एका मुखपृष्ठाचे रसग्रहण
मला 'अनुवाद' ह्या लेखनप्रकारात रस असल्याने मी जास्त करून अनुवादित पुस्तके विकत घेते. त्यातही वेगवेगळ्या अनुवादकांचे अनुवाद वाचून त्यांची शैली, अनुवादाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांचा अभ्यास करायला मला आवडते. अशाच एका पुस्तक प्रदर्शनात डॉ. सुनीती अशोक देशपांडे यांचा 'कथांतर' नावाचा अनुवादित कथांचा संग्रह माझ्या नजरेस पडला. इतर सर्व पुस्तकांत उठून दिसत होते, ते त्याचे वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ आणि त्याच्या जोडीला त्याचे शीर्षक! अनुवाद म्हणजे काय, याबद्दलचा अनुवादिकेचा अवघा दृष्टीकोन त्या शीर्षकात प्रतिबिंबित झाला होता व मुखपृष्ठावरल्या चित्राने त्याचा अर्थ अधिक स्पष्ट केला होता.
coverpage |
हे ते मुखपृष्ठ. सर्वप्रथम त्यावर कोणकोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया. पार्श्वभूमीचा गडद हिरवा रंग, त्यावर उठून दिसणारी एकाखाली दुसरे अशा प्रकारे मांडलेली दोन पाने, त्यांपैकी एक पिंपळपान असून दुसरे नक्की कसले आहे असा प्रश्न पडायला लावणार्या आकाराचे पान, या दोहोंच्या मध्यावर 'रशियन कथांचा भावानुवाद' हे उपशीर्षक, त्याखाली 'कथांतर' हे शीर्षक, सर्वांत खाली 'भावानुवाद' असे लिहून त्याखाली अनुवादिकेचे नाव प्रत्येक अक्षरानंतर थोडी जागा सोडून लिहिलेले आहे.
सर्वप्रथम आपण शीर्षकाचा अर्थ पाहू, म्हणजे त्यानुसार त्या दोन पानांचे रूपक समजायला सोपे जाईल. 'कथांतर' हा एक सामासिक शब्द आहे. देशांतर, भाषांतर, गत्यंतर, वेषांतर अशा शब्दांच्या चालीवर या शब्दाची निर्मिती केली गेली आहे. देशांतर म्हणजे दुसरा देश, भाषांतर म्हणजे दुसरी भाषा, गत्यंतर म्हणजे दुसरी गती (मार्ग) आणि वेषांतर म्हणजे दुसरा वेष तसेच हे कथांतर म्हणजे दुसरी कथा. इथे एक लक्षात घ्यायला हवे, की संपूर्ण मुखपृष्ठावर कोठेही 'भाषांतर' हा शब्द येत नाही, त्याजागी 'भाव-अनुवाद' हा शब्द वापरलेला आहे. 'भावानुवाद' या शब्दाचे महत्त्व आपण नंतर पाहू. पण भाषांतर हा शब्द न वापरता कथांतर हा शब्द वापरण्यामागे लेखिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा विचार दिसून येतो.
भाषांतर या शब्दाचा विग्रह 'दुसरी भाषा' आहे, हे आपण पाहिले. म्हणजेच एका भाषेतली एक साहित्यकृती घेऊन तीच दुसर्या भाषेत आणणे असा त्याचा अर्थ आहे. जणू काही ती कथा ही एखादी स्वतंत्र वस्तू असून तिच्यावर एका विशिष्ट भाषेचे वेष्टण घातले आहे आणि ते काढून दुसर्या भाषेचे वेष्टण तिला चढवले आहे! यातून एक कथा व ती ज्या भाषेत लिहीली आहे ती भाषा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत व भाषा बदलल्याने आतली कथा तीच, तशीच राहते असे काहीसे सुचवले जाते.
पण प्रत्यक्षात तसे होत नाही!
कथा आणि तिची भाषा या गोष्टी एकच आहेत असे वाटण्याइतपत एकमेकांत गुंतलेल्या असतात. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर सतत प्रभाव पडत असतो व त्यातूनच ती कलाकृती जन्माला येते. हे प्रकर्षाने कुठे जाणवत असेल, तर भाषिक विनोदप्रधान लेखनात. पुलंच्या लेखनातली कोणतीही शाब्दिक कोटी घ्या, ती कोटी शक्य होण्यामागे मराठी भाषेत काही शब्दांचा केला जाणारा विशिष्ट वापर आहे. तीच कोटी आपल्याला इतर भाषांत करता येणे जवळ जवळ अशक्य आहे. आणखी वेगळ्या प्रकारचे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण एका भारतीय आदिवासी जमातीच्या कुरुक या भाषेचे उदाहरण घेऊया. मराठीत 'दिवसाचा मध्य' या अर्थाने वापरल्या जाणार्या 'मध्याह्न' या शब्दासाठी कुरुक भाषेत 'जेव्हा आपली सावली आपल्या पायाखाली येते तेव्हा' अशा अर्थाचा शब्दाचा आहे. इथे या दोन्ही शब्दांचा अंतीम अर्थ 'दुपारी १२ वाजताची वेळ' असाच असला, तरी दोन्ही शब्दांत बराच फरक आहे. अशावेळी 'आपली सावली आपल्या पायाखाली येईल तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन' अशा अर्थाच्या कुरुक वाक्याचे मराठीत भाषांतर करताना जर मी 'जेव्हा मध्याह्न होईल, तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन' असे केले तर मूळ वाक्यातली काव्यात्मकता निघून जाईल, शिवाय मध्याह्न आणि सावली पायाखाली येणे यातला संबंध लगेच लक्षात येणार नाही. आपल्याकडे सावली पायाखाली येईल असा वाक्प्रचार नसला तरी त्याच्याशी थोडेसे साधर्म्य दाखवणारा 'उन्हे डोक्यावर येणे' हा वाक्प्रचार आहे. त्यामुळे जर मी 'जेव्हा उन्हे डोक्यावर येतील तेव्हा मी सावलीवरून चालत तुला भेटायला येईन' असे मराठी भाषांतर केले, तर त्यातून उन्हे डोक्यावर येण्याचा व सावलीवरून चालण्याचा संबंध तर प्रस्थापित होईलच, शिवाय ते वाक्य अधिक प्रवाही, अधिक सहज, थोडेसे काव्यात्म आणि अधिक 'मराठी' वाटेल. पण मूळ कुरुक वाक्यापेक्षा या वाक्याच्या स्वरूपात बराच फरक पडलेला असेल.
म्हणजेच एखादी कथा जेव्हा आपण एका भाषेपासून बाजूला काढतो, तेव्हा त्या भाषेचे तिला चिकटलेले विशेष विलग होतात, निघून जातात. व तीच कथा जेव्हा आपण दुसर्या भाषेत नेतो, तेव्हा त्या दुसर्या भाषेचे वेगळे विशेष त्या कथेला येऊन चिकटतात. त्या कथेचे स्वरूप बदलते. ती कथा 'ती'च राहत नाही, एक वेगळी कथा निर्माण होते. म्हणूनच अनुवादिका या सगळ्या प्रक्रियेला भाषांतर न म्हणता, कथांतर म्हणते. ही प्रक्रिया केवळ भाषा बदलण्याची नाही, तर एका कथेतून दुसरी कथा जन्माला घालण्याची आहे.
अशाप्रकारे या शीर्षकाचा अर्थ, महत्त्व कळल्यावर आता चित्राकडे वळू. मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन पाने एकाखाली दुसरे अशाप्रकारे मांडली आहेत. वरच्या पानाचा रंग पोपटी असून, त्यावरचे शिरांचे जाळे, त्यांचा देठाकडे पिवळा होत गेलेला रंग हे सगळे स्पष्ट दिसते आहे. ते पान जिवंत वाटते आहे. खालच्या पानावरचे शिरांचे वगैरे तपशील दिसत नाही आहेत व त्याचा रंगही गडद हिरवा आहे. जणू काही खालचे पान ही वरच्या पानाची सावली आहे. पण सावलीचा आकार मूळ वस्तूसारखाच असतो. इथे तर दोन्ही पानांचे आकार वेगवेगळे आहेत. या सर्वांचा अर्थ काय?
वरच्या पानाचा आकार आपल्या ओळखीचा नाही. मधेच पपईच्या पानासारखे वाटते खरे, पण ते पपईच्या पानाइतके पसरट नाही. शेवटी वरचे पान ज्या झाडाचे आहे, ते झाड आपल्याइथे उगवत नाही, आपल्या ओळखीचे नाही, या निष्कर्षाप्रत आपण पोहोचतो. खालच्या पानाचा आकार मात्र आपल्या ओळखीचा आहे. ते पिंपळाचे पान आहे हे आपल्याला लगेच ओळखता येते. ते ओळखताच इतर अनेक संदर्भ आपल्या मनात गर्दी करतात. जसे, पिंपळाच्या पानाला आपल्याकडे धार्मिक महत्त्व आहे. आपण लहानपणी ते पान एका पुस्तकात जपून ठेवतो व नंतर त्याची जाळी होते. त्यामुळे मराठी साहित्यात पिंपळपान या शब्दाला स्मृतीचा आशय प्राप्त झाला आहे. हे सगळे संदर्भ त्या पानाच्या निव्वळ आकारावरूनच आपल्या लक्षात येतात. त्यासाठी त्या पानाचा खरा रंग, शिरांचे तपशील यांची गरज भासत नाही.
इथे ही दोन्ही पांने व त्यांच्यातला परस्परसंबंध हे एक रुपक आहे. वरचे पान म्हणजे मूळ रशियन कथा, तर खालचे पान म्हणजे अनुवादित कथा. मूळ रशियन कथा शब्दालंकार, रशियन भाषेचा लहेजा, नजाकत, मूळ लेखकाची शैली या सर्वांनी अलंकृत झालेल्या आहेत. पण हे सगळे जास्तीचे तपशील आहेत. शिवाय अनुवाद करताना भाषा बदलल्याने हे तपशील अनुवादित कथेत येत नाहीत. पण कथेचा आत्मा असतो, तो त्यातल्या कथासूत्रात, त्यातल्या भावार्थात. तो मात्र अनुवादित कथेत अधिक स्पष्ट झालेला दिसतो. त्यामुळेच खालच्या पानात तपशील नसले, तरी वरच्या पानातला हिरवा रंग त्यात उतरला आहे पण त्याची छटा अधिकच गडद झाली आहे. म्हणूनच लेखिका या अनुवादित कथांना 'भाषांतर' न म्हणता 'भाव-अनुवाद' असे म्हणते.
मूळ रशियन भाषा आपल्या ओळखीची नसल्याने आपल्याला या कथांचा आस्वाद घेता येत नाही आहे. त्या आपल्यासाठी अनोळखी, परक्या आहेत. जसा वरच्या पानाचा आकार आपल्यासाठी अनोळखी आहे. पण तीच कथा अनुवादित करताना तिचे स्वरूप बदलले आहे, ती आपल्या ओळखीच्या भाषेत, ओळखीच्या आकारात आलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला या अनुवादित कथेचा आस्वाद घेणे शक्य झाले आहे.
पण ही कथा आता 'ती'च राहिलेली नाही, ती वेगळी झाली आहे, तिचे 'कथांतर' झाले आहे!
असे असूनही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अनुवादित कथा ही मूळ कथेची 'सावली' आहे. मूळ कथेशिवाय स्वतंत्र अस्तित्व तिला नाही. मूळ कथेपेक्षा कितीही वेगळी झाली असली, तरी तिच्या अस्तित्वाचा आधार ती मूळ कथाच आहे.
इतका सुंदर अर्थ शीर्षकातून मांडणार्या डॉ. सुनीती अशोक देशपांडे आणि त्याला इतक्या सुंदर रूपकात्मक चित्राची जोड देणारे चंद्रमोहन कुलकर्णी या दोघांनी मिळून एक सुंदर मुखपृष्ठ निर्माण केले आहे यात मला तरी शंका नाही.
Comments
सुंदर विवेचन
राधिका ताई,
आपण मुखपृष्ठावरच्या चित्राचे विवेचन येवढे सुंदर केले आहे की प्रत्यक्षात आपण दिलेले चित्र दिसत नसून सुद्धा डोळ्यासमोर उभे राहिले. आपल्या निरिक्षणशक्तिला सलाम. पण एक गोष्ट आपण अनुत्तरितच ठेवलीत. लेखिकेचे नाव सुटे-सुटे (प्रत्येक अक्षरानंतर थोडी जागा सोडून) का लिहिले असावे बरे? कदाचित पहिल्या वाचनात माझ्याकडून ते सुटले असावे. आजून एकवेळ वाचून पाहतो.
आवांतर - 'उन्हे डोक्यावर येणे' का 'ऊन डोक्यावर येणे' ?
आपला,
(भाव-अनुवादि) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
उत्तम
सुनीती अशोक देशपांडेंच्या रशियन कथांचे भावानुवाद पूर्वी म.टा. च्या रविवार पुरवणीत येत असत. एका वेगळ्या संस्कृतीची ओळख करुन देणार्या कथा, पण अनुवाद केला आहे असं न वाटणार्या.
विवेचन उत्तम झाले आहे. चित्र दिसत नसले तरी भास्कररावांनी म्हटल्याप्रमाणे, मुखपृष्ठाचे इतके सुरेख वर्णन केले आहे की प्रत्यक्षात चित्र दिसत नसले तरी चालावे. पानांचे रुपक सुरेख आहे. 'टू टेक अ लीफ आऊट ऑफ समवन्स बुक' म्हणजे जसंच्या तसं उचलणे. प्रतिबिंबात बदललेले पान दाखवून (मराठीतही लीफ सारखे पान या शब्दाचे पुस्तकातले आणि झाडावरचे असे दोन अर्थ आहेतच.), तसं झालेलं नाही हे तुम्ही म्हणता तसं सूचित केलेलं आहे.
'एक होता कार्व्हर' चं मुखपृष्ठही असंच सूचक आणि अर्थवाही आहे. कृष्णवर्णीय हात आणि त्याच्या स्पर्शाने वाळवंटात फुललेली हिरवळ दाखवणारे.
थोडेसे खरे
खरे आहे,पण येरलिंगचा पाडस हा अनुवाद पण तितकाच सकस आहे हो.
स्वाती
या प्रतिसादापुढे येणारे काही प्रतिसाद विषयांतर वाटल्याने आणि मूळ लेखाशी संबंधीत नसल्याने अप्रकाशित केले आहेत. सदस्यांनी कृपया खरडवही किंवा व्य. नि. चा वापर करावा. - संपादन मंडळ.
असहमत
आकाशफुले, पैलपाखरे सकट जीएंनी केलेले अनुवाद अत्युत्कृष्ट होते. याशिवाय दुर्गा भागवतांनी "वॉल्डन"चा केलेला अनुवाद अप्रतिम होता.
हे मी वाचलेल्यापैकी. इतरही सुरेख अनुवाद असतीलच.
- (वाचक) आजानुकर्ण
एक होता कार्व्हर सुरेखच पण दहा हजार वर्षे वगैरे अतिशयोक्ती वाटते.
-(तौलनिक) आजानुकर्ण
आम्हाला येथे भेट द्या.
फार सुंदर वर्णन
शिवाय भाषांतर आणि अनुवाद यांच्याविषयी उत्तम विचार केला आहे.
सुंदर
भावानुवाद आणि कथांतर यावर सुंदर विवेचन करणारा लेख आहे. मला अनुवादित साहित्य वाचताना बर्याचदा हा प्रश्न पडतो, (त्यातही पाडससारखे आवडीचे असेल तर नक्कीच) की यात मूळ लेखकाचा सहभाग किती आणि अनुवादकाचे कौशल्य किती. पुलंच्या कोटीसारखीच अनुवादित न होउ शकणारी दुसरी गोष्ट म्हणजे गालिबच्या गझला, त्यांचा इंग्रजी अनुवाद वाचायला नको वाटते. प्रत्येक भाषेमध्ये तिचे काही राखून ठेवलेले शब्द असतात, त्यांचा अनुवाद करायचाच म्हटला तर होउ शकतो पण त्यात काही 'राम' नसतो. मराठीतला कैवल्य, फ्रेंचमधला देजा वू किंवा इटालियनमधला फ्रुशिओ (पुस्तक चाळताना पानांचा होणारा आवाज). मला वाटते असे शब्द त्या त्या संस्कृतीची विशेष वैशिष्ट्ये दर्शवणारे असावेत. याउलट जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार्या सामायिक भावना, रीती इ. दर्शवणार्या शब्दांचा अनुवाद करायला सोपे जात असावे.
कथेचा आत्मा तोच रहाण्याची कल्पना फार आवडली.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
वा
एका मुखपृष्ठाचे रसग्रहण - ह्याला म्हणतात "हटके" लेख.
आवडला.
आपल्याला शालेय अभ्यासक्रमात गजला, वेगवेगळ्या काळातील चित्रकला, शिल्पकला, संगीत ह्याचे थोडेसे जरी रंजक शिक्षण दिले असते तरी आज ह्या फाईन आर्टस् (बरोबर ना?) चा आधीक चांगला आस्वाद घेता आला असता नाही का?
सुंदर
अत्यंत मार्मिक शब्दात विवेचन. पण आम्हाला मुखपृष्ट दिसत नाही. लिंक पण दिसत नाही काय करावे?
प्रकाश घाटपांडे
रसग्रहण
मुखपृष्ठाचे रसग्रहण आणि ते करण्याची कल्पना दोन्ही आवडले.
लेख सुंदर झाला आहे राधिका.
स्वाती
चांगला लेख
अगदी हेच.
मुखपृष्ठाचे चित्र मात्र दिसले नाही. प्रतिसादाद्वारे पुन्हा एकदा लावावे.
धन्यवाद/ चित्र
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
चित्रासाठी दुवा देते आहे- http://pandharyavarachekale.files.wordpress.com/2007/10/kathantar-coverp...
राधिका
इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व! इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व! इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व! इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व! इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व! इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व! इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व! इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व!
हे पाहा.
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
नसतं सुचलं
हे पाहून त्याला काहीच नसतं सुचलं. हे म्हणजे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट सारखं वाटलं.
वा!
वा! चित्राच्या रसग्रहणातून एक नवे काव्य, नवी कलाकृतीच तुम्ही उभी केली आहे. लेख एक वेगळाच आनंद देऊन गेला.
आपला
(रसास्वादक) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"
आत्ता दिसले !!
सहीच आहे चित्र !!
ते वरचे पान एखाद्या रशियन झाडाचे पान असेल नाही का? आणि खाली आपले पिंपळपान - रशियनचा मराठीमध्ये भावानुवाद!! किती अर्थगर्भ !!
लेख देखिल आवडला.
झाड
ते वरचे पान एखाद्या रशियन झाडाचे पान असेल नाही का?
रोचक मुद्दा आहे. आंतरजालावर शोधल्यानंतर (गूगलचा विजय असो!) हे पान रेड ओक ह्या झाडाचे असावे असे वाटते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
गूगलवर पान
आनि तेही झाडाचं कसं काय शोधलत बुवा?
पान
नेमके की वर्डस असले तर गूगलवर जवळजवळ काहीही मिळू शकते असा अनुभव आहे. :) (नेमके की वर्ड्स आधी माहीत नसतात ही त्यातली गोम. ते 'नेमके' होते हे नंतर कळते.)
या बाबतीत लीफ, ट्री आणि टाइप्स असे शब्द दिले. यात तिसर्या क्रमांकावर हा दुवा आला. यात पानाच्या आकाराप्रमाणे झाडांची नावे होती.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
सही
नेमके की वर्ड्स आधी माहीत नसतात ही त्यातली गोम
एक्झॅक्टली !! म्हणूनच तर प्रश्न पडला होता, पण सही शोधलंत हां