ओरॅकल ऍप्लिकेशन (भाग ३: तांत्रिक संरचना)

भाग १भाग २ मध्ये म्हटल्याप्रमाणे:

 • मोठ्या उद्योगांमध्ये अनेक विभाग असतात. प्रत्येक विभागाचा हिशोब/जमाखर्च वगैरे सांभाळायला त्यांचे स्वतःचे सॉफ्टवेअर्स असत. परंतु यात दोन विभागांचा एकमेकांशी संवाद तर नसेच शिवाय एकमेकांकडील आवश्यक विदा उपलब्ध नसल्याने जास्त वेळ जात असे. इ. आर. पी अशी "एक" प्रणाली पुरवते जी अनेक छोट्या सॉफ्टवेअर्सने बनलेली असते.
 • समान विदा वापरणारी ही प्रणाली, वेगवेगळ्या "मॉड्युल्स" मध्ये विभागली आहे. विदा संरक्षण हे दोन पातळ्यांवर केले जाते. विदा पातळी व जबाबदारी पातळी. वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांअंतर्गत वेगवेगळ्या स्तरावर विदा हाताळला जाऊ शकतो.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ई. आर. पी प्रणाली म्हणजे काय व त्यातील ओरॅकल ऍप्लिकेशनमधील मॉड्युल्स व विदा संरक्षण प्रणाली नंतर आपण ओरॅकल ऍप्लिकेशनच्या तांत्रिक संरचनेकडे वळूया. ओरॅकल ऍप्लिकेशनची तांत्रिक जडणघडण ही बहुस्तरीय आणि विविध भागांनी एकत्रित बांधलेली प्रणाली आहे. याच्या खोलात शिरण्या आधी आपण काही प्राथमिक व्याख्या बघूयात

"सर्व्हर" म्हणजे एखादा उद्देश साध्य करण्यासाठी एका यंत्रावर (मशीन) चालणारी प्रक्रिया अथवा प्रक्रियांचा समूह होय. याला बऱ्याचदा सर्विस असेही संबोधले जाते. उदा. एच. टी. टी. पी. सर्व्हर हा एच. टी. टी. पी. संबंधीत विनंत्या ऐकून त्यानुसार प्रक्रिया करतो किंवा फॉर्म्स सर्व्हर ओरॅकल फॉर्म्सकडून आलेल्या विनंत्या ऐकून प्रक्रिया करतो.

स्तर (टिअर) म्हणजे विविध सर्व्हर्सचे/सर्विसेसचे तर्कशुद्ध विभाजन. ह्या सर्विसेस वेगवेगळ्या मशीन्सवर स्वतंत्रपणे / स्वायत्तपणे चालू शकतात अथवा एकमेकांशी संपर्काची त्यांना गरज असू शकते.

स्तर आणि सर्विस/सर्व्हर यांच्या व्याख्या समजल्या नंतर आपण ओरॅकल ऍप्लिकेशनच्या तांत्रिक संरचनेकडे बघूयात. ओरॅकल ऍप्लिकेशन ही त्रिस्तरीय संरचना आहे.

 • विदागार स्तर (डेटाबेस टिअर)
 • ऍप्लिकेशन स्तर / मध्य स्तर
 • डेस्कटॉप स्तर

ही संरचना पुढील चित्रात नीट स्पष्ट होईल

three_tier_erchitechture

विदागार स्तरावर संपूर्ण विदा व्यवस्थापन होते. ऍप्लिकेशन स्तरावर विविध प्रणाल्या असतात. त्यांचे व्यवस्थापन, त्यांच्या प्रक्रियांवर कंट्रोल आणि त्यांमधील संवाद साधण्याचे काम ह्या स्तरावर होते. डेस्कटॉप स्तरावर न्याहाळकाच्या मदतीने वापर करणाऱ्याला समजेल अश्या पद्धतीने / वापर करणाऱ्याच्या आदेशानुसार विदा मांडला जातो.
प्रत्येक मशीनला जर "नोड" म्हटलं तर अनेक नोडस मिळून जसा एक स्तर तयार होतो तसेच एका नोडवर अनेक स्तर असू शकतात. उदा. विदागार व एखादा ऍप्लिकेशन सर्व्हर एकाच मशीनवर असू शकतात. विविध प्रणाल्या एकाच ऍप्लिकेशन स्तरावर असण्याचा प्रमुख फायदा असा की त्यामुळे प्रत्येक युजरच्या मशीनवर हे सॉफ्टवेअर्स इंस्टॉल करायची गरज नसते.

