भक्षाभक्ष्य किंवा अभक्ष भक्षण!

राम राम मंडळी,

उपक्रमावरील पद्माकर नावाच्या सभासदाने उपक्रमावरील भारतीय आणि मांसाहार या चर्चेत भक्षाभक्ष्य हा शब्द वापरला आहे व त्याच चर्चेत त्यांनी ह्या शब्दाचा अर्थ मांस खाणे किंवा मांसाहार करणे याच्याशी जोडला आहे. एवढंच नव्हे, तर प्रतिसादींनीही भक्षाभक्ष्य किंवा अभक्ष भक्षण करणे म्हणजे मांस खाणे किंवा मांसाहार करणे हाच अर्थ गृहीत धरून प्रतिसाद लिहिले आहेत.

माझ्या प्रस्तुत चर्चेचा मुद्दा आणि त्याचा उहापोह हे कदाचित त्या चर्चेत विषयांतर वाटेल म्हणून इथे वेगळेपणे मांडत आहे. या चर्चेत मला भक्षाभक्ष करणे किंवा अभक्षभक्षण करणे या शब्दांच्या अर्थाचा उलगडा/उहापोह अपेक्षित आहे.

माझा मुद्दा असा -

साधारणपणे भक्षाभक्ष्य किंवा अभक्ष भक्षण करणे म्हणजे मांस खाणे किंवा मांसाहार करणे हाच अर्थ लावला जातो परंतु माझ्या मते ते चूक आहे. जे भक्ष करण्यास योग्य नाही ते अभक्ष! मग या न्यायाने ज्या व्यक्तिला मधुमेहाचा जबरदस्त विकार आहे त्या व्यक्तिकरता 'श्रीखंड' हे अभक्षच आहे की!

किंवा ज्या व्यक्तिला मूळव्याधीचा खूप त्रास आहे तिच्याकरता ओल्या मिरच्यांच्या ठेचा खाणे तर दूरच, परंतु त्याकडे बघणे हेदेखील भक्षाभक्ष्य किंवा अभक्ष भक्षण केल्यासारखेच आहे की!

किंवा ज्या व्यक्तिला ऍसिडिटी, जळजळ इत्यादीचा खूप त्रास आहे ( अलिकडे अश्या बर्‍याच व्यक्ति सापडतात! ;) ) त्या व्यक्तिकरता तेलकट, खूप मसालेदार खाणे हे भक्षाभक्ष्यच आहे की!

मग केवळ मांसाहार करणे म्हणजेच भक्षाभक्ष्य किंवा अभक्ष भक्षण करणे हे कसे काय? भक्षाभक्ष्य ह्या शब्दाचा अर्थ केवळ मांसाहार करण्याशीच कसा काय लावला गेला?/लावला जातो?

आपल्यापैकी कुणी हा उपापोह करू शकेल का?/यावर प्रकाश टाकू शकेल का?

की माझा मुद्दाच पटला नाही?

असो,

आपला,
(शब्दवेल्हाळ मांसाहारी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंद देई सदा!

लेखनविषय: दुवे:

Comments

भक्ष्याभक्ष्य

शरद

तात्या, एकदम सहमत. तरीही थोडासा मतभेद आहेच. माझ्या मते आपल्याला आवडते ते भक्ष्य आणि आवडत नाही ते
अभक्ष्य. मला अल्सरचा त्रास होता पण भेळ-भजी खाल्यानी बरेच वाटत असे !
समित्पाणी [भेळ-भजी-थालीपीठ आवडीने खाणारा]

शक्य आहे ..

मूळ चर्चेतील् वाक्य् असे आहे - त्यांनी १९३५ साली दिलेल्या व्याख्यानांमधे 'भक्ष्याभक्ष्य'चा ऊहापोह केला आहे.

आता ही एक शक्यता आहे की त्यांनी हे व्याख्यान अशा श्रोतसमुदायापुढे दिले असेल की जो जवळपास १००% शाकाहारी होता. मला जातीयवादात जायचे नाही परंतु त्यांचे व्याख्यान एखाद्या ब्राह्मण सभेने आयोजित केले असणे शक्य आहे. अशा वेळी जर समोरील श्रोतागण "शुद्ध् शाकाहारी" असेल तर त्यांच्यासाठी मांसाहार हा अभक्ष्य ठरतोच.

