दादा कोंडके पुण्यतिथी

दादांची आज दहावी पुण्यतिथी.

सकाळमध्ये काही लेख आले आहेत ते या ठिकाणी वाचता येतील.

मराठी चित्रपटात मैलाचा दगड ठरलेल्या दादांना मानाचा मुजरा. आजही पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात दादांचे सिनेमे लागतात आणि हाऊसफुल चालतात.

मराठी चित्रपटांचा चाहता अभिजित

Comments

कालोचित.

आज आपण जी आठवण करुन दिली त्याबद्दल आपण अभिनंदनास पात्र आहात.

दादा म्हणजे एक अचाट असे व्यक्तिमत्व होते. शुन्यापासुन सृष्टी निर्माण करणार्‍या असंख्य महाराष्ट्रीयन लोकामध्ये दादाचे नाव अग्रभागी राहील.

वर्तमानपत्रातील लेख ही दादांना श्रद्धांजली असु शकत नाही, दादांचा चित्रपट महोत्सव हीच खरी श्रद्धांजली असावी.

लहानपणी ( ७२/७३ मध्ये) दादांचे चित्रपट शहराच्या ठिकाणी लागत आणि आसपासच्या खेडेगावातुन बैलगाड्यातुन लोकं चित्रपट पाहण्यासाठी येत असत असे मला आजही आठवते.

दादांच्या चित्रपटाची यादी दिली तर बरे होईल.

हाऊसफुल्ल हा शब्द मराठीत तुडुंब किंवा प्रचंड गर्दी किंवा खचाखच गर्दी असा वापरायला हवा. आजच लोकसत्तेमध्ये परिक्षेमुळे मुलांच्या अभ्यासिका हाउसफुल्ल असा शब्द आणि या लेखात तोच शब्द वाचल्यामुळे अशी सूचना.

सहमत

आहे. लेख कालोचित आहे. निखळ विनोद म्हणजे काय याचा प्रत्यय दादांच्या सुरुवातीच्या चित्रपटातून येतो. आणि हल्लीच्या तथाकथित विनोदी मालिका बघितल्यावर हे जास्त जाणवते.
एका चित्रपटातील थोडा चावट विनोद आठवला. मुले पळवणार्‍यांना उद्देशून दादा म्हणतात, "मुलं पळवायला लाज नाही वाटत? स्वतः कष्ट करायला नकोत.."
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

असेच म्हणतो

लेख कालोचित आहे. निखळ विनोद म्हणजे काय याचा प्रत्यय दादांच्या सुरुवातीच्या चित्रपटातून येतो.
दादाचे पीच्चर लै आवडायचे आम्हाला. :)

माझे शब्द हे मराठी संकेतस्थळ बंद होत आहे, याचे प्रा.डॉ.दिलीप बिरुटेंना वाईट वाटत आहे.

दादांचे चित्रपट यादी

दादांचे मराठी चित्रपट
यातले बहुतेक सगळेच्या सगळे हिट!!!

१. सोंगाड्या १९७१ हा पहिला चित्रपट. कृष्णधवल स्वरूपात. सुवर्णमोहोत्सवी (दादा चाळीशी पार करून गेले होते या वेळी)
२. एकटा जीव सदाशीव १९७२ कृष्णधवल
३. आंधळा मारतो डोळा १९७३ कृष्णधवल
४. पांडू हवालदार १९७५ कृष्णधवल
५. तुमचं आमचं जमलं १९७६ रंगीत
६. राम राम गंगाराम १९७७
७. बोट लावीन तिथं गुदगुल्या १९७८
८. ह्योच नवरा पाहिजे १९८०
९.आली अंगावर १९८२
१०. मुका घ्या मुका १९८६
११. मला घेऊन चला १९८९
१२. पळवा पळवी १९९०
१३. येऊ का घरात? १९९२
१४. सासरचं धोतर १९९४
१५. वाजवू का? १९९६

हिंदी
१६. तेरे मेरे बिच मे १९८४
१७. अंधेरी रात मे दिया तेरे हाथ में १९८६
१८. आगेकी सोच १९८८ (शक्ती कपूर सोबत)
१९. खोल दे मेरी जुबान १९८९ (मेहेमूद सोबत)

गुजराथी
२०.नंदु जमादार १९७७
२१.राम राम आमथाराम १९७९

दादांसारख्या व्यक्तीवर लिहायला खूप काही आहे पण वेळे अभावी इतकेच देतो.
महाराष्ट्राला प्रणयात बिंधास्त करून सोडणार्‍या दादांना माझाही प्रणाम!

