तुम्ही उपक्रमावर का येता ?

कुठल्याही संकेतस्थळचालकाने आपले सदस्य आपल्या स्थळावर का येतात, ह्याविषयी ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. माझ्यासारख्या भोचक (:-) माणसाला देखील ह्याविषयी ज्ञान असणे आवश्यक वाटते (लेखकाने आपला वाचक वर्ग आपल्याला का लाभलेला आहे, ह्याचा विचार करण्याची गरज आहे.) उपक्रमावर नियमीत लेखन करणार्‍या लेखकांनी आजवर हा प्रश्न उपस्थित केलेला नाही ह्याचेही आश्चर्य वाटते.
प्रश्न असा: तुम्ही उपक्रम ह्या संकेतस्थळावर का येता ?

माझे उत्तर असे:

१. इतर संकेतस्थळांवर झालेल्या ओळखी (माझ्या मराठीबद्दल कार्यात) महत्वाच्या वाटतात म्हणून.
२. सर्वच ज्ञानशाखांमध्ये मला पुरेसे ज्ञान नाही, परंतु ज्यांना हे ज्ञान आहे त्यांची ओळख व्हावी म्हणून.
३. इतर संकेतस्थळांची धोरणे समाधानकारक वाटत नाही म्हणून.
४. मराठीत जशा प्रकारचे साहित्य वाढावे असे माझे मत आहे, तशा प्रकारचे साहित्य येथे वाढीला लागलेले आहे हे दिसते म्हणून.

ही झाली माझी उत्तरे.

तुमचे उत्तर जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे. कृपया सहकार्य करावे.

धन्यवाद.

१ आणि २

पर्याय १ आणि २ असावे माझ्याबाबतीत..

पर्याय ४ का नाही?

पर्याय तीन नसणे मी समजू शकतो. ललित लेखन करण्यासाठी उपक्रमाची धोरणे युक्त नाही म्हणुन.
पण पर्याय ४ का नाही ?

इतर प्रतिसादकांना विनंती की वरील चार पर्याय मी माझ्या मतानुसार दिलेले आहेत. ह्या चारच पर्यायांपैकी एक अथवा अधिक निवडण्याची गरज नाही. आपली मनात येतील तशी कारणे द्यावीत.
मराठी संकेतस्थळांवर लोक का येतात, ह्याची चाचपणी करणे, हा हेतू आहे.

- मिलिंद

(ता. क. प्रशासकीय अनुमतीतून बाहेर पडला तर हाच चर्चा प्रस्ताव दुसर्‍या संकेतस्थळावर देखील येईल.)

पर्याय ४

सध्या अंशतः आहे. पूर्णपणे नाही.

धन्यवाद

हे 'अंशतः' 'पूर्णपणे' मध्ये रुपांतरित व्हावे ह्यासाठी काय करावे, ह्याबद्दल विचारमंथन हवे.

धन्यवाद.

- मिलिंद

टाईमपास..

आम्ही उपक्रमावर मुख्यत्वेकरून टाईमपास म्हणून येतो. चार घटका जरा बरा वेळ जातो. लोकांनी लोहिलेलं वाचता येतं, स्वतःला काही लिहायचं असेल तर लिहिता येतं.

उपक्रमावर येण्यात आमचा 'चार चांगले जीवभावाचे मित्रमैत्रिणी मिळतील' हा स्वार्थही आहे! ;)

तात्या.

इतर संकेतस्थळांशी तुलना ?

तात्या,

आपले ह्या स्थळावर येण्याचे उद्देश उपक्रमाच्या आयुष्यातल्या पहिल्या आठवड्यातच आम्हाला स्वच्छ कळले होते. त्यांना अधिकृत स्वरूप दिल्याबद्दल आभारी आहे.
पण इतर काही संकेतस्थळांवरदेखील हे उद्देश साध्य (अचिव्ह) करता येतील.

(उदाहरणार्थः
उद्देशः माझे साहित्य अनेकांनी वाचावे. स्थळः माझी अनुदिनी
उद्देशः माझ्या मुद्द्यांवर अनेकांनी आपापली वेडीवाकडी, काहीही पुरावे नसणारी मते व्यक्त करावी. स्थळः मनोगत
उद्देशः माझ्या मुद्द्यांवर अनेकांनी त्याविषयी काहीही संबंध नसलेले लिखाण लिहावे. स्थळः मायबोली
)

आपण ह्याच स्थळावर का येता, ही कारणे हवी आहेत.

कृपया सहकार्य करावे, ही विनंती.

- मिलिंद

टाईमपास, धमाल, मजामस्ती! ;)

पण इतर काही संकेतस्थळांवरदेखील हे उद्देश साध्य (अचिव्ह) करता येतील.

हो, येतील ना. मग तिकडे जाऊ का?

आपण ह्याच स्थळावर का येता, ही कारणे हवी आहेत.

नाय देत, जा! ;)

अरे बाबा मिलिंदा, तुला सांगितलं ना एकदा, मी फक्त उपक्रमच नव्हे, तर कुठल्याही मराठी संकेतस्थळावर फक्त,

टाईमपास म्हणून येतो. चार घटका जरा बरा वेळ जातो. लोकांनी लिहिलेलं वाचता येतं, स्वतःला काही लिहायचं असेल तर लिहिता येतं, म्हणून येतो. शिवाय 'चार चांगले जीवभावाचे मित्रमैत्रिणी मिळतात म्हणूनही येतो.

सहसा कुठल्याही मराठी संकेतस्थळावर मी फक्त वर उल्लेखलेल्या कारणांकरताच जातो.

आपला,
(मराठी संकेतस्थळांकडे केवळ विरंगुळ्याचे आणि टाईमपासचे साधन म्हणून बघणारा!) तात्या.

अवांतर-

मागे एकदा एका मराठी संकेतस्थळावर मी एक छानशी पोरगीदेखील पटवली होती. आमची अगदी छान गट्टीही जमली होती. काही दिवस तिच्याबरोबर मस्तपैकी धमाल, मजामस्ती केली! आता हा मला संकेतस्थळावर येण्याचा फायदा झाला, की तोटा, की आणखी काही, ते तूच ठरव बाबा मिलिंदा! ;)

आपला,
(छंदीफंदी!) तात्या.

यासाठी

दुसरे एक मरणपंथाला लागलेले मराठी संकेतस्थळ, त्याच्या प्रशासकांचा उर्मटपणा, त्यांचे कठोर अनुशासन, त्यांच्या पार्श्वभागावर उपक्रमाने केलेला खणखणीत लत्ताप्रहार, त्या दुसर्‍या संकेतस्थळाच्या हुकुमशाहीबद्दल इथल्या माननीय सदस्यांचे बहूमूल्य विचार - थोडक्यात आतापर्यंत एकाच सदस्याच्या अनुदिनीवर वाचायला मिळणारी शिव्यागाळ - आता उपक्रमवरही अव्याहतपणे सुरू असल्याने त्यासाठी येतो. तसेच त्या संकेतस्थळावरील वाद विवाद इथे आणून त्याचे वादापेक्षा वैयक्तिक टिंगल टवाळी - कुचाळकी मध्ये रूपांतर केले ते वाचायला येतो. ज्ञानेश्वरांसारख्या महान संतांनाही यातून वगळले नाही हे पाहून उपक्रम बरीच मोठी झेप घेणार अशी खात्री झाली आहे.

दर्जेदार - माहितीपूर्ण असे लेखन इथे फार झाले नाही तेव्हा त्यासाठी यायचा प्रश्न नाही.

थोड्याच वेळात त्याचाही कंटाळा येईल तेव्हा उपक्रम सोडून देईन.

विनायक

हे बदलण्यासाठी काय करावे ?

विनायककाका,

आपण कदाचित वरील कारणांसाठी येथे येत असाल, परंतु सर्वच सदस्य ह्याच कारणासाठी येत नसावे असे मला वाटते. त्यांनी फक्त ह्याच कारणासाठी येथे यावे, असे आपल्याला वाटते का? मलातरी वाटत नाही. परंतु हे उद्देश खरे असतील, तर हे बदलण्यासाठी आपल्यासारख्या ज्येष्ठ सदस्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे. हे बदलण्यासाठी काय करावे ? प्रशासकीय धोरणे कशी असावीत ? लोकांचा मराठी संकेतस्थळावर येण्याचा उत्साह चिरडून न टाकता दर्जेदार लिखाण येथे व्हावे, हे करण्यासाठी काय करावे ?

=मिलिंद

सहमत आहे

विनायकराव,

तुमच्याशी बराचसा सहमत आहे.

तथ्य मांडावे पण इतर कुठल्याही संकेतस्थळाबद्दल, संकेतस्थळाच्या चालकाबद्दल अनुद्गार नकोत. तसेच वैयक्तिक टिंगलटवाळी-कुचाळकी उपक्रमावरही अव्याहतपणे चालू आहेत, ह्याचे वाईट वाटते. ज्यांना आपले मानले त्यांनी असे करावे? असो. थोडे काही आपल्याविरुद्ध गेले की लगेच पिसाळणारी ही माणसे मैत्रीच्या लायकीची नाहीत. हे अतिरेकी आहेत. स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन वातावरण बिघडवणारे. असो.

सर्किटराव, मी ललितलेखन, कथा, कविता वाचायला इथे येत नाही.

चित्तरंजन

अतिरेकी

चित्तरंजन,

अतिरेकी लोक वर्षभर आपल्या विरोधी विचारांच्या लोकांना आपले विचार पटवण्यासाठी विरोप करत नाहीत. अतिरेकी लोक आपले म्हणणे पटवून देण्यासाठी स्वतःचा वेळ खर्च करून विदा गोळा करीत नाहीत.

धन्यवाद.

- मिलिंद

आपणांस

मी प्रतिसादात नमूद केलेल्या प्रकारचा अतिरेकी समजत नाही.:) आपल्या कळकळीबद्दल दुमत नाही. कृपया गैरसमज नसावा.

:-) :-)

प्रतिसादात नमूद केलेल्या प्रकारचा अतिरेकी

आपली शब्द योजना आवडली.
म्हणजे तशा प्रकारचा नाही, पण इतर प्रकारचा अतिरेकी नाहीच असे नाही :-)
चतुर आहात ;-)

- मिलिंद

विनायकराव

दुसरे एक मरणपंथाला लागलेले मराठी संकेतस्थळ,

अनावश्यक, व्यक्तिगत रोख असणारा मजकूर काढून टाकण्यात आला आहे - उपक्रम
त्याच्या प्रशासकांचा उर्मटपणा, त्यांचे कठोर अनुशासन, त्यांच्या पार्श्वभागावर उपक्रमाने केलेला खणखणीत लत्ताप्रहार,

अनावश्यक, व्यक्तिगत रोख असणारा प्रतिसाद अप्रकाशित करण्यात आला आहे - उपक्रम

त्या दुसर्‍या संकेतस्थळाच्या हुकुमशाहीबद्दल इथल्या माननीय सदस्यांचे बहूमूल्य विचार - थोडक्यात आतापर्यंत एकाच सदस्याच्या अनुदिनीवर वाचायला मिळणारी शिव्यागाळ - आता उपक्रमवरही अव्याहतपणे सुरू असल्याने त्यासाठी येतो.

लोकशाहीत प्रत्येकास स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे विनायकराव. तिथे गळचेपी होत असेल तर म्हणणे मांडणार कुठे?

तसेच त्या संकेतस्थळावरील वाद विवाद इथे आणून त्याचे वादापेक्षा वैयक्तिक टिंगल टवाळी - कुचाळकी मध्ये रूपांतर केले ते वाचायला येतो.

अनावश्यक, व्यक्तिगत रोख असणारा प्रतिसाद अप्रकाशित करण्यात आला आहे - उपक्रम

ज्ञानेश्वरांसारख्या महान संतांनाही यातून वगळले नाही हे पाहून उपक्रम बरीच मोठी झेप घेणार अशी खात्री झाली आहे.

हा मुद्दा स्पष्ट झालेला नाही. तुम्ही धोरणांबद्दल बोलत असाल तर त्यास ही गोष्ठ लागू होत नाही. संपादकांनी काव्य साहित्य हे या संकेतस्थळावर त्याज्य ठरविले असेल तर तो धोरणांचा भाग होतो, ज्ञानेश्वरांच्या अपमानाचा नाही. कृपया आपले म्हणणे स्पष्ट करावे.

दर्जेदार - माहितीपूर्ण असे लेखन इथे फार झाले नाही तेव्हा त्यासाठी यायचा प्रश्न नाही.

नुकतेच जन्मलेले हे मूल आत्ता कुठे बाळसं धरू लागलाय. त्याला वाढायला जरा वेळ द्याल की नाही?

थोड्याच वेळात त्याचाही कंटाळा येईल तेव्हा उपक्रम सोडून देईन.

हा लोकशाही स्वातंत्र्याचा भाग. शेवटी माहेर ते माहेरचं. भाऊ कितीही उर्मटपणे वागला तरी तेच प्रिय असतं.

आपला,
(तौलनिक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

दर्जेदार!

दर्जेदार - माहितीपूर्ण असे लेखन इथे फार झाले नाही तेव्हा त्यासाठी यायचा प्रश्न नाही.

विनायकराव,

जमलं तर इथे येत रहा, हा आपल्याला सल्ला. इथे आपल्याला दर्जेदार लेखनही अवश्य वाचायला मिळेल. येथील काही सभासद येथे दर्जेदार लेखन करण्यास आणि हे संकेतस्थळ त्यांच्यापरीने यशस्वी करण्यास समर्थ आहेत!

धन्यवाद!

आपला,
तात्या अभ्यंकर,
उपक्रमी सभासद.

पर्याय २

पर्याय २ हाच हेतु!
खरं तरं आता मत मांडायची भीतीच वाटते !!
इथे कधी कुणाची मनं दुखावली जातील याचा काही नेम नाही !!!

(घाबरलेला ) रम्या

माझी उत्तरे

१. मला मराठी भाषा वापरून माझी मते व्यक्त करायला आवडतात. उपक्रम हे चांगले व्यासपीठ वाटते म्हणून..
२. इतर ठिकाणी काही सदस्यांनी केलेला गैरवापर येथे निदान सुरूवातीला तरी असणार नाही या अपेक्षेने..
३. समुदाय आणि खरडवही सारखे प्रयोग आवडले म्हणून..
४. येथे तांत्रिक गोष्टींची चर्चा, माहितीची देवाण घेवाण होताना दिसते, मला ते शिकण्यात रस वाटतो म्हणून..
५. सर्वात महत्वाचे - मराठी भाषा जपण्यात अश्या संकेतस्थळांचा मोठा हातभार असणार आहे. अशी संकेतस्थळ तयार करणारे तंत्रज्ञांचे कौतुक वाटते अन काही प्रमाणात आपला सुद्धा हातभार लागतो म्हणून..
६. असे प्रयोग करून हे तंत्रज्ञान तळागाळा पर्यंत जावे असे वाटते, सुरूवात आपल्या पासून व्हावी म्हणून...

तरी पण काही गोष्टी खटकतात (पण आत्ता त्याकडे दुर्लक्ष करतो आहे.) त्या सांगेन कदाचित तुम्ही तसा प्रश्न विचारलात तर...

मी येतो...

नमस्कार,

मी येथे येतो त्याला कारन हे की येथे मराठीत वाचायला, बोलायला आणि आपली अक्कल पाजळायला मिळते. येथे आल्यानंतर आमचा आविर्भाव आम्हाला सुर्याखालील प्रत्येक विषयावर बोलण्याचा हक्क असल्याचा असतो. येथे या स्वातंत्र्याचा पुरेपुर लाभ उठवता येतो.

खरं तर मराठीत अशी झकास मराठीतून चर्चा करण्याची सवय लावनार्‍या संकेतस्थळाने माझ्या सवयी बिघडवल्या, असे माझे मनोगत आहे. ते संकेतस्थळ मराठी संकेतस्थळांच्या वाटचालीतील एक् मैलाचा दगड आहे आणि माझे त्यावर आजही प्रेम आहे. मला ते आवडते, त्यामुळे तेथे हे नाही आणि नेमके 'तेच' येथे आहे असं कुठलंही कारण माझ्या येथे येण्यामागे नाही.

तरीही मी येथे असतो, माझे तेथील मित्र येथे आहेत. त्यांच्याशी संवाद साधायला येथे येतो.

येथे आल्यापासून मला तांत्रीक (संगणकीय) विषयावर मार्गदर्शन करणारे मित्र मिळाले, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला.

बाकी सर्व तसेच आहे जसे तेथे गेली काही वर्षे मी अनुभवतो आहे. त्यामुळे ज्यासाठी तेथे जातो त्याच साठी येथे येतो आणि माझे शब्दवर ही जातो, कदाचित पुढे मिसळपावाची मुक्त बरसात झाली तर तेथेही जाऊ, माझ्या सगळ्या लेखक मित्रांच्या अनुदिनीवरही मी जातोच.

एवढं मात्र नक्की की उपक्रम सुंदर आहे स्वच्छ आहे. येथे इतर जागची उणीदूनी काढू नये. येथे करण्यासारखे खुप काही आहे.
('नेहमी सारख्या शुध्दलेखनाच्या चुका मान्य आहेत'- ह्याची स्वाक्षरी करावी की काय असा विचार् चालु आहे.)

नीलकांत

छान

नीलकांत,

आपले उत्तर आवडले. हल्लीच सदस्यसंख्येवरून संकेतस्थळांची किम्मत ठरवण्याच्या जागतिक पद्धतीचे समर्थन करणार्‍या माझ्या एका लेखावर "फक्त संख्या हा निकष नसावा, संकेतस्थळाची प्रत बघायला हवी" अशी टीका झाली. क्वांटिटेटिव्ह नव्हे तर क्वालिटेटिव्ह निकष असावे, असे मत व्यक्त झाले, त्यामुळे हा विदा गोळा करण्याचा अशा चर्चेव्यतिरीक्त मला दुसरा उपाय आढळला नाही. पण अशा चर्चेतही काही लोकांनी व्यक्तिगत आकस व्यक्त करावा, ह्याबद्दल खेद होतो. त्या पार्श्वभूमीवर आपले स्पष्ट मत आवडले.

धन्यवाद.

- मिलिंद

सहमत

मी येथे येतो त्याला कारन हे की येथे मराठीत वाचायला, बोलायला आणि आपली अक्कल पाजळायला मिळते. येथे आल्यानंतर आमचा आविर्भाव आम्हाला सुर्याखालील प्रत्येक विषयावर बोलण्याचा हक्क असल्याचा असतो. येथे या स्वातंत्र्याचा पुरेपुर लाभ उठवता येतो.

वा वा! १००% सहमत. प्रतिसाद फारच आवडला.

मी १,२,४ यासाठी येथे येते. फक्त ४ था मुद्दा

४. मराठीत जशा प्रकारचे साहित्य वाढावे असे माझे मत आहे, तशा प्रकारचे साहित्य येथे वाढीला लागावे म्हणून.

माझे मनोगत

१. मला मराठी भाषा वापरून माझी मते व्यक्त करायला आवडतात. उपक्रम हे चांगले व्यासपीठ वाटते म्हणून..

माझ्या दृष्टीने हे एकमेव कारण आहे. पण मी ज्या पद्धतीने माझी मते व्यक्त करतो त्या पद्धतींना इथे बंदी आहे. उदा: कविता, ललित.

तरीही सुरेश भट, मराठी शब्द(प्रसार, प्रचार) असेआवडीचे विषय असले की आपली मते द्यायला आणि त्यावर लोक् काय म्हणतात हे पहायला मी उपक्रमावर येतो.

जेव्हा उपक्रम सुरु झालं होतं तेव्हा आमचा असा गैरसमज होता की चला आता एक केंद्रीय(सेंट्रलाईज्ड) संकेतस्थळ सुरु झाला म्हणजे आपल्या इकडे तिकडे भटकावं लागणार नाही. सर्व काही एक छत्राखाली मिळेल. पण हे फोल ठरलं. असो. वर उल्लेखलेल्या कारणासाठी आम्ही इकडे येतच राहू. कुठलेही संकेतस्थळ सुरु करताना संकेतस्थळचालकाला वाचक काय् मागत आहेत आणि आपण वाचकांना काय देतोय हे माहीत असणं गरजेचं आहे.
सर्कीट ने तात्याला दिलेले उत्तर पहा:
तात्या,

आपले ह्या स्थळावर येण्याचे उद्देश उपक्रमाच्या आयुष्यातल्या पहिल्या आठवड्यातच आम्हाला स्वच्छ कळले होते. त्यांना अधिकृत स्वरूप दिल्याबद्दल आभारी आहे.
पण इतर काही संकेतस्थळांवरदेखील हे उद्देश साध्य (अचिव्ह) करता येतील.
.
.
आपण ह्याच स्थळावर का येता, ही कारणे हवी आहेत.

कृपया सहकार्य करावे, ही विनंती.

त्यांच्या उत्तरावरून सर्कीट यांचे तात्याशी भांडण वगैरे चालू आहे काय असा संशय येतो. आणि ह्या भांडणाच्या इतिहासाशी(मनोगत वगैरे) नव्याने उपक्रमात आलेल्या सदस्यांचा काडीमात्र संबंध नाही. आणि तो नसताना प्रत्येक लेख, विषय, चर्चा यामध्ये जुनी संकेतस्थळे आणि त्यावरच्या एकमेकांच्या ओळखीच्या सदस्यांच्या त्या संदर्भात प्रतिक्रिया अनावश्यक आहेतचे म्हणजे मागल्या पानावरून् पुढे किंवा ये रे माझ्या मागल्या असं चालू असल्यासारखं वाटतं. माहिती देणे घेणे वगैरे उद्देश असलेल्या स्थळावर विषयबाह्य चर्चा भरपूर होत आहेत.

(उदाहरणार्थः
उद्देशः माझे साहित्य अनेकांनी वाचावे. स्थळः माझी अनुदिनी
उद्देशः माझ्या मुद्द्यांवर अनेकांनी आपापली वेडीवाकडी, काहीही पुरावे नसणारी मते व्यक्त करावी. स्थळः मनोगत
उद्देशः माझ्या मुद्द्यांवर अनेकांनी त्याविषयी काहीही संबंध नसलेले लिखाण लिहावे. स्थळः मायबोली
)

अशा गोष्टी संवेदनशील मराठी वाचकाची मते प्रभावित करतात. दुसर्‍या संकेतस्थळावर जावे काय करावे काय करू नये. हे वायफळ सल्ले वाचण्यासाठी कोणी इथे येत नाही. वाचकांच्या सू़ज्ञतेचा अपमान करू नये. तेव्हा सर्वांनीच स्वतःच्या (क्रोध)भावनांवर संयम ठेवला तर बरे होईल.

सहमत/माफ करा

अशा गोष्टी संवेदनशील मराठी वाचकाची मते प्रभावित करतात. दुसर्‍या संकेतस्थळावर जावे काय करावे काय करू नये. हे वायफळ सल्ले वाचण्यासाठी कोणी इथे येत नाही.

आपल्याशी सहमत आहे. आमची प्रामाणिक मते इतर संवेदनशील वाचकांना प्रभावित करून ह्या संकेतस्थळापासून दूर करत असतील तर अशा मतांचे संपादन करण्यास संपादकांनी मागेपुढे पाहू नये. धन्यवाद.

- मिलिंद

ये रे माझ्या मागल्या

मागल्या पानावरून् पुढे किंवा ये रे माझ्या मागल्या असं चालू असल्यासारखं वाटतं.
असे व्हायला नको.

माझ्या मते, उपक्रमाची उद्दिष्ट्ये आधीच स्पष्ट करण्यात आली होती. कविता, कथा आणि ललितलेखन ह्यांना फाटा देण्यामागेही हीच उद्दिष्ट्ये आहेत, असे वाटते.

सहमत

अभिजितच्या मताशी पुर्णपणे सहमत

रम्या

मला वाटते...

