श्लोक

शिवाकान्त शम्भो शशाङ्कार्धमौले
महेशान् शुलिन् जटाजूटधारिन् ।
त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप्
प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप ॥

शिवाकान्त म्हणजे पार्वतीचा पती,
शंभो... शं म्हणजे कल्याण करणारा,
शशांक अर्ध मौले म्हणजे अर्ध चंद्र धारण करणारा (डोक्यावर),
सत्तधीश राजांचा अधिपती अर्थात् महेश (महान ईश देवाधिदेव)
शुलिन् म्हणजे त्रिशूळ धारण केलेले (हातात धरलेले),
त्वमेको (त्वम् एक:) तूच (तुम्हीच )एक (एकटे)
जगद्व्यापको (जगत् व्यापकः ) म्हणजे जगाला व्यापून राहिलेले

अर्थात
हे पार्वतीपते शंकरा, शंभो (शं म्हणजे कल्याण), मस्तकावर चन्द्रकोर धारण करणारे, थोर सत्तधीश लोकपालांचेही अधिपति, हातात त्रिशूळ असलेले, मस्तकावर जटांचा भार धारण केलेले, एकमात्र तुम्हीच जागाला व्यापून असलेले, विश्वरूपाने सजलेल्या हे पुर्णरूप प्रभो, तुम्ही प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा.

स्त्रोत:- प्रार्थना प्रीती

लेखनविषय: दुवे:

Comments

आवडले...

हा श्लोकांचा उपक्रम आवडला.
असेच छान छान श्लोक येऊ द्यात.

नीलकांत

एक खट्याळ सुभाषित

भार्तुहरीचे आहे असं ऐकलय ते असे -

आशानां मनुष्यानां काचिद् आश्चर्य शृंखला |
बध्दा यया प्रधावंती, मुक्तास तिष्ठंति पंगुवत् ||

अर्थ सोपाच आहे, पण तरीही लिहीतो - आशा अशी जादूची शृंखला आहे, कि ज्याला बांधलीये तो पळत रहातो , आणि जो मुक्त आहे तो पांगळ्याप्रमाणे पडून रहातो !

आशा पारेख

हो, आणि ती अजिबात आवडत नसल्यामुळे सतत पळत रहाणं सहाजिकच आहे!

धन्यवाद

सुधारणांसाठी धन्यवाद्. अर्थातच मी शाळेत संस्कृत शिकलो नाही हे उघड झालं असेलच (अगदी पन्नास मार्कांचं पण नाही). तसं मराठीही शिकलो नाही, पण आता ते जमायला लागलं आहे

मराठी समसुभाषित (स्वरचित)

श्री.टग्या यांनी केलेल्या सर्व सुधारणा योग्य आहेत.त्यांनी लिहिलेले सुभाषित बहुतांशी शुद्ध आहे.( 'बद्धा' असा शब्द हवा.'बध्दा' नव्हे. 'द्' आधी, नंतर 'ध्'. असो.याला फारसे महत्त्व नाही.)

या सुभाषिताचे मराठीकरण असे:

आशा नामे मनुजा बेडी अहो काय आश्चर्य |
बद्ध धावती सैरावैरा मुक्‍ता लाभे स्थैर्य||

मराठी समसुभाषित

"स्थैर्य" नाही पटले बुवा. "पंगुवत्" म्हणून सुभाषितकाराला नैराश्याचे पांगळेपण दाखवायचे आहे. "स्थैर्य" चा अर्थ बहुधा इष्ट स्थिती असा असतो.

तरी छानच.

अशीच काही...

मला संस्कृत लिहीता येत नाही, मात्र काही सुभाषीत आठवतात.

१) असारे खलु संसारे सारं शश्रुर मंदीरं - या जगात सासर्‍याचे घर सर्वात आनंददायी रहिवास आहे. शंकर हिमालयात आणि विष्णू समुद्रात राहतात.
२) भोजनान्तेच कीं पेयं.. तक्र शक्रस्य दुर्लभं.. हे एक कोडं आहे.
३)अश्व नैव , गज नैव.. - बल हेच जीवन सांगणारं एक् उत्तम सुभाषीत.
४) नाभिषको न संस्कारः ... स्वयमेव मृगेन्द्रता |
५)लालयते पंच वर्षाणी..
६)यस्य नास्ती स्वयं प्रज्ञा ..

अशी अनेक आहेत कुणाजवळ असतील तर येथे द्यावी ही विनंती.

नीलकांत

अश्वं नैव ...


अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैवच नैवच
अजापुत्रा बलीं दद्यात दैवो दुर्बल घातक:

अर्थ स्पष्टच आहे. घोडा, हत्ती, वाघ यांना बळी कसे देणार (बलवानाला बळी कसे देणार?)
तर बोकडाला बळी देतात (तो दुर्बळ आहे) कारण दैव हेच (मुळात) दुर्बळांचा नाश करते.

श्लोकात शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या चुका असल्यास कृपया सांगाव्यात. मी पुन्हा संपादन करीन.
--लिखाळ.

सुधारणा

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैवच नैवच
अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातक:

नाभिषेको न...स्वयमेव मृगेंद्रता

नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने
विक्रमार्जीत सत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता

कोणी मोठेपणाचे संस्कार न करता सुद्धा सिंह वनामध्ये फिरतो.
स्वतःच्या पराक्रमामुळे तो स्वभावतःच मृगेंद्र (पशुंचा राजा) बनतो.

श्लोकात शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या, अर्थाच्या चुका असल्यास कृपया सांगाव्यात. मी पुन्हा संपादन करीन.
--लिखाळ.

लालयेत..

लालयेत पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत
प्राप्तेतु शोडशे वर्षे पुत्रे मित्र वदाचरेत

अर्थात, पाच वर्षे वयापर्यंत मुलाचे लाड करावेत, दहाव्या वर्षा पर्यंत शिस्त लावावी (मार द्यावा) इ.
सोळावे वर्ष लागताच मात्र मुलाशी (पित्याने) मित्रासारखा (बरोबरीच्या नात्याने) व्यवहार करावा.

श्लोकात शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या, अर्थाच्या चुका असल्यास कृपया सांगाव्यात. मी पुन्हा संपादन करीन.
--लिखाळ.

सुधारणा

लालयेत् पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत्
प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत्

मित्रवदाचरेत् = मित्रवत् आचरेत्

काही सुधारणा

**श्लोक शब्दाचा अर्थ "स्तवन, स्तुतिगीत, प्रशंसापद ' असा होतो. या लेखाच्या प्रारंभी जी रचना आहे तो 'श्लोक' म्हणता येईल कारण त्यात शिवस्तुती आहे. इतर रचनांना 'सुभाषित' म्हणणे योग्य.
*** श्री. लिखाळांनी दिलेले सुभाषित शुद्ध स्वरूपात असे हवे :

लालयेत् पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् |
प्राप्‍तेतु षोडशेवर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ||

(मित्रवदाचरेत् = मित्रवत् +आचरेत् असा संधी आहे.)

****श्री.लिखाळांच्या चुका अगदी नगण्य आहेत.त्यानी एका सुभाषिताची भर घातली हे महत्त्वाचे.

आभार

श्री. यनावाला,
सुभाषितांच्या सुधारणांसाठी आभार.
--लिखाळ.

पूर्ण सुभाषिते

नीलकान्तजी तुम्हाला हवी असलेली सुभाषिते :

१) भोजनान्ते च किं पेयं जयन्तः कस्य वै सुतः|
कथं विष्णुपदं प्रोक्‍तं तक्रं शक्रस्य दुर्लभम्||

२)असारे खलु संसारे सारं श्वशुरमंदिरम् |
क्षीराब्धौ च हरि: शेते हरः शेते हिमालये||

३)यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम्|
लोचनाभ्यां विहीनस्य दर्पणः किं करिष्यति||

रामायणातील अप्सरांचा उल्लेख

घृताचीम् अथ विश्वाचीम् मिश्र केशीम् अलम्बुसाम् ।
नागदन्तां च हेमा च हिमामद्रिकृतस्थलाम् ॥

अयोध्याकांडातील या श्लोकांत भारद्वाज मुनीनी केलेल्या भरताच्या आदर सत्कारात घृताची, विश्वाची, मिश्रकेशी, अलम्बुसा, नागदंता, हेमा व हिमा या अप्सरांना पाचारण केल्याचा उल्लेख येतो. या सर्व नृत्य, गायन व वादन कलांत निपुण होत्या आणि त्यांनी भरत व अयोध्येच्या सेनेला रिझवण्यासाठी नृत्य-गायन केल्याचा उल्लेखही नंतरच्या श्लोकांतून येतो.