-------------------------
संदर्भ
अनिता पाध्ये, २००४, एकटा जीव, अनुबंध प्रकाशन, पुणे.

आपला
गुंडोपंत

दादा

दादांचे एक वाक्य' "
माझ्या दृष्टीने लोकांना रडवणे हे पाप आहे. प्रेक्षक त्यांच्या वैक्तीक जीवनात कुठल्या ना कुठल्या कारणाने त्रासलेले असतातच. अशा परिस्थीतीत माझ्या चित्रपटाद्वारे अडीच तास तरी त्यांना त्यांच्या विवंचना विसरता यायला हव्यात असे मला वाटतं. त्यांना हसवण्याचा प्रयत्न मी केला आहे. थिएटर मध्ये माझे वित्रपट बघतांना प्रेक्षकांना मनमुराद हसतांना बघितलं की मला जो आनंद होतो, त्यचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही. 'विच्छा' पासून मी प्रेक्षकांना हसवायचा वसा उचलला आहे आणि मरेपर्यंत मला तो चालवायला हवा, तरच माझं जीवन सफल झालं असं मी मानेन" (पान.४०१:२००४)

अर्थातच दादांचं जीवन त्यांच्या या उद्दीष्टावर १००% सफल होतं यात कुणालाच शंका नाही.

संदर्भ
अनिता पाध्ये, २००४, एकटा जीव, अनुबंध प्रकाशन, पुणे.

आपला
गुंडोपंत

बरोबर आहे..

अशा परिस्थीतीत माझ्या चित्रपटाद्वारे अडीच तास तरी त्यांना त्यांच्या विवंचना विसरता यायला हव्यात असे मला वाटतं.

केवळ हेच उद्दीष्ट ठेवून त्यांनी चित्रपट काढले. त्यातले मराठी (केवळ द्व्यर्थीच नाही ) कळून मनमुराद हसायला आले की समजते की आपल्याला मराठी त डॉक्टरेट करायची गरज नाही. वास्तवीक दादांच्या चित्रपटावर कोणितरी (चांगल्या अर्थी) डॉक्टरेट केली पाहीजे !

एक आठवणारा किस्सा (खरा केलेला पीजे): दादांना मुंबईच्या महाविद्यालयात मराठी वाड्मय मंडळाच्या कार्यक्रमात बोलावले होते. प्रश्नोत्तराचा दिलखुलास कार्यक्रम चालू होता. एका विद्यार्थ्याने समिक्षक असल्याच्या थाटात कुतुहलाने प्रश्न विचारला की तुमच्या प्रत्येक चित्रपटात तुमची आई रत्नमालाच का असतात. दादांनी त्याला त्यांच्या ठेवणीतल्या "टोन" मधे विचारले, "तू तुझी आई बदलशील का?" तो बिचारा म्हणाला , "नाही", मग दादा परत म्हणाले की, "मग मी का माझी बदलू?"

दादा

१. सोंगाड्या १९७१ हा पहिला चित्रपट. कृष्णधवल स्वरूपात. सुवर्णमोहोत्सवी (दादा चाळीशी पार करून गेले होते या वेळी)
२. एकटा जीव सदाशीव १९७२ कृष्णधवल
३. आंधळा मारतो डोळा १९७३ कृष्णधवल
४. पांडू हवालदार १९७५ कृष्णधवल
५. तुमचं आमचं जमलं १९७६ रंगीत
६. राम राम गंगाराम १९७७
७. बोट लावीन तिथं गुदगुल्या १९७८

दादा कोंडक्यांचे हे चित्रपट मला विशेष आवडतात. नंतरचे जरा वाहवत गेल्यासारखे वाटतात. (ही माझी व्यक्तीगत आवड) पण त्यांचे चित्रपट भन्नाट असत आणि त्यातील गाणीही, द्व्यर्थी असली तरी सुरेख असत.

गाणी

दादांच्या चित्रपटांची गाणी अतिशय छान असत. हिल पोरी हिला गाणे अतिशय आवडते.

दादांचे सगळेच चित्रपट प्रभात मध्ये पाहिले आहेत. प्रत्येक चित्रपट हाऊसफुल होता. ही गोष्ट इ.स. २००१-२००२ ची. :)

काही चित्रपटांच्या प्रिंटा मात्र खराब झाल्या असाव्यात. दादांचे तोंड हलताना दिसे मात्र संवाद फारच अस्पष्ट ऐकू येत त्यामुळे अनेक विनोदांचा आनंद लुटता आला नाही.

