दंत (कथा नव्हे) अनुभव

आरोग्य पत्रिकात सगळे विद्वान सांगत असतात की तुम्ही कितीही पैलवान असाल पण जर दाताच्या आरोग्याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमच्या अरोग्याला तुम्ही सुरुंग लावलेत असे समजा. दात खराब असतील म्हणजे किडलेले असतील वा साफ केलेले नसतील तर तुम्ही खात/पीत असलेल्या प्रत्येक घासा सोबत/घोटासोबत तुम्ही त्या अन्नाचे मारेकरी पोटात पाठवत आहात. अन्नाची वाट लाऊन हे जीवजंतू स्वस्थ बसतीलच असे नाही तर तुमच्या पचन संस्थेवर तसेच पुढे शरीरात शिरुन आतल्या अनेक संस्थांवर ते हल्ले करत राहतात.

म्हणजेच निरोगी रहायचे असेल तर दातांना सुद्धा निरोगी ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य बनते. सुदैवाने वा दुर्दैवाने आम्हाला पाश्चात्य जीवनाबरोबरच भारतीय ग्रमीण तसेच शहरी जीवन सुद्धा चांगलेच अनुभवायला मिळाले आहे. या तिन्ही जीवनपद्धतीत आमच्या दंत आरोग्यावर वेगवेगळे परिणाम झाले. त्यांना येथे उतरवत आहोत.

ग्रामीण जीवन :
आमच्या परस बागेत तसेच गावात कडुलिंबांची संख्या भरपूर असल्याने कडुलिंबाची काडी हे आमचे दात साफ करण्याचे (केवळ घासन्याचे नव्हे) मुख्य साधन असे. कधी कधी बदल म्हणून मोगला, उंबर (औदुंबर), सुबाभूळ, वगैरे झाडांच्या काड्या सुद्धा आम्ही वापरत असू. फार कोवळी वा फार मजबूत नसलेली एक वीतभर काडी एका टोकाला आडकित्त्याने व्यवस्थित तोडून नंतर तिला हळू-हळू चावत चावत एका टोकाला एक इंचभर लांबीचा ब्रश बनवायचा. मग त्या मऊ पडलेल्या ब्रशने दातांच्या मधून तसेच हिरड्यांची सफाई करायची. ब्रशचे धागे नैसर्गिक रित्या तयार झालेले असल्याने त्यांत लहान मोठे तसेच मजबूत व मऊ असे सगळ्या प्रकारचे धागे असत. ब्रश तयार करताना दाढींचे पृष्ठभाग साफ व्हायचे तर नंतरच्या ब्रशमुळे दातांच्या मधले अन्नकण पूर्णपणे निघून जात. कडुलिंबाच्या औषधी गुणांमुळे घशातले जीवजंतूही मरुन जात व दिवसभर श्वास कसा मस्त तजेलदार रहात असे.

शहरी जीवन :
आमच्या दातांना थोडेफार ग्रहण लागले ते शहरात रहायला लागल्यावर. कडुलिंब न मिळाल्याने नाईलाजाने आम्हाला ब्रश-पेस्टचा सहारा घ्यावा लागला. आपल्याकडे अजूनही खूप चांगल्या प्रकारचे ब्रश वापरणे सामान्यांच्या आवाक्यातले नाही (किमती हजार रुपयांच्या पुढे आहेत). साधारण ब्रशने दांतांच्या मधले किटाणू जात नाहीत तसेच हिरड्यांची सुद्धा झीज होते. एकंदरीत शहरी पद्धतीने (ग्रामीण भागात सुद्धा) राहणार्‍या सर्वांच्या दांचे आयुर्मान प्रचंड कमी असते. पन्नाशीत बत्तीशी पूर्णपणे गमावलेले अनेक लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. काही म्हणतात की ही आपल्या समाजाची संक्रमण अवस्था आहे. पण त्यासाठी काय दोन-तीन पिढ्यांनी आपले बलिदान द्यायचे? मी केवळ दातांचेच नाही तर त्यांच्या आयुष्याचे म्हणतोय. कारण निरोगी दात असतील तरच निरोगी आरोग्य.
बरे आपल्याकडचे डेंटिस्ट तरी काय मजेशीर. मी मुंबईतल्या एका चांगल्या डेंटिस्ट कडे सहामाई दंतसफाई साठी गेलो होतो. त्याने माझे दात साफ करायचे सोडून सल्ला दिला की तुझे दात साफ करायची काही गरज नाही कारण दात-हिरड्या फार व्यवस्थीत दिसत आहेत. आणि नेहमी-नेहमी अशी सफाई केल्याने तुझ्या हिरड्यांची झीज होईल (व्यवस्थित सफाई केल्यास हिरड्यांना इजा पोचत नाही हे मी त्याला शिकवायाची गरज पडावी?). मी म्हटलो की मला कधी-कधी दुर्गंधी आल्यासारखी वाटते. तर म्हणाला की तुझ्या दाताला शक्यच नाही! काय बोलणार, कप्पाळ!

