ओरॅकल ऍप्लिकेशन (भाग १: ई.आर्.पी. म्हणजे काय रे भाऊ!?)

तुम्ही ई.आर्.पी. हे नाव/संज्ञा ऐकली आहे का? कदाचित हे नाव ऐकलं नसेल तरी जर तुम्ही आर्थिक क्षेत्रात काम करत असाल अथवा उत्पादनक्षेत्रात काम करत असाल खरंतर कोणत्याही मोठ्या (श्रीमंत / पसार्‍याने मोठ्या) संस्थेत काम करत असाल तर आज ना उद्या एखाद्या ई.आर्.पी. शी तुमचा संबंध नक्कीच येणार आहे. किंबहुना जाणते अजाणतेपणी तुम्ही एखादी ई.आर्.पी. प्रणाली वापरतही असाल. आता ते कसं, हे पाहण्यासाठी आपण ई.आर्.पी. म्हणजे काय ते पाहू.

आपण एक उदाहरण घेऊ. तुम्ही एक दुकान चालवत आहात. आता तुमची साधारण क्रिया अशी आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या घाऊक विक्रेत्याकडून माल घेता. व तो कोठारात साठवून ठेवता. कोठारातील काही माल तुम्ही दुकानात मांडता. तुमच्याकडे दररोज गिर्‍हाईक येते आणि गरजेनुसार हवी ती वस्तू विकत घेते. तुम्ही ती वस्तू विकत घेतलेली किंमत + साठवणुकीचा खर्च यापेक्षा जास्त किमतीला विकता व नफा मिळवता. पुढील चित्र ही क्रीया अधिक स्पष्ट करेल

simple_business

आता पर्यंत ठीक होतं. तुम्ही हा सारा हिशोब स्वतः सांभाळू शकत होतात. काळाची पावलं मात्र तुम्हाला स्वस्थ थोडेच बसू देतात? स्पर्धेमुळे तुम्हाला व्यवसाय वाढवणं अपरिहार्य आहे. कामाचा वाढता व्याप सांभाळण्यासाठी तुम्ही अनेक पगारदार नोकर ठेवता (आतापर्यंत ठोक रोजगारी नोकर होते समजा). शिवाय वाढलेल्या व्यापामुळे तुम्हाला काही शाखा उघडाव्या लागतात. शिवाय, फोन वरून मागणी नोंदवणं, घरपोच सेवा आदी सुविधा तुम्ही सुरू करता.

complex_business

आता विचार करा जेव्हा तुमच्याकडे एक दुकान, काही ठोक रोजगारी नोकर आणि ठराविक घाऊक विक्रेते आणि गिर्‍हाईकं होती तेव्हा हा व्याप तुम्ही एखादी "चोपडी" सांभाळून करत असाल पण आता मात्र हा पसारा सांभाळण्यासाठी तुम्हाला आणखी नोकरदार ठेवणं आवश्यक आहे.

अश्या वेळी उत्तम व्यवस्थापनासाठी आपल्या उद्योगाचे तुम्हाला काही तर्कशुद्ध विभाग पाडायला लागतील. जसे, घाऊक विक्रेत्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून स्वस्तात स्वस्त माल मिळवणारा व विकत घेणारा खरेदी विभाग किंवा आपल्या घाऊक व्यापार्‍यांची बिले चुकवणारा देय विभाग किंवा गिर्‍हाईकांची मागणी नोंदवणारा विक्री विभाग किंवा त्यांच्याकडून पैसे घेणारा विभाग इत्यादी. आता याशिवाय असे अनेक विभाग असणं ही गरज असेल. असे विभाग आले म्हणजे ते सांभाळायला प्रचंड मनुष्यबळ लागणार. (आणि ते गोळा करायला एक वेगळा विभाग तर लागेलच). त्यातही जर हे काम वैयक्तिकरीत्या कागदोपत्री नोंदी करत केले तर पुढील धोके/समस्या संभवतात :

