भयोत्सव

ऑक्टोबरच्या महिन्यापासूनच अमेरिकेत एकेका सणाला सुरुवात होते. ऑक्टोबरमध्ये हॅलोवीन, नोव्हेंबरमध्ये थॅंक्स गिव्हिंग आणि डिसेंबरमध्ये ख्रिसमस. भयकथांच्या विलक्षण आवडीमुळे हॅलोवीनबद्दल फार पूर्वी पासूनच वाचले, ऐकले होते. त्यावेळी असा कसा हा सण? यामुळे समाजात आणि विशेषत: लहान मुलांत भीती वाढत असावी की काय असे वाटत असे, परंतु अमेरिकेला आल्यावर या विचारांतला फोलपणा कळून आला. घाबरण्याचा आणि घाबरवण्याचा हा सण अतिशय लोकप्रिय असल्याचे अनुभवास आले. लहान थोरांना आवडणाऱ्या आणि या महिन्यात येणाऱ्या हॅलोवीनच्या सणाचे औचित्य साधून हा लेख उपक्रमावर देत आहे.

हॅलोवीनचा इतिहास: हॅलोवीनची पाळेमुळे प्राचीन ब्रिटन व आयर्लंड मधील केल्टिक संस्कृतीत सापडतात. नोव्हेंबरची पहिली तारीख हा नूतन वर्षारंभाचा दिवस मानला जाई. तसेच, तो त्या काळी उन्हाळ्याचा शेवटचा दिवस मानला जाई. त्यानुसार या दिवसापर्यंत पशुपालन व शेतीची बरीचशी कामे उरकली जात. या दिवसानंतर काळोखी आणि गारठवून टाकणार्‍या थंडीचा ऋतू सुरु होई. नेमकी हीच वेळ गेल्या वर्षभरात जे कोणी मरण पावले त्यांचे मृतात्मे घरी परतण्याची समजली जाई.

आख्यायिकेनुसार मृतात्म्यांना या दिवशी नवी शरीरे शोधायची संधी मिळत असे, त्यामुळे ते सर्व शरीरांच्या शोधात गावांत येत. हा दिवस वर्षातला असा दिवस मानला जाई (जातो) ज्यादिवशी आत्मे आपले जग सोडून मर्त्य मानवाच्या जगात सहज प्रवेश करू शकत (शकतात).

या दिवशी मृतात्म्यांनी आपल्या शरीराचा ताबा घेऊ नये म्हणून त्यांना भिवविण्यासाठी गावकरी गावाजवळील टेकड्यांवर किंवा घराबाहेर मोठा जाळ करत. जनावरांचा बळीही त्याठीकाणी दिला जाई. याचबरोबर ते भयानक मुखवटे व भीतिदायक वेष धारण करत; यामुळे नव्या शरीरांच्या शोधात येणाऱ्या मृतात्म्यांना खरी माणसे कोण व मृतात्मे कोण हे समजणे कठीण होईल अशी गावकऱ्यांची धारणा असे. इसवी सनानंतर पहिल्या शतकात रोमन साम्राज्याने ब्रिटन आणि आयर्लंडवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यावर "पोमोना" या फळा-झाडांच्या रोमन देवतेची पूजा करण्याचा सणही याच दिवशी साजरा होऊ लागला. ऍपल बॉबिंग (एका मोठ्या बादलीतील किंवा हौदातील पाण्यात सफरचंदे सोडून, ती हात मागे बांधून तोंडाने पकडणे) हा हॅलोवीनचा प्रसिद्ध खेळ पोमोनाला समर्पित आहे. यानंतर सुमारे सातव्या शतकात १ नोव्हेंबर हा संतांचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी चर्चकडून संतपद मिळालेल्या किंवा न मिळालेल्या सर्व संतांचे स्मरण केले जाते, यालाच ऑल हॉलोज डे किंवा होली डे किंवा होलीमस (holy day = 'पवित्र दिवस') मानले जाऊ लागले व या दिवसाची पूर्वसंध्या हॅलोवीन म्हणून साजरी केली जाऊ लागली.

