पुरोगामी जमातवाद

ही प्रतिक्रिया मिळून सार्‍या जणी मासिकात २००१ म्ध्ये आलेल्या सुजाता देशमुख यांच्या पुरोगामी जमातवाद या लेखावर प्रतिक्रिया म्हणुन दिली होती. त्याच वेळी ९/११ झाल्याने त्याची आठवण आली म्हणुन खाली ती देत आहे. मूळ लेखा मुळे सुजाता देशमुख "मिळून सार्‍या जणी" च्या संपादक मंडळातुन बाहेर पडाव लागलं. महाराष्ट्र फाउंडेशन चे सुनिल देशमुख या अमेरिका स्थित असलेल्या पुरोगामी आधारस्तंभाची नाराजी ओढवली होती.
---------------------------

जमातवाद

पुरोगामी म्हटल्यावर सर्वसाधारणपणे 'डाव्या` असा शिक्का लोकांनी मारलेल्या सामाजिक, राजकीय, संघटना तसेच 'आम्ही डावं उजवं मानीत नाही. जात, धर्म पंथ वंश मानीत नाही. अशा विचारांचे लोक` असं चित्र डोळयासमोर येईल.
तुमचा कुत्रा कुठल्या जातीचा आहे असा प्रश्न विचारल्यावर पामेरियन, अल्सेशियन असं काही उत्तर मिळाल्यावर त्याची अंगकाठी, रंगरूप बांधा वगैरे गोष्टी डोळयासमोर येतात. तसं माणूस कुठल्या जातीचा आहे असं विचारल्यावर तो हलकट, काळा, गोरा, उंच, विद्वान असं अभिप्रेत नसंत. त्याची जन्मानुसार असलेली मराठा, महार, मांग, चांभार, ब्राम्हण वगैरे अभिप्रेत असतं. निसर्गात अभिप्रेत असलेली जात ही गुणधर्मानुसार असते. एकटया गुलाबाच्या सुद्धा भरपूर जाती आहेत. सरकारी नोकरीत बायोडाटा देताना मला जात विचारली तर 'मी मनुष्य जातीचा प्राणी आहे' व 'मानवता हा माझा धर्म' असे सांगितल्यावर सगळे हॅ हॅ करुन हसले. तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते मी सांगणार नाही असे म्हटल्यावर त्याने नाही सांगितले तरी आम्हाला कळतं असे म्हणून स्वत:च तो कॉलम भरुन टाकला.
एखादा वाद आला म्हणजे मध्यवर्ती मुद्दा आला तसं पुरोगामी जमातवादाला सुद्धा मध्यवर्ती केंद्रबिंदू असतो. तो म्हणजे जन्माधिष्ठित नसलेले पुरोगामित्व. हे पुरोगामित्व सुद्धा कुठल्यातरी बिंदूमुळेच मिळालेली एका रेषेवरील दिशा आहे. त्याच अनुषंगाने प्रतिगामित्व ठरते. या बिंदूच्या सापेक्षते मुळेच पुरोगामित्वाचे शिक्के बसत असतात. त्या मुळे पुरोगामी कुणाला म्हणायचं या प्रश्नात प्रसंगी कुत्सितता वाटली तरी सापेक्षता पण आहे. लेखात नमूद केलेला पुरोगामी जमातवाद हा धर्म निरपेक्षतेशी निगडीत आहे. या धर्म निरपेक्षतेची सापेक्षता ही जन्माधिष्ठित असलेल्या धर्माशी सापेक्ष आहे. पुरोगामित्वाचं सोवळं हे लोकांनीच नेसवलेलं आहे. त्याला मी धर्मविरहित आहे असे सांगण्याची सोय नाही. त्याने स्वत:ला काहीही म्हणवले तरी जन्माधिष्ठित धर्म हा त्याला चिकटला जाणारच. सर्वधर्मसमभाव हे तर रिंगमास्टर एकमेकाचे हाडवैर असणारं प्राणी जस एका रिंगणात 'प्रेमानं` बसवितो तसा बसवलेला भाव आहे. हिंदुत्ववाद हा तरी कुठे एक आहे? त्यातही अनेक छटा आहेत. विविध जाती- जमातींची उतरंड असलेला हा समाज एक असणं हे मानण सुद्धा त्या रिंगमास्टरची कमाल आहे. धर्मनिरपेक्षतेची चिकित्सा करताना कुठलाही धार्मिक मूलतत्ववाद आणि धर्मांधता वगळता येत नाही. धर्मांधता आणि धार्मिक मूलतत्ववाद याचे मूल्यमापन करताना धर्मचिकित्सा ही अपरिहार्य बनते कारण धर्म तत्वांची त्याला जोड असते. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला एक प्रश्न नेहमी विचारला जातो काहो तुम्ही फक्त हिंदूच्याच अंधश्रद्धांवर झोड उठवता पण मुस्लिमांच्या अंधश्रद्धांविषयी फारसे बोलत नाही? हा पळपुटेपणा नाही काय? यात हिंदूंच्या अंधश्रद्धाविषयी बोलण्याचा अधिकार प्रश्नकर्त्याने मान्य केलेला आहे. किंबहुना हे काम तुम्ही चांगलच करता आहात असाही कधी कधी सूर असतो. पण तुम्ही पुरोगामी व धर्मनिरपेक्ष आहात तर मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धांविषयी पण त्याच न्यायाने बोला ना! असे आवाहन अभिप्रेत असते. याची उत्तरे ही दिली जातात ती अशी की जवळजवळ ऐशी टक्के लोक हिंदू आहेत साहजिकच बहुसंख्य कार्यकर्ते हिंदूच असणार. त्यामुळे ऐशी टक्के अंधश्रद्धा हिंदूंबाबत असणार. दुसरं उत्तर दिलं जातं आम्ही हिंदू धर्मात जन्मलो साहजिकच संस्कार हिंदू झाले असल्याने आम्ही हिंदू धर्मातील अंधश्रद्धांविषयी अधिक संवेदनाशिल असणं स्वाभाविक आहे. आपण आपलं घर साफ करायचं नाही तर शेजाऱ्याच करायचं काय? या उत्तरांमध्ये चूक नाही पण सर्वसमावेशकताही नाही. चळवळ ही प्रबोधनाशी निगडित असल्याने जवळीक हा महत्वाचा दुवा आहे. अंधश्रद्धा ही सापेक्ष आहे ही बाब जरी घटकाभर बाजूला ठेवली तरी अंधश्रद्धा ही हिंदू धर्मातील काय किंवा मुस्लिम धर्मातील काय तितकीच अंध आहे.चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा धर्मांधता व मूलतत्ववाद हा राष्ट्रहिताशी निगडीत असते त्यावेळी ही चिकित्सा सोयीनुसार करुन चालणार नाही ती कठोरपणेच झाली पाहिजे ही बाब नाकारुन चालणार नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बळी ठरलेली ९/११ ही न्यूयार्क मधील घटना ही त्याची साक्ष आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