  • काम पूर्ण होण्यास खूप अधिक वेळ लागेल
  • मानवी चुका होण्यास पुरेपूर वाव असेल
  • दोन विभागांमध्ये जर समन्वय नसेल तर व्यवसायाला प्रचंड नुकसान होऊ शकते
  • धन-ऋण यांचा नेमका हिशोब लागेलच असे नाही
  • पुढील वर्षाचे अंदाजपत्रक काढणे हे महाकिचकट काम होईल

परंतु जर तुम्हाला कोणी सांगितलं की आमच्याकडे एकच अशी प्रणाली आहे जी तुमच्या प्रत्येक विभागात चालणारे कामाला स्वयंचलित बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल तर! होय अशी "एकच" प्रणाली जी काळ, काम, वेग आदींबरोबरच छोट्यातल्या छोट्या व्यवहाराची नोंद ठेवेल आणि तुमचे आर्थिक धोरण निश्चित करेल. सुरवातीला अशक्य वाटणार्‍या अशी प्रणाली हळूहळू अवतरायला लागली. ई.आर्.पी. ! Enterprise Resource Planning. ई.आर्.पी. म्हणजे काही स्वतंत्र सॉफ्टवेअर नव्हे, तर ई.आर्.पी. म्हणजे अनेक प्रकारची तंत्रे, सॉफ्टवेअर्स, आज्ञावल्या इत्यादी घटकांनी एकत्रितरीत्या बनवलेली समान विदा वापरणारी प्रणाली होय.

ई.आर्.पी. बनवायच्या आधी वर उल्लेखलेली कामे करायला वेगवेगळी सॉफ्टवेअर्स बाजारात होती. परंतु सगळ्या सॉफ्टवेअरला एकमेकांमध्ये गुंफून एका छताखाली आणून ई.आर्.पी.ने माहिती तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडवली. याआधी खरेदी विभागाचा आपला विदा आणि आपला सॉफ्टवेअर तसेच विक्री विभागाचा, कोठाराचा, मनुष्यबळ विभागाचा अश्या प्रत्येक विभागाचा आपापला विदा आणि आपापला सॉफ्टवेअर असे. त्यामुळे दोन विभागांमध्ये समन्वय राखणे अतिशय जिकिरीचे होत असे.
एक इ.आर्.पी पूर्व काळातील उदाहरण बघूया. समजा एका गिर्‍हाईकाला एक वस्तू हवी आहे जी त्याला दुकानातील शेल्फवर मिळत नाही म्हणून तो विक्री काउंटरवर चौकशी करतो. विक्री काउंटरवरील संगणकात केवळ वस्तू आणि त्यांचे भाव आहेत त्यामुळे तो कोठारात फोन लावतो. कोठारवाला आपल्या सिस्टिममध्ये बघून सांगतो की माल कालच तीन शाखांमध्ये पाठवला आहे. परंतु तो पोचला की नाही हे तो माल स्विकारणार्‍या विभागात विचारा कारण त्याची नोंद माझ्यापाशी नाही. तोपर्यंत गिर्‍हाईकाला कोणीतरी सांगतं की ती वस्तू दुसर्‍या एका शाखेत उपलब्ध आहे परंतू तिथे या शाखेत असणारी सूट नाही. आता याची खात्री करायला काउंटरवाल्याला अजून किती फोन करावे लागतील कोण जाणे.

परंतु हाच नजारा ई.आर्.पी. उत्तर काळात वेगळा असेल. एकतर वस्तू उपलब्ध नाही असे होणं कठीण होईल कारण १० वस्तूंपैकी दिवसात साधारण १ वस्तू विकली जाते व कोठारातून दुकानात वस्तू आणण्यात २ दिवस जातात असा विदा उपलब्ध असेल त्यानुसार (समजा) ६वी वस्तू विकली गेल्या गेल्या कोठाराला प्रणाली सूचीत करेल व साधारणतः१०वी वस्तू विकली गेल्याच्या आत माल पोचला असेल. तरी जर अनियमित विक्रीमुळे माल संपलाच तरी त्याची इतर शाखांतील उपलब्धता, त्यांचा इतर शाखांतील भाव वगैरे गोषी प्रत्येक विभागाला माहीत असू शकतात.