म्हणजेच तात्या म्हणतात ते खरे मानले (जे असण्याची शक्यता दिसते), तर त्या विवक्षित ठिकाणी अभक्ष्य ह्या शब्दाचा अर्थ मांसाहार असाच होतो. नाही का?

(अभक्ष्य भक्षण्यात अत्यानंद मानणारा) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अपेयपान

अभक्ष भक्षणा सोबत अपेय पान हे ओघाने आलेच. तात्या वाया गेला कारण तो अभक्ष भक्षण करतो, अपेय पान करतो. तात्याचे इतर गुण त्यामुळे लगेच लोप पावतात. एखादा गुरुजी अभक्ष भक्षण करुन अपेय पान करुन पुजा सांगायला आला आणि किती जरी 'शास्त्रोक्त' पुजा सांगितली तरी ते जनमानसात रुचणार नाही. रुढार्थाने अभक्ष भक्षण करणारा म्हणजे मांस मच्छी खाणारा, अपेय पान करणार म्हणजे दारु पिणारा असे मानले गेले आहे. याचा संबंध तुमचा सत्व रज तम या प्रवृत्तींशी जोडला गेला आहे.
प्रकाश घाटपांडे

दोन मुद्दे

मुद्दा क्रमांक एक.
ही चर्चा सुरू करण्यासाठी विसोबांनी जो संदर्भ वापरला आहे त्यात (त्या चर्चेपुरता) 'भक्ष्य-अभक्ष्य' या द्वंद्वाचा अर्थ शाकाहार-मांसाहार असा अभिप्रेत आहे. कारण चर्चाप्रस्तावकाने ज्या व्याख्यानाचा उल्लेख केला आहे ते व्याख्यान भारतरत्न महामहोपाध्याय पांडूरंग वामन काणे यांनी हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास करून त्यात मांसाहाराबद्दल काय म्हटले आहे? हाच मुद्दा मांडण्यासाठी दिलेले असावे असे वाटते.
अधिक माहिती पाहिली असता पां.वा. काणे यांनी धर्मशास्त्राचा विपर्यास केलेला आहे असे म्हणता येत नाही. 'जसे आहे तसे' या स्वरूपात मांडताना हिंदू धर्मशास्त्रात अगदी ब्राह्मणांनीही गोमांस खाण्याचे जे उल्लेख आहेत ते तसेच मांडले आहेत.परंतु काणे यांचे त्याबद्दल स्वतःचे काय मत होते ते स्पष्ट होत नाही. त्या व्याख्यानाबद्दल चर्चाप्रस्तावकाने आणखी माहिती द्यायला हवी होती.

मुद्दा क्रमांक दोन.
विसोबा खेचर ऊर्फ तात्या अभ्यंकर यांचा स्वतःचा शाकाहार-मांसाहार याबद्दलचा दृष्टीकोन मराठी आंतरजालावर सर्वशृत आहेच. त्यामुळे त्यांना मांसाहार 'अभक्ष्य' आहे हे मान्य नाही हे स्पष्ट आहे. ते अधिक स्पष्ट व्हावे आणि "'अभक्ष्य' शब्दाचा अर्थ व्यक्तीसापेक्ष असलाच पाहिजे" या त्यांच्या जुन्या मागणीचा पुनरुच्चार करण्याकरिता ही चर्चा त्यांनी प्रस्तावित केलेली आहे असे मला वाटते.
असे असेल तर मी चर्चा प्रस्तावकाशी जितके शक्य असेल तितके सहमत आहे.

अवांतरः
तात्या, अभक्ष्य अणि अभक्षहे दोन वेगेवेगळे शब्द असावेत असे वाटते.

हो, खरं आहे!

त्यामुळे त्यांना मांसाहार 'अभक्ष्य' आहे हे मान्य नाही हे स्पष्ट आहे.

