उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
|| जय गणेश ||
प्रियाली
September 23, 2007 - 3:50 pm
मराठी माणूस आस्तिक असो वा नास्तिक, गणपतीविषयी एक खास जिव्हाळा बाळगून असतो हे निश्चित. गणेशचतुर्थी आणि गणपतीच्या दिवसांत गणेशाची माहिती देणारी एक वेगळी चर्चा सुरु करायची होती. बुद्धी-चातुर्याची देवता मानला जाणारा गणपतीची इष्ट देवता म्हणून वर्णी फार नंतर लागलेली दिसते. गणपतीबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेतः
- ऋग्वेदात गणपतीचा फारसा उल्लेख नाही. जो आहे तो ही संदिग्ध आहे.
- कृष्ण यजुर्वेदात गणेशाचा उल्लेख येतो.
- इ.स. नंतर ४ थ्या पाचव्या शतकानंतरच गणेशाचे महत्त्व वाढलेले दिसते.
- रामायणात गणपतीचा उल्लेख आल्याचे मला आठवत नाही. चू. भू. दे. घे. कोणाला आठवते का? तसा येत असल्यास नेमका कोठे?
- महाभारत व्यासांनी गणपतीला लिहायला सांगितले त्यावर काही तज्ज्ञांचे म्हणणे असे की एखाद्या गणाधिशाला (गण+अधिपतीला) ते लिहायला सांगितले असावे... शिवनंदन पार्वतीसुताला नाही.
- गणपतीच्या जन्माबद्दल ज्या आख्यायिका आहेत त्यातील तो शिव-पार्वतीचा पुत्र नसून इतरत्र त्याचा जन्म झाल्याच्या आख्यायिका कोणत्या? (कार्तिकेयाबद्दलही अशा आख्यायिका आहेत पण त्या इतरत्र.)
या सर्वांबद्दल वाचकांकडे अधिक माहिती असल्यास ती कृपया येथे द्यावी.
सूचना: गणेशाच्या नेहमी सांगितल्या जाणार्या कथांसाठी ही चर्चा सुरु केलेली नाही. गणेश या दैवताबद्दल वाचकांनी आपल्याकडील आगळीवेगळी माहिती असल्यास ती येथे लिहावी.
दुवे:
Comments
वा..मस्त !
वा प्रियालीताई,
छान चर्चा विषय आहे.
मी मागे एकदा द.ग. गोडसे यांच्या एका पुस्तकात (नक्की आठवत नाही) अष्टविनायकांबद्दल काही माहिती वाचली होती. त्यात गणपती ही कल्पना कशी विकसित झाली त्यावर सुद्धा काही भाष्य होते.
*विनायक हे प्रथम विघ्न निर्माण करणारे देव म्हणून मानले जात. त्यांनी विघ्न आणू नयेत म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांची कार्याच्या आधी पूजा करत असत. पुढे त्यांचेच रुप विघ्नहर्ता असे झाले. म्हणजे जे आता दुसर्या कोणी निर्माण केलेली विघ्ने हटवतात असे. तसेच हे विनायक वाटेवरले देव असत. त्यामुळे जून्या महाराष्ट्रातील व्यापारी वाटांवर त्यांची स्थापना झाली. ( ४थ्या शतकानंतर मिळालेल्या प्रसिद्धीस हे कारण असावे का?)
आमच्या कडे 'भारतीय संस्कृती' या नावाचे पं. सातवळेकरांचे (बहुधा) एक पुस्तक आहे. त्यात सुद्धा गणपती विषयी काही माहिती होती. (मी आता ती विसरलो.)
जन्माबद्दलची आख्यायिका म्हणजे पार्वती आंघोळीला गेली असता तीच्या मळापासून ती एक मानव निर्माण करुन त्याला न्हाणीघराच्या बाहेर उभे करते आणी कोणाला आता सोडू नको म्हणून बजावते. मग शंकर येतो आणि गणपती त्याला मज्जाव करतो. त्यावर रागावून तो त्याचे डोके उडवतो. मग पार्वती रागावलेल्या शंकराला समजावते. मग तेथून चाललेल्या हत्तीचे शिर कापून शंकर गणपतीच्या धडावर बसवतो. असा तो गणपती. (ही लहानपणी वाचलेली कथा :).
(* गोडश्यांचे उपरोल्लिखित पुस्तक अनेक वर्षांपूर्वी वाचलेले असल्याने जे समजले होते आणि आता स्मरले ते लिहिले आहे. चूभूदद्याघ्या)
--लिखाळ
गणपतीबाप्पा मोरया !
विघ्नेश
खरंय! हे मीही वाचले होते. गणेशाची विघ्नराज आणि विघ्नेश ही नावे विकिवर आताच वाचली. या दोहोंचा अर्थ कसा होतो. विघ्नांचा ईश्वर असा? तसा होत असल्यास गणपती पूर्वी विघ्न निर्माण करणारी देवता मानली जात असे हे खरे वाटते.
दुसरी गोष्ट पूर्वी वाचनात आली होती की गणेश ही पूर्वी अघोरपंथाची देवता होती, जशी शिव आणि शक्तीही आहे, पण याबद्दल अधिक माहिती नाही आणि संदर्भ शोधले नाहीत. चू. भू. दे. घे.
अघोरपंथ
अघोर पंथा विषयी माहिती वाचायला आवडेल.
नाथ संप्रदाय (म्हणजे, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वगैरे.) यात येतो का?
यांच्या संप्रदायाचे लोक हिमालयात आहेत असे ऐकुन आहे. शिवाय ते अतिशय कठोर तपस्वी म्हणून ओळखले जातात. गुरु त्यांना शिष्य म्हणून स्विकारण्या आधी विवीध प्रकारे परिक्षा घेतात असे ही ऐकुन आहे.
आमच्या लहानपणी असा एक योगी म्हणवून घेणारा माणूस आमच्या घरी येत असे. माझे वडील व तो अनेक तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असत (असावेत, कारण आम्हाला ते आले की बाहेर काढून दिले जात असे!)
(मी अनेकदा दाराआडून त्या चर्चा ऐकण्याचा प्रयत्न केला होता.
त्यात जारण मारण वगैरे विषयी माहिती नको त्या वयातच कळली होती! नंतर फटकेही पडले होते... ते 'मारण' हे अनुभवाने नीटच कळले! ;)) )
या व्यक्तीने एकदा काही चमत्कारीक वनस्पतीही आणल्याचे आठवते. कोणतेही पाणी न घालता, कपाटातल्या पुर्ण अंधारात वर्षभराच्या काळात याची चांगली वाढ झाल्याचे ही स्मरते.
