मराठि लेखिकेवरील "माया"

आत्ताच महाराष्ट्र टाईम्स मधे बातमी वाचली त्याप्रमाणे उत्तरप्रदेश मुख्यमंत्री मायावती यांनी मराठीत उत्कृष्ठ लेखन करणार्‍या लेखिकेस रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे. इतका मोठा पुरस्कार आपले महाराष्ट्र शासनपण देत नाही... (ते १० हजार रुपये देतात - उरलेले "शासन" असते). तसेच मायावतींनी हिंदी आणि पंजाबी पद्यकाव्यासाठी संत नामदेव पुरस्कार जाहीर केला आहे. हे सर्व का ते सगळ्यांनाच माहीत आहे आणि मायावती "ताकाला जाऊन भांडे" लपवतही नाहीत. पण एकंदरीत यामुळे आपल्या शासनालापण जरा जाग आली तर बरे होईल असे वाटते!

मराठी साहित्यावरही 'माया'जाल!
मराठी लेखिकेला मायावती देणार दोन लाखांचा पुरस्कार

- राजीव काळे, मुंबई

' हाथी नही गणेश है... ब्रह्मा विष्णू महेश है' अशी घोषणा देत उत्तर प्रदेशची सत्ता ताब्यात घेणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या भूमीत सत्तेचे पीक काढण्यासाठी व्यूहरचना करणा-या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राज्यातील अभिजन वर्गाच्या गोटात शिरकाव करण्यासाठी साहित्याचा दरवाजा ठोठावला आहे. साहित्याच्या अंबारीतून सत्तेपर्यंत पोहोचण्याचा बसपचा हा अनोखा फॉर्म्युला आहे.

महाराष्ट्रातील साहित्यिकांना राज्य सरकार दरवषीर् पुरस्कार देते. पुरस्कार मानाचा असला तरी त्यासोबत मिळणारे धन अगदीच कमी! पुरस्काराच्या चेकवरचा आकडा १० हजार रुपयांच्या पलीकडे सरकत नाही. या पार्श्वभूमीवर मायावतींच्या उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील लेखिकेला उत्कृष्ट लेखनासाठी तब्बल दोन लाख रुपये इतक्या घसघशीत रकमेच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. हा पुरस्कार रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाईल. तसेच, मराठीसह हिंदी व पंजाबी भाषेत पद्यरचना करणारे संत नामदेव यांच्या नावाचा पुरस्कार हिंदी भाषक लेखकाला देण्यात येईल. समीक्षा, ललित निबंध, आत्मचरित्र आदी लेखनप्रकारांसाठी हा पुरस्कार दीड लाखांचा आहे. महाराष्ट्रात दलित पँथरची चळवळ व विदोही साहित्य यांच्यातील बंध सर्वज्ञात आहेत. साहित्य व राजकारण यांच्यातील नातेही जुनेच आहे. हे नाते हेरूनच मायावती यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असावी, अशी चर्चा आहे.

बसपचे संस्थापक कांशीराम यांच्या नावाने, पंजाबी साहित्यिकासाठी 'स्वाभीमान सन्मान पुरस्कारा'ची घोषणाही मायावती सरकारने केली आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या लेखक/ लेखिकेचे बँक खाते तब्बल अडीच लाख रुपयांनी फुगेल! कांशीराम यांची जन्मभूमी असलेल्या पंजाबमध्ये बसपची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नांतील एक भाग या दृष्टीने त्याकडे पाहिले जात आहे.

Comments

निरुत्तर

मायाबाईंनी भारतातल्या भल्याभल्या राजकारण्यांना नव्या-नव्या क्लृप्त्यांसह डाव टाकून चकीत करण्याचा धडाकाच लावला आहे. आश्चर्य म्हणजे त्यांना त्यात यशही येत आहे. त्यांच्या या तोडीवर तर त्यांचे सगळेच विरोधक निरुत्तर होतील असे दिसते. आठवले-कवाडे-प्र.आंबेडकर तसेच काँग्रेसी वगैरेंनी आता अशा पुरस्कारांची शर्यत लावल्यास आश्चर्य नको. पण त्यामुळे बिचार्‍या साहित्यिकांची दिवाळी होत असेल तर चांगलेच आहे.

मायावती व नरेंद्र मोदी या मुख्यमंत्र्यांनी एका मागून एक नवनवीन निर्णय घेत बाकीच्यांना नवा रस्ता दाखवायला सुरुवात केली आहे हे मात्र खरे.

आपला,
(बघ्या) भास्कर
आम्ही येथे वसतो.

हा पुरस्कार

हा पुरस्कार सुरु करून मायवतींनी एक नवा पायंडा पाडला आहे हे खरं पण त्याचा उपयोग कसा होतो यावर हे पाऊल योग्य आहे की नाहि ठरेल.

जर पुरस्काराची रक्कम खरोखरच उत्तम लेखन करणार्‍या साहित्यिकेस मिळाली तर आनंद आहे, आणि इतर शासनांनी अनुकरण करण्यायोग्य आहे. परंतू केवळ जात/वोटबँक आदी गोष्टी डोळ्यांसमोर ठेऊन हा पुरस्कार दिला जाऊ लागला तर मात्र हा नकारात्मक आणि अनुचित पायंडा पडेल.
(सावध स्वागत करणारा) ऋषिकेश

शिवाय हा पुरस्कार केवळ लेखिकांनाच मिळणार आहे, ही मात्र अनूकरणीय बाब आहे. काय?

राजकीय वापर

याचा अर्थातच राजकीय वापर होण्याची शक्यता आहे. पण काही का असेना जर काही चांगले (तोंडदेखले का होईना) करत असेल तर करूदेत असे म्हणायचे.

--------------

सहमत

हेतू काही असो, चांगले करत असला तर करा असे म्हणायची सध्या पाळी आहे.

----
"आ देखे जरा, किसमें कितना है दम..." -- हिलरी, ओबामा, मॅकेन, हकबी द्वंद्वगीत. :)

ठीक आहे हो

शासनाचे पुरस्कार हे विवादास्पद असणारच ना? तसेच रक्कम लगेच हातात पडतील याची खात्री काय? शिवाय कॅश च्या ऐवजी विकासपत्रे, किंवा असे काहीसे मिळेल जे वटवायला अजुन वेळ. :-)

एका व्यक्तिला पुरस्कार मिळाल्याने जनमत, पक्षबांधणी होइल जरा अवघड वाटते...

असो काही हरकत नाही. कोणाला तरी "नॅनो" घेणे सोपे होईल :-)

घोषणा आणि कृती

घोषणा नक्कीच चांगली आहे पण कृती होते की नाही आणि सातत्य राहणार कि नाही? हा औत्सुक्याचा विषय आहे. मायावती फक्त घोषणा करण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. जर कोणी राजकारणी प्रांतिय अस्मिता आणि देशाचे राजकारण याचा समतोल राखत असेल तर चांगलेच आहे. पण ते टिकते किती? हे पाहणे जास्त योग्य ठरेल.





मायावती

मायावती यांनी सर्वप्रथम उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात येणार्‍या लोंढ्यांना रोखावे व स्वतःच्या राज्याकडे लक्ष धावे .मगच महाराष्टात पुरस्कार द्यावेत.
आपला
कॉ.विकि

लेखिकेच्या नावामागे लेखक

ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या स्त्रीचा नवराच आडून कारभार पहात असल्याची उदाहरणे आहेत. मायावतींनी हे पारितोषिक राजकीय हेतूने ठरावीक समाजातील लेखिकांकरता ठेवले नसावे असे वाटते. पण तसे असेल तर लेखिकेच्या प्रकाशित नावाखाली नवर्‍याकडून, किंवा एखाद्या प्रथितयश लेखक-लेखिकेकडून बक्षिसाच्या वाट्याच्या आशेने लिखाण करवून घेणे शक्य आहे. मायावती बक्षीस देण्यापूर्वी खातरजमा करून घेतीलच. पण एकंदरीत मायावतींची चाल अभूतपूर्व आहे.--वाचक्‍नवी

 
^ वर