जिथे जिथे मराठीतून माझ्या आवडीचे लिखाण वाचायला मिळते अशा सर्व संकेतस्थळांवर मी वावरतो. ही सगळीच संकेतस्थळे त्यांच्या विविध वैशिष्ठ्यांसह मला आवडतात. तसेच माझ्या सामान्य दर्जाच्या लिखाणालाही काही वाचक मिळतात(तेव्हढाच एक स्वार्थ) . जिथे चर्चा चालू असतात त्या ठिकाणी आपल्या मताची पींक टाकायला मिळते(भले कुणी ते गांभीर्याने घेवो अथवा न घेवो). असेच दिवसरात्र पींका टाकत आणि इतरांनी टाकलेल्या वाचताना वेळ फार मजेत जातो. नाहीतरी मी हे सगळे माझा वेळ मजेत जावा म्हणून करत असतो हे चतुर लोकांनी आतापर्यंत ओळखले असेलच.
अहो माझ्या सारख्याचेही काही म्हणणे असू शकते आणि ते ऐकवण्यासाठी ह्या संकेतस्थळांसारखे व्यासपीठ ज्या ज्या लोकांनी उपलब्ध करून दिलेय त्या सर्वांनी मला उपकृत करून ठेवलेय.
काही विद्वत्तापूर्ण आणि माहितीपूर्ण लेखन सोप्या मराठीत वाचायला मिळणे हा ह्या सर्व संकेतस्थळांचा अजून एक मोठा फायदा आहे. तसेच शिव्या,कुचाळक्या वगैरेंसारखे मसालेदार लेखनही वाचायला मिळते हे काय कमी आहे. थोडक्यात सर्वरसांनी परिपूर्ण असणार्‍या अशा संकेतस्थळांवर मनसोक्त वावरणे हा माझा एक परिपाठ बनून गेलाय.
तेव्हा ह्या सर्व संकेतस्थळांच्या निर्मात्यांचा,त्यावर आपापल्या कुवतीपणे लेखन-प्रतिसाद कर्त्यांचा मी सदैव ऋणी राहीन.

एक सामान्य प्रतिक्रिया

उपक्रमवर येणे आणि उपक्रमवर वारंवार येणे (पडीक असणे) ह्या दोन गोष्टी भिन्न असल्याने, मी उपक्रम वर का येतो या पेक्षा 'वारंवार का येतो 'ह्याचे उत्तर आधी देतो. उपक्रम अजुनतरी त्यांच्या उद्दिष्टाशी सुसंगत नसल्याने (थोरा मोठयांच्या जयंत्या मयंत्या झालच तर 'पाळणाघराच्या व्यथा' वगैरे प्रकार संपादकशाही मधून अजुनही टि़कून आहेत हा त्याचा पुरावा) मी उपक्रमवर वारंवार येतो. भविष्यात उपक्रम त्याच्या उद्दिष्टांशी सुसंगत झाले, तरीही येत राहीन परंतू वारंवारीतेत मात्र बराच फरक असेल. (कारण आठवड्यातून एक चक्कर मारण्याइतकीच 'माहिती' मला पुरेशी असते.)

कविता, ललित लेख ह्याना इथं स्थान नाही असं बजावताना ह्यासाठी सबब म्हणून बाकिच्या संकेत स्थळांचा पर्याय सुचवला जातो परंतु केवळ माहीतीपुर्ण लेखांसाठी देखिल मराठी विकी सारखे सुंदर स्थळ उपलब्ध असताना हा खटाटोप करण्याचे प्रयोजन काय ते समजले नाही!

मराठी विकीत

मराठी विकीत वाचकाचे प्रतिसाद आणि सहभाग त्याच्या नावासकट दिसतात का? मराठी विकीत थोडा ऍकडेमिक कोरडेपणा आहे, असे मला वाटते.

मराठी विकि वि. उपक्रम

केवळ माहीतीपुर्ण लेखांसाठी देखिल मराठी विकी सारखे सुंदर स्थळ उपलब्ध असताना हा खटाटोप करण्याचे प्रयोजन काय ते समजले नाही!

प्रयोजन काय ते लिहिण्यास माझा फारसा संबंध नाही ते उपक्रमांचे कार्य परंतु मराठी विकिवर करत असलेल्या बर्‍यापैकी लेखनावरून उपक्रम आणि मराठी विकित असलेले फरक सांगता येतील.

१. मराठी विकिची रचना चर्चा करण्यास उपयुक्त नाही. त्रासदायक प्रकार आहे. मराठीतील फार्शी सारखी चर्चा तेथे होणे कठिण (अशक्य नाही, कठिण) आहे.

२. तुम्ही केलेले लिखाण तुमच्या नावावर छापून येत नाही त्यामुळे त्यासंदर्भात एखाद्याने शंका विचारणे, आपले मत व्यक्त करणे, प्रतिसाद आणि प्रतिप्रतिसाद तेथे देता येत नाहीत. मराठी विकि बर्‍याच कालावधीपासून असूनही तेथील लिखाण विपुल नाही याचे हेच कारण असावे. (लेखाच्या नावे एक ओळ खरडण्याला लेख मानले जाऊ नये.)

३. तुम्ही केलेले लिखाण कोणीही उठून बदलू शकतो. याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. असे लिखाण पुनश्च संपादीत करावे लागते त्यासाठी तेथे जेमतेम ५ प्रबंधक आहेत. उदा. सांगायचे झाल्यास अप्सरा या माझ्या मूळ लेखात तेथे झालेले बदल वाचता येतील. त्यात गैर काहीच नाही परंतु एखाद्याला एखाद्या लेखाचे श्रेय हवे असल्यास ते तेथे मिळत नाही. एखादा उठून तोच लेख थोडे फार बदल करून स्वतःच्या नावावरही छापू शकतो कारण विकिची त्याला परवानगी आहे. एखादे अधिक उदा. म्हणजे चंगीझ खान या लेखात पुस्तकाचा संदर्भ दिला असता एका प्रभृतींनी घुसून 'गेंगीज खानचे' चंगीझ खान असे रुपांतर करून पुस्तकाचे नावच बदलून टाकले. फक्त ५ प्रबंधक असल्याने त्यांच्या डोक्यात अशा गोष्टी येतीलच असे नाही. (येथे निदान एकमेकांच्या लेखा-प्रतिसादांत इतर सदस्यांकडून ढवळाढवळ तर होत नाही. )

४. मराठी विकिवर लेखातून आपली वैयक्तिक मते मांडता येत नाहीत. उपक्रमावर त्याला बंदी असावी असे दिसले नाही.

केवळ वाचकांना दोहोंत फार फरक वाटेल किंवा वाटणार नाही. लेखकांना मात्र नक्कीच फरक आढळेल.

फरक

वरील सुविधांसठी उपक्रमाची निर्मिती झाली असेल तर ह्या सर्व सुविधा असणारे आणि माहितीपूर्ण लेखनास कसलीही आडकाठी नसणारे 'मनोगत.कॉम' नावाचे संकेत स्थळ चालू आहे. तेव्हा 'उपक्रम' चे प्रयोजन काय? हा प्रश्न तसाच रहातो... थोडक्यात बाहेर कुठं काय मिळतं ह्याचा उपक्रमाच्या उद्दिष्टांशी काहीही संबध नसावा इतकेच सुचवायचे होते. '

मराठी संकेतस्थळांवरील वावराचे वर्गीकरण

काय गंमत आहे पहा, आज सकाळीच 'मराठी संकेतस्थळावरील लोकांच्या वावरामागचे (वरकरणी आणि गुप्त ) हेतू' हा लेखविषय मला (साधारणतः लेखविषय ज्या ठिकाणी सुचतात त्या ठिकाणी ) सुचला होता. आता त्यावर स्वतंत्र लेख लिहिण्यापेक्षा प्रतिसादातच मला जे काही दिसले ते लिहितो.
संकेतस्थळावर वावरणार्‍या लोकांचे साधारणतः खालील गटांत वर्गीकरण करता येईल.
१. वितंड खाजशामक वर्गः काही ना काही कारणांनी नवनवीन वादविवाद उकरुन काढणे, त्यावर शिवराळ भाषेत मतप्रदर्शन करणे, आपल्यासारख्या समविचारी तंटाकंडी लोकांना एकत्र करुन आपल्याशी संबंधित असो किंवा नसो, एखाद्या विषयावर गजकर्णी चर्चा करुन वात आणणे आणि यावर मल्लीनाथी म्हणून 'भांडणे हा माझा मराठी बाणा' वगैरे म्हणून त्या संकेतस्थळाला एका सार्वजनिक विसर्जनगृहाचे स्वरूप आणणे ही व्यवच्छेदक लक्षणे असलेला हा वर्ग.
२.स्वयंघोषित आठ्याळ राखुंडे वर्गः स्वतःकडे संस्कृती, परंपरा, धर्म इत्यादिंची धुरा वहाण्याची जबाबदारी असल्याच्या आविर्भावात सतत रुक्ष विषयांवर लिहीत रहाणे. सभ्यता म्हणून लोकांनी नकारात्मक प्रतिसाद देणे टाळले तर त्याला वाचकांची संमती गृहित धरून एकामागोमाग एक लेखांचा मारा करत रहाणे. या वर्गाचा एक उपवर्ग म्हणजे (जी. एं. ची माफी मागून) 'पचक् पचक् मांगल्य वर्ग'. या वर्गाला जिथे तिथे पावित्र्याचे आणि मांगल्याचे सडे पडलेले दिसतात. 'होयबा सुगंधु म्हणे' हे या वर्गाचे ब्रीदवाक्य आहे.
३. फुलपाखरी अश्रूपातक वर्गः सातत्याने वात्सल्य, आईची माया, बालकाचे स्मितहास्य, फुलाच्या पाकळीवर पडलेले दवबिंदू असली वपुळलेली शब्दढास लागलेला हा वर्ग सारखी 'एका डोळ्यात आसू तर दुसर्‍या डोळ्यात हासू' असली बकवास करत असतो. कुणी जोड्याने मारले तरी 'पण् तो जोडा होता बाकी गाईच्या कातड्याचा. गोमाता!' असे गदगदून भावशिंकरणारे हे लोक आपला एक जबरस्त कंपू बनवून जिथेतिथे संवेदना, हळुवार कविमन असले बियाणे पेरत जात असतात. स्त्रीवर्गाला एकेरी संबोधण्याचे लायसन मिळालेला हा वर्ग 'तुला काय सांगू नीता, तुझी 'सकाळी रेल्वेलायनीशेजारी बसलेल्या बालकास' ही कविता वाचून मनाला आलेली अस्वस्थता अजून जात नाही गं' असली प्लास्टिकची वाक्ये लिहून जोरदार लोकप्रिय वगैरेही होऊन जातो.
४. अगम्य तंत्रज्ञान वर्ग: 'एक अक्षर कळू देईन तर शपथ' हा बाणा घेतलेला हा वर्ग सातत्याने तांत्रिक लिखाण करत असतो. लेखन जितक्या जास्त लोकांना कळेल तितका त्या लेखनाचा दर्जा हिणकस या न्यायाचे त्यांचे लिखाण सामान्य वाचकांच्या आकलनासाठी आहे की त्याचे थोबाड रंगवल्यासारखे करून जाणारे आहे हे कदाचित त्यांनाच कळेल.
यशिवाय मनोरंजन, माहिती देणे / मिळवणे, समाजाशी जोडलेले रहाणे या क्षुल्लक गोष्टींसाठीही काही लोक संकेतस्थळांवर येत असावेत, पण ते काही इतके महत्त्वाचे नाही!
सन्जोप राव

जबरदस्त प्रतिसाद

एखाद्या विषयावर गजकर्णी चर्चा करुन वात आणणे आणि यावर मल्लीनाथी म्हणून 'भांडणे हा माझा मराठी बाणा' वगैरे म्हणून त्या संकेतस्थळाला एका सार्वजनिक विसर्जनगृहाचे स्वरूप आणणे ही व्यवच्छेदक लक्षणे असलेला हा वर्ग.
हाहाहा.

'पचक् पचक् मांगल्य वर्ग'.
हाहहहहहह.

स्त्रीवर्गाला एकेरी संबोधण्याचे लायसन मिळालेला हा वर्ग 'तुला काय सांगू नीता, तुझी 'सकाळी रेल्वेलायनीशेजारी बसलेल्या बालकास' ही कविता वाचून मनाला आलेली अस्वस्थता अजून जात नाही गं' असली प्लास्टिकची वाक्ये लिहून जोरदार लोकप्रिय वगैरेही होऊन जातो.
हाहाहाहा

हहपुवा. काय लिहिले आहे. नवीन लिखाणापेक्षा लोकांना संकेतस्थळावर संकेतस्थळाबद्दलच्या चर्चेतच जास्त इंटरेस्ट असतो, असे दिसते.

जबरी

जबरी प्रतिसाद!

मी कोणत्या गटात बसतो याचा विचार चालू आहे. ;)

जबरी

रापचिक लिहिलय. :-))

अभिजित

वा

वाह रावसाहेब ! तुम्ही हे नवे शब्द योजून कमालच केलीत .
तंटाकंडी
हा हा हा काय जबरदस्त शब्द !

आठ्याळ राखुंडे
मस्त !

फुलपाखरी अश्रूपातक-वपुळलेली शब्दढास
वा वा वा..या वर्गातल्या लोकांना काय म्हणावे ! आम्ही मित्र या वर्गाला वपुंसारखे वगैरे असे म्हणत असू आता जोरकस शब्द समजला :)

यशिवाय मनोरंजन, माहिती देणे / मिळवणे, समाजाशी जोडलेले रहाणे या क्षुल्लक गोष्टींसाठीही काही लोक संकेतस्थळांवर येत असावेत, पण ते काही इतके महत्त्वाचे नाही!
होय..आम्ही या क्षुल्लक लोकांत मोडतो असे वाटते. नावच लिखाळ असल्याने सूज्ञ लोक ते प्रथमपासूनच समजून आहेत :)
-- (क्षुल्लक:) लिखाळ.

चर्चा सफल झाली

रावसाहेब,

आपल्या एका प्रतिसादाने ही चर्चा सफल झाली. आम्ही गुप्ततेने पहिल्या वर्गात, आणि वरकरणी चौथ्या वर्गात आहोत हे सांगणे न लगे :-)
आणि काही इतर क्षुल्लक गोष्टीही आहेत, पण ते इतके महत्वाचे नाही.

त्रीवर्गाला एकेरी संबोधण्याचे लायसन मिळालेला हा वर्ग 'तुला काय सांगू नीता, तुझी 'सकाळी रेल्वेलायनीशेजारी बसलेल्या बालकास' ही कविता वाचून मनाला आलेली अस्वस्थता अजून जात नाही गं' असली प्लास्टिकची वाक्ये लिहून जोरदार लोकप्रिय वगैरेही होऊन जातो.

खल्लास !

- मिलिंद

हा हा हा

क्या बात है राव साहेब!!

आपल्या वरील प्रकारांमध्ये अजुन एक पोट प्रकारहही टाकू इच्छितो -

  • विद्यार्थ्यांना कँटिन मध्ये धुम्रपान करताना पकडून त्यांना यथेच्छ बोलून झाल्यावर त्याच सिगरेटचे झुरके मारणरे प्राध्यापक.. अर्थातच चर्चांमध्ये घुसुन 'काय फालतु चर्चा' चालली आहे असा शेरा मारून स्वतःच्या मताच्या पिंका टाकणारे विद्वान.

रापचीकच

दिलीत की राव,
लोकांशीकवे शाळेत द्ननान बाह्रेर कोरडे पाषाण

रापचिक?

लोकांशीकवे शाळेत द्ननान बाह्रेर कोरडे पाषाण

म्हणजे काय?

"लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण" असे म्हणायचे आहे का?

एवढे रापचिक देऊ नका हो!

लई भारी!

वा वा संजोपशेठ,

तुम्ही केलेली वर्गवारी आणि तिचे वर्णन आपल्याला लई आवडले. लई भारी!!

आपण तर 'क्लास वन' मध्ये बसतो बरं का. खुल्लमखुल्ला कबूल करतो! ;)

सभ्यता म्हणून लोकांनी नकारात्मक प्रतिसाद देणे टाळले तर त्याला वाचकांची संमती गृहित धरून एकामागोमाग एक लेखांचा मारा करत रहाणे.

स्त्रीवर्गाला एकेरी संबोधण्याचे लायसन मिळालेला हा वर्ग 'तुला काय सांगू नीता, तुझी 'सकाळी रेल्वेलायनीशेजारी बसलेल्या बालकास' ही कविता वाचून मनाला आलेली अस्वस्थता अजून जात नाही गं' असली प्लास्टिकची वाक्ये लिहून जोरदार लोकप्रिय वगैरेही होऊन जातो.

हा हा हा! सही बोल्लात बघा..;)

'एक अक्षर कळू देईन तर शपथ' हा बाणा घेतलेला हा वर्ग सातत्याने तांत्रिक लिखाण करत असतो.

पण एक बरं आहे रावसाहेब. यांचा जास्त ताप तर होत नाही डोक्याला. ही मंडळी आपापल्या तांत्रिक वादात आणि व्यापात मग्न असतात! ;)

मी प्रामुख्याने 'शुद्धलेखन व व्याकरण'वाल्या मंडळींना प्रचंड म्हणजे प्रचंडच घाबरतो बघा!
'नक्को जीव करतात ही मंडळी..;)

'मराठी भाषेची मदार काय ती आता आपल्याच खांद्यावर आहे' असे मानून लेखन करणार्‍या मंडळींचा पण लई तर्रास होतो बघा! ;)

रावसाहेब, अहो तुमचा हा प्रतिसाद स्वतंत्र लेख म्हणूनच यायला पाहिजे होता.

तात्या.

ह ह पु वा

सन्जोप राव,
तुमचा हा प्रतिसाद वाचून अगदी हसून हसून पुरेवाट झाली! मस्तच लिहिलाय.

सर्किटराव,
माझे उपक्रमवर येण्याचे कारण तुमच्या (४) ह्या व्याख्येत बसतं. इथे साहित्य वाचायला वेळ कोणाला आहे, त्यापेक्षा ह्या संकेतस्थळावरचे छोटेमोठे लेख वाचणं सोयिस्कर पडतं.

अधुन-मधुन सन्जोप रावांसारखी आसामी असं काहितरी लिहून इथे टिकण्यासाठी वेगळंच कारण देतात!

खिरे

मी या संकेतस्थळावर येतो कारण...

हे संकेतस्थळ मराठी भाषकांसाठी आहे. मराठीतून विचार व्यक्त करण्यासाठी असलेले असे मुक्त चर्चात्मक व्यासपीठ असलेले.
विचाशक्ती व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच प्रबोधन व ज्ञान प्राप्ती करण्यासाठी मी या संकेतस्थळावर येतो.
आपला
कॉ.विकि

कारण

काहीतरी चांगले,रंजक,माहितीपूर्ण, उद्बोधक,दीड घटका वेळ घालवता येणारे, लिहिता वाचता यावे याकरता मी मनोगत आणि उपक्रम दोन्ही संकेतस्थळावर येतो. ह्या संकेतस्थळाची जडणघडण आत्ता होत असल्याने मला इथे अधिक स्वारस्य आहे.

हेतू

नमस्कार मिलिंदराव,
आपल्या सर्वेक्षण हेतूने घेतलेल्या चर्चांना प्रतिसाद द्यावा असे नेहमी वाटते म्हणून हा प्रपंच :)

माझी येथे वारंवार येण्याची कारणे
१) या संकेतस्थळाची रचना मला आवडली.
२) मराठी भाषेच्या संगणकावरील प्रसारासाठी असलेल्या एका प्रयत्नात आपला खारिचा वाटा असावा म्हणून.
३) अशा स्थळांवर जे मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचे प्रयत्न चालतात त्यात काही वाटा उचलता आला तर म्हणून,
४) मराठी लिहायला वाचायला, त्यातून गप्पा, मनोरंजन, माहिती आदानप्रदान करायला आवडते म्हणून.
५) पुस्तके लेख इत्यादींशी संपर्क ठेवणे सुद्धा २०किलो सामान घेवून आलेल्या माझ्या सारख्या दूरस्थ विद्यार्थ्याला शक्य झाले नसते. तो हेतू या स्थळांमुळे साध्य होतो. तसेच आता पुस्तके विकत आणून, वाचून, त्यावर साहित्यमंडळात बसून विचार करण्याचा काळ मागे सरकत आहे तर आपण सतत जो संगणक वापरत असतो त्यावरच वेळ मिळेल तेव्हा हे छंद पुरवणे सोपे होत आहे. सोयीचे होत आहे.

या सर्व कारणांमुळे मी येथे येतो. यातील अनेक हेतू इतर ठिकाणी सुद्धा साध्य होत असतात त्यामुळे तेथे ही जातोच.

फक्त माहिती देणारे संकेतस्थळ असे उपक्रमाचे स्वरूप यापुढे झाले तरी येथे वारंवार येत राहणे आवडेल. कारण वर एका प्रतिसादात चित्तरंजन म्हणतात तसे येथे माहिती आहे पण कोरडेपणा वाटत नाही.
आपला,
-- लिखाळ.

असेच


२) मराठी भाषेच्या संगणकावरील प्रसारासाठी असलेल्या एका प्रयत्नात आपला खारिचा वाटा असावा म्हणून.
३) अशा स्थळांवर जे मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचे प्रयत्न चालतात त्यात काही वाटा उचलता आला तर म्हणून,

चित्रा

कारण

उपक्रमाची घडी अजूनही बसते आहे असे मला वाटते. इथे येण्याचा मुख्य हेतू नवीन मराठी संकेतस्थळावर काय चालले आहे हे बघण्याचा असतो. इथे प्रकाशित होणारे सर्वच साहित्य उच्च दर्जाचे नसते. शिवाय तेच साहित्य इतर संकेतस्थळांवर किंवा सदस्यांच्या अनुदिनीवरही उपलब्ध असते. दुसरा मुद्दा म्हणजे अनुदिनीविश्वात काही लोक उच्च दर्जाचे साहित्य प्रकाशित करतात आणि हे साहित्य कुठल्याही संकेतस्थळावर उपलब्ध नसते. त्यामुळे फक्त साहित्यासाठी इथे येण्याचे कारण नसावे.
वर उल्लेख केलेले मुद्दे परत मांडत नाही. पण नवीन संकेतस्थळांवरही पूर्वीच्याच मारामार्‍या, हेवेदावे, कुचाळक्या बघून उबग येतो. हे इथेही चालू राहीले तर इथे यावेसे वाटणार नाही.
राजेंद्र

झकास रावसाहेब !

संजोप राव यांचा प्रतिसाद आवडला. एकदम जबरी !

मिलिंद , आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

नीलकांत

नविन सकेत् स्थळाबद्द्ल् अभिनन्दन्

हे सन्केत् स्थळ् पाहुन् खुप् आनन्द् झाला,

उद्दिष्ट

उपक्रमाचे मराठीतून माहितीची देवाण घेवाण करण्याचे, चर्चा करण्याचे उद्दिष्ट आवडले आहे म्हणून मी उपक्रमाचे सदस्यत्व घेतले आहे. इतिहास, भाषा अश्या समुदायांतील लेख आत्तापर्यंत वाचले ते आवडले. खरडवही, समुदाय अश्या सोयी आवडल्या. म्हणून मी उपक्रमावर येते आहे.

मी इथे येत नाही

मी इथे येत नाही... मराठीचे प्रेम मला इथे खेचून आणतं.

माहितीजालावर जास्तीत जास्त मराठी रुजावी, फुलावी अशी सुप्त कंड (सभ्य भाषेत कळकळ) मला असल्यामुळे मी मराठमोळ्या संकेतस्थळांचे सभासदत्व घेतो.

पण मराठी संकेतस्थळावर मला आलेले अनुभव फारसे उत्साहवर्धक नाहीत. मराठी दुकानदारांची मग्रूरी मराठी संकेतस्थळांत उतरली आहे, असा माझा अनुभव आहे. ( उपक्रमाचा अजूनतरी अपवाद आहे...उद्याचं माहीत नाही)

पु.लं.नी म्हटले आहे की "पुण्यातील दुकानात सर्वात उपेक्षित वस्तू कोणती असेल तर ती म्हणजे गिर्‍हाईक". तद्वत ह्या संकेतस्थळावर सर्वात उपेक्षित कोणी असेल तर ते म्हणजे त्या संकेतस्थळाचे सभासद. असो.

तर माझ्या मायमराठीच्या प्रेमापोटी मी इथे येतो...आणला जातो. मराठी संकेतस्थळावर वाद होतात, भांडणे होतात, शिवीगाळ होते,तरीही मी येतो. कारण मराठी रुजली पाहिजे.

एकूण काय, आपण एका धाग्यानी विणलो गेलो आहोत.

त्यामुळे ... पादा पण नांदा...

(पादरा) बापू

प्रतिसादातील व्यक्तिगत रोखाचा आणि अनावश्यक भाग काढून टाकला आहे. कृपया नोंद घ्यावी ही विनंती. - उपसंपादक.

का आलो... आणि का राहिलो...

मनोगत बंद पडले आणि एका मैत्रिणीने हे संकेतस्थळ चांगले असल्याचे कळविले. त्यामुळेच तर येथे फिरकलो.

तांत्रिक आणि धोरणात्मक दृष्ट्या हे संकेतस्थळ आवडले म्हणून टिकलो. ओळखीची माणसे दिसली ह्याचाही नक्कीच हातभार लागला.

उखाळ्यापाखाळ्या कमी होउन चांगले लिखाण, वाचन पाहायला मिळाले नाही तर मात्र रामराम ठोकून निघून जावे लागेल.