-- आजानुकर्ण

लबाड लांडगं

  1. लबाड लांडगं ढ्वांग करतय
  2. काय गं सखू
  3. ढगाला लागली कळ
  4. माळयाच्या मळ्यामंदी कोन गं उभी?

ही गाणी विशेष आवडतात.

लबाड लांडगं तर फारच!

चल रं शिरपा!

बहुतेकांच्या विस्मरणात गेलेलं

"चल रं शिरपा देवाचे किरपा
झालीया औंदा छान रं छानं
गाऊ मोटंवरचं गानं."

हे माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे. यातलं शेत, पीक, मोट हे सगळं अगदी जवळचं वाटतं.
दादांनी प्रत्येकाच्या मनात असलेला गाव चित्रपटात सादर केला आणि अर्थात तो आवडलाच.

आपला
गुंडोपंत

आठवायचा प्रयत्न

मिसळपाव वरील "ढगाला लागली कळ" या चर्चेनंतर 'आंधळा मारतो डोळा' मधलं हे गाणं आठवायचा प्रयत्न करत होतो. शेवटी उपक्रमावरच शब्द मिळाले.

धन्यवाद गुंडोपंत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आठवायचा प्रयत्न

मिसळपाव वरील "ढगाला लागली कळ" या चर्चेनंतर 'आंधळा मारतो डोळा' मधलं हे गाणं आठवायचा प्रयत्न करत होतो. शेवटी उपक्रमावरच शब्द मिळाले.

धन्यवाद गुंडोपंत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दादा आणि आम्ही

दादांबद्दल इतर कोट्यावधी लोकांप्रमाणे प्रेम केले ही गोष्ट खरीच , पण या प्रेमाची जातकुळी थोडी गुंतागुंतीची बनत गेली हेदेखील खरे. इतका मोठा, गुणी, आणि लोकप्रिय कलावंत. पण द्वयर्थी संवाद, गाणी (आणि चित्रपटांची शीर्षके सुद्धा !) यांच्या आहारी जायला लागला. कथा आणि संवादांमधला ठस्सका आणि विनोद यांची जागा द्वयर्थी पाचकळ विनोदानी घेतली. संगीताची बाजू लंगडी पडत गेली. (उषा मंगेषकरानी शेवटची काही वर्षे अश्लीलतेच्या कारणावरून गाणी गायला नकार दिला.) कौटुंबिक करमणूकीची जागा केवळ प्रौढ पुरुषांसाठीची आचकटविचकट करमणूक या प्रकाराने घेतली. दादा कोंडके लौकिकार्थाने पुष्कळ नंतर गेले असतील, पण त्यांच्यातल्या कलावंताला त्याआधी अनेक वर्षांपूर्वी मूठमाती मिळाली होती. शेवटीशेवटी त्यानी केला त्याला (वाईट अर्थाने) धंदा म्हणता येईल.

त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध व्हायच्या आत त्यांचे आकस्मिक निधन झाले. पण हे पुस्तक मनोरंजक, माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे अगदी आरपार खुल्ले दर्शन घडविणारे आहे. दादांच्या रोखठोक स्वभावाचे आणि त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचे कसलाही आडपडदा न ठेवता दर्शन यातून घडते. वग आणि लोकनाट्यापासून चित्रपटांपर्यंत केलेला प्रवास , सत्तर आणि ऐंशीच्या काळातील असंख्य किस्से-कहाण्या , चित्रपटांच्या जन्मकथा , शांतारामबापूंसारख्यांशी केलेले दोन हात .... माणूस प्रचंड होता !

काही काही व्यक्तिगत उल्लेख स्फोटक म्हणावेत असे आहेत. (उदा. आशा भोसले यांच्या संदर्भातील.) पण त्याचा शेवट करुण आहे. दोन दे-दोन घे असे रफटफ जगणारा हा प्रचंड लोकप्रिय असा माणूस फार फार एकाकी होता. नातेसंबधांच्या बाबतीत दुर्दैवी ठरला. वर्षानुवर्षाच्या सहकार्‍यानी, प्रेमपात्रानी विश्वासघात केल्याने, साथ सोडल्याने शेवटच्या दिवसांमधे कुणीही जवळ नसलेला..

