ओरॅकल ऍप्लिकेशन (भाग २: मॉड्युल्स आणि विदा संरक्षण)

भाग-१ मध्ये आपण पाहिलेले ठळक मुद्दे:

  • मोठ्या उद्योगांमध्ये अनेक विभाग असतात. प्रत्येक विभागाचा हिशोब/जमाखर्च वगैरे सांभाळायला त्यांचे स्वतःचे सॉफ्टवेअर्स असत. परंतु यात दोन विभागांचा एकमेकांशी संवाद तर नसेच शिवाय एकमेकांकडील आवश्यक विदा उपलब्ध नसल्याने जास्त वेळ जात असे.
  • ई.आर्.पी प्रणाली हा एकच मोठ्ठा सॉफ्टवेअर नसून अनेक छोट्या सॉफ्टवेअरने बनलेली, "समान विदा" वापरणारी प्रणाली आहे.
  • ई.आर्.पी प्रणाली ही विविध व्यावसायिक गरजा / प्रोसेसेस यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना ऑटोमेट करून अनेक प्रकारचे फायदे उपलब्ध करून देते.

आता पुढे........
___________________________________________________________________________

गेल्या वेळी पाहिल्याप्रमाणे मोठ्या कंपन्यांच्या सोप्या व्यवस्थापनासाठी ओरॅकलसारख्या कंपनीने "ओरॅकल ऍप्लिकेशन" नावाची महाप्रचंड प्रणाली अस्तित्वात आणली. आधी म्हटल्याप्रमाणे हा एक सॉफ्टवेअर नाही किंवा कुणा एकाच तंत्रज्ञानावर आधारीत नाही. दररोजच्या व्यावसायिक क्रिया (बिझनेस प्रोसेसेस) ऑटोमेट करण्यासाठी नानाविध तंत्र, रचना वगैरेंनी बनलेली ही प्रणाली आहे. तांत्रिक दृष्ट्या पाहिलं तर या प्रणालीला कोणतेही तंत्रज्ञान वर्ज्य नाही. ओरॅकल फॉर्म्स-रिपोर्टस, ओरॅकल वर्कफ्लोज, ओ.ए.फ्रेमवर्क अश्या स्वतःच्या (होमग्रोन) प्रणाल्या असोत वा जावा-जे.एस्.पी असो वा एच्.टी.एम एल्., एक्स्.एम्.एल्. असो, ओरॅकल ऍप्समधे या (व यासारख्या अनेक) प्रणाल्या - भाषा -तंत्रे सढळहस्ते वापरण्यात आली आहेत. परंतु यातील काही तांत्रिक प्रणाल्यांवर (फॉर्म्स् , रिपोर्टस, वर्कफ्लो इ.) भागांवर मी पुढील भागांत प्रकाश टाकणार आहे. या भागात ओरॅकल ऍप्सची मॉड्युल्स आणि विदा संरक्षण प्रणाली बद्दल पाहु.

ओरॅकल ऍप्लिकेशन हे विविध "मॉड्युल्स" ने बनलेले आहे. संपूर्ण व्यावसायिक प्रक्रिया विविध तर्कशुद्ध विभागात विभागता येतात. आपण ओरॅप्स मधील असे विभाग आणि त्याखाली येणारी मॉड्युल्स पुढील आकृतीमध्ये पाहू

oraaps_2_1

आता वर दाखवल्याप्रमाणे इतक्या सगळ्या विभागांसाठी, त्यातील मॉड्युल्ससाठी एकच समान विदागार आहे. त्यामुळे विविध विभागांना एकमेकांना जोडणे अत्यंत सुकर होते. पूर्वी जे विभाग एकमेकांपासून संपर्करहित होते, त्यांना विविध प्रकारची माहिती उपलब्ध होणे सोपे जाऊ लागले. पण यामुळे एक वेगळा प्रश्न समोर आला तो म्हणजे विदा संरक्षणाचा. असा बराचसा विदा जो एखाद्या विभागाला गरजेचा नाही तो ही उपलब्ध होऊ लागलाच पण त्याशिवाय असा विदा जो काही ठराविक व्यक्ती सोडल्यास इतरांसाठी गोपनीय राहणे आवश्यक आहे तोही मिळण्याची भीती होती. उदा. जर प्रत्येक नोकरदाराला एकमेकांचे पगार समजले तर एकूणच होणार्‍या परिणामांचा विचार करा :).

यासाठी विविध पातळ्यांवर, विविध पद्धतीने विदा संरक्षण सांभाळले जाते जसे:
- युजर पातळी (वापरायचे नाव आणि परवलीचा शब्द)
- विदागार पातळी
- विविध मान्यता
- नेटवर्क पातळी
- ऑपरेटिंग युनिट पातळी
- मॉड्युल्स

यासाठी ओरॅप्स मध्ये काही विशेष सुविधा आहेतच पण विदागारातही विदयाचे विविध गट बनवले गेले (स्कीमा). 'ऍप्स' नावाच्या महा गटात सगळा विदा असेल परंतु वेगवेगळ्या विभागांना 'ऍप्स'चा विदा उपलब्ध न होता केवळ त्यांच्या गटाचा विदा उपलब्ध होईल याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी गटांना त्या त्या भागाच्या वापराच्या विविध 'मान्यता' (ग्रॅन्ट्स) देण्यात आल्या. पुढील आकृती हे स्कीमा आणि ग्रॅन्ट्स स्ट्रक्चर (गट आणि मान्यता संरचना) स्पष्ट करेलच

oraaps_2_2

परंतु ही झाली विदागारात घेतलेली काळजी. परंतू कोण त्या व्यक्तीला कोणत्या मॉड्युलचा ऍक्सेस द्यायचा वगैरे गोष्टी ओरॅकल ऍप्लिकेशनमध्ये ठरतात. त्यासाठी "युजरनेम" बरोबर एक "रिस्पॉन्सिबिलिटी" जोडली जाते व ती रिस्पॉन्सिबिलिटी एका विशिष्ट गटाला. म्हणजे ज्या युजरला ज्या रिस्पॉन्सिबिलिटीला ऍक्सेस असेल केवळ तितकाच विदा त्याला उपलब्ध होईल. मग एखाद्याला केवळ विदा "पाहण्यापुरता" ऍक्सेस द्यायचा की तो त्यात काही बदलही करू शकतो हे देखील रिस्पॉसिबिलीटीच ठरवते.

आपण एक उदाहरण घेऊ. समजा तुम्ही एका व्यवसायाच्या पेएबल्स डिपार्टमेंटमधे काम करताय. आता तुम्ही जर तेथील कारकून असाल तर तुमचे काम असेल, आलेल्या बिलां(इन्वॉइसेस) प्रणालीत नोंद करणे, व ती बिलं कोणत्या वस्तु/सर्विस साठी आहेत त्याची नोंद ठेवणे (पी.ओ. मॅचिंग), आणि पुढे ठरल्या दिवशी त्याचं पेमेंट करणे. यासाठी तुम्हाला इन्वॉइस "एंट्री"ची, तसेच इन्वॉइसमध्ये बदल करण्याची मान्यता असणे गरजेचे आहे. तसेच ती बिलं कोणत्या पर्चेस ऑर्डरकरिता आहेत हे पाहण्यासाठी "पर्चेस ऑर्डर" पाहण्यापुरती उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी तुमच्या युजरनेमला "इन्वॉइस एंट्री" व "पीओ इन्क्वायरी" या रिस्पॉन्सिबिलिटिज देता येतील. तुमच्या मॅनेजरला यापेक्षा विस्ट्रुत ऍक्सेस देता येईल तर इतर खात्यातील लोकांना तुमच्या घडामोडींचा "बघण्यापुरता" ऍक्सेस देता येणं शक्य आहे.

खरंतर ह्या विदा संरक्षणाबद्दल फार खोलात शिरावंसं वाटतंय परंतु विस्तारभयापेक्षा केवळ तोंडओळख असलेल्या लेखात प्रत्येक विषयाच्या गाभ्यात शिरणं अप्रस्तुत वाटतं. तेव्हा तूर्तास इथेच थांबतो. पुढील भागात ओरॅप्सची तांत्रिक संरचना पाहू

(क्रमशः)

Comments

चांगला लेख

समजा माझ्या व्यवसायात आधीपासून वरीलपैकी एखादे मॉड्यूल दुसर्‍या एका प्रणालीवर बनवलेले आहे आणि आता ओरॅप्सचे इम्प्लिमेंटेशन (अंमलात आणायचे आहे, कार्यान्वित करायचे) करायचे आहे. तर ओरॅप्स दोन वेगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये इंटरफेसिंग (जोडणी) कसे करते याबाबत काही सांगता येईल का?