स्त्रोत: http://vmoti.blogspot.com/

पल्लवी

पल्लवीताई

आपण माझ्याच अनुदिनीवरून उचलून हा श्लोक दिलात. तक्रार नाही हं! मूळ स्रोत दिल्याबद्दल आपली आभारी आहे फक्त एवढेच की उपक्रमावरही हा लेख 'अप्सरा' या नावानिशी हजर आहे. :)

चंदनं शितलं

चंदनं शितलं लोके चंदनादपि चंद्रमा:
चंद्रचंदनयोर्मध्ये शितला साधूसंगती

अर्थात, सर्व जगात (लोके) चंदन शितळ आहे. तर चंद्र (प्रकाश) हा चंदनापेक्षाही शितळ मानतात.
तर चंद्र आणि चंदन यापेक्षाही साधूसंगती ही सर्वात शितळ (तापहरण करणारी, मनाला शांती देणारी) आहे.

श्लोकात शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या, अर्थाच्या चुका असल्यास कृपया सांगाव्यात. मी पुन्हा संपादन करीन.
--लिखाळ.

सुधारणा

चंदनं शीतलं लोके चंदनादपि चंद्रमा
चंद्रचंदनयोर्मध्ये शीतला साधूसंगति

संस्कृत सुभाषित

श्री.लिखाळ यांनी लिहिलेल्या (म्हणजे दिलेल्या) सुभाषितात 'शीतल ' शब्द दोनदां ह्रस्व पडला आहे आणि 'संगति:' हा शब्द 'संगती' असा लिहिला गेला आहे.अन्य सर्व शब्द व्याकरण दृष्ट्या निर्दोष आहेत. 'चन्द्रमस्' हा हलन्त शब्द 'चन्द्रमा: चन्द्रमसौ चन्द्रमसः --प्रथमा ' असा चालतो.त्याचे प्रथमेचे एकवचन 'चन्द्रमा:' हेच योग्य आहे.
सुभाषिताचे शुद्ध रूप पुढील प्रमाणे:

चन्दनं शीतलम् लोके चन्दनादपि चन्द्रमा: |
चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगति:||

वरदताई

वरदताई,
चुका सुधारल्या बद्दल आभार. (आपले प्रतिसाद त्या त्या सुभाषिताला असल्याने आता मी ते संपादित करु शकणार नाही.) तरी मला समजून घ्यावे.
९४ साला नंतर प्रथमच सुभाषिते आठवून लिहिली त्यामुळे त्यात अनेक चुका होणार असे वाटतच होते.
आभारी,
--लिखाळ.

आणखी एक

यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वमविवेकीता
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्

अर्थ: तारूण्य,धनसंपत्ती, सत्ता आणि अविवेकी वर्तणूक यातली एकेक गोष्ट अनर्थाला कारणीभूत होऊ शकते.मग चारही गोष्टी जिथे एकत्र असतील तिथे काय (होईल याची कल्पना करवत नाही).

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

आवडलं

विषेशतः स्वतः क्लिंटन साहेबांकडून आलेलं पाहून अजुनच आवडलं!

तात्या खूप छान बोललात...

तात्या ,
झकास बोललात हो ..!

नीलकांत

अर्जुन म्हणतो

अर्जुन म्हणतो

नाहं कामये राज्यं ना स्वर्गं नापुनर्भवम्
कामये दु:खतप्तानाम् प्राणिनार्तिनाशनम्

मला राज्य नको, स्वर्ग नको आणि मोक्ष सुध्दा नको. दु:खाने पिडीत असलेल्या प्राणीमात्रांच्या वेदना नाहीशा कराव्यात एवढीच माझी इच्छा आहे.

(मला ज्या पध्दतीने आठवत आहे तसा श्लोक लिहिला आहे.शाळेत असताना एका चुकेसाठी अर्धा मार्क जायचा.आता मार्क जाणार नसल्यामुळे जसा आठवला तसा श्लोक लिहिला आहे.चूक असल्यास सुधारावी ही विनंती)

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

असा

नत्वहं कामये राज्यं न स्वर्गं ना पुनर्भवम्
कामये दु:खतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम्

प्राणिनामार्तिनाशनम् = प्राणिनाम् आर्ति नाशनम्
आर्ति = वेदना

न अपुनर्भवम्?

वरदाताई,
क्लिंटन यांनी "नापुनर्भवम्" लिहिले आहे व आपण "ना पुनर्भवम्".
मला वाटते की क्लिंटन यांचे "नापुनर्भवम्" (न अपुनर्भवम्) हेच बरोबर असावे.
कोणकोणत्या गोष्टींची इच्छा केली जाते त्यांची यादी आधी देऊन मला त्यांची इच्छा नाही असे कवी सांगत आहे. या पार्श्वभूमीवर "ना पुनर्भवम्" - नराचे पुन्हा जन्माला येणे यात इच्छा करावे असे काही दिसत नाही, त्याऐवजी "नापुनर्भवम्" यातील पुन्हा जन्माला न येणे (म्हणजे मोक्ष) हे मला अधिक सयुक्तिक वाटते (ज्याची या ठिकाणी कवि इच्छा करीत नाही).
ऐकताना या दोन्हीतील फरक समजत नाही, त्यामुळे मुळात वाचायला मिळाल्याशिवाय निर्णय होणे कठीण आहे.
- दिगम्भा

धन्यवाद...

यनावाला यांना धन्यवाद !
मला हवी ती सुभाषीते दिल्याबद्दल धन्यवाद .

नीलकांत

काळे-पांढरे

जिम कॅरीच्या कुठल्याश्या चित्रपटात तो म्हणतो "ब्युटी इज ओनली स्किन डीप ऍण्ड ओनली अग्ली पीपल् से इट्" (मी जिम् कॅरीची फ्यान नसल्याने चित्रपटाचे नाव लक्षात ठेवण्याच्या भानगडीत पडले नाही.) मात्र हे वाक्य ऐकले की खालील सुभाषित आणि ह्या सुभाषिताची आठवण झाली की वरील वाक्य मला हमखास आठवते. तपकिरी (ग्रे) लक्षात न घेता काळे-पांढरे पाहण्याची वृत्ती भारतीयांमध्ये पूर्वीपासूनच असावी असे दिसते!!

नारिकेल समाकारा: दृष्यन्ते अपिहि सज्जना:
अन्ये बदरिकाकारा: बहिरेव मनोहरा: ||

सज्जन भले नारळाप्रमाणे (नारळाच्या आकाराप्रमाणे, थोडक्यात बेढब वा बाहेरून खडबडीत, थोडक्यात कुरूप) दिसत असले तरी इतर बोराप्रमाणे केवळ बाहेरूनच (केवळ दर्शनी रूपच) सुंदर असतात. एकदा स्तुती करायची ठरवली की मग ती कशाचीची करायची आणि एकदा नावे ठेवायची ठरवली की कशालाही ठेवायची असा खाक्या मला ह्यात दिसतो. असो.

वा वा!

इथे लोकांनी सुभाषितांची बहारच उडवून दिली आहे की ! वाचून मन अत्यंत प्रसन्न झाले.जुन्या मित्रपरिवारापैकी अनेक जण भेटले तसेच संस्कृतप्रेमी नवीन लोकही ! त्यामुळे संस्कृत भाषेला उज्ज्वल भवितव्य आहे याबद्दलचा विश्वास वाढला.

प्रवासी आलेत?

अरे वा ! प्रवासी आलेत. छान !!!

ततः किं ततः किं ततः किं ततः किं

शुक-रंभा संवादात शुक म्हणतात:
सुरूपं शरीरं नवीनं कलत्रं धनं मेरूतुल्यं वचश्र्चारू चित्रम् ।
हरेरंडिघ्रयुग्मे मनश्र्चेदलग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं ॥

सुंदर शरिरसंपदा, सुंदर भार्या, मेरु पर्वताएवढे धन, मनाला भुरळ घालणारी मधुर वाणी असेल पण जर भगवान शंकराच्या चरणी मन एकाग्र होत नसेल त्या जीवाचा त्रिवार धिक्कार असो.

स्त्रोत:- विकिपीडिया

संस्क्रृत सुभाषिते

हा विषय मागे पडलेला दिसतो.सुभाषितांचा केवळ आशय समजून घ्यायचा असेल तर त्याचा सर्वसाधारण गोळा बेरीज अर्थ देणे ठीक आहे. पण संस्कृतभाषा थोडी शिकायची असेल तर सुभाषिताचा पदच्छेद ,अन्वय,आणि नेमका शब्दार्थ देणे उपयुक्त ठरेल.त्याचे उदाहरण म्हणून एक सुभाषित देण्याचा हा प्रयत्न आहे.

किं वाससः तत्र विचारणीयम् |
वासो विहीनं विजहाति लक्ष्मी:
पीतांबरं वीक्ष्य ददौ स्वकन्याम् |
दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ||

अन्वय ....................... अर्थ

वाससः किम्.......................कपड्यांचे एवढे काय?(महत्त्व आहे )
तत्र विचारणीयम्...................त्याविषयी विचार करायला हवा.
वासः विहीनम् लक्ष्मी: विजहाति.....ज्याच्याजवळ (चांगले) कपडे नसतात त्याला लक्ष्मी सोडून जाते.
पीताम्बरम् वीक्ष्य..................पीतांबरधारी विष्णूला पाहून
समुद्रः (तम्) स्वकन्याम् ददौ.......समुद्राने त्याला आपली कन्या दिली.
दिगम्बरम् वीक्ष्य ...............दिगंबर अवस्थेतील शंकराला पाहून
(समुद्रः तम्) विषम् (ददौ)......समुद्राने त्याला विष दिले.
(येथे सागरमंथनाचा संदर्भ आहे)

योग्य

"पण संस्कृतभाषा थोडी शिकायची असेल तर सुभाषिताचा पदच्छेद ,अन्वय,आणि नेमका शब्दार्थ देणे उपयुक्त ठरेल."

हे आपले म्हणणे अगदी योग्य आहे. आपण दिलेले सुभाषितही अतिशय व्यावहारिक आहे.

- अमृतांशु

ज्योतिषी आणि गणिका

ज्योतिषी पंचांगातील् पाच अंगे दाखवून जातकाला झुलवतो तर गणिका आपल्या शरीराची पाच अंगे दाखवून गिर-हाइकाला झुलवते अशा आशयाचे चावट सुभाषित मी वाचले होते . कुणाला माहीत आहे का?

कराग्रे वसते

कराग्रे वसते लक्ष्मी:
करमूले सरस्वती ।
करमध्ये तु गोविंद:
प्रभाते करदर्शनम्।।

शब्दार्थ
कराग्रे = कर + अग्रे = हाताच्या टोकावर (बोटांच्या टोकावर)
वसते = वास करते
करमूले = हाताचे मूळ (मूळाशी)
करमध्ये: = कर + मध्य (तळवा)
करदर्शनम =हाताचे दर्शन

अर्थात

हाताच्या अग्रभागावर लक्ष्मी , मूळभागावर सरस्वती आणि मध्यभागावर गोविंदाचे वास्तव आहे , (म्हणून) सकाळी आपल्या हातांचे दर्शन घ्यावे.

पल्लवी

जगन्नथाश्टकम्

हरत्वम् संसारम् द्रुततरमसारम् सुरपते
हरत्वम् पापानाम् विततिमपराम् यादवपते
अहो दीनानाथम् निहितमचलम् निश्चितपदम्
जगन्नथस्वामी नयनपथगामी भवतुमे

अर्थही सांगा..

अनिरुद्धशेठ,

आम्हाला संस्कृत भाषा समजत नाही. कृपया आपण दिलेल्या ओळींचा अर्थही अवश्य सांगावा.

तात्या.

जगन्नाथ स्तोत्राचा मला समजलेला अर्थ

हरत्वम् संसारम् द्रुततरमसारम् सुरपते
हरत्वम् पापानाम् विततिमपराम् यादवपते
अहो दीनानाथम् निहितमचलम् निश्चितपदम्
जगन्नथस्वामी नयनपथगामी भवतुमे

हरत्वम् - हर् त्वम् - हर् हरण करणे (येथे दुर करणे)
त्वम् - तू
संसारम् - संसारात
द्रुततरमसारम् -
सुरपते - देवांचा अधिपती
पापानाम् - पापांचा
विततिमपराम -
यादवपते - यादवांचा अधिपती
निहितमचलम् - सदैव अचल
निश्चितपदम - अढळ पदी असलेला / स्थिर असलेला
नयनपथगामी - मार्गदर्शक
भवतुमे - माझा हो
(नयनपथगामी भवतुमे - माझा मार्गदर्शक हो.)

हे देवांच्या अधिपती, तू माझ्या जीवनातील वाईट गोष्टी दुर कर (? साशंक आहे). मी केलेली (अनंत) पापं हे यादवपते तू त्यांचं हरण कर. हे स्थिर व अढळ दीनानाथा तू (माझ्या जीवनातील माझ्या वाटचालीचा) माझा मार्गदर्शक हो.

माझ्या संस्कृतच्या तोकड्या ज्ञानावरून व तुटपुंज्या माहिती वरून मी हा अर्थ काढला आहे. हा अर्थ बरोबर असेलच असा माझा दावा नाही. श्रेष्ठींनी चुका दुरुस्ती करावी ही विनंती.

पल्लवी

 
^ वर