आपला
गुंडोपंत
अघोर
खरे तर घोर तपश्चर्या हा तपाचा एक् प्रकार असून यामध्ये साधक घोर अरण्यात कमी वस्त्रांत, कंद खावून कठिण तपश्चर्या करतो असे कुठेतरी ऐकले आहे. त्याचा आणि जारण-मारण इत्यादी तंत्रमार्गाचा काही थेट संबंध नसावा. नाथपंथिय लोक जारण्.मारण वगैरे मध्ये रस ठेवतात असे परंपरेनुसार वाटत नाही तर तो त्य त्या व्यक्तीची स्वतःचवावड असावी. असे वाटते.
--लिखाळ.
लिखाळ या नावानेच आम्ही अज्ञानी, प्रतिभाशून्य असे असूनही लेखनाची कंड असणारे आहोत असे दाखवले आहे, त्यामुळे आमची माहिती ही तुटपुंज्या वाचनावर आणि क्षीण स्मरणावर आधारलेली आहे असे मानावे. कसें !!!
अघोर
अघोरांबद्दल कुठेतरी काहीतरी वाचलेले या कथेत गुंफले होते त्याचा काही भाग खाली देते -
अघोर म्हणजे ज्याने स्वत:ला आठ प्रकारच्या दुर्गुणांपासून मुक्त केले आहे तो. हे दुर्गुण म्हणजे अपेक्षा, अभिमान, भीती, हाव, घृणा, बीभत्स, शारीरिक सुख आणि दांभिकता. यापासून मुक्ती मिळाली तर जीवाला कोणताही घोर राहत नाही आणि म्हणून यावर विजय मिळवणार्याला म्हणतात अघोर आणि साधनेला म्हणतात अघोर विद्या. जो हे साधतो तो शिव म्हणजे पवित्र असतो आणि त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात, तांत्रिक विद्येत तो प्रगती करतो.
तशी ही कथा आहे त्याला सत्याच्या पट्टीने मोजू नये हे सांगायला नकोच. ;-)
या व्यक्तीने एकदा काही चमत्कारीक वनस्पतीही आणल्याचे आठवते. कोणतेही पाणी न घालता, कपाटातल्या पुर्ण अंधारात वर्षभराच्या काळात याची चांगली वाढ झाल्याचे ही स्मरते.
इथे उत्सुकता ताणली गेली. याबद्दल काही अधिक माहिती मिळेल का? म्हणजे कसली वनस्पती होती? तिचा काय उपयोग केला गेला इ. इ.
वाटेवरले देव
म्हणजे नेमके काय? जसे 'टोल नाका' असतो तसे का? प्रश्न मजेशीर (किंवा ढ) वाटला तरी तो उत्सुकतेपोटी विचारला आहे. तसेच, विनायकांनाच वाटेवरचे देव का केले असावे?
वाटेवरचे देव
वटेवरले देव म्हणजे प्रवासात येणार्या संकंटांच्या निवारणासाठी मह्त्त्वाचे देव. त्यांची स्थापना म्हणूनच व्यापारी मार्गांवर झाली. (सर्व माहिती स्मरणावर आधारित त्यामुळे संवादास उपयुक्त असली तरी विश्वासार्ह नाही.)
--लिखाळ.
लिखाळ या नावानेच आम्ही अज्ञानी, प्रतिभाशून्य असे असूनही लेखनाची कंड असणारे आहोत असे दाखवले आहे, त्यामुळे आमची माहिती ही तुटपुंज्या वाचनावर आणि क्षीण स्मरणावर आधारलेली आहे असे मानावे. कसें !!!
शिंगरोबा!
हेच! मला या देवाचे नाव आठवत नव्हते पण तेथे पैसे भिरकावून(?) गेल्याचे आठवत होते म्हणून टोलनाका म्हटले. ;-)
व्यासांना अधिकार नाही!
महाभारत व्यासांनी गणपतीला लिहायला सांगितले त्यावर काही तज्ज्ञांचे म्हणणे असे की एखाद्या गणाधिशाला (गण+अधिपतीला) ते लिहायला सांगितले असावे... शिवनंदन पार्वतीसुताला नाही
अगदी खरे आहे. गणपतीसारख्या बुद्धीच्या महान देवतेला लेखनिकाचे काम सांगायचा अधिकार कुणालाच नाही, व्यासांना तर नाहीच नाही!! माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला मोठेपणा मिळावा म्हणून ही कंडी खुद्द व्यासांनीच पिकवलेली आहे! (चूभूद्याघ्या!)
आपला,
(गणेशभक्त!) तात्या.
वाटलंच!
लिखाळाच्या ज्ञाना इतकेच माझेही ज्ञान आहे!
असो,
शंकराने एकदम शीर वगैरे उडवले होते म्हणजे जरा जास्त वाटले . शिवाय मळाचा आक्खा माणूस होऊ शकेल इथ पर्यंत आंघोळच केली नाही पार्वतीने? बर्फात होती म्हणून? ती घरात पण अशीच असणार? स्वयंपाक तरी करेल का मग ती... ??? (म्हणजे तीने तेच करावे अशी अपेक्षा नाही. शंकरानेही स्वयंपाक केला तरी माझी काहीच हरकत नाही! माझे म्हणणे इतकेच की, घरात काही काम-धाम करत होती की नाही बॉ??? )
असे असेल तर मग शंकराची चिडचीड होतच असणार...आधीच हे असे आळशी वागणे शिवाय आपल्याच घरात यायलाही बंदी? शिवाय नसेल मिळाले चिलीम वगैरे वेळेत, रागारागात शीर उडवलेच असणार त्याने!
त्यातही, आधीच यांचे घर इतके लांब. कैलासावर कोण मरायला जातो? मग इतक्या सिक्युरीटीची का बरं काळजी वाटली असावी पार्वतीला?
काही कशाचा मेळच लागत नाही बॉ मला यात!
कुणी तरी सांगा मला समजावून यात काही छुपे रुपक वगैरे असेल तर!
आवांतरः
मला वाटलच होतं की, चर्चेत व्यासांचा उल्लेख म्हणजे तात्याबां ची सुप्रसिद्ध व्यास मते ऐकायला मिळणार!
;)))
आपला
गुंडोपंत
मडपॅक
गुंडो, किती शंका तुम्हाला? :)))) म्हणूनच या आख्यायिका/गोष्टी नको होत्या चर्चेत. आपण मानू की पार्वतीने सर्वांगाला मडपॅक लावला होता.
मडपॅक!
ओहो मडपॅक!!!
अरे! हो ना...
याचा तर मी विचारच केला नव्हता!
ओ के! हे मान्य आहे.
एक गुंता सुटला असे मान्य करु या!
आपला
मॅडकॅप
गुंडोपंत
गौरी
हम्म.. पार्वती गौरवर्णीय होती म्हणतात ते उगाचच नाही तर..
कैलासावर हत्ती ?!!
आणि कैलासावर हत्ती ? राम् राम ! (उप्प्स चुकलेच) शिव शिव !
हे म्हणजे असामी असामीतल्या त्या जहूच्या महाराजांसारखे दिसते. हिमालयावर कोणी पोहोचू शकणार नाही (अगदी तुमचा शेर्पा तेनसिंग सुद्धा !) अश्या ठिकाणी एका पायावर उभे राहून तपश्चर्या करणार्या बाबांचा फोटो ! (तो सुद्धा वाघिण दूध पिउ देत असतानाचा :)
--लिखाळ.
लिखाळ या नावानेच आम्ही अज्ञानी, प्रतिभाशून्य असे असूनही लेखनाची कंड असणारे आहोत असे दाखवले आहे, त्यामुळे आमची माहिती ही तुटपुंज्या वाचनावर आणि क्षीण स्मरणावर आधारलेली आहे असे मानावे. कसें !!!
हे माझे लहानपणीचे आवडते दैवत
त्यामुळे या चर्चेत रस वाटतो. पण विकिपीडिया वाचल्यानंतर याविषयी मला त्याहून अधिक काहीच माहीत नाही, असे लक्षात आले. तेव्हा या चर्चेतून शिकत राहीन.
दुसरी एक कथा !
दुसरी एक कथा अशी आहे की,तारकासुराच्या सैन्यातील गजासुर नावाच्या असुराने शंकराचा कमंडूल लाथाळून त्याचा अपमान केला. हे कृत्य आपला द्वारपाल जो गणपती त्याचेच असावे या समजुतीने शंकराने त्याचा शिरच्छेदकेला. परतु आपल्या पत्नीकडून खरा प्रकार समजताच त्याने गजासुराचे शुण्डायुक्त शिर त्याच्या धडापासून वेगळे केले व गणपतीच्या शरीरावर बसवले. हा गजासुर तारकामय संग्रामात कपाली रुद्राच्या हातून मरण पावल्याचे मत्स्यपुराणात सांगितले आहे असे म्हणतात.
तिसरी कथा अशी आहे की,गजासुराचा वध करण्यासाठी विष्णूने पार्वतीच्या उदरी जन्म घेतला.त्याचे योग्य काळी अष्टशिध्दिबरोबर लग्न झाले व सिध्दींनी त्याला अनेक कार्यात मदत केली.
प्राचीन काळी त्रिविष्टम किंवा तिबेटदेश देवभुमी होती व तेथे प्राचीन आर्यांच्या देवदेवता मूलतः वास करीत अशी समजूत आहे. या देवात लेखा: नावाचे देवगण होते. हे देवगण लेखकाचे काम करीत गणपतीस अत्यंत श्रेष्ठ लेखक मानलेले आहे.तेव्हा अशा गणातील एक देवता गणपतीच्या नावाने हिंदुच्या देवगणात सामील असावा असे वाटते.
तारकासुर, रुद्र इ.
वा! बिरुटेसर, कळत नकळत एक अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद दिला. गजासुराची कथा मीही ऐकली होती पण विसरले होते.
आता काही प्रश्नांची उत्तरे कोणाकडे आहेत का?
१. रुद्र ही देवता कोणती? रुद्र हा साक्षात ब्रह्मदेवाचा पुत्र पण तो शंकरस्वरुप आहे का? रुद्राची कथा/ आख्यायिका कोणती?
याबद्दल अधिक वाचायला कोठे मिळेल. मी पूर्वी काही वाचन केले त्यात यक्ष, अप्सरा, किन्नर, गंधर्व यांची राज्येही तिबेटात होती असे म्हटले होते.
रुद्र
प्रियालीजी तुम्ही उगाच पुस्तके उचकायला लावता बॉ !
ऋग्वेदात शिवाचे स्वरुप व त्याचा महिमा रुद्र असे वर्णन येते. ऋषींनी शिवाच्या भयानक रुपास रुद्र हे नाव देऊन त्याची करूणा भाकलेली आहे.
आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास
लेखक ऋग्वेदी
या पुस्तकात ऋग्वेदकालीन शिवोपासना या प्रकरणात 'रुद्र' या विषयावर अधिक माहिती आहे.
रुद्र पुढे चालू...
मलाही विकिवर रुद्र सापडला. ती माहिती अर्थातच तुमच्या माहितीशी जुळते. तसेच मी जो चार्ट लावला होता त्यानुसार रुद्र ही ब्रह्मदेवाची उत्पत्ती सांगितली जाते.
तुमच्याकडे उचकायला पुस्तकं आहेत हे भाग्य! मलातर जालावरच तृप्त राहावे लागते. तुम्ही शोधलं इथे माहिती टाकली त्याबद्दल अनेक धन्यवाद.
वा
बिरुटे सर,
अख्यायिका आवडली.
प्रियालीताई,
रुद्र अकरा आहेत असे ऐकतो. मारुती अकरावा रुद्र !
--लिखाळ.
लिखाळ या नावानेच आम्ही अज्ञानी, प्रतिभाशून्य असे असूनही लेखनाची कंड असणारे आहोत असे दाखवले आहे, त्यामुळे आमची माहिती ही तुटपुंज्या वाचनावर आणि क्षीण स्मरणावर आधारलेली आहे असे मानावे. कसें !!!
अनुभव
काही गहन शास्त्रिय माहीती देत् नाही आहे. पण लहानपणी आम्हाला सांगीतले होते की गणपती विर्सजनानंतर ज्या जागी गणपतीमूर्ती ठेवली जायची तिथे आपल्याला जो विषय अवघड जातो त्या विषयाचे पुस्तक, वही ठेवा (त्या रात्रीपुरती). वार्षीक परिक्षेत चांगले मार्क्स् मिळतील. :-)
मानले तर खरे आहे, जेवढी बोलणी अभ्यासाबद्दल घरच्यांकडून् खायला लागायची त्याचा विचार करता आता वाटते की नापास कधी झालो नाही ते बहूदा सगळे दप्तर त्या रात्री तिथे ठेवल्यामूळेच.
शंका
एक 'लघु' शंका - रावणाला आली होती - शंकराचे आत्मलिंग घेऊन तो परत लंकेस जात असता. तेंव्हा तो गोकर्णाच्या किनार्यावर होता.
शिवशंभूची अट होती - आत्मलिंग जमिनीवर ठेवायचे नाही. आता रावण ते हातातच ठेवून आपली शंका कशी व्यक्त करणार?
तेवढ्यात गणपती तिकडून बटूचे रूप घेऊन आला आणि त्याने ते आत्मलिंग ओंजळीत धरून ठेवण्याचे मान्य केले.
झाले. रावण 'तिकडे' गेला. इकडे बटू गणेशाने त्याला हाका मारायला सुरुवात केली - "रावणा, लवकर ये, लिंग जड आहे, माझे हात दुखत आहेत, तीन म्हणायच्या आत आला नाहीस तर हे खाली ठेवीन" इ.इ.
रावणाचीच ती- लघु असली तरी वेळ लागणारच. रावण आला नाही. ती संधी साधून बालगणेशाने लिंग जमिनीवर ठेवून दिले आणि तो गायब झाला.
अर्थातच ही कथा रामायणानंतरच्या गणेश पुराणात प्रक्षिप्त झाली आहे.
नंतर
रावणाने ते शिवलिंग ओढून उचलण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात शिवलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला आणि म्हणून गोकर्ण.
अवांतरः गायीच्या आणि बैलाच्या कानाच्या आकारात कितपत फरक असतो. मग वृषभकर्ण असे का नाही?
आम्हाला येथे भेट द्या.
नरपुंगव !
मुळात बैलोबा ही अवमानकारक संज्ञा का असावी?
ही संज्ञा फक्त मराठीत अवमानकारक आहे. संस्कृतात एखाद्या धष्टपुष्ट पुरुषाला कौतुकाने "नरपुंगव" म्हणजे बैलासारखा (सामर्थ्यवान) पुरुष म्हणण्याची रीत आहे. बैल म्हणजे पौरुषाचे प्रतीक मानले जाते याचा उल्लेख "लज्जागौरी"मध्येही आला आहे.
- दिगम्भा
गणेश पुराण
ही कथा गणेशपुराणातच येत असावी.
मूळ रामायणात गणेशाचा उल्लेख मला तरी दिसलेला नाही. (अर्थातच, मी काही अधिकारी व्यक्ति नाही त्यामुळे चू. भू. दे. घे. लिहून टाकते.) गणेशपुराण हे बर्याच नंतर लिहिले गेल्याने (जवळपास १००० वर्षांपूर्वी ) त्यात ही कथा येत असावी.
गणपती ---
प्रियाली, आपण सुरू केलेल्या या चर्चायज्ञात माझ्या काही समिधा -
१. जालावर उपलब्ध असलेली एकंदर माहिती पाहता सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की आर्य भारतात त्यांची संस्कॄती रुजवण्याचा प्रयत्न करत होते (सिर्का १००० बी.सी.) त्या काळात - कॄष्ण यजुर्वेद निर्माण झाला त्या काळात - येथील स्थानिक रहिवाशांना दस्यू, नाग, पिशाच्च इ. नावाने संबोधण्याची पद्धत होती.
२. शिव/शंकर ही स्पष्टपणे त्याकाळातली ऍबोरिजिनल / (द्रविड हा शब्द नंतरचा) देवता होती. लिंग-योनीपूजा आणि पशूपूजा (कदाचित मदिरा प्राशन न करणार्या - असुर) करणार्या समाजाचे विलिनीकरण (वर्णसंकर आणि संस्कृतीसंकर) हळूहळू गाय/घोडा यांचे हवन करणार्या सुर समाजात होत होते. त्यामुळे त्यांची दैवतेही सामंजस्याने या नव्या रहिवाशांनी घेतली.
३. त्याच काळात या असुर/दस्यु समाजातील वीरपुरुष आणि चार लोकसमुहांचे राजे असणार्या व्यक्तींनी नव्या लोकांना (आर्य आक्रमकांना) विरोध केला आणि विजयही मिळवला. .(त्यांचे मूळ अस्त्र 'हत्ती' हे असावे. या हत्तींनीच {वक्रतुंड, महाकाय, दंतीन, शूर्पकर्णकम} आर्यांचा पाडाव केला असावा. गाई, बकर्या चारणार्या आणि घोडे बाळगणार्या नोमॅड आर्यांनी हत्ती प्रथमच पाहिला होता.)
त्यामुळे त्यांना गणनायक, विनायक,लोकपाल, गणपाल अथवा गणपती असे नाव मिळाले. अर्थातच ते आर्यांचे शत्रू असल्याने प्राथमिक ग्रंथात त्यांचा उल्लेख शत्रू (विघ्नकर्ता?) असाच होतो. त्यामुळे त्यांचे हत्तीला काबूत ठेवणारे शौर्य (आणि प्रत्यक्ष हत्तीही) कोणत्यातरी अघोरी शक्तीकडून मिळाले असावे असे आर्यांना वाटले.
४. परंतु हे चारही लोकपाल आदर्श राजे असल्याने त्यांनी आपल्या प्रदेशात शांतपणे वास करण्यासाठी आर्यांना मुभा दिली असावी
५. अर्थातच एकदा शांतपणे स्थापित होण्याची मुभा मिळाल्यावर त्या लोकपालांचे शौर्य हे आर्यांच्याही आदराचा विषय ठरले. (लोकनायकांचे विभूतीकरण होऊन त्यांचे देवदेवता बनल्याचे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होते. उदा. राम, कृष्ण, फार काय मल्हारी-म्हालसाकांत सुद्धा!) पुढे संस्कृतीसंकरात हेच चार गणपती पुढे एकाच दैवतात विलीन होऊन त्यांचा एकच गणपती झाला असावा. (इस्.४००)आणि त्यांचे हत्ती हे चिन्हात्मक विभूतीकरण जाले असावे.
६. 'गणपतीने महाभारत लिहिले' याचे साधे स्पष्टीकरण मिळू शकते. त्याकाळच्या आर्यांना लिहिता येत नव्हते. परंतु अनार्यांना लिहिता येई. त्यामुळे या गणपतींच्या राज्यात मुखोद्गत असलेले महाभारत प्रत्यक्ष लिपीबद्ध केले गेले असावे. म्हणून 'गणपतीने महाभारत लिहिले'.
७. गणपती ही बुद्धीमत्तेची देवता याचमुळे असावी. कारण याच राज्यकर्त्यांनी लोकांना लिहायला शिकवले.
अर्थातच आजचा गणपती त्या काळच्या गणपतीपेक्षा फारच वेगळा आहे. आपल्या पुराणांनी इतिहासावर शेंदुराची इतकी पुटे चढवली आहेत की मूळची कोरीव काम असलेली सुंदर मूर्ती आता केवळ एक गुळगुळीत गुंडा होऊन उरलली आहे.
असो. ही माझी वैयक्तिक मते. जावईशोध म्हणा हवा तर...त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास नाक घासतो - गणपती बाप्पा आणि त्यांच्यासमोरही..
--- बाप्पा मोरया!!! (शीर्षक पहा.)
नाक घासणे इ. :)
सर्वप्रथम प्रतिसाद अतिशय आवडला. नाक घासणे गणपतीबाप्पासमोरच असू दे. इथे आपली गंभीर मते मांडायचीच तर आहेत, ती इतरांना पटली नाहीत म्हणून नाक का घासावे बॉ!
तसे आर्य आले ही मूळ संकल्पनाच मला न पटणारी आहे पण आर्य बाहेरून आले या संकल्पनेतून विचार केला तर तुमचा प्रतिसाद खरंच विचार करण्याजोगा, माहितीपूर्ण आणि पटणाराही आहे, म्हणूनच आवडला.
आता एक अवांतर प्रश्न - ही माहिती जरी तुमची वैयक्तिक मतं असली :) तरी तुम्हाला कोठे मिळाली? म्हणजे यावर विस्तृत वाचण्यासारखे जालावर काही आहे का? असल्यास तो दुवा नक्की द्या. धन्यवाद.
सहमत
वरिल प्रतिसादाशी सहमत आहे.
आर्य बाहेरुन आले, ते आक्रमक होते असे गृहित धरले तर आपण जे म्हणता विचार करण्यासारखे आहे.
--लिखाळ.
लिखाळ या नावानेच आम्ही अज्ञानी, प्रतिभाशून्य असे असूनही लेखनाची कंड असणारे आहोत असे दाखवले आहे, त्यामुळे आमची माहिती ही तुटपुंज्या वाचनावर आणि क्षीण स्मरणावर आधारलेली आहे असे मानावे. कसें !!!
परमतसहिष्णुता
पण आर्य बाहेरून आले या संकल्पनेतून विचार केला तर तुमचा प्रतिसाद खरंच विचार करण्याजोगा, माहितीपूर्ण आणि पटणाराही आहे, म्हणूनच आवडला.
इतपत परमतसहिष्णुता सुद्धा शिल्लक आहे की नाही असे वाटले म्हणून -नाक घासावे बॉ!
असो.
माझी मते काही वाचन आणि निरीक्षणातून बनली आहेत. ती चुकीची असतीलही.
मत १- आर्य बाहेरून आले.खरे म्हणजे बाहेरून म्हणजे शेजारून - अफगाणमधून. अनेक पुरातत्त्वशास्त्रज्ञानी, भाषातज्ञानी आणि इतिहासकारांनी तसे स्पष्ट केले आहे. झेंद अवेस्ता आणि ऋग्वेद यांच्यातील साम्य, घोडे आणि रथांचा वापर, मूर्तीपूजेवरचा अविश्वास आणि अग्नीपूजा, इंडो-युरोपीय भाषांतील साम्यस्थळे, चेहेरेपट्टी आणि शरीरबांधणी या सर्वच मुद्द्यांवर वेगवेगळ्या विचारसरणी मान्य करणार्या (हिंदुत्ववादी टिळक ते कम्युनिस्ट राजेश कोचर) सर्वांनीच - आर्य मूळ अफगाणाच्या हिमालय - हिंदुकुशचे वासी असावेत हे मान्य केले आहे. ज्या काळात 'भारत' ही संकल्पनाच नव्हती त्या काळात बाहेरून आणि आतून याला काही अर्थ नाही. फारतर असे म्हणता येईल की एक फार मोठा रिकामा भूभाग होता. त्याला कोणत्याच राष्ट्रीय सीमा नव्हत्या. मानवांच्या टोळ्या नवनवे भूभाग पादाक्रांत करत अधिक हिरव्या कुरणांकडे जात होत्या.
मत २- भारताचे मूळ रहिवासी असे कोणी नव्हतेच. येथल्या म्हणवल्या जाणार्या ओरिजिनल लोकांचे मूळ आफ्रिका होते आणि ते कित्येक (४० लाख?) वर्षांपूर्वी भारतात समुद्र किनार्याच्या कडेकडेने पसरले. म्ह. गुजरात ते कन्याकुमारी ते बंगाल - पेनिन्सुलर एजेस वर. पण दंडकारण्यात मात्र त्यांची अत्यंत तुरळक वसती होती. या लोकांची मूळ भाषा तमिळसदृष होती. तमिळवरूनच द्रविड ह शब्द संस्कृत भाषेत आला. एक तमिळ (द्रविडी) भाषाभगिनी पाकिस्तान-(बलुचिस्तान)-अफगाण सीमेवर तुरळक अस्तित्वात आहे.
असो. अशी अनेक मते आहेत. प्रत्येकाचे संदर्भ देण्याची शक्यता नाही. (माझी तपशिलाची स्मरणशक्ती फारच दुबळी आहे. याचे कारणही विश्वजाल हेच आहे. संदर्भ हवा? - महागुरूला विचारा!!) कोणताही वैचारीक अभिनिवेश न बाळगता वाचन, मनन केल्यास हे उघड होते.
प्रियाली, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आर्य भारताबाहेरून आले नाहीत तर आपलेही मत सविस्तर मांडावे. योग्य वाटल्यास त्याचाही स्विकार करण्यास माझ्या प्रत्यवाय नाही.आर्य भारताबाहेरून आले का? किंवा भारताचा प्राचीन इतिहास नक्की काय होता? अशी चर्चा सुरू केल्यास उत्तम.मागे एका हिंदुत्ववादी व्हिडिओवरून झालेल्या चर्चेत आपण प्रतिसादरूपाने काही मते मांडली होती पण त्याऐवजी एक संपूर्ण लेख लिहिल्यास बरे होईल.
आर्य(?)
विसुनाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपले मत २ मी बाजूला ठेवते कारण त्याबद्दल कोणतेही मतभेद नाहीत.
या विषयावर लेख लिहिणे म्हणजे जे आधी लिहिले ते कॉपी-पेस्ट करणे आहे. :-(
हे म्हणणे शतप्रतिशत खरे, परंतु जे आले ते आर्य नव्हते. किंबहुना, आर्य अशी कोणतीही जमात इ. नाही. जे आले ते आक्रमण करून आले नाहीत तर त्यांचे संक्रमण होत गेले. आर्य ही संकल्पना ज्या मॅक्स म्युल्लरमुळे डोक्यात आली त्याच्यामते कॉकेशस पर्वत तुर्कस्तानाच्या उत्तर (की वायव्य? नेमकी दिशा विसरले) दिशेला असून जवळपास युरोपात येतो. ते आर्य तेथून आक्रमण करून आले आणि त्यांनी अनार्यांना दक्षिणेत पळवले. यावर विस्तृत प्रतिसाद मागे दिला होताच. संक्रमण या शब्दात जी समावेशकता आहे ती आक्रमण या शब्दांत नाही.
१. येथे अनेकदा म्हटले जाते की अनार्यांना घोडे माहित नव्हते. :-) जर त्यांना घोडे माहित नव्हते तर बहुधा गाई-गुरेही माहित नव्हती का? कारण ते ही भटके आर्य येथे घेऊन आले, तेव्हा हे तसे नसावे. अनार्यांना घोडे माहित असल्याचे पुरावे लोथल, ढोलावीरा या शहरांत मिळाले आहेत. रथ मात्र पर्शियात वापरले जात होते. त्यांचे संक्रमण कोठून कोठे झाले याबाबत फारशी कल्पना नाही.
२. मेगॅस्थेनिसचा इंडिका वाचताना भारतातील जमाती या इंडिजिनिअस (मराठी) असल्याचा, त्यांच्यावर पूर्वी कोणी आक्रमण केले नसल्याचे किंवा त्यांनी कोणावर आक्रमण केले नसल्याचे त्याने लिहून ठेवले आहे.
३. अलीकडेच अलेक्झांडरचा इतिहास वाचताना ग्रीक हिंदुकुश पर्वतराजीलाही "कॉकेशस" म्हणत हे कळले. या भागात अलेक्झांडरने अलेक्झांड्रिया कॉकेशिया या शहराची निर्मितीही केली होती.
सर्वांनीच - आर्य मूळ अफगाणाच्या हिमालय - हिंदुकुशचे वासी असावेत हे मान्य केले आहे. ज्या काळात 'भारत' ही संकल्पनाच नव्हती त्या काळात बाहेरून आणि आतून याला काही अर्थ नाही. फारतर असे म्हणता येईल की एक फार मोठा रिकामा भूभाग होता. त्याला कोणत्याच राष्ट्रीय सीमा नव्हत्या. मानवांच्या टोळ्या नवनवे भूभाग पादाक्रांत करत अधिक हिरव्या कुरणांकडे जात होत्या.
म्हणूनच बाहेरून आले असे म्हणावे असे वाटत नाही कारण मुद्दा २ घेतला तर अफ्रिका सोडून सगळेच बाहेरून आले.
असो, माझा मूळ मुद्दा समावेशकतेचा होता. जेव्हा आक्रमण होते तेव्हा आपले विचार-आचार, पद्धती इतरांवर लादल्या जातात. त्यांचे शिरकाण केले जाते किंवा दास्य पत्करावे लागते. बरेचदा मूळ संस्कृतीची पाळेमुळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. असे इथे घडले असावे असे वाटत नाही.
लेखनाविषयी माझे मतही मी एका लेखातून मांडले होते त्यामुळे अनार्यांना लेखनकला अवगत होती आणि आर्यांना नाही याबद्दलही मी साशंक आहे.
तसे मलाही यातील सर्वज्ञान आहे असे मी म्हणू शकत नाही, तेव्हा चू. भू. दे. घे.
प्रथमेश आणि प्रमथेश
तेवढा अभ्यास नसल्यामुळे माहिती देण्याऐवजी दुसरे काही लिहीत आहे.
१. प्रथमेश
माझ्या लहानपणी गणपती या देवाला विशेष किंवा वेगळे महत्व नव्हते. आमच्या आठवणीतले मुख्य/मोठे देव म्हणजे शंकर, विष्णू, राम, कृष्ण, फार तर देवी (अंबाबाई). गणपती होता पण आपला असाच एक देव म्हणून. कार्यारंभी वगैरे पुजला जायचा तेवढ्यापुरता, नाहीतर ५ दिवस येऊन जाणारा.
गेल्या दहा-वीस-तीस वर्षांत पहातो तर त्याला असाधारण महत्व आले आहे. महत्वच काय लोक त्याच्या प्रेमातच पडले आहेत. "युबर (की ऊबर) आलेस" म्हणतात तसे तो सर्व देवांहून मोठा, सर्व देवांचे उत्पत्तीस्थान असा गणला जाऊ लागला आहे.
काही असले तरी मुलाला (गणपतीला) बापापेक्षा (शंकरापेक्षा) एवढे जास्त महत्व दिले जाते हे माझ्यासारख्या जुन्या लोकांना फारसे रुचत नाही. आता जमाना बदल गया म्हणून मानायचे एवढेच.
२. प्रमथेश
पण गणपती कोण होता? तर भूतगणांचा पुढारी. एका प्रकारे गुंडांच्या टोळीचा दादा. उगीच नाही त्याला विघ्नेश/प्रमथेश म्हणायचे.
या दृष्टीने पहाता हल्ली सार्वजनिक गणेशोत्सवांना काहीसे स्थानिक दादा/भाईंच्या मालकीच्या उत्सवांचे स्वरूप आले आहे त्यात फार काही गैर झाले असे मानण्याचे कारण नाही. ज्यांचा देव त्यांचा उत्सव.
[वरील वर्णनावरून मी गणपतीचा द्वेष्टा वगैरे आहे अशी समजूत करून घेऊ नये, फक्त जेवढी गणेशभक्ती हल्ली जनात माजलेली दिसते तेवढी व तशी माझ्या अंगी नाही एवढेच.
तसा विद्याकलांचा देव म्हणून तो मला प्रिय आहेच, शिवाय त्याचे गोंडस रूपसुद्धा मला आवडते.]
(गणेश-प्रेमी पण अभक्त)
दिगम्भा
"युबर आलेस"
माहिती आवडली.
बहुधा अमिताभने नमस्कार केल्यावर तो "युबर आलेस" झाला असावा :)
तसेच गणपतीच्या नावाने जसे उत्सवाचे दुकान चालते तसे अजून नवरात्रीत चालू लागले नाही. ते तसे झाले की देवी "युबर आलेस" होणार बहुधा. होवू देत. काळाचा महिमा. लोकांची प्रापंचिक गर्हाणी ऐकून गणपती कंटाळला की तो सूत्रे देवीकडे देईल बहुधा. (तसे ही संतोषीमातेवर सिनेमा आल्यावर ती देवी सुद्धा अचानक प्रसिद्धीच्या शिखरावर गेली होती म्हणे. काही काही देवांच्या कुंडलीत सुद्धा असे रातोरात प्रसिद्धीचे योग असणार. घाटपांडे साहेबांना विचारले पाहिजे.:)
--(अप्रसिद्ध :) लिखाळ.
लिखाळ या नावानेच आम्ही अज्ञानी, प्रतिभाशून्य असे असूनही लेखनाची कंड असणारे आहोत असे दाखवले आहे, त्यामुळे आमची माहिती ही तुटपुंज्या वाचनावर आणि क्षीण स्मरणावर आधारलेली आहे असे मानावे. कसें !!!
देवांची कुंडली
" अहो देवांनाही साडेसाती चुकली नाही. तिथे तुम्ही आम्ही कोण?" असा ज्योतिषी व जातक यातील संवाद साडेसाती विषयक उहापोह करताना माझ्या पुस्तकात घेतला आहे. बाकी संतोषी माते चे उदाहरण अगदी परफेक्ट आहे.
प्रकाश घाटपांडे
गणेश ही ऑस्ट्रिक देवता.
