"संस्कृतीची जपणूक"

शिक्षणाने समृद्ध झालेली आपली ही पिढी आपला कौटुंबिक सांस्कृतीक वारसा विसरत चाललेली आहे का, असे वाटायला लावणारी आजची परिस्थिती दुभंगत चाललेल्या कुटुंबांच्या माध्यमातून समोर येताना दिसते. जनरेशन ग्याप हा प्रेमाच्या, समजुतीच्या आणि संवादाच्या पुलाने भरून येण्यासाठी, नात्यांतील जिव्हाळा टिकवण्यासाठी आपणांकडून ठरवून अन जाणीवपूर्वक प्रयत्न व्ह्यायला हवेत.

नवी आव्हाने पेलताना, स्पर्धेत जगताना नात्यांशीही स्पर्धा होत चाललीय. ह्याच बाबतीत निदर्शनास आलेल्या काही गोष्टी आणि माझी वैयक्तिक मते (६ सप्टे.) लोकमत मधील 'सखी' ह्या पुरवणीत लेख स्वरुपात.
==============================================================

शाळेत असताना आम्ही दरवर्षी इन्सपेक्शनच्या वेळेस वर्ग धुवुन स्वच्छ करायचो आणि शिडी लावून भिंतीच्या सर्वांत वरच्या बाजूला असलेल्या बोर्डांवर रंगीत खडूने

मातृ देवो भव। पितृ देवो भव।
अतिथी देवो भव।
विद्या विनयेन शोभते।

असे लिहित असू, मग त्याच्या शेजारी वर्गाचे मित्रंमंडळ, सुविचार, अभ्यासविषय महत्वाची माहिती अशा प्रकारे चारही भिंती रंगवून वर्ग सुसंकृत भासवीण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत असू. आता शाळा संपली, कॉलेज झाले, नोकरी लागली, आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर आल्यावर अवती - भवती पाहून असे वाटायला लागले कि वर लिहिलेले हे नुसते सुभाशित.. रोजच्या जिंदगीत किती लोक हे पाळतात? प्रत्येक ठिकाणी असे नसेलही कदाचीत पण समोर जे आले, पाहिले त्यावरून मला असे वाटायला काहिच हरकत नव्हते.

आपल्या संस्कृतीनुसार माय-बाप हे दैवत. पत्नी ही अर्धांगीनी. वरील ओळींना न्याय द्यायचा तर तीची भूमिका ही अत्यंत महत्वाची. त्यामुळे ती जेथून येणार त्या लग्न संस्थेबद्दल आणि जेथे राहणार त्या कुटुंबसंस्थेबद्दल तिची असणारी अपेक्षा व विचार जाणून घेणे हे ओघाने आलेच. पुण्यात वधू-वर सूचक मंडळाच्या आकडेवारीनुसार स्वत: वंदना कुलकर्णी ह्या प्रसिद्ध समुपदेशकेने मांडलेली माहिती वाचली. हे सर्व एकूण मुलापेक्षा आई-वडिलांना धसका न बसेल तर नवलच. जोडीदाराच्या शोधात असलेल्या दहा पैकी सात शिक्षित मुलींना एकत्र कुटुंबात राहण्याची इच्छा नसते. आपले विचार आई-वडिलांना पटणार नाहीत, घरात भांडणे वाढण्यापेक्षा आपण वेगळेच राहू. हा त्यांचा स्टॅण्ड!!

मुलींचा सासरी होणारा मानसिक व शारिरीक छळ, त्यांची मुस्कटदाबी, करिअर बाबतचे स्वातंत्र्य, नवीन विचारशैलीशी जुळवून घेण्याची मोठ्यांची असमर्थता ह्या गोष्टि जरी ह्या मानसिकतेला काही अंशी कारणीभूत असल्या तरीही त्याची टक्केवारी ७०% जाण्यापर्यंत कुटुंबसंस्था वाईट झालेली नसावी.

नको रोजचे वाद-विवाद म्हणून बरेच लोक वेगळेपणाचा खटाटोप करतीलही. विजयी सूनबाई मोलकरिणीच्या हातात चाव्या सोपवत, मुलाला पाळणाघरात घालून,घरचा जमेल तसा स्वयंपाक करून कामाची तारेवरची कसरत करेलही. वेळेची गरज म्हणून त्या ते करत असतील तर त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे पण माझा 'वेगळा संसार'हा 'हट्ट' त्या पाठीमागे असेल तर ह्या त्यागाची, कष्टांची किव करावी असेच नाही का? भावा-भावांची वेगळी घरं जागेच्या वाढ्त्या समस्येमुळे होऊ शकतील पण म्हणून आई-वडिलांनाही आपल्यापासून दूर करणे कींवा वृद्दाश्रमाचा मार्ग काढून मोकळे होणे हाच उपाय शिल्लक राहतो का? कितीतरी कुटंबं एकाच गावांत वा शहरात असून वेगवेगळी राहताना आपण पाहतो. काहींची कारणे ही निराळी असतील पण ते विभक्त आहेत हि एक सत्यताच. या सर्व गोष्टींची वाढती व्यापकता लक्षात घेवून शेवटी शासनाला कायदा करावा लागला. वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी टाळणारया सुपुत्रांविरुद्ध थेट सरकार दरबारी अर्ज करता येणार आहे. पण आधीच शरीराने खंगलेल्या अन परिस्थितीने भंगलेल्या ह्या मनांना लढण्याची ताकद येणार कुठुण आणि तेही आपल्याच लोकांविरुद्ध. साक्षात ब्रम्हदेवानं जरी ही शक्ती त्यांना दिली, तरीही मिळालेला विजय हा त्यांच्यासाठी सर्वात दुर्दैवी नसेल का.

शांत विचार करत एका आई-वडिलांच्या भूमिकेत शिरलो. त्यांचा पूर्ण जीवन-पट नव्याने पाहण्याचा प्रयत्न केला. मूलाचा जन्म झाल्या-झाल्या त्यांच्या चेहरयावर आभाळ जिंकल्याचा आनंद दिसला, त्याच्या हट्टापायी आणलेली महागडि खेळणी पाहीली, शाळेत पहिल्या दिवशी सोडवून आल्यानंतर त्याच्या पाठमोरया आकृतीकडे बघताना त्यांच्या मनात निर्माण झालेले कौतुकाचे भाव टिपता आले. भोके पडलेला बनियन तसाच रेटत बापाने सहलीसाठी दिलेले पैसे, झिजलेली चप्पल तशीच झिजवत रनिंग कॉम्पीटिशन साठी आणलेले स्पोर्ट शूज, पुढे इंजि., मेडिकल अशा चांगल्या शिक्षणासाठी काटकसरीने जपत आलेल्या आपल्या उभ्या आयुष्याची त्यांनी लावलेली कमाई, नाही लागली कॅंपस मधून त्यावेळी धीराने टाकलेला तो खांद्यावरचा हात. आणि आता सर्व व्यवस्थित करून झाल्यावर "सूनबाई आली कि आम्ही मोकळे !" असा चारचौघात त्यांनी मिश्किलपणे टाकलेला उसासा. भूतकाळात कदाचीत आपणाकडून गृहीतच धरले गेलेले त्यांचे ते रंग अजूनच गडद होवून समोर येवू लागले. आपल्या पूर्वायुष्याचा 'बालपण ते बोहल्यापर्यंतचा' हाच जीवनपट घरात येणारया नविन मुलीने त्याच जाणीवेने अन निर्भेळ व सकारत्मक मनाने पाहीला तर वरील टक्केवारी कमी होण्याची काहीच शक्यता नाही का? नक्कीच आहे, गरज आहे ती जुन्या पिढीला समजून घेण्याची, त्यांना जपण्याची.

पैसा, गाडी, बंगला, कला, गुण ह्या सगळ्यांतून माणसं मोठी भासतांत पण ती अजूनही मोठी वाटतात आई-वडिलांवरील प्रेम आणि श्रद्धेमुळे. होस्टेल मध्ये असताना जवळचा मित्र, विवेककडे नेहमी जाणे व्हायचे. टि.व्हि. वर गाणी, क्रिकेटची मॅच पाहताना, काकू बाहेरच्या खोलीत येऊन आठवण करून देत, "आरे, आवाज जरा कमी करा, आजी झोपलीय आत". यावरूनच काका-काकूंनी आजींना वय वर्षे ९७ पर्यंत कसे जपले असेल याची प्रचिती येते. नुकताच ग्रॅज्युएट झालेला माझा भाचा, बंटी नोकरीच्या पहिल्या पगारातून आणलेली साडी आजीला देण्यासाठी पुण्यास आला. तिला नमस्कार करून निरोप घेताना त्याचे भरून आलेले डोळे पुसताना ती आजीही मनातून किती भिजली असेल. जबाबदारीला ओझ्याचं स्वरूप येऊ न देता हसतमुखाने नात्यांची गुंफण विणणारे 'काका-काकू' अन 'बंटी' सारखी आचारशैली घडवणारी कुटुंबकेंद्रे असतील तर येणारया नव्या पिढीलाही ते हाच वारसा देतील.

शेवटी माणसाचे खरे आस्तित्व जाणवत असते ते धर्म, राष्ट्र, मूल्यं, आणि संस्कृति वरून. कुटुंबसंस्था आणि त्यातील माता-पित्याचे स्थान हाही आपल्या संस्कृतिचाच एक भाग. या गोष्टी केवळ वाचण्यापुरत्या किंवा बोर्डावर लिहिण्यापुरत्या सिमीत व्ह्यायला नको. हे पाळणे फार जिकिरीचे आहे असेही नाही त्यासाठी सोडावे लागेल स्व:त्व, मी पणा, अन जपावे लागेल एक संवेदनशील मन.....

आणि संस्कृती म्हणजे तरी काय....???

"अभि, तूच ये ना जावून राणीच्या मुलीच्या वाढदिवसाला...आज ऑफ़िस मधे फ़ारच आग्रह करत होती ती, मी घरी थांबते...आईंना ताप जरा जास्तच वाटतोय"
"काही नको, मला असं काय होणार आहे चार-पाच तासांत....अभि, घेवून जा रे अशुला....
आणि हो....फ़ार उशीर लावू नका रे...., हेल्मेट आणि स्कार्फ घ्या बरोबर!"

हिच आपली संस्कृती ना....

सुनील चोरे - बेल्हे, (पुणे)

लेखनविषय: दुवे:

Comments

ही पण संस्कृती

Aajacha Sudharak Oct 2007" alt="">

वर वर पाहता

लेख चांगला आहे, शेवटही उत्तम आहे पण लेखावर विचार करता काही मुद्दे खटकण्यासारखे आहेत.

लेखाचा सूर असा की लग्न करून येणार्‍या मुलीने तडजोड करावी. सासरच्यांना समजून घ्यावे. सासू-सासर्‍यांच्या व्यथा आणि कथा जाणून घ्याव्यात. मुलाची बाजू किंवा बायकोकरता तो किती तडजोड करतो ते लेखात दिसतच नाही.

मुलींचा सासरी होणारा मानसिक व शारिरीक छळ, त्यांची मुस्कटदाबी, करिअर बाबतचे स्वातंत्र्य, नवीन विचारशैलीशी जुळवून घेण्याची मोठ्यांची असमर्थता ह्या गोष्टि जरी ह्या मानसिकतेला काही अंशी कारणीभूत असल्या तरीही त्याची टक्केवारी ७०% जाण्यापर्यंत कुटुंबसंस्था वाईट झालेली नसावी.

या गोष्टी तर फार पुढच्या झाल्या पण अगदी साध्या गोष्टीतून मुलीची कुचंबणा होते हे इतरांना लक्षात येत असावे का? नुकतेच लग्न झालेल्या आणि वरवर सर्व आलबेल असलेल्या नववधूच्या मनात पुढील विचार येत नसतील का?

"बघा किती आरामात सोफ्यावर पाय वर करून चहा पितोय. वर्तमानपत्रात डोकं तर इतकं खुपसलंय की बाजूला मी संकोचून उभी आहे याचा पत्ताही नाही. बहुधा, हा त्याचा नित्यक्रम असेल. आई हातात चहाचा कप देते आणि ताजं वर्तमानपत्र उघडून दोघांचे आस्वाद घ्यायचे. मी कुठे बसू चहाचा कप घेऊन? डायनिंग टेबलवर की सोफ्यावर? मी कशी सोफ्यावर ऐसपैस बसू? कालपर्यंत मलाही आई चहा आणून देत होती आणि पेपरवाला वर्तमानपत्र टाकून गेला की धावत जाऊन मी पहिला नंबर लावत असे. आज मात्र या चार परक्या लोकांत मला मागे राहावं लागणार."

हा बहुधा अगदी सहज विचार आहे आणि त्यात जाणवेल इतपत कुचंबणाही आहे. हल्लीच्या मुलींना जसे वाढवले जाते, शिकवले जाते त्यांच्याकडून एकत्र कुटुंबात राहून तडजोडी करण्याची अपेक्षा करणे कठिण आहे या सत्याला सामोरे जायलाच हवे. मुंबई-पुण्यासारख्या काडेपेट्यांच्या आकारांच्या घरात आपल्या नवर्‍याशी मनमोकळे भांडता यावे इतकी अपेक्षाही पूर्ण होणे कठिण असते.

वृद्धत्वाचा बाऊ आपल्या समाजात जितका केला जातो तितका तो इतरत्र होत नसावा. यात सर्वच गैर मानता येणार नाही कारण आपण मुलांना आपली भविष्यातील हुंडी म्हणून पाहत असतो. वेळ आली की वटवायची या हेतूने. एकंदरीत समाजरचनाच तशी असल्याने वृद्धत्व आल्यावर मुलांवर अवलंबून राहणे येते. आता वय झालं, आपला उपयोग शून्य ही भावना आपल्याकडील मोठ्यांच्या मनात रुजलेली आढळते. मुलांनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करू नयेच पण जग झपाट्याने बदलते आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. केवळ सुनेने नाही किंवा सासूने नाही.

आणि आता सर्व व्यवस्थित करून झाल्यावर "सूनबाई आली कि आम्ही मोकळे !" असा चारचौघात त्यांनी मिश्किलपणे टाकलेला उसासा.

हे तरी कोठे खरे? सूनबाई बँके, एलआयसीतली असली तर ठीक (मरण बिचारीचं, बाहेर नोकरी करा आणि घरातही व्यवस्थित मदत.) पण करिअर सांभाळणारी असली तर संध्याकाळी सासूच तिला गरमागरम पोळ्या करून वाढते. दोन चार वर्षांच्या नातवंडांमागे धावून आपली थकलेली हाडे मोडून घ्यावी लागतात. पूर्वी आजी घरी असायची, तेव्हा बर्‍याचशा आई-काकूही घरीच असायच्या.

मागे एकदा टग्यादादांनी वानप्रस्थाश्रमाबद्दल लिहिले होते. आपल्याकडे "वृद्धाश्रम" या संज्ञेकडे अतिशय हेटाळणीने पाहिले जाते. परंतु, समवयस्क लोकांबरोबर राहणे, दैनंदिन व्यवहारातून आपल्याला मोकळे करून घेणे, उर्वरित आयुष्याचा उपभोग घेणे आणि मुलांना त्यांचे आयुष्य त्यांच्या परीने जगू देणे गैर काय आहे?

एकमेकांची काळजी करणे, सेवा करणे, एकोप्याने राहणे या गोष्टी कोणत्याही संस्कृतीत चांगल्याच असतात. परंतु, एकोप्याने राहणे म्हणजे एकत्र राहणे नाही हे समजून घेण्यासारखे आहे. एकत्र न राहता, मनाने आणि जमल्यास शरीराने जवळ राहून एकोप्याने राहणे अधिक सोपे असते.

प्रश्न आहे शिक्षणा बरोबरच्या संस्कारांचा....

हल्लीच्या मुलींना जसे वाढवले जाते, शिकवले जाते त्यांच्याकडून एकत्र कुटुंबात राहून तडजोडी करण्याची अपेक्षा करणे कठिण आहे या सत्याला सामोरे जायलाच हवे. मुंबई-पुण्यासारख्या काडेपेट्यांच्या आकारांच्या घरात आपल्या नवर्‍याशी मनमोकळे भांडता यावे इतकी अपेक्षाही पूर्ण होणे कठिण असते.
वृद्धत्वाचा बाऊ आपल्या समाजात जितका केला जातो तितका तो इतरत्र होत नसावा. यात सर्वच गैर मानता येणार नाही कारण आपण मुलांना आपली भविष्यातील हुंडी म्हणून पाहत असतो. वेळ आली की वटवायची या हेतूने.

आटा-पीटा करून भल्या मोठ्या डिगरयांचे शिक्षण देवून फुलाप्रमाणे जपलेल्या आपल्या मुलीला प्रापंचीक काट्यांची तोंड ओळख करून देणे हे सुद्धा वधु माय-पित्याचं एक काम. लग्नातून नाती घडली जावीत.... संसारच काय पण किती-तरी गोष्टीं बरोबर आपण तडजोड करत असतो. आतापर्यंतची सगळी कमाई मुला-बाळांवर घालविलेल्यांनी, पेन्शनचीही साथ नसलेल्यांनी काय करावे? त्यांचा हुंडीचा स्वार्थ जरी असला असे घटकाभर समजले, तरी ती वटवून त्यातून मजा मारण्याचे त्यांचे वय राहीलेले असते का?

कोणत्याही शिक्षणात तुम्ही तडजोड करू नका, एकत्र राहू नका असे सांगितले जात नाही. उलट शिक्षणामुळे दृष्टी व्यापक व्हावी, योग्य-अयोग्य यातील भेद कळावा. ते फक्त उदरभरणाचे साधन नाही. प्रश्न आहे शिक्षणा बरोबरच्या संस्कारांचा....

खरा प्रश्न आहे...

आटा-पीटा करून भल्या मोठ्या डिगरयांचे शिक्षण देवून फुलाप्रमाणे जपलेल्या आपल्या मुलीला प्रापंचीक काट्यांची तोंड ओळख करून देणे हे सुद्धा वधु माय-पित्याचं एक काम.

मला वाटतं अद्यापतरी बहुतांश माता पिता हे काम चोख करतात. तसे त्यांनी करावेच का? आणि का करावे असा प्रश्न आहे. आजच्या युगात हा खरा प्रश्न वधुपालकांचा नसून वरपालकांचा आहे. कारण मुलाला अगदी हेच सांगितलं जातं का? प्रापंचिक काट्यांची ओळख त्याला करून दिली जाते का? खूप तटस्थ विचार केला तर उत्तर नाही असेच मिळेल.

लग्नात तुला एकुलती एक कन्या असलेली बायको मिळाली तर तिच्या आईवडिलांकडे मुलाप्रमाणे राहून किंवा वेगळे राहून तरी त्यांची काळजी घ्यावी लागते हे अद्यापही वरपालक मुलाच्या मनावर ठसवत नाहीत.

आतापर्यंतची सगळी कमाई मुला-बाळांवर घालविलेल्यांनी, पेन्शनचीही साथ नसलेल्यांनी काय करावे?

हाच मोठा प्रश्न भारतात आहे. यावर योग्य उपाय म्हणजे आपल्या मुलांवर आपल्या कष्टाची सर्व कमाई घालवताना आपल्या उर्वरित आयुष्याची पुंजी साठवत जाणे. आपल्या "तथाकथित" संस्कृतीला हा उपाय सध्या पचनी पडत नसला तरी कालांतराने तो मान्य करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही.

त्यांचा हुंडीचा स्वार्थ जरी असला असे घटकाभर समजले, तरी ती वटवून त्यातून मजा मारण्याचे त्यांचे वय राहीलेले असते का?

हा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणण्यापेक्षा आपल्या समाजातला कॉम्प्लेक्स आहे. यावर वेळ झाला की सविस्तर लिहिन. परंतु येथे एवढेच लिहिते. मजा मारण्यासाठी वयाची अट नसते. आपल्याला झेपेल, पचेल ती मजा माणसाने कोणत्याही वयात मारावी.

स्टेपफोर्ड वाइव्झ

योगायोगाने कालच मी स्टेप्फोर्ड वाइव्झ हा चित्रपट पाहिला.
तो जरी गमतीदार असला तरी मला आवडला नव्हता.
ज्या पुरुषांना वाटते की "बायकोने विशेष प्रयत्न करून मनमिळावू, हरहुन्नरी, गृहकर्तव्यदक्ष असावे, अशातच आपली संस्कृती आहे, पुरुषांनी फक्त माणसाला जमेल तितके कुटुंबवत्सल असून बाहेरच्या जगात वावरावे"; अशा पुरुषांची त्या चित्रपटात थट्टा केलेली आहे.

("कुटुंबसंस्थेबाबत आपली संस्कृती पूर्वी चांगली होती आणि आता बिघडली आहे" हा आर्त आक्रोश भारतासारखा अमेरिकेतही ऐकू येतो.)

चित्रपट न आवडण्याचे कारण हे, की मला वाटले की अशी टोकाची मते असलेले पुरुष आजच्या जमान्यात कुठेच नाहीत, त्यामुळे हा चित्रपट केवळ भडक आणि निरर्थक आहे. हा लेख वाचून तो चित्रपट पूर्णपणे निरर्थक नाही असे वाटू लागले आहे.

आपल्या संस्कृतीनुसार माय-बाप हे दैवत. पत्नी ही अर्धांगीनी. वरील ओळींना न्याय द्यायचा तर तीची भूमिका ही अत्यंत महत्वाची.

पत्नी हे अर्धेच अंग? या संस्कृतीला शिरोधार्य मनायचे? शिवाय मुलीला तिचे आईवडील दैवते नाहीत काय? त्यांना तर एकटेच सोडून देणार असे या लेखाने गृहीत धरलेले दिसते. फक्त मुलाच्या आईवडलांच्या देवत्वाचा विचार का?

जोडीदाराच्या शोधात असलेल्या दहा पैकी सात शिक्षित मुलींना एकत्र कुटुंबात राहण्याची इच्छा नसते. आपले विचार आई-वडिलांना पटणार नाहीत, घरात भांडणे वाढण्यापेक्षा आपण वेगळेच राहू. हा त्यांचा स्टॅण्ड!!

जोडीदारणीच्या शोधात असलेल्या मुलांचा काय विचार आहे? कमीतकमी मुलीला भाऊ नसेल तर तिच्या आईवडलांबरोबर एका घरात राहायला होकार देणारे किती सापडतील? पूर्वीच्या संस्कृतीच्या काळात तरी मुलीच्या आईवडलांकडे असलेले कर्तव्य कोणीच मानून घेतले नसते. ("मुलगी हे परक्याचे धन, मुलगा हा कुलाचा दीपक, इ.इ." असे लोक म्हणतात त्यावरून माझा असा निष्कर्ष आहे.)

भावा-भावांची वेगळी घरं जागेच्या वाढ्त्या समस्येमुळे होऊ शकतील पण म्हणून आई-वडिलांनाही आपल्यापासून दूर करणे कींवा वृद्दाश्रमाचा मार्ग काढून मोकळे होणे हाच उपाय शिल्लक राहतो का?

एक भाऊ सोडून सगळ्यांनी विभक्त होण्यास लेखक मान्यता देतात असे दिसते. "जागेच्या समस्येमुळे" विभक्त झालेल्या भाऊ क्र २, ३, ४ यांच्या बायकांना चावी मोलकरणीकडे द्यावी लागेल, नाही का?

पण लेखकाचे एक पटले, की समाज जसा बदलतो, तसा दोन पिढ्यांमधला जिव्हाळा सांभाळून बदल व्हावा. त्यासाठी एक विशिष्ट धर्मव्यवस्था, राज्यव्यवस्था, कुटुंबव्यवस्था राहिली पाहिजे असे काही नाही. या सर्व व्यवस्था प्रवाही असून संस्कृती टिकू शकावी असे वाटते.

शेवटी माणसाचे खरे आस्तित्व जाणवत असते ते धर्म, राष्ट्र, मूल्यं, आणि संस्कृति वरून.

शिवाशीव आणि सोवळे-ओवळे, हे माझ्या आजी-पणजीच्या काळात "धर्म"मध्ये मोडत, माझ्या आईच्या शिकवणीप्रमाणे नाही मोडत. इथे माझ्या आईने तिच्या आईच्या संस्कृतीचा अपमान केला नाही असे माझे मत आहे. माझ्या आईच्या पिढीने अशा प्रकारे कशाला "धर्म" म्हणतात, त्यात रोजव्यवहारात घडीघडी जाणवेल असा बदल घडवून आणला.
माझ्या आज्या-पणजाच्या काळात "राष्ट्र" म्हणजे १. भो पंचम जॉर्ज भूप चे साम्राज्य २. ब्रह्मदेश-अफगाणिस्तान-सह अखंड भारत ३. अखंड भारत ४. शिवशाहीतले स्वराज्य ५. पेशवाईतले स्वराज्य...; अशी वेगवेगळी वर्णने लागू होती. मला साधारण भारताची राज्यघटना सांगते तितपतच राष्ट्राचे प्रेम आहे (बाकी मानवजातीचे आहे, तितपत अफगाण, ब्रह्मदेशी लोकांचे आहे). म्हणजे "राष्ट्र" ही कल्पना प्रवाही आहे. मला "पूर्ण इंग्रज साम्राज्याचे" किंवा "फक्त शिवशाहीचे" राष्ट्रप्रेम नाही, यात माझ्या पणजाचा आणि खापर-खापर पणजाचा सांस्कृतिक अवमान नाही, असे माझे मत आहे.
"मूल्य" हा प्रकार अर्थाच्या बाबतीत फारच निसरडा आहे. उदाहरणार्थ "राजभक्ती" हे "मूल्य" आहे असा माझा कयास आहे. किंवा शिवशाहीतल्या गोष्टींमधून ते मूल्य असावे अशी माझी कल्पना आहे. पण जो कोणी आज पंतप्रधान आहे त्याच्यावर(च) अनन्य भक्ती करणे हे लोकशाहीच्या मूल्यांच्या विरोधी आहे. त्यामुळे "मूल्य" नावाची काहीतरी खूप महत्त्वाची कल्पना आहे, हे मी मानतो; पण त्यामध्ये कुठल्या यादीचा समावेश होतो, त्याविषयी दुमत असू शकते.
तीच गोष्ट "संस्कृती" शब्दाबद्दल - हा काहीतरी महत्त्वाचा प्रकार आहे, पण त्याच्या अंतर्गत कुठल्या बाबी येतात, याविषयी चर्चा होऊ शकते.

पुढीलप्रमाणे आपली संस्कृती आधी नव्हती, आता नाही पण पुढे व्हावी अशी इच्छा मी येथे व्यक्त करतो :
"अनु, तूच ये ना जावून राणीच्या मुलीच्या वाढदिवसाला...आज ऑफ़िस मधे फ़ारच आग्रह करत होती ती, मी घरी थांबतो...सासूबाईंना ताप जरा जास्तच वाटतोय"
"काही नको, मला असं काय होणार आहे चार-पाच तासांत....अनु, घेवून जा ग अशुला....
आणि हो....फ़ार उशीर लावू नकोस ग...., हेल्मेट आणि स्कार्फ घ्या दोघेजण बरोबर!"

माझा प्रतिसाद थोडासा उपहासात्मक वाटू शकेल म्हणून शेवटी पुन्हा लेखकाचे जे पटते ते सांगतो - वडीलधार्‍यांत आणि पुढच्या पिढीत प्रेमळपणा राहावा असे मलाही वाटते. अर्थव्यवस्था बदलत असल्यामुळे कुटुंबव्यवस्था तशी बदलणारच. ती बदलताना कुटुंबातले प्रेम, जिव्हाळा नाश पावू नये.

मुलीच्या घरचे-मुलाच्या घरचे असा भेदभाव नसावा...

सुनेकडून मुलीची अपेक्षा करणारयांनी देखील तीला मुलीचेच प्रेम देणे अपेक्षित आहे. आई-वडिलांचे जसे मुलाला कर्ते बनविन्यात मोठे योगदान असते तसे मुलीला देखील तिच्या घरचे तेवढ्याच प्रेमाणे वाढवितात.

परवा येथे चेन्नईत माझ्या घर-मालकाशी बरीच विस्तृत चर्चा झाली. त्या आजोबांचा एकुलता मुलगा आणि सुनबाई अमेरिकेत आहेत. आजोबा, आजींना अजून दोन मुली. आजोबा म्हणाले माझे दोघेही जावई आम्हा दांपत्यांची अगदी मुलाप्रमाणेच काळजी घेतात. शक्यतो मला त्यांना त्रास देणे योग्य वाटत नाही. दर रविवारी कींवा जमेल तसे ते आमच्या घरी येतात, मुली-नातवंडांबरोबर मस्त टाईम जातो.

सांगण्याचे तात्प्रर्य एवढेच की नात्यां मधे मुलीच्या घरचे-मुलाच्या घरचे असा भेदभाव नसावा. आई-बाबांची साठी आनंदाने साजरी करणारयांनी सासू-सासरय़ांच्या लग्नाच्या वाढ-दिवसाला तितक्याच उत्सहाने हजर का राहू नये???

एक भाऊ सोडून सगळ्यांनी विभक्त होण्यास लेखक मान्यता देतात असे दिसते. "जागेच्या समस्येमुळे" विभक्त झालेल्या भाऊ क्र २, ३, ४ यांच्या बायकांना चावी मोलकरणीकडे द्यावी लागेल, नाही का?

आता हे टोटल किती भाऊ आहेत त्यावर अवलंबून ...दुसरे....ज्या क्रमांकाच्या घरी आपल्या हजेरीत भांड्यांची विनाकारण आदळ-आपट होणार नाही, त्या भाऊ-साहेबांच्या घराला चाव्यांची काळजी करायची कमी गरज. :-)

---लेखक

आदर्श अपेक्षा

सुनेकडून मुलीची अपेक्षा करणारयांनी देखील तीला मुलीचेच प्रेम देणे अपेक्षित आहे.

लेखकाची ही अपेक्षा आदर्श अपेक्षा आहे. त्यात चुकीचे काही नाही पण ती व्यावहारिकही नाही. पोटच्या मुलांना आपण लहानपणापासून मायेने वाढवतो. ती माया एखाद्या वाढलेल्या परक्या मुलीला लावणे तेवढे सोपे नसते. लावायला गेलं तरी त्या मुलीला त्याची आवश्यकता असते असे नाही. असे संबंध अशक्य असते असे म्हणणार नाही पण सोपे खचितच नसते, हृदयापासून आलेले नसते. एक उदाहरण आठवले.

मागे एकदा एका भरल्या घरातील (भरल्या म्हणजे बर्‍यापैकी आलबेल असलेल्या) एक सून सासूची गंमत सांगत होती. "आमच्या घरात पापलेट आलं ना की त्याचे मधले तुकडे संजूला (नवर्‍याला) जातात. मला मात्र हमखास शेपटीकडचा आणि डोक्याकडचा तुकडा येतो." यांत तिला खूप वाईट वाटत होतं असं नव्हतं पण खटकत असावं (म्हणून तर बोलून दाखवावसं वाटलं). सासूही तो प्रकार मुद्दाम करत असावी असं नाही पण लहानपणापासून पोटच्या पोराला उत्तम ते देण्याची सवय लागल्याने हे आपसूक होत असावं.

याउलट, जावयाला सासू-सासरे अगदी पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करताना, कौतुक करताना दिसतात. यामागे, आपल्या मुलीला सासरी त्रास होऊ नये ही आप्पलपोटी भावनाच अधिक असते.

मुले-मुली सारख्याच, तर कुटुंबव्यवस्था बदलावी लागेल

सांगण्याचे तात्प्रर्य एवढेच की नात्यां मधे मुलीच्या घरचे-मुलाच्या घरचे असा भेदभाव नसावा.

मोलाचे बोललात.
आजकालच्या कुटुंबात अनेक आईवडलांना मुलीच असतील (साधारण २५% हम-दो-हमारे-दो कुटुंबे अशी असतील हा ढोबळ हिशोब). त्यामुळे सून ही नवर्‍याच्या घरची होईल ही कुटुंबव्यवस्था हळूहळू बदलत जावी लागेल.
एकच चूल आणि भांडणे, या स्थितीपेक्षा मला तुमच्या घरमालकांच्या घरची स्थिती आवडली. तुमच्या घरमालकांसारखे भेटीभेटीत खेळीमेळीचे वातावरण असले तरी पुरे - मग आजी-आजोबा, मुलगे-सुना, मुली-जावई, सर्व कुटुंबाच्या चुली वेगवेगळ्या कट्ट्यांवरती पेटत असल्या तरी काही वाईट नाही.

उपहासात्मक वाटला नाही

माझा प्रतिसाद थोडासा उपहासात्मक वाटू शकेल म्हणून शेवटी पुन्हा लेखकाचे जे पटते ते सांगतो - वडीलधार्‍यांत आणि पुढच्या पिढीत प्रेमळपणा राहावा असे मलाही वाटते. अर्थव्यवस्था बदलत असल्यामुळे कुटुंबव्यवस्था तशी बदलणारच. ती बदलताना कुटुंबातले प्रेम, जिव्हाळा नाश पावू नये.

हा प्रतिसाद अजिबात उपहासात्मक वाटला नाही.
२१ आक्टोबर २००७ लोकसत्तेतील लोकरंग पुरवणीतील " विंडोतून डोकावणारी बदलती नाती" हा चिन्मय बोरकर यांचा लेख अप्रतिम आहे.
http://loksatta.com/daily/20071021/lokkal.htm इथे तो लेख आवर्जून वाचा. नीट दिसला नाही तर रिफ्रेश करा.

जागतिकिकरणाचा परिणाम केवळ आर्थिक वा तंत्रज्य़ान क्षेत्रावर होत नाहीत, तर ते नाते संबंधांवरही होतात. आय.टी. संलग्न क्षेत्रात सध्या लग्न टिकणे ही समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे येत्या काळात हा प्रश्न अधिक व्यापक होणार आहे. आधुनिकतेच्या प्रचंड फोर्स मध्ये पारंपारिक व्यवस्थांना धक्के बसत आहेत. नात्यांची वीण बदलत आहे.

इतिहासाचार्य राजवाड्यांचा " भारतीय विवाह संस्थेचा इतिहास" वाचला कि माझे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज किंवा लिव्ह इन रिलेशनशिप हे भारतात लवकरच रुजेल हे आमचे नेहमीचेच सामाजिक भाकीत पुनश्च वर्तवतो..
या भाकितासाठी आम्हि हर्षल, नेपचुन. प्लेटो या नव्या ग्रहांना वेठीस धरतो.

प्रकाश घाटपांडे

छान..

सुनील,

छान लिहितोस तू. असाच लिहीत रहा...

तात्या.

तात्या धन्यवाद....

तात्या,
धन्यवाद!!

आश्चर्य

लेखातील काही मुद्दे वाचून आश्चर्य वाटले. याच संदर्भातील एका चर्चेला प्रतिसाद आधीही दिला आहे. शिवाय प्रियाली आणि धनंजय यांनीही चांगले मुद्दे मांडले आहेत. तेच मुद्दे परत मांडण्यापेक्षा वेगळे लिहीण्याचा प्रयत्न करतो.

अवती - भवती पाहून असे वाटायला लागले कि वर लिहिलेले हे नुसते सुभाशित..

आम्हीही शाळेत अशी सुभाषिते रोज लिहीत असू. नंतर लक्षात आले बर्‍याचशा सुभाषितांचा रोजच्या आयुष्यामध्ये काहीही उपयोग नसतो.
उदा.
लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे(आजच्या आयटी युगात याला जास्त अर्थ उरलेला नाही.)
केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद बना. (इथे आयदर-ऑर का? दोन्ही करता येईल की. आइनस्टाइनचा फोटू बघा. :) )
ब्लड इज थिकर दॅन वॉटर (सर्वांच्या अनुभवामध्ये हे सुभाषित खोटे ठरवणारा एक तरी नातेवाईक असतोच.)
अतिथी देवो भव (डिट्टो)
अशाच प्रकारची स्त्रियांबद्दलची सुभाषिते तर फारच डेडली असतात. पती हा परमेश्वर असतो, लाज हा स्त्रीचा दगिना आहे वगैरे.

पैसा, गाडी, बंगला, कला, गुण ह्या सगळ्यांतून माणसं मोठी भासतांत पण ती अजूनही मोठी वाटतात आई-वडिलांवरील प्रेम आणि श्रद्धेमुळे.

इथे शिरीष कणेकरांच्या एका लेखातील त्यांच्या आईचे वर्णन आठवले. भूक लागली असे सांगितल्यावर त्यांच्या आईचे उत्तर असे, "आत्ताच खाल्लस ना मेल्या, आता हाडं खा माझी." यातील विनोदाचा भाग सोडून देऊ. मुद्दा हा की कुठलेही नाते आदर्शाच्या पातळीवर नेणे बरोबर नाही.

शेवटी माणसाचे खरे आस्तित्व जाणवत असते ते धर्म, राष्ट्र, मूल्यं, आणि संस्कृति वरून.

हे सापेक्ष आहे. जर मी आफ्रिकेच्या कलाहारी वाळवंटात जन्मलो असतो, तर तिथल्या बुशमनची संस्कृती माझी संस्कृती झाली असती** आणि माझी भाषा मराठी न होता क्लिक-क्लिक झाली असती. मूल्येही संस्कृतीवर अवलंबून आहेत. कॅमेरूनमध्ये एकापेक्षा अधिक बायका असणे कायदेशीर आहे. त्यांच्या दृष्टीने ही त्यांची मूल्ये आहेत. आपलीच मूल्ये सर्वात महान हे कुणी आणि कसे ठरवायचे?

आणि संस्कृती म्हणजे तरी काय....???
"अभि, तूच ये ना जावून राणीच्या मुलीच्या वाढदिवसाला...आज ऑफ़िस मधे फ़ारच आग्रह करत होती ती, मी घरी थांबते...आईंना ताप जरा जास्तच वाटतोय"
"काही नको, मला असं काय होणार आहे चार-पाच तासांत....अभि, घेवून जा रे अशुला....
आणि हो....फ़ार उशीर लावू नका रे...., हेल्मेट आणि स्कार्फ घ्या बरोबर!"

ही संस्कृतीबद्दलची वाक्ये म्हणजे "और ये लगा सिक्सर." :)
बायको म्हणजे फुकट घर सांभाळणारी मेड सर्विस ही जर खरेच आपली संस्कृती असेल तर मी अशा संस्कृतीचा भाग न होणे पसंत करेन. धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे हा प्रतिसादही उपहासात्मक वाटू शकतो. कठोरपणाला पर्याय म्हणून विनोदाचे सहाय्य घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. गैरसमज नसावा.

**कुणी सांगावं, चर्चांमध्ये कळफलक बडवण्यापेक्षा उघड्या माळरानावरची ता़जी हवा खात लंगोटी लावून शेकोटीभोवती नाचणे अधिक रोमांचक ठरले असते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

भावनिक जिव्हाळ्याचा अर्थ 'मेड सर्विस' म्हणून घेतला जात असेल तर्

घरातल्या प्रत्येकाने एकमेकांना मायेची ऊब देणं, दुखण्या-खुपण्यात मदत करणं ही का 'मेड सर्विस' ठरू शकते? मेड तुम्हाला सेवा पुरविते, तो संबंध पैशापुरता. आपल्या माणसाच्या केवळ नुसत्या जवळ असण्यानेही वेदना नाहीशा होतात. असे सुख-दु:खाचे प्रसंगच नाती अजून बळकट करतात.

एका भावनिक जिव्हाळ्याचा अर्थ 'मेड सर्विस' म्हणून घेतला जात असेल तर, 'संस्कृती' फार दूर निखळ प्रेमाचा अर्थ ही समजणे कठीण होईल.

असे नाही

प्रेम, जिव्हाळा याबद्दल काहीच आक्षेप नाही. फक्त या गोष्टी स्त्रियांकडूनच आल्या पाहिजेत अशी सक्ती नको. स्त्री आणि पुरूष या दोघांनी त्यात समान सहभाग घ्यायला हवा. या संदर्भात धनंजय यांनी बदललेली वाक्ये अधिक पटतात.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

कुटुंब म्हणजे फक्त 'स्री' च असा होत नाही.

धनंजय यांना पाठविलेला प्रतिसाद पहावा. कुटुंब म्हणजे फक्त 'स्री' च असा होत नाही.

आजारी माणूस घरी असताना त्याच्या काळजी साठी पत्नी ने घरी थांबले तर ती 'मेड' होत नाही. तसेच ऑफिस वरून घरी लवकर आलेल्या नवरय़ाने भाताचा कूकर लावून दमून आलेल्या आपल्या पत्नीला गरम चहाचा कप हातात द्यावा, यात काय तो बैलोबा ठरत नाही.

---लेखक...

समानता

कुटुंब म्हणजे फक्त 'स्री' च असा होत नाही.

लेखाच्या शेवटची संस्कृतीदर्शक दोन्ही वाक्ये स्त्रीने म्हटलेली आहेत.

तसेच ऑफिस वरून घरी लवकर आलेल्या नवरय़ाने भाताचा कूकर लावून दमून आलेल्या आपल्या पत्नीला गरम चहाचा कप हातात द्यावा, यात काय तो बैलोबा ठरत नाही.

अर्थातच नाही, आणि असे कुठे म्हटल्याचेही स्मरत नाही. उलट हे वाक्य संस्कृतीदर्शक म्हणून आले असते तर प्रश्नच मिटला असता.
मुद्दा इतकाच आहे की घरातील कामाची जबाबदारी दोघांनी वाटून घ्यावी. परंपरेनुसार फक्त स्त्रीवर त्याचा सर्व बोजा पडू नये.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

बायकोविषयी कल्पना


तसेच ऑफिस वरून घरी लवकर आलेल्या नवरय़ाने भाताचा कूकर लावून दमून आलेल्या आपल्या पत्नीला गरम चहाचा कप हातात द्यावा, यात काय तो बैलोबा ठरत नाही.

तत्वतः मान्य आहे पण एकदम पचनी पडणार नाही, हजारो वर्षांची परंपरा एकदम् जाणार नाही. काहि अवधी द्यावा लागेल.

कार्येषु मंत्री
करुणेषू दासी॥
भोजनेषू माता
शयनेषु रम्भा ।
या कल्पना आजही बायकोविषयी आहेत. या संकल्पना बाळगून आपल घरट मोडु नये यासाठी प्रयत्न करणरी स्त्रीला अष्टावधानी असाव लागत. Multitasking Mode ख्ररं तर् घर चालवणे हा फुल टाईम बिझीनिसे आहे. एखादी गोष्ट निर्माण करण्या पेक्षा सुरळित ठेवण्यासाठी जास्त खर्च येतो.
प्रकाश घाटपांडे

खरे आहे

तत्वतः मान्य आहे पण एकदम पचनी पडणार नाही, हजारो वर्षांची परंपरा एकदम् जाणार नाही. काहि अवधी द्यावा लागेल.

खरे आहे. हजारो वर्षांच्या कंडिशनिंगमुळे पुरूषधार्जिण परंपरेची मानसिकता खोलवर रूजली आहे. तिला मुळापासून काढून टाकायला वेळ लागेल. पण यात हळूहळू बदल होतो आहे हे पाहून आशा वाटते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

बदल

हा प्रतिसाद आरागॉर्न यांना नाही.

>> पण यात हळूहळू बदल होतो आहे हे पाहून आशा वाटते.
हे बरोबरच. पण या बदलांनाच संस्कृती बुडत चालल्याचे नाव दिले जाते (सरळपणे नाही). म्हणजे हे बदल वाईट आहेत असे थेट म्हणायचे नाही पण पूर्वी असे असे होते आता ते राहिले नाही असे म्हणायचे. 'राहिले नाही' यातच ते रहायला हवे होते असे सुचवणे असते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

हो नक्कीच!

चर्चांमध्ये कळफलक बडवण्यापेक्षा उघड्या माळरानावरची ता़जी हवा खात लंगोटी लावून शेकोटीभोवती नाचणे अधिक रोमांचक ठरले असते.

वा आवडले! ट्राय करायला हरकत नाही... ;))

आपला
लंगोटिया
गुंडोपंत

बदलते वातावरण

लेख आवडला, मुळात एक पटण्यासारखे आहे की एका घरच्या माणसांनी एकमेकांना धरून रहावे.

तुम्ही म्हणता ते ऐकिवात आहे. अनेक मुली चुकीच्या पद्धतीने हट्ट करत असताना दिसतात. पण हल्ली वातावरण इतके बदलते आहे की कोण बरोबर कोण चूक हेच कळेनासे झाले आहे. मुलींना हल्ली मुलगा राहत असलेले शहर, नातेवाईक, त्याच्या कामाचे स्वरूप इत्यादी अनेक गोष्टी तपासून लग्न करायचे असते. त्यात कधीकधी त्यांच्या मागण्या कधीकधी अतिरेकी वाटू शकतात पण मुळात स्वतःला काय हवे आहे हे इतके सुस्पष्ट माहिती असणे हीच माझ्या मते मोठी गोष्ट आहे. पण नवर्‍याचे आई-वडिल अजिबात जवळ राहायला नको असणे किंवा त्यांची विचारपूसही न करणे हे व्यक्तीस्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पनांमुळे होते आहे असेही वाटते. मी बघते काही घरांत मुलांचा आजीआजोबांशी संबंधही नसतो. कदाचित मी स्वतः एकत्र कुटुंबात वाढल्याने असेल पण मला ते चुकीचे वाटते. व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक आणि अभाव ही दोन्ही टोके आहेत. अति सर्वत्र वर्जयेत् असे म्हणतात.

त्याचबरोबर मुलांच्या नातेवाईकांनी लग्न करून देताना काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.
१. हल्ली शहरात बर्‍याच मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये मुलगा/ मुलगी यात वाढवताना फारसा फरक केलेला नसतो. तसेच मुली मोठेपणी लग्न करतात. तेव्हा अचानक लग्न झाल्यावर मुलीला सासरच आपले घर अशी भावना तयार बहुतांशी नसते/ व्हायला फार वेळ लागतो. मुलाकडच्यांनी एकदम अशी अपेक्षा केल्यास त्यांना आणि तिलाही जाचक ठरू शकते. लग्न झाल्याझाल्या सासूला एकदम आई म्हणून हाक मारायला प्रेमानेच असेल पण सवय करणे, हेही त्याचाच भाग असल्याचे मला वाटते. त्यामुळे लग्नानंतरचा सुरूवातीची वर्ष -दोन वर्षे नवीन दांपत्याला मोकळेपणाची असावीत. त्यांना एकमेकांशिवाय इतरांशी नाती तयार करायला, ती वाढवायला वेळ मिळावा असे वाटते. एकदम अपेक्षा करू नये. मुलींच्या आई-वडिलांना कित्येक घरांत नीट वागवले जात नाही, त्यांच्या चालचलणुकीवर टीका केली जाते, त्यांच्या स्वैपाकाची थट्टा होते हेही ऐकले/पाहिले आहे. हेही करू नये.
२. जेथे घरात आजारपणे, लहान घरे आणि इतर समस्या असतील तेथे काळजी घेणे जास्तच आवश्यक आहे. नवीन आलेल्या मुलींनी सासू-सासर्‍यांना नीट वागवावे ही अपेक्षा योग्य आहे पण त्यांनी घरातील सर्व जबाबदारी स्विकारावी ही अपेक्षा अवास्तव आहे.
३. लग्न झाल्यावर मुलीच्या आई-वडिलांचा संबंध घरादाराशी सातत्याने येणार आणि त्यांची जबाबदारीही मुलगी कधी तरी घेणार हाही विचार केला पाहिजे.

मुळात जर एकत्र/प्रेमाने राहाण्यात काही अर्थ आहे असे घरातील व्यक्तींना मनात कुठेतरी मान्य असले तर एक सर्वसामान्य व्यवस्था त्या घरापुरती तयार होऊ शकते. मग प्रत्यक्ष एकत्र न का राहिनात. नीट पाहिल्यास अनेक सामाजिक प्रश्नांची कारणे ही पुरेशी सपोर्ट सिस्टम (सहाय्यकारी व्यवस्था) नसणे असते.

दरवेळी पैशाने उपलब्ध होणारी सुविधा (उदा: पाळणाघरे, वृद्धाश्रम) असली पाहिजेत असे नाही (जरी त्याचीही आज गरज असली तरी). वृद्धाश्रमात जायचे आहे ही मनाची तयारी तरूणपणापासून करावी लागते, एकदम तेथे रहायची वेळ आल्यास माणसे हताश आणि दु;खी होतात. एकदम वृद्धांकडून ही अपेक्षा करणे चुकीचे आणि क्लेशकारक ठरू शकते. म्हणून जोवर पैशाने उपलब्ध होणार्‍या या सोयींची जनमानसाला सवय नाही तोवर तरी वृद्धांची काळजी त्यांच्या घरातच घेतली जावी. पण त्याचबरोबर लेक-मुलगा-सून-जावई/आई-वडिलांवर अतिरिक्त भार पडू नये ह्याचीही खबरदारी घेतली पाहिजे. तसेच आई-वडिलांना दुखले-खुपले तर त्याकडेही मुलांचे प्रेमाचे लक्ष हवे. आणि एका मुलाचे नाही, तर इतर भावंडांनी पण लक्ष घातले पाहिजे.

याचबरोबर पूर्वी एक म्हण मी घरात ऐकली आहे - मध्ये असे लोड, तर तुम्ही आम्ही गोड. यालाच इंग्लिशमध्ये स्पेस म्हणत असावेत. ही थोडी स्पेस, मोकळेपणाची जागा प्रत्येकाने दुसर्‍याला देणे गरजेचे आहे नाहीतर दुसर्‍यांच्या अपेक्षा पुरवताना एकाद्या भल्या व्यक्तीचा स्वत:च्या भावनांचा / इच्छांचा मात्र चक्काचूर व्हायचा.

छान

प्रतिसाद आवडला. सर्व मुद्दे पटले.

याचबरोबर पूर्वी एक म्हण मी घरात ऐकली आहे - मध्ये असे लोड, तर तुम्ही आम्ही गोड. यालाच इंग्लिशमध्ये स्पेस म्हणत असावेत.
'साइनफेल्ड'मध्ये याला बफर झोन असे म्हटले आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आपले म्हणणे पटले.

चित्राताई,

आपले म्हणणे पटले.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

चर्चांचा अतिरेक

पत्‍नीला घरकामात, मुलांना संभाळण्यात, त्यांना शाळेला नेण्या-आणण्यात, त्यांचा अभ्यास घेण्यात वगैरे वगैरे मदत न करणारे नवरे तुम्हा लोकांना कुठे सापडतात कोण जाणे? माझ्या अवलोकनात तरी नाहीत. हल्लीच्या मुली, गरज असेल तर, आईबापांना जमेल त्या रीतीने मदत करतात, आणि याला विरोध करणारे नवरे सुशिक्षित समाजात क्वचितच असतील. पूर्वी पैसा कमी असल्याने भेडसावणारे प्रश्न आता उद्‌भवत नाहीत. सुनेला छळणार्‍या सासवांपेक्षा सासूला छळणार्‍या सुना हल्ली वाढल्या आहेत असे ऐकिवात आहे. मुलीच्या लग्नाची हल्ली आईबापांना चिंता नसते इतकी मुलाच्या लग्नाची असते हे मी अनेकांच्या तोंडून ऐकले आहे. कदाचित मुलींची संख्या कमी झाली हे कारण असेल, पण चांगल्या मुलांसाठी चांगली वधू शोधणे अवघड झाले आहे असा अनुभव आहे. --वाचक्‍नवी

बरोब्बर

याला विरोध करणारे नवरे सुशिक्षित समाजात क्वचितच असतील
सोळा आणे पटले

तसेच

जे काही मोजके विरोध करणारे नवरे आहेत त्यांना थोड्याच अवधीत ताळ्यावर आणणार्‍या बायका तर नक्कीच आहेत सर्वत्र.

खरे की नाही?

:-)

सासु सुन मुलगा

लग्नात दोघांकडूनही तडजोड झाली तर भांडणे होत नाहीत...पण कायम नवीन आलेल्या व्यक्तीलाच तडजोड करावी का लागते...जर नवरा बायको रथाची दोन चाके असतील तर सगळा भर एकावरच टाकून कसे चालेल...आणि सगळ्यांना आलेला अनुभव असेल कि मुलाची आई सुरुवातीपासूनच सून हि आपली compitition आहे असेच मानून चालते...माझा मुलगा, माझं घर, माझं अमुक तुमक सुरु होते...मुलाला हे कळत नाही कि हि आपली बायको आहे...तिला protect करावे... शेवटी वेगळे घर केले कि मुलाला फितवले असे म्हणायला मोकळे...माझ्या पाहण्यात अशी बाई आली कि मुलाला ५-७ वर्ष्याची २ मुली झाली तरी हि बाई मुलाच्या संसारातून बाहेर पडायला तयार नाही....मग त्या सुनेने काय करावे? तिला नाही का संसाराची हौस...का हि घरात कामवाली म्हणून आली कि पोर काढायला आली? जरा तरी विचार नको का करायला ?

सासु सुन मुलगा

लग्नात दोघांकडूनही तडजोड झाली तर भांडणे होत नाहीत...पण कायम नवीन आलेल्या व्यक्तीलाच तडजोड करावी का लागते...जर नवरा बायको रथाची दोन चाके असतील तर सगळा भर एकावरच टाकून कसे चालेल...आणि सगळ्यांना आलेला अनुभव असेल कि मुलाची आई सुरुवातीपासूनच सून हि आपली compitition आहे असेच मानून चालते...माझा मुलगा, माझं घर, माझं अमुक तुमक सुरु होते...मुलाला हे कळत नाही कि हि आपली बायको आहे...तिला protect करावे... शेवटी वेगळे घर केले कि मुलाला फितवले असे म्हणायला मोकळे...माझ्या पाहण्यात अशी बाई आली कि मुलाला ५-७ वर्ष्याची २ मुली झाली तरी हि बाई मुलाच्या संसारातून बाहेर पडायला तयार नाही....मग त्या सुनेने काय करावे? तिला नाही का संसाराची हौस...का हि घरात कामवाली म्हणून आली कि पोर काढायला आली? जरा तरी विचार नको का करायला ?

 
^ वर