हो, ते स्पष्ट आहेच. परंतु या चर्चेत मी मांडलेल्या मुद्द्याशी याचा काहीच संबंध नाही. मी हे सांगायचा प्रयत्न केला आहे की केवळ मांसाहार हा अभक्ष्य होत नाही तर जे अन्न भक्षण करण्याजोगे नाही ते सर्व अभक्ष्यच! मग ते भले शाकाहारी अन्न का असेना, काही वेळेला तेदेखील एखाद्याकरता अभक्ष्य असू शकते. (जे मी मधुमेहाच्या उदाहरणात म्हटले आहे.)

आणि "'अभक्ष्य' शब्दाचा अर्थ व्यक्तीसापेक्ष असलाच पाहिजे" या त्यांच्या जुन्या मागणीचा पुनरुच्चार करण्याकरिता ही चर्चा त्यांनी प्रस्तावित केलेली आहे असे मला वाटते.

खरं आहे!

आपला,
महामहोपाध्याय तात्या काणे!

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

मान्य!

'अभक्ष्य' शब्दाचा अर्थ व्यक्तीसापेक्ष असलाच पाहिजे" या त्यांच्या जुन्या मागणीचा पुनरुच्चार करण्याकरिता ही चर्चा त्यांनी प्रस्तावित केलेली आहे असे मला वाटते.
असे असेल तर मी चर्चा प्रस्तावकाशी जितके शक्य असेल तितके सहमत आहे.

१००% मान्य.

मी मटण खात नाही तरी मटणाचे भाव ब्राह्मणांमुळे वाढले असेच मला वाटते. ;-)

मनुस्मृती पाचवा अध्याय

मनुस्मृतीतल्या पाचव्या अध्यायात कायकाय खाऊ नये याबद्दल बरेच तपशील दिसले. बहुधा त्या सर्व वस्तूंना "अभक्ष्य" म्हणत असावेत. ते तपशील मी विसरलो आहे. ते तपशील काय आहेत त्याविषयी मला खूप कुतूहल नाही, आणि ते तपशील मी वापरत नाही, हे त्यावरून दिसलेच असेल.

तिथे म्हटल्याप्रमाणे विधिवत् बळी दिलेल्या प्राण्याचे मांस खाता येते, इतपत आठवते.

विस्मृती

ते तपशील मी विसरलो आहे.

मनुस्मृतीतील तपशील विसरलात म्हणजे तीला धनुविस्मृती असे म्हणता येत असेल :-) (ह.घ्या हे सांगायला लागू नये पण...!)

आपण संदर्भ दिलात म्हणून प्रथम मनुस्मृती पाहीली अर्थात जालावर शोधून. हा दुवा पहा. त्यातील ५६ वी ओळ म्हणते:
There is no sin in eating meat, in (drinking) spirituous liquor,..., for that is the natural way of created beings, but abstention brings great rewards.

बाकी तात्यांच्या मूळ मुद्याबद्दल बरेच लिहीले गेले आहे पण मला पण असेच वाटते की जे एखाद्या व्यक्तीस खाण्यालायक नाही ते त्या व्यक्तीपुरते "अभक्ष भक्षण" आहे!

घाटपांडे म्हणतात तसे वागणे, बोलणे आदी प्रमाणेच खाण्याचा संबंध हिंदू ग्रंथांत सत्व-रज-तम वृत्तींशी जोडला गेला आहे. गीताईतील खालील श्लोक पहा (विकीबुक्स) :

सत्त्व प्रीती सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी । रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्त्विक ॥ ८ ॥
खारे रूक्ष कडू तीख अम्ल अतुष्ण दाहक । दुःख-शोक-द आहार रोग-वर्धक राजस ॥ ९ ॥
रस-हीन निवालेले शिळे दुर्गंध-युक्त जे । निषिद्ध आणि उष्टे हि तामस-प्रिय भोजन ॥ १० ॥

यातील राजसीक वृत्तीत "अभक्ष भक्षण" मोडत असावे - मग ते शाकाहारी असो अथवा मांसाहारी. ह्याचा अर्थ तामसी आहार हा अभक्ष भक्षणासाठी पण व्यर्ज आहे असा होतो. तसेच अभक्ष भक्षण करणारे राजसीक वृत्तीचे असतात अथवा तसे खाणारे राजसीक होतात असापण अर्थ आहे.

