सगळेच अनिश्चित! पुंजभौतिकीने वास्तवच संपवले का? - २/२ (फाइनमन यांचे लिखाण)

भाग १ मधली शेवटची वाक्ये : ...म्हणूनच सिद्धांतातल्या कुठल्या-कुठल्या कल्पना थेट तपासल्या जाऊ शकत नाहीत, त्यांच्याबद्दल तशी माहिती असावी. पण तशा सर्व कल्पनांचे उच्चाटन करणे आवश्यक नाही. केवळ प्रयोगात थेट तपासता येतील अशाच संकल्पना वापरूनच विज्ञानातले मार्गक्रमण आपण करू शकतो, हे सत्य नव्हे.
(मूलपाठ्याचा अनुवाद काळ्या ठशात, भाष्य करड्या ठशात)
-------------------------------------------------------------------------------------------------------
खुद्द पुंजभौतिकीतच शक्यतेचा आयाम (probability amplitude) आहे, गर्भित कार्यशक्ती (potential) आहे, आणि थेट मोजल्या जाऊ शकत नाहीत अशा अनेक संकल्पना आहेत. या संकल्पनांची उदाहरणे देऊन फाइनमन दाखवतात, की न मोजता येणार्‍या संकल्पनांचे उच्चाटन झालेले नाही. विज्ञानाचा पाया म्हणजे भाकिते करणे (prediction) होय. भाकिते करणे म्हणजे जो प्रयोग आजतागायत झालेलाच नाही त्यात काय निष्पन्न होईल, ते सांगणे. आपण तसे कसे करू शकतो? प्रयोगावेगळे स्वतंत्र असे काही आहे, आणि आपण ते जाणतो, असे गृहीत धरून. त्या संकल्पनेच्या ज्या पैलूच्या बाबतीत प्रयोग अजून झाले नाहीत, तिथे जे जाणतो त्याची अतिव्याप्ती (extrapolation) केली पाहिजे. फाइनमन असे म्हणतात की ज्या ठिकाणी आजतागायत प्रयोगच झाला नाही, तिथे त्या संकल्पनेचा उपयोग करायचा विचार करणे, म्हणजे ती संकल्पना वास्तव असल्याचे मानणे, होय. मी हे वेगळ्या शब्दात सांगेन. ही न मोजता येणारी संकल्पना त्या भावी निरीक्षणातही उपयोगी पडेल, असा विचार करूनही भाकिते करता येतात. मागच्या भागात फाइनमनच म्हणतात की ज्या संकल्पना थेट मोजता येत नाहीत त्या मानण्याची कुठल्या नव्या सिद्धांताला गरज नाही - त्यामुळे अशा संकल्पना कुठल्या हे नीट ध्यानात ठेवले पाहिजे. आपल्या संकल्पना आपण विचारात घेतल्या पाहिजेत, आणि ज्या ठिकाणी त्या अजून तपासलेल्या नाहीत, त्या ठिकाणपर्यंत त्यांची पोच वाढवली पाहिजे. आपण तसे केले नाही, तर आपल्यापाशी कुठले भाकीतच असणारनाही. त्यामुळे क्लासिकल (न्यूटोनियन) भौतिकवैज्ञानिकांनी सुखेनैव मानले की "स्थान" (position) - या संकल्पनेचा बेसबॉल चेंडूच्या बाबतीत अर्थ स्पष्ट होता - अशी काही संकल्पना इलेक्ट्रॉनच्या बाबतीतही अर्थपूर्ण आहे, हे त्यांनी ठीकच केले. हा मूर्खपणा नव्हे. हीच शहाणी कार्यपद्धती होय. ही भाकितेच क्लासिकल वैज्ञानिकांनी केली नसती, ती भाकिते तपासण्यासाठी प्रयोग केले नसते, तर त्या संकल्पना चुकल्या होत्या असे कळलेच नसते. प्रगतीसाठी ती भाकिते करणे, तपासणे, चूक कळणे, कबूल करणे, हाच शहाणा मार्ग होय. आजकाल आपण म्हणतो, की सापेक्षता सिद्धांत (theory of relativity) ऊर्जेच्या सर्व स्तरांवरती लागू आहे असे मानावे, पण पुढे कोणी येऊन आपल्याला सांगेल -किती तुम्ही मूर्ख. जोवर स्वतः चूक म्हणून सिद्ध होऊ असे भाकिते करत नाही, तोवर आपला हा मूर्खपणा आपल्याला कळायची वेळच येणार नाही. त्यामुळे आपण चूकही ठरू शकू अशा प्रकारचे आपल्या मर्यादेचे सीमोल्लंघन (stick one's head out) करणे हीच विज्ञानाची अवघी कल्पना आहे. आणि आपण कुठल्या प्रकारे चूक करत आहोत ते कळण्यासाठी कुठल्यातरी संकल्पनेबद्दल आपली काय भाकिते आहेत ते शोधून काढणे कळीचे आहे. अशा तर्‍हेने संकल्पना बनवणे आवश्यक आहे. मी अन्यत्र संकल्पना मानण्याच्या या गरजेला "सोय" म्हटले आहे, आणि विज्ञानासाठी "सोय" हे एक महत्त्वाचे तत्त्व आहे असे म्हटले आहे. याच तत्त्वाला अनुसरून मी अन्यत्र "सेंट्रिफ्यूगल फोर्स" विशिष्ट विचारसरणीत मानणे सोयीचे आहे, असे म्हटले आहे.

आपण पुंजभौतिकीतल्या अनिश्चिततेबाबत (indeterminacy बाबत) काही उल्लेख केलेलेच आहेत. म्हणजे एखादा भौतिक प्रयोग शक्य तितक्या काळजीपूर्वक मांडला तरीही त्याची भविष्यातली भौतिक स्थिती काय आहे, ते सांगणे आपल्याला शक्य नाही. जर एखादा अणू चेतवलेल्या स्थितीत असेल तर त्यातून प्रकाशकण (photon) निघणार - पण तो नेमका कधी निघणार याचे आपल्याला भाकित सांगता येत नाही. त्यातून प्रकाशकण निघायच्या शक्यतेचा आयाम काय त्याचे आपण भाकित सांगू शकतो, पण नेमके भविष्य आपण सांगू शकत नाही. यातून "निर्धारस्वातंत्र्याचा (free will) अर्थ", "जगात काही निश्चित नाही", वगैरे, असल्या बाबतीत प्रश्न आणि निरर्थक गप्पा उद्भवल्या आहेत. जर या सर्व कल्पनांसाठी पुंजभौतिकीने जागा करून दिली, असे म्हणायचे असेल, तर तितपत अनिश्चितता क्लासिकल भौतिकीत नव्हती असा या बाता करणार्‍या लोकांचा गैरसमज असावा. तो गैरसमज फाइनमन पुढील परिच्छेदात दूर करतात. पण न्यूटोनियन तत्त्वाला दोष देण्यासाठी न समजलेल्या पुंजभौतिकीचा लोकांनी असा वापर करणे, हे फाइनमन यांना मुळीच आवडले नसावे. म्हणून या तर्कदुष्ट आणि भोंगळ विचारसरणीला ते निरर्थक गप्पा (नॉन्सेन्स) म्हणतात.

अर्थातच आपण येथे ठासून सांगितले पाहिजे, की क्लासिकल (न्यूटोनियन) भौतिकीही एका प्रकारे अनिश्चितच आहे. बहुतेक लोकांना असे वाटते, "भविष्य नेमके वर्तवता येत नाही" हे खास पुंजभौतिकीचे वैशिष्ट्य आहे - आणि यातून मनाची (mind) कार्यप्रक्रिया, निर्धारस्वातंत्र्य, वगैरे, गोष्टींचे स्पष्टीकरण होते. पण विश्व हे जरी "क्लासिकल" असते - म्हणजे भौतिकीचे कायदे खरोखर क्लासिकल असते - तरीही मन आहे त्यापेक्षा फारसे वेगळे असते का? हे तितके स्पष्ट नाही. आता हे खरे आहे, की विश्वातल्या (किंवा वायू भरलेल्या एका पात्रातल्या) प्रत्येक कणाचे या क्षणीचे स्थान, आणि या क्षणीचा वेग आपलाला ठाऊक असता, तर आपण नेमके भविष्य वर्तवू शकलो असतो. आणि म्हणून क्लासिकल विश्व पूर्वनिश्चित (deterministic) आहे. पण असे समजा, की प्रत्येक अणूचे नेमके स्थान कुठे आहे त्याबद्दल आपल्या मोजमापात नेमकेपणा नाही (येथे केवळ मोजमाप करायच्या यंत्रात नेमकेपणा नाही, असे फाइनमन म्हणायचे आहे) आणि असे समजा की प्रत्येक कणाबाबत एक लक्ष-कोट्यांश (one part in a billion) भाग मोजण्यात कमीजास्त होत आहे (error). तो अणू पुढे दुसर्‍या अणूला टक्कर देईल, आणि आधीच्या सूक्ष्म प्रामादिक स्थान-नोंदणीमुळे, टकरेनंतरच्या स्थान-भाकितात थोडा अधिक प्रमाद (error) असेल. आणि अर्थातच प्रत्येक टकरेनंतर हा प्रमाद वाढतच जाईल. सुरुवातीला स्थान निश्चित करण्यातला प्रमाद अगदीच सूक्ष्म असला तरी लवकरच स्थाननिश्चितीतला प्रमाद खूपच मोठा होईल. उदाहरण द्यावे तर असे : बांधावरून पाणी कोसळते आहे आणि तुषार उडत आहेत. आपण जवळपास उभे असू तर कधीमधी एखादा तुषार आपल्या नाकावर पडेल. हे पूर्णपणे यादृच्छिक भासते, पण ही प्रक्रिया शुद्ध क्लासिकल सिद्धांताने पूर्णतया सिद्ध आहे. बांधावरून कोसळण्याआधी पाण्यात जे काही नेमके प्रवाह-उपप्रवाह होते, त्यांच्यावर प्रत्येक तुषाराचे नेमके स्थान अवलंबून असते. ते कसे? उपप्रवाहातला सूक्ष्मातिसूक्ष्म वेडेवाकडेपणा कोसळण्याच्या प्रक्रियेत वाढत जातो, आणि अशा तुषारांना पूर्णपणे यादृच्छिकता प्राप्त होते. अर्थातच जोवर आपल्याला पाण्याची गती पूर्णपणे तंतोतंत ठाऊक नसेल तर तुषारांच्या स्थानाबद्दल भाकित सांगणे खरोखर शक्य नव्हे. म्हणजे क्लासिकल भौतिकीतही निर्धारस्वातंत्र्य, मनाचा स्वैर व्यवहार दिसून येण्याइतपत भाकितांची अनिश्चितता आहे. हे सर्व पुंजभौतिक परिणाम मानणे म्हणजे एकीकडे क्लासिकल भौतिकशास्त्र न समजणे, आणि दुसरीकडे पुंजभौतिकी न समजणे - म्हणजे अवघा भोंगळपणा होय.

आणखी नेमकेपणे सांगावे तर असे. आपले मोजमाप कितीका वास्तवाशी निकटगामी असो, आपण अशी काही कालमर्यादा सांगू शकतो, त्यानंतर आपली भाकिते विश्वसनीय राहाणार नाहीत. खास हे, की ही कालमर्यादा काही फार लांबलचक नसते. एक लक्ष-कोट्यांशापर्यंत मोजमाप नेमके असले तर काही लाखो करोडो वर्षांपर्यंत आपली भाकिते कामचलाऊ राहात नाहीत. प्रमादाच्या अंशाशी या कालमर्यादेचे घातांकात्मक (logarithmic) नाते आहे - आणि गणित करता असे दिसून येते, की अल्प अत्यल्प काळात आपली माहिती अवघी प्रमादात हरवून जाते. मोजमापांतला नेमकेपणा वाटल्यास कोटी-कोटी-कोटी-कोटी अंशांवर न्या - पण जोवर आपण कुठेतरी थांबू - आपल्याला असे दिसेल की तेवढा कोटी-कोटी-कोटी-कोटी आकडा तोंडी म्हणून दाखवायच्या आत आपली भाकिते करण्यालायक राहाणार नाहीत. त्यामुळे कोणी लोक असे म्हणतात की आपल्याला जाणवणार्‍या मनाच्या स्वैर चंचलतेमुळे आपल्याला हे आधीच कळायला हवे होते, की क्लासिकल "पूर्वनिश्चित" भौतिकशास्त्र चूक आहे, आणि पुंजभौतिकीमुळे या "पूर्णपणे पूर्वनिश्चित" विश्वापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे - या लोकांचे असे म्हणणे ठीक नव्हे. क्लासिकल भौतिकशास्त्र जसे उपयोगात आणता येत होते (practically), त्या दृष्टिकोनातून त्यात आधीच पर्याप्त अनिश्चितता उपलब्ध होती.

पुंजभौतिकीबद्दलच्या व्याख्यानांमध्ये फाइनमन पुन्हापुन्हा दाखवतात, की अणूंच्या बाबतीत क्लासिकल भौतिकशास्त्र चुकीचे निष्कर्ष देते. या उपप्रकरणात ते क्लासिकल शास्त्रही तितकेच वैज्ञानिक प्रक्रियेच्या दृष्टीने योग्य होते, असे दाखवतात. पुंजभौतिकीतल्या शोधांनी क्लासिकल संकल्पना चुकल्या आहेत हे दाखवले. पण संकल्पना सांगणे -> भाकिते करणे -> तपासणे -> प्रत्यक्ष निरीक्षणांशी न जुळणार्‍या संकल्पना त्यागणे -> नवीन संकल्पना तयार करणे->...->...-> या विज्ञानाच्या आधीच्याच तात्त्विक पायाला पुंजभौतिकीच्या शोधांनी तसूभरही धक्का दिलेला नाही. भौतिकीत वापरल्या जाणार्‍या संकल्पनांच्या संक्रमणाने विज्ञानाच्या विचारसरणीलाच शह बसलेला आहे, त्या विचारसरणीची मात झालेली आहे, असा काही गैरसमज लोकांमध्ये झालेला दिसतो. तो गैरसमज दूर करायचा प्रखर प्रयत्न फाइनमन करतात. पूर्वीचे भौतिकवैज्ञानिक, आणि पुंजभौतिक वैज्ञानिक एकाच प्रयोगनिष्ठतेला, भाकिते तपासण्याच्या निष्ठेला मानतात, तो पाया मुळीच बदललेला नाही. उलट तो स्थिर असल्यामुळेच संकल्पना बदलण्यास वाव आहे, संकल्पना बदलतात, असे समजावून देण्याचा फाइनमन येथे प्रयत्न करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------(समाप्त)

Comments

अगदी अगदी

फाइनमन यांचे म्हणणे आणि त्यावरील आपले भाष्य पूर्णपणे पटले.
खरेतर इतक्या स्पष्ट शब्दात नव्हे पण काही विस्कळीतपणे हे असेच आहे हे यापूर्वीच आपोआप कळाले होते.
आपल्या विचारांना समर्थ आणि स्पष्ट दुजोरा मिळाला की बरे वाटते. :)

क्लासिकल (पूर्वानुभाव) भौतिकी आणि क्वांटम (कणानुगामी) भौतिकी यात पायाभूत तार्किक अंतर नाही. अंतर फक्त संकल्पनांबाबत आहे. ( विषयांतर - जसे ऍनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल यात आहे. विषयभूल -कणाच्या ठिकाणाच्या अनिश्चितीप्रमाणे सँपलिंग क्रियेतसुद्धा सँपलिंग रेट कितीही वाढवला तरी मूळ सिग्नल जसाच्या तसा निश्चितपणे पुनर्निर्मित करता येणार नाही. कारण दोन सँपलच्या मधल्या कालात होणार्‍या घटनांची अनिश्चितता. सँपलिंग एरर.)

शिवाय मागील अर्धभागाच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे - झाड पडले म्हणून निश्चितपणे ध्वनी झाला हे केवळ कॉरस्पॉडन्सने सिद्ध करता येणार नाही. काही प्रमाणात ते खरे ठरेल. (१००००० झाडे पडली तर प्रत्येकवेळी ध्वनी होईल. पण दशकोटी झाडे पडली तर प्रत्येक झाडाचा ध्वनी होईलच असे निश्चितपणे सांगता येणार नाही.
उदा. टुंगुस्का स्फोटाच्या प्रकारासारख्या प्रचंड स्फोटात अनेक झाडे पडली. यावेळी स्फोटानंतर एका क्षणात जर तिथे निर्वात पोकळी निर्माण झाली असेल तर त्या निर्वात पोकळीत त्या क्षणानंतर पडलेल्या झाडांचा आवाज होणार नाही. वगैरे... ;)

असो.
धनंजय, अशा लेखांमुळे मला अल्झायमर्स डिसीज होणार नाही अशी शक्यता आहे. कृपया आपले असे लेखन सुरू ठेवावे.

हं!

हं!

आपला
गुंडोपंत

मर्यादित आकलनक्षमता

मराठी असे आमुची मायबोली
***********************************
पुंजभौतिकी संबंधीचे श्री.धनंजय यांचे दोन्ही लेख मी पुनःपुन्हा वाचले. पण म्हणावे तसे समजूं शकलो नाही.विचारान्ती माझ्या आकलनक्षमतेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. माझ्या वर्तुळाची त्रिज्या लहान आहे याची जाणीव झाली. त्या परिघाचे उल्लंघन मी करू शकत नाही हे उमगले. त्यामुळे मी त्या वर्तुळाच्या आत उभा राहून बर्ट्रॅण्ड रसेल, रिचर्ड फेनमन, श्री. धनंजय यांना तसेच ज्यांना पुंजभौतिकी "करतळी आवळे" प्रमाणे सुस्पष्ट झाली आहे त्या सर्वांना दुरूनच प्रणाम करतो.

हम्म् !

आपण असे म्हणता तर आमचा काय पाड !

धनंजय,
हा उपक्रम सुद्धा चांगला होता. मला विशेष असमजले नाही पण कधीतरी समजेल अशी आशा बाळगुन आहे.

(आवळा खाउन पाणी प्यायले की ते गोड लागते इतकेच आम्हाला माहित. असो ! सध्या नुसतेच पाणी पितो.)
-- लिखाळ.

असे म्हणू नये...

ज्याने वेळ आणि लक्ष दोन्ही दिले, त्याच्यापर्यंत विचार पोचले नाहीत, तर तो सांगण्याच्या पद्धतीचा दोष मानावा. ऐकणार्‍याच्या आकलनक्षमतेचा नव्हे.

येथील विचारांच्या शृंखलेत कुठे कच्चा दुवा असेल, आणि तिथे आकलन अडखळल्यासारखे वाटले, तर आश्चर्य नाही. नीरक्षीरविवेकबुद्धी शाबूत असल्याचे ते लक्षण मानावे. अशा कच्च्या दुव्यांकडे लक्ष वेधून दिलेत तर माझा फायदाच होईल. सर्वांना रस वाटेल असे तुम्हाला वाटले, तर ती कमजोर स्थाने इथे सांगावीत, नाहीतर व्य.नि.ने कळवावीत.

(करतली आवळ्याप्रमाणे पुंजभौतिकीचे गणित फाइनमन यांना हस्तगत होते, हे मात्र खरे. तसेच रसेल यांना सापेक्षतेच्या सिद्धांतातली समीकरणे सोडवण्यासाठी गणिताचा चांगला हातखंडा होता.) मला मात्र शाळेतल्या बारावीपुढच्या गणिताची कामापुरतीच तोंडदेखली ओळख आहे :-) त्या शिक्षकांच्या श्रेणीत कोणी मला लुडबुडताना बघितले तर हसे माझेच होईल.

पण वैज्ञानिक दृष्टिकोन (किंवा विज्ञानाना तात्त्विक पाया) हा रसेल किंवा फाइनमन यांचा मक्ता नव्हता, असे मला वाटते. आपल्या रोजच्या आयुष्यात यशस्वीरीत्या वापरत असलेल्या तत्त्वांचेच काटेकोर पालन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन होय, असे माझे मत आहे. कधी घिसाडघाईने आपलीच रोजची यशस्वी तत्त्वे (म्हणजे अप्रत्यक्ष संकल्पना जरूर वापरणे, पण शंका ठेवून राहाणे, वगैरे, ही तत्त्वे) आपण त्यागतो. कित्येकदा (घाईच्या "आदतसे मजबूर") हे असे होते आहे, हेसुद्धा आपल्या लक्षात येत नाही. आपल्या भाकिता-निरीक्षणात कोणतीही विसंगती लक्षात येता, त्याबद्दल विचार करण्याची सवय असल्यास, आपल्याच अंतर्गत तत्त्वांना आपण नेमका कुठे फाटा दिला ते लक्षात येते. अव्यावसायिक वैज्ञानिक (म्हणजे आपण सगळेच) आणि व्यावसायिक वैज्ञानिक यांच्यात हाच काय तो सूक्ष्म फरक आहे, असे मला वाटते. (विसंगतींबद्दल विचार करून त्या दूर करण्याची सवय, दूर करता आल्या नाहीत तरी त्यांची मोजदाद ठेवायची सवय, हा फरक.)

फाइनमन आणि रसेल यांचे लेखन एवढ्यासाठी उद्धृत केले, कारण ते नावाजलेले शिक्षकही होते. त्यांच्या विचारशृंखलेतही परखडपणे कच्चे दुवे शोधलेत तर विद्यार्थी म्हणून तुम्ही-आम्ही त्यांचा केलेला आदरच ठरावा.

कळता काही कळेना!

मराठी असे आमुची मायबोली |
***********************************
पुंजभौतिकी
" श्री.धनंजय यांचे पुंजभौतिकी विषयीचे लेखन वाचले का?"
"हो. त्यांचे सर्वच लेखन मी अगदी मन लावून वाचतो.आपल्याला माहित नसलेल्या , सर्वस्वी नवीन अशा अनेक गोष्टी त्यांच्या लेखनातून कळतात."
"बर्टरॅण्ड रसेल तसेच फ़ेनमन यांच्या लेखांचे त्यांनी छान भाषांतर केले आहे नाही?"
"यात तर त्यांचा हातखंडा आहे.इंग्रजीच नव्हे तर संस्कृत मधील पतंजलीकृत व्याकरणमहाभाष्याच्या प्रस्तावनेचे उत्कृष्ट मराठीकरण त्यांनी दिले होते; ते तुम्ही वाचलेच असेल.कोणतीही संकल्पना व्यक्त करण्यासाठी समर्पक मराठी शब्द ते सिद्ध करू शकतात.पारिभाषिक कोशांविना त्यांचे कधी अडत नसावे."
"हे दोन्ही लेख तुम्हाला समजले का?"
" तसे वाचताना समजते आहे असे वाटले.पण मग त्यावर मनन करावे तर सगळे निसटते.म्हणजे पूर्ण बोध होत नाही.पुंजभौतिकीविषयी मी पूर्वी काहीच वाचले नाही.त्याचा हा परिणाम असेल."
"लेख अजून सोपे हवे होते असे वाटते का?”
"नाही. कोणतीही कल्पना सोपी करून सांगण्याची हातोटी श्री.धनंजय यांना चांगलीच साधते हे अनेकदा दिसून आले आहे.पण काही संकल्पना अशा असतात की त्यांचे सुलभीकरण एका मर्यादे पलीकडे करता येत नसावे.
रिचर्ड डॉकिन्स यांचे "द गॉड डिल्यूजन" हे पुस्तक पुन्हा वाचताना पुढील परिच्छेदाकडे(पृ.३६५) लक्ष वेधले:
........धिस प्रेडिक्टिव्ह सक्सेस सीम्स टु मीन दॅट क्वांटम थिअरी हॅज गॉट टु बि ट्‌रु इन सम सेन्स; ऍज ट्‌रु ऍज एनिथिंग वुई क्नो, इव्हन इन्क्लुडिंग द मोस्ट डाऊन-टु -अर्थ कॉमन-सेन्स फ़ॅक्ट्स. यट दि ऍसम्शन्स दॅट द क्वांटम थिअरी नीड्स टु मेक, इन ऑर्डर टु डिलिव्हर दोज प्रेडिक्शन्स ,आर सो मिस्टेरिअस, दॅट एव्हन द ग्रेट फ़ेनमन हिमसेल्फ़ वॉज मोव्हड टु रिमार्क "इफ़ यू थिंक यु अंडरस्टॅण्ड क्वांटम थिअरी....यू डोण्ट अंडरस्टॅण्ड क्वांटम थिअरी."
क्वांटम थिअरी इज सो क्विअर दॅट फ़िजिसिस्ट रिसोर्ट टु वन ऑर अनदर पॅरॅडॉक्सिकल इंटरप्रिटेशन ऑफ़ इट. डेव्हिड ड्यूट्श, इन "द फ़ॅब्रिक ऑफ़ रिऍलिटी ", एंब्रेसेस द मेनी वर्ल्डस इंटरप्रिटेशन ऑफ़ क्वांटम थिअरी इट पोस्ट्युलेटस अ व्हास्ट ऍण्ड रॅपिड्ली ग्रोइंग नंबर ऑफ़ युनिव्हर्सेस,एक्झिस्टिंग इन पॅरलल ऍण्ड म्यूच्युअली अनडिटेक्टेबल.इन सम ऑफ़ दीज युनिव्हर्सेस आय ऍम ऑलरेडी डेड.इन अ स्मॉल मायनॉरिटी ऑफ़ देम, यू हॅव अ ग्रीन मूस्टॅश.ऍण्ड सो ऑन.”

"खरे आहे.अशावेळी आपण वाचायचे. समजेल तेव्हडे समजेल.श्री. लिखाळ म्हणतात त्याप्रमाणे कधीतरी समजेल अशी आशा करायची"
"हो. आपण त्यांच्या पुढील लेखनाची प्रतीक्षा करूंया."
................................................................................................................................

लेख आवडले | स्पष्टीकरणाची गरज काय?

धनंजय,
दोन्ही लेख आवडले. Everything should be made as simple as possible, but not simpler. ही आइनस्टाइनची उक्ती तुम्हीच पूर्वी उपक्रमावर दिली होती. त्याची आठवण झाली.

फाइनमन यांचा आक्षेप 'पुंजभौतिकीच्या (किंवा कोणत्याही वैज्ञानिक) संकल्पनांचा योग्य अभ्यास नसताना इतरत्र अयोग्य वापर' यावर अधिक विचार करता आणि अनुवादातील '"भविष्य नेमके वर्तवता येत नाही" हे खास पुंजभौतिकीचे वैशिष्ट्य आहे - आणि यातून मनाची (mind) कार्यप्रक्रिया, निर्धारस्वातंत्र्य, वगैरे, गोष्टींचे स्पष्टीकरण होते. पण विश्व हे जरी "क्लासिकल" असते - म्हणजे भौतिकीचे कायदे खरोखर क्लासिकल असते - तरीही मन आहे त्यापेक्षा फारसे वेगळे असते का?' हे वाक्य वाचून एक शंका येते की 'मनाच्या कार्यप्रक्रिये'चे स्पष्टीकरण वैज्ञानिक सिद्धांतांनी, तेही भौतिकशास्त्राच्या, देण्याची गरजच काय?

स्पष्टीकरणाची कधीकधी गरज

हे वाक्य वाचून एक शंका येते की 'मनाच्या कार्यप्रक्रिये'चे स्पष्टीकरण वैज्ञानिक सिद्धांतांनी, तेही भौतिकशास्त्राच्या, देण्याची गरजच काय?

बरोबर आहे. मनाच्या अंतर्गत व्यवहाराचे भौतिकशास्त्रीय स्पष्टीकरण द्यायची वेळ उद्भवू नये.

मनाच्या बहिर्गामी व्यवहाराबद्दल मात्र भाकिते करण्याची वेळ अधूनमधून (म्हणजे खूपच!) येते. याच्याबद्दल आपण पुष्कळदा तपासून बघता येणारे ठोकताळे (=विज्ञान) वापरतो. "अमुक केले तर समोरची व्यक्ती चवताळून तमुक प्रकारे वागणार..." वगैरे.

बहुतेक प्रसंगी मनाचा "मुक्त" बहिर्गामी व्यवहार काही भौतिक परिणाम घडवतो. उदाहरणार्थ, इतस्ततः विखुरलेले कपडे घड्या होऊन कप्प्यात राहावेत असा मी निर्धार केला तर ते कपडे खाली जमिनीवरून वर कप्प्याकडे जातात. (असे माझी आई समजते - कपडे तसेच खाली पडलेले बघून गुरुत्वाकर्षणाच्या भौतिकशास्त्राकडे दुर्लक्ष करून माझ्या "आळशीपणाला" दोष देते.) त्याच प्रकारे कोणी (क्लार्क केंट नामक सद्गृहस्थ?) निर्धार करावा की रुळावरून उतरलेली रेल्वेगाडी रुळावर असावी. गाडी पटदिशी रुळावर बघितली नाही तर मात्र लोक बहुधा गाडीच्या वजनाबद्दल बोलतात, कोणाच्या (क्लार्क केंटच्या) आळशीपणाबद्दल नव्हे... म्हणजे मन काय निर्धार करू शकते, काय निर्धार करू शकत नाही, त्याबद्दल काही भौतिकशास्त्रीय मर्यादा वापरण्यात सोय आहे. त्या मर्यादा समजून भाकिते केलीत तर ती सत्यात उतरण्याची अधिक शक्यता आहे.

"भौतिकशास्त्रात काही राम असेल तर अशा भौतिक परिणाम असलेल्या मानसिक व्यवहाराची योग्य व्यवस्था त्याच्याद्वारे लावता आली पाहिजे," अशी काही अपेक्षा आपण करत असू. भौतिक शक्यतेत असलेल्या क्रिया करण्याइतपत निर्धारस्वातंत्र्य ते शास्त्र (=ती समज) आपल्यापाशी सोडते. काही लोकांना वाटते की न्यूटोनियन नियम आपल्यापाशी काहीच स्वातंत्र्य शिल्लक ठेवत नाही. मी रेल्वेगाडी नुसत्या निर्धाराने उचलणार नाही अशी ज्याप्रकारे भौतिकशास्त्रीय मर्यादा आहे, त्याचप्रमाणे जमिनीवरचे कपडेही उचलणार नाही (किंवा उचलेनच) अशी भौतिकशास्त्रीय मर्यादा आहे की काय, असे न्यूटनचे पूर्वनिश्चित गणित बघून काही लोकांना वाटते. या तथाकथित "पूर्वनिश्चित" गणितातही पुरेशी अनिश्चितता आहे, त्यात कपडे उचलेन किंवा नाही उचलणार असा स्वैर व्यवहार शक्य आहे. म्हणूनच कपड्यांचा पसारा बघून आई मला रागावू शकते - गुरुत्वाकर्षणाची ऐशीतैशी. (पण रेल्वेगाडी न-उचललेली बघून कोणी मला रागवू नये. गुरुत्वाकर्षणाची ऐशीतैशी करून चालणार नाही. शिवाय माझे नाव क्लार्क केंट नाही.)

भौतिकशास्त्रीय स्पष्टीकरणांची गरज असण्याचा आणि मनाच्या स्वतंत्र व्यवहाराचा असा काही संबंध आहे.

भौतिक परिणाम

भौतिकशास्त्रात काही राम असेल तर अशा भौतिक परिणाम असलेल्या मानसिक व्यवहाराची योग्य व्यवस्था त्याच्याद्वारे लावता आली पाहिजे

ही अपेक्षा रास्त नाही असे वाटते. उदा. दोन रसायने एकत्र केल्यावर तिसरे एक वेगळेच रसायन निर्माण होणे इ. क्रियांचे भौतिक परिणाम दिसत असले तरी त्याचे स्पष्टीकरण भौतिकशास्त्राने देता येणार नाही, रसायनशास्त्राने देता येईल. कदाचित अणूंच्या पातळीवर जाऊन या अभिक्रियेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करता येईल. तर मग पेशी विभाजनाची जीवशास्त्रीय प्रक्रिया जर पाहिली तर त्यातही एका पेशीपासून अधिक पेशी निर्माण होतात या भौतिक परिणामाचे स्पष्टीकरण भौतिकशास्त्राच्या आधारे देता येणार नाही.

मानसिक व्यवहाराचे स्पष्टीकरण हा एक वेगळ्याच चर्चेचा विषय आहे. मुळात मन म्हणजे काय, त्याचे कार्य कसे चालते, विचार निर्माण कसे होतात इ.इ. याचे काही सर्वमान्य स्पष्टीकरण आहे का?

रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांमधला फरक?

यांच्यामध्ये फरक काय आहे? म्हणजे मूलभूत तात्त्विक फरक, असे विचारायचे आहे. शाळेत दोन वेगवेगळे विषय शिकवतात हे शिक्षणाच्या सोयीच्या दृष्टीने चांगलेच आहे.

तर मग पेशी विभाजनाची जीवशास्त्रीय प्रक्रिया जर पाहिली तर त्यातही एका पेशीपासून अधिक पेशी निर्माण होतात या भौतिक परिणामाचे स्पष्टीकरण भौतिकशास्त्राच्या आधारे देता येणार नाही.

हे बहुधा बरोबर नाही. असे स्पष्टीकरण देता यावे.

मानसिक व्यवहाराचे स्पष्टीकरण हा एक वेगळ्याच चर्चेचा विषय आहे. मुळात मन म्हणजे काय, त्याचे कार्य कसे चालते, विचार निर्माण कसे होतात इ.इ. याचे काही सर्वमान्य स्पष्टीकरण आहे का?

"मन म्हणजे काय" याबद्दल काही अंतर्गत कल्पना असतात, त्यांच्याबद्दल तुमचे म्हणणे पटण्यासारखे आहे. (माझ्या वरील प्रतिसादात सुरुवातीचे वाक्य असेच काही आहे.) बहिर्गामी व्यवहार आहे, त्याबाबत कोणाला विशेष कुतूहल असेल तर शब्दाच्या व्याख्या केल्या जातील. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे कुतूहल असेल, ते लोक वेगवेगळ्या व्याख्या करतील. चर्चा आणि विश्लेषण करताना कुठली व्याख्या वापरतो, ते लक्षात ठेवले तर पुरते. "ऊर्जा" शब्दाचे वेगवेगळे अर्थ, तो शब्द वापरताना घ्यायची काळजी, वगैरे चर्चा हल्लीच आनंद घारे यांनी उपक्रमावर केली आहे. त्याचप्रमाणे "मन म्हणजे काय" "त्याचे कार्य काय" विषयी शब्दांच्या वेगवेगळ्या व्याख्या लोक करतील. ते शब्द काटेकोरपणे संदर्भानुसार व्याख्येत वापरणे महत्त्वाचे.

फरक

यांच्यामध्ये फरक काय आहे? म्हणजे मूलभूत तात्त्विक फरक, असे विचारायचे आहे. शाळेत दोन वेगवेगळे विषय शिकवतात हे शिक्षणाच्या सोयीच्या दृष्टीने चांगलेच आहे.

मूलभूत फरक नाही असे वाटते. हे जाणवल्यानेच जीवशास्त्राचे उदाहरण दिले.

तर मग पेशी विभाजनाची जीवशास्त्रीय प्रक्रिया जर पाहिली तर त्यातही एका पेशीपासून अधिक पेशी निर्माण होतात या भौतिक परिणामाचे स्पष्टीकरण भौतिकशास्त्राच्या आधारे देता येणार नाही.

हे बहुधा बरोबर नाही. असे स्पष्टीकरण देता यावे.

हे समजले नाही.

जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र

यांच्यात मूलभूत फरक काय? बहुतेक शाळा-कॉलेजांत पेशींचे विभाजन वगैरे रासायनिक प्रक्रिया म्हणून समजावून सांगतात.

शाळेत शिकवलेले रसायनशास्त्र म्हणजे विशिष्ट ऍप्लिकेशनसाठी तपशीलवार गणिते करणे, इतर काही भौतिक तपशिलांकडे दुर्लक्ष करणे. (म्हणजे गणित न करता "हे असेच आहे" असे म्हणून वेळ वाचवणे.)

त्याचप्रमाणे जीवशास्त्र म्हणजे विशिष्ट रासायनिक तपशिलांकडे जास्त लक्ष देणे (कुठल्या ऍप्लिकेशन - म्हणजे वैद्यक वगैरे - करिता महत्त्व वाटत असेल ते तपशील), आणि अन्य रासायनिक तपशिलांकडे दुर्लक्ष करणे. (म्हणजे गणित न करता "हे असेच आहे" असे म्हणून वेळ वाचवणे.)

शक्यतोवर "हे असेच आहे" असे म्हणून वेळ वाचवण्यापूर्वी, "हे असेच असू शकते" याबद्दल स्वतःला पटवून घेतलेले असले तर बरे असते - ज्ञानात विसंगत कप्पे-कप्पे पडत नाहीत. तरी कुठल्या विशेष व्यवसायात केवळ त्या व्यवसायातील क्रिया करायच्या असतील, तर सामान्यनियम विशेष क्षेत्रातील नियमांशी सुसंगत आहेत की नाहीत, ते स्वतःला पटवून घेणे अपरिहार्य नाही.

असे करण्यात सोय आहे, वेगवेगळ्या व्यवसायात लवकर स्पेशलायझेशन करता येते, नोकरी मिळवता येते, हे मी नाकारत नाही. शाळेत असे विभाजन करणे ठीकच आहे. पण मला मूलभूत काही फरक माहीत नाही.

खरे

हेही खरेच :) 'मूलभूत विज्ञाना'च्या कक्षेत न येणारे (मूलभूत विज्ञानानुसार स्पष्टीकरण देता येत नाही असे) असे काही आहे काय?

:-) खूप काही

कुठल्याही काळात स्पष्टीकरण न देता येणार्‍या गोष्टींची संख्या सारखी वाढतच राहाते... निरीक्षणे स्पष्टीकरणांच्या विरुद्ध गेलीत तर स्पष्टीकरणे त्यागावी लागतात, त्यामुळे संकल्पना अधूनमधून बदलाव्या लागतात, वगैरे, लेखात आलेलेच आहे.

प्रश्न थोडा बदलून

:)

प्रश्न थोडा बदलून - विज्ञानाच्या साहाय्याने स्पष्टीकरण देता येणार नाही अशी काही व्यापक प्रमाणात अनुभवाला येणारी गोष्ट आहे का? विषयांतर होईल कदाचित, पण मनोव्यापार, मूड, भावभावना याविषयी काही थिअरी आहे का?

फारच मोठा प्रश्न

इथे विज्ञान म्हणजे "वस्तुनिष्ठ निरीक्षणांची व्यवस्था लावून भाकिते तपासणारी पद्धत" अशी काही व्याख्या आहे का?

मग तुमच्या प्रश्नातला
"अनुभव"=निरीक्षण,
"व्यापक"=?अनेकांना येणारा अनुभव? = ?वस्तुनिष्ठ?
असा समांतर अर्थ लावणे योग्य आहे का? असल्यास पुढे वाचावे. नाहीतर पुन्हा समजावून प्रश्न विचारावा.

अशी कुठलीही व्यापक अनुभवाची गोष्ट असली तिची व्यवस्था लावली, भाकिते तपासली, तर त्या क्रियेला विज्ञान म्हणू शकतो, आणि त्या व्यवस्थेला वैज्ञानिक स्पष्टीकरण म्हणू शकतो.

आता तुम्हीच वर म्हटले आहे की "मन म्हणजे काय" याची व्याख्या वादग्रस्त आहे. त्यामुळे वेगळेच एक उदाहरण : मागे माझी जुनी मोटार कधी सुरू व्यायची, कधी चावी फिरवली तरी सुरू व्हायची नाही. हे निरीक्षण होते, आणि वस्तुनिष्ठ होते (एकदा मेकॅनिकसमोरही चालू झाली नाही). पण त्या घटनांची कुठलीही व्यवस्था मी आणि मेकॅनिकने लावली नाही, कारण त्याचा ताशी दर मोटारीच्या किमतीपेक्षा अधिक होता. कुठली संकल्पना मानली नाही (म्हणजे बॅटरीतील चार्ज, स्टर्टर मोटरचे भ्रमण, इंधनाच्या नळीत हवा शिरेल असे छिद्र, वगैरे), भाकिते केली नाहीत, आणि तपासली नाहीत. त्यामुळे त्या चालू होण्या-न-होण्याच्या घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण मला मिळाले नाही (आणि पैसे टाकण्याइतके माझे कुतूहलही नव्हते.)

अशा प्रकारे कित्येक सामान्य अनुभवांचे स्पष्टीकरण वैज्ञानिक पद्धतीने आपल्याला माहीत नसते.

पुन्हा : "मन म्हणजे काय" याची व्याख्या वादग्रस्त आहे. "वादग्रस्त" म्हणजे काय असावे? वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या बाबतीत कुतूहल असावे. त्यामुळे तुम्हीच तुमच्या मनातील व्याख्या वापरून उत्तर द्या :
१. हा "मन" प्रकार अनुभवता येतो का?
२. हा प्रकार वस्तुनिष्ठ आहे का? - म्हणजे तुमची व्याख्या मानून घेणार्‍याला तुमच्यासारखा अनुभव येतो, असे कुठल्या निरीक्षणाच्या बाबतीत म्हणता येते का?
१+२ असल्यास त्याची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. (नसल्यास खालील ता.क. बघावे)
३. त्या बाबतीत व्यवस्था लावून, त्या व्यवस्थेवरून भाकिते करायची. ती भाकिते तपासायची. ती भाकिते ठीक निघालीत तर तुमच्या व्यवस्थेने त्या "मन" विषयाबद्दल वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले असे मानता येते. भाकित फोल ठरले, तर त्या मानलेल्या व्यवस्थेने स्पष्टीकरण दिले नाही, असे समजण्यास हरकत नाही.
४. (नाहीतर माझ्या मोटारगाडीसारखी गोष्ट असेल तर घटनांची व्यवस्था लावायचा, भाकिते करायचा, तपासायचा खर्च करायची इच्छा नसेल. तसे असल्यासही "सध्या वैज्ञानिक स्पष्टीकरण नाही" असे म्हणणे ठीक आहे.)

मला वाटते, "मनोविज्ञान" आणि "मनोरोगज्ञान" (सायकॉलॉजी आणि सायकायॅट्री) या विषयांचा अभ्यास करणार्‍या लोकांना या विषयात कुतूहल असते. ते त्या कुतूहलाचा विषय एकमेकांशी जुळतो असे चर्चेतून ठरवतात. वस्तुनिष्ठ निरीक्षणे जुळवता येतील अशा व्याख्या करतात (म्हणजे "मन", "भावना" वगैरे, शब्दांच्या). ते लोक त्या निरीक्षणांची व्यवस्था लावतात, भाकिते करतात, तपासतात. त्यांच्या व्याख्या तुमच्या कुतूहलाशी जुळतात का? हे तुम्ही बघितले पाहिजे. कुतूहल जुळत नसल्यास अर्थातच त्यांची व्यवस्था तुमच्यासाठी अप्रस्तुत आहे. कुतूहलाचा विषय+व्याख्या जुळत असल्यास त्यांची निरीक्षणे तुम्ही प्रस्तुत मानाल. त्यांची स्पष्टीकरणे (थियरी) कदाचित तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील.

ता.क.--पुढील मुद्दे तुम्ही आधीच मानता असे तुमच्या प्रश्नावरून वाटते, तरी पुन्हा लिहितो--
ज्या गोष्टी व्यापक असतील पण अनुभवता येत नाहीत, त्यांच्याबद्दल वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येत नाही. उदाहरणार्थ : इजिप्शियन देव अमोन रा याची व्यापक नजर. ती आहे की नाही, असली तर कृपादृष्टी की वक्रदृष्टी, याचा अनुभव येत नसल्यामुळे व्यवस्था लावण्यासाठी माझ्यापाशी निरीक्षणेच नाहीत.

ज्या गोष्टींचा अनुभव व्यापक नाही, त्यांच्याबद्दल वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येत नाही. उदाहरणार्थ : काल मला पडलेल्या स्वप्नाचे तपशील. "कुठलेतरी स्वप्न पडणे - तपशील बाजूला ठेवा" असा अनुभव मानला, तर तो व्यापक असू शकतो, आणि या सामान्य (तपशील नसलेल्या) अनुभवाचे कदाचित स्पष्टीकरण देता येईल. अर्थात वेळ आणि कुतूहल असल्यास.

 
^ वर