समर्थ रामदास

रामनवमी इ.स. १६०८ साली रामदासांचा जन्म झाला होता. थोडक्यात आज त्यांची ४०० वी जयंती आहे. वयाच्या बाराव्या वर्षी नारायण ठोसर नामक मुलगा स्वतःच्या लग्नातून पळून गेला आणि १२ वर्षे देश पालथा घालून त्याचा कालांतराने "रामदास", पुढे "समर्थ रामदास" झाला.

"दिसामाजी काहीतरी ते लिहावे.." ह्या स्व-उक्तीप्रमाणे रामदासांनी ग्रंथसंपदा निर्माण केली. दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके, इत्यादी ग्रंथसंपदा पाहील्यास समजते की त्यात शिष्ठाचार, वर्तन, मानसीक संतुलन ठेवणे इत्यादी गोष्टींमधे पण अनेक उपयुक्त सल्ले आहेत. अर्थात हे सर्व करत असताना ते रामाच्या/देवाच्या नावाने करण्यात आले आहे, हे वेगळे सांगायला नको. त्या व्यतिरीक्त जे कोणी गौरी-गणपतीत, नवरात्रात इतर धार्मिक प्रसंगी आरत्या म्हणत असतील त्यांना गणपतीची, शंकराची, नवरात्राची वगैरे आरत्या माहीत असतीलच. संभाजीला लिहीलेले पत्र तर प्रसिद्धच आहे आणि मंगेशकर बंधु-भगिनींमुळे ते अजून प्रसिद्ध झाले.

"भज गोविन्दम्", म्हणणारे शंकराचार्य, "एकतत्व नाम दृढ धरी मना हरीसी करूणा येईल तुझी", म्हणणारे ज्ञानेश्वर, यांच्याच आणि अशाच मधल्य काळातील अनेक संतांच्या भक्तीसंप्रदायातील "नाम महात्म्य" रामदासांनी धुडकारून आपलेच वेगळे सांगायचा प्रयत्न केला नाही. पण व्यवहारज्ञान हे त्यांनी भक्तिशी जोडले. भावणारे काही व्यावहारीक श्लोक येथे देतो:

मनाचे श्लोकः (स्वतःच्या मनाला आळवणारे श्लोक हा कदाचीत एकमेवाद्वितिय प्रकार असावा)
मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडू नको हो। मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्य संकल्प जीवी धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरू दंभ भारू॥ ६ ॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।मना बोलणे नीच सोशीत जावे ॥स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥ ३६ ॥

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी। मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥ चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥ ५४ ॥

दासबोधः (अनेक मार्मिक गोष्टी वाचायला मिळतात!)

कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं । केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ॥ ३ ॥
आळसें काम नसतें । हें तों प्रत्ययास येतें । कष्टाकडे चुकावितें । हीन जन ॥ ४ ॥
आधीं कष्टाचें दुःख सोसिति । ते पुढें सुखाचें फळ भोगिती । आधीं आळसें सुखावती । त्यासी पुढें दुःख ॥ ५ ॥
येहलोक अथवा परलोक । दोहिंकडे सारिखाच विवेक । दीर्घ सूचनेचें कौतुक । कळलें पाहिजे ॥ ६ ॥
मेळविती तितुकें भक्षिती । ते कठीण काळीं मरोन जाती । दीर्घ सूचनेनें वर्तती । तेचि भले ॥ ७ ॥ (दशक १८, समास ७)

बुद्धी दे रघुनायका: (रामाला बुद्धी मागत असताना अप्रत्यक्षपणे आपल्यात काय हवे आहे ते सांगितले आहे)

युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥ नेणता भक्त मी तुझा। बुद्धी दे रघुनायका॥१॥
मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा। बुद्धी दे रघुनायका॥२॥
बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी। बुद्धी दे रघुनायका॥३॥
...
नेटके लिहीता येना। वाचिता चुकतो सदा॥ अर्थ तो सांगता येना। बुद्धी दे रघुनायका॥५॥
प्रसंग वेळ तर्केना। सुचेना दीर्घ सूचना॥ मैत्रिकी राखता येना। बुद्धी दे रघुनायका॥६॥
संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥ वीसरु पडतो पोटी। बुद्धी दे रघुनायका॥७॥
चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी। बुद्धी दे रघुनायका॥८॥
...

Comments

माहिती

समर्थ रामदासांच्या चरित्रविषयी अजून माहिती वाचायला आवडेल.
बाकी
मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडू नको हो। मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्य संकल्प जीवी धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरू दंभ भारू॥ ६ ॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।मना बोलणे नीच सोशीत जावे ॥स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥

हे कळते पण वळायचे काय हो?

आपला
गुंडोपंत

योग्य संदर्भ

संत वाड्मय, तत्वज्ञान वगैरे योग्य संदर्भात घेता आले नाही तर घेऊ नये पण चुकीचे नक्कीच घेऊ नये!

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।मना बोलणे नीच सोशीत जावे ॥स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥

असे ज्या रामदासांनी म्हणले आहे त्यांनीच दासबोधात राजकारणनिरूपण करताना खालील ओळी लिहील्या आहेत:
(अर्थात खालील ओळी बाकीचे न वाचता वाचल्या तर "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" ठरू शकते!)