आता आपण प्रत्येक स्तराचे कार्य अत्यंत थोडक्यात पाहू:
डेस्कटॉप स्तरः
या स्तरावर विदा दोन मुख्य प्रकारे दाखवला जातो. हल्लीच्या नवीन वर्जन्सवर एच. टी. एम. एल. आधारीत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तर पारंपरिक "फॉर्म बेस्ड" ऍप्लिकेशनसाठी न्याहाळकात चालणाऱ्या (उघडणाऱ्या) जावा ऍपलेटचा वापर होतो.
या स्तरावर प्रवेश करताना "एक प्रवेश प्रणाली"चा वापर केला जातो. एकदा तुम्ही योग्य परवलीचा शब्द देऊन प्रवेश केला की तुम्हाला असलेल्या जबाबदारीनुसार तुम्ही विदा हाताळू शकता. वेब/फॉर्म्स आधारीत प्रणालीसाठी वेगळे प्रवेश करण्याची गरज नसते.
पारंपरिक फॉर्म्स आधारीत प्रणाली हाताळण्यासाठी फॉर्म्स क्लायंट ऍपेलेट लागतं. त्यात हे फॉर्म्स क्लायंट ऍपेलेट जावा वर्चुअल मशीनवर (जेवीएम) चालणे गरजेचे आहे. यासाठी ओरॅकल ने "जे-इनिशिएटर" नावाची प्रणाली पुरवली आहे. ही प्रणाली फॉर्म्स क्लायंट ऍपेलेटला न्याहाळकाच्या जेवीएम ऐवजी ओरॅकलचे जेवीएम पुरवते. हे जे-इनिशिएटर प्लग-इन अथवा ऍक्टिव्ह एक्स रूपात असते व पारंपरिक प्रणाली वापरायची वेळ येताच वापरकर्त्याला डाउनलोड करायला सांगते.

ऍप्लिकेशन स्तरः
या स्तराला मध्य स्तर असेही म्हणतात. या स्तराची दुहेरी जबाबदारी असते. एक म्हणजे विविध सॉफ्टवेअर्स, प्रणाल्या या स्तरामध्ये असतात त्यांचा योग्य वापर आणि व्यवस्थापन, व दुसरी डेस्कटॉप टीअर आणि विदागारामधील संवादाचे व्यवस्थापन.
यात मुख्यत्वे पुढील सर्विसेस/प्रणाल्या/सर्व्हर्स येतात:

 • जाल(वेब) सर्व्हर
 • फॉर्म्स सर्व्हर
 • समांतर प्रक्रिया व्यवस्थापन सर्व्हर / सर्विस
 • रिपोर्ट सर्व्हर
 • व्यवस्थापन (ऍडमीन)सर्व्हर
 • डिस्कव्हरर सर्व्हर इ. (ऑप्शनल)

यातील प्रत्येक सर्व्हर हा स्वतंत्र अभ्यासाचा (आणि म्हणूनच लेखाचा; ) ) विषय आहे व त्याची व्याप्ती बरीच आहे. तूर्तास इथे मी केवळ समांतर प्रक्रिया व्यवस्थापन सर्व्हर / सर्विस बदल सांगू इच्छितो. कारण कंकरंट प्रोसेसिंग हा ओरॅकल ऍप्लिकेशनचा अविभाज्य व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ज्या प्रक्रिया/रिपोर्ट/आज्ञावल्या चालण्यासाठी वेळ लागतो परंतु वापरकर्त्याची गरज नसते अश्या आज्ञावल्या एकीकडे चालू असतात व दुसरीकडे वापरकर्ता आपले काम चालू ठेवू शकतो. यात काही आज्ञावल्य आपोआप चालवल्या जातात तर काही 'शेड्यूल' करू शकतो.