DSC00560
पोहोण्याच्या तलावात सफरचंदे पकडणारी मुले

आर्यलंडमधून विस्थापित होऊन अमेरिकेत स्थिरावलेल्या आयरिश लोकांनी हॅलोवीनचा सण अमेरिकेत आणला. हॅलोवीनचा सण प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, पोर्टो रिको (प्वेर्तो रिको), आयर्लंड व ब्रिटन मध्ये साजरा केला जातो. अमेरिकेत १९व्या शतकात या सणाने मूळ धरल्याचे उल्लेख वाचायला मिळतात.

हॅलोवीनच्या सणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जॅक-ओ'-लॅन्टर्न नावाचा भला मोठा भोपळा कोरून केलेला कंदील. अमेरिकेत भोपळ्याचे पीक चांगले घेता येते आणि हॅलोवीनच्या हंगामात ते तयारही होते. भोपळ्याला मानवी डोक्याचा आकार देऊन त्यावर डोळे, नाक, तोंड कोरणे दिसतेही भीतीदायक. ३१ तारखेपर्यंत या भोपळ्यांवर मुखवटे कोरले जातात. रात्री या भोपळ्यांत मेणबत्ती पेटवली जाते. दिवाळीत आपल्याकडे जसा कंदील बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्यापाशी लावला जातो तसाच हा जॅक-ओ'-लॅन्टर्न प्रज्वलित करून बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्यापाशी ठेवला जातो. या जॅक-ओ'-लॅन्टर्नची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे.

कथा जॅक-ओ'-लॅन्टर्नची: या कथेची विविध रूपे आहेत, तरी बऱ्याच कथांतील एक कथा उचलून येथे थोडक्यात देत आहे.

जॅक नावाच्या एका अत्यंत हुशार परंतु तितक्याच आळशी आयरिश इसमाने आयुष्यभर काहीही केले नाही. त्याने कधी कुठले चांगले काम केले नाही की कधी कुठले वाईट काम केले नाही. त्याच्या मृत्यूची वेळ जशी जवळ आली तसे त्याला आणायला सैतान आला, परंतु आपल्या हुशारीने त्याने सैतानाला चकवून आपले आयुष्य वाढवून घेतले. असे दोन-तीन वेळा झाल्याने सैतान त्याच्यावर रुष्ट झाला व तुला आणायला परत येणार नाही असे वैतागून सांगून निघून गेला.

जॅक’ओ लॅन्टर्न

तरीही एके दिवशी अचानक नकळतच जॅकला मृत्यू आला व आपण स्वर्गाच्या मोतिया रंगाच्या फाटकापाशी उभे आहोत हे त्याला जाणवले. स्वर्गाच्या दारात उभ्या असणाऱ्या सेंट पीटरने जॅकला सांगितले, 'तू आयुष्यात एकही चांगले काम केले नाहीस. तुला स्वर्गात प्रवेश मिळू शकत नाही. तेंव्हा तुला बहुधा नरकात जावे लागेल.'

जॅक यानंतर सैतानासमोर गेला. सैतानाच्या मनात जॅकला अद्दल घडवायची असल्याने त्याने जॅकला सांगितले, 'तुला नरकातही प्रवेश मिळू शकत नाही कारण आयुष्यभरात तू कोणाचेही वाईट केलेले नाहीस.'

यावर हिरमुसला होऊन जॅकने विचारले, 'तर मग मी या अंधारात जाऊ तरी कोठे?' यावर सैतानाने जवळ पडलेल्या एका कोरलेल्या पोकळ भोपळ्यात नरकातला पेटता कोळसा घातला व सांगितले, 'जेथून आलास तेथेच परत जा आणि कायमचा अंधारात हा कंदील घेऊन भटकत राहा.'

कधी कधी हॅलोवीनच्या रात्री दूरवर अंधारात अजूनही जॅक दिवा घेऊन भटकताना दिसतो म्हणतात.