erp_overview

या लेखात दिलेले दुकान हे तर एक केवळ उदाहरण आहे. आर्थिक, वस्तुंशी निगडत, उत्पादनक्षेत्रात किंवा इतर कोणत्याही विस्तारीत क्षेत्रात ई.आर्.पी. ही मोठ्या मोठ्या संस्थांची आता गरज बनत चालली आहे. त्यामुळे या ई.आर्.पी. बनवणार्‍या कंपन्या अनेक आहेत (खरंतर होत्या) जसे बान, जे.डी.एडवर्डस्, पीपलसॉफ्ट, सॅप आणि ओरॅकल ऍप्लिकेशन!

पुढील भागात यातील ओरॅकल ऍप्लिकेशन काम कसे करते ते पाहू.

(क्रमशः)

टिप:
- हा लेख (चित्रांसकट) लोकमित्र मंडळ जसाच्या तसा एकवेळच्या छपाईसाठी वापरू शकते.
- या लेखासाठी कोणतेही पुस्तक अथवा संकेतस्थळ संदर्भ म्हणून वापरलेले नाहि. त्यामुळे चुका आढळल्यास त्वरीत निदर्शनास आणून द्याव्यात.

Comments

सुंदर चित्रे

भाग १ सुरवात - सोपी भाषा व चित्रांमुळे अजुनच छान झाली आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

चांगला लेख

सोप्या शब्दांत समजावलेला सुरेख आणि सुलभ लेख. उत्कृष्ट चित्रे. वाचताना मजा आली. इ. आर. पीचा गाभा जो विविध व्यावसायिक गरजांसाठी एकत्रित माहिती साठा याबद्दलही पुढील भागात थोडा प्रकाश टाकावा. तसेच व्यावसायिक गरजा आणि आउट-ऑफ-द बॉक्स फंक्शनॅलिटी यांच्या समन्वयाबद्दलही लिहिता येईल.


अवांतरः लेख ओघवता आणि प्रभावी आहे परंतु दुकांनातील शेल्फसाठी दुकानांतील फळी किंवा फडताळ आणि काऊंटरसाठी गल्ला असे प्रचलीत शब्द वापरता आले असते आणि आज्ञावलीसारख्या शब्दासाठी प्रोग्रॅमिंग असा सर्वसामान्य शब्द वापरता आला असता. तंत्रे, सॉफ्टवेअर्स,आज्ञावली जरा खटकले. वैयक्तिक मताबद्दल राग नसावा.

सुरेख लेख

आणि चित्रेही सुरेख.

ई.आर.पी.

शरद
छान.अशीच माहिती देत रहा.
समित्पाणी

छान उपक्रम

ई आर पी बद्दलची माहिती इतक्या सरल भाषेत, कुणालाही समजेल असे उदाहरण वापरून (किराणा) आणि सचित्र देण्याचा उपक्रम आवडला.

पुलेशु

वा!

चटकन् समजेल अशा भाषेत लिहिलय.
उदाहरणही उत्तम.
एकुणातच लेख आवडला.
पुलेशु.

पुढील भागांची वाट पाहणारे
जन सामान्यांचे मन

फारच छान!

ऋषिकेश, इआरपी ची ओळख अतिशय चांगली करून दिली आहेस! उदाहरणही इतके चपखल आहे की अगदी सहज संकल्पना ध्यानात येते. या सुंदर लेखाबद्दल धन्यवाद, अभिनंदन आणि कौतुक :) पुढील भागांची वाट पाहात आहे.

असेच

ऋषिकेश, इआरपी ची ओळख अतिशय चांगली करून दिली आहेस! उदाहरणही इतके चपखल आहे की अगदी सहज संकल्पना ध्यानात येते. या सुंदर लेखाबद्दल धन्यवाद, अभिनंदन आणि कौतुक :) पुढील भागांची वाट पाहात आहे.

असेच म्हणतो. मस्त लेख! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

सुंदर

चित्रांमुळे समजणे सुलभ होते.

धन्यवाद!

सगळ्यां प्रोत्साहनकर्त्यांचे अनेक आभार!
प्रियालीताईंचे मुद्दे पटले. त्या म्हणतात त्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस जे शब्द वापरतो (मग ते मुळ इंग्रजी का असेनात) ते वापरून लेखन करण्याचा प्रयत्न करेन. :-)

बाकी लेखाचा विषय बर्‍याचपुर्वी आपले उपक्रमी निनाद यांनी सुचवला होता. त्यांचे विषेश आभार.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

काय हो साहेब

काय हो साहेब

  • केव्हढ्याला मिळते ही सिस्टीम?
  • आणि कशी बसवायची?
  • किती दिवस लागतात बसवायला?
  • आणि बसवल्या नंतर काही परत मदत लागली तर देतात का?
  • या सगळ्यात भारतातून नक्की काय काय घडते?
  • या सगळ्यात भारतातून असणार्‍या लोकांचा सहभाग काय आहे?
  • तशीच असणारी भारतीय सिस्टीम कोणती?
  • देशी/विदेशी सिस्टीमचे तोटे/फायदे काय आहेत?

आपला
गुंडोपंत प्रश्नांकित

:)

:)अहो प्रश्नांकित गुंडोपंत ;),
तुम्ही एकदम कळीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले आहेत. पुढील येणार्‍या भागांत याची उत्तरे येतीलच. काहि प्रश्न सुचले नव्हते त्याची उत्तरेही जमतील त्या लेखात समाविष्ट करेनच!

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

वाट पाहतो!

आशा आहे भारतीय लोकांनीही आपली मोहोर उमटवली असेल.
आपल्या नावाचा ठसा एक खास भारतीय ऍप्लिकेशन बनवून आणि ते जगभर खपवून उमटवले असेल.

मला तरी असे फक्त घैसासांचे आयफ्लेक्स माहिती आहे. (मराठी माणूस!)
ते पण आता तुमच्याच कंपनीने घेतले आहे.
(असे माझ्या भाच्याच्या, मित्राच्या, काकांच्या, साडूच्या, मुलीची मैत्रीण म्हणत होती...)

आपला
गुंडोपंत

उत्तम लेख

या प्रणाली वरील संगणक कोणत्या मार्गाने जोङले जातात? (म्हणजे व्हीपीएन वगैरे)
'कंटेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर्स' ईआरपीचे छोटे प्रतिरूप आहे का?
मी आयटी क्षेत्रात जरी नसलो तरी नवीन तंत्रज्ञानाबद्दल वाचायला व जमल्यास प्रयोग करायला आवडते. नेहमी प्रमाणे सोप्या भाषेत लिहले आहेस.

जयेश

+१

लेख आवडला. आकृत्या तर मस्तच आहेत!

मी आयटी क्षेत्रात जरी नसलो तरी नवीन तंत्रज्ञानाबद्दल वाचायला व जमल्यास प्रयोग करायला आवडते. नेहमी प्रमाणे सोप्या भाषेत लिहले आहेस.

हेच म्हणतो.

असेच म्हणतो !!!

ऋषी, लेख आवडला. आकृत्या तर मस्तच आहेत!