पशूच्या आकाराच्या (Zoomorfic) हिंदु देवता ही मूळ ऑस्ट्रिक देवके (Totems) होत. द्रविडांनी त्यांना अधिक महत्त्व दिले. नाग, मत्स्य, मकर, हनुमान, गणेश, नंदी इत्यादिकांच्या पूजेचे मूळ ऑस्ट्रिक आहे.
नऊ उपवंशासह सहा मुख्य भारतवासी मानववंश:
१. नेग्रिटो-हे आता अंदमानमध्ये आहेत. यांचे काही अंश कोचीन-त्रावणकोरच्या डोंगरातील कडर व पलयन, वायनारचे इरूल, आसामातील अंगामी नाग, व पूर्व बिहारच्या राजमहाल डोंगरातील काही जमाती यांच्यामध्ये दिसतात.
२. प्रोटो ऑस्ट्रलॉइड-हे पुढे इंडोनशिया-मलेशियामार्गे ऑस्ट्रेलियात गेले. भारतातील बहुजनसमाज ऑस्ट्रलॉइड वंशाचा. , ३. मोंगोलॉइड-आसामी, बंगाली, तिबेटी, सिक्कीमी, भूतानी. , ४. भूमध्य समुद्रीय-(अ)कानडी, तामीळ व केरळी. (आ) पंजाब, राजस्थान, सिंध--हेच आर्यपूर्व सुसंस्कृत द्रविड., ५. पश्चिमी पृथुकपाली -(अ)दिनारिक-ओरिसा, सौराष्ट्र, कूर्ग. (आ)अल्पिनाइड-गुजराथ; आणि मलबार सोडून उरलेला भारताचा पश्चिम समुद्र किनारा, आणि ६. नॉर्डिक (म्हणजे आर्य?).
शिव-उमा या देवता आर्यपूर्व कालापासून असून त्या द्रविडांनी प्रस्थापित केल्या. यज्ञ, पशुहत्या या आर्य कल्पना. पत्र, पुष्प, फल, जल यांनी करायची पूजा ही द्रविडांची पद्धत. आर्यांचे देव: इंद्र, अग्नी, वरुण, मित्र, सोम, सविता, सूर्य, पूषा, मातरिश्वा, वायू, पर्जन्य, ब्रह्मणस्पती, ब्रह्मा, प्रजापती, विश्वकर्मा, अश्विदेव, विश्वेदेव, अदिती, द्यौष्पिता, मरुद्गण, ऋभू इत्यादी. शिव, उमा, विष्णु व त्याचे अवतार, लक्ष्मी हे मुख्य देव आणि गणेश, स्कंध, नाग, नंदी, भैरव. हनुमान, गरुड, सीतलादेवी इत्यादी उपदेवता या द्रविडांच्या.
वेदामध्ये उमा हिचा रुद्रपत्नी म्हणून उल्लेख नाही. शिव, शंभू या शब्दाची उत्पत्ती तामीळ आहे. वेदातील मरुद्गणांचा पिता रुद्र हा शिवदेवाशी द्राविड संपर्काने एकरूप झाला. वेदात लक्ष्मी ही विष्णुपत्नी नाही. स्कंद आणि गणेश हे द्राविड देव. गणेशाचे मूळचे नाव विनायक. हा मूळचा विघ्नकारक व झपाटणारा ग्रह. म्हणून स्मृतींमध्ये विनायकशांतिकर्म सांगितले आहे. पुढे तो ज्ञानदाता व विघ्नहर्ता झाला. --वाचक्नवी
ऑस्ट्रिक-रुद्र
या सर्व विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद.
मला आतापर्यंत फक्त सहाच भारतवंश माहित होते: नेग्रेटो, प्रोटो ऑस्ट्रेलॉइड, मोंगोलॉइड् आणि मेडेटरेनिअन, नॉर्डीक आणि पश्चिमी ब्रॅकेसेफल्स (Brachycephals म्हणजेच सिरिअन आणि मध्य आशियाई इ.) हेच पृथुकपाली का?
५. पश्चिमी पृथुकपाली -(अ)दिनारिक-ओरिसा, सौराष्ट्र, कूर्ग. (आ)
पृथुकपाली म्हणजे काय? (भूपाल?) आणि ते असे पूर्व, पश्चिम, दक्षिणेला विखुरण्याचे कारण काय असावे? (हा सहज प्रश्न मनात आला)
रुद्रावर मला आंतरजालावर बर्यापैकी माहिती फक्त विकिवर मिळाली. तीही आपण दिलेल्या माहिती एवढी विस्तृत नाही. ही सर्व माहिती आंतरजालावर वाचायला मिळेल असे स्थळ आहे का? मला शोधून मिळाले नाही.
रुद्र
रुद्रावर आन्तरजालावर एवढी माहिती आहे की ती वाचून थोडक्यात आणणे कठीणच.
ऋग्वेदातील रुद्र आणि पूषन् या देवता आर्यांच्या पशुपाल जमातीचा जीवनक्रम सूचित करतात.
ऋग्वेदातील रुद्र इंद्रासारखाच सुंदर व गौर वर्णाचा आहे. रुद्राच्या गळ्यात सोन्याच्या निष्काचा हार आहे (ऋग्वेद २।३३।१०). निष्क म्हणजे वर्तुळाकार, मधे भोक असलेली सोन्याची नाणी . या नाण्यांवर अनेक आकृती काढलेल्या आहेत. म्हणून त्या हाराला विश्वरूप असे म्हटले आहे.
रुद्र आर्यांचा सर्वात जुना देव आहे. रुद्र हा पशुपति आहे.
अग्नि, उषा, सविता वायु इत्यादी निसर्गाची शक्ति असणार्या देवता तर इंद्र, वरुण रुद्र या निसर्गशक्तीच्या पलीकडे असलेल्या व्यक्तिरूप देवता.
अग्नीला असुररुद्र म्हटले आहे(ऋग्वेद २।१).
रुद्राला प्रथम दैव्य भिषक्(वैद्य) किंवा भिषक्तम म्हटले आहे.(शुक्ल यजुर्वेद १६-१२, ऋग्वेद २-२३-४; ७; १२).
रुद्र हा यज्ञविध्वंसक आहे, त्याने दक्ष-प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केला; अग्निचयात रुद्रसंबंधी कृत्य संपल्यावर प्रोक्षण करून शुद्धी करतात; त्र्यंबकेष्टीत रुद्राला बाहेर दूर देशी उत्तरेच्या दिशेला पाठवून शुद्धिविधी करतात; इत्यादी प्रमाणावरून हा अवैदिक देव आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न अनेक इतिहासतज्ज्ञ करतात. या प्रमाणांवरून फारतर असे म्हणता येईल की तो वैदिक लोकांचा त्यांच्या रानटी पशुपालक अवस्थेपासून चालत आलेला देव असावा. त्याचा व शिवाचा संगम वैदिकांनी घडवून आणला.
ऋग्वेदातील रुद्रसूत्रात तो मरुतांचा पिता आहे.
रुद्राला असुर हे अत्यंत प्राचीन देवतांचे विशेषण लावतात(ऋग्वेद ५।४२।११). त्यास ईशान व शिव(ऋ. १०।९२।९). असेही म्हटले आहे. शिव हे नाम वेदोत्तरकालात रुद्रालाच विशेषनाम म्हणून प्राप्त झाले. याचा बाण घातक म्हणून सर्व वेदात वर्णिला आहे. इंद्राचा बाण फक्त शत्रूचा घात करतो, तर रुद्राचा बाण कोणाचाही. म्हणून आमची मुलेबाळे, आईबाप, सेवकजन, पशु, अश्व व आम्ही यांचा नाश करू नकोस अशी रुद्राची प्रार्थना ऋग्वेदात(१।११४। ७, ८) आहे. अशीच वर्णने अथर्ववेद(११।२।२६),आणि शतपथ ब्राह्मण(९।१।१।१) येथे सापडतात.
रुद्र हा आर्य व अनार्य या दोघांचा देव आहे. रुद्रगणाच्या लोकांची अवैदिकांशी मैत्री होती. दक्ष प्रजापतीच्या कन्येचा रुद्रगणाच्या अधिपतीशी झालेला स्वयंवर विवाह दक्ष प्रजापतीला मान्य नव्हता, म्हणून यज्ञविध्वंसापर्यंत पाळी आली असावी.
रुद्र हा सुंदर, नित्य तरुण, सशक्त, सुरेख हनुवटीचा, तेजस्वी, लाल-गोरा असा आहे(ऋ. १।३३।५, १०). त्याची कांति व गात्रे सोन्यासारखी देदीप्यमान आहेत. सूर्यासारखा व हिरण्यासारखा तो चमकतो. तो मेघपती आहे. तो सुशिप्र व बभ्रु आहे. तो लहरी, भयंकर, पशुपालक, रोगकारक आहे. तो वनांचा पती, चोरांचा नायक, तस्करांचा नेता आहे. थोडक्यात हा सर्व मानवी गुणावगुणांनी युक्त असा आर्य आणि अनार्य असा दोघांचा देव आहे. --वाचक्नवी
अफाट
आपले वाचन व माहीती अफाट आहे.
आपली माहिती वाचून, अर्धवट ज्ञानावर गमज्या मारणारे मुर्ख गुंडोपंत स्तिमित राहून जातात.
आता मी परत परत आणी परत एकदा विनंती करतो की आपले ही ज्ञान जालावर नक्की येवू देत!
आपण दिलेला रुद्रावरचा प्रतिसाद थोडाफार बदलला तर तो एका रुद्रावरील एका लघु लेखाच्या लायक नक्कीच आहे.
आशा आहे आपण माझे म्हणणे मनावर घ्याल.
आपला
लेखनाभीलाषी
गुंडोपंत
भारतवंश
मला आतापर्यंत फक्त सहाच भारतवंश माहित होते:
भारतवंश सहाच. बाकी त्याचे उपवंश.
मोंगोलॉइडचे उपवंश: (१) पुरा मोंगोलॉइड(Palaeomongoloid ?)(अ)लंबकपाली(म्हणजे सेफॅलिक इन्डेक्स कमी असणारे ?)-उंच डोक्याचे.(आ) पृथुकपाली[ पृथु म्हणजे रुंद. कुंतीचे एक नाव पृथा. ती असामान्य सौंदर्याची पुतळी असली तरी बुटकी आणि रुंद(पक्षीं - लठ्ठ) होती, पृथ्वीसारखी); कपाल म्हणजे कवटी.]--सेफॅलिक इंडेक्स जास्त असणारे, म्हणजे रुंद डोक्याचे. म्हणजे बहुधा Brachycephalic.] (२). तिबेटी मोंगोलॉइड.
भूमध्य समुद्रीय चे उपवंश: (१) पुरा(Proto ?)-भूमध्य समुद्रीय. (२) भूमध्य समुद्रीय (३) तथाकथित प्राच्य भूमध्यसमुद्रीय.
पश्चिमी पृथुकपाली चे उपवंश: (१)अल्पिनाइड(२)दिनारिक(३)आर्मेनाइड.
लंबकपाली मोंगोलॉइड हे आसाम व भारत-ब्रह्मदेश सरहद्दीवरचे मूळवासी. पृथुकपाली चितगावच्या डोंगरातले व ब्रह्मदेशातले मागासलेले वर्ग. तिबेटी मोंगोलॉइड तिबेटमधून आले.
सर्व भूमध्यसमुद्रीय लंबकपाली. त्यातले पुरा-मध्यम उंचीचे, काळे व किरकोळ बांध्याचे. ह्यांची वस्ती कर्नाटक, तामिळनाडु व केरळात. खरे भूमध्यसमुद्रीय म्हणजे युरोपीय. त्यांची वस्ती पंजाबात व गंगेच्या वरच्या भागात झाली. हे आर्यपूर्व सुसंस्कृत द्राविडजन. आर्यांच्या आक्रमणानंतर त्यांनी आर्यभाषा अंगीकारली.
प्राच्य भूसमुद्रीय गट गोरटेला, उंच व लांब नाकाचा. ह्यांची वस्ती सिंध, राजस्थान व उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात.
पृथुकपाली असे पूर्व, पश्चिम, दक्षिणेला विखुरण्याचे कारण काय असावे? (हा सहज प्रश्न मनात आला)
आर्यांच्या आक्रमणानंतर मूळ उत्तरेला वस्ती करून राहिलेले भूमध्य समुद्रीयांपैकी काही दक्षिणेला गेले असले पाहिजेत. --वाचक्नवी
»
कपाल
वरील प्रतिसादात आलेला शब्द 'कपाल' म्हणजे कवटी, कपाळ नाही. हे लक्षात आलेच असेल.--वाचक्नवी
सहमत आहे..
महाभारत व्यासांनी गणपतीला लिहायला सांगितले त्यावर काही तज्ज्ञांचे म्हणणे असे की एखाद्या गणाधिशाला (गण+अधिपतीला) ते लिहायला सांगितले असावे... शिवनंदन पार्वतीसुताला नाही
सहमत आहे! किंबहुना 'मी गणपतीला लिहायला सांगितले व त्याने ते लिहिले' ही खुद्द व्यासांनीच मारलेली एक थाप आहे अशी माझी माहिती आहे!
असो, या बद्दलचे माझे विस्तृत मत इथे वाचता येईल! सदर लेखात चर्चाप्रस्ताविकेनेही मत दिले आहे! :)
आपला,
(गणेशभक्त) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!