अमेरिकेतील हॅलोवीन: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील दुकाने हॅलोवीनच्या विविध साहित्यसामुग्रीने भरलेली असतात. यांत नानाविध आकारांचे भोपळे, भोपळ्याच्या आकाराचे प्लॅस्टिकचे कंदील, भयानक मुखवटे व वेष, हॅलोवीनची शुभेच्छापत्रे, आणि या सणाला साजेशा वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया यांचा समावेश असतो. तसेच घराच्या सुशोभीकरणासाठी बनावट वटवाघुळे, काळ्या मांजरी, कोळी आणि कोळिष्टके, हाडांचे सापळे अशा अनेक भयप्रद गोष्टी विकायला ठेवतात. या सर्व गोष्टींचे रंग शिशिर ऋतूच्या रंगांशी मिळतेजुळते असतात. जसे, काळा, केशरी, जांभळा, लाल व हिरवा. या काळात घराघरांतून भोपळ्यांची खरेदी होते. 'पंपकिन पीकिंग' म्हणजे भोपळ्याच्या शेतात जाऊन आपल्याला हव्या त्या आकाराचे भोपळेही खरेदी करता येतात. कुटुंबातील सर्व व्यक्ती मिळून लहान भोपळे रंगवतात तर मोठे भोपळे कोरून पोकळ करतात. अमेरिकेत या सणाला धार्मिक महत्त्व नाही.

ट्रिक ऑर ट्रिटींगसाठी सज्ज बालकंपनी

३१ तारखेच्या संध्याकाळी ड्रॅक्युला, फ्रॅन्केस्टाईन, ईजिप्शियन ममीज, गॉबलिन्स या खलनायकांप्रमाणे किंवा पऱ्या, राजकुमाऱ्या, परीकथांतील नायक इ. प्रमाणे वेषांतर केलेली लहान मुले जवळपासच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावतात व "ट्रिक ऑर ट्रीट" असे ओरडतात. यजमानांनी सहसा "ट्रीट" असे म्हणून या मुलांजवळ असलेल्या छोट्या प्लॅस्टिकच्या बादल्यांमध्ये मिठाया टाकायचा रिवाज आहे.(ट्रिक म्हटले असता मुले यजमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात.) गोड खाल्याने मनाला लागणारी हुरहुर, काळजी, चिंता आणि भीती तात्पुरती दूर होते असे सांगितले जाते. ट्रिक ऑर ट्रीटला मिठाई वाटण्याची परंपरा यांतूनच सुरु झाली असावी का काय कोण जाणे.
अमेरिकन कुटुंबात या दिवशीची संध्याकाळ एखादा भयप्रद सिनेमा पाहण्यात, भयकथांचे मोठ्याने वाचन करण्यात किंवा एकमेकांना भयप्रद किस्से सांगण्यात व्यतीत करण्यात येते. या दिवसांत झपाटलेले वाडे, भूतबंगले, स्मशाने यांची सफर या सारख्या भयप्रद मनोरंजनाच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. सर्व कुटुंबीय मिळून अशा कार्यक्रमाचा आस्वाद लुटतात.

गेल्या काही वर्षांपासून आपल्या भारतीय सणांबरोबरच या अमेरिकन सणांची मजा लुटण्याचा आनंद आम्ही घेत आहोत. या मागची भावना इतकीच की आपल्या सभोवतीचे जग आनंदी असेल तर आपणही त्यात सहभागी व्हावे.

अमेरिकेतील सर्वांना हॅलोवीनच्या अनेक शुभेच्छा!

(या लेखाची पूर्वावृत्ती मनोगतावर गेल्या हॅलोवीनला प्रकाशित.)

Comments

मस्त!

भयोत्सव हे नाव मस्त आहे!
अगदी चपखल!!

लेख नेहमी प्रमाणेच झकास नि माहीतीपूर्ण! :)
आपला
गुंडोपंत

उद्या हॅलोवीन

प्रियाली, लेख आवडला. जॅक-ओ'-लॅन्टर्नची गोष्ट आवडली.