विदागार स्तरः
नावाप्रमाणे हा स्तर ओरॅकल ऍप्लिकेशनचा संपूर्ण विदा संग्रहित करतो व त्याचे व्यवस्थापन करतो. तसेच विदासंरक्षण, मदत इ. गोष्टीदेखील याच स्तरावर संग्रहित केलेल्या असतात. तपशिलात जायचं तर या स्तरावर वेगवेगळ्या फाइल्स, टेबल्स, इंडेक्सेस, आणि इतर विदागारातील महत्त्वाच्या गोष्टी संरक्षीत असतात.
साधारणतः हा स्तर डेस्कटॉप बरोबर थेट संपर्कात नसतो. ऍप्लिकेशन टीअर या संपर्काचे नियंत्रण करतो.

पुढील भागात आपण काही महत्त्वाच्या मॉड्यूल्सची ओळख करून घेऊ

टीपः या भागात काही भाग पुर्णपणे तांत्रिक शैलीत आहे. परंतु हे अपरिहार्य वाटल्याने शैली तशीच ठेवली आहे. यावरही अभिप्राय कळवावेत.

(क्रमशः)

Comments

चांगले

विवेचन चांगले झाले आहे.
एकुण विषयच तांत्रीक असल्याने लिखाण तांत्रीकच होईल.
याला एक पर्याय सुचतो तो म्हणजे व्यक्तीरेखा घेऊन, त्या व्यक्ती काय काम आणि कसे करतील याचे वर्णन करणे आणि मग हे लिखाण समजायला अजून सोपे होईल असे वाटते.
(खरं तर मलाही सॅपवर लिहितांना हाच प्रश्न पडला होता!)१

-निनाद

मस्त

लेख मस्तच झाला आहे. निनादने लिहिल्या प्रमाणे लेख तांत्रिक विषयावर असल्याने लिखाण तांत्रिक असणे अपेक्षीतच आहे. तांत्रिक विषय असा समजावून सांगणे तसे अवघड आहे.
त्रिस्तरीय व्यवस्थेत, विदागारासाठी कोणती प्रणाली वापरली जाते? सॅप आणि ओरॅकलच्या या प्रणाल्यांमध्ये कॅडची काही सुविधा आहे का? विदा शक्यतो मार्केटिंग ते मार्केटिंग वाहतो. पण त्यात इंजिनीअरींगचा विदा शक्यतो अनेकदा कॅड वर आधारीत असतो. त्यासाठी काही सोय आहे का?

छान

हा भागही चांगलाच जमला आहे. वेळ मिळाला की यापेक्षा बरा प्रतिसाद देता येतो का ते पाहते. ;-) तूर्तास एवढेच.

तिन वेळा

तिन वेळा वाचला तेंव्हा काही कळला... (असे वाटते आहे!)
इतका अभ्यास कधी करता रे बाबांनो?

(आणि सगळा वेळ यातच दिला तर व्यायाम कधी करता रे बाबांनो? मागे एकदा सॉफ्टेवेअर मध्ये असलेल्या तरूण मुलांची सतत बैठे काम केल्याने पुनरुत्पादना संबंधी काही चमत्कारीक हकिकती ऐकु आल्या होत्या! ;))) ) हे सॉफ्टवेयरवाले सारखे 'गोट्या जाम' का म्हणतात ते तेंव्हा कळले होते ;)))

असो,
मला कळले ते असे की,
काम तिन वेगवेगळ्या पण जोडलेल्या भागात चालते
भाग १- सगळा विदा एकत्रित पणे राखणे - येक्दम भारीतला माणूसच इथे जावू शकतो!
भाग २ - विदा खुप लोकांना एकाच वेळी पाहाण्याची पद्धती - हा माणूस जे ठरवेल तेच खालचा पाहू शकतो!
भाग ३ - विदा न्याहाळकाच्या वैयक्तिक सोई - कुनी बी लल्लू-पंजू ठरवून दिलेले पाहु शकतो/काम करू शकतो.

याशिवाय तुमचे ते ओरॅकल २ प्रकारे चालते. फॉर्म वापरून म्हणजे जुनी पद्धत.
आणि एच टी एम एल वापरून म्हणजे जरा नवी पद्धत.

बरुबर का?

आपला
गुंडोपंत

तीनदा वाचला

तपशीलवार आणि माहितीपूर्ण आहे. काही प्रमाणात हा प्रकार समजू लागला आहे.

चालू ठेवा, ऋषिकेश.

:)

.... मागे एकदा सॉफ्टेवेअर मध्ये असलेल्या तरूण मुलांची सतत बैठे काम केल्याने पुनरुत्पादना संबंधी काही चमत्कारीक हकिकती ऐकु आल्या होत्या! ;)))

हा हा हा!! ह्. ह्. पु.वा!.. पण हे खरं असेल तर यावर एक "माहितीपूर्ण" लेख होऊन जाऊ देत :)

बाकी

भाग १- सगळा विदा एकत्रित पणे राखणे - येक्दम भारीतला माणूसच इथे जावू शकतो!

भाग १ येक्दम म्हणजे साधारणतः फक्त तांत्रिक जाणकारालाच (डी.बी.ए. वगैरे) विद्याचा थेट ऍक्सेस असतो. बाकी कोणताही वापरकर्ता त्याच्या जबाबदारीपुरताच विदा पाहू शकतो.

भाग २ - विदा खुप लोकांना एकाच वेळी पाहाण्याची पद्धती - हा माणूस जे ठरवेल तेच खालचा पाहू शकतो!

याला पद्धत नाहि म्हणता येणार. ओरॅप्समधे प्रत्येक वापरकर्त्याची "जबाबदारी" (रिस्पॉन्सिबिलिटी) निश्चित असते. सगळ्या विद्याला ठेट ऍक्सेस असणारा डि.बी.ए. देखील केवळ विदा पाहु/हाताळू शकतो. मात्र त्या विद्याचे माहितीत रुपांतर करण्यासाठी लागणारी जबाबदारी त्याच्या कडे नसते (नसावी). उदा. डि.बी.ए. जरी सळी लेजर डिटेल्स बघू/हाताळू शकत असला तरी बॅलन्स शीट जनरेट करणं त्याला जमणार नाहि कारण ती महाकिचकट प्रोसेस ज्या जबाबदारीतून लीलया होते त्या ती जबाबदारी त्याला नाही. (शक्यतो डि.बी.ए. लोकांना बिजनेस "फंक्शनालिटि" कळु नये याची खबरदारी घेतली जाते (घ्यावी) )

भाग ३ - विदा न्याहाळकाच्या वैयक्तिक सोई - कुनी बी लल्लू-पंजू ठरवून दिलेले पाहु शकतो/काम करू शकतो.

विदा न्याहाळकाच्या वैयक्तिक सोई या प्रत्येकाला लागतात मग तो लल्लु पंजु असो वा महामाणव ;) या सोईचा वापर करून कोणता विदा हाताळायचा हे पुन्हा जबाबदारीच ठरवते. (एका वापरकर्त्याला एकापेक्षा अधिक जबाबदारी असु शकते (साधारणतः असतेच) )

याशिवाय तुमचे ते ओरॅकल २ प्रकारे चालते. फॉर्म वापरून म्हणजे जुनी पद्धत.
आणि एच टी एम एल वापरून म्हणजे जरा नवी पद्धत.

ह्ये एकदम बरुबर! :)

शेवटून दुसर्‍या भागात एखादं उदा. रचून देतो ज्यात ह्या सगळ्या कंसेप्ट्स एकत्रपणे येतील व एक ओवॅरऑल चित्र समोर येईल

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

माहितीपूर्ण

एक प्रश्न पडला - या सर्वरवरील विदा हा केवळ फॉर्म स्वरूपाने देण्याचा असावा लागतो का? का इतरही प्रकार चालतात?

ऋषी

ओरॅकल ऍप्लिकेशन डोक्यावरुन चाललंय !!! :(
पण लिहित राहा, आमचा विचार नका करु !!!
बाकी फोटो मस्त चिटकवतो हं !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर