या ज्या भाषणाचे भाषांतर दिले आहे, त्या प्रकारचा प्रखर प्रचार चर्चिल यांनी पुढील कित्येक वर्षे केला. ते ब्रिटनचे पंतप्रधान झाले, तेव्हाही त्यांच्या भारतद्वेषाबद्दल त्यांच्या मंत्रीमंडळातल्या लोकांनी आठवणी लिहून ठेवल्या आहेत.
त्यांनी ब्रिटनचे युद्धकाळात चांगले नेतृत्व केले, हे खरे. पण त्यांचे भारतविषयक धोरण ब्रिटनच्या तरी फायद्याचे होते का? हा विचार करण्याजोगा आहे. दुसर्या महायुद्धानंतरही त्यांचे पंतप्रधानपद कायम राहिले असते तर भारताला स्वातंत्र्य लगेच मिळू नये म्हणून त्यांची चतुर बुद्धी चालली असती असे त्यांच्या खालील भाषांतरित भाषणावरून कल्पना येते.
--
श्री. विन्स्टन चर्चिल यांनी १८ मार्च १९३१ रोजी लंडन येथील रॉयल ऍल्बर्ट हॉलमध्ये पुढील भाषण दिले. (दुवा)
--
हिंदुस्थानाला ब्राह्मणांच्या हातात टाकून सोडून जाणे म्हणजे क्रूर आणि दुष्ट निष्काळजीपणाचे कृत्य आहे. हा अपराध जो करेल त्याला कायम शरम वाटत राहील. हे ब्राह्मण पाश्चिमात्त्य उदारमतवादाची तत्त्वे तोंडातून पटापटा उच्चारतात, आणि तत्त्वज्ञानी, लोकशाही नेते असल्याचा आव आणतात. हेच ब्राह्मण त्यांच्या सहा करोड देशबांधवांना "अस्पृश्य" म्हणून स्वयंसिद्ध हक्क नकारतात. हजारो वर्षांच्या जुलुमाने त्यांनी यांना ही दु:खद स्थिती स्वीकारण्यास शिकवले आहे. या सहा करोड लोकांबरोबर ते अन्न खाणार नाहीत, पाणी पीणार नाहीत, त्यांना मनुष्य म्हणून वागवणार नाहीत. ते जवळ आले तरीही त्यांचा विटाळ होतो. आणि तत्क्षण ते फिरकी घेतात आणि जॉन स्टुअर्ट मिलशी तर्कशास्त्राच्या गप्पा मारायला लागतात, जाँ जाक रुसो बरोबर मानवाधिकारांचे युक्तिवाद करायला लागतात.
कुठलाही सामाजिक किंवा धार्मिक समूह अशा प्रकारच्या रीतिरिवाजांवर शिक्कामोर्तब करतो, त्यांच्यापैकी ६ करोड देशबांधवांना सदासर्वकाळसाठी गुलामगिरीत ठेवण्याचा दृढनिश्चय करतो, तर त्या समूहाने लोकशाहीचे दस्तऐवज मिळवण्याचा दावा आपण मानू शकणार नाही. त्यांना तिटकारा वाटणारे ते असहाय करोडो लोक त्यांच्या निरंकुश अधिपत्याखाली आपण देण्याचे तर सोडाच. या ब्राह्मण धर्मसत्तेच्या आणि प्रचंड हिंदू जनतेच्या शेजारी - यांच्यात पावन आणि नीच जाती आल्यात - यांच्या शेजारी शेजारी हिंदुस्तानात सात करोड मुसलमान राहातात. यांच्या वंशात शारिरिक जोम आणि ईर्ष्या आहे, आणि युद्ध करून दुसर्यांना जिंकण्यासाठी यांचा धर्म सहज वळू शकतो. हिंदू वाद विवाद करतो, तिथे मुसलमान तलवारीला धार लावतो. या दोन वंशांतल्या, श्रद्धा-समाजांतल्या लोकांमध्ये कित्येक गुणी, रुबाबदार लाघवी तरुण लोक आहेत, पण त्यांच्यांत एकमेकांत विवाह होत नाही. ही दरी पार करण्यासारखी नाही. आता तुम्ही फ्रान्स आणि जर्मनींच्या मधील वैमनस्य घेतले, त्यात कॅथोलिक-प्रोटेस्टंट यांच्यामधील वैमनस्य मिळवले, आणि त्याचा दहापट गुणाकार केला, असे समजा. तरी हिंदुस्तानाच्या शहरांत आणि मैदानी प्रदेशांत करोडोंच्या संख्येत मिसळून राहिलेल्या या दोन वंशांच्या मधील दुफळीच्या समान ते वैमनस्य होणार नाही. आजपावेतोवर ब्रिटनच्या शासनाने या दोन्ही वंशांवर आपला निष्पक्षपाती अनुनय करणारा राजदंड उभारला आहे. माँटॅग्यू-चेम्सफोर्ड सुधारणांनी स्थानिक सार्वभौमत्व आणि शासनाचा प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी, हे लोक एकमेकांच्या शेजारी थोडेफार सहिष्णूपणे राहायला शिकले होते. पण टप्प्याटप्प्याने त्यांना असे वाटू लागले आहे की आपण एक तर हिंदुस्थान सोडून जाऊ, किंवा आपल्यला घालवून टाकले जाईल. तशी ही प्रचंड चुरस आणि हा द्वेष पुन्हा जिवंत होऊ लागला आहे. या गोष्टी दिवसेंदिवस अधिकाधिक तिखट होत चालल्या आहेत. आपल्याकडच्या भावनेच्या भरात वाहावत गेलेल्या लोकांची इच्छा आहे, त्याप्रमाणे आपण आपल्या जबाबदारीतून हात झटकून मोकळे झालो, आणि आपल्या सर्व अधिकाराचा त्याग केला, तर हिंदू-मुसलमानांमध्ये लगेच हिंस्र गृहयुद्ध सुरू होईल. हिंदुस्थानाची ओळख असलेला कोणीही याबाबत वाद घालणार नाही.
--
समारोप :
चर्चिल यांची निरीक्षणशक्ती उत्तम होती, आणि त्यांनी वर्तवलेला नरसंहार घडून आला, हे खरे आहे. पण भारताच्या स्वातंत्र्याबद्दल कुत्सित भावना ही मला माणुसकीच्या दृष्टीने खोलवर अनभिज्ञ वाटते. चर्चिल यांचे बोल जर मुत्सद्देगिरीबाबत असतील, युद्धातील डावपेचांबाबत असतील, तर ते "शिकवण" म्हणून मानण्यास मी तयार आहे. पण माणुसकी कशी असावी, देशांदेशांच्या मध्ये नैतिक आंतर्राष्ट्रीय संबंध काय असावेत, याबद्दल त्यांचे कुठले मत ऐकले तर त्याच्या नेमकी उलटी शिकवण घ्यायचा माझा मोह अनावर होतो. (मोह थोडासा आवरावा लागतो - भंपक ड्वायकॉग-बाजीमध्ये कदाचित त्यांनी योग्य नैतिक मूल्यही सांगितले असेल - उलट अर्थ घेण्यापूर्वी वाक्याचा विचार करावा लागतो, चर्चिलवेगळ्या कोणी म्हटले असते तर त्या उक्तीचा अर्थ पटला असता का?)
Comments
नसते दिले
तुमच्या मूळ प्रश्नाचे मला वाटणारे उत्तर आहे, "विन्स्टन चर्चिल यांनी भारताला सुखासुखी स्वतंत्र होऊ दिले नसते"! थोडक्यात आपल्या या विचारांशी सहमत. जेंव्हा कोणी भारतीय चर्चिलचे अथवा एकंदरीतच ब्रिटीशांचे भारतावरील राज्यकर्ते म्हणून कौतूक करतात तेंव्हा मला संताप येतो.
पुढे आपण जे म्हणत आहात की, "या माणसाला हे वाक्य म्हणण्याचा काय हक्क पोचतो?" त्याचा अर्थ मात्र लागला नाही. कारण त्याचा आपण म्हणत असलेला भारतद्वेष जो मला द्वेषापेक्षा "साम्राज्यवाद" वाटतो त्याचा संबंध हा वरील व्याख्येशी लागत नाही. भारत हे त्याच्या दृष्टीने केवळ अंकीत राष्ट्र होते. त्यातून जे काही फायदे मिळू शकतील कच्चा माल, कामगार, इतर संपत्ती ते मालकी हक्काने घेणे इतकेच काय ते त्याचे ध्येय होते. अर्थातच ते ध्येय बरोबर होते असे मला म्हणायचे नाही. पण त्याचा संबंध वरील वाक्याशी लागत नाही इतकेच काय ते मी म्हणत आहे.
समारोप :
चर्चिल यांची निरीक्षणशक्ती उत्तम होती, आणि त्यांनी वर्तवलेला नरसंहार घडून आला, हे खरे आहे. पण भारताच्या स्वातंत्र्याबद्दल कुत्सित भावना ही मला माणुसकीच्या दृष्टीने खोलवर अनभिज्ञ वाटते. चर्चिल यांचे बोल जर मुत्सद्देगिरीबाबत असतील, युद्धातील डावपेचांबाबत असतील, तर ते "शिकवण" म्हणून मानण्यास मी तयार आहे. पण माणुसकी कशी असावी, देशांदेशांच्या मध्ये नैतिक आंतर्राष्ट्रीय संबंध काय असावेत, याबद्दल त्यांचे कुठले मत ऐकले तर त्याच्या नेमकी उलटी शिकवण घ्यायचा माझा मोह अनावर होतो.
हे सगळे मान्य आहे. मला वाटते त्या काळासाठी चर्चिल हा गतकाळातील नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करत होता. थोडक्यात पुराणमतवादी होता अथवा "ओल्ड स्कूल ऑफ थॉट" चे प्रतिनिधित्व करत होता. किंबहूना म्हणूनच दुसर्या महायुद्धाच्या नंतरची निवडणूक तो हरला.
सत्ता
आपण म्हणत असलेला भारतद्वेष जो मला द्वेषापेक्षा "साम्राज्यवाद" वाटतो त्याचा संबंध हा वरील व्याख्येशी लागत नाही. भारत हे त्याच्या दृष्टीने केवळ अंकीत राष्ट्र होते. त्यातून जे काही फायदे मिळू शकतील कच्चा माल, कामगार, इतर संपत्ती ते मालकी हक्काने घेणे इतकेच काय ते त्याचे ध्येय होते.
सहमत.
वर्णपिपर्यय
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आणखी एक वाक्य चर्चिलचे म्हणून बहुपरिचित आहे.ते असे:
''इंडिया इज नॉट अ नेशन. इट इज ओन्ली अ पॉप्युलेशन''
नाही
इथे चर्चिल यांची दोन रूपे (किंवा व्यक्तिमत्वे) समोर येतात. दुसर्या महायुद्धात त्यांनी ज्या धडाडीने ब्रिटनचे नेतृत्व केले तो नेता. आणि त्याच वेळेस इतर सर्व जग आणि विशेषत: भारतीय कस्पटासमान मानणारी जुनी ब्रिटीश वृत्ती. "आजपावेतोवर ब्रिटनच्या शासनाने या दोन्ही वंशांवर आपला निष्पक्षपाती अनुनय करणारा राजदंड उभारला आहे" हे वाक्य म्हणजे नैतिकतेचा कडेलोट आहे. पण हे सर्व त्यावेळेसच्या ब्रिटीश सत्ताधिकार्यांना अनुसरूनच आहे. साम,दाम,दंड भेद कुठलाही मार्ग अनुसरून सर्व जग काबीज करायचे आणि मग नैतिकतेच्या गप्पा ठोकायच्या. आजच्या जगातील पॉवर इक्वेशन्स बघता ब्रिटीशांना असे करणे शक्य नाही.
चर्चिल यांना भारत आणि भारतीय नेते यांच्याबद्दल विशेष आकस होता. गांधींबद्दलचे त्यांचे वक्तव्य प्रसिद्धच आहे.
----
साम्राज्यवादी!
लोकशाहीत उणिवा असल्या तरी तीच सर्वांत चांगली राज्यपद्धती आहे असं चर्चिलचं मत होतं. एका पुस्तकात वाचलेल्या माहितीनुसार ब्रिटीशांनी लोकशाहीवादाचा पुरस्कार केला असला तरी आपल्या साम्राज्यवादात चर्चिलने त्याचा अडथळा होऊ दिला नाही. जपानने जेव्हा आग्नेय आशिया, मलाया, सिंगापूर, ब्रम्हदेश असे ब्रिटीश शासित प्रदेश जिंकत इंफाळ, काकीनाडा पर्यंत मजल मारली तेव्हा 'भारतात राष्ट्रीय सरकार स्थापा, आम्ही तुमच्या बाजूने लढून देशाचं रक्षण करु' असं आश्वासन काँग्रेसने ब्रिटीशांना दिलं. तेव्हा 'ब्रिटीश साम्राज्याचं दिवाळं काढण्यासाठी मी पंतप्रधान झालेलो नाही' अशी चर्चिलची प्रतिक्रिया होती. साम्राज्यवादाचा अजून काय पुरावा पाहिजे?
सौरभदा-
===============
I love America more than any other country in this world; and, exactly for this reason, I insist on the right to criticize her perpetually. - Quote
स्वार्थ आणि त्याग
महर्षी रसेल एके ठिकाणी* लिहितात की, इंग्रजी बोलणार्या देशात एक विशेष प्रकारची विचारधारा आढळते. त्यात एखाद्याच्या कृत्याचे जाहीर कारण परोपकार, तो सोडून इतरांचे भले व्हावे, त्याचा तोटा झाला तरी बेहत्तर असे असते; तर खरे कारण पक्के स्वार्थी असते. माणसे जाणूनबुजून असे करत नाहीत तर असे वागणे त्यांच्या हाडात भिनलेले आहे. म्हणजे पुष्कळदा माणसे परोपकार हेच खरे कारण आहे असे मनोमन मानत असतात आणि खरे स्वार्थी कारण अंतर्मनात दडून असते. अश्या धूर्त वागण्यामुळे इंग्रज व अमेरिकन इतके यशस्वी झाले आहेत.
चर्चिलांच्या पत्रातही असेच दिसते, की केवळ अस्पृश्यांच्या रक्षणासाठी, भारतासारख्या मागास देशात अराजक माजू नये म्हणून इंग्रज त्यांचे वेळ, श्रम खर्च करीत आहेत (असा आव.)
* स्केप्टिकल एसेझ् : ब. रसेल.