पुरंदर

पुरंदर. पुरंदर म्हटलं की आठवतो मुरारबाजी, पुरंदरचा तह आणि संभाजीराजांचा जन्म. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचं पाणी पळवणार्‍या मुरारबाजीचा गड पुरंदर. वज्रगड पडल्यावर कशी आणि कुठे लढाई झाली असावी. "अरे तुझा कौल घेतो की काय?" असं म्हणत दिलेरखानावर चाल करून गेलेला मुरारबाजी कसा दिसतो हे बघायचं होतं. पुरंदरला जायचं म्हणून शनिवारी सकाळी पाच जणांनी स्वारगेटला भेटायचे ठरले. सकाळी फोनाफोनी करून सगळ्यांनी एकमेकांना उठवले. अमितचा निरोप आला की आम्ही १० मिनिटात येतोय. खरंतर अमित एकटाच येणार होता पण ऐनवेळी सलिलही पुरंदरला यायचं म्हणून उत्साहाने सकाळी उठून आला होता. अगदी शेवटच्या क्षणी एखादा सवंगडी गळाला तर जितकं दु:ख होतं त्याहीपेक्षा जास्त आनंद ऐनवेळी कोणी मिळाला तर होतो. असं क्वचित होतं पण ट्रेकला जायला हुरुप येतो. आम्ही सहाजण सात वाजता म्हणजे समिराज, ओंकार, अमित, सलिल आणि सुदर्शन (अर्रेच्या मी राहिलो की) सासवडला जाणार्‍या गाडीत बसलो. स्वारगेटहून पुरंदरला जायला कापूरहोळमार्गे पुणे-बेंगलोर महामार्गानेही जाता येतं. पुरंदर सासवड आणि कापूरहोळला जोडणार्‍या रस्त्यावर आहे.

सासवडला जाताना दिवे घाट लागतो. हा रस्ता म्हणजे माऊलींच्या पालखीची वाट. मध्येच एका वळणावर खाली मस्तानी तलाव दिसतो. पावसाच्या शिडकाव्याने हिरवेगार झालेले डोंगर, वळणावळणाचा प्रशस्त रस्ता, मस्तानी तलाव आणि बाजूच्या शेतात तरारून वर आलेली पिके यामुळे प्रवास रमणीय झाला. सासवडला उतरून भोर गाडी पकडली आणि नारायणपूरला उतरलो. नारायणपूरला दत्ताचं आणि नारायणेश्वराचं मंदीर आहे. नारायणेश्वराचं मंदीर सुमारे १०००-१२०० वर्षापूर्वीचं आहे. नारायणेश्वराचं दर्शन घेऊन बाजूलाच एका हॉटेलमध्ये दणकट नाष्टा केला. मिसळ झटकेबाज होती हे वेगळं सांगायला नकोच. नारायणेश्वर मंदीराच्या जवळून जाणारी वाट पुरंदर-वज्रगडकडे जाते. डांबरी रस्त्याने थोडं चाललं की आपण पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात येतो. इथून एक गाडीवाट तुम्हाला अनेक वळणे घेत थेट मुरारबाजींच्या पुतळ्याजवळ घेऊन जाते. पण ही आमची वाट नव्हती. सोप्या वाटेने जायचं नाही हा गुणधर्म प्रत्येकाच्या अंगी होता.

किल्ल्याची चढण बर्‍यापैकी दमछाक करणारी आहे. पण निसर्गराजाने साथ दिल्याने पूर्णवेळ आकाश अभ्राच्छादित राहिलं. नऊ वाजता सुरुवात करून मध्ये थोडी विश्रांती घेत, एकमेकांना चिडवत खिदळत ११-११.३० वाजता बिनी दरवाज्यात पोहोचलो. दरवाजावरून वळणे घेत येणारी गाडीवाट सुंदर दिसते. मागे एक जुना चर्चदेखिल आहे. बिनी दरवाजातून उजवीकडे आलं की रणझुंजार किल्लेदार मुरारबाजींचा आवेशपूर्ण पुतळा आहे. समोर आलेल्या गनीमाची पाचावर धारण बसली असणार हे नक्की. पुतळ्यासमोर उभं राहिलं तर उजवीकडची वाट वर बालेकिल्ल्याकडे जाते आणि दुसरी वज्रगडाकडे. खालून येणारी गाडीवाट पुतळ्याकडे येऊन वज्रगडाला जाणार्‍या वाटेला मिळते. पुतळ्याचे रौद्ररूप डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो.

आम्ही बालेकिल्ला आणि वज्रगडाकडे जाण्याऐवजी पुतळ्यासमोरच्या गाडीवाटेने पुरंदरमाचीकडे आलो. माची वरून बालेकिल्ल्यावर जायला दुसरी वाट शोधावी(मघाचाच गुणधर्म) म्हणून पद्मावती तळ्याच्या वरच्या दिशेने चढायला सुरुवात केली. पण काही वेळातच सरळ उभा कडा समोर आला. अपने बस की बात नही म्हणून परत मुरारबाजींच्या पुतळ्याकडे आलो. उजवीकडच्या वाटेने बालेकिल्ल्याच्या दिशेने चढायला सुरुवात केली. अधूनमधून पावसाचा मारा होत होता पण शिणवटा पळून जात होता. पुरंदरचा बालेकिल्ला राजगडच्या बालेकिल्ल्यापेक्षा कमी उंचीवर आहे आणि चढणही सोपी आहे. चढण संपली की दिल्ली दरवाजा आहे. दिल्ली दरवाजातून वर आलं की अजून एक दरवाजा आहे. दरवाजाच्या भिंतीवर रंगाने कल्याण दरवाजा असं लिहीलं आहे पण पूर्वेकडे तोंड करून असल्याने थोडा अविश्वास नक्कीच वाटला आणि पोट्ट्यांनी वादही घातला.

कल्याण दरवाजासमोर खंदकडा आहे. खंदकड्याच्या अगदी टोकावरून वज्रगड, पुरंदर-वज्रगड मधली भैरवखिंड, काही बंगले, राजाळ तळे असे विहंगम दृष्य दिसते. खंदकड्यावर काही झाडीत झाकल्या गेलेल्या विहीरी आहेत. खंदकड्याच्या टोकावर बुरुज आहे. तिथे थोडावेळ विश्रांती घेऊन पोटपूजा करून कल्याण दरवाजाकडे आलो. कल्याण दरवाजातून आत येऊन थोडं पुढं आलं की राजगादी टेकडी आहे. येथे संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. मोठ्या उत्साहाने टेकडी वर चढून गेलो पण वरती एका बाजूला भक्कम तटबंदीखेरीज काहीच बांधकाम शिल्लक नव्हतं. मराठा साम्राज्याच्या दुसर्‍या छत्रपतीच्या जन्मस्थान नैसर्गिकदृष्ट्या नष्ट झालं असलं तरी सरकार आणि पुरातत्त्वविभागाने तिथे एक पुतळा तरी स्थानापन्न करायला हवा. टेहाळणीसाठी तटबंदीत बनवलेली इंग्रजी झेड आकाराची खिडकी अप्रतिम होती.

राजगादीवरून खाली येऊन तसंच पुढं गेलं की केदार टेकडी आहे. त्यावर केदारेश्वराचं पुरातन मंदीर आहे. राजगादी टेकडीवरून केदारेश्वराचं दर्शन घेणारी शिवराय आणि शंभूची जोडी क्षणभर डोळ्यासमोर तरळून गेली. केदार टेकडीवर फक्त केदारेश्वर मंदीर आहे जणू त्या मंदीरासाठीच ती टेकडी तिथे आहे. मंदिर तसं लहान आहे पण रेखीव आहे. समोर नंदी आणि एक दीपमाळ आहे. महाशिवरात्रीला येथे भाविकांचा पूर येतो. मंदिरात दुसरे चार जण आधीच झोपले होते म्हणून आम्ही बाहेरच थांबलो. वरूणराजाने काही वेळासाठी आमची रजा घेतली. आणि मंदिराच्या दगडी व्हरांड्यात आम्ही पहुडलो. दोन वाजले होते. सर्वांनी मस्त तासभर डुलकी कसली झोपच काढली. जगात सर्वात सुंदर काय असेल तर निसर्ग. पाय निघत नव्हता पण परत तर जायचंच होतं जीवनाच्या रहाटगाडग्याला जुंपून घेण्यासाठी. केदारटेकडीच्या मागे कोकण्या बुरुज आहे आणि टेकडीच्या बाजूने गेलं की केदार दरवाजा आहे. पुढे प्रचंड मोठी सपाट माची आहे.

बालेकिल्ला उतरून आम्ही वज्रगड आणि पुरंदरच्या मध्ये असलेल्या भैरवखिंडीत आलो. येथे एन. सी. सी. चे काही बंगले आहेत. किल्ला पूर्वी मिलिटरीच्या अखत्यारीत असल्याने वर बरीच बांधकामे आहेत. पण बहुतेक रसिक माणसाने बांधली असल्याने किल्ल्याची शोभा घालवत नाहीत. येथे संभाजीराजांचा पुतळा आहे. धर्मवीराला वंदन करून राजाळ तळ्याकडून आम्ही पुरंदरेश्वर मंदीरात आलो. थोरल्या बाजीरावाने या मंदीराचा जीर्णोद्धार केला होता. मंदीरामागे पेशव्यांच्या वाड्यांचे अवशेष आहेत. पुरंदरेश्वर मंदीरासमोर एक उपहारगृह आहे तिथे चहा-बिस्किटे खाऊन आम्ही तडक उतरणीला लागलो. किल्ल्यावरून खाली आलो आणि इतका वेळ गुडुप झालेला पाऊस तुफान कोसळला. सायंकाळी सहा वाजता परत नारायणेश्वर मंदिरात आलो.

किल्ल्यावर ऐसपैस माच्या आहेत. बालेकिल्लाही मोकळा आणि मोठा आहे. बचावासाठी भक्कम सरळसोट कडे आहेत. पुणे, भोर, सासवड पट्टयावर नजर ठेवता येईल अशी मोक्याची जागा त्यामुळेच हा किल्ला मराठी इतिहासात बर्‍याच महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार झाला आहे. किल्ल्याबद्दल अधिक माहिती येथे उपलब्ध आहे. इतिहासासंबंधित माहिती प्रियाली आणि इतर माननीय सभासदगण देतीलच. :-)

पुरंदर किल्ल्यावरील प्रकाशचित्रांचा स्लाईडशो खरडवहीत आहे.

अभिजित...

Comments

प्रवासवर्णन

आवडलं. यात फेरफार करून विकिवर चढवताही येईल. चित्रे मस्तच आहेत. दोन्ही हातात तलवारी घेऊन लढणारा मुरारबाजी विशेष.

इतिहासासंबंधित माहिती प्रियाली आणि इतर माननीय सभासदगण देतीलच. :-)

:)) इथे सपशेल शरणागती. मला फारसं आठवत नाही म्हणून तर तुम्हाला लेख टाका असं सुचवत असते. असो.

ट्रेक क्षितिजच्या दुव्याबद्दल धन्यवाद परंतु तो स्पष्ट दिसत नाही. चौकोन चौकोन दिसतात त्याबाबत काही काही करता येईल का? काही प्रश्न पडले ते हा दुवा वाचून सोडवता येतील का ते पाहात होते पण वाचणे थोडे कठिण होते आहे. इतरांनाही असेच दिसते का?

सुंदर..

अभिजिता,

सुंदर लिहिलं आहेस रे.. वाचून आनंद वाटला..

किल्ले पुरंदराला आणि थोरल्या आबासाहेबांना प्रणाम..

तात्या.

हेच

म्ह्मणतो.

सुंदर नकाशा

मूळ वाटा सोडून इकडे तिकडे भटकताना हा नकाशा उपयोगी पडला. कंटूर पद्धतीने काढल्यामुळे दोन् ठिकाणांच्या उंचीतील फरक समजतोय.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

मस्तानी तलाव

मस्तानी तलावाबद्दल शोधत होते. हा लेख वाचायला मिळाला.

लेख आणि छायाचित्रे

लेख आणि छायाचित्रे
एकदम अप्रतीम! अजूनही (जो पर्यंत तेथे जात नाही तो पर्यंत) वाचायला/पहायला आवडेल. वाट बघतोय..

वा!

लेखातील वर्णन, छायाचित्रे आणि नकाशे (किल्ल्याचा आणि दिवेघाटाचा) सुरेख. पायथ्याचं गाव सोनुरी आहे का? [अल्याड सोनुरी, पल्याड जेजुरी मधून वाहते कर्‍हा, या वर्णनावरून आठवलं. :)]

सोनोरी

सोनोरी गाव नेमकं कुठे आहे हे शोधायचा मी ही प्रयत्न केला तेव्हा हे भेटलं . मल्हारगडाच्या पायथ्याला सोनोरी गाव आहे.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

झकास!

"मिसळ झटकेबाज होती हे वेगळं सांगायला नकोच. "
यामुळे लेख वाचायला रसा-पुर्ण वाटला!

