व्यायाम

व्यायाम

काहींचा आवडता नि काहींचा नावडता विषय. बहुदा प्रत्येकाने कधी ना कधी 'आजपासून मी व्यायाम करणारच' अशी प्रतिज्ञा आयुष्यात केलेली असते. ती तशीच राहिलेली ही पहिलेले असते. मीही त्यातून सुटलो नाहीये. पण हळूहळू त्यातून बाहेर यायला शिकलो. परत परत व्यायामाला सुरूवात करत राहिलो. हळूहळू सवय होत गेली. मग शरीरच रोज व्यायाम मागायला लागलं. व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर व्ययाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच! आज आपण काही गोष्टींची ओळख करून घेऊ या

व्यायाम सुरु करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे उत्तम.

१. आपली फ़िटनेस लेव्हल तपासून पहा. हे जास्त वयाच्या लोकांइतकेच तरूण मुलांनाही लागू आहे. किमान एकदा डॉक्टरकडे जाऊन आपले ब्लड प्रेशर तपासून घ्या. आपण कोणता व्यायाम करणार आहात याची डॉक्टरांना कल्पना द्या. व्यायाम करण्यासाठी आपण फ़िट आहोत याची त्यांच्या कडून खात्री करून घ्या.

२. आता व्यायामाची सुरुवात. पण लगेच उठून खुप मोठा व्यायाम करायला घेतलात तर स्नायुंना सवय नसल्याने हातपाय दुखुन जाम व्हाल. व व्यायाम कोलमडून पडेल. म्हणून जरा शांतपणे बसून नक्की काय व्यायाम मला करायचा आहे याचा एक आराखडा बनवा.

आपण कशी कशी आपल्या व्यायामात वाढ करणार आहोत हे सारखे ट्रॅक करण्यासाठी एक नोंदवही ठेवली तरी चालेल. या वहीत आपला व्यायामाचा नकाशा उतरवा. म्हणजे आज जर मी दहा जोर मारण्यापासून सुरुवात करणार असेन तर ते वाढवणार कसे आहे? किती ने वाढवणार आहे. मग आपण खरंच किती वाढवू शकलो आहोत याचा पडताळा घेता येईल. बहुतेक वेळा यात मन शरिरापुढे धावते असे दिसून येईल.

३. कोणता व्यायाम करायचा हे पाहू. आपण अत्यंत माफ़क नि छोटीशी सुरुवात करू या. म्हणजे "मी रोज चालायला जाईन पण फ़क्त दहा मिनिटे". पण रोज करेन नि ठरल्या वेळीच करेन हे महत्त्वाचे. आता आपल्यावर खुप ताण येणार नाहीये. दिवसात दहा मिनिटे वेळ काढणे शक्यही आहे. बरं, चालणे हा उत्तम व्यायाम आहे. याला कोणतीही साधने लागत नाहीत. शिवाय काही काळानंतर याचा काळ नि गती दोन्ही वाढवता येते. या व्यायामात सगळे शरीर सामील असते. पचन सुधारते. ट्रेडमीलवर करायलाही हरकत नाही पण मी मात्र मोकळ्या हवेत करा असेच म्हणेन.

४. हळू हळू व्यायामात वाढ करु या. म्हणजे आयडियली सुरुवात फ़क्त 'रोज' व्यायाम करेन याने करू मग वाढ, अंतर वाढवणे, वेग वाढवणे चढावर चालणे नि शेवटी टेकडी चढून उतरणे अशी करू. लक्षात ठेवा आठ दिवसात हे घडणार नाहिये! यात महिनेही जाऊ शकतात.

वजन खुप जास्त असून चालायला त्रास वगैरे असेल तर पोहोणे हा उत्तम प्रकार आहे. यात पाठीच्या विकारासलेल्यांनाही आराम मिळू शकतो (योग्य तो वैद्यकीय सल्ला आधी घ्यावा!) यातही सुरुवात आठवड्यातून २ वेळ पंधरा मिनिटे अशी करून रोज पाउण तास पर्यंत गेलात तरी चालेल. मात्र लक्षात ठेवा थोडा का होईना पण रोज!

आता मी काय करतो?
तालावर नृत्य हा ऍरोबिक्स चा प्रकारही मस्त असतो. मला हा अतिशय आवडतो. तालावर नाचण्यात भरपूर एनर्जी खर्च होते. एकुण या प्रकारात मला खुप फ़्रेशनेस जाणवतो.
असो, माझे एकुण स्वरूप पाहून मला मागे एका व्हिडियो मध्ये काम करायला मिळाले. आशा आहे आपल्याला आवडेल. हे गाणे माझे आवडते आहे.

आपला
गुंडोपंत

यापुढे ही व्यायाम मालिका चालवण्याचा मानस आहे.

Comments

गाण्यात

गाण्यात कसा दिसतोय हा गुंडोपंत?
आवडला की नाही?

आपला
गुंडोपंत

लयी बेस.

याम कराचं लयी जीवार येतं बा ! म्या दररुज म्हण्तो उद्यापासून लयी याम कराचा पर जमना भौ.

बाकी त्यो नाचनारा भौ आवल्डा.

यामा पेकसा डोपींग घेतल्यावर यामाची गरज नै म्हणतेत.

एरनॉल्ड(पीच्चरमधला)याम कुढं करीतो, त्यो डोपींग घेता म्हणते. ते जाऊंदे लिव्हलं लै भारी.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)

बाबूराव :)

त्याचा लै तरास हाये बाबुराव

त्याचा लै तरास हाये बाबुराव,
त्या दिखावटी बाडी साटी 'स्टिरॉईड्स' बी घेत्यात. पन मंग म्हातरपनी हाडाचा नि इतर बी, लै तरास होतो भौ!

जे अंगचं कमावेल र्‍हातं त्ये टिकतं...
भायेरातून लावल्यालं तरासच द्येनार का न्हाई?

हापला
गुंड्याभाऊ

उत्तम

तिकडे व्याकरणकार कसे (व्याकरणातले) एक एक प्रकार घेऊन चर्चीतचर्वण करत आहेत आता तुम्ही एक एक व्यायामप्रकार घेऊन शाब्दीक कवायती करा ;-) कसे?

सहभाग व प्रतिसाद एवढेच जमणारे आम्ही आमच्यापरीने जमेल ते करुच.

कोणी वैद्यकशास्त्राविशारद/मानसशास्त्रविशारद "लेखनकंड" ह्या नवीन खाजप्रकारावर प्रकाश टाकू शकेल काय्? ह. घ्या.

छान...

गुंडोपंत.. लेखमाला सुरू केल्या बद्दल आभार. तुम्ही लिहित रहा. आम्ही वाचत राहू, आणि एक दिवस कधीतरी व्यायम सुरू करू....
व्यायम हा "नियमीत" झाला पाहिजे असे आपल्याला म्हणायचे आहे असे जाणवते आहे, म्हणजे निदान व्यायामात तरी नियमाला महत्व आहे असे मानायचे का?





मराठीत लिहा. वापरा.

हा हा हा!

म्हणजे निदान व्यायामात तरी नियमाला महत्व आहे असे मानायचे का?

वा ! चांगली खेचताय! आहे आहे! 'नियमिततेला' महत्व आहे असे नक्कीच म्हणेन.
बाकनापला 'डान्स' कसा वाटला?

आपला
गुंडोपंत

आय लाईक टू मुव्ह इट मुव्ह इट!!

लय भारी

लय भारी आहे डान्स.





मराठीत लिहा. वापरा.

थॅक्यु थॅक्यु

थॅक्युथॅक्यु!!
ते कपडे घालयचे म्हणजे अगदीच लाज वाटत होती हो. पण काय करणार? रोल तसा आहे ना! ;)

आपला
गुंडोपंत

होय.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
व्यायामात नियम आणि नियमितता ह्या दोघांनाही अतिशय महत्व आहे. कुणीही उठला आणि कोणताही व्यायाम सुरु केला असे करणे अयोग्य आहे. आपली शक्ती,तब्येत आणि वय पाहून मगच विचारपूर्वक व्यायाम निवडायचा असतो. सुरुवात शक्यतो त्या क्षेत्रातील तज्ञांच्या देखरेखीखाली करणे हितावह आहे.

वा! वा! मस्त!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
गुंडोपंत छान विषय निवडलात! सुरुवातही झकास केलेत! त्यात तो विडिओही मस्तच आहे.
आता एक मात्र करा. मध्येच हा उपक्रम बंद करू नका बॉ. पुढचेही भाग येऊ देत. एकेका व्यायाम प्रकाराची माहिती,शक्य असेल तिथे छायाचित्रे/विडिओ वगैरे येऊ देत. आणि व्यायाम प्रकारही हळू हळू वाढू देत. इथल्या मंडळींना पचेल रुचेल इतपत लिखाण होऊ द्या. तुमच्या ह्या प्रकल्पाला माझ्या मनःपूर्वक सदिच्छा!

नक्की!

आपल्या सदिच्छा पाठीशी असल्या तर
लेखमाला नक्की पुर्ण करेन!

आपला
गुंडोपंत

सकाळी की संध्याकाळी?

"व्यायाम सुरू करण्यापूर्वी.." विचार करताना हा प्रश्न नेहमी पडतो. व्यायाम सकाळी करावा की संध्याकाळी? दोन्हींचे काही फायदे, तोटे आहेत काय?

चालेल

व्यायाम सकाळी, सायंकाळी कधीही केला तरी चालतो. माझे एक ओळखीचे स्नेही शिफ्ट ड्युटी करायचे. ते आल्यावर रात्री १२ ते १ असा व्यायाम करायचे.
पण ती त्यांची लाईफ स्टाइल अनेक वर्ष तयार झालेली होती.

अचानक रात्री बेरात्री असा व्ययाम करायला लागलो तर त्रास व्हायचा. (वासूची सासू मधे सांगितले आहेत् ते चंद्र नमस्कार घालत असावेत रात्रीचे ;) )

असो, व्यायाम जमेल तसा, अगदी थोडा का होईना पण रोज एकाच वेळी महत्वाचा. सकाळी केलात तर दिवस छान जाईल. संध्याकाळी केलात तर थकवा दूर होईल. :)

आपला
गुंडोपंत

थकवा

>>>थकवा दूर होईल

यावरून जरा जास्त सांगाना पंत

म्हणजे बैठीजीवनशैली आता चिकटली आहेच. व्यायामपण तेवढा जमत नाही.

तर मला सांगा की आता जो थकवा वाटतो (धुम्रपान करत नाही, अपेयपान कधीतरीच एकच प्याला, व प्यायल्यावर अजिबात दमल्यासारखे वाटत् नाही पण तो उपाय नाही हे पटते ;-)) जो थकवा / कंटाळा तिशीपुर्वी अजीबात वाटायचा नाही तो आता जाणवतो. पुर्वी कधीही कितिही वेळ जागू शकायचो आता तसे होत नाही.

हा थकवा दूर् करण्यासाठी, जरा स्टॅमीना वाढवण्यासाठी काय करावे? म्हणजे त्याकरता काही विशेष व्यायाम? कदाचीत प्राणायाम - जादा ऑक्सीजन जादा उत्साह, कमी थकवा?

चालायला लागा!

चला चालायला लागा!

असा प्रेमळ सल्ला मी देईन.
सकाळचे फिरणे शक्य असल्यास सुरू करा. यासाठी कुणी मित्र मिळाल्यास अजून उत्तम!

शिवाय एकदा डॉक्टर कडून तपासणी करून घेणे योग्य राहील असे वाटते.

आपला
गुंडोपंत

स्टॅमीना आणि दीर्घ श्वास

स्टॅमीना वाढवण्यासाठी काय करावे? म्हणजे त्याकरता काही विशेष व्यायाम? कदाचीत प्राणायाम - जादा ऑक्सीजन जादा उत्साह, कमी थकवा?

यांत प्राणायाम उत्तम कारण त्यात श्वासोच्छ्वासाला नियमीत केले जाते. आमच्या योगशिक्षिका स्टेसीदेवी (परदेशस्थांकडून योगासने शिकण्याची वेळ आली आहे.) यांच्यामते दीर्घ श्वास घेऊन तो क्षणभर रोखताना (याकाळात योगासनाची कृती होते.) आपण आपल्या मेंदूला फसवत असतो कारण मेंदू श्वास घेण्यात व्यग्र असल्याने आपण शरीर कसे वाकवतो, वळवतो किंवा चालवतो याकडे तो दुर्लक्ष करतो. जर दीर्घ श्वास घेतला नाही तर मेंदूचे आपल्या सर्व क्रियांकडे लक्ष जाते आणि तो आळशीपणा करण्याला प्रोत्साहन देतो. ;-) पाहा पटते का? त्यापेक्षा करून पाहा - परिणाम दिसेल.

बाकी, व्यायाम तुम्हाला शक्य असेल तेव्हा केला तर चालतो, तो तुमच्या शरीराला मानवला पाहिजे हे महत्त्वाचे. आमच्या पोहोण्याच्या वेळा रात्री साडे आठ ते नऊ या आहेत. बरेचदा संध्याकाळी सहा वाजता हलके जेवण (सपर) घेऊन आम्ही रात्री पोहोतो.

स्टॅमीना वाढवण्यासाठी अपेयपानापेक्षा लाल बैल पिऊन पाहा पण तेही योग्य नाही असेच मला वाटते. त्यापेक्षा वरील उपाय उत्तम.

हम्म!

लाल बैलात कॅफिन असते. त्यामुळे शरिराला पित्त खवळून तात्पुरते प्रोत्साहन मिळते. पण ते योग्य नव्हे. पण लक्षात ठेवा तुमचे एनर्जी ही बँक अकाऊंट सारखी आहे. जर लोन घेतले तर तितकीच विश्रांती देवून परतही करावे लागणार आहे.

दीर्घ श्वास घेऊन तो क्षणभर रोखताना (याकाळात योगासनाची कृती होते.) आपण आपल्या मेंदूला फसवत असतो कारण मेंदू श्वास घेण्यात व्यग्र असल्याने आपण शरीर कसे वाकवतो, वळवतो किंवा चालवतो याकडे तो दुर्लक्ष करतो. जर दीर्घ श्वास घेतला नाही तर मेंदूचे आपल्या सर्व क्रियांकडे लक्ष जाते आणि तो आळशीपणा करण्याला प्रोत्साहन देतो

हे काही तितकेसे पटले नाही. पण तुम्हाला हे कारण व्यायामाला चालत असेल तर माझी हरकत नाही! :)

बाकी कुणा कडून शिकतोय पेक्षा, तुम्हाला योग शिक्षक मिळालाय याचे भाग्य समजा. पैशासाठी योग शिकवणारे खुप आहेत. पण आयुष्यासाठी योग शिकवणारे फार थोडे! (याची अजून फोड हवी असल्यास देईन!)
नि परदेशस्थ असले तरी त्यांची पात्रता शिक्षकाची असेल तर काय हरकत आहे?

माझी एक फ्रेंच मैत्रिण आहे. ती भारतात येत जात असते. आली की फक्त योग, आयुर्वेद, ध्यान याविषयी बोलते. तीचे यातले ज्ञान इतके उत्तम आहे की, अनेकदा ती ज्या ग्रंथांविषयी बोलते, संदर्भ देते ते मला माहितही नसतात!
पंचकर्म वगैरे भारतात कोठे चांगले होते, ते तेथले चांगले का, त्यात कोणती तेले वापरावीत त्यानंतर काय करावे, आहार काय असावा, ध्यानाचे प्रकार, योगासने वगैरे बद्दल तीच्या फ्रेंच मिश्रीत इंग्रजीतून ऐकल्यावर आपण चाटच पडतो.
(ती म्हणते की मी चूकून तिकडे जन्माला आले. खरी मी भारतीयच आहे! तेंव्हा शिक्षकाच्या जन्मस्थानापेक्षा तो आपल्याला ताची पॅशन आपल्याला 'काय देईल' हे महत्वाचे वाटते.)

आपला
गुंडोपंत

जबाबदारी तुमची

गुंडो,

लेखाने प्रेरित होऊन आज अर्धा तास ब्रिस्क वॉकींग केले पण तेरड्याचा रंग तीन दिवसांत गेला तर तेव्हा अध्येमध्ये व्यायाम चाललाय का याची विचारपूस करायची जबाबदारी तुमची. ;-) - ह. घ्या.

बरोबर

पण तेरड्याचा रंग तीन दिवसांत गेला तर तेव्हा अध्येमध्ये व्यायाम चाललाय का याची विचारपूस करायची जबाबदारी तुमची..

सहमत! आमच्या बाबतीतपण आम्ही हेच गुंडोपंतांना सांगू इच्छीतो!

दिला!

बास इतनीसी बात?
दिला आम्ही आठवणीचा शब्द!

पण आम्ही आठवण केल्यावर त्या आठवणीला मान देण्याची जबाबदारी आपली. हे मान्य आहे का?

आपला
गुंडोपंत

ब्रिस्क वॉकींग

ब्रिस्क वॉकींग वरून अभय बंग यांचे "माझा साक्षात्कारी हृदयरोग" हे पुस्तक आठवले. नुसतेच माहीतीपूर्ण नाही तर चांगल्या भाषेतही लिहीले आहे. वाचले नसले आणि मिळाले तर अवश्य वाचा.

थकवा कमी करण्यासाठी

जो थकवा / कंटाळा तिशीपुर्वी अजीबात वाटायचा नाही तो आता जाणवतो. पुर्वी कधीही कितिही वेळ जागू शकायचो आता तसे होत नाही.

हा थकवा घालवण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे वय कमी करणे.
(एक सोपा मार्गः जन्मतारखेचा दाखला म्युनिसिपाल्टीतून बदलून आणा. १९७० चे १९८० करून मिळू शकेल.)

(असो. गुंडोपंतांचा दणका बसण्या आधी समाधीस्थ व्हावे, हे श्रेयस्कर.)

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

कधीही

भारतात साधारणपणे व्यायाम सकाळी करण्याची पद्धत आहे. पण परदेशात बर्‍याचदा दुपारी-संध्याकाळी लोक जॉगिंग करताना दिसतात (आता भारतातही सुरू झाले असल्यास कल्पना नाही). जेवण आणि व्यायाम यात २-३ तासांचे अंतर असलेले बरे. फक्त योगासने काही न खाता सकाळी करणे जास्त योग्य आहे असे वाटते. पण धावणे, चालणे किंवा इतर व्यायाम संध्याकाळीही चालतील. मी यातील तज्ञ नाही, त्यामुळे चूभूद्याघ्या.
मी गेले काही महिने (बर्‍यापैकी) नियमित योगासने आणि इतर व्यायाम करत आहे आणि याचा फायदा जाणवतो आहे. आठवड्यातून तीनदा जरी नियमितपणे व्यायाम केला तरी फायदा होतो. याशिवाय शक्यतो लिफ्ट न वापरता पायर्‍या वापरणे, छोटी अंतरे पायी जाणे असेही उपाय लाभदायक आहेत.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

योगासने

चांगला विषय आहे. वर दिलेल्या व्यायांमप्रकारांमध्ये योगासनांची भर घालावीशी वाटते. योगासने करण्याचे अनेक फायदे आहेत आणि विशेष म्हणजे योगासने केल्यावर अजिबात थकवा जाणवत नाही. याशिवाय नेहेमीचे व्यायाम आहेतच जसे की जोर, बैठका, जॉगिंग किंवा तयारी असेल तर असे काही.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आहारसुद्धा महत्त्वाचा

व्यायामा बरोबर आहारसुद्धा महत्त्वाचा आहे. रोज २०० मिली दूध, १अंडे, कडधान्ये, फळे, पालेभाज्या, बदाम-खारीक ;-) वगैरे खायलाच पाहीजे .

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

बरोबर आहे पण..

चांगल्या आरोग्यासाठी अनेक महत्वाचे घटक आहेत जसे योग्य व आवश्यक व्यायाम, संतुलीत आहार, जीवनशैली, प्रदूषणमु़क्त पर्यावरण, ....इ. इ. पण आपण सध्या (गुंडोपंताना अपेक्षीत) व्यायामावर चर्चा केंद्रीत करुया का?

बर्‍याच चर्चात विषयांतर होते म्हणून हा..

चालणे-पोहणे

पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे असं अगदी जुन्या जाणत्या व्यक्तींच आणि माझंसुद्धा मत आहे. पण सगळ्याच जणांना पोहायला मिलतं असं नाही. नदी, विहीर तर शहरात अवघड आणि स्विमिंगपूल स्वस्तातला शोधायचा म्हणजे अजून अवघड. तेव्हा सायकल चालवणे, चालणे आणि हळूवार पळणे/जोरात चालणे(ब्रिस्क वॉकिंग) हे चांगले पर्याय आहेत.

सकाळी दहा सूर्यनमस्कार घातले की सर्वांगसुंदर व्यायाम होतो. त्यासाठी वेगळे डंबेल्स-बार-सोटा घ्यायची गरज नाही. शक्य तितका शरिराच्याच वजनाचा वापर करावा.

या विषयावर एखाद्या सराईत व्यायामपटूकडून माहिती मिळाली तर बरे होईल.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो. मुंगळा गाण्यावर नाचल्याने अंग मोकळं होतं.

व्यायाम आणि आहार

या एकमेकांना पूरक गोष्टी आहेत त्यामुळे व्यायामाच्या चर्चेत आहाराचा मुद्दा घेतल्यास ते विषयांतर ठरत नाही असे वाटते.

अभिजीत यांनी सांगितलेले पदार्थ हाय प्रोटीन डाएट या प्रकारात मोडतात. हे पदार्थ शरीराला कधीही चांगले.

उपाशीपोटी आणि भरल्यापोटी व्यायाम केल्यास त्याचे दुष्परिणामच अधिक होऊ शकतात त्यामुळे संतुलीत खाऊन तासाभराने व्यायाम करावा.

असो. चालणे, पोहोणे,योगासने आणि जीममध्ये ऍब्जच्या व्यायामाची यंत्रणा हे खरेच चांगले व्यायाम म्हणायला पाहिजेत. शक्य असल्यास अर्धा तास मैदानी खेळ खेळणे हे व्यायामाला पूरक आहे.

प्रियालीताईंना हे सगळे येते परंतु गेले काही महिने 'कळतं पण वळत नाही' अशी गत होती, ती हा लेख वाचून सोडली. आजपासून नित्यनियमाने व्यायामशाळा दर्शन घेण्याचा संकल्प आहे. ;-)

आपल्या

आपल्या संकल्पाला शुभेच्छा!
आशा आहे की 'खंड पडले तरी तो अंत न मानता खंड मानून' व्यायाम सुरूच राहील.!

आपला
चिवट
गुंडोपंत

गुंडोपंत,

परत व्यायामाला उद्युक्त केल्याबद्दल आभार.

गेले काही महिने 'कळतं पण वळत नाही' अशी गत होती, ती हा लेख वाचून सोडली. आजपासून नित्यनियमाने व्यायामशाळा दर्शन घेण्याचा संकल्प आहे. ;-)

मनातले बोललात.

वा!

अरे वा,
माझ्या एका लेखात इतके पक्षी?
वा! क्या बात है!

आपल्यालाही शुभेच्छा!

आपला
गुंडोपंत

चांगला लेख आणि विषय

गुंडोपंत,

हा लेख आणि उत्तेजना आवडली. आता फक्त किबोर्डवर टंकून बोटांचा आणि काय लिहायचे याचा विचार करत फक्त डोक्याचा व्यायाम करणार नाही!

बाकी या विषयाशी निगडीत अजून एका विषयावर लेखन करता आले तर पहा (आपल्यास किंवा अजून कोणी योग्य व्यक्ती, मी नाही!!) तो म्हणजे वेळेचे व्यवस्थापन! कारण व्यायाम न करणे, योगासन नीट न करणे याला एक सोपे कारण असते ते म्हणजे - सध्या वेळ मिळत नाही!

संक्रातीच्या वेळेस या वेळेस अमेरिकेत सूर्य नमस्कार यज्ञाचेे आयोजन हिंदू स्वयंसेवक संघाने केले होते. पंधरा दिवसात १० लाख सूर्य नमस्काराचा संकल्प होता. त्यात बर्‍याच भारतीय - अभारतीय संस्थांनी भाग घेतला होता. प्रकल्प अर्थातच धार्मीक नव्हता. दरोज जरी सूर्य नमस्कार घालत होतो तरी एक दिवशी तासा भरात एकदम ९० का १०० सूर्यनम्स्कार घातले आणि दोन दिवस "अंग ठणकणे" म्हणजे काय याचा अनुभव घेतला....

खरे आहे!

तो म्हणजे वेळेचे व्यवस्थापन!

नक्की लिहीन! आवडेलही.

कारण व्यायाम न करणे, योगासन नीट न करणे याला एक सोपे कारण असते ते म्हणजे - सध्या वेळ मिळत नाही!
जर आपल्याच साठी वेळ नाही तर मग कुणासाठी वेळ आहे म्हणायचा?
असेही मी वेळ मागितलाच नाहिये. मी म्हणतो की चालायला जा. ते ही फक्त १० मिनिटे मात्र रोज एकाच वेळी.
यात अनेक फायदे आहेत. चालतांना व्यायामाबरोबरच, आपला आप्ल्याला वेळ मिळतो. आपले चिंतन मनन होवू शकते. दहा मिनिटे हा काळ मोठा नाही, शिवाय यात आपण कुठे आहात यालाही काही बंधन नाही. आपली वेळ झाली की १० मिनिटांचे चालणे कुठेही शक्य आहे. अगदी विमानातही!

एकदा हा वेळ शेड्युल मध्ये नाहिच्चे असे म्हंटले की आपला मेंदू चटकन 'बाकी वेळा वाकवायला' शिकतो असा माझा अनुभव आहे. हा माणूस ऐकतच नाही... म्हंटल्यावर आपल्या बरोबर असणारी मंडळीही आपोआपच 'आता १० मिनिटे हा /ही नसणार' हे मनोमन मान्य करतात!

मी अनेक मित्र मैत्रीणींना भेटण्यासाठी ही वेळ देतो, नि विचारतो, मी चालायला जाणार आहे, येणार का? बहुतेकांना आवडते. जर त्यांना शक्य नसेल तर मी ती वेळ देतच नाही! :)
बाकी हा अशा वेळी काळ खुप छान जातो हे नक्की!

आपला
चालोपंत

वेळेचे आणि कंटाळ्याचे व्यवस्थापन - माझा उपाय

दोन वर्षे अधूनमधून व्यायामशाळेत नाव नोंदवून पैसे भरून पाहिले. कंटाळा येऊन व्यायाम बंद करायला दोन आठवडे लागायचे, एक महिना झाला तर डोक्यावरून पाणी. मग कामावरून आल्यावर वेळ मिळत नाही असे स्वतःचे समर्थन करून व्यायामशाळेतून नाव काढून टाकायचे. त्यावर नामी युक्ती मला जमली ती अशी. मोटार बंद. अर्ध्या तासाच्या चालायच्या रस्त्यावर माझी कामाची जागा आहे त्याचा फायदा करून घेतला. घरातून मुद्दामून २५ मिनिटेच राहिली असताना निघायचे. मग भराभर चालणार नाही तर काय करणार?
अशा रीतीने सकाळची २५ मिनिटे ब्रिस्कवॉकची आणि संध्याकाळची ३० मिनिटे रमतगमत चालायची आयतीच पदरात पडली. दिवसात वेळ नाही म्हणून सबब सांगतोय कुणाला? असा मला तरी माझ्यावरच गनिमी कावा खेळावा लागला.

(कामाची जागा खूपच जवळ किंवा खूपच दूर असती तर नसते जमले म्हणा. शिवाय मला घामेजलेला बदलण्यासाठीचा दुसरा सदरा पिशवीत घालून न्यावा लागतो - माझ्या हापिसात इस्त्री बिघडलेला सदरा घातला तरी चालतो हे माझे नशीब.)

वा!

वा! उत्तम उपाय निवडलात!
स्वतःशीच गनीमीकावा हे तर अगदी खरेच आहे हो!

म्हणूनच आमच्या व्यायाम शाळेत
'मन हा सगळ्यात अवघड स्नायू आहे. तो एकदा घडवलात की इतर काहीही घडवायला वेळ लागत नाही'

असे लिहिले आहे! :)

आपण मात्र तो स्नायू येनकेन प्रकारेण 'घडवला' असे दिसते आहे!

आपला
गुंडोपंत

अजुन एक वेगळा चर्चाप्रस्ताव

करायचा का? "मी व्यायाम न करण्यामागची कारणे".

व्यायाम न करणार्‍याने पण ज्याला करायची इच्छा आहे त्याने आपली कारणे लिहायची व इतर लोकांनी त्यांना सडेतोड उत्तरे देऊन निरुत्तर करायचे व जा करा व्यायाम म्हणायचे. ;-)

आहे की नाही विन-विन चर्चाप्रस्ताव. व्यायाम न करणारा/री व्यायाम करायला लागेल व इतर लोकांना टंकून डंखायचे सुख मिळेल, कसे?

:-)

व्वा!

करायचा का? "मी व्यायाम न करण्यामागची कारणे".

एकदम भन्नाट कल्पना आहे. आवडली!

असे म्हणतात की व्यायामाच्या आधी नंतर खाऊ-पिऊ नये. माझा तोच "प्रॉब्लेम होतो"... मी व्यायाम करायचे म्हणतो आणि लक्षात येते की आत्ताच खाल्ले अथवा जेवायची वेळ झाली आहे :)

वा छान

गुंडोपंत,
फार चांगला लेख आणि लेखमालेची कल्पना.

सूर्यनमस्कार हा माझा आवडता व्यायामप्रकार आहे.

पुढील लेख वाचण्यास उत्सुक,
--(हुप्पा..हुय्या ) लिखाळ.

मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)

छान

व्यायाम ही इतरांनी करण्याची गोष्ट आहे, असे आजवर आम्हाला वाटत होते.
गौतमाला व्यायाम करणारे लोक दिसले असते, तर बौद्ध धर्म स्थापन झाला नसता.
परंतु त्याला व्यायामाअभावी शारीरिक कष्ट सहन करणारे लोक दिसले.
आणि पुढे इतिहास घडला.

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

कळले नाही!

क्षमा करा तथागत पण आपल्या म्हणण्याचा अर्थ कळला नाही. या चर्चेवर त्याचा संदर्भही कळला नाही.
असो, तरीही माझ्या अल्पमति प्रमाणे उत्तरे देतो.

गौतमाला व्यायाम करणारे लोक दिसले असते, तर बौद्ध धर्म स्थापन झाला नसता.
पण त्यांच्या कडे कल्पना होती, योग्य ती प्रेरणा होती. काही घडवण्याची नि प्रस्थापितांना हलवण्याची हिम्मत होती.

त्यायोगे व्यायाम करणारी मंडळी पाहून 'व्यायाम धर्म' स्थापन झाला असता!
आणी आपण सगळे "व्यायामं सरणं गच्छामी" म्हणालो असतो.

"बुद्धाच्या व्यायामाच्या कल्पनांनी" कदाचित भारतातल्या क्षात्र तेजाला नि वीर रसाला ग्लानी आली नसती. भारतीय सम्राटपद अशोकानंतरही अढळपणे प्रखरपणे तळपत राहिले असते!

मुस्लीम आक्रमण, व्यायाम नि त्यायोगे येणार्‍या वीर रसाच्या जोराच्या मोडून काढली असती. तो भाग भारताच्याच ताब्यात राहिला असता. ब्रिटीशांनी यायची हिम्मतच केली नसती.

सैन्य, ज्ञान व आक्रमकतेच्या बळावर कदाचित आज भारत अमेरिकेच्या ठिकाणी असता!

आपला
व्यायापंत

हे कसे काय बुवा ?

त्यायोगे व्यायाम करणारी मंडळी पाहून 'व्यायाम धर्म' स्थापन झाला असता!

हे कसे काय बुवा ?
गौतमाने शारीरिक व्याधी आणि जरेने जर्जर, आणि मृत लोक पाहिले, आणि संसार असार आहे, मिथ्या आहे, म्हणून सर्व सुखांचा त्याग केला. तेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती झाली आणि बौद्ध धर्माची तत्वे बनली.
व्यायाम करणारे बघितले असते, तर गौतम राजप्रासादातच राहिला असता, आणि फारतर एक पर्सनल ट्रेनर नेमला असता.

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

हे जरा विषयांतर वाटतेय...

व्यायाम करणारे बघितले असते, तर गौतम राजप्रासादातच राहिला असता, आणि फारतर एक पर्सनल ट्रेनर नेमला असता.

माफ करा तथागत साहेब पण हे जरा विषयांतर होतेय असे वाटत नाही का? उद्या गौतम बुद्ध किबोर्डवर टंकायचे नाहीत म्हणून तुम्ही काय त्यांच्या सारखा संसार सोडून झाडाखाली जाऊन बसणार आहात का? त्यापेक्षा आपण एक वेगळी चर्चा चालू करा आणि आपले विचार मांडा. आपल्याला या विषयातील चांगली माहीती दिसतेय तेंव्हा आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल.

धन्यवाद

माफ करा

गुंडोपंत आणि विकास,

विषयांतराबद्दल माफी असावी. आपला व्यायाम चालू द्या. आम्ही समाधी लावतो.

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

वा वा!

वा वा आपल्या संयत पणाने आम्ही खुष आहोत.
आता ध्यान कसे करावे यावर आपणच एक छान लेख लिहा ही आग्रहाची विनंती.

आपला
गुंडोपंत

ध्यान कसे करावे

आता ध्यान कसे करावे यावर आपणच एक छान लेख लिहा ही आग्रहाची विनंती.

ध्यान कसे करावे यावर ध्यान कसे असावे यावर नाही! :) (ह. घ्या. आता विषयांतराबद्दल माझी माफी!)

खाणे

व्यायामाप्रमाणेच आपले (भारतीय) "खाणे" या विषयावरपण लेखन होणे गरजेचे वाटते. जी पक्वान्ने आणि चटमटीत जेवण हे अगदी आपल्या (निदान आमच्या ;) ) लहानपणीही फक्त सणासुदीला आणि विशेष लग्नसमारंभात खाल्ली जात, जेव्हढे शारीरीक कष्ट आपल्यास पडत त्याचे सगळे गणितच आता चुकले आहे. अमेरिकेत तर खूपच चुकते. वीकएन्ड म्हणत जर एकमेकांकडे जाणे झाले तर हमखास गोडधोड खाणे, बर्‍याचदा चटमटीत/पंजाबी खाणे होते. आता आम्ही ते थोडे बदलायचा प्रयत्न करतोय, मराठी साधे जेवण/पालेभाज्या पण लोकांना इतर गोष्टींचे अजिर्ण झाल्यामुळे "स्पेशल" वाटू लागतात...

एकदा एक डॉ. प्रकाश आमट्यांनी त्यांच्या भाषणात सांगीतलेला किस्सा (कोणीतरी ऐकवलेला सांगतो): त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गल्लोगल्ली डॉक्टर, त्याच्या बाजूला (कधी कधी ) त्याच्याच नात्यातल्याचे/माहीतल्याचे केमिस्टचे दुकान, त्याच्याच जवळपास हलवायाचे दुकान... म्हणजे आपण लोकांना नक्की नकळत काय "मेसेज" देतो?

खरं आहे!

(भारतीय) "खाणे" या विषयावरपण लेखन होणे गरजेचे वाटते.
खरं आहे, पण मी पडतो खाण्याला झुकते माप देणारा... तात्यांच्या बाजूचा!
त्यामुळे मी प्रतिसाद नक्की देईन, पण लेख लिहायला मला काही जमायचे नाही बॉ! :)
(इथे विद्रोह जमत नाहीये हो! :))) )
हवे तर जरा जास्त चालायला जा असे म्हणेन! :)

आपला
गुंडोपंत खवैय्ये

कोणी किती व्यायाम करावा !

गुंडोपंत,
अजून एक मुद्द आठवला.
बाल वयात अथवा तरुण वयात शरीर बळकट करण्यासाठी व्यायाम करतात. तर मध्यम वयानंतर शरीर तरतरित ठेवण्यासाठी, त्याची काळजी म्हणून आणि म्हातारपण योग्य शारीरिक स्थितीमध्ये (अगदीच ह्या ! असे नको) म्हणून व्यायाम करतात असा सर्वसामान्य होरा असतो.

पण काही वेळेला मध्यम वयापासून ते उतार वयाला लागलेले लोक तरुणपणातला स्वतःचा व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती स्मरुन, तसाचा व्यायाम करायच्या मागे असतात. शरीराक्डून ते पूर्वीच्याच ताकतीच्या आपेक्षा करतात आणि सारखे निराश होतात आणि क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करुन आपली ताकत वाढेल या खुळ्या आपेक्षेने व्यायाम करुन थकत असतात असेही मी पाहिले आहे.

त्यासाठी 'रेट ऑफ ऍनबोलिझम आणि कॅटेबोलिझम' हे वेगवेगळ्या वयात वेगळे असतात (लहानवयात अऍनबोलिझम हा जास्त म्हणजे झीज भरुन येण्याची गती जास्त त्यामुळे शरीराची वाढ होते आणि उतारवयात कॅटॅबोलिझम जास्त त्यामुळे झीज जास्त होते.) हे लक्षात घेणे गरजेचे असते आणि त्यानुसारच आपला व्यायाम, शरीराकडून ठेवायच्या आपेक्षा माणसाने ठरवाव्यात असे मला वाटते. त्यमुळे कोणी कोणत्या वयात किती व्यायाम करावा ते समजणे गरजेचे आहे मला वाटते. याबाबत आपण तज्ञ असल्याने आपण आपल्या लेख मालेत याविषयी जरुर सांगा अशी विनंती.

-- लिखाळ.

आज आमचा श्रावण एक महिन्याचा झाला ! आज सायंकाळी त्याच्या वाढदिवसानिमित्त 'तीर्थ-प्रसाद' आहे :)

 
^ वर