निळ्या काचेचे पेन

कोणतेही पूर्वगृह, कोणत्याही निष्ठा, कोणतेही अहंकार (धार्मिक कार्यक्रमात जानव्यातली लोखंडी किल्ली बाजूला काढून ठेवतात त्याप्रमाणे - जी. ए. ) बाजूला ठेवून वाचकांनी 'निळ्या काचेचे पेन' या चौकस यांच्या कथेचे भाग http://www.manogat.com/node/11514http://www.manogat.com/node/11516 वाचावेत. माहितीजालावर यापेक्षा वरच्या दर्जाचे साहित्य सहसा वाचायला मिळत नाही.
संपादक महाशयः माझे हे लिखाण विशिष्ट कालावधीनंतर काढून टाकले तरी चालेल.

Comments

माझं मत..

राव साहेब,

आपल्यासारख्या चोखंदळ वाचकाने/लेखकाने रेकमेन्ड केले म्हणून मुद्दामून आत्ताच 'तिकडे' जाऊन दोन्ही भाग वाचले.

कथेतले अनेक प्रसंग, त्यातल्या वर्णनात्मक बारकाव्यांमुळे चांगले वाटतात. काही काही बारकावे लेखकाने खरंच खूप छान टिपले आहेत.

पण दीड भाग नुसती अगळपघळ वर्णनं वाचायला थोडेसे बोअर होऊ लागले. कोड, त्याचाशी निगडीत सामाजिक, कौटूंबिक (हो, कौटूंबिक सुद्धा!) अवहेलना ही वास्तविक या कथेची 'punch theme!' माझ्या मते ही अधिक प्रभावीपणे लोकांसमोर यायला हवी होती. परंतु पहिला दीड भाग केवळ वर्णनातच खर्ची पडल्यामुळे थोडेसे बोअर तर व्हायला लगले होतेच आणि शेवटच्या अर्ध्या भागातील 'पंच थीम' चा म्हणावा तसा परिणाम एक वाचक म्हणून माझ्यावर तरी झाला नाही!

असो, चौकसरावांना पुढील लेखनाकरता अनेक शुभेच्छा!

आपला,
(वाचक) तात्या.

अवांतर -

>>माहितीजालावर यापेक्षा वरच्या दर्जाचे साहित्य सहसा वाचायला मिळत नाही.<<

राव साहेब, आपली तोंडावर स्तुती करत नाहीये, परंतु आपलंच 'वर्तूळ' हे प्रकटन वरील कथेपेक्षा मला तरी खूप वरच्या दर्जाचे वाटले होते! असो..

असहमत

तात्यांच्या प्रतिसादाशी पूर्णपणे असहमत आहे. :)

दीड भाग अनावश्यक व रटाळ हे अजिबात पटले नाही. असे असेल तर महाभारताची बोळवण दोन घरातील भाऊबंदकीचा वाद या एका वाक्यात करता येईल. (इति. जीए)

आम्ही मागे म्हटल्याप्रमाणे "चांगल्या फक्कड जमलेल्या पानावर जर सामाजिक जाणीवेच्या चुन्याची कांडी धरली नाही तर प्रतिसादाच्या पिचकार्‍या कमी येतात" याची पुन्हा आठवण झाली.

या आधी प्रकाश संतांनी लंपनमध्ये व जी.ए. नी पिंगळावेळ मधील "कैरी" व कुसुमगुंजा मधील "लग्न" या दोन कथांमध्ये असे भावविश्व उभे केले होते. त्या लेखनाची सही सही आठवण होईल इतके चांगले आणि तरीही पूर्णपणे स्वतंत्र असे हे लेखन आहे.

त्याचाशी निगडीत सामाजिक, कौटूंबिक (हो, कौटूंबिक सुद्धा!) अवहेलना ही वास्तविक या कथेची 'punch theme!' माझ्या मते ही अधिक प्रभावीपणे लोकांसमोर यायला हवी होती.

यापेक्षा प्रभावी "लेखन" करणे अशक्य वाटते. सिनेमा केला तर वेगळी गोष्ट.

तात्यांनी पुन्हा एकदा वाचावे अशी नम्र विनंती.


आम्हाला येथे भेट द्या.

आवडले..

तात्यांनी पुन्हा एकदा वाचावे अशी नम्र विनंती.

पुन्हा एकदा वाचले तेव्हा आवडले. राव साहेबांनी दिलेल्या दुव्यावर जाऊन घाईघाईत वाचल्याने मळक्या पेनाचा रेफरन्स चटकन ध्यानात आला नाही. मळकं पेन धुवून घ्यायची पंचलाईन भारी आहे..

जियो चौकसराव..:)

आपला,
(वेंधळा) तात्या.

अम्म्ह

ती पंचलाईन आम्हाला आता समजली. आभार तात्या !
-- (बावळट आणि असमंजस) लिखाळ.

मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)

घाई,

अरे सकाळी सकाळी राव साहेबांनी रेकमेन्ड केल्यामुळे चौकसची कथा जरा घाईघाईतच वाचली आणि प्रतिसाद लिहिला. परंतु नंतर कर्णाच्या सांगण्यानुसार पुन्हा एकदा सवडीने वाचली व आवडली. अर्थात, काही वर्णनपर मजकूर (जरी वर्णन सुरेख आणि चित्रदर्शी असले तरी) अनावश्यक वाटते, त्यामुळे मूळ सुंदर कथा थोडीशी उगाचंच लांबली आहे असं माझं अजूनही मत आहे..

परंतु एकंदरीत चौकसराव उत्तमच लिहितात हे मात्र नक्कीच जाणवले.. या माणसाकडून खूप अपेक्षा आहेत..

तात्या.

सुंदर पण लांबली

काळजाला हात घालणारी कथा, पण काहीकाही चित्रदर्शी वर्णने जरा लांबली आहेत असे मलाही वाटले. त्या चित्रदर्शी वर्णानांतून आणि मूळ कथानकाच्या आजूबाजूच्या व्यक्तींचे चांगले रेखीव चित्रण वाचून येथे एक प्रभावी कादंबरीकार उमलतो आहे असे वाटले.

शिवाय लेखकाने एक कठिण शैली हाताळण्याचे ठरवले आहे - मला नीट समजले नाही की हा एका निरागस छोट्या मुलाचा दृष्टिकोन आहे ("प्रोपेसर का कायशा..."), की आता प्रौढ असलेल्या गोष्ट सांगणार्‍याची पूर्वीच्या निरागस दृष्टीची आठवण आहे (न्हाण्याबाबत "माझा संताप संताप होई"). जे काय आहे ते बरेच प्रभावी आहे. पण जितकी गोष्ट लांबली, तशी ही कसरत पेलणे लेखकाला नेहमी जमलेच, असे वाटले नाही.

म्हणून पुन्हा वाटले की कथेला थोडी कात्री लावली असती तर चालले असते.

छोट्या "मी"ला पेन धुण्याची काहीच गरज नव्हती, ही पंचलाईन खूपच भारी.

अवांतर..

राव साहेब,

कसा योगायोग आहे पाहा!

'आंतरजालीय साहित्यिक' या शीर्षकाचा एक लेख कालच लिहायला घेतला आहे. आज-उद्याकडे मिसळपाववर प्रकाशित करीन! :)

तात्या.

आम्हाला वाटले.

रावसाहेब,
आम्हाला वाटले आपण 'निळ्या काचेचे पेना'वर लिहिले.आता आपण सांगितले आहे म्हणून वाचतो पण तात्यांनी समिक्षा केली असल्यामुळे तिकडे जाऊन वाचण्याची घाई करत नाही.

>>माहितीजालावर यापेक्षा वरच्या दर्जाचे साहित्य सहसा वाचायला मिळत नाही.<<


बाय द वे रावसाहेब,आम्ही तिकडे मनोगतावर अनेक लेखन वाचले ,तरीही आम्हाला तुमच्या 'अक्का''वर्तुळ'आणि 'मरणा तुझा काय तेगार'
याच लेखांची आठवण होते आणि आमच्यासाठी तरी ते माहितीजालावरचे वरच्या दर्जाचे साहित्य आहे.

समिक्षक
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अप्रतिम

कथा वाचुन संपली तेव्हा एखादा चित्रपट पाहिल्याचा अनुभव देणारे जिवंत लेखन वाटले.

माहितीजालावर यापेक्षा वरच्या दर्जाचे साहित्य सहसा वाचायला मिळत नाही.

पटले.
----
मागे एकदा मनोगतावरच एक कथा अर्धी वाचून सोडावी लागली होती... नंतर कामाच्या रगाड्यात वाचायची विसरुनच गेलो होतो.. पण आता एकदम ती कथा आठवली... मनोगतावर शोधायचा खूप प्रयत्न केला तरी सापडली नाही.. कथा कोकणातल्याच एका गावात घडले आणि (बहुदा) विनोदी ढंगाची होती.. 'चौकस' की असेच काहितरी लेखकाचे नाव होते ह्यावरुन कुणाला काही आठवते का?

- ---सापडली ती कथा. 'चौकस' ह्यांचीच आहे भुरकुंडीचे शहाणे.. आता पुन्हा वाचत आहे.. रावसाहेब आपले आभार!

माझे प्रामाणीक मत

>>कोणतेही पूर्वगृह, कोणत्याही निष्ठा, कोणतेही अहंकार बाजूला ठेवून

हो हे सगळे करून मी वाचले. बरे आहे. जरा माझ्यासाठी लांबलचक वाटले, कमी शब्दात जमायला हरकत नव्हती. तसेच एका लहान मुलाचे कोणाशी असे नाते (ॠणानूबंध) जुळणे व त्या व्यक्तीची काहीतरी सॅडस्टोरी होणे हा काही नवीन प्रकार नाही. कदाचीत त्या जयूताइला कोड झाला नसता तर झाली असती का स्टोरी? झाली असती म्हणा बाईवर संकटे आणणे ("१") प्रत्यक्ष जीवनात सहज शक्य आहे तर लेखनात म्हणजे लेखकाने कथेतल्या बाईवर संकटे आणणे व लोकांची सहानूभूती घेणे तर एकदमच सोपे.
माफ करा दुवा देऊ शकत नाही पण तसे काहीतरी आधी कूठे तरी वाचले आहे, कदाचीत मराठीत नसेल दुसर्‍या भाषेत असेल.

असो कदाचीत विषय माझ्या आवडीचा नसेल, ही मानसीकता मला तेवढी ओळखीची नाही म्हणजे गेल्या काही पिढ्या माझ्या घरातील समंजसपणा, मनाचे मोठेपण, तशी शिकवण, सारासार विचार करावयास अनूकूल, आजुबाजूचे पुरोगामी , वैज्ञानीक दृष्टीकोन असलेले वातावरण. मुख्य म्हणजे बर्‍यापैकी पूर्णपणे शहरी वास्तव्य. असो.

लेखकाने अजून लेखन करत रहावे. त्यांच्य प्रतीभेचे, प्रयत्नांचे कौतूक आहे. आता लक्षात ठेवून श्री. चौकस यांचे लिखाण वाचीन व माझे प्रामाणीक मत देइन. सन्जोप राव यांच्या "यापेक्षा वरच्या दर्जाचे साहित्य सहसा वाचायला मिळत नाही"ह्या वाक्याशी असहमत. असो एखाद्याची आवड-निवड समजून सोडून द्या.

कदाचीत "फुलपाखरी अश्रूपातक वर्गः"(**आधीक माहीती साठी संजोपराव देखील सांगू शकतील म्हणा त्यांचा ह्या विषयातील अभ्यास, व्यंग सॉरी व्यासंग जास्त आहे) अश्या अभीरूचीवाल्यांना आवडेल असे लेखन आहे असे मला वाटते.

टीप - मला ही कथा आवडली नाही म्हणून माझ्या ह्या पुढील प्रतीसादांना "कोणतेही पूर्वगृह, कोणत्याही निष्ठा, कोणतेही अहंकार बाजूला ठेवून" माझे प्रामाणीक मत, समजून पहा. ही वाचकांना विनंती. निदान माझ्या सारख्याला कूठल्यातरी वरील दुव्याप्रमाणे वाचकवर्गीकरणात फीट करून टाकू नका. फारतर भटका विमुक्त वाचक समजा ज्याला मूडप्रमाणे एखादे दिवशी काही तरी भावते, कधी त्याचा कंटाळा पण येऊ शकतो पण काय ग्रहण करावे किंवा काय नाही हे तरी नक्की समजता येते.
"१" - (वर्तमानपत्र वाचून / कधीतरी मालीका बघून हा मला वैयक्तीक अनूभव नाही ;-))

सॉरी खूपच शब्द वापरले मी असे वाटते. आटोपतो.

हा हा हा! :)

"(**आधीक माहीती साठी संजोपराव देखील सांगू शकतील म्हणा त्यांचा ह्या विषयातील अभ्यास, व्यंग सॉरी व्यासंग जास्त आहे

राव साहेबांच्या वरील प्रतिसादातील 'फुलपाखरी अश्रूपातक वर्गः' हा उतारा बाकी सहीच आहे! :)

आपला,
(सुरवंट!) तात्या.

कथा वाचली एकदा नव्हे दोनदा !


चौकस यांची कथा वाचली अतिशय काळजीपूर्वक वाचली. कथा सुंदर आहे,लेखनाची शैली दर्जेदार लेखकाची आहे.कथा जरा लांबते पण निखीलची निरागसता,आणि शेवट चटका लावतो इतकेच या कथेचे वैशिष्टे. मात्र जालावर या पेक्षा दर्जेदार साहित्य वाचायला मिळत नाही अशी विधाने वाचकाच्या आवडीवर निवडी वरयेत राहतात पण तेही एका उत्तम लेखकाने अशी विधाने करावीत याचेच राहून राहून आश्चर्य वाटते आहे.

अवांतर :) कथा प्रकार आणि काही कथा तेही जालावर(अनुदिन्यासहीत) पुन्हा पुन्हा वाचाव्या लागतील आणि मग बुध्यांक वाढला की,दर्जेदार कथा म्हणजे कशा असतात याचा आम्हाला बोध होईल असे वाटते. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशयोक्ती

गोष्ट ठीकठाक आहे.

माहितीजालावर यापेक्षा वरच्या दर्जाचे साहित्य सहसा वाचायला मिळत नाही.

काहीतरीच... उलट माहितीजालावर कोणीही कोणालाही उठून कोणतेही सर्टीफिकिट वाटत फिरत असतो.

- राजीव.

सुंदर गोष्ट

रावसाहेब,
एका सुंदर लेखनाकडे लक्ष वेधल्याबद्दल आभार. कथा, वातावरणनिर्मिती सुंदर आहे. चौकस यांचे इतर लेख सुद्धा मस्त असतात.
महाजालावरील उत्तम लेखांमधील एक हे नक्कीच.
--लिखाळ.

गणपती बाप्पा मोरया !

करुण की तरुण

या चर्चेवरून आजच्या लोकसत्तेतील लोकमानसमध्ये प्रसिद्ध झालेले हे एका वाचकाचे पत्र आठवले. हा हा...

बोला गणपती बाप्पा मोरया. :))


आम्हाला येथे भेट द्या.

हसून हसून दमलो :)

''मालवू टाक दीप' हे असेच एक शृंगारिका गीत वीज भारनियमनाच्या काळात लिहिले असून प्रेम करतांन उगाच ढणढण विजेचे दिवे जाळल्याने इन्व्हर्टरची बॅटरी डिसचार्ज होते म्हणून नायिका नायकाला दिवे विझविण्यास सांगते आहे''

हाहाहा :)))
कवितेचा ख-या अर्थाने आस्वाद घेणा-या आणि विचार करायला लावणा-या उज्जवला रानडे यांची भुमिका आवडली आणि कवितेचा भावार्थ आम्हा उपक्रमींना उपलबध्द करुन दिल्याबद्दल आजानुकर्ण यांचे आभार मानतो. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजुनि रुसुन आहे...

कवी अनिल यांची ही कविता (कुमार गंधर्वांनी गायलेली) त्यांच्या मृत पत्नीला उद्देशून लिहिलेली आहे, असे ऐकले होते. अर्थात सांगणारी व्यक्ती अधिकारी असल्याने, ते खरे असावे.

भलताच अर्थ काढला आहे.

अवधूत गुप्तेंनी भलताच अर्थ काढला आहे. ती सरळ सरळ शृंगारिक कविता आहे.

हृदयनाथांची पुस्ती

सारेगमप- महाराष्ट्राचा आजचा आवाजमध्ये मधुरा दातार हिने गायलेल्या या गाण्याबाबत मत व्यक्त करताना हृदयनाथांनी वरील मत ग्राह्य आहे असे सांगितल्याचे दिसते. "सुरेश भटांशी झालेल्या चर्चेत त्यांनीही ही कविता शृंगारिक आहे असे म्हटले व त्याच अनुषंगाने मी इतकी शृंगारिक चाल लावली आहे" असे हेच्च मंगेशरावांनी म्हटले आहे. अधिक माहितीसाठी सोमवार-मंगळवारी झालेल्या सारेगमपच्या ध्वनिफिती यूट्यूबवर शोधून पहाव्यात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अतिशय उत्तम

निळ्या काचेचे पान खरोखरच फारच उत्तम आहे. चौकसांचे लिखाण खरेच फार चांगले असते. इंटरनेटवर असे लेखन फारसे वाचायला मिळत नाही.

 
^ वर