छान लेखन. अजून येवू देत. लेखमाला केली तर कसे राहील?

आपला
किल्लोपंत

~याचे मी समर्थन करतो~
"शुद्धीचिकित्सक वापरणे हे आम्ही आमच्या 'शान के खिलाफ' समजतो! भेंडी, काय शुद्ध अन् काय अशुद्ध हे आम्हाला सांगणारा शुद्धीचिकित्सक कोण लागून गेला आहे?:) इतरांनी बनवलेल्या शुद्धलेखनाच्या नियमांना आम्ही जुमानत नाही..."

लेखमाला

आत्तापर्यंत ज्या किल्ल्यांवर जाऊन आलोय त्यावर लेख लिहिण्याचा मनोदय आहे.

मिसळीने पोटपण भरतं आणि जिभेचे चोचलेही पुरवले जातात. मटकीच्या कडक रश्याने तोंडात जाळ निघाला होता. जय मिसळ.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

भटक्या माणसाला

मिसळीने पोटपण भरतं आणि जिभेचे चोचलेही पुरवले जातात. मटकीच्या कडक रश्याने तोंडात जाळ निघाला होता. हो रे! पाणीच सुटलय तोंडाला आता...
मस्त लाल पातळ असा रस्सा नि ते पाव!
समोर दिसणारा गड. यष्टी इतक्यातच गेल्याने जाणवणारा एक संथ शांतपणा... वा! क्या बात है!

भटक्या माणसाला मिसळ ना आवडली तरच नवल!

इतके मस्त वर्णन केले आहे की, मिस्सळ खाऊन गडावर जाऊन आल्यासारखेच वाटले!

जय मिसळ पाव!

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

लयी भारी पर याची काय गरज

पुरंदर त्याबरुबर स्लाइड शो लयी भारी पर म्ह्या म्हणतो अशा लेखनामधी खाली जे लिव्हेल हाये त्याची का गरज.लयी जीवावर आलं बॉ वाचाचं !

पुरंदरला जायचं म्हणून शनिवारी सकाळी पाच जणांनी स्वारगेटला भेटायचे ठरले. सकाळी फोनाफोनी करून सगळ्यांनी एकमेकांना उठवले. अमितचा निरोप आला की आम्ही १० मिनिटात येतोय. खरंतर अमित एकटाच येणार होता पण ऐनवेळी सलिलही पुरंदरला यायचं म्हणून उत्साहाने सकाळी उठून आला होता. अगदी शेवटच्या क्षणी एखादा सवंगडी गळाला तर जितकं दु:ख होतं त्याहीपेक्षा जास्त आनंद ऐनवेळी कोणी मिळाला तर होतो. असं क्वचित होतं पण ट्रेकला जायला हुरुप येतो. आम्ही सहाजण सात वाजता म्हणजे समिराज, ओंकार, अमित, सलिल आणि सुदर्शन (अर्रेच्या मी राहिलो की) सासवडला जाणार्‍या गाडीत बसलो. स्वारगेटहून पुरंदरला जायला कापूरहोळमार्गे पुणे-बेंगलोर महामार्गानेही जाता येतं.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)

बाबूराव

बरोबर

मान्य आहे बाबूराव..

आपला रसभंग झाला म्हणून खेद वाटतो. खरंतर ब्लॉग आणि उपक्रम यावर टाकण्यासाठी हा लेख लिहीत होतो. निव्वळ माहितीपूर्ण लिहिणं अजून तितकसं जमत नाही. :-)संपादन सुविधा नसल्यामुळे आता मला काही बदल करता येईल असं वाटत नाही.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही. हे तर अचूक आहे.

मस्त

लेख आणि चित्रे दोन्ही मस्त. उपक्रमींमध्ये गड सर करणारे खंदे मावळे आहेत याचा आनंद झाला.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

अनेक मावळे आहेत

आपले आजानुकर्ण पटाईत आहेत.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

सहमत

सहमत आहे. शिवाय आजानुकर्णांची गडांची चित्रेही एकदम भन्नाट असतात.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हम्म

वासरांत लंगडी गाय शहाणी!

छान

ट्रेकींग हा माझा छंद आहेच पण आपल्या सारख्याच भट्क्यांना भेटून फार आनंद होतो, वर्णन छान आहे.

सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"

रायगड

सुमीत तुमच्या रायगडावरच्या लेखाची वाट पहातोय. मागे तुम्ही लिहिणार होतात.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

 
^ वर