हॅलोवीनची वाट न पाहतील अशी मुले विरळाच. मलाही आधी हा सण विचित्र वाटत असे पण नंतर त्यातली मुलांना येणारी मजाही कळली. छान वेगवेगळे कपडे घालायचे आणि वर चॉकलेटेही मिळणार.

भोपळ्यांचे वाफे (?) असतात (पॅचेस) असतात त्याची चित्रे दिल्याशिवाय रहावत नाही म्हणून..

असे भोपळे आणायचे किंवा अर्थात सुपरमार्केटमधून आणायचे. नंतर ते आतून पोखरून काढायचे. याच्याही स्पर्धा असतात.

नंतर हॅलोवीनला काय वेष करायचा हे ठरवणे हाही एक कार्यक्रमच. आणि मग संध्याकाळ झाली की आजूबाजूची पिल्लावळ गोळा करून बाहेर पडायचे ट्रीक ऑर ट्रीट करीत. अशी नटलेली छोटी प्रजा खूप गोड दिसते. एक निरीक्षण म्हणजे अमेरिकेत एरवी कधीही बाहेर न दिसणारे शेजारीही चित्रविचित्र टोप्या आणि कपडे घालून बाहेर चॉकलेटे वाटत बसलेले दिसतात. ऍपल बॉबिंगसारखेच अजून एक म्हणजे "डोनटस ऑन स्ट्रिंग" पाहिले आहे. एकंदरीत या दिवशी सर्व मजाच मजा असते!

प्रथा

नटलेली छोटी प्रजा खूप गोड दिसते. एक निरीक्षण म्हणजे अमेरिकेत एरवी कधीही बाहेर न दिसणारे शेजारीही चित्रविचित्र टोप्या आणि कपडे घालून बाहेर चॉकलेटे वाटत बसलेले दिसतात.

खरंय! ज्यांच्या घरासमोर जॅक'ओ लँटर्न जळत असतो ते ट्रिट द्यायला सज्ज असतात असे समजले जाते. ही लहान पिल्लावळ बिनधास्त येऊन त्यांचे दार ठोठवते. (इतर वेळेस असे करणे अमेरिकन संस्कृतीच्या विरुद्ध आहे. ;-) ) मोठेही कँडीज् घेऊन मुलांच्या पिशव्यांत ती टाकायला सज्ज असतात.

छान माहीती

छान माहीती आहे. बर्‍याचजणांनी हॅलोवीन नाव ऐकले असेल पण तितकी माहीती नसेल्.

जागतिककरणात एक मोठा टप्पा पार पडलाय, किंवा खरोखर भारतात अमेरीकन संस्कृती मिसळली आहे हे तेव्हा बर्‍यापैकी सिद्ध होईल जेव्हा भारतात हॅलोवीन साजरा व्हायला लागेल. :-)

अवांतर - जर का दरवाज्यात गोळ्या/चॉकलेट मागायला येणार्‍या ह्या मुलांना घारगे, भरीत, सॅलेड करून पुढे आणले तर यजमानांची भयानक "ट्रीक" समजून पळून जातील ना? :-)

सुंदर लेख !

भयोत्सव आहेच नावाप्रमाणे ! बाकी आपला लेख नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आणि झकास . हा लेख वाचून काही दिवसापासून चाललेल्या खरडींमधील , हॅलोवीनच्या कुजबूजीच्या अर्थ आज कळला ! तसा जॅकही आवडला.

आख्यायिकेनुसार मृतात्म्यांना या दिवशी नवी शरीरे शोधायची संधी मिळत असे, त्यामुळे ते सर्व शरीरांच्या शोधात गावांत येत. हा दिवस वर्षातला असा दिवस मानला जाई (जातो) ज्यादिवशी आत्मे आपले जग सोडून मर्त्य मानवाच्या जगात सहज प्रवेश करू शकत (शकतात).

हिंदू परंपरेत आहेत का असे काही ? किंवा तशा आख्यायिका ?

आपला .
भला मोठा भोपळा कोरून कंदिल करत असलेला.
प्रा.डॉ..................

अमेरिकेतील आमच्या मराठी बांधवांना हॅलोवीनच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान

सगळेच लोक तसे उत्सव प्रिय असतात. युरोपात लोकं हे सगळे सण खुप आनंदाने साजरे करतात. माझे वैयक्तिक मत असे आहे की, ज्या प्रमाणे भारतात हिंदुंसाठी श्रावण महिना अन त्या सोबत सुरू होणारा काळ हा उत्सवांनी भरलेला असतो तसेच काहीसे ख्रिश्चन संस्कृतीत आढ़ळूअन आले. त्यांच्या सुद्धा हे उत्सव ख्रिसमस पर्यंत चालत राहतात जसे आपल्याकडे दिवाळी पर्यंत.

थोडी अवांतर माहिती:
जर्मनीमध्ये लग्नात वधुवरांच्या डोक्यावर तांदुळ टाकण्याची प्रथा आहे असे एका जर्मन सहकार्‍याने सांगितले. तसेच लग्न लागल्यावर नववधुला पळवुन नेले जाते वर पळवुन नेणारे नातलग अनेक बारमध्ये वधु सोबत मद्यपानाची मजा लुटतात. नवर्‍याने वधुला शोधुन काढायचे असते अन हे लोक ज्या ज्याबारमध्ये गेले होते त्याचे बिल चुकते करत राहणे. अशी सुद्धा एक मजेशीर प्रथा आहे. तसेच ख्रिश्चन लोक महिनाभर उपास सुद्धा करतात असे ऐकुन आहे.

मराठीत लिहा. वापरा.

खरंय!

माझे वैयक्तिक मत असे आहे की, ज्या प्रमाणे भारतात हिंदुंसाठी श्रावण महिना अन त्या सोबत सुरू होणारा काळ हा उत्सवांनी भरलेला असतो तसेच काहीसे ख्रिश्चन संस्कृतीत आढ़ळूअन आले. त्यांच्या सुद्धा हे उत्सव ख्रिसमस पर्यंत चालत राहतात जसे आपल्याकडे दिवाळी पर्यंत.

हो हे खरंच आहे अगदी ख्रिसमसनंतर न्यू इयरपर्यंत.

वधुला पळवून बारमध्ये नेऊन नवर्‍याला शोधायला लावणे ही जर्मन प्रथा मस्तच आणि डोक्यावर तांदूळ टाकण्याची प्रथा आश्चर्यकारक वाटली कारण तांदूळ हे काही जर्मन पीक नाही. कधी शक्य झाले तर या प्रथेसाठी तांदूळ कसे काय निवडले गेले हे अवश्य विचारून घ्या.

विचारले होते

विचारले होते. पण उत्तर मिळाले नाही. फरक एवढाच आहे कि ते तांदुळ आपल्या अक्षतांसारखे रंगीत नसतात. हि माहितीची देवाण घेवाण करताना अशी ही माहिती कळली होती कि एकदा कलोन शहराजवळ खोदकाम चालु असताना एक गुहा सापडली होती. त्यात अनेक सांगाडे होते. ते सांगाडे कोणत्याही मोजमापाने जर्मन माणसांचे (आपल्याशी तुलना करता जर्मन लोक तसे धिप्पाड असतात.) नव्हते. थोडेफार आशियायी होते. जर्मन स्वतःला आर्य म्हणवुन घेतात. त्यामुळे त्याच जर्मन सहकार्‍याने आमचा तुमच्याशी काहीतरी संबंध आहे हे मिस्किलपणे सांगितले होते.

मराठीत लिहा. वापरा.

लेख छान, ऍशमिटवॉख

लेख आणि जॅकची गोष्ट आवडली. मागच्या वर्षी मनोगतावर कार्यबाहुल्यामुळे वाचण्यात आला नव्हता.
जर्मनीत 'ऍशमिटवॉख' म्हणजे बुधवारपासून साधारण इस्टरपर्यंत चाळीस दिवस धार्मिक मंडळी उपास करतात असे काही ऐकल्याचे आठवते. अर्थात त्यांचा उपास म्हणजे साबुदाण्याची खिचडी आणि रताळ्याचा कीस खाणे असा नाही, फक्त सामिष आहार वर्ज्य करणे व इतर सर्व खाणे इतकाच असावा.
(सध्या आठवत नाही,जर्मनीवासियांनी खुलासा करावा.)