मूळ लेख ...

मूळ लेख कृपया कात्रणरूपाने देता येईल का ? आम्हाला तुमच्या लिखाणावरची प्रतिक्रिया सुद्धा तेव्हा नीट देता येईल !

मूळ लेख ...+१

मूळ लेख कृपया कात्रणरूपाने देता येईल का ? आम्हाला तुमच्या लिखाणावरची प्रतिक्रिया सुद्धा तेव्हा नीट देता येईल !

+१

असेच म्हणतो

मूळ लेख कृपया कात्रणरूपाने देता येईल का ? आम्हाला तुमच्या लिखाणावरची प्रतिक्रिया सुद्धा तेव्हा नीट देता येईल !

असेच म्हणतो

आपला
(सहमत) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

म्हणजे यात ही सोय आधी?

पण तुम्ही पुरोगामी व धर्मनिरपेक्ष आहात तर मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धांविषयी पण त्याच न्यायाने बोला ना! असे आवाहन अभिप्रेत असते. याची उत्तरे ही दिली जातात ती अशी की जवळजवळ ऐशी टक्के लोक हिंदू आहेत साहजिकच बहुसंख्य कार्यकर्ते हिंदूच असणार. त्यामुळे ऐशी टक्के अंधश्रद्धा हिंदूंबाबत असणार. दुसरं उत्तर दिलं जातं आम्ही हिंदू धर्मात जन्मलो साहजिकच संस्कार हिंदू झाले असल्याने आम्ही हिंदू धर्मातील अंधश्रद्धांविषयी अधिक संवेदनाशिल असणं स्वाभाविक आहे. आपण आपलं घर साफ करायचं नाही तर शेजाऱ्याच करायचं काय? या उत्तरांमध्ये चूक नाही पण सर्वसमावेशकताही नाही.
आपण आपलं घर साफ करायचं नाही तर शेजाऱ्याच करायचं काय? असे कसे म्हणू शकता?
यात चूक आहेच. करायचे तर सगळीकडे काम करा नाहीतर ही एक हिंदु चळवळ आहे असे जाहिर करा.

