घसरगुंडीची शाळा - २

पहिल्या दिवशीचा अनुभव पाठीशी घेऊन आम्ही दुसर्‍या दिवशी स्कीच्या टेकट्यांकडे निघालो. आमचे कालचे साथिदार आज गायब होते. त्यांना केवळ अनुभव म्हणून एकदा स्कीईंग करुन बघायचे होते ते त्यांनी साध्य केले होते. शिवाय आज त्यांची येण्याची स्थिती सुद्धा नव्हती. कोणाचा गुडघा, कोणाचा खांदा तर कोणाची पाठ दुखत होती. माझेही अंग जरा जड वाटत होते पण दुखापत नसल्याने तसेच उत्साह फुरफुरत असल्याने आम्ही निघालो.

पहिल्या दिवशी थंडी कमी असल्याने (४ ते ७ डि.से.) कान टोपीची वगैरे गरज भासली नव्हती. आज मात्र थंडी चांगलीच असल्याने कानाला हुड लावावे लागत होते. आम्ही अस्त्र-शस्त्रे लेऊन सज्ज झालो. स्कीईंग साठी तीन आवश्यक तर चार-पाच ऐच्छीक साहित्य लागते. आवश्यक सामान या प्रमाणे...

बूट: हे बूट स्नो-बूट प्रमाणेच नडगी बरोबर उंचीचे असातात. त्यात पायाच्या पंजाला तसेच पिंडरी-नडगीला पक्के करण्यासाठी यंत्रना असते. ही यंत्रना दोन-तीन वेगवेगळ्या प्रकारची असते. आम्ही हे असे बूट वापरत आहोत.

स्कीज (घसर पट्टी) : स्कीज तुमच्या बुटाच्या मापाच्या असाव्या लागतात. त्यांतली बुटाला आवळणारी पकड लांबीला थोडीशी कमी-जास्त करता येते. बुटांना स्कीमध्ये आडकवण्यासाठी त्यात बुटासह असलेला पाय घालून दाब द्यावा लागतो. तर बूट बाहेर काढण्यासाठी त्याला एक कळ असते. ही कळ हाताने तसेच पोलने दाबायची असते. अवजड बुटांमुळे बरेच वेळा स्की पर्यंत हात पोहचत नाहीत म्हणून पोलचाच उपयोग करावा लागतो.

पोल (छड्या) - स्कीईंग करताना बहुतेक खेळाडू दोन्ही हातात पोल पकडतात. पोल पकडताना त्याचा पट्टा हातच्या नाडीला समांतर घेऊन मुठीत आला पाहीजे व त्याला पोल सोबतच पकडले पाहिजे. अन्यथा आंगठा दुखावला जाण्याची शक्यता असते.

याशिवाय शिरस्त्रान, गॉगल्स, सुद्धा खेळाडुंनी बाळगायला हव्यात याची प्रचिती आम्हाला दुसर्‍या दिवशी आली.

सुरुवातीला वार्म अप म्हणून मी कालच्याच प्रकारे दोरीला पकडून छोट्या टेकडीवरुन एकदा घसरगुंडी केली. काल आम्हाला शिकवायला असणारे दोन्ही प्रशिक्षक आज दिसत नव्हते. आजही आमच्याकडे शिकाऊ तिकीट असल्याने आम्ही आमच्या शंका तिथे उपस्थित असणार्‍या प्रशिक्षकांना विचारू शकत होतो. पण तशी गरज वाटली नाही. आजचे ध्येय म्हणजे गती न वाढवता अगोदर वळायला शिकणे, त्यानंतर थोडी गती वाढवने जेणे करून एक दोन दिवसानंतर प्राथमिक गटातून वरच्या गटात (मॉडरेट लेवल) जाता येईल.

आणि आम्ही थोड्या मोठ्या टेकडीवर निघालो. वर जाताना कोणत्या मार्गाने यायचे याची आखणी करत होतो. काल त्या छोट्या टेकडीवर आमच्या अशा आखण्यांची वाट लावायला अम्हाला मार्गात हाटकून कोणीतरी धडकत असे (म्हणजे ते समोर आल्यावर आम्हाला वळता न आल्याने आम्ही त्यांना धडकत असू). त्यावर उपाय म्हणून अगदी उतारावर सुद्धा गती पूर्ण थांबवता येण्याची कला आम्ही आज आवगत केली होती (हे आज पर्यंत आमच्या कोणाही मित्राला न जमलेले कसब आल्याने विश्वास वाढला होता).

दोरावरुन वरती जाताना पायात किती जास्त ओझे आहे हे जाणवत होते. नेहमी ओझ्याखाली दबलेल्या पायांना हे बुटाचे-पट्ट्यांचे ओझे ताणून लोंबकळत होते. त्याच बरोबर खाली घरगुंडी करत असणार्‍यांकडून बरेच शिकायलाही मिळत होते. नेमके काय केल्याने हमखास पडणार व काय केल्याने नाही याचे आकलन करता करता आम्ही टेकडीवर पोचलो सुद्धा. आरे बापरे! आता या पाळण्यातून खाली उतरताना सावरायचे कसे? आठवले, पिझ्झा! पिझ्झा (उलटे इंग्रजी अक्षर व्ही) केल्याने गती कमी होते. पण तो पर्यंत मागच्या पाळण्यातले लोक पाठीवर येऊन आदळले तर? ठरले, छोटा पिझ्झा!

जमले रे बॉ! चला पहिली पायरी तर झाली. पण हे काय, सगळी टेकडी बंद! मला जाता येण्यायेवढा मार्गच शिल्लक राहिला नव्हता. सगळीकडे पडलेले लोक. एव्हाना आमच्या स्कीने गती पकडलेली. पायांनो वळा, वाळा... राम, राम, राम... आठवले "डावीकाडे वळायला उजव्या पायवर भर द्या अन उजवी कडे वळायला डाव्या पायावर" आमच्या प्रशिक्षकाचे हे वाक्य काय ऐनवेळी आठवले हो!

आणि चक्क पहिल्याच चकरीत मी टेकडीच्या पायथ्यापाशी. चला, सौंच्या हजेरीत पडापडी नाही झाली. त्यातही जर एखादी बाई येऊन आदळली असती तर उद्यापासून स्कीइंग बंद होण्याचा धोका होता... टळला एकदाचा!

दुसर्‍या फेरीत पाळण्यामध्ये एक मित्र झाला. त्याचे नाव ल्यूक, वय केवळ चार वर्ष पण मोठ्यांना लाजवेल अशी त्याची गती, वळणावरचे नियंत्रन. त्या पोराने मला एक ध्येय दिलं. मी शक्य तितक्या लवकर माझ्या मुलीला स्कीईंग शिकवायला आणणार! पण "कोणाला पोहायला शिकवायचं तर दुसर्‍याचा जीव वाचवता येईल येवढं चांगलं पोहता आलं पाहिजे" हा नियम ईथे सुद्धा वापरायचा होता. आता स्वतःची साधन सामग्री विकत घ्यायचीच!

बघता बघता चार तास कसे गेले कळलेच नाही. प्रत्येक चकरी सोबत गतीवरचं तसच वळनांवरचं नियंत्रण जास्त चांगलं जमत होतं. आता त्या मोठ्या टेकड्या/डोंगर खुणावत होते. तितक्यात मस्त हिमवर्षाव सुरु झाला. पाळण्यातून समोर दिसणारे डोंगर, खाली पांढर्‍या शुभ्र बर्फाचे गालीचे अन त्यात हे अलगद झोकावत-झोकावत खाली येणारे हे कापसा सारखे बर्फाचे पुंजके... किती विहंगम दृष्य ते! पण हे काय, घरगुंडी सुरु झाल्यावर गती घेऊन खेळताना ते सुंदर बर्फाचे इवले-इवले दिसणारे पुंजके सुयांप्रमाने डोळ्यात घुसत होते. उद्याला गॉगल पाहिजे हे खरं पण बंद डोळ्याने खालपर्यंत पोचायला तर हवं!

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे वा!

अतिशय रंजकशैलीत मांडलेला माहितीपूर्ण लेख!. अजून येऊ द्यात..
हे सगळं वाचून आम्हालाही हा खेळ रसगर्भ (इंटरेस्टींग) वाटू लागला आहे :)

-ऋषिकेश

एकदा जा

तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर स्कीईंग नक्कीच आवडेल. एकदा जाऊन याच. उद्याच शनिवारची सुटी आहे. काय म्हणता?

पण इतरांना काही ही लेखमाला आवडलेली दिसत नाही. दुसरा एखादा विषय घेतो लिहायला.

आपला,
(स्कीवाला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

वा क्या बात है!

अर्थात लेखकाने लेखन थांबवायचेच म्हटले, तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही. (आणि एका मर्यादेपलीकडे थांबवण्याचा प्रयत्न करूही नये.) पण शेवटी आपण लेखन कशासाठी / कोणासाठी करतो, आपल्याला लिहायला आवडते म्हणून (स्वतःसाठी / स्वतःच्या आनंदासाठी) की लोकांनी वाचावे म्हणून (लोकांसाठी), याचा विचार प्रत्येक लेखकाने आपापल्या परीने करणे आवश्यक आहे, असे वाटते.

अगदी माझ्या मनातले बोललास टग्या!

भास्करराव... तुम्हाला वाटतेय ना लिहावेसे, मग झाले तर! शिवाय एक ऋषिकेश तर वाचून आनंदी आहे ना? काय बिघडले? नी पण वाचला आवडलाही... पण मला सध्य खरच कंटाळा येतोय टंकत बसायचा म्हणून प्रतिक्रिया दिली नाही. याचा अर्थ लेखच आवडला नाही असे नाही.
तुम्ही लिहा हो! आपले कोर्डेसाहेब या बाबतीत आदर्श आहेत असे मी मानतो. ते सदैव नवनवीन विषय येथे मांडतात. एखादा चांगला चालतो एखादा नाही पण त्यांना वेगळ्या विषयाची ओळख करून देण्याचा आनंद तर नक्की मिळतो. मागे तर त्यांच्या एक लेखा कुणी म्हणजे कुणीच काही प्रतिसाद दिला नाही... तो ही त्यांनी अतिशय खेळीमेळीने घेतला नि तुम्हाला तर १० मिळालेत! अजून काय हवे?

आणि असेही तुमी मराठी विकि वर लेखन केलेत तर शून्य प्रतिसाद असतात..... (म्हणजे प्रतिसाद हा प्रकारच नाहीये) मग तेथे लिहायचेच नाही का?

आपला
गुंडोपंत

माझ्या मते

पण इतरांना काही ही लेखमाला आवडलेली दिसत नाही. दुसरा एखादा विषय घेतो लिहायला.

माझी इच्छा आहे की या विषयावरील लेखन थांबवू नये.
आता बघा दोन शक्यता आहेत
१) लेखन विषय लोकांना आवडला तरी प्रतिसाद नाहितः वर टग्या यांनी लिहिल्याप्रमाणे कार्यबाहुल्य / आळस इ. मुळे प्रतिसाद दिला नाहि तरी लेखन चालू रहावे असे वाटते
२) लेखन विषय लोकांना आवडला नाहि: हे तर अधिक महत्वाचे कारण या विषयात रुची असणारे जर तुम्ही एकटेच आहात तर या विषयावर लिहायची जबाबदारी केवळ तुमच्यावर येते.. हे खरे असेल तर दुसरे कोणी या विषयांवर लिहिणार नाहि. तेव्हा तुमचं चालु द्या

तेव्हा दोन्ही शक्यतामधुन लेखन करा हेच प्रतित होते.. :)

वरील प्रतिसाद फक्त केंडेसाहेबांना उद्देशुन नसून अश्या सगळ्या लेखक मंडळींना आहे ज्यांनी केवळ आपली आवड वेगळी असण्याच्या कल्पनांतून किंवा कमी प्रतिसादांमुळे लेखन करणे थांबवले आहे / सुरु केलेले नाहि. अश्या सगळ्यांना विनंती की सुरु करा :)

असो.

-ऋषिकेश

लेख आवडला...

तुमचा हा लेख (आणि याचा पूर्वभाग) आवडला ....माझ्या स्वतःच्या स्कीईंगची आठवण झाली. मला आठवतेय् , मी पेनसिल्व्हेनियामधे गेलो होतो; पाळण्यात बसून वर गेलो आणि स्कीईंगची घसरगुंडी चालू केली. सुरवातीला पाय फाकवून व्यवस्थित हळूहळू जात होतो. एकदम काय आक्काबाई आठवली देव जाणे. पाय जवळ आणले आणि वेग एकदम वाढला. एकूण साधारण १५ सेकंद भीषण मजा येत होती. आणि मग....... सर्व कह्याबाहेर गेले. असा फेकला गेलो की , मी , माझे दोन्ही स्कीज् आणि दोन्ही पोल्स् एकमेकांपासून २५-३० फूटांवर ! सर्व सामग्री गोळा करून अस्मादिक खुरडत खुरडत पायथ्याशी आले :-)

पण ते १५ सेकंद ....अहाहा !

१५ सेकंद

अस्मादिक खुरडत खुरडत पायथ्याशी आले
--- मग पुन्हा प्रयत्न केलात की नाही? मला सुद्धा अशीच अक्काबाई आठवायची. मग मी आमच्या प्रशिक्षकांना प्रश्न विचारला की ही अशी का आठवते तर त्यांचं म्हणनं होतं की "इट्स जस्त मॅटर ऑफ टाईम. यू पुट मायलेज अँड यू वील बी गुड एट इट."

पण ते १५ सेकंद ....अहाहा !
--- हो, अगदी पहिल्यांदाचा अनुभव काही औरच. आता त्यापेक्षा कितीतरी मोठाल्या टकडीवरुन जास्त वेगात अन जास्त वेळ घसरलो तरी ती सुरुवातीची फिलींग येत नाही. पण मजा येते.

आपला,
(१५ सेकंदाचा सहप्रवासी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अरे! हे काय?

अहो मलाही लेख वाचायचा आहे. आताही वेळ नाही पण वाचून प्रतिसाद देईनच. चांगली माहिती आहे. मला हवीही आहे पण वेळेचा प्रश्न आहे. तुम्ही लेखन थांबवू नका.

लेख थांबवू नका, आवडला

पण इतरांना काही ही लेखमाला आवडलेली दिसत नाही. दुसरा एखादा विषय घेतो लिहायला.

आवडणे न आवडणे आपल्या हाती नसते! लिहावेसे वाटले तर नक्की लिहावे. आणि गेले काही दिवस लेख वाचूनही आणि आवडूनही उत्तर द्यायला वेळ होत नाही अशी परिस्थिती आहे.

आणि लेख खरोखरच आवडला. धडपडण्याचे फोटोही आवडले!
मी इथे आल्यावर दोन तीन वेळाच स्की करायला गेले आहे. न्यू हँपशायरमध्ये. गंडोला राईड हा त्यातील सर्वात आवडता अनुभव! पहिल्याने गेले तेव्हा भरपूर पडले. आणि त्यानंतर स्की करण्याचे मनसुबे जे खोक्यात जाऊन बसले ते मुलगी लहान असताना तिला शिकवायला घेऊन गेलो होतो तोवर. मागील अनुभवावरून मनाची चांगलीच तयारी झालेली होती आपटण्याची. पण निदान पडत धडपडत का होईना गोल गोल फिरण्यात यश आले. आता तुमचे लेख वाचून यंदा स्कीइंगचा परत प्रयत्न करण्याचा हुरूप आलेला आहे.

न्यू हँपशायरमध्ये

न्यू हँपशायरमध्ये
--- आम्ही ऐकून आहोत की न्यू हँपशायरमध्ये बर्फ जास्त असल्याने स्कीईंगची खूप मजा असते म्हणून.

मुलगी लहान असताना तिला शिकवायला घेऊन गेलो होतो तोवर.
--- मग तुमची मुलगी शिकली का? मी सुद्धा माझ्या मुलीला शिकवण्याच्या विचारात आहे. बघू या काय करते ती...

आता तुमचे लेख वाचून यंदा स्कीइंगचा परत प्रयत्न करण्याचा हुरूप आलेला आहे.
--- आरे वा! नक्की जा आणि आपले अनुभव सुद्धा लिहा.

लेखन

वर इतरांनी म्हणले आहे त्यात थोडे अजूनः

लेख चांगला आहे. आवडला देखील. फक्त आमच्यासारख्यांना त्यात "पण" म्हणत, उगाच पिंक टाकता येत नाही म्हणून लिहीले नाही इतकेच:-) "कम्यूनिस्ट कसे भांडवलशाही खेळ म्हणून स्कींग विरोधी आहेत, अल्पसंख्य भारतीयांनाच कसे स्किंग येते (म्हणजे धर्माने अल्पसंख्य नाही बरं का, पण लोकसंख्येच्या मानाने स्किंग येणार्‍याची संख्या), ज्य्तिष आणि स्कींग संबंध, मोदी गुजरात विकास करताना वाळवंटातपण स्किंगची व्यवस्था कशी करणार आहेत", अशी काही तरी वाक्ये टाकून पहा, प्रतिसाद् देयला स्फुर्ती चढेल :-) ही वाक्ये पीजे आहेत माझ्यासकट सर्वांनी ह.घ्या. आधीच सांगतो त्यात काही संकुचितपणा वगैरे नाही आहे!

तसे पहाल तर ९० वाचने दिसत आहेत. त्यात काही परत येणारे सदस्य लक्षात घेतले तरी निदान ७०-७५ वाचने तरी झाली असतील. आधीच्या लेखाची पण १६३ वाचने झाली आहेत.

बाकी मी दोनदा स्कीइंगला गेलो होतो. एकदा पडायचे कसे ते शिकलो आणि दुसर्‍यांदा जे आधी शिकलो ते वापरले नाही तर कसे न पडता स्कीईंग करता येते ते शिकलो!

एकूण काय जसे पडले तरी स्कींग करत राहायचे तसेच प्रतिसाद आले नाहीत तरी लेखन करत राहायचे. वाचणारे वाचत असतात जरी प्रत्येक वेळेस प्रतिसाद दिले नाहीतरी!

पडण्याचा खेळ

एकदा पडायचे कसे ते शिकलो आणि दुसर्‍यांदा जे आधी शिकलो ते वापरले नाही तर कसे न पडता स्कीईंग करता येते ते शिकलो!
--- अगदी बरोब्बर. हा खेळच तसा पडापडीचा आहे. पण इजा न होता पडायचे कसे हे अवगत झाले की मग मजा येते. काल यूट्यूबवर स्कीईंचे विडीओ पहात होतो. काय भन्नाट स्किईंग करतात हो हे लेकाचे!... ऍग्रेसीव स्कीईंग मध्ये पडल्यावर मात्र वाट लागते शरीराची.

एकूण काय जसे पडले तरी स्कींग करत राहायचे तसेच प्रतिसाद आले नाहीत तरी लेखन करत राहायचे.
--- पटले. आम्ही लेखन करणार!

आपला,
(आभारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

आम्हाला

आम्हाला काही हे शक्य नाही... त्यामुळे वाचूनच आनंद घेतो!

बर्फात जावून तर आता बराच काळ झाला. कुलूला केले होते असे 'काहीतरी'... पण काय गर्दी हो! एक भली मोठी पंजाबी बाई तर (तीची तीचीच येवून!) आपटली पण माझ्यावर!
मग आमच्या सौं. ची जी काय शाबदीक घसरगुंडी सुरू झाली ती काही थांबेना!
तेंव्हा पासून धसकाच घेतला.

शिवाय आयुष्यात सुरू राहीलेली घसरगुंडीची मजा अजूनही अनूभवतोच आहे...
ती संपंल्यावर कधी वर गेलोच, तर आवडेलच असे खेळ खेळायलाही!

पण तोवर...

आपला
मार्गावरून घसरून गेलेला
गुंडोपंत

हा हा हा

पंतांनी आपल्या शैलीला साजेसा प्रतिसाद दिला आहे....

शिवाय आयुष्यात सुरू राहीलेली घसरगुंडीची मजा अजूनही अनूभवतोच आहे... हा हा हा... मजा आली वाचून!

आपला,
(घसरलेला सहकारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

आभार

सकाळी पाहिले तर केवळ एक प्रतिसाद अन संध्याकाळ पर्यंत ११ नवे प्रतिसाद! कमालच आहे! टग्याराव म्हणतात तसे प्रतिसाद न येण्याचे अनेक कारणे असू शकतात. पण त्यानंतर आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार!

पुढचा भाग नक्की लिहीन.

आपला,
(कृतज्ञ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

स्केटिंग

भास्करराव, आम्ही ह्ये समद हिंदि पिच्चर मधे पघितलं हाय. पण तेच्या मागचं शास्र तुम्ही सांगितल पघा. आन ते स्कीईंग च्या अदुगर स्केटींग यायला पाहिजेल का? म्हजे मोटरसायकल चालवायच्या आदुगर सायकल यायला पाहिजे ना? या हिशेबात म्हन्तोय मी. तसं म्हन्ल तर ज्याला सायकल येत नाही तो डायरेक कार बी हाकतुय. "बर्फाव घसरन्याची प्रीती आन आयुष्यात घसरन्याची भीती" ह्ये गनित काय सुटना पघा. यकदा त्ये स्केटींगच्या चाकावाल्या पादुका घालून पघितल्या. आन काय सांगायच राव! चालाया गेलो आन ....वर आपाट्लो ना? तव्हापासून भ्या वाटत पघा!
( मनातल्या मनात स्कीईंग करुन बघणारा)
प्रकाश घाटपांडे

स्केटिंग, स्कीईंग, स्नोबोर्डींग

मजेदार पण अर्थपूर्ण प्रतिसाद!

स्केटिंग - बुटाला चाके लावून जमीनीवर केली जाते.

आईस स्केटिंग - बुटाच्या तळव्याला धातूचे पाते लाऊन कडक बर्फावर (थिजलेले तळे/नदी) केलेली घसरगुंडी.

स्कीईंग - बर्फावर पायाला पट्ट्या लाऊन केलेली घसरगुंडी.

स्नो बोर्डींग - फळीवर बुटांना बांधून बर्फावर केलेली घसरगुंडी.

बोर्डींग - चाकाच्या फळीवर उभे राहून जमीनीवर गाडी-गाडी खेळने.

स्केटींग तसेच बोर्डींग पाश्चात्य देशातल्या शाळा/कॉलेजातल्या मुलांचा आवडता प्रकार असतो.

जाणकारांनी अधिक खुलासा करावा...

आपला,
(केवळ प्राथमिक ज्ञान असलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

स्लायडिंग

आईस स्लायडिंग हा ही अजून एक अतिमजेशीर प्रकार. पोटाखाली/छातीखाली एक फळकुट घ्यायचं आणि मग द्यायचं सोडून स्वतःला उतारावरून!!!! इथे तर बॅलन्सिंगचा पण प्रश्न नाही :)) आपण झोपुन फक्त स्लाईड व्हायचं.
-(स्लायडर) ऋषिकेश

माहिती आवडली - स्केटींग/ आईस स्केटींग

सचित्र लेखमाला आवडली. स्कीइंगला जायची इच्छा होती पण योग येत नव्हता, आता प्रयत्न केला पाहिजे. (गेल्यावेळेस एका मैत्रिणीने काय पडलो माहित्ये? दोन दिवस अंग दुखत होतं सांगितल्याने आम्ही प्रयोग टाळला होता.)

स्केटींग किंवा रोलर स्केटींग हे जमिनीवर, रस्त्यावर बुटाला चाके लावून आणि आईस स्केटींग हे बुटाला रोलर ब्लेड्स लावून केले जाते. आमच्या कन्येला दोन्ही बर्‍यापैकी येते त्यामुळे अनुभवाने दोहोंत साम्य केवळ तोल सांभाळायचे असते आणि भास्कर यांनी सांगितलेलं इंग्रजी वी चे अक्षर अत्यंत उपयोगी. यानंतर आईस स्केटींगमध्ये गिरक्या घेणे, फिशेस काढणे (मत्स्याकारात स्केट करणे) वगैरे वगैरे वेगवेगळे प्रकार असतात.

लेखन आवडते हो !!!

भास्करराव,
अरे तुमचा घसरगुंडीचा लेख आम्हाला तरी माहितीपूर्ण वाटला आणि आवडला. आता तुम्हीच सांगा आपला मराठवाडा हे असा, जीथे पाणीच नाही तर बर्फ वगैरे फार दूरची गोष्ट :) चित्रपटात पाहतांना बरं वाटतं, आईस स्केटींग,स्कीज, पोल, ते बूट, ही सर्व माहिती आमच्यासाठी अद्भूत आहे. तेव्हा पहिला वाचक असतांनाही प्रतिक्रिया देऊ शकलो नाही. बरे आवडले, मस्त, लै भारी, हे शब्द वापरून वापरुन त्याचा पार चोथा झालाय. त्या शब्दातला भावही लेखकापर्यंत पोहचत नाही. आणि प्रतिक्रिया आल्या नाहीत, येत नाहीत म्हणुन आपल्या लेखनाला मुरड घालू नये असे वाटते. आपण लिहित राहा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर