घसरगुंडीची शाळा - १

ही skiing काय भानगड आहे या उत्सुकतेपोटी मित्रांसोबत आम्ही जवळच्याच Mount Southington या घसरकेंद्राकडे (स्की-केंद्र) निघालो. सगळेच नवे. पण मित्रांचे अनुभव ऐकून होतो. सगळेच जण हाताला, पायाला वा एखाद्या सांध्याला ईजा घेऊन परत आलेले होते. तेव्हा आपल्याला सुद्धा ईजा झाली तरी कामावर जास्त खंड पडू नये म्हणून सुटीतला पहिला दिवस पकडून निघालो होतो. एक नवीन अनुभव घेणे व जखमी न होता घरी परतने हे घ्येय ठरवून तेथे पोचलो.

आरे बापरे! स्कीचे बूट आहेत की दगड! पाय घोट्यातून अजिबात हलवता येत नव्हता...

स्की सुद्धा चांगल्याच जड होत्या.

चला शाळा सुरु झाली एकदाची. दोन शिक्षक, त्यातली एक स्त्री. खरच येथे सगळ्या क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीत आहेत बा. (पण आपले काय) ... असो.

आम्ही हे घडे शिकलो...
१. बुटात उभे राहिल्यावर गुढघ्यात वाकायला हवे. असे वाकल्यावर नडगीवर भार यायला हवा. नडगीवर भार येत नसेल तर बुट आणखी घट्ट करावा.
२. हातातल्या छाड्या/काठ्या (पोल) पकडताना दोरी/पट्टा आतल्या बाजूने मुठीत आलेला असावा. आंगठा व चाफेकळीच्या मधून हा पट्टा गेलेला असल्यास आंगठा दुखावू शकतो/उपटला जाऊ शकतो.
३. या छड्यांचा उपयोग केवळ तोल राखण्यासाठी करण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता वाटत नसेल तर या न वापरल्यासही चालेल.
४. स्थिर उभे रहायचे असेल चढ-उतार हे डाव्या उजव्या बाजूला यावेत. चढ-उतार हे समोर वा पाठमोरे आल्यास तुम्ही घसरु लागता. तसेच कधीही टेकडीकडे तोंड करुन उताराकडे पाठमोरे उभे राहू नका. पाठमोर्या दिशेने
५. स्कीची रुंद बाजू जमीनीला कोणात ठेवावी जेणेकरुन त्याची कडा बर्फात रुतून बसेल.
६. उतारावरून स्की समांतर ठेवल्याने गती वाढते. गती कमी करायची झाल्यास पायांतील आंतर वाढवून स्कींना इंग्रजी उलटे V असे पकडावे.

हे धडे प्रत्यक्षात आणताना मात्रा आम्ही असे पडत होतो...

दोराला पकडून असे छोट्या टेकडीवर जाऊन हळू हळू सुरुवात केली. टेकडीवर पोचल्यावर मुख्य प्रश्न असायचा तो चढ-उतार हे डाव्या उजव्या बाजूला यावेत म्हणून बाजूला वळण्याचा. हे करताना आम्ही बहुतेक वेळा पडत होतो.

पण आता थोडे-थोडे जमायला लागले होते.

तितक्यात आमच्या एका मित्राने मोठ्या टेकडीवरुन जाऊन येण्याचा प्रयत्न केला. अपेक्षेप्रमाणे चार वेळा चांगला आपटला होता तो. मी मात्र ठरवल्या प्रमाणे पाया पक्का झाल्या शिवाय घाई करायची नाही हे ठरवले होते.

चार तास प्रयत्न केल्यावर आता मी त्या छोट्या टेकडीवरुन न पडता खाली येत होतो.
पहिल्या दिवशीची घसरगुंडी पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.

टीप - ही लेखमाला मी अनुदिनीवर लिहायच्या बेतात होतो (वैयक्तिक असल्याने). पण जर अक्षेपार्ह नसेल व कोणा नवशिक्याला/वाचकाला हवे असेल तर हे अनुभव येथे उपक्रमवर लिहायला आवडतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा

चांगले आहेत हे अनुभव.
ललीत नाही म्हणता येणार पण माहितीपूर्ण नक्कीच आहेत असे वाटते.

अजून माहिती वाचायला आवडेल जसे पुरातन स्की चे प्रकार, यातले खेळातले बिनिचे खेळाडू, मुख्य स्पर्धा, बक्षिसे,
कोणत्या देशातून याची सुरुवात झाली,
या साहित्याची किम्मत, काय सावधानी बाळगावी, कपडे कोणते घालावेत
इत्यादी...

माहिती

निनादराव,

आपण सुचविल्याप्रमाणे पुढील लेखापासून माहिती द्यायला सुरु करीन. सध्या सामान खरेदी सुरु असल्याने माहिती काढत आहे.

छान सुचना केल्याबद्दल आभार!

आपला,
(घसरगुंडीतला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

:)

मस्त.. मजा आली विडियो पाहून. येऊ देत पुढचे लेख. निनाद म्हणतात त्याप्रकारे माहिती बरोबर दिलेत तर् पूर्ण ललित होणार नाहित

आपली सूचना

आपली सूचना शिरसावंद्य!

पुढील लेखासाठी माहितीची जुळवाजुळव चालू आहे.

आपला,
(शिकाऊ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

लई भारी

भास्करराव, त्या व्हिडिओ मध्ये आपाटलेले म्हन्जे तुमीच वाटताय. लई भारी बर्फ हाय. काडीवं गोळा घेउन त्येच्यावं साखरेच लाल रंगाच पानी टाकावं आन गारिगार म्हनून खाव.
( गारिगार मधे मीठ टाकल कि अळ्या बाहेर पडतात अशी भिती लहानपणी घातला गेलेला)
प्रकाश घाटपांडे

तो मी नव्हेच

आहो घाटपांडे साहेब, स्वतः आपतल्याचा व्हिडीओ कोण कसा देईल? ;)

त्या विडीओ मध्ये एकच तर माणूस घसरताना दिसतो आहे. आणि तोच मी. :)

आपला,
(घसरगुंडीतला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

भारीच!

आम्ही सपाट राज्यात राहात असल्याने हा खेळ अद्याप अनुभवलेला नाही. म्हणजे राज्याच्या दक्षिणेला काही टेकाडांवर असे खेळ खेळता येतात असे ऐकून आहे पण आम्हाला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही.

असो. सध्या म्हणजे आज बाहेर १ अंश फॅ. तापमान आहे तेव्हा घरात चूपचाप दडून राहिलेलं बरं असं वाटतंय पण तुमचे फोटो पाहून मजा वाटली. या खेळावर माहिती दिलीत तर ते ललित लेखन नक्कीच होणार नाही.

मजेदार खेळ

प्रियाली ताई,

खेळ मजेदार आहे. मला आजून पर्यंत तरी काही दुखापत झालेली नाही तसेच आता चांगली गती मिळत आहे. आपण सुद्धा एकदा जाऊन पहाच. मजेदार खेळ आहे.

आपला,
(चकटफू सल्लागार) भास्कर
आम्ही येथे वसतो.

उपक्रमराव

मूळ लेखाच्या नावात इंग्रजी अक्षर होते. मात्र तसे येथे चालत नसल्याने शेवटी नाव बदलले. घाईत टंकलेखनातली चूक लक्षात आली नाही. कृपया "घसरघुंडीची" ऐवजी "घसरगुंडीची " असा बदल कराल का?

धन्यवाद!
भास्कर!
आम्ही येथे वसतो.

 
^ वर