+१

दादा कोंडके लौकिकार्थाने पुष्कळ नंतर गेले असतील, पण त्यांच्यातल्या कलावंताला त्याआधी अनेक वर्षांपूर्वी मूठमाती मिळाली होती.

पटले! वरचे उद्गार विशेषकरून आणि बाकी सर्व प्रतिसादपण

बाकी त्यांच्या आत्मचरीत्राबाबत ऐकल्याप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या मरणानंतर ते प्रकाशित करण्यात आले. (तो योगायोग नव्हता)

भालजी

भालजी पेंढारकरांनी त्यांना
आशा भोसले पासून वाचवलं असं म्हणायला हरकत नाही. भालजीच त्यांचे गुरू.

(पुर्वी मी आशाचा मोठा फॅन होतो. अगदी सगळी गाणी, फोटो वगैरे असलेली माझी वही होती.
पण नंतर नंतर मला एकुणच मंगेशकर घराण्याचा भामटेपणा, भंपकपणा, पैशाचा लोभ, प्रसिद्धी लोलूपता वगैरे दिसून आलं.
मग अगदी जीव वगैरे ओवाळून टाकावासा वाटेनासा झाला.
र्‍हुदयनाथाला एका कार्यक्रमात तर आमच्या रविवार कारंज्यावर लोकांनीच असं झापलं होतं की बास रे बास! परत कधी तरी तो किस्सा..)

आपला
गुंडोपंत

+१

आत्मचरित्र वाचलेच पाहिजे.

गंगाराम वीसकलमे

आणीबाणीच्या काळात "गंगाराम वीसकलमे" हे या चित्रपटाचे पुर्वनियोजित नाव बदलून 'रामराम गंगाराम' केले. अगदी प्रारभिक जाहिरातीत आगामी म्हणून गंगाराम वीसकलमे असा उल्लेख होता.
आपल्याला दादा कोंडके लई आवडायचा.आजुबाजुच जगण त्याच्या पिच्चर मदी प्रतिबिंबित होत असे. पन शहरातली मान्स आपल्याला गावठी म्हनतील या भयापोटी मी ती आवड पुर्वी व्यक्त करीत नसे.
प्रकाश घाटपांडे

दुतोंडीपणा

हा लेख वर आलाच आहे तर त्यानिमित्ताने एक मुद्दा आठवला. दादांचे चित्रपट कुठलीही वाहिनी कधीही दाखवीत नाही. कारण : अहो त्यात कमरेखालचे विनोद असतात ना! आता हे कारण जर आखातातील एखाद्या देशाने दिले असते तर मान्य केले असते. पण ज्या देशात प्राईम टाईमला विल अँड ग्रेसचे विनोद चालू शकतात त्यांनी दादांचे विनोद कमरेखालचे* म्हणणे हा दुतोंडीपणा आहे. की विल अँड ग्रेस पाश्चात्य म्हणून ते वेगळे?

*वैयक्तिक पातळीवर मला कुठलाही विनोद कमरेच्या वरचा किंवा खालचा आहे यावरून त्याचा दर्जा ठरवणे पटत नाही. विनोद चांगला असतो किंवा नसतो. त्याचा विषय कदाचित काहींना मान्य करायला अवघड जात असेल. याखेरीज असे विनोद कुठे सांगावेत आणि कुठे नाही याचे ही काही संकेत असतात, ते ही मान्य. पण एखादा विनोद केवळ कमरेखालचा म्हणून निकृष्ट हे पटत नाही.
----
"This is Linus Torvalds. I announce Linux."

खरेय

अहो, इकडे बैलदेखील गूळ देतो. मी बघतो ना रोज. ;)

बाकी दुतोंडीपणाशी सहमत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दादांचे चित्रपट कुठलीही वाहिनी कधीही दाखवीत नाही

मला वाटते याचे कारण विनोदापेक्षा चित्रपटांच्या हक्कांसंदर्भात आहे. दादांच्या चित्रपटांचे हक्क नसल्याने कदाचित हे चित्रपट वाहिन्या दाखवित नसतील.

कारण

असे असल्यास त्याचे कारण काय असावे? दादांची कंपनी हक्क देण्यास का तयार नसावी?

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

पैसा

ईट्स ऑब्व्हीयस!
जर दादांचे चित्रपट अजूनही चित्रपटगृहात गर्दीत खेचत असतील, तर उपग्रह हक्कांसाठी ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कोण मारील?

 
^ वर