कांटीनें कांटी झाडावी । झाडावी परी ते कळों नेदावी । कळकटेपणाची पदवी । असों द्यावी ॥ १२ ॥
हुंब्यासीं हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा । लौंदास पुढें उभा करावा । दुसरा लौंद ॥ २९ ॥
धटासी आणावा धट । उत्धटासी पाहिजे उत्धट । खटनटासी खटनट । अगत्य करी ॥ ३० ॥
जैशास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां मज्यालसी थाटे । इतुकें होतें परी धनी कोठें । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥

रामदासांचे चरित्र

>>समर्थ रामदासांच्या चरित्राविषयी अजून माहिती वाचायला आवडेल.<<
रामदासांच्या दुर्मीळ चरित्रग्रंथाच्या, तीन खंड आणि सात कांडे असलेल्या, अनंतदास रामदासी यांनी लिहिलेल्या व पंथाचा ज्ञानकोशच अशा "श्री दासायन" ची पुनर्मुद्रित आवृत्ती, मोरया प्रकाशनने डोंबिवलीत १४ एप्रिलला २००८ रोजी प्रकाशित केली आहे. मूळ किंमत ३०० सवलतीत २०० रुपये. --वाचक्‍नवी

प्रचंड.

रामदास स्वामी म्हणजे प्रचंड असेच म्हणायला हवे. ग्रंथसंपदा, मार्गदर्शन, राजकिय परिस्थितीची जाणीव, धर्म जागृती , अखंड भ्रमण इत्यादी इत्यादी.

रामदास स्वामींचा आणि माझा पहिला परिचय तो नाथमाधवांच्या कथानकातून झाला. अनेक गोसावी, सन्यासी आणि मावळे यांच्या एकोप्यातून स्वराज्याचा श्री गणेशा इत्यादी वाचायला मला आजही आवडेल. ३० वर्षापूर्वी या कादंबर्‍या वाचताना मन किती भारावुन जात असेल याची आजही आठवण येते.

सज्जन गडाची भेट हा माझ्या मनातील दुसरा अमुल्य ठेवा आहे.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ :)

जगी सर्व सूखी कोण आहे ! विचार मना तूंचि शोधून पाहे !!
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें ! तयासारिखें भोगणे प्राप्त झाले !!
फुकाचे मुखी बोलतां काय वेंचे ! दिसंसीस अभ्यंतरी गर्व साचे !!
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ! विचारे तुझा तूंचि शोधून पाहे !!

असे म्हणणारे संत रामदासांची ''मना सज्जना भक्तीपंथाचे जावे'' इथून ओळख झाली.
ती आता संत साहित्याचे निमित्ताने पुन्हा पुन्हा होत असते. शिवकालीन विषयाची निगडीत कवी म्हटले की समर्थ रामदासांची हटकून आठवण होते. त्या विषयीची चर्चा कधीच न संपणारी आहे. तत्कालीन राजकीय परिस्थितीविषयी इतर संताच्या तुलनेत रामदास अधिक जागृक होते. हे मत कोणासही अमान्य होणारे नाही. इतकेच नव्हे तर भागवत धर्माला तेव्हाच्या परिस्थितीनुरुप महाराष्ट्रधर्माचे वळण लावले. 'तुकारामांचे कार्य जिथे संपते तिथून रामदासाचे कार्य सुरु होते' हे ल. रा. पांगारकरांचे मत सर्वज्ञात आहेच.

समर्थ रामदास परंपरावादी होते, एकाच वर्गाचे पुरस्कर्ते होते इत्यादी इत्यादी आक्षेप सोडून द्या. त्यांच्या लेखनाचा व्याप दांडगा आहे, ' मायब्रम्हलक्षण' या सारख्या तात्त्विक विषयापासून ते ' बाग कशी करावी, इमारत कशी बांधावी' असे अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत असे म्हणतात.

मात्र दासबोध, मनोबोधातील त्यांच्या काही ओव्यांना सुभाषिताचा अर्थ प्राप्त झाला आहे.

'आधी प्रपंच करावा नेटका ! मग घ्यावे परमार्थ विवेका'

'वेष धरावा बावळा ! अंतरी असाव्या नाना कळा '

'दुसर्‍यावरी विसंबला ! त्याचा कार्यभाग नासला'

'जे जे काही आपणाशी ठावे ! ते ते इतरांशी शिकवावे !
शहाणे करुन सोडावे ! सकळ जन !!'

'यत्न तो देव जाणावा'

विवेक आणि प्रयत्न यावर विश्वास ठेवणारा संत म्हणजे समर्थ रामदास. त्यांच्या लेखनाबाबत संत अभ्यासक म्हणतात की त्यांच्या करारी स्वभावामुळे त्यांचे लेखन कोमल वगैरे झाले नाही,नसावे. त्याच बरोबर त्यांना लेखनाच्या शुद्धतेकडे लक्ष देण्याची त्यांना गरज वाटली नसावी, म्हणुनच त्यांच्या लेखनात नवनवीन शब्द दिसून येतात. र्‍हस्व-दीर्घाची ओढातान, व्याकरण-छंद यांची पायमल्ली हा दोष तर त्यांच्या ओवीओवीत सापडेल असे संतसाहित्याच्या अभ्यासकाचे मत आहे, त्यांच्या या गुणामुळे तर ते आम्हाला अधिक जवळचे वाटतात. :)

निष्क्रिय उदासिनतवर प्रयत्न वादाची शिकवण दासबोध,मनोबोध यातून समर्थ रामदासांनी दिली आहे, आणि समाजविकासाठी या पेक्षा अधिक योगदान कोणते असावे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर