चार महाराज व एक कर्नल - पहिल्या कसोटीसाठी भारताचे पाच संघनायक

खुलासा:- हा लेख माझा नाही. माझे एक स्नेही श्री. सुनील आणावकर हे क्रिकेटसंबंधी अनेक मजेशीर गोष्टी जाणतात आणि सातत्याने लेखन करतात. उपक्रमावर क्रिडाविषयी लेख फारसे येत नसल्याने मी त्यांना येथे येण्याचे आमंत्रण दिले होते परंतु जालावर मराठी टंकण्याचा फारसा अनुभव नसल्याने त्यांचे लेखन उपलब्ध होण्यास मर्यादा आल्या. खालील लेख वाचकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. तसे प्रतिसादांतून दिसल्यास त्यांना पुन्हा रितसर आमंत्रण देण्याचा मानस आहे.


काही दिवसांपूर्वी राहूल द्रवीडच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडचा दौरा केला व त्या दौर्‍यात इंग्लंडचा १-० असा पराभव करून नव्याने स्थापित झालेली "पतौडी ट्रॉफी" जिंकली. भारत व इंग्लंड या दोन राष्ट्रांच्या क्रिकेट संघांनी एकमेकांविरूद्ध कसोटी सामने (Test Matches) खेळायला प्रथम सुरुवात केली त्याला गेल्या जून महिन्यात ७५ वर्षे झाली. २५, २७ आणि २८ जून १९३२ या दिवसांत लंडनमधील "लॉर्डस्‌" मैदानावर या दोन संघांतील पहिला सामना खेळला गेला होता व त्या घटनेचा गौरव करण्यासाठी "इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स (ICC)” या नव्या ट्रॉफीची स्थापना केली. एके काळी भारत व इंग्लंड या दोन्ही देशांसाठी खेळलेले असे एकमेव खेळाडू इफ्तिकार अली खान उर्फ नबाब ऑफ पतौडी, सिनिअर (मन्सूर अली खान ’टायगर’ पतौडीचे वडील आणि हिंदी चित्रपटाचा नायक सैफ अली खानचे आजोबा) यांचे नाव या नव्या ट्रॉफीला दिले गेले आहे.

१९३२ मधला भारताचा दौरा मात्र यंदाच्या दौर्‍याइतका सुरळीतपणे पार पडला नव्हता. उलट सुरुवातीपासूनच बराच गोंधळ झाला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील तो पहिलाच कसोटी सामना होणार होता. खरे म्हणजे १९२९ मध्ये भारतीय क्रिकेटला ’इंपिरिअल क्रिकेट कॉन्फरन्स’ (ICCचे जुने नाव) कडून कसोटी सामन्यांचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर भारताने लगेचच इंग्लंडला आपला संघ पाठवावा अशीही शिफारस झाली होती. परंतु प्रत्यक्षात संघ पाठवायला तीन वर्षे लागली. “नकटीच्या लग्नात सतराशे विघ्ने" अशी एक म्हण आहे. भारतीय क्रिकेटच्या पहिल्या दौर्‍यात संकटाचे रूपाने आले होते चार महाराज. सर्वप्रथम, इंग्लंडच्या दौर्‍याचे वृत्त कानावर पडल्याबरोबर विजयनगरचे महाराजकुमार (जे "विझ्झी" या नावाने प्रसिद्ध होते) यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाला ५०,००० रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली. अर्थात, त्यामागे आपल्याला कप्तानपद मिळावे याची अपेक्षा होती. ते ऐकताच विझ्झींचे दुष्मन पतियाळाच्या महाराजांनी विझ्झींच्या ऑफरवर कुरघोडी करण्यासाठी बोर्डाला कळवले की खेळाडूंच्या चाचणीचा, प्रॅक्टीसचा आणि इंग्लंड दौर्‍यातील पहिल्या महिन्याचा सर्व खर्च ते करतील. बोर्डाला मनापासून हवे होते पतौडीचे नबाब आणि दुलीपसिंहजी. परंतु ते दोघे इंग्लंडमध्ये राहत होते आणि इंग्लंडच्या संघातून खेळण्याची अपेक्षा बाळगून बसले होते. त्यामुळे त्या दोघांनीही भारतासाठी खेळायला नकार दिला. मग "अडला हरी गाढवाचे पाय धरी" या प्रथेप्रमाणे पतियाळाच्या महाराजांना कप्तान बनवले गेले. विझ्झींना उप-कप्तान (Vice Captain) बनवायचे ठरवले गेले. परंतु खरी परिस्थिती अशी होती की पतियाळाचे महाराज राजकारणात एवढे गर्क झाले होते की दोन-तीन वर्षे ते क्रिकेट खेळलेच नव्हते व विझ्झी अतिशय कमी दर्जाचे खेळाडू होते. म्हणून मग बोर्डाने ठरवले की इंग्लंडमध्ये काही वर्षे क्रिकेट खेळून नुकतेच भारतात परतलेले लिंबडीचे महाराज घनश्यामशिंहजी यांना उप-कप्तान आणि विझ्झींना उप-उप-कप्तान (Deputy Vice Captain) बनवायचे. ती बातमी ऐकताच विझ्झींनी बोर्डाला आपली तब्येत अचानक खराब झाल्याने आपण इंग्लंडला जाऊ शकणार नाही असे कळवले. तेव्हा "सुंठी वाचून खोकला गेला" असा विचार करून बोर्डाने त्यांचा राजिनामा आनंदाने स्वीकारला आणि खेळाडूंची निवड करायला सुरुवात केली. त्यावेळचे जातीभेद व धर्मभेद यांचा विचार करून सात हिंदू, चार मुसलमान, चार पारशी आणि तीन शिख असे खेळाडू निवडून संघ बनवला.

शेवटी एकदाचा मग तो संघ १९३२ च्या मे महिन्यात इंग्लंडला जायला निघाला. अचानक पतियाळाच्या महाराजांनी आपली तब्येत बिघडली असल्याचे निमित्त करून संघातून आपले अंग काढून घेतले. मग आयत्या वेळी पोरबंदरच्या महाराजांना कप्तान बनवले गेले. त्यावेळी हे महाराज लोक कोठेही - विशेषत: इंग्लंडला - एकटे जात नसत. सारा परिवार घेऊन जायचे. त्यामुळे संघ आधी पुढे गेला व "वरातीमागून घोडा" गेल्यासारखे पोरबंदरचे महाराज पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी जेमतेम काही दिवस इंग्लंडमध्ये हजर झाले. ते पहिल्या एक-दोन सामन्यांत खेळले. त्यात त्यांच्या धावांची गोळाबेरीज झाली तीन. त्यावर इंग्लंडच्या एका खट्याळ पत्रकाराने त्यांच्याबद्दल "भारताच्या कप्तानाकडे धावांपेक्षा रोल्स-रॉईस अधिक आहेत" असे लिहिले. त्या टीकेला घाबरून पोरबंदरच्या महाराजांनी लिंबडीच्या महाराजांना कप्तान बनवून आपण फक्त भाषणे करायची आणि मुलाखती द्यायच्या असे ठरवले परंतु कसोटी सामन्याच्या दोन दिवस आधी लिंबडीच्या महाराजांची पाठ लचकली व त्यांनीही आपले अंग काढून घेतले. त्यामुळे मग संघातले ३७ वर्षंचे ज्येष्ठ खेळाडू कर्नल सी. के. नायडू यांना आयत्यावेळी कप्तान बनवण्यात आले.

नायडू आपल्या उतार वयातही सुदृढ होते आणि चांगली फटकेबाजी व द्रुत गोलंदाजी करायचे. त्या दौर्‍यातील एका महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी एक दमदार शतकही ठोकले होते. खरे म्हणजे फक्त क्रिकेटचा विचार केला असता, तर नायडूच पहिल्यापासून कर्णधार व्ह्यायला हवे होते. परंतु त्या काळात भारतीय क्रिकेटवर राजे, नबाब आणि ब्रिटिश अधिकार्‍यांची सत्ता होती. नायडू कप्तान झाले तरी संघातल्या कटकटी मात्र थांबल्या नाहीत. त्यांचे नाव कप्तानपदी पाहिल्याबरोबर संघातील काही खेळाडूंनी बंड पुकारले. सैन्यात बरेच आयुष्य काढल्यामुळे नायडू कडक शिस्तिचे आणि व्यायामप्रेमी होते. ते सकाळ संध्याकाळ व्यायाम आणि रोज मैदानावर भरपूर प्रॅक्टिस करायची या दोन गोष्टींवर भर द्यायचे, त्यामुळे काही लाडावलेल्या खेळाडूंना ते आवडत नव्हते. सामन्याच्या आदल्या रात्री त्यांनी पोरबंदरच्या महाराजांच्या हॉटेलमधील खोलीचे दार ठोठावले आणि त्यांना उठवून बरेच खेळाडू नायडूंच्या हाताखाली खेळायला तयार नाहीत त्यामुळे सामना रद्द करायला हवा असे सांगितले. बिचारे महाराज घाबरले आणि त्यांनी बोर्डाला फोन केला व सामना रद्द करायचा आपला निर्णय जाहीर केला. सुदैवाने बोर्डाच्या सदस्यांनी त्यांचा निर्णय धुडकावून दिला आणि सामना वेळेवर सुरु व्हायलाच हवा असा महाराजांना ठासून दम भरला. या सार्‍या गोंधळानंतर दुसरे दिवशी सारे खेळाडू (त्यापैकी काही अक्षरश: डोळे चोळत) मैदानावर, उशीरा का होईना पण हजर झाले.

सी के नायडू

एकदा सामना सुरु झाल्यावर मात्र नायडूंनी आपल्या सार्‍या खेळाडूंन गोर्‍या साहेबांविरुद्ध देशासाठी अटीतटीने खेळायची प्रेरणा देऊन आपल्या उत्कृष्ट नेतृत्व-कौशल्याची झलक सार्‍या जगाला दाखवली. त्यांचे तरुण आणि अननुभवी साथी ते तीन दिवस अगदी कस लावून खेळले आणि त्यांच्या भारतीय चाहत्यांबरोबर इंग्रजी क्रिकेटप्रेमी जनतेची वाहवा मिळवून गेले. तो सामना इंग्लंडच्या संघाने जिंकला परंतु, भारताने त्यांना चांगलीच झुंज दिली. स्वत: नायडूंनी पहिल्या फळीमध्ये ४० धावा काढल्या आणि दोन बळी घेतले. या सामन्यात महम्मद निसारने सहा बळी घेतले आणि जहांगीर खान व अमरसिंग यांनी प्रत्येकी चार बळी घेतले. अमरसिंगने दुसर्‍या फळीत ५१ धावाही काढल्या. संघाचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले. एकंदरीत एवढे सारे गोंधळ होऊनही दौर्‍याचा शेवट चांगला झाला.

आज रांचीमधल्या एका छोट्या खोलीत राहणार्‍या कुटुंबात मोठा झालेला, भारतीय रेल्वेच्या एका तिकीट कलेक्टरचा मुलगा महेन्द्रसिंग धोनी हा भारताचा कप्नात बनला आहे. गब्बर श्रीमंत महाराजांपासून गरिबीत वाढलेल्या धोनीपर्यंतचा भारतीय क्रिकेटचा हा प्रवास अखेरीस "रावापासून रंकापर्यंत" पोहोचला आहे.

- सुनील आणावकर
ह्यूस्टन, टेक्सास.

लेखनविषय: दुवे:

Comments

वेगळा विषय

लेख आवडला. तत्कालिन बोर्डाच्या निर्णय प्रक्रियेविषयी वाचून गंमत वाटली - म्हणजे काही मुख्य धर्मांना प्रतिनिधित्व देणे यासारखे. सी. के. नायडूंचे नाव अर्थातच ऐकले आहे, पण हा इतिहास माहिती नव्हता. अजूनही क्रिकेटवीर कधीकधी न खेळण्यासाठी तब्येतीचे कारण पुढे करतात असे दिसते, त्याचाही उगम पूर्वीच झाला आहे हे नवे कळले.

सुनील आणावकरांनी जरूर अधिक लेखन करावे, वाचायला नक्कीच खूपच आवडेल. प्रियाली, हा लेख आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार.

सहमत

वेगळ्या विषयावरील हा लेख आवडला. क्रिक - इन्फोवर अशी रंजक माहिती अधूनमधून येत असते, परंतु भारतीय क्रिकेटच्या बाल्यावस्थेतील काळाबद्दल फारसे वाचायला मिळत नाही.

>> सुनील आणावकरांनी जरूर अधिक लेखन करावे, वाचायला नक्कीच खूपच आवडेल. प्रियाली, हा लेख आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार.
-- असेच म्हणतो.

रंजक लेख

तसा क्रिकेटबद्दल मी उदासीन आहे, पण अशा गोष्टी मला वाचायला आवडतात. आणावकरांनी माहिती छान खुलवून सांगितली आहे - प्रियाली, त्यांच्यापाशी माझे आभार/अभिनंदन पोचवा.

तेच म्हणतो

धनंजयराव यांचा प्रतिसाद व टग्यारावांच्या प्रति-प्रतिसादास ..... तेच तर म्हणतो.

आपला,
(सहमत) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

हा कसला लेख?

जुन्या काळचा लेख पण "लगान ११" चा काहीच उल्लेख नाही पाहून जरा निराशा झाली खरी. :-)

आता ती श्री. सुनील आणावकर यांनी येथे येऊन अजून एक लेख लिहून दूर् करावी हा खलीता राजदूत प्रियाली यांनी त्वरीत पोहोचवावा.

आणी हो आमच्या प्रश्राचे (हा कसला लेख?) आम्हीच उत्तर देतो - "उत्तम" कंठा बक्षीस देऊ लवकरात लेखंदाजाला पाचारण करावे.

आपला
महाराजा फिरकी बोलंदाज जी

आवडला!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
लेख मस्तच आहे. विझी उर्फ महाराजा ऑफ विजयनगरम् ह्या माणसाने केलेले धावते वर्णन मी रेडिओवर ऐकलेले आहे. एक शब्द समजला असेल तर शपथ. तोंडातल्या तोंडात उच्चार आणि अतिशय रटाळ समालोचन करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकणार नाही. त्यांच्या क्रिकेटच्या अज्ञानाबद्दल बरेचसे किस्से वाचल्याचे आठवते.
कर्नल सीके नायडू म्हणजे वाघ होता. इंग्लंडच्या संघाविरुद्ध मुंबई जिमखान्यावर झालेल्या एका सामन्यात ह्या पठ्ठ्याने मोजून ११ षटकार मारल्याचे वाचनात आहे. एक षटकार इतका उत्तुंग होता की त्याने मुंबई विद्यापिठाच्या ’राजाबाई टॉवरच्या’ घडाळ्याची काच फोडली होती अशीही दंतकथा ऐकिवात आहे.
अजून काही किस्से असले तर येऊ द्या.
आणावकरांना आणि प्रियाली आपणा दोघांना धन्यवाद!

मस्त

एका वेगळ्या विषयावरचा रोचक लेख. याबद्दल कर्ता आणावकर आणि करविती प्रियाली दोघांचेही आभार. पूर्वी षटकार मासिकात अशा जुन्या काळच्या सुरस आणि मनोरंजक हकिकती येत असत, त्याची आठवण झाली.

>त्यावर इंग्लंडच्या एका खट्याळ पत्रकाराने त्यांच्याबद्दल "भारताच्या कप्तानाकडे धावांपेक्षा रोल्स-रॉईस अधिक आहेत"

आत्ताच्या काळात धावांपेक्षा मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट्स (नक्कीच) जास्त आहेत असे म्हणता येईल. :)

>रोज मैदानावर भरपूर प्रॅक्टिस करायची या दोन गोष्टींवर भर द्यायचे, त्यामुळे काही लाडावलेल्या खेळाडूंना ते आवडत नव्हते.

अजूनही आवडत नाही :)

अवांतर : हा दौरा १९३२ मध्ये झाला, याच वर्षात ब्रॅडमनचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंडचा कप्तान डग्लस जार्डीन याने बॉडीलाइन स्ट्रॅटेजी वापरली.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

लेख आवडला

लेख आवडला,
राजेंद्र म्हणतात त्याप्रमाणे संदीप पाटील च्या 'षटकार'ची आठवण झाली, आम्ही तेव्हा षटकार घेत असू,त्याची चातकासारखी वाट पाहत असू, आत्ता आत्तापर्यंत बरेच जुने अंक जपून ठेवले होते मग मध्ये केव्हातरी ते जड मनाने रद्दीत दिले.
स्वाती

फारच छान!

काही तरी सुरेख वाचायला मिळाले. असेच आणखी लेख येऊ द्यात.--वाचक्नवी

असेच

फारच छान! काही तरी सुरेख वाचायला मिळाले. असेच आणखी लेख येऊ द्यात.

वाचक्नवींशी सहमत आहे.

आपला
(क्रीडाप्रेमी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

आवडले!

वेगळा विषय... आवडले...!
आपला
गुंडोपंत

मस्त

वा. नवीन माहिती मिळाली आणि मनोरंजन सुद्धा झाले. आणावकरांनी खरच आणखी लिहावे. उपक्रमावर एका दमात टंकायला जमत नसल्यास. गमभन उतरवुन जमेल तसे लिहिता येइल. आम्ही पुढील लेखाची वाट पाहतो आहे.

मराठीत लिहा. वापरा.

चांगली माहिती मिळाली.

क्रिकेट म्हणजे आमचा सर्वाधिक आवडता खेळ. पण भारतीय क्रिकेटचा सुरुवातीचा इतिहास फारसा परीचित नाही.
चांगली माहिती मिळाली. असेच अजून लेखन येवू द्या!.

 
^ वर