सगळेच अनिश्चित! पुंजभौतिकीने वास्तवच संपवले का? - १ (फाइनमन यांचे लिखाण)
तत्त्वज्ञानचा, किंवा खरेखोटे काय, असा विषय निघाला, की लोकांच्या बोलण्यात सहजच पुंजभौतिकीचा उल्लेख होतो. त्यातल्या त्यात "हाइसेनबेर्गच्या अनिश्चितता तत्त्वा"चा उच्चार होतो. विज्ञानच "सबकुछ झूठ" म्हणते असे कोणी म्हणते. आणि गप्पा रंगत जातात. विज्ञान "सगळे काही अनिश्चित" असे म्हणत असेल, हे जरा विचित्र वाटते. कमीतकमी तसे सिद्ध करणे असंभव वाटते. जलपानावरील गप्पांपेक्षा काही अधिक माहिती मिळवावी म्हणून आपण विसाव्या शतकातल्या एका महत्त्वाच्या भौतिकी-शिक्षकाचे, म्हणजे रिचर्ड फाइनमन यांचे, विचार वाचूया.
रिचर्ड फाइनमन (विकी दुवा) यांचा आयुष्यकाल १९११-१९८८ असा होता. मनुष्य मोठा खेळकर, गमत्या होता, बाँगो ढोल वाजवण्याचा छंद होता, वगैरे, "दुढ्ढाचार्य-विरोधी" अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे प्रमुख शोधकार्य पुंजभुतिकीमध्ये होते. त्या विषयातल्या कार्याबद्दल १९६५मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक दिले गेले. त्यांचे नाव अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचे काम त्यांच्या पाठ्यपुस्तकाने केले. हे पाठ्यपुस्तक आहे "फाइनमन यांची भौतिकशास्त्रावरची व्याख्याने (द फाइनमन लेक्चर्स इन फिजिक्स)." यातले अनेक भाग बारावी-बीएस्सी शिकलेला विद्यार्थी सहज वाचू शकेल. त्यातील तत्त्वांवर प्रभुत्व मिळवायला मात्र मला येते त्यापेक्षा थोडे अधिक गणित शिकावे लागेल.
या पुस्तकातल्या पुंजभौतिकीबद्दलच्या एका प्रकरणात हे दोन पानी उपप्रकरण आले आहे - तत्त्वज्ञानविषयक पडसाद. त्यावर मी भाष्य लिहिणार आहे, पण भाष्याचा संदर्भ समजण्यासाठी मूलपाठ्याचा अनुवादही देणार आहे. (रंगसंगती: मूलपाठ्य - काळा ठसा, भाष्य - करडा ठसा.) मूलपाठ्याचा प्रत-अधिकार ऍडिसन-वेस्ले प्रकाशक, यांच्यापाशी आहे.
-----------------------------------------------------------------------------------
पुंजभौतिकीचे तत्त्वज्ञानविषयक पडसाद
आता आपण पुंजभौतिकीच्या तत्त्वज्ञानातील तार्किक पडसादांबद्दल थोडक्यात विचार करू. नेहमीप्रमाणे दोन बाबी आहेत : एक बाब भौतिकशास्त्रासाठी तत्त्वज्ञानातले तार्किक पडसाद; आणि दुसरी बाब या तात्त्विक विचारांचा अन्य संदर्भांत ओढूनताणून वापर. विज्ञानातील तात्त्विक कल्पना जेव्हा अन्य क्षेत्रांत खेचून आणल्या जातत, साधारणपणे त्यांचा विपर्यास होतो. त्यामुळे शक्यतोवर आपण आपली चर्चा भौतिकशास्त्रापर्यंत मर्यादित ठेवू.
पुंजभौतिकीतल्या काही तांत्रिक संकल्पनांची नावे मोठी रोचक आहेत : जसे "अनिश्चितता तत्त्व" किंवा "कणलहरी द्विधातत्त्व/द्वैत" वगैरे. त्यांचा तंत्रशुद्ध अर्थ समजून न घेता काही लोक आपल्या मनाला रोचक वाटेल तो वेगळाच अर्थ "'पुंजभौतिकी-सिद्ध" मानतात. आणि तत्त्वचर्चा करतात. तसे केल्यामुळे अनर्थ होतो, असे फाइनमन यांचे मत दिसते.
