प्रशासन व्हावे लोकशासन

प्रशासन व्हावे लोकशासन

प्रशासनाने पारदर्शक असणे हे काही नोकरशहांच्या दृष्टिने घातकच असते. लोकाभिमुख प्रशासनात लोक हा शब्द नागरिक या अर्थाने वापरला गेला आहे. लोकशाहीची 'लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचेच राज्य` ही व्याख्या अतिशय बाळबोध आहे. नागरिक होण्यासाठी या देशात जन्म घेणे एवढेच पुरेसे आहे. त्या भांडवलावर आपण नागरिकांचे हक्क मिळवू शकतो. सवोच्च न्यायालयाने सुद्धा नागरिकांचे हक्क व कर्तव्य यांची सांगड घालताना कर्तव्यात कसूर झाली तरी हक्कावर बाधा येत नाही असेच सांगितले आहे. बहुसंख्य लोकांना हक्क हे माहितच नाहीत. ती त्यांना सवलतच वाटते. कर्तव्याचा तर प्रश्नच उदभवत नाही. तेवढी प्रगल्भता अद्याप आलेली नाही. याचाच चतुराईने वापर करुन काही लोकांनी लोकांचाच वापर करुन स्वार्थासाठी चालवलेले काही लोकांचेच राज्य ही लोकशाहीची वस्तुस्थिती आहे. लोकशाहीची चिकित्सा व्हायला पाहिजे. नाहीतर एखाद्या मूल्याचा स्वीकार केल्यानंतर त्याचे प्रामाण्य मानून त्याला अपरिवर्तनीय करणे आणि आंधळेपणाने त्याची पूजा करणे हे अंधानुकरण ठरते. लोकप्रतिनिधी म्हणून मिरवण्यासाठी केवळ संख्याबळा्रच्या जोरावर म्हणजेच लोकशाहीच्या तत्वाचाच आधार घेउन जनादेश म्हणून विजयी होता येते. हा संख्यात्मक विजय आहे गुणात्मक नव्हे. कायद्यासमोर गरिब श्रीमंत भेद नसला तरी गरिबांच्या गरिबीचे काही लोकांनी भांडवल करुन स्वत: श्रीमंत झाले व आपल्याला हवा तसा न्याय अनुकूल करुन घेतला तर काही श्रीमंतांनी पैशांच्या जोरावर आपल्याला हवा तसा न्याय अनुकूल करुन घेतला. मध्यमवर्ग मात्र यात भरडला जातो.
पृथ्वी सपाट आहे असे मानणाऱ्यांची संख्या पूर्वी जास्त असल्याने व चिकित्सा करायची नाही या वृत्तीमुळे 'पृथ्वी गोल आहे व स्वत:भोवती फिरते` हे शास्त्रीय दृष्टया सिद्ध व्हायला सोळावे शतक उजाडले. वास्तव व कागद यात कितीही तफावत असली तरी प्रशासन कागद हेच वास्तव वा प्रमाण मानून त्यानुसार नियोजन व कार्यवाही करते. त्यामुळे त्याची परिणामकारकता ही फक्त कागदावरच राहते. नियोजन, इच्छाशक्ती व अधिकार या तीन गोष्टी एकत्र आल्या तरच काहीतरी विधायक घडू शकते. असे माझे प्रांजल मत आहे. यापैकी एका गोष्टीचा जरी अभाव असला तरी इलेक्ट्रॊनिक्स च्या 'ऎण्ड गेट` लॉजिक नुसार अंतिम परिणाम हा शून्य येतो.
लोकशाही ही उत्क्रांतीच्या अवस्थेतून चालली आहे, आताशी लोकशाहीला कुठं पन्नास वर्ष झाली आहेत. आपली जनता आतापर्यंत गुलामगिरीतच होती. इतक्या कमी कालावधीत लोकशाही कशी प्रगल्भ होईल? असे सांगितले जाते. याबाबत दुमत नाही पण पुढे मला ही तुलना रासायनिक प्रक्रियेशी करावीशी वाटते. एखाद्या रासायनिक प्रक्रियेत कॅटॅलिस्ट जर नसेल तर तिला दीर्घकाळ लागतो पण कॅटॅलिस्टच्या उपस्थितीने ती अल्पावधीत होते. प्रबोधनाचे कॅटॅलिस्ट कमी पडल्याने या लोकशाही विकसन प्रक्रियेला जास्त काळ लागतो आहे. शांतता काळात प्रबोधनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सातत्याने केले गेले असते तर पन्नास वर्षात जनता बऱ्यापैकी सूज्ञ झाली असती. ज्यांच्याकडे शहाणपण आहे त्यांच्याकडे सत्ता नाही. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे शहाणपण नाही आणि सत्ते पुढे शहाणपण चालत नाही. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आता लढा द्यावा लागणार आहे. पूर्वीचा लढा स्वराज्यासाठी होता व तो परकीयांविरुद्ध होता. आताचा लढा हा सुराज्यासाठी आहे आणि तो स्वकीयांविरुद्ध असणार आहे. स्वकीयांविरुद्धचा लढा हा जास्त अवघड असतो आणि तोही लोकशाही चौकटी राहून द्यायचा आहे.
प्रशासकीय कामात पारदर्शकतेचा अभाव हा काही लोकांनी जाणीवपूर्वक ठेवलेेला अडसर आहे. कारण ज्यांच्यावर राज्य करायचे ती जनता अडाणी व अज्ञानी असली पाहिजे. ती तशी कशी राहील तर ते पारदर्शकतेच्या अभावाने. खरेतर भारत प्रजासत्ताक झाला त्याच दिवशी जनतेला माहितीचा अधिकार प्राप्त झाला. परंतु पन्नास वर्षांनतर सुद्धा माहीतीचा अधिकार जनतेला मिळवण्यासाठी कुणीतरी मसीहा लागतो. हे लोकशाहीचे दुर्दैव नसून काही लोकांचा मतलबीपणा आहे.
सरकारी यंत्रणेचे कामकाज इतक्या मागासलेल्या पद्धतीने चालते की त्याचे जीर्णोद्धारापेक्षा पुनर्रचनाच सोयीस्कर व व्यवहार्य ठरावी अशीच परिस्थिती आहे. यंत्रणा एकदा कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत झाली की त्यासमोर कुठलीच गोष्ट महाग नसते. त्याचे मूल्यमापन करण्याचा विचारसुद्धा समाजद्रोह व देशद्रोह ठरतो. काश्मीरवर शासनाने केलेला खर्च हा अनाठायी कसा ठरवणार? हौसेला जसे मोल नसते तसे सुरक्षिततेलाही मोल नसते.
गेल्या पाच वर्षात झालेला विज्ञान व तंत्रज्ञानातील वेगामुळे झालेला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पातळीवरचे बदल या मुळे आधुनिक व्यवस्थापनशास्त्राला सुद्धा पचविणे अवघड झाले. आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचे निकष लावून जर तज्ज्ञांनी सरकारी यंत्रणेचे मूल्यमापन केले तर जनतेला धक्कादायक असे निष्कर्ष बाहेर पडतील. नुकतेच विरोधी पक्षनेते नितीन गडकरी यांनी ९० टक्के मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कामावर न येण्यासाठी जरी शासनाने पगार दिला तरी सुधारणांची गती वाढेल. यातील विनोदाचा भाग सोडला तरी वास्तव फारसे वेगळे नाही. छुपी बेकारी मध्ये जसे लोक काम करताना दिसत असतात पण प्रत्यक्षात त्यांनी ते केले नाही तरी त्याचे विधायक मूल्य फारसे नसते. काही लोकांनी खड्डा खांडणे आणि काही लोकांनी तो बुजवणे या सारखी ती कामे असतात. यातून फक्त बेरोजगारीचा प्रश्न काही अंशी सुटतो. विलासराव देशमुखांनी ७० टक्के तिजोरीतील रक्कम शासकीय नोकरांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष होत असतो तर ३० टक्क्यातून काय विकास साधणार? असे सांगितले तर ते अप्रिय होतात.
कायदा व सुव्यवस्था हा तर लोकशाहीचा श्वास. हा भाग सांभाळणाऱ्या पोलीस खात्याची विश्वासार्हता का खालावली यावर खूप मोठा निरंतर प्रबंध होउ शकतो. पण पोलीस हा समाजातूनच आला असल्याने त्यातील देाष त्यापासून वेगळे करता येणार नाहीत असे म्हणून समाजावरच त्याचे खापर फोडता येते. चांगली असलेली अपवादात्मक अल्प उदाहरणे मात्र वारंवार देउन खात्याची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न करता येतो. समाजात समाजकंटक म्हणता येतील असे जास्तीत जास्त २ टक्के लोक असतील पण त्यांचे उपद्रवमूल्य हे उरलेल ९८ टक्के लोकाना वेठीस धरण्याइतके असल्याने पोलीस खात्याची निर्मिती झाली. भीष्मराज बाम हे वरिष्ठ अधिकारी एके ठिकाणी म्हणतात की ज्यांनी पोलीसांना घाबरायला पाहिजे ते लोक पोलिसांना घाबरतच नाहीत व ज्यांनी पोलीसांना घाबरण्याची आवश्यकता नाही असेच सर्वसामान्य लोक पोलीसांना घाबरतात हे वास्तव नाकारुन चालणार नाही.पोलीस खात्यात खात्यांतर्गत शिस्त या नावाखाली होणारी घुसमट ही कुठे उमटतच नाही. सहनही होत नाही व सांगताही येत नाही. 'समरी पॉवर` या नावाने चालणारी समांतर राजेशाही ही अंतरंगात डोकावल्याशिवाय समजतच नाही. पारदर्शकतेमुळे पोलीस खात्याची ताकदच नष्ट होईल की काय? अशी भीती काही घटकांना वाटते. साहेबानी रेडा एक शेर दूध देतो असे सांगितल्यावर आपण त्यात अजून एकाची भर टाकून तो दोन शेर दूध देतो असे सांगावे. साहेबाच्या पुढून व गाढवाच्या मागून कधी जाउ नये असे जुने अनुभवी लोक नवीन लोकंाना सांगतात. यात गाढवाचा सन्मान आहे की साहेबाचा अवमान आहे हे मला अद्याप समजलेले नाही. अनेक वरिष्ठ सम्पूर्ण शासकीय यंत्रणा स्वत:च्या दिमतीसाठी बिनदिक्कतपणे वापरतात. तसा वापर करण्यास प्रतिबंध करणाऱ्याला टार्गेट करुन नोकरी करणे मुष्किल करुन टाकतात. त्या मानसिक तणावातून चुका झाल्या की त्याचे कागदावर भांडवल करुन रीतसर शासकीय नियमांचाच वापर करुन काटा काढतात. मग इतर लोकही ताटाखालचे मांजर बनून राहणे पसंत करतात. सदासर्वदा कायदेशीर नियमानुसार राहणे कुणालाही शक्य नसते. बरं हे नियम व्यवहार्य असतीलच असेही नाही.नियमांच्या कचाटयात न सापडता जगणे हे तारेवरच्या कसरतीपेक्षाही अवघड आहे. सर्वच सरकारी खात्यात लायकी नसलेले अधिकारी अनेक असतात. केवळ पदासाठी आवश्यक असलेल्या काही विशिष्ट खातेनिहाय तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याने ते अधिकारी झालेले असतात. पण ही लायकी ठरविण्याचे अधिकार कोणाचे? हा प्रश्न उपस्थित होतो.
नागरिकांची सनद निर्माण होण्याआधी प्रशासनाची सनद असायला हवी आणि ती शासकीय यंत्रणेच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायला हवी. शासकीय यंत्रणेच्या सर्वसाधारण घटकालाच यंत्रणेची सर्वांगीण माहिती नसते. सरकारी यंत्रणेच्या प्रत्येक घटकाला यंत्रणेच्या सर्व घटकांची संपूर्ण साखळी दाखवणारी, त्यातील पदे त्यांचे अधिकार, कर्तव्ये, मर्यादा तसेच यंत्रणेचे कामकाज कसे चालते? यांची तपशीलवार माहिती