आमची ई आर पी

या वरुन एक अनुभव
एक बिनतारी संच (Wireless Set) दुरुस्त करायचा होता. त्यातील बी सी १४८ हा ट्रान्जिस्टर ( किंमत एक् ते दोन रुपये ) निकामी झाला होता. नियमानुसार त्याची कार्यालयाच्या भांडारात मागणीपत्र सादर केले. भांडार पालाने नोंदवहीत पाहिले. शिल्लक नाही. मग मुख्यालयाला(HQ) ३ कि.मी. अंतरावर मागणी सादर केली. ही मागणी जाताना "थ्रु प्रॉपर चॅनेल " म्हणजे शासकीय परिभाषेत 'योग्य मार्फतीने सविनय सादर' पद्धतीने प्रथम कोल्हापुर परिक्षेत्र ( kolhapur Range ) या वरिष्ठ कार्यालया कडे गेली. तेथुन ती परत आमच्या जवळ असलेल्या त्यापेक्षा वरिष्ठ कार्यालय म्हणजे पश्चिम परिमंडल(West Zone) येथे मुख्यालयाच्या आवारातच गेली. नंतर तेथेच संचालक कार्यालय म्हणजे मुख्यालयात गेली . नंतर त्यावर 'प्रथम कोल्हापुर परिक्षेत्रात कुणाकडे असल्यास पहावे ' असे परिमंडळाला सांगण्यात आले. नंतर तशा आशयाचा बिनतारी संदेश सर्वांना पाठवला गेला. नंतर सांगली ने बिनतारी संदेश पाठवुन सांगितले कि आमच्या कडे सदर पाच नग असुन त्यातील दोन आम्ही पुणे शहर यांना देउ शकतो. पुणे शहर यांनी ते घेउन जाण्याची व्यवस्था करावी. त्यानंतर आमचा मुरुडकर नावाचा कॉन्स्टेबल एस टी वॉरंट घेउन कोल्हापुरला गेला. देवदर्शन करुन दोन दिवसांनी परत आला. येताना खिशात दोन ट्रान्जिस्टर घेउन आला. या सर्व प्रकारात ४ महिने गेले.
हे सर्व मला अगोदरच माहित होते. म्हणुन मी तो फक्त हा सेट फक्त कागदावरच नादुरुस्त ठेवला होता. हे दोन रुपये खर्च करण्याचे अधिकार मला वा आमच्या कार्यालयाला नव्हते. मी खिशातले पैसे टाकुन तो प्रत्यक्ष दुरुस्त केला होता. या दोन रुपया साठी शासनाचे किती पैस खर्च झाले. एखाद्या वस्तुची किंमत बाजारात दहा रुपये असेल तर कोटेशन १०० / ११० / ११५ रु असे मिळाल्यास कमीत कमी असलेले १०० रुपयाचे कोटेशन मंजुर होते. ही तिन्ही कोटेशन एकच दुकानदार वेगवेगळ्या लेटर हेडवर देत असतो.
Every thing is cheaper at the cost of law & order.

प्रकाश घाटपांडे

वा!

हा हा हा झकास किस्सा आहे हा!
आवडला.
तुम्ही इतके दिवस कसे त्या सिस्टिम मधे काढलेत !

या लोकांनाही इ आर पी सारख्या गोष्टी नकोच असणार. कारण त्यामुळे काम करावे लागेल. शिवाय कोण काय काम करणार तेही निटच स्प्ष्ट होणार.
किती काम कुणी केले आणि कुणामूळे काय अडले आहे हे पण कळणारच.
शिवाय सगळेच ऑन लाईन झाले तर पैसे कुठे खाणार हा मोठाच प्रश्न?
कोण कशाला वापरतो या सिस्टीम्स मग?

म्हणून तर मुंबई महापलिकेतल्या लोकांना सॅप नको आहे असे मागे म टा ला वाचले होते.
अर्थात इ आर पी हेच सगळ्याल उत्तर नाही याची मला कल्पना आहेच!

शिवाय सॅप सारखी पैशाला हावरट कंपनी एकदा आत घुसायला मिळाल्यावर, आपल्या महापलिकांना किती लुटेल हे ही सांगता यायचे नाही!

आपला
गुंडोपंत

कर्मचार्‍यांचाही विरोध

या लोकांनाही इ आर पी सारख्या गोष्टी नकोच असणार

अहो सरकारीच कशाला मोठ्यामोठ्या स्वायत्त कंपन्यांच्या कर्मचार्‍यांचाही त्याला विरोध असतो. कारण शेवटी एक इ.आर्.पी. अनेक जणांच्या पोटावर पाय आणते (आणि आय टी तील अनेकांचे पोट भरते :) )
एक किस्सा आठवला, जो आमच्या कंपनीच्या गिर्‍हाईक कंपनीकडे घडला होता (नाव देत नाही). तिथे एक स्त्री कॅश रिसिविंग विभागात गेले २४ वर्षे काम करत होती. तिचे काम काय तर आरामात ऑफीसला यायचं आणि दोन आदल्यादिवशीचे रिपोर्ट घेऊन वैयक्तीकरित्या ते टॅली करायचे आणि मान्यता (अप्रुवल) द्यायचं. यासंपूर्ण कामाचं ऑटॉमेशन म्हणजे तिच्यां नोकरीवर गदा हे निश्चित होतं. हे तिलाही माहित होतं त्यामुळे ती काय करते (या पेक्षा कसं करते) हे तिने कोणालाही सांगितलं नव्हतं. शेवती संस्थेने 'वरून' दबाव आणला व शेवटी तिचे काम ऑटोमेट केलं. दुसर्‍या दिवशी पिंक स्लीप हजर होती. बिचारी खूप रडली.. पण काय करणार असे बिना नोटीसची पिंक स्लिप आमेरीकाच देऊ जाणे..
त्या दिवशी सगळेच खूप अस्वस्थ होते हे वेगळे सांगणे नलगे

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

सरंबळकर

प्रकाश घाटपांडे यांचा अनुभव वाचला, राहावले नाही. म्हणुन हा प्रपंच ! माझा अनुभव फारसा वेगळा नाही आमच्या विभागात सन एप्रिल १९९५ साली संगणक आले. (४८६ संगणक) संगणकाचे बेसिक हे ज्या कंपनीचे संगणक घेतले त्या कंपनीच्य़ा इंजीनिअर मार्फत शिकविण्यात आले. तेव्हा पासुन आजपावेतो आमचे संगणकीकरण सुरु आहे. हेतु इ.आर.पी. प्रमाणेच सर्व कार्यालये संगणकाने जोडुन कामकाज करणे हा होता त्यासाठी दुरध्वनी कनेक्शन घेण्यात आली परंतु आजपावेतो आमचे संगणकीकरण पुर्ण झालेले नाही. नवीन संगणक आला का तो चढया भावाने खरेदी केला जातो. परंतु संगणकीकरण कशाला म्हणतात हे कोणालाही समजलेले नाही (की समजुन घ्यायचे नाही) त्यासाठी लाखो रुपये खर्च करुन संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली (unix) आज जुलै २००८ संगणकीकरण चालु आहे. पाहुया केव्हा होतेय.
कारण या कार्यालयात काम करणा-या लोकांनाही इ आर पी सारख्या गोष्टी नकोच आहे. कारण त्यामुळे काम करावे लागेल. शिवाय कोणामुळे काम अडकले कोणी (पैसे न मिळाल्यामुळे) बिले तयार केली नाही तेही स्पष्ट होणार. किती काम कुणी केले आणि कुणामूळे काय अडले आहे हे कळणार. शिवाय सगळेच ऑन लाईन झाले तर पैसे कसे खाणार हा मोठाच यक्ष प्रश्न ? कोण कशाला वापरणार ही सिस्टीम्स ?

"थ्रु प्रॉपर चॅनेल " म्हणजे शासकीय परिभाषेत 'योग्य मार्फतीने सविनय सादर" प्रकार फार भयानक आहे भले भले थकले बुवा !

मस्त

मस्त आणि उपयुक्त लेख.
माझ्यावतीने काही मदत करता आली तर नक्की करेन. ई. आर. पी. सुद्धा एखाद्या मोठ्या उद्योग समुहाला १००% उपयोगी नाही.
ही लेखमाला फारच माहितीपुर्ण असेल याची खात्री आहे. :)





 
^ वर