सर्व साधारण समाजात जेंव्हा सात्वीक-राजसीक वृत्ती अधिक असते तेंव्हा तो उत्कर्षाकडे जात असतो. अर्थात ती केवळ खाण्यावरून ठरवता येत नाही ("तंगड्या खाउन" मग "तंगड्या" वर करून बसणे ही काही राजसिक वृत्ती नाही!)

अमेध्य

विनोबांनी भाषांतरात जरा गंमत केलेली दिसते - बहुधा वृत्त राखण्यासाठी.

"निषिद्ध आणि उष्टे"चे संस्कृत मूलपाठ्य "उच्छिष्टम् अपि चामेध्यम्" असे आहे. येथे "अमेध्य" म्हणजे मेध न केलेले (विधिवत् बळी न दिलेले) मांस. भावार्थ म्हणून "निषिद्ध" ठीकच आहे म्हणा. त्यामुळे आजकालचे बाजारातले बहुतेक मांस "तामसी" मध्ये मोडत असावे.

मांस स्निग्ध (फॅट-युक्त) असते, रश्श्यात शिजवले तर रसाळ असते, आयुष्य/बळ वगैरे ही वाढवत असावे बहुतेक. त्यामुळे मेध केलेले असले तर मात्र मांस सात्त्विक म्हटले जाईल.

(सतरावा अध्याय लहानपणी पाठ केला होता, म्हणून थोडाफार आठवतो. त्या सत्त्व-रज-तम याद्या मात्र रोजच्या आयुष्यात वापरत नाही!)

कालानुरूप

अपेक्षेप्रमाणे चांगली माहीती मिळाली :)

येथे "अमेध्य" म्हणजे मेध न केलेले (विधिवत् बळी न दिलेले) मांस. भावार्थ म्हणून "निषिद्ध" ठीकच आहे म्हणा. त्यामुळे आजकालचे बाजारातले बहुतेक मांस "तामसी" मध्ये मोडत असावे. मांस स्निग्ध (फॅट-युक्त) असते, रश्श्यात शिजवले तर रसाळ असते, आयुष्य/बळ वगैरे ही वाढवत असावे बहुतेक. त्यामुळे मेध केलेले असले तर मात्र मांस सात्त्विक म्हटले जाईल.

ह्या संदर्भात जे काही गीतेत म्हणले आहे ते कालानुरूप भावार्थाने समजून घेतले तर कदाचीत योग्य अर्थ लागू शकेल. (गीतेच्या/गीताईच्या बचावात हे लिहीत नाही आहे, अर्थ काय असू शकतो त्या संदर्भात जे वाटते ते लिहीत आहे):

विधिवत बळी न दिलेले मांस: मला अजून योग्य दुवा जालावर मिळत नसल्याने ऐकीव माहीतीवर लिहीत आहे - जर प्राण्याला त्याचे मरण समोर दिसले तर त्यातून जे काही भय उत्पन्न होते आणि त्यातून जी काही "टॉक्सिसिटी" तयार होते ती पहाता ते मांस असा प्राणि मारल्यावर खाण्यालायक रहात नाही. याचा अर्थ असा की विधिवत मारणे म्हणजे भिती उत्पन्न न करता मारणे असा अर्थ होऊ शकतो. या संदर्भात १० एक वर्षांपुर्वी मला बिफ इंडस्ट्रीज् शी संबंधीतएक अमेरिकन माणूस भेटला होता. (जरा ग्राफिक वाटू शकेल) त्याने सांगीतले की गायींना कन्व्हेयर बेल्टवर एकापाठोपाठ एक असे ठेवले जाते. आणि नंतर गायीच्या कपाळावर प्रहार होतो जो तीला होण्या आधी दिसत नाही. तसेच ज्या पद्धतीने तिचे डोळे असतात त्या पद्धतीत पुढील गायीचे काय होते ते मागच्या गायीला समजत नाही. पर्यायाने गायीच्या जन्मास योग्य असे जे काही भय उत्पन्न व्हायला पाहीजे ते होत नाही...