सर्वप्रथम लक्षणीय पैलू म्हणावा तर अनिश्चितता तत्त्व (अन्सर्टनटी प्रिन्सिपल) होय; निरीक्षण केल्याने घटनाक्रमावर (फेनॉमेनन वर) परिणाम होतो. निरीक्षण केल्याने घटनाक्रमात हस्तक्षेप होतो, हे आधीपासून, नेहमीच माहीत होते. नवा मुद्दा हा की निरीक्षक-यंत्रणेत फेरफार करून हा परिणाम वाटेल तितका कमी करता येत नाही. तसे कल्पनेतही करता आले नाही तर त्या परिणामाकडे दुर्लक्ष करता येत नाही. आपण कुठल्या विवक्षित घटनाक्रमाचे निरीक्षण करतो, तेव्हा जर काही किमान प्रमाणात घटनाक्रम विचलित होणार असेल तर तो दृष्टिकोन सुसंगत असण्यासाठी तसे विचलन अपरिहार्य आहे.
निरीक्षणामुळे घटनाक्रम विचलित झालेल्याकडे दुर्लक्ष करता तर येतच नाही, घटनाक्रम तसा विचलित होणार हे मुद्दामून लक्षात घेऊनच दृष्टिकोन सुसंगत राहील.
पुंजभौतिकीपूर्वीच्या भौतिकशास्त्रात निरीक्षक कधीकधी महत्त्वाचा होता - पण ते महत्त्व तात्विकदृष्ट्या पायाभूत नव्हते - तपशीलमात्र होते. ही समस्या उठवली जाते : जर अरण्यात वृक्ष कोसळला, आणि ऐकायला कोणी नसले, तर त्या परिस्थितीत ध्वनी होतो का? अर्थात, हे जर कुठल्याही वास्तविक अरण्यामधल्या वास्तविक वृक्षाबाबत बोलत असू, तर अर्थातच ध्वनी होतो - तिथे कोणी नसले तरीही. ऐकायला कोणी हजर नसले तरीही अन्य खाणाखुणा उरतात.ध्वनीमुळे पाने हलतील, आणि आपण अगदी काळजीपूर्वक शोधू, तर असे दिसूही शकेल, की कुठलेतरी पान काट्यावर घासून खरचटलेले दिसेल, आणि त्यावरून ध्वनीमुळे पानाचे कंपन झाल्याची निश्चित खूण सापडेल. कुठल्यातरी प्रकारचा ध्वनी होता असे आपल्याला म्हणावे लागेल. कंपन उत्पन्न करणारा = ध्वनी, असे काही घडले, असे त्या खुणेवरून ओळखता येते. आपण असे विचारू शकू: ध्वनीची संवेदना होते काय? तर नाही, कारण संवेदना केवळ संवेदनाशील (कॉन्शस) व्यक्तीलाच होऊ शकते, असेच बहुधा असावे. "असेच बहुधा असावे" (प्रिझ्यूमेब्ली) शब्द वापरला, कारण संवेदनाशीलता-संवेदना असा खराखरचा अवश्यसंबंध आहे की नाही याबाबत फाइनमन यांचे मत नसावे, पण "संवेदनाशील", "संवेदना" केवळ शब्दस्वरूपावरुन, या प्रश्नाचे उत्तर देण्यापुरते तसे मानण्यास हरकत नाही. आणि अरण्यात मुंग्या होत्या का, मुंग्या संवेदनाशील असतात का, वृक्ष संवेदनाशील होता का- हे सगळे काही आपल्याला माहीत नाही. तर ती समस्या आपण त्या ठिकाणीच सोडूया.
पुंजभौतिकीचा विकास झाल्यानंतर लोकांनी आणखी एका मुद्द्यावर भर दिलेला आहे - तो असा : ज्या वस्तू आपल्याला मोजता येत नाहीत, त्यांच्याबद्दल आपण बोलू नये. (वास्तविक सापेक्षता सिद्धांतही हेच म्हणतो.) एखाद्या वस्तूला मोजमापाची व्याख्या नसेल, तर त्या वस्तूला सिद्धांतात काहीच स्थान नाही. आणि विशिष्ट ठिकाणी स्थित कणाचा संवेग (मोमेंटम) नेमका मोजला जाऊ शकत नाही, म्हणून त्याला सिद्धांतात काही स्थान नाही. पण क्लासिकल (न्यूटनच्या) मेकॅनिक्समध्ये हीच काय ती गडबड होती, असे समजणे चुकीचा दृष्टिकोन आहे. विज्ञानात संकल्पना मानून, त्या मानलेल्या संकल्पनांनी भाकिते वर्तवून, ती भाकिते तपासण्याची पद्धत आधीसारखीच चालू आहे. न मोजल्या जाणार्या संकल्पना असणे, म्हणजे चुकीची पद्धत असे म्हणणे चूक होय. मागे उपक्रमावर आपण फ्लोजिस्टॉन संकल्पनेबद्दल विचार केला. फ्लोजिस्टॉन संकल्पनाच मनात आणू नये असा विचार ठीक नाही. जोपर्यंत ती संकल्पना मनात ठेवून आपली समज वाढते आहे, तोपर्यंत ती मनात येणे ठीकच आहे. क्लासिकल (न्यूटनच्या) मेकॅनिक्समध्ये हीच काय ती गडबड होती, असे समजणे म्हणजे परिस्थितीचे निष्काळजी विश्लेषण होय. आपण कणाचे स्थान आणि संवेग नेमकेपणाने मोजू शकत नाही, याचा असा अर्थ नाही की आधीपासून ठरवायचे की त्या संकल्पनांबद्दल आपण बोलूच शकत नाही. त्याचा केवळ असा अर्थ आहे, की त्या संकल्पनांबद्दल बोलायची आपल्याला गरज नाही. विज्ञानामधली परिस्थिती ही अशी आहे : जरी एखादी संकल्पना थेट मोजली जाऊ शकत नसली, किंवा प्रयोगाशी तिचा थेट संदर्भ लावता येत नसला तरी ती उपयोगी असू शकते किंवा निरुपयोगी असू शकते. सिद्धांतात ती संकल्पना असलीच पाहिजे अशी गरज नसते. तेच दुसर्या शब्दांत सांगूया. आपण क्लासिकल जगत्सिद्धांत आणि पुंजभौतिकी जगत्सिद्धांत यांची तुलना करत आहोत असे समजा, आणि समजा हे खरे आहे की कणाचे स्थान आणि त्याचा संवेग आपल्याला प्रयोगांत फक्त ढोबळमानानेच मोजता येतो. प्रश्न हा आहे, की कणाला कुठले नेमके स्थान आहे, कुठला नेमका संवेग आहे, या कल्पना वैध (व्हॅलिड) आहेत का? क्लासिकल सिद्धांतात त्या कल्पना विचाराधीन असतात, पुंजभौतिकीत त्या खिजगणतीत नसतात. फक्त तेवढ्यावरून क्लासिकल भौतिकशास्त्र चुकले आहे, असा अर्थ निघत नाही. नवीन पुंजभौतिकीचा शोध लागला तेव्हा क्लासिकल लोक - म्हणजे हाइसेनबेर्ग, श्रडिंगेर, आणि बॉर्न सोडून सर्व लोक - असे म्हणाले "बघा तुमचा सिद्धांत चांगला नाही कारण काही विवक्षित प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकत नाहीत : कणाचे नेमके स्थान काय? कणाने कुठल्या छिद्रातून मार्गक्रमण केले? आणि असे काही..." हाइसेनबेर्गचे उत्तर होते : "या प्रश्नांची उत्तरे देण्याची मला गरज नाही, कारण तुम्ही प्रायोगिकरीत्या हा प्रश्न विचारू शकत नाहीत." म्हणजे या प्रश्नांची उत्तरे द्यायची आपल्यला काही गरज नसते. समजा तुमच्याकडे दोन सिद्धांत आहेत - सिद्धांत 'अ' आणि सिद्धांत 'ब'. 'अ'मधील विश्लेषणात कुठलीशी, थेट तपासता येत नाही अशी संकल्पना वापरली जाते. 'ब'मध्ये ती कल्पना अंतर्भूतच नाही. त्या दोन सिद्धांतांच्या भाकितांमध्ये तफावत असली तर आपण 'ब'ला दोष देऊ शकत नाही, की त्यात 'अ'मधील कल्पनेचे स्पष्टीकरण नाही, कारण तशी कुठली वस्तू थेट तपासलीच जाऊ शकत नाही. म्हणूनच सिद्धांतातल्या कुठल्या-कुठल्या कल्पना थेट तपासल्या जाऊ शकत नाहीत, त्यांच्याबद्दल तशी माहिती असावी. पण तशा सर्व कल्पनांचे उच्चाटन करणे आवश्यक नाही. केवळ प्रयोगात थेट तपासता येतील अशाच संकल्पना वापरूनच विज्ञानातले मार्गक्रमण आपण करू शकतो, हे सत्य नव्हे. फाइनमन अनेकदा वेगवेगळ्या शब्दात "उपयोगी/ग्राह्य संकल्पना" आणि "अपरिहार्य संकल्पना" यांच्यात फरक करून सांगतात. गर्भितार्थ असा की "गरज नसलेल्या" संकल्पना उपयोगी असेपर्यंत जरूर वापराव्यात पण त्या संकल्पनांचा उल्लेख नाही, म्हणून दुसरा कुठला सिद्धांत खंडित करता येत नाही. खंडन करण्यासाठी मात्र मोजमाप करू शकतो अशा संकल्पनाच वापरता येतात.
-----------------------------------------------------------------------------------
Comments
भाग २ चा दुवा, इंग्रजी शब्द, शुद्धीपत्र
भाग २चा दुवा.
विकास यांनी सुचवल्याप्रमाणे काही इंग्रजी शब्द येथे देत आहे:
पुंजभौतिकी : Quantum mechanics
तत्त्वज्ञानविषयक तार्किक पडसाद : philosophical implications
अनिश्चितता तत्त्व : uncertainty Principle
निरीक्षण : observation
घटनाक्रम : phenomenon
संवेदना : perception
संवेदनाशील : conscious
सापेक्षता सिद्धांत : Theory of relativity
स्थान : position
संवेग : momentum
आणखी कुठले शब्द द्यायचे राहून गेले असल्यास खरडीत किंवा व्यनि ने कळवावे. या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये. संपादन करून त्या शब्दांचे इंग्रजी मूलशब्द येथे देईन.
शुद्धीपत्र :
१. रिचर्ड फाइनमन यांचा आयुष्यकाल १९१८-१९८८ असा होता.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
रिचर्ड फेनमन
यांना सामान्य माणसाच्या भाषेत शास्त्र समजावून देणारा माणूस म्हटले जाते. त्यांचे लेक्चर्सही तसेच आहेत. माझ्याकडे त्यांच्या लेक्चर्सची पीडीएफ फाईल आहे. आणि फिजिक्सचे इतर शास्त्रांतील स्थान यावर एक ऑडिओ फाईल आहे.
पीडीएफ लेक्चर गूगलवर मिळेल. ऑडिओ सर्वांना कसा पोहोचवण्याची काहीतरी सोय करतो.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा..
सुरुवात्
चांगली झाली आहे, पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
अवांतर -
१. लेखात मांडलेला विचार हा थोडाफार 'अस्तित्व हे विनासायास आहे' या तुमच्या विज्ञानाबाबतच्या पूर्वपीठिकेतल्या दुसर्या मुद्द्याच्या थोडा जवळ जातो आहे, असे वाचताना अधूनमधून वाटत राहिले.
२.अभिजित, ऑडिओ फाईल इस्निप्स्वर चढवता येईल का?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वर्णन आणि नियम
माझ्या त्या लेखातल्या "नियम सांगण्यापूर्वी वर्णन सांगणे आवश्यक आहे"या परिच्छेदाशी त्यातल्या त्यात अधिक साम्य आहे.
"वर्णन" म्हणजे मोजमाप केलेली निरीक्षणे, आणि "नियम" म्हणजे "गर्भित संकल्पनांबद्दल विचार". तिथे हे "वर्णनच आधी" तत्त्व थोडेसे सौम्य केले आहे असे दाखवतो. म्हणजे
खूप ढोबळ वर्णन -> खूप ढोबळ नियम -> कमी ढोबळ वर्णन -> कमी ढोबळ नियम -> सूक्ष्म वर्णन -> आणखी नीट केलेले नियम ->->->
म्हणजे जोवर "नियम"=संकल्पना उपयोगी आहेत तोवर ठेवायच्या, त्यांच्या आधारे आणखी निरीक्षणे = वर्णने करायची. वर्णनांवरून नियम त्यागायचे, नवीन नियम-संकल्पना मानायच्या->नवीन वर्णने->नवीन नियम->-> असे.
या लेखात फाइनमन साधारण तसेच काही म्हणतात.
"वर्णने"="थेट निरीक्षणे" नसलीत तरी संकल्पनांबद्दल बोलता येते. पण दोन संकल्पनांमध्ये विरोधाभास असला तर निरीक्षण हेच प्रमाण ठरू शकते. एका (आदल्या) सिद्धांतातल्या अनिरीक्षित संकल्पनांवरून, त्या संकल्पना छाटून टाकलेल्या पुढच्या सिद्धांताचे खंडन करता येत नाही.
त्या लेखातले "अस्तित्व विनासायास आहे" हे तत्त्व कार्यकारणभावाबाबत आहे. (म्हणजे प्रत्येक कार्याला कारण असते हे तत्त्व. हे तत्त्व मी मूलभूत मानत नाही. कारण शोधून-न-शोधून काही निष्पन्न होत असेल तरच कार्याचे कारण शोधतो.) फाइनमन यांच्या लेखातल्या पुढच्या भागात कार्यकारणभावाबद्दल विवेचन आहे की नाही, ते आठवत नाही.
छान
सुरूवात छान झाली आहे. पुढचे भाग आले की अजून रंगत येईल.
----
प्रोबॅबिलिटी
फाईनमन यांनी पुढे काय लिहिले आहे ते वाचण्याची उत्सुकता आहे. आपले भाष्यही.
अवांतर -
पुंज भौतिकी बद्दलचे माझे ज्ञान यथातथा असले तरी 'वास्तव' ही सर्वात जास्त शक्य गोष्ट आहे असे म्हणायला हरकत नसावी. ('ढोबळमानानेच' , 'विचाराधीन')
एक कण निश्चित कोणत्या ठिकाणी आहे हे सांगणे अशक्य आहे कारण बघितल्याने त्याचे स्थान बदलते याबरोबरच बघितल्याने संदर्भ चौकट आणि मोजण्याचे मापही बदलत असावेत. (असे वाटते. हे मी कोठेही वाचून लिहीत नाही. कोणी म्हटले आहे काय? चु.भू. द्या. घ्या. इंग्रजीत 'नथिंग ईज अब्सोल्युट' वगैरे... हेही भौतिकशास्त्रापुरते मर्यादित, तर्कशास्त्रात नव्हे!)
परंतु वास्तवात एखादा कण कोणत्या ठिकाणी असावा त्याची जास्तीत जास्त शक्यता वर्तवता येते. त्या कणाची स्थिती, संदर्भ चौकट आणि माप यांच्यात निरीक्षणाने होणारा जास्तीत जास्त बदल जमेस धरूनही ही जास्तीत जास्त शक्यता म्हणजे वास्तव असे म्हणता येईल.
'क्वांटम टनेलिंग' या विषयाबद्दल वाचताना प्लांक स्थिरांकाची किंमत बदलली तर एखाद्या अन्य विश्वात मोटरकारही भिंतीतून आरपार जाऊ शकते असे काहीसे वाचले. वाचावे ते नवलच!
वृक्ष कोसळला तेंव्हा आवाज झाला का? या प्रश्नाचे उत्तरही 'आवाज झाला असण्याची जास्तीत जास्त शक्यता संभवते' हे वास्तव म्हणून स्विकारायला हरकत नसावी.
हम्म
वृक्ष कोसळला तेंव्हा आवाज झाला का? या प्रश्नाचे उत्तरही 'आवाज झाला असण्याची जास्तीत जास्त शक्यता संभवते' हे वास्तव म्हणून स्विकारायला हरकत नसावी.
मला वाटते इथे करस्पाँडन्स प्रिंसिपल वापरायला हवे. पुंजभौतिकी सूक्ष्म वस्तूंसाठी उपयोगी पडते पण मोठ्या गोष्टींसाठी क्लासिकल थिअरी वापरता येते.
----
"आरपार" शब्द "टनेलिंग"पेक्षा आवडला
"टनेलिंग"मध्ये चित्रदर्शी वैचित्र्य आहे. म्हणजे जणूकाही मोटार (किंवा इलेक्ट्रॉन) भिंतीत (किंवा आडथळ्यात) भुयार करून जाते आहे. या चित्रातला दोष असा की ती मोटार (किंवा तो इलेक्ट्रॉन) कुठल्यातरी तत्क्षणी भुयाराच्या आत असते. वास्तविक असे निरीक्षण होईल (भुयारात असलेला कण दिसेल) असे तो सिद्धांत भाकित करतच नाही.
निरीक्षण केल्यास कधी "आर" आणि कधी "पार" असा तो कण दिसेल - हे त्या सिद्धांताचे भाकीत आहे. "जाईल" या चित्रदर्शी रूपक-शब्दाबद्दल माझे काहीच मत नाही. पण "आरपार" हा शब्द तुम्ही वापरून "टनेलिंग" या रूपक-शब्दातली एक घोडचूक दूर केली आहे. सलाम!
लेख आवडला
लेख आवडला. फाइनमनची लेक्चरसिरीज वाचलेली नाही पण त्या विषयी ऐकले मात्र बरेच आहे.
एक सुचवावेसे वाटते: काही शब्द मराठीत पटकन समजायला जड जातात. त्यामुळे त्यांचे इंग्रजी प्रचलीत शब्द जर कंसात सांगितले (सुरवातीस) तर बरे होईल.
अवांतरः
मनुष्य मोठा खेळकर, गमत्या होता, बाँगो ढोल वाजवण्याचा छंद होता, वगैरे, "दुढ्ढाचार्य-विरोधी" अशी त्यांची ख्याती होती.
चॅलेंजरचा जो मोठा अपघात घडला त्या संदर्भातील चौकशी समितीत त्यांनी केवळ एकट्याने वेगळे निकालपत्र जोडले होते ज्यात तत्कालीन रेगन शासनाच्या घाईमुळे कसे राजकीय दडपण आले इत्यादी लिहीले होते.
आठवणीप्रमाणे: मॅनहॅटपोप्रोजेक्टच्या वेळेस (अमेरिकेच्या दुसर्या महायुद्धाच्या वेळच्या पहील्या वहील्या अणूचाचणीच्या वेळेस) त्यांना लॉस ऍलोमॉसया ठिकाणी मागील एका बाजूने सुरक्षा कवच नसल्याने सहज "अतिगोपनीय" असलेल्या या प्रकल्पाच्या भागात जाता येते हे लक्षात आले. पण सरळ तसे सांगण्याऐवजी ते कामाला येताना सुरक्षेमधून जात आणि बाहेर जाताना मागील बाजूने जात. आशा होती की सुरक्षाव्यवस्थेच्या हे लक्षात येईल. तसे ते आले देखील... पण त्या संदर्भात अशा अर्थाचे निरीक्षण लिहीले गेले की की एक व्यक्ती दरोज आत येते पण बाहेर जात नाही!
त्यांनी गोपनीय कागदपत्रे असलेल्या कपाटांच्या कुलुपांचे गोपनीय क्रमांक पण शोधले होते...
सहमत
सहमत आहे. लेख सोपा आणि सुरस झाला आहे. विकासरावांचा प्रतिसादही उत्तम.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चांगली माहिती
धन्यवाद, विकास.
चॅलेंजर, लोस आलामोस बाबतीत फाइनमन यांचे काम महत्त्वाचे होते.
त्यांच्या विकी पानावर आणखी एक विनोदी किस्सा आहे :
फ्रीमन डायसन यांनी फाइनमनचे वर्णन "अर्धा जीनियस, अर्धा विदूषक" असे केले, आणि मग स्वतःचेच वाक्य सुधारले "पूर्ण जीनियस, पूर्ण विदूषक"!
उत्कृष्ट लेख
फेनमन यांची अजून काही पुस्तके प्रसिध्द आहेत यातील "You must be joking Mr. Fenman"हे एक. हे स्वतः उत्तम बाँगो ढोल वाजवत असत इतकेच नव्हे तर स्वतंत्र कार्यक्रमही करत. आपल्या आजारी पत्नीला कोडी घालून तिला सतत कशात तरी गुंतवून आजारपणाबद्दल भीती घालवीत असत.
नितीन
सं.ग्रा.
ज्योतिषातल्या मंगळ या संकल्पनेचा जेव्हा बागुलबुवा झाला त्यावेळी या मंगळदोषाचे उपद्रवमुल्य कमी करण्यासाठी सं.ग्रा. म्हणजे संकटकाळी ग्राह्य असा पर्याय देण्यात आला.पुढे निरुपयोगी व अग्राह्य कल्पना याकडे वाटचाल करण्यास बेळगावच्या ज्यो.सुंठणकर यांच्या" विवाह मंगळाची अनावश्यकता" या पुस्तकाचा आम्हाला बराच उपयोग झाला.
प्रकाश घाटपांडे
क्वांटम केमिस्ट्री
लेख आवडला.
क्लासिकल केमिस्ट्रित पदार्थ हा कणांनी बनलेला आहे यासारखे क्वांटम केमिस्ट्रीत एक अँटी मॅटर नावाचा पदार्थ असल्याचे गणले जाते, जो अँटी-पार्टिकल्सने बनलेला असतो (चू. भू. द्या. घ्या. माझा स्रोत डॅन ब्राऊनचे एन्जल्स अँड डिमन्स) म्हणजे अँटी-इलेक्ट्रॉन आणि अँटी-प्रोटॉन आणि अँटी-न्यूट्रॉन(?) हे अँटी-अणू बनवू शकतात(?) असा काहीसा सिद्धांत वाचल्याचे आठवते.
अँटी मॅटर
ड्यान ब्राऊन वाचलेला नाही, पण अँटीमॅटरबद्दल काही उत्तरे इथे आहेत.
----
उत्सुकता
अनुवाद अतिशय आवडला. पुढील भागांची उत्सुकता आहे.
आवडला...
पुंजभौतिकी हे आकलनाला कठीण आणि अंगीभूत करण्यासाठी त्याहूनही कठीण... त्यामुळे त्यात नक्की काय म्हटले आहे हे सामान्यांना समजवून सांगणे कठीण जाते. त्यामुळे आपला प्रयत्न आवडला.
विशेषतः
ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण कणाची स्थिती मोजत नाही, तोपर्यंत त्याचे केवळ लहरसूत्र (वेव्ह फंक्शन) लिहिता येते. त्यात आपला लाडका "आय्" (वजा एकचे वर्गमूळ) जागोजाग येतो... पण तुम्हाला कणाची स्थिती मोजायची असेल तेव्हा मात्र लहरसूत्राच्या योग्य भागांचा वर्ग होऊन "आय्" जादूसारखा नाहीसा होतो..
अनिश्चितता तत्त्व, लहरसूत्राचा पुंजीय एकीकरण (क्वांटम कोलॅप्स) आणि त्यातून उद्भवणारे तात्त्विक प्रश्न फारच रंजक आहेत. त्यावर अधिक माहिती या पानांत पाहायला आवडेल. पुंजभौतिकीत निरिक्षक का महत्त्वाचा ठरतो यावर अधिक प्रकाश पडेल...
राजेश