उघडझाप

हातकणंगलेकरांचं स्वतंत्र लेखन मी फारसं वाचलं नाही. बारावीत असताना अभ्यासाचा कंटाळा आला - तसा तो नेहमीच यायचा म्हणा - की ग्रामपंचायतीच्या लायब्ररीतून पुस्तकं आणून - आईवडिलांचे लक्ष चुकवत - वाचणे चालू होते. नेमका त्याचवेळी प्रोफेसर लोकांचा संप असल्याने कॉलेज बिलेज काही नसायचं. त्यात गावाकडं कोचिंग क्लासेसचाही त्रास नव्हता. त्यामुळे पुस्तकं वाचायला भरपूर मोकळा वेळ मिळायचा. हातकणंगलेकरांचं नाव पहिल्यांदा वाचलं ते "डोहकाळिमा" या जीएंच्या निवडक कथांचे संकलक/संपादक म्हणून. संध्याकाळी ८ वाजता एक पुस्तक बदलून "डोहकाळिमा" आणलं होतं. लोडशेडिंग ऊर्फ भारनियमन चालू असल्याने नेहमीप्रमाणे लाईट नव्हती. तेव्हा त्या पुस्तकाची हातकणंगलेकरांनी लिहिलेली प्रस्तावना कंदिलाच्या प्रकाशात वाचली होती. मध्ये जेवायला उठलो असेल तेवढाच. प्रस्तावना वाचून संपली तेव्हा रात्रीचे १२ वाजून गेले होते. काहीतरी खूप चांगलं, अभ्यासपूर्ण पण तरीही बोजड नसलेलं, अगदी गुंगवून टाकणारं वाचल्यानंतर येतो तसा थकवा आला होता. "डोहकाळिमा" तील मूळ कथा वाचल्यावर हातकणंगलेकर लक्षातही राहिले नाहीत.

हातकणंगलेकरांची फारशी पुस्तकं लायब्ररीत नसल्याने पुढे वाचायलाही मिळाली नाहीत. गेल्या एक दोन वर्षात त्यांनी संपादित केलेल्या जीएंच्या पत्रांचे ४ खंड वाचले नसते तर त्यांना विसरूनही गेलो असतो कदाचित.

मागच्याच महिन्यात एका पुस्तक प्रदर्शनात त्यांचं आत्मनिवेदनात्मक "उघडझाप" हे पुस्तक सापडलं. अर्थात ते पुस्तक विकत घेण्याचं कारण त्यातला "जीए नावाचं कोडं" हा लेखच होता. पण पुस्तकातून हातकंगलेकरांची खूप वेगळी ओळख पटते. "नॉन जीए" असलेलं त्यांचं स्वतंत्र लेखन किती चांगलं आहे हे त्यांच्या "उघडझाप" याच लेखातील खालील उतारा वाचून कळेल.

उघडझाप

"गेल्या पंचाहत्तर वर्षांच्या काळाच्या प्रवाहाकडे तटस्थतेच्या टोकावरून पाहताना काय आठवते? अनेक आठवणी अंत:चक्षूंसमोर सरकतात. कोल्हापूरला गेलेले वडील रात्री आठच्या गाडीने परत येणार असतात. त्यांची वाट पाहत पेंगुळलेल्या डोळ्यांनी आजीच्या मांडीवर डोके टेकून मी पडलेला असतो. समोरच्या खोलीच्या चौकटीला कंदील टांगलेला आणि त्याची तांबूस पांढरी ज्योतच तेवढी डोळ्यांत भरत राहिलेली. पांढर्‍या वस्त्रांत लपेटलेली पिकल्या केसांच्या आजीची गोरीपान, सुंदर सुरकुत्यांनी रेखलेली आकृती. तिने सांगितलेल्या इसापाच्या, हातिमताईच्या, वेताळपंचविशीतील गोष्टी, पानाने रंगलेले तिचे पातळ ओठ आणि कुठल्या अज्ञातात पाहणारे तिचे स्थिर डोळे. स्टेशनात येऊन थांबलेल्या आगगाडीचे उसारे, पानकाडीबिडीचे आवाज देणारा स्टेशनावरचा पोर्टर आणि मग बराच काळ करावी लागणारी ओळखीच्या पावलांची मन ताणून केलेली प्रतीक्षा, कोपर्‍यावर वाजलेली वडिलांची पावले आणि त्यांच्या कमरेवरच्या किल्ल्यांचा आवाज आणि नंतर दारातून अवतरणारी त्यांची पावले आणि घर भरून पावल्याचा आभास, कुणीतरी गादीवर आणून ठेवणे, स्नान करून देवापुढे उघड्या, देखण्या पाठीने बसलेले वडील, उदाचा उदात्त वास, त्याच्या धुराची अनंताकडे झेपावणारी वलये आणि नंतरची गाढ झोप- खिडकीतून उन्हे आल्यानंतरच हलकेच संपणारी. हे चित्रच आयुष्यभर स्थिर झाले असते तर केवढा सुखाचा ठेवा मी जतन करत जगलो असतो. कुठलेच सुख स्थानबद्ध करून ठेवता येत नाही हेच माणसाचे कारुण्यगर्भ भागधेय.