बाकी तामसी म्हणण्यासारखे अन्न म्हणजे जे शिळे अर्थात खराब झाले आहे, दुर्गंधीयुक्त आहे असे. त्यातून अर्थातच जी काही जीवनसत्वे मिळायला हवीत ती मिळणार नाहीत परीणामी त्याचा परीणाम ताज्या अन्नासारखा होणार नाही. बाजारातील मांस फ्रोजन असते अर्थात त्यातील सत्वे खराब होण्यापासून वाचवलेली असतात. त्या अर्थाने ते तामसीक मांस (अथवा कुठलेही इतर अन्न) होत नाही.

बाकी आधी म्हणल्याप्रमाणे "खाणे" हा एक भाग झाला त्याच्याशीच संबंधीत सात्विकता, राजसीकता आणि तामसीकता ठरवता येत नाही. आधीच्या चर्चेत सांगितल्याप्रमाणे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे मासे खायचे तर हिटलर शाकाहारी होता...

काणे यांची व्याख्याने

Padmakar Dadegaonkar
मला इतर मुद्द्यात् पडवयाचे नाही, पण एका सदस्याने म्हटल्याप्रमाणे अधिक माहिती देणे आवश्यक वाटते. काणे यांनी मुंबईच्या न्राह्मण सभेच्या दिवाणखान्यात शनिवार दिनांक २८-७ ते शनिवार दिनांक १५-१२-१९३४ या काळात धर्मशास्त्रपर जी व्यख्याने दिली ती पुढे 'धर्मशास्त्रविचार' या पुस्तकात प्रकाशित झाली. त्यातील 'भक्ष्याभक्ष्य-विचार' या प्रकरणात म.म. काणे यांनी म्हटले आहे.'या बाबतीत मला थोड वैयक्तिक खुलासा करावासा वाटतो. आपल्यामधे काही सन्मान्य देशभक्त पुढारी आहेत व त्यांचे म्हणणे पुष्कळ बाबतीत मलाही मान्य आहे. पण कित्येक बाब्तीत त्यांचे मत मान्य कराव्यास मी तयार नाही. त्या पुढार् यांचे म्हणणे असे की, आपण सांप्रत् मांसाहार सोडला ही गोष्ट इष्ट नाही. यामुळे आपण दुबळे झालो, यास्तव मांसाहारवर्जन आपण सोडल्यास म्हणजे पुनः मांसाहार करू लागल्यास आपल्यास अधिक चांगले दिवस येतील, आपली संघशक्ती वाढेल आनि आपण आपल्याला विरोध करणार् या मंडळींच्या संघशक्तीला तोंड देऊ शकू. पुढारी आम्हला सामान्यतः मान्य असले तरी सर्व बाबतीत त्यांचे आम्ही मानू असे नाही .निदान माझी तरी वृत्ती तसी मानण्याची नाही. " (पृष्ठ १७४)
वरील उतायावरून सर्व खुलासा होईल. भक्ष्य अभक्ष्य ठरविण्याचे प्रत्येकाल स्वातंत्र्य असावे या बद्दल वादच नाही. स्

आभारी आहे

माहितीबद्दल धन्यवाद.

अपथ्य-कुपथ्य

मधुमेह किंवा इतर शारीरिक व्याधी असलेल्यांनी जसले खाऊ नये तसल्या अन्‍नाला अपथ्यकारक किंवा कुपथ्य म्हणतात. भक्ष्य किंवा अभक्ष्य नाही. प्राण्याला मारण्याच्या पद्धतीतसुद्धा धार्मिक मते आहेत. प्राचीन ब्राह्मणांच्या मते विधिवत बळी दिलेले भक्ष्य, तर मुसलमानांच्या मते हाल हाल करून मारलेल्या पशूचे मांस. शीखांच्या मते एका झटक्यात मारलेला पशू भक्ष्य. ज्यू लोकांचे क्रोशर मांस तर पाश्चात्यांचे प्राण्याला बधिर करून मारायची पद्धत. ब्राह्मण सोडून इतरांना श्रावणात किंवा गणपतीच्या दिवसात मांसाहार अभक्ष्य.

हल्लीच्या ब्राह्मणाचे बरे असते. कुठल्याही पद्धतीने मारलेल्या पशूचे मांस एरवी खाल्ले तर जेवढे पाप लागते तेवढेच श्रावणात खाल्ले की!-----वाचक्‍नवी

हालहाल - बरोबर व्युत्पत्ती नाही

मुसलमान आणि ज्यू लोकांची बळी देण्याची पद्धत साधारण एकसारखीच आहे. मुसलमान ज्यू लोकांनी विधिवत बळी दिलेले मांस (त्यांच्या धर्मशास्त्रानुसार) खाऊ शकतात. त्या दोन्ही धर्मात (एकाच पुरातन धर्मातील नियमामुळे) रक्त अभक्ष्य आहे. दोन्ही धर्मांत जनावराचे रक्त पूर्णपणे सांडून मग त्याचा बळी दिला जातो. (खाटिक साधारणपणे रक्त वाया न जाऊ देता, रक्त्या विकतात. ज्या धर्मांमध्ये रक्त भक्ष्य आहे - भारतात हिंदू, युरोपात ख्रिश्चन - ते लोक आधीपासून रक्त्या खाटकाकडून विकत घेतात.)

हलाल म्हणजे वैध. ज्या गोष्टी हलाल नसतात त्या हराम असतात. जी मुले वैध (औरस) असतात त्यांना "हलालजा़दा" म्हणतात. अनौरस मुलांना "हरामजा़दा" म्हणतात. औरस=हलाल जन्म असण्यासाठी लग्न केलेले पुरते. विवाहितांनी प्रजनन करताना एकमेकांचे हाल करणे वैकल्पिक असते, हाल नाही झाला तरी संतती हलाल असते. त्याच प्रमाणे बळी देताना, रक्तस्राव करताना हाल नाही झाला, तरी ते मांस ज्यू किंवा मुसलमान धर्मशास्त्राप्रमाणे विहित मानले जाईल.

कदाचीत

आपण सांगितलेला अर्थ (इतक्या विस्तृतपद्धतीने नाही, पण) माहीत होता.
(उ.दा. - जेंव्हा "हरामखोर" म्हणतो, तेंव्हा त्याचा अर्थ काय होऊ शकतो, ते आता समजले :-) )

पण मला व्युत्पत्ती उलट पद्धतीने झाल्यासारखी कायम वाटते. म्हणजे - हलाल मधे जनावरातील रक्त निघे पर्यंत त्याला मारत नाहीत म्हणजे त्रास खूप होत असणार (असे म्हणतात की खाटीक ज्या पद्धतीने आणि जेथे मारतो, त्यानंतर ते जनावर जिवंत असले तरी "नंब" झालेले असते). थोडक्यात हलाल मधे त्रास करत मारतात (एका घावातमारायच्या आधी, म्हणून त्याला "हाल हाल" असा शब्दप्रयोग तयार झाला असावा. अर्थात हा निव्वळ अंदाज आहे पण धनंजय/वाचक्नवी अथवा येथील इतर यावर प्रकाश पाडू शकतील असे वाटते.

ज्या गोष्टी हलाल नसतात त्या मक्रूही असू शकतात.

ज्या गोष्टी हलाल नसतात त्या हराम असतात.
ह्याशिवाय एक गोष्ट असते. ती म्हणजे मक्रूह (मक्रू). उदाहरणार्थ हिंस्त्र जनावरांचे मांस खाणे. सिंहाचे, गरुडाचे मांस खाणे पाप नाही. पण घृणास्पद आहे. तूर्तास एवढेच.