संकलित करुन शासकीय यंत्रणेच्या न्यूनतम घटकापर्यंत पोहोचवली तरी यंत्रणेच्या विविध घटकांमधील विसंवाद दूर होईल. तसेच घटकांमध्ये कर्तव्याची जाणीव तसेच परस्परांवर सकारात्मक दबाव तयार होईल. काही खात्यांनी हे काम काही अंशी वेबसाईटवर केले आहे. पण पुस्तिका या स्वरुपात ती उपलब्ध नाही. एकदा मी पोस्टात गेलो व लोकांसाठी पोस्टाच्या काय काय सेवा कशाप्रकारे उपलब्ध आहेत? पोस्टाचे कामकाज कसे चालते? याची माहीती देणारी एखादी तुमची पुस्तिका विकत मिळेल काय असा प्रश्न विचारल्यावर हा मनुष्य वेडा बिडा आहे की काय? अशा नजरेने बघितले व बोर्डावर पोस्टाचे रेट लावले आहेत असे उत्तर दिले.
जनता ही मेंढरांसारखी आहे असे म्हणण्यास बरेचसे विद्वानसुद्धा कचरतात. कारण त्यातून 'जनतेला मूर्ख समजण्याचा यांना काय आधिकार? हस्तिदंती मनोऱ्यात बसून यांना समाजाचे काय आकलन होणार? हे स्वत: तेवढे शहाणे आणि बाकीचे सगळे काय मूर्ख आहेत काय? हा जनतेचा अवमान आहे, जनता आता जागरुक आहे, पुरेशी सुजाण आहे, तिला बरं वाईट काय ते कळतं,जनताचं आता योग्य तो धडा शिकवेल.` असे मुद्दे जनतेच्या 'वती` चा आव आणून काही धूर्त पुढारी, राजकारणी,भ्रष्ट नोकरशहा मांडत असतात. कारण जनतेने मेंढरासारख राहणं हे त्यांच्या हिताचं असतं. जनतेमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न जर त्यांच्या हिताच्या विरोधात असेल तर जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करु नये असा इशारावजा धमकी हे लोक देत असतात. जागरुक नागरिक हा सरकारी यंत्रणेच्या दृष्टिने 'कटकट्या` असतो. लोकशाहीचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाही विरोधी कृती असा अर्थ काढून लोकांच्या भांडवलावर निर्माण केलेल्या स्वशाहीचे संरक्षण करीत असतात. लोकशाहीतील त्रुटींचे निवारण करण्याचा प्रयत्न देखील या लोकांना नको असतो. कारण या त्रुटींचे भांडवल करुन लोकांच्याच सहभागातून त्यांना फॅसिझम निर्माण करायचा असतो. गरीब, बेराजगार, अल्पशिक्षित, अपरिपक्व जनतेला हाताशी धरुन त्यांच्यात द्वेषाच्या आधारावर एखादी अस्मितेची नशा निर्माण करायची त्याला 'स्वाभिमान` हे नाव द्यायचं व त्याचा झुंडशाहीसाठी कुशलतेने वापर करायचा. या नशेत ती जनता आपले मूलभूत प्रश्न विसरते. एखाद्या दारुडयाला भूक लागली की त्याला अन्नाऐवजी दारुच द्यायची. हळूहळू त्याचे शरीर भूक लागल्यानंतर अन्नाऐवजी दारुचीच मागणी करु लागते. जो ती मागणी पूर्ण करतो तो त्याला आपला हितचिंतक वाटतो. जो त्याला अन्न द्यायचा प्रयत्न करतो तो त्याला शत्रू वाटतो. अशा पद्धतीने जनतेची कोंडी करुन त्याला मार्ग दाखवल्याचा आभास निर्माण केला जातो.
यातून आपल्याला सर्वांना मार्ग काढायचा आहे. यासाठी हेवेदावे, प्रतिष्ठा, काही मतभेद पूर्वदूषित ग्रह या गोष्टी विसरुन सर्वांनी एकत्र यायला हवं. एकत्र आलं तरच विचारांची देवाणघेवाण होणार आहे. पुरोगामी लोक यासाठी एकत्र येण्याचा चमत्कार घडेल का?

पुर्वप्रसिद्धी :- 'आजचा सुधारक' जाने २००५

अवांतर- हा लेख आजच्या सुधारक ला पाठवताना शीर्षक दिले नव्हते. ( संपादकांनी योग्य ते शीर्षक द्यावे ही कल्पना) 'काही सुचना ' लेखक वाचकांकडून मागवल्या होत्या. त्यानुसार मी लेख पाठवला होता. संपादकांनी या लेखाला ' काही सुचना ' हेच शिर्षक दिले होते.

लेखनविषय: दुवे:

Comments

अनुभव

एकदा मी पोस्टात गेलो व लोकांसाठी पोस्टाच्या काय काय सेवा कशाप्रकारे उपलब्ध आहेत? पोस्टाचे कामकाज कसे चालते? याची माहीती देणारी एखादी तुमची पुस्तिका विकत मिळेल काय असा प्रश्न विचारल्यावर हा मनुष्य वेडा बिडा आहे की काय? अशा नजरेने बघितले व बोर्डावर पोस्टाचे रेट लावले आहेत असे उत्तर दिले.

पुण्याच्या कॉर्पोरेशनमध्ये जाऊन पुण्याचे नकाशे मागून पाहिले आहेत का? मी मागितले आहेत, गेल्या दोन महिन्यांतली गोष्ट. पुण्यात केवळ या एका कारणासाठी मी कॉर्पोरेशनपर्यंत येण्यात जाण्यात बरेच तास आणि रूपये वाया घालवले . उत्तर मिळाले की ८७ चे (२० वर्षांपूर्वीचे) नकाशे आहेत. इतर नकाशे सँक्शन झाले नसल्याने मिळणार नाहीत. आणि कधी सँक्शन होतील सांगता येणार नाही. जीआयएस चे नकाशे वर भिंतीवर लावलेले होते पण अधिकार्‍यांनी ते द्यायला नकार दिला - २ वर्षे लागतील म्हणून सांगितले. जे नकाशे त्यांनी देऊ केले ते इतके जुने आहेत की त्यांचा काहीही उपयोग झाला नाही (निदान माझ्या कामासाठी).

सुरेख

प्रकाशराव
आपण सुरेखच लेखन करता.

हा लेख खुप मोठा आहे. मला वाटतं असे लेख २ भागात दिले तरी चालतील.

एकुण विचारप्रवर्तक लेखन.

आपला
गुंडोपंत

दोन भागात- पुढ्च्या टायमाला

मला वाटतं असे लेख २ भागात दिले तरी चालतील.

मलाही तेच वाटतं. आत्ता दोन भागात करतानाच ते राहून गेलं. छोट लिहिलं तरच ते गांभिर्याने वाचले जाते.
प्रकाश घाटपांडे

सहमत आहे,

आत्ता दोन भागात करतानाच ते राहून गेलं. छोट लिहिलं तरच ते गांभिर्याने वाचले जाते.

सहमत आहे. लेख तर बुवा फारच वैचारिक वाटला आणि चांगलाही वाटला. पण खूप मोठा असल्यामुळे वाचायला कंटाळा आला..

तात्या.

नकाशा

हा प्रयोग मी पण केला होता. मलाही असाच अनुभव आला. २० रु च्या कोर्ट फी स्टॅप लावून अर्ज करा. मग तुम्हाला तुम्ही मागिलेल्या भागाचा नकाशा आम्ही तयार करुन देऊ . नव्या हद्दीचे बोर्डावर लावले आहेत ते इतके पैसे भरुन मिळतील. हेलपाटे घालून माणूस वैतागतो.
प्रकाश घाटपांडे

माहितीचा अधिकार !

घाटपांडे साहेब,
प्रशासन व्हावे लोकप्रशासन हा लेख आवडला खरे तर तो दोन भागात असता तर अधिक काळजीपूर्वक वाचता आला असता ;) म्हणजे आता वाचला आहे !
प्रशासनाने पारदर्शक असणे हे काही नोकरशहांच्या दृष्टिने घातक असले तरी, माहितीच्या अधिकारामुळे प्रत्येक कार्यालयात पारदर्शकता येईल असे वाटते आहे. पुर्वी कोणत्याही कार्यालयात गेल्यावर काही माहिती किंवा मदत मागितल्यावर चेह-यावर आठ्या पाडणारे आता बळजबरीचे हसू चेह-यावर आणून मदत करताहेत ही मात्र पारदर्शक शासनाची नांदी आहे असे वाटते.

अवांतर ;) या नंतर आपला मोठा असलेला कोणताही वैचारिक लेख ,दोन भागात देणार नसाल तर, आम्ही लेख न वाचता लेख खूप आवडला असे म्हणू याची नोंद घ्यावी :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून काही मुद्दे

घाटपांडे साहेब,

आपला हा लेख पण नेहेमीप्रमाणे आवडला/भावला. या विषयावर अजून लिहाल अशी आशा करतो!

काही गोष्टी देशाबाहेर पाहील्यावर जे वाटते ते येथे लिहीतो: (संदर्भ केवळ अमेरिकेचाच - पण लोकसंख्येने मोठ्या लोकशाहीची तुलना - खया अर्थाने मोठ्या असलेल्या लोकशाहीशी करणे योग्य वाटते. शिवाय, या जगात अमेरिकेस खया अर्थाने तुल्यबळ होऊ शकेल असा केवळ भारत आहे असे बयाचदा बयाच कारणांवरून वाटते, पण तो विषय वेगळा आहे!)

गेल्या शतकाच्या सुरवातीस ते अगदी ६०-७० च्या दशकापर्यंत अमेरिकेत पण अशाच गोष्टी (भ्रष्टाचार) होत असत. आज येथील कायदे आणि शिक्षा खूप कडक आहेत म्हणून प्रत्यक्ष भ्रष्टाचार दिसणार नाही. काही अंशी लोकांना प्राथमीक सुखसोयी लाभल्याने सामान्य माणसाचा भ्रष्टाचार दिसत नाही. याचा अर्थ सर्व चांगले असेल असा नाही पण खूपच कमी दिसेल...

वरील मुद्याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे येथे सामान्य नागरीक लोकप्रतिनिधींकडून काम करून घेण्याची सतत मागणी करतो. एकटी व्यक्ती अथवा समुह. परीणामी लोकप्रतिनिधींवर एक प्रकारचा शह असतो. आपल्याकडे असे कितीवेळा होते? (हा माझा प्रश्न जनहितवादींच्या चर्चांमधे पण दिसेल). एक तर शिकवण नसते अथवा भिती किंवा मला काय करायचे आहे किंवा हे असेच चालणार हा निराशावाद.

मला राहून राहून वाटते की लोकशासन होण्यासाठी लोकांनी शासनाला वेठीस धरून कामे करायला लावली पाहीजेत. ही जरा "ऎक्टीव्हिझम"/"चळवळी" वृत्ती झाली पण तोच तर लोकशाहीचा अर्थ आहे ना? नाहीतर मला कायम वाटते तसे: महाराष्ट्र शासन म्हणजे "अवघ्या महाराष्ट्राला शासन" आहे! तसेच लोकशासन ह्याचा अर्थ होईल..

एक फुकटचा सल्ला: विचार करा, आज एका पुण्यात गल्लोगल्ली गणेशमंडळे आहेत. त्यातले एक तरी ज्या हेतूने लोकमान्यांनी गणॆशोत्सव चालू केला तो हेतू आमलात आणते का? दहा दिवस टाळ कुटून टिळक काही उरलेले ३५५ दिवस निवांत बसायचे नाहीत. आज बाकी काही नाही तरी या गणेश मंडळांनी आपल्या लोकप्रतिनिधींच्या वार्षीक सभा घेऊन त्यांच्या कार्याचा आणि त्यांना मिळालेल्या १० लाख, १ कोटी वगैरे मतदारसंघाच्या अनुदानाचा नक्की काय फायदा झाला ते लोकांसमोर मांडायला सांगीतले पाहीजे. हे सर्व पक्षातीत पद्धतीने होणे महत्वाचे आहे. असे सलग २-३ वर्षे होऊदेत, एकदा का अकांऊटीबिलीटी चा आणि उलट प्रसिद्धीच्या भितीचा प्रश्न येईल त्या सरशी, गोष्टी हळू हळू सुधारू लागतील.

अजून, नंतर जसे सुचेल तसे लिहीन!

हाहाहा :)


मला आधी वाटले की हा लेख संकेतस्थळाच्या "प्रशासनाविषयी" आहे, म्हणून उत्साहाने बाह्या सरसावल्या. पण मग विरस झाला. आता आरामात वाचीन, आणि प्रतिक्रिया कळवीन :-)

हाहाहा :))))))))

नवरात्रापर्यंत संचारबंदी शिथील आहे ! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्वलंत सामजिक विषय

घाटपांडे साहेब,

नेहमीप्रमाणेच ज्वलंत सामजिक विषय आपण उत्तम हाताळला आहे.

आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचे निकष लावून जर तज्ज्ञांनी सरकारी यंत्रणेचे मूल्यमापन केले तर जनतेला धक्कादायक असे निष्कर्ष बाहेर पडतील.
-- माहितीच्या आधारे आता बर्‍याच गोष्टी लोकांसमोर उजेडात येत आहेत. अश प्रकरणांचा ताळेबंद ठेवणार्‍या काही सामजिक संस्था सुद्धा "हळूहळू" नावारुपाला येत आहेत. पण हे जे घडत आहे ते फारच संथ गतीने. जेव्हा जास्तीत जास्त लोक या प्रक्रियेत भाग घेतील तेव्हाच त्याचा परिणाम दृष्य स्वरूपात समोर येईल असे वाटते. तुमच्या सारखे समाज जागृतीचे कार्य करणारे लोक या कर्यातले शिरोमणी असतील यात शंका नाही.

साहेबाच्या पुढून व गाढवाच्या मागून कधी जाउ नये असे जुने अनुभवी लोक नवीन लोकंाना सांगतात. यात गाढवाचा सन्मान आहे की साहेबाचा अवमान आहे हे मला अद्याप समजलेले नाही.
-- हा हा हा. मार्मिक टोला आवडला. गाढवांनी आणि साहेबांनी वाचायला हवा.

अनेक वरिष्ठ सम्पूर्ण शासकीय यंत्रणा स्वत:च्या दिमतीसाठी बिनदिक्कतपणे वापरतात. तसा वापर करण्यास प्रतिबंध करणाऱ्याला टार्गेट करुन नोकरी करणे मुष्किल करुन टाकतात. त्या मानसिक तणावातून चुका झाल्या की त्याचे कागदावर भांडवल करुन रीतसर शासकीय नियमांचाच वापर करुन काटा काढतात. मग इतर लोकही ताटाखालचे मांजर बनून राहणे पसंत करतात.
--शासकीय यंत्रणेतल्या कर्करोगाची हीच तर खरी गोम आहे.

एकदा मी पोस्टात गेलो व लोकांसाठी पोस्टाच्या काय काय सेवा कशाप्रकारे उपलब्ध आहेत? पोस्टाचे कामकाज कसे चालते? याची माहीती देणारी एखादी तुमची पुस्तिका विकत मिळेल काय असा प्रश्न विचारल्यावर हा मनुष्य वेडा बिडा आहे की काय? अशा नजरेने बघितले व बोर्डावर पोस्टाचे रेट लावले आहेत असे उत्तर दिले.
--शासकीय यंत्रनांमधील ही उदासिनता खरेच खूप तापदायक आहे.

असे मुद्दे जनतेच्या 'वती` चा आव आणून काही धूर्त पुढारी, राजकारणी,भ्रष्ट नोकरशहा मांडत असतात. कारण जनतेने मेंढरासारख राहणं हे त्यांच्या हिताचं असतं.
--अगदी खरे.

जागरुक नागरिक हा सरकारी यंत्रणेच्या दृष्टिने 'कटकट्या` असतो.
-- तुम्ही असे लेख वारंवार लिहीत राहिलात तर तुम्हाला "ते" लोक "कटकट्या क्रं १" म्हणून घोषीत करटतील बरे! जरा जपून.

एखाद्या दारुडयाला भूक लागली की त्याला अन्नाऐवजी दारुच द्यायची. हळूहळू त्याचे शरीर भूक लागल्यानंतर अन्नाऐवजी दारुचीच मागणी करु लागते. जो ती मागणी पूर्ण करतो तो त्याला आपला हितचिंतक वाटतो. जो त्याला अन्न द्यायचा प्रयत्न करतो तो त्याला शत्रू वाटतो.
--धर्म-जाती यांच्या नावावर आरक्षणे देणे हे सुद्धा यातलेच. आरक्षणे आर्थिक दुर्बलांसाठी असावीत असे म्हणनार्‍यांना सामाजिक-शत्रू ठरवले जात आहे.

आवांतर: आजच बातमी वाचली -- बृहन्मुंबईतल्या एका व्यापार्‍याने पोलीस निरिक्षकाला हस्तका मार्फत खंडणी गोळा करताना पकडून दिले. त्या व्यापार्‍याचे आपण सर्वांनी अभिनंदन करायला हवे.

आपला,
(प्रभावित) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

 
^ वर