आमच्या घराचे दोन भाग होते : पाठीमागे स्वयंपाकघर, पाण्याचा आड, जनावरांचा गोठा आणि मधल्या जागेत फरसबंदी चौक. उन्हे कलायला सुरुवात झाल्यापासून माझा मुक्काम या उबदार फरशीवर असायचा. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची चाहूल. आजी ताज्या पालेभाजीला फोडणी देऊन, गरम भाकरी , तिखट, दही असे ताट करून मला या फरशीवरच जेवण द्यायची. झुंझुरक्या चंद्रप्रकाशात या अन्नाला अवीट गोडी प्राप्त होत असे. सोन्याचा घास म्हणतात तो हाच! त्यानंतर आयुष्यात तर्‍हतर्‍हेचे पदार्थ चाखले पण बालपणातल्या या भाजी-भाकरीची चव विसरता आली नाही.

पुढे व्यंकटेश माडगूळकरांची एक कथा वाचली : शिकारीला गेले असता ते एका पारध्यांच्या पालावर संध्याकाळच्या वेळेला पोचतात. रात्रीचे जेवण तव्यावर तयार होत असते. कोणता तरी पक्षी भाजला जात असतो. त्याचा खमंग वास सुटलेला. “काय शिजवता?” माडगूळकर विचारतात. “गिधाड गावलं मालक!” “ काय? तुम्ही गिधाडदेखील खाता?” “ तर काय, फार चवदार असतं मालक, उलिसं तेल घालून, लसूण टाकून भाजला की अक्षी चवदार!” लहानपणातल्या माझ्या जेवणाची अशीच रूची असावी. पदार्थ वेगळे पण अनुभव तसाच. “

- (वाचक) आजानुकर्ण

Comments

डोहकाळिमा

"डोहकाळिमा" तील मूळ कथा वाचल्यावर हातकणंगलेकर लक्षातही राहिले नाहीत.

कधी उलट पण होते.
पण असं लेखन वाचल की मन भुतकाळात जात " उघडझाप" होते ती भुत आणि भविष्याची वर्तमानकाळ मात्र निसटून जातो.

अवांतर - नेटाळल्यापासून पुस्तकवाचन मात्र खुपच कमी झालय. त्याची खंत वाटते.
प्रकाश घाटपांडे

सही !

प्राचार्य , हतकणंगलेकर अध्यक्ष झाल्यावर रसिक वाचकांना ज्या 'उघडझाप' ची उत्कंठा लागलीय, तशी ती आम्हालाही लागलेली आहे. त्यातील थोडासाच आनंद वरील लेखातून मिळाला, आपल्या एका उता-याने दुधाची तहान ताकावर भागली असे म्हणतो, पण अजून येऊ द्या बॉ ! त्यांच्या आत्मचरित्राचे काही विशेष, वैशिष्टे ! वगैरे वगैरे इत्यादी इ.

ता.क. आपल्या आवडत्या जी.ए. बद्दलही कधीतरी झक्कास लेख येऊ दे !

धन्यवाद आणि विनंती

अजानुकर्ण, धन्यवाद ! पण पुस्तक आणि मुख्य म्हणजे तुमच्या त्याबद्दलच्या वाचनाचे तरंग सुद्धा उमटू द्यात.
पुस्तकाच्या प्रकाशनाबद्द्लची माहितीसुद्धा उपयोगी होईल.

पुस्तक

पुस्तक अजून संपूर्ण वाचून झालेले नाही. पुस्तकातील काही लेख विस्कळित वाटले. स्वतःच्या कुटुंबाबद्दल त्यांनी लिहिलेला लेख तर अर्धवट लिहिला असून तो न तपासता थेट छापण्यासाठी गेला की काय असे वाटावे इतका अपूर्ण वाटला.

अर्थात हे पुस्तक हे त्यांच्या आधी प्रकाशित/अप्रकाशित साहित्याचे संकलन आहे हे लक्षात घेतले तरी हा दोष प्रकर्षाने जाणवतोच.


आम्हाला येथे भेट द्या.

धन्यवाद

उतारा आवडला. मूळ पुस्तक वाचावेसे वाटते आहे. येथे टंकल्याबद्दल धन्यवाद, योगेश. बाकी मुक्तसुनित आणि डॉक्टरसाहेबांशी सहमत आहे.

आवडले

आवडले!
अजून हवे... :)

आपला
गुंडोपंत

सहमत

गुंडोपंतांशी सहमत. येऊ दे.

-राजीव.

उघडझाप

मीही उघडझाप कर्णाने ज्या कारणासाठी विकत घेतले त्याचसाठी विकत घेतले. जी.एं. वरचा दीर्घ लेख वाचल्यानंतर पुढे फारसे काही वाचावेसे वाटलेच नाही.
(मी विलिंग्डनला विद्यार्थी असताना हातकणंगलेकर आमचे प्राचार्य होते. त्यांच्या इंग्रजी शिकवण्याबाबत ते प्रसिद्ध होते. त्यांच्या विभागात खळदकर नावाचे आणखी एक इंग्रजीचे अभ्यासक प्राध्यापक होते. स्वतः जी. ए. इंग्रजीचे जबरे वाचक आणि उत्तम प्राध्यापक. आजचे प्राध्यापक पहातो आणि ही कालची पिढी हातातून निसटून गेल्याची खंत वाटते.)
सन्जोप राव

प्रेमाचे लव्हाळे

शाळेत आम्हाला मर्ढेकरांची(?) "प्रेमाचे लव्हाळे, सौंदर्य नव्हाळे" अशी काहीशी कविता होती. मास्तरांनी शीर्षकाचा अर्थ सांगताना लव्हाळे म्हणजे "लव्ह + आळे" असे सांगून मर्ढेकरांना लव्हाळे नावात शब्दश्लेष व विनोद अपेक्षित आहे असे सांगितले होते.


आम्हाला येथे भेट द्या.

मकान आणि मूंगफली

मकान चा अर्थ शेत आणि मूंगफली चा अर्थ मुगाच्या डाळीपासून केलेला एक पदार्थ असे सांगणारे एक विद्वान शिक्षक आम्हाला होते. त्यांच्याशी या अर्थांबाबत वाद घातल्याने मला 'उद्धट' असा शेरा मिळाला होता!
सन्जोप राव

तो अर्थ नाही.

'आमच्या वेळी' या पेन्शनर अर्थाने मी तसे म्हणत नाही. 'व्यासंग' असणे, केवळ पोटार्थी व्यवसाय म्हणून नव्हे तर एक सामाजिक जबाबदारी म्हणून शिकवणे, स्वतः आयुष्यभर विद्यार्थी असणे हे शिक्षकगुण खरोखरच दुर्मिळ होत चालले आहेत. या संदर्भात 'शिक्षकांचे अगाध ज्ञान' या अर्थाची एक चर्चा तुम्हाला आठवत असेलच.
आमच्या वेळी हे असं नव्हतं, ही पुण्यात शिशुविहारापासून पर्वतीपर्यंत कुठेही ऐकू येणारी ओळ आता आपल्या तोंडून ऐकायला कससंच वाटतं.
'आता' चा अर्थ समजला नाही...
सन्जोप राव

जीए आणि "उघडझाप"

"उघडझाप" इतक्यांत हाताशी लागेलसे वाटत नाही. त्यांतील जीएंबद्दलचा मजकूर काय आहे याबद्दल कमालीची उत्सुकता मला वाटते आहे. संजोपराव आणि "कर्ण" यांनी त्यावर प्रकाश टाकला तर फार बहार येईल.

भटकळांनीसुद्धा जीएंवर् लिहिताना "अनोळख" असे कायसेसे वर्णन केल्याचे स्मरते. दळवींचा (जी एंच्या मृत्यूनंतर लगेच प्रकाशित झालेला) लेख तर फारच कठोर होता. हातकणंगलेकरांचे मतही असेच असेल असे शीर्षकावरून तरी वाटते आहे ...

वा..

वा वा,येथे उघडझाप मधली एक 'तिरीप' टंकली आहेस,धन्यवाद. पुस्तक वाचायची आता उत्सुकता लागली आहे.बाकी वरील डॉ.साहेब आणि नंदन यांच्याशी सहमत.
स्वाती

छान

उतारा आवडला. अजून वाचायला आवडेल.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
उतारा आवडला. अजून वाचायला आवडेल.उतारा आवडला. अजून वाचायला आवडेल.उतारा आवडला. अजून वाचायला आवडेल.उतारा आवडला. अजून वाचायला आवडेल.

लिहिणार

"जीए नावाचे कोडे" मधील मला आवडलेले उतारे येथे नक्की लिहितो.


आम्हाला येथे भेट द्या.

उघडझाप ची उघडझाप

अजानुकर्ण,

आपण उघडझाप ची येथे केलेली उघडझाप आवडली. प्रतिसाद अनुदिनीवर दिला आहेच. असेच येऊ द्या.

आपला,
(जी.ए. प्रभावित) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

 
^ वर