हलाल, हराम वगैरे

हलाल म्हणजे वैध हे वर आलेच आहे. हलाल करणे म्हणजे बळी देणे. मुसलमान शिकारी बंदुकीच्या गोळीने प्राणी पडला की घाईघाईने त्याच्या जवळ जाऊन त्याचा प्राण जायच्या आत त्याला चाकूने भोसकून त्याचे रक्त काढतात. म्हणजे प्राण्याचे मरण एका झटक्यात न होता, त्याला मरताना वेदना व्हाव्यात, म्हणजेच त्या मांसाला चव येते असे त्यांचे धर्मशास्त्र सांगते. धनंजय लिहितात ते 'रक्त्या' काय आहे? हा शब्द फार पूर्वी ऐकला होता, पण तेव्हाही त्याचा अर्थ समजला नव्हता.
हरम=रंगमहाल, रखेली, दासी, पत्‍नी(?).. हरमसरा=जनानख़ाना..हराम=निषिद्ध, दूषित, अनुचित, अनीतिमान..डुक्कर(नाम). हरामखोर=फुकटचे खाणारा.. हरामज़ादा=वर्णसंकरयुक्त, दुष्ट, पाजी.. हरामी=व्यभिचारातून जन्मलेला, दुष्ट, लबाड..हरम्ज़्दगी=लबाडी,दुष्टपणा, भांडखोरपणा. वगैरे. फार पूर्वी हराम म्हणजे वेश्या असे मी वाचले होते, त्यामुळे हरामज़ादा म्हणजे वेश्येपासून झालेली संतती अशी कल्पना होती. तसे नसावे असे आता वाटते आहे.--वाचक्‍नवी

रक्ती

रक्तीबद्दल अजानुकर्णाने लिहिले होते. जनावरांचे रक्त विकत घेऊन त्यापासून पदार्थ बनवले जातात.

येथे वाचा.

सर्व रक्त वाहून जावे म्हणून हलाल

प्राण्याचे मरण एका झटक्यात न होता, त्याला मरताना वेदना व्हाव्यात, म्हणजेच त्या मांसाला चव येते असे त्यांचे धर्मशास्त्र सांगते.
माझ्या माहितीनुसार, सर्व रक्त वाहून जावे म्हणून हलाल करतात. तुम्ही म्हणता त्याला धर्मशास्त्रीय पुरावा असल्यास तो द्यावा, ही विनंती.

अभक्ष..

तात्या,
'अभक्ष' म्हणजे जे 'भक्षिण्या'साठी योग्य नाही ते. खाऊ नये असे.
हा शब्द सर्वसाधारण स्थितीत सर्वांना लागू होणारा आहे. मधूमेहीला साखर, मुळव्याधग्रस्तास हिरव्या मिरच्या आदी विशिष्ट व्यक्तींस लागू होणार्‍या गोष्टी आहेत. त्यांनी त्या गोष्टी न खाणं हे त्यांच्या पथ्यात सांगितलेले असते. ते त्यांचे पथ्य असते. ते स्वत:साठी ते 'अभक्ष भक्षण' आहे असे म्हणू शकतात. पण त्याने नैतिकतेला बाधा येत नाही.
मुळात जेंव्हा 'अभक्ष' भक्षण म्हंटले जाते ते ब्राह्मणांनी मांसाचार करण्यावरून म्हंटले आहे. तेही अन्न आहे, विष नाही. पण ते खाल्याने ब्राह्मण धर्म बुडतो म्हणून ते नितीमत्तेविरुद्ध आहे असे ब्राह्मणांनी मानले आहे. एखाद्या मधूमेही ब्राह्मणाने साखरेचा चहा प्यायल्यास किंवा एखाद्या मुळव्याधी ब्राह्मणाने हिरव्या मिरच्या खाल्ल्यास, त्याने 'अभक्ष भक्षण' केले असे समाज (किंवा इतर ब्राह्मण्) म्हणत नाहीत पण मांसाहार केला तर ' तो अभक्ष्य भक्ष्यण करतो' 'त्याने धर्म बुडवला' 'त्याने नितीमत्ता सोडली' असे म्हंटले जाते.
म्हणजेच 'अभक्ष्य भक्षण' शब्दप्रयोगाची व्याप्ती विशिष्ट व्याधीग्रस्त व्यक्तींपुरती संकुचित नाही. जातीसाठी असू शकेल्.
शब्दशः अर्थ घेतल्यास, 'डुक्कर' खाणे हिन्दू, ख्रिश्चनांस अभक्ष्य भक्षण नाही पण मुसलमानास आहे.
कुत्रा, उंदीर, साप खाणे आपल्यासाठी अभक्ष भक्षण असले तरी कित्येक जमातीत ती मेजवानी आहे.
असो. 'अभक्ष भक्षण' आणि 'कुपथ्य' ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चातुर्मासांत कांदा, लसूण आदी पदार्थही 'अभक्ष भक्षण' व्याखेत येतात्.

 
^ वर