विविध जबाबदार्‍यांच्या बाबत आणखी एक उदाहरण पटतं का बघ -

समजा तुम्ही आणि तुमचा चमू (संघ) एखादा माल विकणारे विक्रेते आहात. तो माल दुकानदारांना विकताना तुम्ही त्यांना कोणत्या सवलती दिल्यात, किती कमिशन मिळवलेत, त्या दुकानदारांशी केलेले इमेलिंग याची माहिती तुमच्या चमूतील इतरांना करून देणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे या चमूतील लोकांना एकमेकांची माहिती पाहण्याची सुविधा दिलेली नसते परंतु म्यानेजरला त्याच्या हाताखालील लोकांचा व्यवसाय पाहण्याची सुविधा असते. तो त्याच्या हाताखालील सर्वांनी दिलेल्या सवलती, मिळवलेली कमिशन्स पाहू शकतो परंतु त्यालाही चमूने दुकानदारांशी केलेले इमेलींग पाहण्याची परवानगी असेलच असे नाही. तसेच तो द्सर्‍या मॅनेजरच्या चमूचा विदाही पाहू शकत नाही. परंतु डायरेक्टरच्या पातळीवरील एखादा मनुष्य त्याच्या हाताखालील सर्व म्यानेजर्सचा आणि त्यांच्या चमूचा विदा बघू शकतो. परंतु हे सर्व बॉसेस तो विदा हवा तसा बदलू शकतील असे नाही, ती जबाबदारी त्यांना दिली जाईलच असे नाही. कदाचित सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर हे काम करू शकेल.

अरेरे! मराठीचे बारा वाजले. :-(

असो, लेख चांगला झाला आहे. चित्रेही सुरेखच. पुढील भागासाठी उत्सुक

धन्यवाद!

....कदाचित सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर हे काम करू शकेल.

आपण दिलेले उदाहरण अगदी चपखल आहे. याशिवाय वरील प्रकारच्या गरजांसाठी साधारणतः ओरॅकल प्रोजेक्ट्स अकाऊंटिंग (पी.ए.) हे मोड्युल इंप्लिमेंट केले जाते. ज्यामुळे प्रोजेस्ट लेव्हल वरही विदासंरक्षण करता येते.

समजा माझ्या व्यवसायात आधीपासून वरीलपैकी एखादे मॉड्यूल दुसर्‍या एका प्रणालीवर बनवलेले आहे आणि आता ओरॅप्सचे इम्प्लिमेंटेशन (अंमलात आणायचे आहे, कार्यान्वित करायचे) करायचे आहे. तर ओरॅप्स दोन वेगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये इंटरफेसिंग (जोडणी) कसे करते याबाबत काही सांगता येईल का?

साधारणतः या अश्या प्रकारच्या परिस्थितींपैकी ज्या अत्यंत कॉमन आहे अश्या गोष्टींसाठी ओरॅकलने स्टँडर्ड इंटरफेस (तयार जोडणी) उपलब्ध करून दिलेली आहे. उदा. बिलिंग, इनव्हॉईसिंग, पी.ओ. इ. साठीही तयार इंटरफेसेस आहेत. तुम्ही जी सिस्टीम वापरता त्यातील विदा ओरॅकलने सांगितलेल्या टेबलमधे ठराविक कॉलम्समधे टाकायचा आणि हा इंटरफेस चालवायचा. सगळा विदा ओरॅकलमधे स्थानांतरीत होतो.
याशिवाय, ओरॅकल काहि बाहेरील कॉमन सिस्टीमशी संवाद साधु शकणारे इंटरफेसही बनवतो. जसे, अमेरिकेत आय. आर्. एस्. ला (रिवेन्यु सर्विसेस) कंपन्यांना १०९९ विदा पाठवावा लागतो. तो सरकारी सिस्टीमशी संवाद साधु शकेल अश्या प्रकारच्या इंटरफेस ओरॅकलने तयार दिलेला आहे.

....परंतु हे सर्व बॉसेस तो विदा हवा तसा बदलू शकतील असे नाही, ती जबाबदारी त्यांना दिली जाईलच असे नाही...

मी लेख लिहिताना रिसपॉन्सिबिलिटीसाठी जबाबदारी वापरावा का नाहि या संभ्रमात होतो. कारण "ओरॅकल रिस्पॉन्सिबिलिटीज" केवळ 'जबाबदारी'पेक्षा व्यापक अर्थाने वापरल्या जातात. पण तुमचे हे वाक्य वाचून जबाबदारी वापरला असता तरी बिघडले नसते असे वाटून गेले

प्रतिसादाबद्द्ल आभार

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

विदा

विदा संरक्षणाबद्दल खोलात गेलात चालेल.
कारण याची माहिती जितकी असेल तितकी चांगलीच आहे.

आपला
गुंडोपंत

एक्स आय

उत्तम लेख, अजून यायला हवे.
यातला इतर सिस्टीम्स शी आपल्या सिस्टीमची जोडणी करता येणे हा फार महत्वाचा भाग आहे. इतके दिवस या सिस्टीम्स ना एक मेकांशी बोलते करता येणे हा अतिशय किचकट आणि त्रासदायक भाग होता.
हा अतिशय गुंतागुंतीचा भाग सॅप ने तरी एक्श्चेंज इन्फ्रास्ट्रक्चर - एक्स आय नावाचे एक मोड्युल आणून सांधला आहे.
विदा वाहून नेण्यासाठी यात एक्स एम एल (XML) चा वापर होतो.
(एक्स एम एल XML शिकायचे असेल तर ते सोपे आहे आणि ते चक्क हिंदी भाषेत वेबवर शिकायला मिळू शकते. www.w3schools.org येथे शोधा!)

ओरॅकल मधे यासाठी काय वापरात आहे?

-निनाद

एक्स्.एम्.एल्. च

ओरॅकल मधे यासाठी काय वापरात आहे?

ओरॅकलमधेही एक्स्.एम्.एल्.वर आधारीत प्रणालीच आहे.
काही ठिकाणी मात्र ओरॅकलने ऑप्शन्स दिले आहेत. जसे विक्रेत्यांची प्रणाली वापरण्याकरता एक्स्.एम्.एल्. वर आधारीत आय सप्लायरही वापरता येते. अथवा काहि मोठे विक्रेते सरळ आपली सिस्टीम "ओरॅकल सप्लायर नेटवर्क" द्वारे वापरू शकतात
परंतु बहुतांश वेळी एक्स्.एम्.एल्. वापरले आहे.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

वेब सर्व्हिसेस्

एक्स् एम् एल् तंत्रावर आधारित वेब सर्व्हिसेस् वाटे व्यवस्थांचे एकमेकांना जोडणे हा (system integration using Web Services) हा एक लोकप्रिय पर्याय आहे. वेब सर्व्हिसेस् मुळे हे इंटिग्रेशन् बॅच मोड आणि फाईल्-लोड च्या कचाट्यात न अडकता , "तत्काल" (रियल टाईम)करता येणे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ , ओरॅप्स च्या विश्वात , पर्चेस् सिस्टम्स् आणि फायनानशिअल्स् यांना वेब सर्व्हिसेस् वाटे जोडले असता , पर्चेस् रिक्वेस्ट् आणि पर्चेस् ऑर्डर या दोन प्रकारच्या कागदपत्रांमधे रियल टाईम दुवा साधणे शक्य होते.

हा सुद्धा मस्त

हा लेख सुद्धा मस्त झाला आहे. विषयाचा आवाका खुपच मोठा आहे. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत आहे.

+१

हा लेख सुद्धा मस्त झाला आहे. विषयाचा आवाका खुपच मोठा आहे. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत आहे.

मी पण!

बाकी "एओएल् विदा" हे चुकून मी अलविदा असे वाचले आणि क्षणभर बुचकळ्यात पडलो! ;)

छान

दोन्ही भाग आवडले. चित्रे आणि सोप्या भाषेत दिलेल्या माहितीमुळे समजायलाही अजिबात अवघड नाहीत. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

+१

लोकमित्रसाठी उत्तम लेख.

विदा

विदा चा अर्थ कोणी सागेल काय?

डेटा किंवा डाटा

हा शब्द नवीनच तयार झालेला आहे. उपक्रम आणि त्यावरचे "नेहमीचे यशस्वी" सदस्य ज्या ज्या स्थळांवर जमतात, त्या ठिकाणी हा शब्द रुळलेला आहे. तो सोपा आणि उपयोगी असल्यामुळे कदाचित काही वर्षांनी तो शब्दकोशातही जाईल. छापील वर्तमानपत्राचे वार्ताहार जोवर तो स्वीकारणार नाहीत, तोवर तो "छोट्या कंपूचा खास शब्द" (कल्ट जार्गन) बनून राहील.

मला हा "विदा" शब्द सुटसुटीत आणि उपयोगी वाटत असल्यामुळे, (आणि मी या छोट्या कंपूत असल्यामुळे,) हा शब्द मी सर्रास वापरतो.

सहज् आठवलं आहे,

म्हणून विचारतो.
(जुना धागा जिवंत करायची माफी मागून)
ओरॅकल् अजूनी जिवंत आहे का हो? म्हणजे डीबेस/फॉक्सबेस/व्हिज्युअल् फॉक्स् इ.. सारखा?

विदा = विषेश दाखला. डेटा ला प्रतिशब्द होऊ शकतो अन नाही पण.

जिवंत आहे

अर्थाच ओरॅकल जिवंत आहे. नुसते जिवंत नाही तर माझ्यासारख्या हजारो (लाख-दोन लाखही कदाचित) मंडळींचे पोट भरतो आहे ;)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

अगदी अगदी!

ओरॅकल जिवंत आहे. नुसते जिवंत नाही तर माझ्यासारख्या हजारो (लाख-दोन लाखही कदाचित) मंडळींचे पोट भरतो आहे ;)

हो ना! ;-)

 
^ वर