त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे.

म्हणजे सोय पाहुन काम चालते तर... मुसलमानां विषयी ब्र काढायची हिंम्मत नसलेले दाभोलकर सोय पाहुनच काम करतात यात का ते विषेश?
समाज मऊ लागतोय म्हणून कोपराने खणायाचा व फुकट प्रसिद्धी मिळवण्याचाच प्रयत्न आहे हा अनिस म्हणजे.

मुसलमान जाऊ द्या पण किती ख्रिश्चन अंधश्रद्धांवर अनिस काम करते?
पहिली अगदी मुर्ख श्रद्धा एक 'व्हर्जीन' मेरि ला बापाशिवाय बाळ होते ही अंधश्रद्धा तर फोडायचा एक जाहिर प्रयत्न करून दाखवा. द्या ना एका तरी पाद्र्याला आव्हान. तेंव्हा कुठे जातात हे अनिसवाले भामटे दाभोलकर? आहे का हिम्मत?

उगाच काय गरीब आहेत म्हणून हिंदुंवरच पाश्चात्य विचारसरणीच्या आहारी जावून हल्ला करायचा येता जाता?

आपला
अंधश्रद्धा निर्मुलन समीतीचेच आता निर्मुलन व्हावे असे म्हणणारा
गुंडोपंत

सोय व मर्यादा

अंनिस ची ताकद तशी क्षीणच आहे. प्रबोधन ही गोष्ट कलाकलाने घ्यावी लागते. त्याची सक्ति करता येत नाही. अंनिस नवीन काहीच सांगत नाही. सर्व गोष्टी संत , समाजसुधारक यांनी अगोदरच सांगितल्या आहेत. देशासमोर अनेक गम्भीर प्रश्न असताना तुम्ही अमुक एक काम का करता? तमुक का करत नाही? अशा प्रश्नांना काय उत्तर देणार? जेवढ शक्य आहे ते तर कराव! सोयीने काम करण्यात गैर काय?
आता दाभोलकरांनी किती ही सांगितले की मी निधर्मि आहे तरी लोक त्यांना हिंदुच समजतात. त्यांच्यावर झालेले संस्कार हिंदुच आहेत. ते बदलता येतात का? दाभोलकर आपली मते कुटुंबात इतरांवर लादू शकत नाही. मग लोक असे पण म्हणतात स्वत:च्या घरच्या लोकांना बदलू शकले नाहीत तर जगाला बदलायला निघाले आहेत बघा?
इतर धर्मातिल अंधश्रद्धांना हातच घातला नाही असे मात्र नाही. ख्रिश्चनातिल् फेथ हिलींग. कर्नाटक सीमेवरील अस्लम बाबा, खेड-शिवापुर मधिल करम अलि दरवेश् . व्याघ्रमुत्र देणारा मुसा बाबा ही वानगी दाखल. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे कुणीही कराव त्यात काहीच गैर नाही. ते काही फक्त अंनिसचेच काम नव्हे .

प्रकाश घाटपांडे

मुळ लेख-आशय

मूळ लेख मी शोधत होतो. पण अनेक प्रयत्नांनी तो मिळाला नाही. पण आशय असा होता कि पुरोगामी लोकांनी आता मुस्लिम धर्मांधते मुळे होणारा दहशद वाद याविषयी पण बोलल पाहिजे. किती दिवस हिंदु धर्मातील दोषांविषयी च बोलत रहाणार? जर आपण स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत असाल तर धर्मांधता या संकल्पनेवर सर्व धर्मियांवर बोलले पाहिजे.
अवांतर- मूळ लेख सोबत देणे हे उचित होते. पण तो उपलब्ध झाला नाही. या बद्दल दिलगीर . प्रतिक्रिया संगणकात होती म्हणुन देता आली. ( म्हणजे पुन्हा सोय) मुळ लेखा शिवाय प्रतिक्रिया देणे अनेकांना योग्य वाटणार नाही याची जाणीव आहे पण सध्यातरी या मर्यादा म्हणुन मानाव्यात.
प्रकाश घाटपांडे

जमातवाद

प्रकाशराव, आपण दिलेला आशय आणि त्यासंबंधातील त्यावरील प्रतिक्रीयात्मक मूळ लेख जो आपण सुरवातीस टंकला आहे त्यावर आधारीत जे वाटले ते लिहीतो:

यात मी जरी खाली अनिसचा उल्लेख केला असला तरी तीच गोष्ट तत्सम संघटनांना लागू होउ शकेल. मला अनिस जास्त माहीत असल्याने त्यांचा उल्लेख आहे इतकेच.

अनिसच्या जे विरोधात असतात ते सरसकट त्यातील "अंधश्रद्धेच्या" बाजूचे असतात असा बर्‍याचदा गैरसमज होतो असे वाटते. त्याचे बर्‍याचदा कारण हे कुठल्या बाबतीत, काय सांगीतले जाते आणि कसे सांगीतले जाते यावर अवलंबून असते. त्यात परत श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे दोन भाग होतात. त्याच्या व्याख्या करणे म्हणजे चावून चावून चोथा झालेला विषय आहे. या प्रतिसादापुरते मी इतकेच म्हणतो की ज्या व्यक्तिगत श्रद्धेमुळे तशी ती ठेवणार्‍या व्यक्तिस आणि/किंवा इतरांना मानसीक/शारीरीक त्रास होऊ शकतो ती अंधश्रद्धा. बाकीच्या वैयक्तिक आवडी-निवडी म्हणा हवे तर! पण अशी मर्यादा बर्‍याचदा ठेवली जात नाही कारण चूक ठरवायचेच असले तर जे काही दृश्य दिसत नाही अशा प्रत्येक गोष्टीत काहीतरी चू़अ ठरवू शकतो. आपल्याला माहीत असेलच की आजपण "अमेरिका चंद्रावर जाउन आली हे थोतांड आहे," असे सप्रमाण सिद्ध करणारी संकेतस्थळे आणि संस्था अमेरिकेतच आहेत! तर देवधर्माबाबत तर ते साहजीकच शक्य आहे. पण माणसाला कुणाला त्रास न देता "एक तत्व नाम" घेत मनःशांती लाभत असेल तर कुणाचे काही बिघडू नये आणि त्यावर आणि तसे सांगाणार्‍यावर टिका करू नये असे वाटते. तो पण एका अर्थी पुरोगामी विचारांचा अतिरेक होतो.

बर "पुरोगामी" या शब्दाचा अर्थ काय असू शकतो? माझ्या मते आणि अर्थातच शब्दार्थ घेतला तर "जो विचार आपल्याला पुढे नेतो तो." पण अनिस ज्या पद्धतीने विशेष करून हिंदू-धर्मरुढींना विरोध करते त्या मुळे, "आपण पुढे जात आहोत का तसले वाद घातल्याने भुत-वर्तमानकाळाच्या भावनात्मक खेळात अडकून न पेक्षा होऊ शकणारा विकास आणि सामाजीक ऐक्य यात अडथळा निर्माण करतो," ह्याचा विचार करायला हवा.

कुठलीही पद्धत (सिस्टीम) जर बदलायची असेल तर त्या पद्धतीचा आपण भाग आहोत असे निदान त्यातील जनसामान्यांना वाटले पाहीजे तरच ते ऐकणार. या संदर्भात परत आठवतात ते रानडे, आगरकर आणि टिळक. तिघांनाही समाजसुधारणा करायच्या होत्या पण तिघांचे मार्ग भिन्न त्यामुळे त्यांचा प्रभाव वेगवेगळ्या पद्धतीने पडला. रानडे - मृदू स्वभावाचे. परीणामी त्यांनी स्वतःचा आब राखत, स्वतःची प्रतिमा तयार केली (यात मी काही त्यांना नावे ठेवत नाही आहे!) आणि तीचा वापर जितका शक्य असेल तितका समाजासाठी करायचा प्रयत्न केला. पण ते करत असताना स्वतः त्यातील कठीण गोष्टी आचरू शकले नाहीत. परीणामी त्यांच्या म्हणून मर्यादा ठरल्या. त्याबाबत त्यांचा दुसरा विवाह आणि चहा ग्रामण्य वाद वाचण्या सारखा आहे. आगरकर - म्हणाल तर स्वतःस त्याच समाजातील समजत आले. ते कधी "मी हिंदू नाही अथवा निधर्मी आहे," असे म्हणल्याचे वाचले तरी नाही . पण टोकाचे परखड. आज आपली काय अवस्था आहे आणि त्यातून पुढे जात असताना किती पुढे किती काळात जाऊ शकतो याचे गणित भावनेच्या भरात करायला शिकले नाहीत अथवा त्याकडे दुर्लक्ष केले. परीणामी जिवंतपणी त्यांच्या प्रतिमेच्या प्रेतयात्रा काढल्या गेल्या आणि प्रचंड मनस्ताप सहन करत महाराष्ट्राला खर्‍या आणि प्रामाणिक सुधरकाला लवकर गमवण्याचा तोटा सहन करावा लागला. टिळक या दोन्ही पेक्षा वेगळे होते. स्वतःला त्यांनी सनातनी वगैरे म्हणल्याचे ऐकीवात नाही पण पारंपारीक असल्याचा कायम दावा करत राहीले. पण जिथे शक्य असेल तिथे सनातन्यांना वाद आणि कृतीत नेस्तनाबूत केले. परत या संदर्भात रानड्यांप्रमाणे चहाग्रामण्य वाद वाचण्यासारखा आहे. तसेच अनेक किस्से सांगता येतील. तरी देखील त्यांच्या देखील मर्यादा पडल्याच.

पण वरील तिघांनीही बर्‍याच अर्थी प्रस्थापितांमधे राहून आपापल्यापद्धतीने त्यात बदल करायचे प्रयत्न केले. जर दाभोळकर म्हणणार असले की "मी स्वतःला हिंदू समजत नाही", तर ठिक आहे, पण मग, "आमच्या मधे कशाला येता?" असे म्हणणारे तयार होणारच. साधे माझे उदाहरण देतो. ९/११ नंतर मी एक म.टा. मधे लेख लिहीला होता. त्यात शेवटी अशा अर्थी म्हणले होते की अमेरिकेत जशी "करेक्टिव्ह ऍक्शन्स" घेण्याची पद्धत आहे ती आपल्यात आणायला हवी आहे आणि आपण जर प्रबळ नसलो तर आपल्याला मित्र मिळणार नाहीत (भारताला इतका अतिरेक्यांचा त्रास होउन जगाने दुर्लक्ष केले पण एका ९/११ चा किती प्रभाव!)". ताबडतोब दुसर्‍या दिवशी म.टा. मधे पत्र आले की,"तुम्ही उंटावरचे शहाणे म्हणून अमेरिकेत बसून आम्हाला शिकवू नका! " एका अर्थी तसे कुणाला वाटले तरी चूक नाही पण मी पण भारताबद्दल बोलण्यात चूक नव्हतो/नाही , विशेष करून जो पर्यंत विशेष करून माझा पासपोर्ट भारतीय आहे तो पर्यततर् नक्कीच.

आता राहीला प्रश्न त्यांनी (अनिस आदींनी) मुस्लीम दहशतवादाविषयी बोलले पाहीजे का तो. यावर मला वाटते की जर ते कुठल्यातरी विशेष संदर्भात अंधश्रद्धानिर्मूलन हा भाग सोडून हिंदू हिंसा किंवा अगदी दहशतवाद वगैरे बोलत नसले तर न बोलूदेत मुसलमानांविरुद्ध. पण उगाच त्यांची (दहशतवादासंदर्भात) बाजू घेऊन, "तेच तसे असे नाही, ही वृत्ती असते, ती कुठल्याही धर्मात मिळू शकते" इत्यादी म्हणू लागलात तर ते अत्यंत चूक आहे.

असो. आता जमातवाद या शब्दाबाबत. स्वतःला जर कोणी पुरोगामी समजत असेल तर त्यांनी सर्वात प्रथम मोकळे / लिबरल असायला हवे . म्हणजे अर्थातच विचारांच्या देवाणघेवाणीस तयारी हवी. शेवटी ऍक्शन काय घेयची ते ठरवण्यासाठी पण विविध विचार होणे महत्वाचे आहे नाहीतर तुम्ही काय वेगळे? पण हाच प्रकार आपण सांगीतलेल्या उदाहरणात दिसला: "..मूळ लेखा मुळे सुजाता देशमुख "मिळून सार्‍या जणी" च्या संपादक मंडळातुन बाहेर पडाव लागलं. महाराष्ट्र फाउंडेशन चे सुनिल देशमुख या अमेरिका स्थित असलेल्या पुरोगामी आधारस्तंभाची नाराजी ओढवली होती..." हे आपण म्हणता तसे आहे, तर हे कसे पुरोगामी. अगदीच कचकडयाचे आहेत असे म्हणावेसे वाटते. दुर्दैवाने असला "पुरोगामी जमातवाद" नक्कीच अस्तित्वात आहे. स्वतःला शहाणे समजणारे सेक्युलर्स हे इतरांकडे बघताना कधी धर्माचे, कधी जातीचे तर कधी भाषेचे चष्मे लावून कसे पाहतात आणि त्याचा वापर करतात हे मी ह्या "मेल्टींग पॉट" अमेरिकेत पण पाहीले आहे आणि भारतातपण - अनुभवले नसले तरी - निरीक्षलेले आहे.

तात्पर्यः अनिस संदर्भात बर्‍याचदा जो विरोध असतो तो अंधश्रद्धानिर्मूलना पेक्षा त्यांच्या पद्धतीस आणि त्यातून ते नकळत ज्याप्रकारे ते संपूर्ण समाजाला तुच्छ लेखतात, अडाणी लेखतात त्याला असतो, जरी तसे म्हणणार्‍या विरोधकांना तसे म्हणायचे सुचले नाही तरी. जर पुरोगाम्यांवर झालेली एका व्यक्तीची टिका त्यांना एका मर्यादीत खपाच्या मासीकात आली तरी त्या लेखिकेस संपादक मंडळातून बाहेर काढावेसे वाटते तर स्वतःला निधर्मी म्हणत कोट्यावधींच्या हिंदू धर्माला नावे ठेवणे यात कुठले नैतिक बळ स्वतःला आहे ह्याचे प्रामाणिक आत्मपरीक्षण असल्या पुरोगाम्यांनी केले पाहीजे असे वाटते.

वा

विवेचन आवडले.
बरेचसे पटलेही.

शेवटी आपण

तात्पर्यः अनिस संदर्भात बर्‍याचदा जो विरोध असतो तो अंधश्रद्धानिर्मूलना पेक्षा त्यांच्या पद्धतीस आणि त्यातून ते नकळत ज्याप्रकारे ते संपूर्ण समाजाला तुच्छ लेखतात, अडाणी लेखतात त्याला असतो, जरी तसे म्हणणार्‍या विरोधकांना तसे म्हणायचे सुचले नाही तरी. जर पुरोगाम्यांवर झालेली एका व्यक्तीची टिका त्यांना एका मर्यादीत खपाच्या मासीकात आली तरी त्या लेखिकेस संपादक मंडळातून बाहेर काढावेसे वाटते तर स्वतःला निधर्मी म्हणत कोट्यावधींच्या हिंदू धर्माला नावे ठेवणे यात कुठले नैतिक बळ स्वतःला आहे ह्याचे प्रामाणिक आत्मपरीक्षण असल्या पुरोगाम्यांनी केले पाहीजे असे वाटते.

देवून चांगला पायंडा पाडत अहात असे वाटते.
यामुळे लेखकाला काय म्हणायचे आहे हे परत एकदा स्प्ष्ट शब्दात सांगितले जाते.

बाकी स्वतःला निधर्मी म्हणत कोट्यावधींच्या हिंदू धर्माला नावे ठेवणे यात कुठले नैतिक बळ स्वतःला आहे ह्याचे प्रामाणिक आत्मपरीक्षण असल्या पुरोगाम्यांनी केले पाहीजे असे वाटते.

आपल्या या वाक्याशी मी पण सहमत आहे.
पण समजा अनिस ने आहे ते कामही बंद करून टाकले तर तीही आपलीच एक शोकांतीकाच ठरेल असे नाही का वाटत?

आपला
गुंडोपंत

बंद करायला कोण सांगतोय?

पण समजा अनिस ने आहे ते कामही बंद करून टाकले तर तीही आपलीच एक शोकांतीकाच ठरेल असे नाही का वाटत?

मी सुरवातीसच म्हणून म्हणले की, "अनिसच्या जे विरोधात असतात ते सरसकट त्यातील "अंधश्रद्धेच्या" बाजूचे असतात असा बर्‍याचदा गैरसमज होतो असे वाटते. त्याचे बर्‍याचदा कारण हे कुठल्या बाबतीत, काय सांगीतले जाते आणि कसे सांगीतले जाते यावर अवलंबून असते." अनिसने काम करताना ऍक्टीव्हीझम च्या जोशात विरोध करत इप्सित काम करण्याच्या ऐवजी जर लोकांमधे विश्वास निर्माण करून केले असते तर बरे झाले असते. अजूनही ते तसे करू शकतील. लोकांना समजून घेत त्यांच्या प्रत्येकच श्रद्धेस नावे न ठेवता, टिका न करता जर ज्या अंधश्रद्धा या घातक आहेत त्यांच्यावर लोकांना समजेल अशा भाषेत आणि आविर्भावात सांगीतले तर त्यांचा "ऍक्सेप्टन्स" वाढू शकेल आणि यश येईल. पण तसे वागायचे असेल तर त्यांना त्यांचा अहंभाव दूर करावा लागेल...

अंशतः सहमत


अनिसच्या जे विरोधात असतात ते सरसकट त्यातील "अंधश्रद्धेच्या" बाजूचे असतात असा बर्‍याचदा गैरसमज होतो असे वाटते.


होय असा विचार करणारे काह् लोक आहेत. पण कालांतराने त्यांची मते बदलतात असाही अनुभव आहे. अंनिसत प्रबोधन व बुवाबाजी संघर्ष असे दोन विचारप्रवाह आहेत. दोन्ही आवश्यक आहे हे दोघांनाही मान्य . प्रश्न प्राधान्यक्रमाचा. अंनिस दुभंगली ती याच मुळे. (अन्यही कारणे आहेतच) दाभोलकरांची महाराष्ट्र अंनिस व शाम मानव ची अ.भा. अंनिस. १९८९ नंतर दुफळी झाली. शाम मानव आक्रमक , भंडाफोड वादी .दाभोलकर तुलनेने मवाळ व प्रबोधनवादी. एकमेकांवर टीका न करता आपापले काम करणे अभिप्रेत. पण इगो ही प्रेरणाच असते हे वास्तव थोडेच नाकारता येते. थोडक्यात अंनिसचे जेस्वरुप मिडीयामुळे दिसते ते पुर्णत: वास्तव नाही.
दाभोलकर- लागू वादसंवाद महाराष्ट्राला परिचित आहे. लागू पुर्ण निरिश्वरवादी. दाभोलकर अज्ञेयवादी भुमिका मांडतात. त्यामुळे देव - धर्माविषयी तटस्थ. पण सर्व धर्माची धर्मचिकित्सा ही गोष्ट झाली पाहिजे हा आग्रह. दाभोलकरांच्या मते लागुंना चळवळ चालवायची नसल्याने त्यांनी घेतलेली भुमिका ही त्यांच्यापरीने योग्य आहे.

त्यात परत श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे दोन भाग होतात. त्याच्या व्याख्या करणे म्हणजे चावून चावून चोथा झालेला विषय आहे


मला विधायक श्रद्धा व विघातक श्रद्धा असे दोन भाग करावेसे वाटतात. देव या संकल्पनेच्या बाबतही असाच चोथा झाला आहे. पण तसे होणे अपरिहार्य आहे. व्याख्येत पकडणे हे कुठेतरी कचाट्यात पकडण्यासारखे असल्यामुळे संकल्पना व अन्वयार्थ असा भाग विकसित होतो. त्याविषयी http://mr.upakram.org/node/770 इथे लिहिले आहेच. 'माझी ती श्रद्धा व इतरांची ती अंधश्रद्धा' असा सुर पण काही मानसिकतेत दिसतो. 'आमचा बाबा/महाराज हा खरा इतरांचा तो भोंदु' हा भाग श्रद्धाळू लोकांत दिसतो. अंनिस वा समविचारी संघटनांनी कितीही इतरांच्या श्रद्धेचा आदर करायचा म्हणले तरी चिकित्सा करायची म्हणली कि तो आमच्या श्रद्धेवर घाला आहे असेच म्हटले जाते. मुस्लिम सत्यशोधक समाज, हमीद दलवाई यांचे कार्य हे अंनिसला पोषक असेच आहे. कडव्या धर्मांधतेला विरोध करताना त्यांना खुपच अवघड जाते. चार्वाक दर्शनाला मानाचे स्थान देणार्‍या हिंदु धर्मात अंधश्रद्धा निर्मुलन हे तुलनेने सोपे आहे.
तरी देखील त्यात काही आपल्या मताशी प्रामाणीक असलेली माणसे दुखावली जातात. तर काहींचे स्वार्थ गुंतलेले असतात ते याचे भांडवल करतात.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर