धगधगता पश्चिम बंगाल आणि मार्स्कवादी

(स्थलमाहात्म्याप्रमाणे येथील थॅंक्सगिव्हींगच्या सणासाठी बाहेर असल्याने या चर्चेतील प्रतिसादास उत्तर देण्यास वेळ लागल्यास कृपया गैरसमज करून घेऊ नये.)

खालील बातमी वाचताना, तीच जर "उजव्या" म्हणजे अर्थातच भाजपप्रणित सत्ताधारी/कार्यकर्त्यांच्या बाबतीत असती, तर त्याचा उपक्रमावरील कॉम्रेड्स आणि इतरत्र स्वतःस बुद्धीवादी म्हणवून घेणारे विचारवंत, तत्वज्ञ आणि अर्थातच प्रसिद्धी माध्यमाने कसे गळे काढले असते याचा विचार येतो. पण आता इंग्रजी माध्यमे पहा, पेज तथ्री न्यूज् करून सारे कसे शांत शांत म्हणत बसलेत.

सामान्यांवरची आणि एकंदरीतच कुठलीही हिंसा (एक कायद्याने केलेला काय्देशीर प्रतिकार सोडता) कायदा हातात घेऊन कोणीही केली तरी ती निषिद्धच पण भारतात या बाबतीत पण कम्यूनिस्टांचे तत्वच चालते, " All are equal but some are more equal".

आपणास काय वाटते?

नंदीग्राम

काझीचे घर जाळले. उभे पीकही पेटवण्यात आले... अचानक झालेल्या हल्ल्यानंतर फजलूची तीन मुले घरी परतली नाहीत... कृष्णाच्या डोळ्यासमोर तिच्या पतीला घराबाहेर काढून गोळ्या घालून ठार केले... बसुदेवलाही घेरून गोळ्या घालण्यात आल्या... शेतजमीन वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांवर माकप कार्यर्कत्यांनी केलेल्या अत्याचाराच्या या काही कहाण्या. आतापर्यंत माकपचा वेढा पडलेल्या नंदीग्राममध्ये केंदीय राखीव पोलिस दल पोहोचले आणि या कहाण्यांना तोंड फुटले.

शेतकऱ्यांनी भूमी उच्छेद प्रतिरोध समितीच्या झेंड्याखाली येत आंदोलन उभे केले. नंदीग्राममध्ये जवान तैनात झाल्यानंतर माकपचे अत्याचार समोर आले.

एस. के. हाजी यांचे घर जाळण्यात आले. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी वाट फुटेल तिथे पळत सुटलेले त्यांची पत्नी व दोन मुले अजूनही घरी परतलेले नाहीत. दुसरे उदाहरण फजलू शेखचे. त्यांचीही तीन मुले गायब आहेत. कृष्णा माझी यांच्या डोळ्यांत माकप कार्यर्कत्यांविरोधात संताप दिसतो. कृष्णांसमोर पतीला गोळ्या झाडून ठार करण्यात आले. मुलीसह पळ काढल्यानेच त्या बचावल्या. बसुदेव मंडल यांच्या पोटात गोळ्या झाडण्यात आल्या. १० ऑक्टोबरपासून ते जीव वाचवण्यासाठी सतत धावत आहेत... नंदीग्राममधील माकपच्या 'कम्युनिझम'ची अशी अनेक उदाहरणे अजूनही वेशीबाहेर येऊ शकलेली नाहीत. (वृत्तसंस्था)

Comments

दैनिक सकाळ अग्रलेख दि.१७ नोव्हे २००७

दुटप्पी मार्क्‍सवादी

नंदीग्राममधील घटनांमुळे डाव्या पक्षांचा, विशेषतः मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उग्र, दहशतवादी चेहरा जनतेसमोर येऊ लागल्याने न्याय व नैतिक व्यवहाराचे उपदेशामृत वारंवार सर्वांना पाजणारे डावे नेते अडचणीत सापडले आहेत. नंदीग्राममध्ये स्टॅलिनशाही सुरू आहे, असे म्हटले तरी चालेल. या दडपशाहीचे उघड समर्थन करण्याचा निर्ढावलेपणा बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यानेही दाखवावा याचे आश्‍चर्य वाटते. बुद्धदेव हे सभ्य, सुसंस्कृत व व्यवहारी विचार करणारे मुख्यमंत्री असावेत असा समज होता; मात्र आम्ही जशास तसे उत्तर दिले, या वक्तव्यातून त्यांनी आपला लाल चेहरा दाखविला. नरेंद्र मोदी यांचे गोधरानंतरचे विधान व बुद्धदेव भट्टाचार्य यांचे वक्तव्य यात फरक काय, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडेल; पण डाव्यांकडे त्याचे बौद्धिक प्रत्युत्तर तयार आहे. "गुजरातमधील जातीय कत्तलीला सरकारचे अभय होते', असे सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे. मार्क्‍सवादी पक्षाच्या गुंडांना नंदीग्राममध्ये पोलिसांकडून मिळणारे अभय हे सरकारी नव्हे, असे येचुरी यांचे मत असावे. सरकारी अभय असल्यामुळे गुजरातचा विषय हा राष्ट्रीय होतो, तर नंदीग्राम हा स्थानिक विषय असल्याने त्याची संसदेत चर्चा होऊ द्यायची नाही, असा निश्‍चय डाव्या आघाडीने केला आहे. गुजरातमधील दंगलीबाबत तहलकाच्या "स्टिंग ऑपरेशन'वर मात्र पक्ष चर्चेची मागणी करणार आहे. पारदर्शी कारभाराची मागणी करणाऱ्यांना स्वतःच्या हिंसक कारभारावर चर्चा केलेली खपत नाही. "काही जण अधिक समान असतात', या ऑर्वेलच्या उक्तीप्रमाणे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट संसदेत स्वतःला अधिक समान मानतात. नंदीग्राममध्ये महिलांवर अत्याचार झाले. अनेकांना घरातून हुसकाविण्यात आले. देशातील कुठेही दंगा झाला की गळा काढणाऱ्या डाव्यांनी नंदीग्राममध
्ये प्रसारमाध्यमांनाही जाऊ दिले नाही. माहिती मिळविण्याच्या जनतेच्या अधिकारालाच नंदीग्राम परिसरात डाव्यांनी ग्रहण लावले, तरीही त्याविरोधात प्रसारमाध्यमांतील डाव्यांच्या शागिर्दांनी देशभरात निदर्शने केली नाहीत. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी हा अधिक चिंतेचा विषय आहे. या सर्वांची निकोप चर्चा संसदेत होणे अत्यावश्‍यक ठरते. विरोधकांच्या आक्षेपांना प्रत्युत्तर देण्याची संधी या चर्चेतून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळेल; पण पक्षाकडे प्रत्युत्तर नसल्याने हा प्रश्‍न स्थानिक असल्याचा बहाणा करून मार्क्‍सवादी पक्ष आपले क्रौर्य झाकत आहे. चर्चा टाळण्यासाठी पक्षाने दाखविलेला नियम बरोबर असला, तरी यापूर्वी अनेकदा स्थानिक प्रश्‍नांवर संसदेत चर्चा झाल्या आहेत. परराष्ट्रांशी करार करताना संसदेला विश्‍वासात घेण्याची गरज नाही, हा नियम असल्यानेच पंतप्रधानांनी परस्पर अमेरिकेशी करार केला, तरीही मार्क्‍सवादी पक्षाने त्यावर आक्षेप घेऊन सरकारसमोर पेच उभा केला. अणुकराराबाबत नियम मोडायचा आणि नंदीग्रामबाबत नियमाचा आग्रह धरायचा, असा हा डाव्यांचा दुटप्पी व्यवहार आहे. अर्थात, इतिहासात त्यांनी अनेकदा असे व्यवहार केले असल्याने त्याबद्दल आश्‍चर्य वाटायला नको.

प्रकाश घाटपांडे

आम्ही सारेच सज्जन!

डावे, उजवे काहीही म्हणोत स्वतःला, पण सगळे एकाच माळेचे मणी. सत्तेचे लालची व पैशाचे गुलाम.

डाव्यांच्या मक्केत म्हणजे सध्याच्या चीनमधे हे असे झालेले आहे. कित्ता गिरवला इतकेच.

नोटिसा, चांगले पुर्नवसन, अटकसत्र, अश्रुधुर, बेशुद्ध करणारे वायु, नाकाबंदी, फारतर लाठीमार, टेझर गन्स, रबरी गोळ्या (खरी गोळी घालून जीव घेण्यापेक्षा पर्याय म्हणून लिहतोय) हे सगळे उपाय किंवा अजुन चांगले असताना, घरातुन खेचून काढुन गोळ्या घालणे, महिलांवर अत्याचार हे हजारो वर्षांच्या उदात्त संस्कृती, परंपरा असलेल्या "लोकशाही" देशात घडतेच कसे?

हा पक्ष असा आणी तो पक्ष तसा पेक्षा "प्रगतीचे नियोजन, जनशिक्षण, जनता-सरकार परस्पर सुसंवाद, सहकार्य, विश्वास, उत्तम पुर्नेवसन" आधीक चांगल्याप्रकारे का बरे होऊ शकत नाही ह्या देशात? हा खरा मुद्दा आहे.

खायचे दात

पऱकीय गुंतवणुकीला नेहमी 'देशहितासाठी' विरोध करणार्‍या कम्युनिस्ट पक्षाने एका भांडवलवादी परकीय कंपनीसाठी एवढा आटापिटा करावा यात आश्चर्य असले तरी आपल्या निर्णयाला असलेला विरोध बलात्काराने मोडून काढणे यात काही आश्चर्य नाही. मानवी हक्कांबद्दल सर्वात जास्त कळवळा व्यक्त करणार्‍या पक्षाने गरज पडेल तेंव्हा मानवाधिकारांचा गळा घोटला आहे.

राज्यपालांनी दबावाला बळी न पडता सत्यपरिस्थितीवर भाष्य केले ते चांगलेच झाले. मानवाधिकार आयोग, न्यायालये आणि सरकारनेही यावर तातडीने चौकशी करून अत्याचारांना जबाबदार लोकांना शासन करणे आवश्यक आहे. नंदिग्रामध्ये चाललेले थैमान अतिशय निंदनीय, तिरस्करणीय खरेच पण यातून कम्युनिस्ट पक्षाचे दाखवायचे आणि खायचे दात सर्वांसमोर आले आहेत.

आपला
(दंतकर्मी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

इशयांतर नको

मुद्दाच बोलां,

घाटपांडे काका, बरुबरु बोल्ले .

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)

बाबूराव :)

विषयांतर?

कम्युनिस्ट पक्ष, नंदिग्राम, राज्यपाल, मानवधिकार हे सगळे असताना विषयांतर कसे?

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं

तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर करून असे म्हणावेसे वाटते की आपण काय लिहितो आहोत याचा स्वतः विचार करणे आवश्यक आहे.

आपला
(विचारपूर्वक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

चीन चीच् औलाद न ते

अहो सारे डावे नेते चीन चीच औलाद आहेत ना, जो धुमाकूळ चीन ने थ्येनाआनमेन चौकात घड़वून आणला होता नन्दीग्राम त्यापेक्षा काहीच कमी नाही, उलट जास्तच... गुजरातात मुस्लिमांवर हल्ला झाला तर सगळी कडे कांगावा, आणि आता तिथे मुस्लिमांवर (एका मुस्लिम कम्पनी - सलीम ग्रुप) मुळेच अत्याचार होताहेत तर कांग्रेसच्या तोंडात दही जमले आहे काय?
प्रकाश साहेब खरं बोलले, सगळेच नेते आणि दल दुटप्पी आहेत... आणि आता तरी लोकांना समजून घ्यायला हवे कि गेले २५ वर्ष डावे लोक बंगाल मधे कशे आणि कां जिंकत होते ते...

http://sureshchiplunkar.blogspot.com

क्रोर्याची परीसिमा.

भारतीय भूमीत तसे क्रोर्य अपरीचित नाही, दुर्देवाने मात्र नंदिग्राम येथे क्रोर्याची परिसिमा झाली असे म्हणावेसे वाटते.

मार्स्कवादी हे मार्क्सवादी असे वाचायला हवे.

काय चालू आहे?

इथे 'माओवादी' व 'सीपीएम' मध्ये काहीतरी गोंधळ तर नाही?.

त्याच्या माहिती प्रमाणे, नुकतेच उघडकीस आलेले किस्से सीपीएम (मार्क्सवादी) कार्यकर्त्यांवर झालेले अत्याचाराचे आहेत. ज्या मागे ममतांची 'भूमी उच्छेद प्रतिशोध' व त्याच बरोबर/आडून 'माओवाद्यांचा' हात होता.

नक्की काय चालू आहे? त्याच्या समजुतीत गफलत तर नाही?

(प्रसारमाध्यमांपासून दुरावलेला) तो

नंदीग्रामचे रहस्य!

म.टा. मधील अग्रलेख वाचण्यासारखा आणि माध्यमांमधे अपवादात्मक वाटला. आधी म्हणल्याप्रमाणे डाव्यांकडे वर्षानूवर्षे झुकलेल्या माध्यमांना डाव्यांना नावे ठेवायला (ते ही मुसलमानांवर अत्याचार केलेत म्हणून), जड जात आहे. म. टा. बर्‍यापैकी समतोल वाटत आला आहे. (सगळ्यांनाच योग्य तेथे झोडपत असतो म्हणून)

नंदीग्रामचे रहस्य!
7 Dec 2007, 0035 hrs IST

पश्चिम बंगालमध्ये 'नंदीग्राम' येथे गेल्या काही महिन्यांपासून ज्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गेल्या तीस वर्षांच्या 'आदर्श राज्यकारभारा'चे पितळ उघडे पडले आहे. शेतकरी व कामकरी यांच्यासाठी झगडणाऱ्या या पक्षाला शेतकऱ्यांचा रास्त विरोध यत्किंचितही सहन होत नाही हे नंदीग्रामच्या घटनेमुळे उघड झाले आणि गेली तीन दशके मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पश्चिम बंगालमध्ये 'केकवॉक' का मिळत गेला, हेही लक्षात येऊ लागले आहे. राज्यात झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत खास पाहणी करून निवडणूक आयोगाने मतदारांवर मार्क्सवादी दहशतीचा कसा पगडा आहे हे शोधून काढले होते. पण त्याचा काही उपयोग न होता, मार्क्सवादी पुन्हा या निवडणुकीत विजयी झाले व सत्ता त्यांच्या हातात आली.

या सत्तेच्या जोरावर आपण करू ती पूर्व असे या पक्षाला वाटत होते. पण नंदीग्राममध्ये 'स्पेशल इकॉनॉमिक झोन' स्थापण्यासाठी या पक्षाने शेतकऱ्यांची रोजीरोटी असलेल्या जमिनीला हात घालताच तिथला शेतकरी पेटून उठला. शेतकऱ्यांच्या सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनीच आंदोलन करावे हे आजवर प्रत्येक बंगाली खेडे 'सांभाळणाऱ्या' मार्क्सवादी केडरला सहन झाले नाही. त्यांच्यासाठी ही 'प्रतिक्रांती'च होती. ती चिरडून टाकणे त्यांना आवश्यक वाटत होते. त्याप्रमाणे मार्क्सवादी केडरने शेतकऱ्यांना धडा शिकवण्यास सुरुवात केली. अनेक शेतकरी रस्त्यांत, रानात मृतावस्थेत सापडू लागले. कित्येक शेतकरी स्त्रियांवर बलात्कार झाले. या दडपलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ममता बॅनजीर् यांची तृणमूल काँग्रेस पुढे आली; पण त्यांना मार्क्सवादी केडरने हुसकावून लावले. बंगालमध्ये इतके दिवस दबून बसलेल्या नक्षलवाद्यांना मात्र ही मार्क्सवाद्यांविरुद्धची संधी वाटली व ते शेतकऱ्यांच्या बाजूने लढण्यासाठी उतरले. मार्क्सवादी केडरचे जे लढण्याचे मार्ग आहेत, त्यात नक्षलवादी अधिक पारंगत आहेत. त्यांनी मार्क्सवाद्यांचा त्यांच्याच पद्धतीने काटा काढण्यास सुरुवात केली आणि कोलकात्याचे बुद्धदेव सरकार हादरले. नुकत्याच झालेल्या कोलकाता बंदमध्ये बांगलादेशी इस्लामी संघटनांच्या मदतीने नक्षलवाद्यांनी जो धुडगुस घातला, त्यामुळे या सरकारची बोबडीच वळली असून आता या प्रकरणात आपण चुकलो अशी कबुली बुद्धदेव भट्टाचार्य देत आहेत.

खरे तर आपण आधीपासून चुकतो आहोत हे बुद्धदेव यांना माहीत होते. पण गेल्या तीस वर्षांत अनेक चुका पचविल्या तशी नंदीग्रामचीही चूक पचून जाईल, असे बुद्धदेवांना वाटत होते. पण त्यांचा अंदाज चुकला. आता काही उपायच उरलेला नसल्याने ते आजवरच्या कम्युनिस्ट परंपरेला अनुसरून चुकांची कबुली देत आहेत. नंदीग्राममध्ये गेल्या काही महिन्यांपासून सशस्त्र मार्क्सवादी केडरचे जंगल-राज्य आहे. पोलिसही या केडरला सामील आहेत. पण नक्षलवादी व जिहादी यांनी त्यांना आव्हान देताच या केडरचे धाबे दणाणले. त्यामुळे आता तेथे केंदीय राखीव पोलिस दलाला नाईलाजाने बोलावण्यात आले आहे. पण मार्क्सवादी केडरची इच्छा या दलानेही आपल्या मजीर्ने व आपल्याला हवे तसे काम करावे अशी आहे. त्याला केंदीय राखीव पोलिस दलाने सपशेल नकार दिला आहे. या दलाने स्थानिक पोलिसांची मदत मागितली असता त्यांनी मदत देण्यास नकार दिला. तेव्हा या दलाच्या मुख्य कमांडंटला टीव्ही चॅनल्सपुढे तक्रार करावी लागली. नंतर पोलिसांनी सहकार्य दिले. त्यानंतरच या दलाने नंदीग्राममधल्या पुरलेल्या प्रेतांचा शोध घेतला. ही प्रेते आता खणून काढण्यात येत असून ती कुणाची आहेत ते लवकरच स्पष्ट होईल. केंदीय पोलिस दल आल्यामुळे नंदीग्रामच्या स्थानिक रहिवाशांच्या जीवात जीव आला आहे; पण ते अजूनही काही बोलण्यास तयार नाहीत. कारण हे दल गेल्यानंतर मार्क्सवादी केडर आपला समाचार घेईल अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे नंदीग्रामचे पाप कुणाचे आहे यावर प्रकाश पडणे अवघड आहे.

मार्क्सवादी सरकार बरखास्त करून बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणली तरच कदाचित नागरिक निर्भय होऊन काही बोलण्याची शक्यता आहे. पण केंद सरकारचे अस्तित्वच मार्क्सवाद्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्यामुळे ते बुद्धदेव सरकारला हात लावण्याची हिंमत करणार नाही. त्यामुळे पुरलेली प्रेते कुणाचीही असली तरी नंदीग्रामचे रहस्य दडवून ठेवण्यात बुद्धदेव सरकार यशस्वी होईल. एवढेच नाही तर पुढच्या निवडणुका जिंकण्यातही आणि शेतकऱ्यांच्या प्रेतावर 'सेझ'चे थडगे उभारण्यातही यशस्वी होईल.

 
^ वर