पाश्चात्य जीवन :
इकडे अमेरिकेत जवळपास सर्व जनता दर सहा महिन्याला दंत-सफाई करुन घेते. प्रत्येक दाताचे हिरडीसोबतचे आंतर मोजले जाते. जर हिरडी घट्ट नसेल तर त्यावर उपाययोजना केली जाते. आणि जर एखाद्यच्या हिरड्यातून रक्त येत असेल वा त्यात किटाणू मर्यादेपेक्षा जास्त असतील तर त्याची हिरड्यांच्या शल्यचिकित्सकाकडून सखोल सफाई केली जाते (मला वाटते ०.००१ मिमि पर्यंत). येथे डेंटिस्ट विद्युत घारणी असलेला ब्रशच सर्वांना वापरायला सांगतात. तसेच ब्रश सकाळ संध्याकाळ करायला सांगतात. त्याच बरोबर ब्रशने दातांच्या सांधींमधून तसेच खोल हिरड्यांमधून अन्नकण निघत नसल्याने फ्लॉस वापरणे अनिवार्य असल्याचे सांगतात. भारतात फ्लॉस काय भानगड असते ते कित्येक औषध विक्रेत्यांना सुद्धा माहित नसते. मग प्रश्न पडतो की आपण पाश्चात्यांप्रमाणे ब्रश वापरण्याचे सुद्धा अंधानुकरणच करत नाही का?

दंत शस्त्रक्रिये विषयी :
भारतात सर्वसाधारणपणे रुट कॅनाल केलेल्या दाताच्या मुळाला काही वर्षात पुन्हा किटाणू संसर्ग होतो व बहुतेक वेळेला तो दात गमावण्याची पाळी आपल्यावर येते. त्याचे कारण समजावून घेताना असे लक्षात आले की अद्ययावत यंत्रसामग्रीच्या अभवाने भारतातल्या बहुसंख्य रुट कॅनाल शस्त्रक्रियेत दात साफ करताना त्याच्या मुळाशी जाणे शक्य होत नाही. तो भाग खूपच चिंचोळा असतो व तेथे खूप कमी किटाणू मावू शकतात. ते किटाणू त्रास देण्याच्या संख्ये येवढे वाढेपर्यंत अनेक वर्षे गेलेले असतात. पण या दीर्घ काळा नंतर आपल्यावर दात गमावण्याची वेळ आलेली असते.
हीच बाब दताला टोपी (कॅप) बसवताना वा पूल (ब्रीज) बसवताना सुद्धा प्रकर्षाने जाणवते. आमच्या सौ.च्या दातांवर भारतात बसवलेल्या चार टोप्या व एक पूल दोन-तीन वर्षात उध्वस्त झाले. कारणे काय तर पुन्हा अद्ययावत यंत्रसामग्री व योग्य धातूमिश्रण यांचा अभाव. त्यामुळे बसवलेल्या टोप्यांची कडा दताच्या आवरणाशी एकजीव होऊन न बसल्याने वा जेथे तो धातू संपून दाताचा पृष्ठभाग सुरु होतो तेथे खाच निर्माण होते. हीच खाच किटाणूंचे घर बनते व कालांतराने टोपी वा पूल उध्वस्त होतो.

यावर जाणकार अधिक व शास्त्रीय दृष्टीकोणातून योग्य माहिती देऊ शकतील. आम्ही आमच्या अल्प बुद्धिला जेवढे समजले तेवढे लिहिले. पण एक मात्र खरे की जर आमच्या पुरते बोलायचे तर ग्रामीण जीवना नंतर गमावलेले दंत आरोग्य पुन्हा मिळवले आहे म्हणून आम्ही आनंदी आहोत.

अनुदिनीवर पूर्वप्रसिद्ध

Comments

वा!

अतिशय चांगला विषय आहे. सर्कीटरावांनी लहान् मुलांसाठी लेख लिहा म्हणल्यावर हाच विषय आठवला होता.

ह्या निमित्ताने प्रत्येकाने आपापल्या मौखिक आरोग्याचा (Oral Care) परत एकदा सखोल विचार केला तर उत्तम.

आता खाली जरा अकलेचे तारे!! मेट्रोसेक्श्युअलगिरी वाटु शकेल पण दंत आरोग्यासाठी तो धोका मी घेतोय ;-)!! कृपया प्रमाण मानू नये, आपल्या दंतवैद्याचा सल्ला घ्या.

प्रत्येक जेवणानंतर ब्रश करणे. रात्री दात घासून झोपल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्या उठल्या परत ब्रश करण्या ऐवजी न्याहरी नंतर ब्रश करणे, दुपारच्या भोजना नंतर (?? हे बर्‍याचदा शक्य होत नाही म्हणजे घर/कचेरीच्या बाहेर असल्यास, त्यामुळे निदान खळाळून चुळा आणी दातात काही अडकले असे वाटल्यास फ्लॉस) आणी रात्रीच्या भोजनानंतर. ब्रश करताना (मोरी घासल्यासारखा) जोर न देता हलक्या हाताने घासणे, जीभ साफ करणे, फ्लॉस करणे, हीरडीला हलक्या (दाब)बोटाने मसाज करणे व माउथवॉश गुळण्या/चुळा. एकदा फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट एकदा विना फ्लोराईड.

तसेच दंत विमा असेल/नसेल तरी एक बचत योजना सुरू करणे आयुष्यात नंतर डेंटल मेकओव्हर साठी. ;-)

उत्तम सवय

प्रत्येक जेवना नंतर ब्रश, फ्लॉस व माउथवाश वापरणे योग्यच. रात्री हे सोपस्कर् पार पाडून झोपला असाल तर सकाळी उठल्यावर पुन्हा ब्रश करायची गरज नाही वाटत. त्या ऐवजी मी मंजन (विको वापरायचो पण आजकाल रामदेव बाबांचे दिव्य दंतमंजन छान वाटत आहे) ने सकाळी हिरड्यांना मसाज देतो. हिरड्या पक्क्या वाटतात. बघा तुम्हाला आवडतो का हा एक चकटफू सल्ला.

आपला,
(मंजन वाला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अजून एक सल्ला

दात स्वच्छ करताना ब्रश खालच्या दातांसाठी खालून वर आणि वरच्या दातांसाठी वरून खाली असे नीट ब्रश करावे. बाहेरच्या (दाखवायच्या) बाजूने दात बर्‍याचदा नीट घासले जातात पण आतल्या बाजूने घासताना आळस केला जातो, तो करू नये !

भारतीय दंतवैद्यांचा तुम्ही म्हणता तसा वाईट अनुभव मला नाही. कदाचित जवळचे नातेवाईक डेंटिस्ट असल्याने असेल:-)

दातकोरणं

हे बघा दातकोरणं
हे साधारणपणे चांदीचे असते. कारण सोन्यापेक्षा चांदी हा कठीण धातू आहे. केवळ स्वस्त हे कारण नव्हे. दातातील फटीत अडकलेले अन्न कोरुन बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग होतो. फोटोत हे काळ्या गोफाला बांधले आहे. ठेवण्याच्या सोयीसाठी.
Datkoran
आजही हे मी हेच वापरतो.
प्रकाश घाटपांडे

दातकोरणं

दात कोरण्याने सुद्धा फ्लॉस सारखे अतिशय छोटे व खोल असलेले अन्नकण निघत नाहीत. दातकोरणे वापरण्याला भारतीय परंपरागत शास्त्राची सुद्धा पुस्ती नाही असे वाटते.
पण मोठाले कण तसेच राहू देण्यापेक्षा या कोरण्याने काढलेले बरे.

आपला,
(दंतधारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अमेरिकेतील दंतवैद्य

मला वाटतं दंतवैद्य हा आरोग्य पत्रिकेतील शनी ग्रह असावा. (म्हणजे ग्रहस्थितीतील ज्ञान शून्य तरीही) लाभला तर लाभतो नाहीतर फक्त मागे लागतो.

भारतातील आमचे दंतवैद्य अतिशय हुषार आहेत. दात भरण्यासाठी (फिलिंग) त्यांनी कधी मला इंजेक्शन टोचल्याचे आठवत नाही. इथले दंतवैद्य मात्र एक दात भरायचा असेल तर हैराण करतात असा अनुभव आहे. दंतवैद्याकडे त्यामुळे जाणे नकोसे वाटले तरी क्लिनिंग मात्र मला आवडते. न चुकता करून घेते. अमेरिकेतील दंतवैद्य मात्र इंशुरन्स देणारे ना मग कापा पेशंटला हवे तसे अशा आविर्भावात असतात असे अनुभव आले आहेत. त्यापेक्षा कधी भारतवारी केली तर मोठ्या कामांसाठी आपल्या जुन्या फ्यामिली दंतवैद्यांची भेट घेणे मी पसंत करते.

तसंही अमेरिकेतील दंतवैद्यांच्या फिया (हे फीचे अनेकवचन ;-)) ऐकल्या की दातांऐवजी डोळे पांढरे होतात. मध्यंतरी असं ऐकलं होतं की एका ट्रॅवल एजन्सीने भारत ट्रीप आयोजीत करण्याचे ठरवले आहे. यात भारत दर्शनाबरोबर योग्य दरात प्रवाश्यांचे दंतकर्मही भारतात केले जाईल.

माझा अनुभव..

अमेरिकेतील एका मूळच्या भारतीय दंत-वैद्यिणीकडे जाण्याचा योग आला होता. दुसरे कुठलेही उपचार सुरू करण्यापूर्वी तिने माझा जबडा सुमारे पंधरा मिनिटे उघडा ठेऊन जवळजवळ प्रत्येक दाताचा क्ष्-किरण फोटो काढला!!

जबडा नुसता दुखून आला होता!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ते तर आहेच.

जबडा नुसता दुखून आला होता!

हो हे देखिल आहेच पण एकदा दात भरून घ्या. दात भरल्याने तो जर पुढचे १५ दिवस ठणकणार असेल तर कॅविटी काय वाईट असे म्हणण्याची परिस्थिती येते.

आणखी एक, पोरांच्या दातांना तारा लावणे, मग ते वेडेवाकडे नसले, पुढे आलेले नसले तरीही, हे येथील एक मस्ट काम आहे. आम्हाला यावर्षी हा भुर्दंड आहे.

तेव्हा दातांची काळजी घेणे आणि दंतवैद्याला लांबून साष्टांग नमस्कार ठोकणे सर्वात उत्तम.

आम्ही एक दात गमावलाय !!!

केंडे साहेब,
दंत कथेचा विषय मस्तच आहे. आम्ही दात कोरण्यासाठी ब-याचदा काडीच्या पेटी मधील काडी वापरायचो.मटण आणि चिकनच्या पीसाचा कोणता तरी तंतू किंवा मेथीची भाजी ( आवडती हं आपली ) दाताच्या फटीत हमखास अडकायची. मग त्याला वेगवेगळ्या ऐंगलने काढल्याशिवाय चैन मिळायचे नाही. कालांतराने फट मोठी झाली आणि मटनाचे हाड चावतांना दाताचा चूरा झाला, म्हणजे दात खूडला.
आता विषयाकडे वळतो........तर आम्ही ते प्रकरण घेऊन दंत वैद्याकडे गेलो. त्यांनी एकूण परिस्थिती पाहिली आणि त्याला काढावे असे ठरले. त्यानंतर त्यांनी इंजेक्शन टोचले ३०मि.नंतर माझी गालाकडची एक साईड पुर्ण बधीर झाली असे वाटल्यावर त्यांनी वेगवेगळ्या अवजारांनी राहिलेला दाताचा भाग काढून टाकला. पण, त्यांनी ज्या पद्धतीने हे सर्व केले त्याची इतकी धास्ती बसली की, काही दिवसानंतर या आपण दात (विविध प्रकारांपैकी ) बसवु असे ठरले. पण, केंडे साहेब, खोटे बोलणार नाही. अजूनही आम्ही दात बसवला नाही. अजूनही दाताची खींड उघडीच आहे. ( तसे लक्षात येत नाही. पण, बोलतांना टक लावून आमच्या दाताकडे पाहिल्यास ते निदर्शनास येते. ) बाकी राहिलेल्या दाताचे क्लिनिंग नियमित करुन घेतो. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छानच विषय.

भास्कररावांनी खरेच खुपच आगळा वेगळा विषय हातात घेतला आहे.

मी सुध्दा दोन्ही वेळेस ब्रश ( दात घासण्याचे ठरविले होते.) परंन्तु त्या मुळे वेगळीच समस्या जाणवली. माझे तोंड यायला लागले. भिक नको पण...

माझ्या मते सकाळ, दुपार आणि झोपण्यापूर्वी चुळ भरली तर समस्या सूटते.

लेख वाचण्यापूर्वी नकळतच आपण काही अनुमान मनात बांधतो, काही आठवत जाते. कनफयुशियसची गोष्ट आठवली. एकदा एक शिष्य त्याच्या कडे आला आणि विचारले की चांगले का वागावे? त्याने आपले बोळके दाखवले आणि सांगितले की दात कोठे आहे? शिष्याने सांगितले दात पडलेली दिसतात. मग त्याने सांगितले कठोर दात पडतात पण कोमल जीभ कायम राहते. तसेच माणसाने कोमल राहावे. अशीही एक दंतकथा.

रात्री ब्रश, सकाळी मंजन

द्वारकानाथजी,

तोंड येत असेल तर हे सुद्धा करुन बघू शकता...
१. पेस्ट बदला
२. रात्री ब्रश, सकाळी मंजन असे केल्यास तोंड येत नाही हा स्वानुभव.

आपला,
(अनुभवी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

भारतीय दंत वैद्य

या बाबतीत माझे मत भारतीय दंतवैद्यांच्या बाजूने आहे. एक तर परदेशातील दंतउपचार इतके पराकोटीचे महाग असतात की बहुतेक वेळा भारत यात्रा आणि भारतात उपचार यांना कमी पैसे पडतात. दुसरे म्हणजे भारतीय दंतवैद्यांकडे तितकी आधुनिक साधने नसतील, पण त्यांच्या कौशल्यावर मात्र माझा पूर्ण विश्वास आहे. अर्थात त्यांची निवड मात्र काळजीपूर्वक केली पाहिजे. सर्व दंतवैद्य सारखे नसतात. नवीन दंतवैद्याकडे जाण्याआधी मित्र, नातेवाईक यांच्याकडे चौकशी करून त्यांचा अनुभव विचारात घ्यावा.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

 
^ वर