नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड!

सह्याद्रीत ट्रेकिंग करणार्‍या लोकांमध्ये २ प्रकार असतात.
१. हरिश्चंद्रगड पाहण्याची इच्छा असलेले.
२. हरिश्चंद्रगड पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा असलेले.

ही अतिशयोक्ती नाही. हरिश्चंद्रगड या नावाचं प्रचंड आकर्षण ट्रेकर्सना आहे. माळशेज घाट आणि आजूबाजूच्या परिसराचा संरक्षक अशा या किल्ल्याला "ट्रेकची पंढरी" असेच म्हटले जाते. मत्स्यपुराण, अग्नीपुराण, स्कंदपुराणात या गडाचे उल्लेख आढळतात. ह्या पंढरीची वारी करण्याची प्रत्येक ट्रेकरची इच्छा असते. हरिश्चंद्रेश्वर, केदारेश्वर, तारामती माची आणि कोकणकडा यांना भेट देण्यासाठी न तळमळणारा ट्रेकर हा खरा ट्रेकरच नव्हे. ;)

१,२ सप्टेंबरला हरिश्चंद्रगडाला भेट देण्याचा योग आला त्याचीच ही विस्तृत आणि रटाळ नोंद.

हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी खालील रस्ते आहेत.

१. पुणे-आळेफाटा-खुबीफाटा-खिरेश्वर-तोलार खिंड-हरिश्चंद्रगड:
खुबीफाट्याला उतरून पाच किमी चालत खिरेश्वरमध्ये यावे. तिथून तोलार खिंडीच्या वाटेने साधारण चार ते पाच तास लागतात.
२. पुणे-संगमनेर-राजूर-पाचनई-हरिश्चंद्रगड
३. पुणे-संगमनेर-राजूर-तोलार खिंड-हरिश्चंद्रगड
४. पुणे-आळेफाटा-सावर्णे-बेलपाडा-साधले घाट-हरिश्चंद्रगड
५. पुणे-आळेफाटा-सावर्णे-बेलपाडा-नळीची वाट-हरिश्चंद्रगड

आमची मोहीम होती कोकणकड्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खाचेतून नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड चढण्याची. उपलब्ध असणार्‍या मार्गांमधला हा बहुधा सर्वात अवघड रस्ता.
ट्रेकची योजना आकार घेत असताना अनेकांनी "पावसाळ्यात नळीच्या वाटेने जाण्याचा धोका पत्करू नका" अशा अर्थाचे अनेक इशारे दिले होते. स्वत: आयोजकांनीही हा ट्रेक "अतिशय अवघड" या प्रकारातला असल्यामुळे नियमित ट्रेकर्स वगळता इतरांनी हे धाडस करू नये असे सुचवले होते. पण अशा सूचना (नेहमीप्रमाणे अतिशहाणपणा करून) धुडकावून लावून शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास आम्ही १२ जण शिवाजीनगर बसस्थानकावर हजर झालो. पुणे-नाशिक आरामगाडीतून साडेदहाला आळेफाट्याला आल्यावर सर्वांनाच भुका लागल्याची जाणीव झाली. कल्याणच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलात खाऊन बाहेर आलो आणि सावर्णे गावाकडे जाणारी गाडी किती वाजेपर्यंत मिळेल याची आजूबाजूला चौकशी केली तर "आताच पाच मिनिटांपूर्वी कल्याण गाडी गेली." असे कळले. ट्रक किंवा जीपने माळशेजचा प्रवास रात्री करणे हे धोक्याचे आहे हे नाणेघाटाच्या वेळी कळले होते. त्यामुळे तो पर्याय स्वीकारण्यास कोणी तयार नव्हते. शिवाय आळेफाट्यावरुन कल्याणला जायला "पाहिजे तेवढ्या" बसगाड्या मिळतात हा एक गोड गैरसमज आमच्या मनात होता. दीडदोन तास एस्टीची वाट बघण्यात गेले. बारा-साडेबाराच्या सुमारास नगर-बोरिवली गाडी मिळाली आणि दीड तासाने माळशेज घाट उतरून सावर्णे गावाबाहेर आम्ही उतरलो. उजव्या बाजूला आत जाणार्‍या रस्त्याने पाच मिनिटे चालल्यावर एक शाळा आहे. व्हरांड्यात आयोजकांचे स्थानिक कार्यकर्ते साबळेमामा आमची वाट पाहत होते. मुंबईचे लोक दोन-अडीचपर्यंत येतील आणि ते येईपर्यंत इथेच बसावे लागेल हे स्पष्ट झाले. . पावसामुळे शाळेचा व्हरांडा ओलसर झाला होता. सर्वांना झोपण्यासाठी पुरेशी जागाही नव्हती. शिवाय तासाभरात मुंबईचे लोक येतील तेव्हा सगळं सामान काढण्यापेक्षा तसंच भिंतीला टेकून बसलो.

शाळा, सावर्णे

मुंबईची वीसेक मंडळी पावणेचार वाजता आली. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही शनिवारी पहाटे निघणार होतो. आणि आता चार वाजले होते म्हणजे पहाट झालीच होती. तेव्हा विश्रांतीची भानगड न करता चार वाजता आम्ही बेलपाड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

बर्‍यापैकी उंच अशा दोन टेकड्या पार करून आम्ही कोकणकड्याच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा-वाल्हिवरे गावात आलो. तेव्हा सकाळचे साडेसात वाजत आले होते. ढग आणि धुक्यामुळे कोकणकडा पूर्ण दिसत नव्हता पण त्याच्या भव्यतेची कल्पना येत होती. आयोजकांच्या सौजन्याने गावात चहापान व नाश्त्याचा कार्यक्रम उरकून थोडेसे बसून घेतले. गावाबाहेरच्या ओढ्यावर पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. त्यावेळी गावातल्या काही लोकांनी "नळीच्या वाटेने जाऊ नका त्याऐवजी साधले घाटाने जा. थोडे लांब पडेल पण तो मार्ग तुलनेने सुरक्षित आहे. नळीमध्ये उभं राहणंसुद्धा अशक्य आहे. शेवाळामुळं सगळा रस्ता निसरडा झाला आहे" वगैरे सूचना आम्हाला दिल्या. मात्र त्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं आणि नळीच्याच वाटेने जायचं असं ठरलं.