एकासन.

या उपासामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फक्त शुक्रवारीच उपवास केला जातो. या ४० दिवसात मद्य, मांस इत्यादी टाळळे जातात.

ऍश वेडनेसडे (भस्म बुधवार) ते इस्टर ( स्वर्गारोहणाचा शुक्रवार) पर्यंत उपवास केले जातात. याकाळावधीत क्षमायाचनाही केली जाते. येशू च्या लोकप्रियतेपासून ते मृत्युपर्यंतचा काळावधी माझ्या मनात विलक्षण औदासिन्य आणतो असा माझा अनुभव आहे.

हे लिहतानापण मन उदास झाल्यासारखे वाटते.

छान

छान लेख आहे. मागच्या वर्षीचाही चांगला होता. इथे हॅलोवीन फारसे लोकप्रिय नव्हते, पण आता अमेरिकनाइझेशनमुळे लोकप्रिय होउ लागले आहे. हॅलोवीनवर गुरूवर्य जेरी साइनफेल्ड यांची मते ऐकण्यासारखी आहेत :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

प्वॉरधरी

यामुळे समाजात आणि विशेषत: लहान मुलांत भीती वाढत असावी की काय असे वाटत असे, परंतु अमेरिकेला आल्यावर या विचारांतला फोलपणा कळून आला. घाबरण्याचा आणि घाबरवण्याचा हा सण अतिशय लोकप्रिय असल्याचे अनुभवास आले.

आमच्या कडे गावाला मुलांना भीती दाखवण्यासाठी " बागुलबुवा" नसे. याबुवाचे अस्तित्व शहरातच असे. त्याऐवजी "प्वॉरधरी" नावाची टोळी ही गावातली पोर पळवून नेतात. नंतर त्यांचे हालहाल करतात. ही मात्रा मात्र लागू पडे. मोठी लोक या प्वॉरधर्‍यांना पकडून शिक्षा का करत नसत हे मात्र कधी डोक्यात येत नसे.
प्रकाश घाटपांडे

धर्‍याबुवा

आमच्या कडे गावाला मुलांना भीती दाखवण्यासाठी " बागुलबुवा" नसे. याबुवाचे अस्तित्व शहरातच असे. त्याऐवजी "प्वॉरधरी" नावाची टोळी ही गावातली पोर पळवून नेतात.

हे वाचून प्रसिद्ध मानवत खून खटल्याची आठवण झाली. त्यात एकजण धर्‍याबुवा असे वेडेविद्रे वेशांतर करून गावांत फिरत असे अशी काहीशी गावात वावडी होती. (की खरंच होते ते आठवत नाही.) माझे वडिल कधीतरी हा धर्‍याबुवा आपल्याकडेही येतो असे सांगून मला लहानपणी घाबरवायचे.

युरोपात भटके लमाण

युरोपात भटक्या लमाणांना मुले पळवणारी टोळी मानतात. (युरोपातले "रोमा" लोक आणि भारतातले लमाण एकाच वंशातले, साधारण एकच भाषा बोलतात.)

पोरधर्‍या टोळीसारखे कल्पित नसल्यामुळे या खोट्या अपकीर्तीमुळे लमाणांचे युरोपात खूप हाल झाले आहेत.

पण तरी रंगीबेरंगी कपडे घातलेल्या, केसातून चांदीचे दागिने लोंबकाळणार्‍या बायका, त्यांचे मळकट पुरुष बघून मलाही लहानपणी भीती वाटायची. का कोणास ठाऊक - कारण त्यांच्याविरुद्ध कुठलीही आख्यायिका ऐकल्याचे आठवत नाही.

हॅलोवीन शुभेच्छा!

रोमा जमात

रंगीबेरंगी कपडे घातलेल्या, केसातून चांदीचे दागिने लोंबकाळणार्‍या बायका, त्यांचे मळकट पुरुष बघून मलाही लहानपणी भीती वाटायची.

मलाही वाटायची. ;-)

या रोमा जमातीबद्दल मनोगतावर मागे आमची (म्हणजे मी आणि इतर विकिपीडित ;-) ) जोरदार चर्चा झाली होती. ती येथे वाचता येईल.

छान !

लेख माहितीपूर्ण, मजेशीर आहे. चित्रे व नाव सुध्दा छानच! आम्ही सुद्धा या वर्षी पहिल्यांदा भोपळ्याच्या मळ्यातून भोपळा आणला व मुलीसोबत या सनाचा आनंद घेत आहोत.

आपना सर्वांना भयोत्सवाच्या शुभेच्छा!

आपला,
(भयभीत) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

भोपळा बक्षिस

सर्वप्रथम प्रतिसादांबद्दल अनेक आभार.

गणिताच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल लेकीला शाळेतून २५ पौंडाचा भोपळा बक्षिस मिळाला आहे. तो घरी आणताना बिचारीला नाकी नऊ आले आणि आत्ता आम्ही तो कोरायला घेतो आहोत. उद्या घरातल्या जॅक'ओ लँटर्नचे चित्र इथे लावेन. :-)

गणितात भोपळा

गणितात भोपळा मिळायचा अर्थ पूर्वी वेगळा होता, आता इथे तो इतका छान बदलला आहे की मस्तच. कन्येचे अभिनंदन!

मस्त

गणितात भोपळा - हा शब्दप्रयोग मी जवळजवळ विसरलोच होतो!

हेच,

गणितात भोपळा मिळायचा अर्थ पूर्वी वेगळा होता, आता इथे तो इतका छान बदलला आहे की मस्तच. कन्येचे अभिनंदन!

हेच म्हणतो! मायलेकी दोघीही हुशार आहेत हो! :)

असो, भयोत्सवाचा लेखही मस्त!

तात्या.

२५ पौंडाचा जॅक'ओ लँटर्न

गणितात भोपळा मिळायचा अर्थ पूर्वी वेगळा होता, आता इथे तो इतका छान बदलला आहे की मस्तच. कन्येचे अभिनंदन!

अगदी!! तिला मी हाच अर्थ सांगितला आणि तिने आजीआजोबांना हे सांगून चकित केले. :-) अभिनंदनाबद्दल धन्यवाद. काल संध्याकाळी घाईत कोरलेल्या २५ पौंडी जॅक'ओ लँटर्नचा फोटो येथे लावला आहे.

DSC00577

वा!

भारीच दिसतो आहे भोपळा. छान कोरलाय.

हे हे

कसला मोठ्ठा भोपळा आहे! सही!
मस्त कोरलाय..
तुम्हास व लेकीस पुढिल महिन्यात अशीच मोठी टर्की बक्षिस मिळो ही शुभेच्छा :-)

टर्की

या भोपळ्याचंच काय करायचं असा त्या भोपळ्यापेक्षाही मोठ्ठा प्रश्न पडला आहे. टर्की मिळाली तर गावजेवण घालावं लागेल. तसा, भोपळा टर्कीपेक्षा जास्त चवदार असतो असं आपलं माझं मत. ;-)

हा हा

कधी घालताय गावजेवण?!.. टर्की आणि भोपळा दोन्ही ठेवा उगाच कमी नको पडायला .. आम्ही नक्की येऊ :प..
बाकी भोपळ्याचा केक खाल्ला आहे का? मस्त लागतो खाऊन आणि करूनही बघा. प्रयोगासाठी लागणारं भरपूर सामान आहेच् तुमच्याकडे ;) एक केक बिघडला तरी हरकत नाही :-)

छान लेख

प्रियाली,

लेख आणि माहीती छान आहे. पहील्यांदा अमेरिकेत आलो ते फॉल मधे आणि लगेचच घरांवर भुतेखेते टांगलेली पाहून हा काय सण साजरा करण्याचा प्रकार असे गुढी आणि तोर्णे लावणार्‍या माझ्या मनाला वाटले. अर्थात त्याचा अर्थ नंतर कळला. मजा पण कळली. आणि आम्ही एन्जॉयपण करतो.

पण कधी कधी अतीच दाखवले जाते असेही वाटते. कालच्या हॅलोवीनला बाजूच्या गावात जिथे शिक्ष्णाच्या मक्का/काशी/रोम व्हॉटेवर आहेत अशा ठिकाणि लहानमुले ज्या घरात गोळ्या चॉ़कलेट मागायला जातात तिथे मेलेली मुल्यांच्या बाहुल्या, ऍक्सिडंट झालेला माणूस असे डेकोरेशन पाहून जरा अतीच वाटले..

गेल्या वर्षी मुलीने आनंदात (आमच्याबरोबरच) गोळ्या-चॉकलेटे गोळा करून आणली त्यातले खाणार इतक्यात शेजारीण म्हणाली की बाहेर्ची कोणीही दिलेली चॉकलेटे कशी देतात त्यात कधी कधी विकृत माणसे काही घालून देऊ शकतात. वास्तवीक ही बया जरा "पॅरॉनोया" असलेली आहे याची कल्पना आहे तरी पण असे बोलल्यावर देण्याचा धीर झाला नाही (अर्थात मुलीने माझ्याकडून दुसरी चॉकलेटे वसूल केली!).

या सणाचा विकृत प्रवृत्ती वाटेल ते मुखवते घालून गैरफायदा घेऊ शकतात हे मात्र खरे आहे. म्हणून ओळखीच्या/माहीतीच्या घरात जाणे आणि मुलांबरोबर कुठलाही न मुखवटा न घालता जाणे हे महत्वाचे आहे. असे वाटते.

अर्बन लीजंड

गेल्या वर्षी मुलीने आनंदात (आमच्याबरोबरच) गोळ्या-चॉकलेटे गोळा करून आणली त्यातले खाणार इतक्यात शेजारीण म्हणाली की बाहेर्ची कोणीही दिलेली चॉकलेटे कशी देतात त्यात कधी कधी विकृत माणसे काही घालून देऊ शकतात.

:-) हे अमेरिकेतील एक फेमस अर्बन लीजंड आहे परंतु आतापर्यंत हा असा प्रसंग प्रत्यक्षात कधीही घडलेला नाही. काही माणसे मात्र पॅरानोया असल्याप्रमाणे अशा शंका उपस्थित करतात हे खरेच.

उलट, मजेशीर गोष्ट म्हणजे लहान मुलेच पूर्वी (सुमारे ४० च्या दशकात) कँडी मागण्यासाठी घरमालकांना छळायची. घराच्या काचा फोडणे, घाण करणे, मोडतोड करणे इ. इ. त्यात काही वृद्धांना खूप त्रास झाल्याची उदाहरणे समोर आली होती असे हिस्टरी चॅनेलच्या एका कार्यक्रमात पाहिले.

अर्बन लीजंड - मान्य

:-) हे अमेरिकेतील एक फेमस अर्बन लीजंड आहे परंतु आतापर्यंत हा असा प्रसंग प्रत्यक्षात कधीही घडलेला नाही. काही माणसे मात्र पॅरानोया असल्याप्रमाणे अशा शंका उपस्थित करतात हे खरेच.

अगदी मान्य आणि हे तेंव्हा कळतही होते. फक्त त्यावेळेस रिस्क घ्यावीशी वाटली नाही, शेवटि पोटच्या पोराचा प्रश्नः-). मग सोपी आयडीआ केली, तीला घरातली उरलेली चॉकलेट्स दिली आणि मिळालेली ऑफिसात लोकांसाठी ठेवली!

:)

>> मिळालेली ऑफिसात लोकांसाठी ठेवली!

आता ऑफिसातली चॉकलेट्स जपून खाल्ली पाहीजेत ;)

 
^ वर