सव्वानऊच्या आसपास आम्ही कोकणकड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. ऐनवेळी आयोजकांचे अनेक कार्यकर्ते न आल्याने शनिवार दुपार, रात्र आणि रविवार सकाळ यासाठी असलेले स्वयंपाकाचे सामान सर्वांनी वाटून घ्यावे म्हणजे एकाच माणसाला खूप जास्त ओझे येणार नाही असे ठरले. मला मिळालेल्या पिशवीत प्रत्येकी २ लीटर असे दुधाचे साधारण ३-४ टेट्रा पॅक आणि काही छोट्या पुड्या होत्या. त्यामुळे बॅगेचे वजन एकदम आठएक किलोने वाढले. पण त्याला काही पर्यायच नव्हता.
बेलपाड्यावरुन कोकणकड्याच्या डाव्या बाजूला असलेली इंग्रजी व्ही आकाराची खाच स्पष्टपणे दिसते. ह्या खाचेतच नळी लागते. आम्हाला तिथपर्यंत जायचं होतं. बेलपाड्याच्या प्रदेशात अतिशय घनदाट जंगल आहे. झाडाच्या एका प्रकाराने आम्हाला प्रचंड त्रास दिला. या झाडाच्या सर्व फांद्या, खोड वगैरे ठिकाणी बाभळीच्या काट्यांसारखे काटे होते. अशी अनेक झाडे येथे मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे रस्ता निसरडा असला तरी आधारासाठी बर्‍याच झाडांचा काही फायदा होत नव्हता. शिवाय झाड अंगाला लागून खरचटण्याची भीती असल्याने अवधानाने चालावे लागत होते. चार-साडेचार तासांच्या वाटचालीनंतर एक नदी ओलांडून आम्ही थोडी विश्रांती घेतली.

धबधबा
पोहण्याची मजा

कोकणकड्यावरचे ढग थोडेसे विरळ होऊ लागले होते. साधारण ३००० फूट उंचीच्या अनेक भिंती आजूबाजूला दिसू लागल्या. कोकणकडा तर नजर पोचत नव्हती इतका उंच दिसत होता. कड्याच्या उंचीचा अंदाज बांधणे चुकीचे होते. कारण कडा नक्की संपला आहे की त्याचे टोक ढगांमध्ये लपले आहे हेही ठरवता येत नव्हते.

उत्तुंग सह्यकडा

पुढेपुढे चढण त्रासदायक होऊ लागली होती. घनदाट झाडांमधून चालणे अशक्य असल्याने ज्या मार्गाने पाणी वाहते त्याच घसरड्या मार्गाने वर चढणे आवश्यक होते. शिवाय रात्रीची चुकलेली झोप आणि पहाटेपासून झालेली सात तासांची वाटचाल यामुळे चालण्याचा वेगही मंदावला होता. ह्या मार्गात दरडी कोसळण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. प्रत्येक दगडावर पाय ठेवताना तो सटकेल की काय अशी भीती वाटते. तीन तासांच्या वाटचालीनंतर समोर हरिश्चंद्रगडाची "नळी" आता समोर दिसू लागली.

नळीची वाट

अतिप्रचंड उंच अशा दोन डोंगरकड्यांमधील चिंचोळा असा खिंडीसारखा हा भाग आहे. नळीपर्यंत जाण्याचा रस्ता थोडा बिकट होता. कोकणकड्याला चिकटून कपारींचा आधार घेत पुढे पुढे सरकावे लागते. शिवाय हाताने आधार घेतली कपार आणि पाय ठेवलेली खाच कधी निखळून जाईल याचा भरवसा नाही. अगदी मजबूत दिसणार्‍या दगडाला धरावे तर त्याचा मूठभर तुकडाच हातात येईल. अतिशय काळजीपूर्वक चालत नळीच्या सुप्रसिद्ध रॉक पॅचसमोर आलो. पंधरा फूट उंचीचा हा धबधबा आहे. आमच्या मदतीसाठी दोर बांधण्याची व्यवस्था केली होती. नाकातोंडात जाणारे पाणी न जुमानता सगळेजण वर चढून आले.

चढण १

आमचा समज असा होता की हा धबधबा आणि खिंड संपली की एखादा महादरवाजा लागेल आणि आपण थेट किल्ल्यावर प्रवेश करू. पण तसे नव्हते. हा तर पहिलाच पॅच होता. असे सुमारे ४ ते ५ धबधबे आम्हाला चढून पार करावे लागणार होते. प्रत्येक ठिकाणी दोर बांधणे आणि सर्वांना वर घेणे हे काम जोराने वाहणारा वारा, पाऊस, धबधब्यांच्या पाण्याचा जोर यामुळे अतिशय वेळखाऊ होत होते. पावसापासून आडोसा असा कुठेही न मिळाल्याने दुपारचे जेवण शिजवणे व खाणे शक्य झाले नाही. त्यामुळे बिस्किटे, लाडू, चणे, शेंगदाणे अशा गोष्टींवर भूक भागवावी लागली. जसजसे वर जाऊ तसतसा कडाही उंच होतोय की काय असे वाटत होते. अनेक ठिकाणी दोर बांधण्यासाठी आवश्यक असा मजबूत दगड न सापडल्याने एकमेकांना हातानेच आधार देऊन पुढे घ्यावे लागले.

चढण २

शेवटून दुसरा धबधबा ओलांडून वर आलो तेव्हा संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. झाडीमधून जाणारी चिखलाची निसरडी उंच चढण पार केली आणि एका पठारावर आलो. सर्वजण तिथे जमेपर्यंत साडेसहा वाजून गेले. आता अंधार पडू लागला होता. बर्‍याच जणांनी आवश्यक असलेल्या बॅटर्‍या आणि सेल न आणल्याने एकमेकांना रस्ता दाखवत घनदाट जंगलातून चालायला सुरुवात केली. अडीच तास चालल्यानंतर पुढे शेवटचा पॅच होता.

चढण ३

रात्री नऊच्या सुमारास आम्ही त्या पॅचच्या पायथ्याशी पोचलो. दोर बांधणे व त्याची चाचणी घेणे यात तासभर गेला. या वाटेवरचा हा सर्वात उंच पॅच. साधारण २० फूट उंचीचा अर्धवर्तुळाकार दगड चढून वर यायचे होते. अंधारात चढायला खूपच वेळ लागत होता. सर्वजण वर येईपर्यंत अकरा वाजले. एकदाचे आम्ही गडावर येऊन पोचलो होतो. इथे वार्‍याचा वेग फारच जास्त होता. शिवाय पावसाचे थेंबही अतिशय थंडगार होते. चालताना शरीरात उष्णता निर्माण होते तेव्हा चालताना काही वाटत नव्हते. पण इतरांची वाट पाहत थांबलो तेव्हा थंडीने कुडकुडत होतो. आता आम्हाला मुक्कामासाठी आवश्यक असलेल्या गुहा आणि मंदिर शोधणे आवश्यक होते. लवकरच एखादा आडोसा मिळेल आणि पाण्याने निथळणारे कपडे बदलून कोरडे कपडे घालू. शिवाय पाठीवर असलेले तीसएक किलोचे ओझे रात्रभर तरी उचलावे लागणार नाही अशी आशा वाटू लागली. पण दैवाने आमची परीक्षा पाहण्याचेच जणू ठरवले असावे.

हरिश्चंद्रगडाचा विस्तार खूपच मोठा आहे. साबळेमामांसारखा १५-२० वेळा गडावर आलेला अनुभवी माणूसही येथे पावलापावलावर चुकतो. आवश्यक असलेला रस्ता अजिबात सापडत नाही. तीनचार तास किल्ल्यावर कुडकुडत भटकूनही आम्हाला गुहा सापडल्या नाहीत. शिवाय पाठीवरचे सामान कुठेतरी ठेवून गुहा शोधाव्यात म्हटले तर तेही शक्य नव्हते. बॅगा ठेवलेली जागा परत सापडते की नाही अशी भीती. एव्हाना रात्रीचे अडीच वाजून गेले होते. तीनचार तासांनी सकाळ होईल आणि थोडे दिसायला लागेल तेव्हा गुहा शोधता येतील असे ठरले. आयोजकांनी आणलेली ताडपत्री डोक्यावर घेऊन सर्वजण त्याखाली उकिडवे बसून राहिलो. ताडपत्रीतूनही थोडे पाणी झिरपत होते. मात्र वार्‍यापासून थोडेसे संरक्षण मिळत होते. रात्रीचेही जेवण आमच्या नशिबी नव्हते. स्वयंपाक करण्यासाठी आवश्यक तो आडोसा नसल्याने शिल्लक राहिलेल्या बिस्किटांसारख्या पदार्थांवर हात मारला. प्रत्येकाच्या वाट्याला तांदळाची अर्धी भाकरी आणि थोडी चटणी आली. आयोजकांनी श्रीखंड आणले होते ते तसेच खाल्ले. आणि सकाळ होण्याची वाट पाहू लागलो. रात्री काही नशीबवान सदस्यांना ताडपत्रीतून अंगावर पाणी ठिबकत आहे, ताडपत्री धरून हात दुखल्यामुळे हात थोडा हलवावा तर बाजूने थंडगार हवा हळूच आत येत आहे, दिवसभर पावसाने, धबधब्याच्या पाण्याने भिजलेले कपडे अंगावर तसेच आहेत, आणि जागेच्या अभावामुळे आडवे पसरण्याची सोय नसल्याने उकिडवे बसावे लागत आहे अशा परिस्थितीतही घोरावे लागण्याइतक्या शांत झोपेचे सुख अनुभवता येत होते याचा हेवा वाटला. ;) पाचच्या सुमारास एका मित्राने "ताडपत्रीत आपण भिजतच आहोत. अशा अवघडलेल्या परिस्थितीत बसण्यापेक्षा बाहेर छत्री घेऊन उभे राहू. तेव्हढेच पाय मोकळे राहतील." असे सुचवले. बाहेर आलो तर थंडगार वार्‍याने अक्षरश: हुडहुडी भरली. ताबडतोब परत ताडपत्रीमध्ये शिरलो.

बरोबर सहा वाजता आयोजकांनी शिट्टी वाजवून ताडपत्री ओढून घेतली आणि गुहा शोधण्याच्या मोहिमेला पुन्हा प्रारंभ झाला. विश्रांतीसाठी नसल्या तरी आमचा उतरण्याच्या रस्त्यावर असल्याने या गुहा सापडणे आवश्यकच होते. पुन्हा एकदा नळीच्या वाटेने कोकणकडा उतरणे अशक्य होते. शिवाय नळीच्या वाटेचा रस्ताही सापडतो की नाही अशी शंका होतीच. साडेतीन तासांनी गुहा सापडल्या. समोर धुक्यामध्ये हरिश्चंद्रेश्वराचे मंदिरही दिसत होते. गुहेत एकदाचे सामान टाकले आणि गरमागरम चहा घेतला. पाचएक मिनिट थोडे ऊनही पडले तेव्हा बाबूजींच्या

पडसाद कसा आला नकळे, अवसेत कधी का तम उजळे,
संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावरले,
किमया असली केली कुणी

या ओळीच आठवून गेल्या.

अरुण सावंत सर आणि आम्ही

हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर, आजूबाजूचा परिसर, केदारेश्वर यांचं वर्णन करायला तर शब्दही अपुरे आहेत. काळ्याभोर दगडातलं हे मंदिर त्याच्या प्राचीन वैभवाची साक्ष देतं. सर्वत्र कोरीव खांब आणि शिला. मंदिराच्या बाजूला असलेली थंडगार पाण्याची तळी, मंदिरासमोरील असलेले पाण्याचे अतिशय सुंदर कुंड. कुंडावरच असलेली लहान खिडक्यांसारखी कोरीव देव्हार्‍यांची रांग, थोडे खाली उतरून गेले लागणारी केदारेश्वराची गुहा यांना "चमत्कार" या एकाच शब्दाने गौरवणे योग्य होईल. केदारेश्वराची गुहा तर अद्भुत म्हणावी इतकी सुंदर आहे. हरिश्चंद्रेश्वर आणि केदारेश्वराच्या दर्शनासाठी - तुम्ही अगदी माझ्याप्रमाणेच नास्तिक असला तरीही - नक्की पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल.

तळे
हरिश्चंद्रेश्वर मंदिर
केदारेश्वर गुहा

दीड वाजता उतरायला सुरुवात केली. आमचा उतरण्याचा मार्ग तोलार खिंडीवाटे होता. हरिश्चंद्रगडापासून चालत चालत ७ टेकड्या पार केल्या की तोलार खिंड लागते. ही खिंडही पावसाळ्यात पार करणे अशक्य व्हावे इतकी निसरडी होते. जागोजागी असलेले तुटके रेलिंग्ज आणि बाजूला दिसणारी खोल दरी यामुळे धडकी भरते. सुदैवाने पावसाने एखाद्या शहाण्या मित्रासारखे वागून आम्हाला उतरताना अजिबात त्रास दिला नाही. चारएक तासांच्या वाटचालीनंतर एकमेकांच्या आधाराने खिंड पार करून आम्ही व्याघ्रशिल्पापर्यंत येऊन पोचलो.

व्याघ्रशिल्पाकडून डावीकडे जाणार्‍या रस्त्याने रतनगड, राजूर परिसराकडे जाता येते. आम्ही उजवीकडून जाणार्‍या रस्त्याने खिरेश्वराकडे आलो. शेवटच्या एक तासाच्या प्रवासात पायांनी अगदीच असहकार पुकारला. खांदे आणि गुडघे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव क्षणोक्षणी करून देत होते. पण पुण्यात लवकरात लवकर पोचण्यासाठी घाईने पाय उचलणे आवश्यक होते. घनदाट जंगलातली ही पायवाट पार करून खिरेश्वराला पोचायला सहा वाजले. मुंबईच्या मंडळींच्या बसने खुबीफाट्यापर्यंत आलो. तिथून एक खाजगी जीप करून आळेफाटा आणि आळेफाट्यापासून खचाखच भरलेल्या इंदौर-पुणे एस्टीमध्ये काहीजण पायर्‍यांवर बसून तर काही उभे राहून असा कंटाळवाणा प्रवास करत पुण्यात आलो.

सर्वजण

अंगावर काट्यांनी ओरखडल्याच्या खुणा, सुजलेले पाय, जळवा चावल्याचे दिसणारे फोड, बॅग रुतल्यामुळे खांद्यावर दिसणारे खरचटलेले रक्त, दोन दिवस झोप न झाल्याने तारवटलेले डोळे हे सगळे पाहिल्यावर घरी आल्यावर नेहमीप्रमाणे विचार केला. "काय गरज आहे इतकं सगळं करण्याची?"

पण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती असतात असं थोडंच आहे.

ऋणनिर्देश:
१. हरिश्चंद्रगडाचा नकाशा: सांगाती सह्याद्री व ट्रेक क्षितीज.
२. छायाचित्रे: सागर भोसले


हाच लेख आजानुकर्ण यांच्या माहितीपूर्ण अनुदिनीवरही वाचता येईल.

लेखनविषय: दुवे:

Comments

विनंती

कृपया लेखाच्या शीर्षकातील हरीश्चंद्रगड या अशुद्ध शब्दाऐवजी हरिश्चंद्रगड असे वाचावे.

-धन्यवाद.

अवांतरः उपक्रमरावांनी योग्य तो बदल केल्यास आगाऊ आभार!

थरारक

वर्णन थरारक आहे. ट्रेकिंगची सुरक्षीतता साधने असतात ना जवळ?

साधने

नळीच्या वाटेने करायच्या प्रवासात दोरखंड वगळता इतर साधने नव्हती. त्यांची आवश्यकताही भासली नाही. पावसाळा वगळता इतर ऋतूंमध्ये दोरखंडाचीही आवश्यकता भासत नसावी. त्याऐवजी rock climbing चे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.

मस्त!

फास्टर फेणेच्या एक गोष्टीत या गडाचे नाव ऐकल्यापासून येथे ट्रेकिंग/हायकिंगला जाण्याची दुर्दम्य इच्छा मनात आहे. पण अद्याप योग आलेला नाही. हे वर्णन आणि चित्रांद्वारे दिसणारा थरार पाहिल्यानंतर तर ही इच्छा आणखी बळावते. वेळच सगळ्याचे योग्य उत्तर यावर भरवसा ठेवून आयुष्याचा ट्रेक करायचा, हेही तितकेच खरे नव्हे काय? असो.
आटोपशीर वर्णन आणि तितकीच सुंदर छायाचित्रे आवडली. असेच आणखी अनुभव वाचायला आवडतील.
- परीवश

मस्त

रोमांचक वर्णन आहे. त्याबरोबरच संदर्भासहित चित्रांमुळे वाचताना प्रवास झाल्यासारखेच वाटले. धबधब्यांवरची चढाई विशेष थरारक वाटली. पुढील चढायांसाठी शुभेच्छा!

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हौशी

एकदम हौशी कलाकार आहात् तुम्ही योगेशराव. तुमचे फोटो व वर्णन पाहून/वाचून आम्हालापण गड सर केल्यासारखे व थोडेफार खरचटल्यासारखे वाटते आहे बघा. थोडी थंडी वाजतीय, भुक लागली आहे व झोपही येते आहे.

नळीची वाट व उत्तुंग सह्यकडा हे फोटो बघूनच आमच्या अंगातील संपत आलेल्या वीररसाने थोडी का होईना उसळी मारलीच. सही!

काही गोष्टी खटकल्या
१) आयोजकांची अव्यवसायीकता - तुम्हा लोकांना उचलायला लागलेले वजन (म्हणजे तुम्ही पैसे भरले होते असे समजून हा, समजा ह्या आधीक वजनाच्या भाराने कोणाचा तोल गेला असता तर..)
२) हरिश्चंद्रगडाला भेट गेली कित्येक वर्षे लोक देत आहेत तर काही ठरावीक जागी निदान पावसापासून बचाव होईल अशी काही केबीनस् असायला काय हरकत आहे.
३) प्राचीन वास्तूची पडझड?? काही डागडूजी?
आपण भारतीय मंडळी सगळे चालवून घेतो..

प्रतिसाद

१) आयोजकांची अव्यवसायीकता - तुम्हा लोकांना उचलायला लागलेले वजन (म्हणजे तुम्ही पैसे भरले होते असे समजून हा, समजा ह्या आधीक वजनाच्या भाराने कोणाचा तोल गेला असता तर..)

अंशत: सहमत. अधिक वजनाच्या भाराने तुलनेने नवीन मंडळींना त्रास झाला. ऐनवेळी आयोजकांचे सदस्य येणे अशक्य झाल्याने हा प्रसंग ओढवला होता. मात्र ट्रेकिंगसारख्या कार्यक्रमात अशा घटनांची अपेक्षा असतेच.

२) हरिश्चंद्रगडाला भेट गेली कित्येक वर्षे लोक देत आहेत तर काही ठरावीक जागी निदान पावसापासून बचाव होईल अशी काही केबीनस् असायला काय हरकत आहे.

तुलनेने सोपा असणार्‍या तोलार-खिंडीच्या मार्गाने आल्यास मुक्कामाची गुहा वाटेवरच असल्याने ताबडतोब सापडते. "नळीची वाट" हे वेगळे धाडस होते.

३) प्राचीन वास्तूची पडझड?? काही डागडूजी?
आपण भारतीय मंडळी सगळे चालवून घेतो..

भारतीय मंडळी केवळ सगळे चालवूनच घेत नाहीत तर या पडझडीसाठी यथाशक्ती हातभारही लावतात. हरिश्चंद्रगडासारख्या अप्रतिम ठिकाणी दारू पिऊन बाटल्या फोडून टाकणे. महत्त्वाच्या शिलालेखांवर "महेंद्र ट्रेकर्स, नाना पेठ" किंवा "हरिश्चंद्रेश्वर जीर्णोद्धार समिती" असे खडूने लिहून ते विद्रूप करणे. ही तर अगदी मोजकी उदाहरणे झाली.

गडासंबंधी आलेली ही बातमी वाचा.

गडासंबंधी आलेली ही बातमी वाचा.

>>>गडासंबंधी आलेली ही बातमी वाचा.

अरेरे ही बातमी वाचून अजूनच वाईट वाटले. म्हणून ही घ्या शिवी ज्यांनी कोणी घाण केली त्यांनाच लागू...

सह्याद्रीत ट्रेकिंग करणार्‍या लोकांमध्ये ३ प्रकार असतात.
१. हरिश्चंद्रगड घाण करण्याची इच्छा असलेले.
२. हरिश्चंद्रगड पुन्हा एकदा घाण करण्याची इच्छा असलेले.
३. काहीजण अपवाद

छान !

योगेशराव,
हरिश्चंद्रगडाची माहिती आणि त्याचे वर्णन आवडले. ट्रेकिंग वाली मंडळी असतेच जिगरबाज, त्याचा उत्तम नमुना म्हणजे तुम्ही.छायाचित्रे सुंदर आहेत . बाकी पोहणारा योगेश का ? सावंतसरांच्या ग्रुपमध्ये योगेश कोणता ? आणि "काय गरज आहे इतकं सगळं करण्याची?" हे प्रश्न पडलेच :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाहवा!

चित्तथरारक आणि रोमहर्षक लेख.
प्रकाशचित्रेही अप्रतिम...

वाचतावाचता आमचेही पाय(/र्श्व) दुखायला लागलेत. ट्रेकमध्ये घसरून पडणे म्हणजे काय असते त्याची कल्पना आहे.;)
योगेशराव, जरा सांभाळून, बरं का!

मस्त छायाचित्रे

लेख आवडला. छायाचित्रे तर अप्रतिम.

अफलातून

या कठीण रस्त्याने नाही तर सोप्या रस्त्याने तरी हा गड चढावा अशी उर्मी आली आहे!

वर्णन आणि छायाचित्रे

दोन्ही अप्रतिम. सर्वच छायाचित्रे भूल घालणारी आहेत.

काही प्रश्नः

मत्स्यपुराण, अग्नीपुराण, स्कंदपुराणात या गडाचे उल्लेख आढळतात.

१. याबद्दल अधिक माहिती आहे काय? म्हणजे हे उल्लेख कोणत्या बाबतीत आले आहेत. तसेच, हा किल्लाही सातवाहनकालीन असल्याचे असे एकांनी माझ्या अनुदिनीवर लिहिले आहे.

२. किल्ला किती जुना असावा? किंवा बांधकाम कोणत्या काळातील आहे?

३. किल्ल्याच्या नकाशात विश्वामित्र मंदिर दिसते आणि गणेश गुहाही दिसते. हे नेमके काय आहे? (म्हणजे विश्वामित्र ऋषींचे मंदिर का? ऋषींची मंदिरे बांधण्याची प्रथा होती का? असे प्रश्न पडले.)

४. रोहिदास, तारामती आणि हरिश्चंद्र आणि विश्वामित्र ही सर्व नावे राजा हरिश्चंद्राच्या गोष्टीशी निगडीत असल्याने या सर्वांचा या किल्ल्याशी काय संबंध असावा असा प्रश्न पडला.

या प्रश्नांची उत्तरे लेखकाला माहित नसल्यास परंतु इतर कोणाला माहित असल्यास त्यांनी कृपया शंकानिरसन करावे. विकिवर थोडी माहिती मिळाली. मी पूर्वी वाचली नव्हती, वाचून जरा संशोधन करावे लागेल.

५. विकिवरील माहितीत कलचुरी, कालचुरी अशा एका राजघराण्याचा उल्लेख आहे. हे राजघराणे कोणते याबाबत कोणाला माहिती आहे काय?

:(

लेखकाला या प्रश्नांची उत्तरे अर्थातच माहिती नाहीत. मात्र महर्षी चांगदेवांनी हरिश्चंद्रेश्वर मंदिरात १४०० वर्षं तप केले होते असे ऐकले आहे. चांगदेवांची तपश्चर्येची खोली व ते तपासाठी बसत तो दगडही तेथे उपलब्ध आहे.

किल्ल्याविषयी अधिक माहिती येथे पहा.

ऋषींची मंदिरे

(... ऋषींची मंदिरे बांधण्याची प्रथा होती का? असे प्रश्न पडले.)

पुण्याच्या सदाशिव पेठेत भिकारदास मारुतीच्या/एस्पी कॉलेजच्या जवळ एक नारदमंदिर आहे, असे आठवते. फार लहानपणी आत गेलो होतो, त्यामुळे आतली मूर्ती नारदाची होती की नाही ते आठवत नाही.

कालचुरी/ कालछुरी

या राजवंशाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मीच देते. अधिक शोध घेतला असता या राजघराण्याबद्दल ही माहिती मिळाली. त्यावरून बाराव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले गेले असावे असे वाटते. हे राजे हैहय वंशीय होते असे वाचले. अजानुकर्णांच्या खास माहितीसाठी, हे राजे यदुकुळातील चांद्रवंशीय राजे मानले जातात परंतु या हैहयवंशीय राजांनी हरिश्चंद्राच्या कथेतील पात्रांच्या नावाचा उल्लेख का करावा हे गौडबंगालच आहे.

वाचक्नवी, पुराणांत हरिश्चंद्रगडाचा उल्लेख झाला आहे याबद्दल काही शोध घेता येईल का?

नारदाच्या मंदिराबद्दल पुणेकरांना जाऊन आत कोणाची मूर्ती आहे त्याची खातरजमा करता येईल असे वाटते. ;-)

सही

सुंदर छायाचित्रे आणि माहिती

काही प्रश्न -
१. उपलब्ध असणार्‍या मार्गांमधला हा बहुधा सर्वात अवघड रस्ता. तर मग सर्वात सोपा रस्ता कुठला?
२. आयोजकांनी नक्की काय आयोजन केलं होतं?
३. आयोजकांनी आणि गावक-यांनी दिलेल्या धोक्याच्या सूचना धूडकावून लावून ट्रेक करणे कितपत बरोबर आहे? सर्वजण सुरक्षीतपणे परत आल्यावर आता हे लिहिणे सोपे असले तरी कदाचित पश्चाताप झाला नसता काय?
४. सुरक्षिततेची पातळी वाढविण्यासाठी काय करता येईल जेणे करून डेअर डेव्हिल नसणारेही हा आनंद लूटू शकतील ?

५.

५) तसेच मोकळे टेट्रा पॅक आणि काही छोट्या पुड्या , बिस्किटे, लाडू, चणे, शेंगदाणे इ.च्या रिकाम्या पिशव्या, कागद ह्यांची विल्हेवाट काय लावली? ही खात्री आहे की तुमचे तुम्ही सांभाळले असेल पण ग्रुपमधल्या सर्वांनी?

मस्त

नेहेमीप्रमाणेच मस्त वर्णन. आम्ही काय काय "मिस" केले आहे हे जाणवले. ;) छायाचित्रे पण आवडली. या गडाच्या प्राचीन वैभवाचा उल्लेख आपण केला आहे त्यावर काही अधीक माहीती आपण दिलेल्या दुव्यांवर आणि इतरत्र शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करीन!

धन्यवाद!

काही उत्तरे

१. उपलब्ध असणार्‍या मार्गांमधला हा बहुधा सर्वात अवघड रस्ता. तर मग सर्वात सोपा रस्ता कुठला?

माझ्या माहितीप्रमाणे सर्वात सोपा रस्ता हा पुणे-संगमनेर-राजूर-पाचनई मार्गे हरिश्चंद्रगड हा आहे. मात्र संगमनेर ते राजूर हा रस्ता भयंकर वळणावळणाचा आहे.त्यापेक्षा नळीचा घाट बरा असे अनेक अनुभवी ट्रेकर्स सांगतात. ;) शिवाय सोयीस्कर वेळेच्या बसच्या अनुपलब्धतेमुळे राजूरला मुक्काम करणे टाळले जाते असे म्हणतात.
२. आयोजकांनी नक्की काय आयोजन केलं होतं?
नळीच्या वाटेने ३० जणांना सुखरुप वर नेणे व परत आणणे हे भव्य कार्य आहे. आम्हाला आलेला अनुभव -रस्ता चुकणे + धुके + पाऊस + चढाईसाठी २२ तास- हा त्यांनाही प्रथमच आला होता असे त्यांनी कबूल केले. त्यांनी सोबत आणलेले स्वयंपाकाचे सामान पाहता त्यांचा हेतू आम्हाला गंडवण्याचा नव्हता हे स्पष्ट आहे. ;)
३. आयोजकांनी आणि गावक-यांनी दिलेल्या धोक्याच्या सूचना धूडकावून लावून ट्रेक करणे कितपत बरोबर आहे? सर्वजण सुरक्षीतपणे परत आल्यावर आता हे लिहिणे सोपे असले तरी कदाचित पश्चाताप झाला नसता काय?
आयोजकांनी दिलेली धोक्याची सूचना ही डिसक्लेमर प्रकारची आहे. हरिश्चंद्रगड हा प्रसिद्ध असल्याने होणार्‍या त्रासाची कल्पना न करता अननुभवी व अतिउत्साही मंडळी ट्रेकला येतात व नंतर त्यांचे लफडे निस्तरणे अवघड होते. त्यामुळे हा ट्रेक केवळ अनुभवी ट्रेकर्ससाठीच व अतिशय अवघड प्रकारातला आहे ही पूर्वसूचना त्यांनी दिली होती.
गावकर्‍यांचा मुद्दा थोडा वेगळा आहे. गावकर्‍यांच्या मते (आयोजकांना माहिती असलेल्या) नळीच्या वाटेने जाण्याऐवजी तुलनेने सोप्या (पण आयोजकांना पुरेशी कल्पना नसलेल्या) साधले घाटातून जाण्याने एक गावकरी "राजू गाईड" स्वरुपात आम्हाला घ्यावा लागणार होता.
येथे एक गोष्ट मांडणे आवश्यक आहे. या ट्रेकचे आयोजन मुंबईचे प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांच्या कॅम्प फायर इंडिया या संस्थेने केले होते. २५ वर्षांपूर्वी पुण्याचे एक निसर्गप्रेमी अरविंद बर्वे यांनी कोकणकड्याच्या प्रेमात पडून हरिश्चंद्रगडावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यांचे प्रेत शोधण्यासाठी २००० फूट उंचीचा सरळसोट कोकणकडा दोरीच्या सहाय्याने rappelling करत ८६ मिनिटांत उतरण्याची कामगिरी अरुण सरांनी केली होती. हे कार्य करणारे अरुणसर हे पहिले गिर्यारोहक. स्वतः अरुण सरांना ट्रेकिंगचा ३० वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर फारसे शंकाप्रदर्शन आम्ही केले नाही.
४. सुरक्षिततेची पातळी वाढविण्यासाठी काय करता येईल जेणे करून डेअर डेव्हिल नसणारेही हा आनंद लूटू शकतील ?
सुरक्षिततेची पातळी वाढवण्यासाठी आवश्यक असलेले शिरस्त्राण-हेल्मेट, संरक्षक पट्टे व कड्या इ. चा वापर करता येईल.
५. तसेच मोकळे टेट्रा पॅक आणि काही छोट्या पुड्या , बिस्किटे, लाडू, चणे, शेंगदाणे इ.च्या रिकाम्या पिशव्या, कागद ह्यांची विल्हेवाट काय लावली? ही खात्री आहे की तुमचे तुम्ही सांभाळले असेल पण ग्रुपमधल्या सर्वांनी?

कॅम्प फायर इंडिया व बहुतेक सर्व व्यावसायिक ट्रेकर ग्रुप या बाबतीत फारच असहनशील आहेत. किल्ल्यांवर कचरा फेकणे कोणीही सहन करत नाही. आम्ही मित्रमंडळीही वाईटपणा पत्करुन का होईना पण सर्वांना कचरा सोबत आणण्याचा आग्रह करतो. एखादा अकडू कार्यकर्ता निघालाच तर त्याने केलेला कचरा वाटून घेऊन सोबत आणतो. पायथ्याच्या गावामध्ये न टाकता हा सर्व कचरा पुण्यामध्ये परत येतो. ;)

साहसी

साहसी आहातच, आमचा सलाम आणि पुढील ट्रेकसाठी शुभेच्छा!!

सलाम

२००० फूट उंचीचा सरळसोट कोकणकडा दोरीच्या सहाय्याने rappelling करत ८६ मिनिटांत उतरण्याची कामगिरी अरुण सरांनी केली होती. हे कार्य करणारे अरुणसर हे पहिले गिर्यारोहक.

बाप रे! २००० फूट रॅपेलिंग! वाचूनच छातीत धडकी भरते. तुमच्या अरुण सरांना आमचाही सलाम!
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

पंढरी!

कर्णा!
सर्वप्रथम "ट्रेकची पंढरी" केल्या बद्दल मनापासून अभिनंदन!
खुप मोठा अनुभव आहे हा! कशासाठी हे सगळं करायचे हा विचार गडावर असतांना, कोकणकडा समोर असतांना कधीही मनात येत नाही! खरं सांगायचे तर हा एक असा आनंद आहे की, त्याला 'का' ह प्रश्न विचारणे गैर आहे. काही गोष्टी सांगुन समजावता येत नाहीत. जसे आंबा ही गोडच असतो, सिताफळही गोडच असते. पण दोन्हीची गोडी वेगळी कशी आहे हे शब्दाने सांगणे अवघड आहे. चाखुन पाहिले की मगच ते कळते, तसेच अहे आहे!

कशासाठी हे सगळं करायचे हा विचार शेवटी 'बस मध्ये बसल्यावर मात्र' नक्कीच येतो हा भाग वेगळा... अशावेळी ती रेटारेटी, गर्दी ; इतका 'मोकळा अवली अनुभव' घेऊन आल्यानंतर नकोशी वाटते!

लेख आजाबात रटाळ नाहीये! खुपच मजा आली वाचायला! खुप आवडला तुझा अनुभव.
चित्रे मस्तच आहेत. पण खरं तर कोणतीच चित्रे, नि कोणताही कॅमेरा या गडाला त्यांच्या कवेत घेऊच शकत नाहीत, इतका भव्य अनुभव आहे तो!

इतके 'पावसाळ्यातले अनुभव सिद्ध फिरणे असतांनाही' जेवणाची का आबाळ झाली? (म्हणजे पुर्‍या/पराठे लोणचे/मॅगीची पाकिटे असे साहित्य का नव्हते हाताशी!? - मॅगी कच्ची खाऊन पण दिवस आरामात काढता येतो!) असो, त्यावेळी खाल्लेले शेंगदाणे ही भलतेच चविष्ट असणार याची मला अनुभवसिद्ध खात्री आहे!

प्लॅनिंग करतांना, काळाला काही सूट देवू शकलात, (म्हणजे एक रात्र जास्तीची) तर या ट्रेक ला जून मजा येईल.

आता पुढील रतनगड मार्गे हरिश्चंद्र गड असा चार/पाच दिवसीय ट्रे़क करून पहा. रतन गडावर राहण्यालायक गुहा, स्वच्छ निर्मळ पाण्याची टाके आहेत... (वरच्या भोकात जाऊन बसणे व परत उतरणे पावसाळ्यात अत्यंत धोक्याचे आहे, मोह टाळाच!)
पण हिवाळ्या/उन्हाळ्यात कोणत्याही परिस्थितीत चुकवू नका!
(येथे ध्यानाचा अप्रतिम शब्दातीत असा अनुभव येतो!)

असा अवलीपणा केल्यानंतर या जगात परत कशासाठी यायचे असाच प्रश्न पडतो!!;
हा माझा अनुभव आहे! :)

असो,
पुढील ट्रेकसाठी शुभेच्छा!
असेच मोकळे फिरणे होवू दे नि असेच लेख वारंवार येवू दे!

आपला
अवली फिरस्ता
गुंडोपंत

रतनगड

रतनगडाच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडीतील अमृतेश्वराचे मंदिर पाहण्यासाठी तरी तिथे जायलाच हवे. :)

अमृतेश्वर मंदिर

अवांतरः रतनगड ते हरिश्चंद्रगड हा २ दिवसांचा ट्रेक आहे असे ऐकले आहे. चार ते पाच दिवस थोडे जास्त वाटतात का?

ते तुमच्यावर

रतनगड ते हरिश्चंद्रगड हा २ दिवसांचा ट्रेक आहे असे ऐकले आहे. चार ते पाच दिवस थोडे जास्त वाटतात का?

असु शकतील किती 'अवली बनायचे' हे तुमच्यावर आहे!
आम्ही आठवडाभरही आनंदाने करू!

बाकी रतनवाडीतील अमृतेश्वराचे मंदिर सुरेखच आहे. खुप थंडी वाजल्यावर एकदा या मंदिरातच राहिलो होतो रात्रीचे...

(येथेच फॉरेस्ट चे एक १०-१५ वर्ष जुने २ खोल्या असे बांधकाम केलेले काही तरी आहे. पण या १५ वर्ष जुन्या खोल्यांपेक्षा १५०० वर्ष जुने मंदीर जास्त भक्कम आधार देणारे वाटते हे नक्की!)

(या खोल्या पडल्या असे ऐकुन आहे आता. जाणकारांनी खुलासा करावा)

आपला
गुंडोपंत

ओझे!

अर्थातच
ओझे 'आजानुकर्ण' वाहणार हे ओघानेच आले! :)))))))))))

ह.घ्या!

आपला
गुंडो.

गड

छान आहे वर्णन.
फिरून आल्यासारखे वाटले.
पण अवघडच असणार हा गड.
आशा आहे सुरक्षेची योग्य ती खबरदारी आपण घेतली असेल.
फोटोज चांगले आहेत.
-निनाद

धाडसी

धाडसीच दिसताय आपण जरा!
चांगला लेख. खाण्याचे हाल झाले वाचून वाईट वाटले.

शिवानी

धन्यवाद

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!

-(आभारी) आजानुकर्ण

ट्रेकींगचा अट्टहास् का?

ट्रेकींगचा अट्टहास् का? तर् उत्तर् आहे सह्याद्रीच्या प्रेमासाठी आणि अंगातल्या मस्ती साठी :)
अफलातून अनुभव होता ना आनाजुकर्णा ??? होताच, वर्णन तर् छान् केलेसच पण नियमीत् ट्रेक करत असल्या मुळे काय् काय् घडले असेल ह्याची कल्पना आहे. कौतुक वाटते की पावसाळयात हा ट्रेक केलात त्याचे. मी स्वतः तर पावसाळ्यात कोकणातले ट्रेक टाळतोच त्यामूळे अवघड वाटेने केलेल्या चढाई बद्दल अभिनंदन.

सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"

सुरेख!

अतिशय प्रत्ययकारी वर्णन, वाचताना आजुबाजूचे भान हरवले. (तरी अंगठा आणि तर्जनी अल्ट-टॅब वर ठेवण्याची शुद्ध राहिली, सवयीने :)) छायाचित्रे पाहून गडाच्या भव्यतेची पुसटशी कल्पना आली विशेषतः 'उत्तुंग सह्यकडा' आणि 'नळीची वाट' ही छायाचित्रे आवडली.

बिकॉज इट् इज देअर

'हिमालय' (की आल्प्स?) चढणार्‍यांना हे आततायी धाडस का, कशासाठी तो डोंगर चढायचा असे विचारल्यावर 'बिकॉज इट् इज देअर' असे दिलेले उत्तर आठवले.
आनंददायी लेख. तुम्हा मंडळींना 'लिव्ह डेंजरसली' असेच सांगावेसे वाटते. पण दुसरीकडे तुम्ही लोक मूलभूत सुरक्षेकडे दुर्लक्ष तर करत नाही ना, अशी काळजी वाटते...
सन्जोप राव

आजानुकर्ण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आजानुकर्ण यांचा "नळीच्या मार्गे हरिश्चंद्रगड " हा एका थरारक धाडसाचा लेख वाचला. त्या निमित्ताने त्यांची मागची प्रवासवर्णने(नाणेघाट इ.)आणि इतर लेख वाचले.(तेवढा'टिकली'वरचा लेख वगळून).त्यांचा अनुभव फार मोठा आहे. या ऊर्जस्वल युवकाची शारीरिक,मानसिक तसेच बौद्धिक क्षमता किती अफाट आहे याची कल्पना येते. एवढे ओझे पाठीवर घेऊन दोरखंडाच्या सहाय्याने कडा चढायचा म्हणजे शारीरिक क्षमता हवीच.धोक्याचा संभव असताही या नळीच्या बिकट वाटेने जाण्याचे धाडस करण्यासाठी मोठी मानसिक क्षमता हवी. आणि हा सर्व अनुभव शब्दबद्ध करून इथे आकर्षक पद्धतीने सचित्र माडणे यासाठी उच्च दर्जाची बौद्धिक क्षमताही हवी. ती श्री.आजानुकर्णा यांच्यापाशी आहेच...जणुकाही सुंदर सुवाच्य हस्ताक्षरातच लिहिली आहे अशी दिसणारी त्यांची मनोगतावरील अनुदिनी(आजानुकर्णोक्ती) वाचली की त्यांच्या भाषाप्रभुत्वाची कल्पना येते.त्यांनी केलेले विडिओ,फडकता राष्ट्रध्वज इ पाहिए की त्यांच्या संगणक विषयक सखोल ज्ञानाची महती पटते.त्यांचे इथले सर्व लेख एकत्रित वाचता यावे म्हणून त्यांचे ई-पुस्तक करायला हवे.(तसेच ई-पुस्तक श्री. धनंजय यांच्या व्याकरणविषयक लेखांचेही व्हायला हवे.) यथाकाल ही पुस्तके सर्व वाचकांसाठी मुद्रित स्वरूपात उपलब्ध व्हायला हवी.

एकदम सहमत

यनावाला सरांसारखे भाषाप्रभूत्व आमचे नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणतो की एकदम सही बात आहे. मी म्हणतो जर का आपण "उपक्रम श्री (श्री. उपक्रम)" स्पर्धा / पोल (poll) घेतली तर योगेशराव, धनंजयराव इ. मंडळी हमखास जिंकतील.

काय म्हणता अशी चाचणी घ्यायची? :-)

अवांतर - आमच्या नात्यातले एक जेष्ठ भाषापंडीत (काशीकर नाव कदाचीत ऐकले असेल) एकदा चकटफू मिळालेल्या तिकीटावर एक प्रसीध्द वगनाट्य / तमाशा बघून आले व वर्णन करताना म्हणाले "नर्तीकेचा पदन्यास मोठा मोहक होता " वरील भाषा वाचून त्याची आठवण आली.

बापरे

हा स्तुतीपूर्ण प्रतिसाद वाचून लाजल्यासारखे होत आहे. पण यनावालांच्याच शब्दात सांगायचे तर हा प्रतिसाद वस्तुनिष्ठ नसून आत्मनिष्ठ आहे. ;)

अनुदिनीवरील फडकता झेंडा, व्हिडिओज, अनुदिनीचे स्वरूप दिसणारे टेम्प्लेट हे आंतरजालावर चकटफू मिळतात.
असलेला फुकटचा वेळ आणि कार्यालयाच्या सौजन्याने फुकटचेच इंटरनेट यामुळे हे करायला जमते. ;)

शिवाय धाडस व (प्रा. बिरुटे सरांचा) जिगरीबाज शब्द म्हणाल तर पुण्यात बाईक चालवण्यासाठी आवश्यक असलेले धैर्य गोळा करणे मला जमलेले नाही.

त्यामुळे या गर्दभाच्या केसात मोराचे पीस खुपसून त्याला कान्हा करण्याचा खटाटोप कशाला.

हा विनय नसून माझ्या तोकड्या क्षमतेची मला संपूर्ण जाणीव आहे याचे स्पष्टीकरण समजा. :)

मात्र अशा प्रतिसादांमुळे लेखन करण्यास हुरूप येतो हे खरेच. :)

मात्र धनंजयांबाबतची टिप्पणी वस्तुनिष्ठ व मार्मिक आहे हे सांगणे नलगे.

नव्हे

श्री अजानुकर्ण,
मला वाटते तुम्ही या प्रशंसेसाठी पात्र आहातच. मी तर म्हणेन असे लेख मुलांच्या पाठ्यपुस्तकात हाटकुन टाकयला हवेत जेणेकरुन त्यांच्यातल्या सुद्धा अशा जीवनाला परिपूर्ण करणाया वेगवेगळ्या छंदांची जोपासना होईल.

तुमच्या या लेखाने मी तर ठरवले आहे की जी एस यांच्या प्रमाणे तुमच्या सोबत सुद्धा ट्रेकिंगला नक्की जायचेच. बाहू फुरफुरल्यागत वाटते आहे तुमच्या या लेखाने!

अप्रतिम

अनुभव मस्तच्.... तसाच थरारकही.
हरिश्चंद्रगडावर कितीही वेळा गेले तरी समाधान होत नाही.

तारा

ट्रे़किंगचे प्रशिक्षण कुठे मिळते?

अजानुकर्ण तुमचा हा लेख धाडसी प्रवास वर्णनाचा उत्तम नमुना आहे. अंगातील मस्ती अश्या रितीने उधळायची हौस मला देखिल आहे पण मला ट्रेकींगचा जरा देखिल अनुभव नाही. नाही म्हणायला लहाणपणी नवि-मुंबईतील गवळीदेव व खारघरच्या डोंगरावर बरीच चढउतर केली आहे. पण या विषयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मात्र घेतले नाही. हे प्रशि़क्षण कुठे घ्यावे या बाबत जरा मार्गदर्शन करावे ही विनंती.

आपला,

नितिन दिवेकर

सोप् आहे

"पण या विषयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मात्र घेतले नाही. हे प्रशि़क्षण कुठे घ्यावे या बाबत जरा मार्गदर्शन करावे ही विनंती."

अरुन् सावंत् सरांसरख्या ट्रेकर्स् बरोबर् ट्रेक् करा, किंवा सोपे ट्रेक् एकात्याने करुनहि सवय् होते.. फार् बावू करु नये...

बाकि हरिश्चण्द्राबद्द्ल् काय् लिहिने? अतिशय् पवित्र, गुढ् शक्तिने भारलेले ठीकाण्..

नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड

लै भारी, नळीच्या वाटेनं हरिश्चंद्रगड करणं आणि ते हि पावसाळ्यात - ह्ये जिगरबाज धाडस कडक मंडळीच करु शकतात. मानलं तुम्हाला. आम्ही एकदा रतनगड ते हरिश्चंद्रगड ( १९८८ साली ) आणि दुसर्यांदा (ऑगस्ट २००७ ) हरिश्चंद्रगड पाचनई मार्गे केला, त्यावेळी आम्हाला इंद्रवज्र (गोल इंद्रधनुष्य ) दिसलं.

रोमान्चक ट्रेक

अश्या प्रकारच्या ट्रेक ला जाण्याची माझी फार ईच्छा आहे, त्यासाटी कोणाला भेटावे.
कल्याण खराडे

असे ट्रेक आयोजित करणारे

ट्रेक क्षितिज, धुमकेतू ट्रेकर्स, ट्रेकडी वगैरे व्यावसायिक, अर्धव्यावसायिक मंडळी अशा अवघड ट्रेकचे आयोजन करत असतात. त्यांच्याशी संपर्क साधला तर ट्रेकविषयी अधिक माहिती कळेल.

trekshitiz.com
trekdi.com
dhumketutrekkers.com


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फारच

सुंदर वर्णन!

एवढी वर्ष महाराष्ट्रात राहून अशी अनेक गिर्यारोहणे करायची राहून गेलीयेत ही खंत परत एकदा सलली मनाला...

 
^ वर