मराठी भाषेतील नकारात्मक वाक्यरचनेतील क्रियापदे

मराठीमध्ये नकारात्मक वाक्यांत क्रियापदांची रूपे सकारात्मक वाक्यांपेक्षा वेगळी दिसतात. सकारात्मक वाक्यांतील क्रियापदांच्या रूपाबद्दल पूर्वपीठिका मांडून मी येथे नकारात्मक स्थितीबद्दल माझ्या प्रस्तावाचे विवेचन करणार आहे.

शाळेत मराठी भाषेचे व्याकरण इंग्रजीला अंधानुकरणाने समांतर शिकवले जाते. माझे शिक्षण गोवा बोर्ड, मराठी तृतीय भाषा, मराठीची शेवटली यत्ता ८वी असे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमिक शाळांची ही घोर आणि अन्याय्य नालस्ती झाली असू शकेल. पण मराठी माध्यमात शिकलेल्या लोकांकडून "वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषण", "चालू भविष्यकाळ", वगैरे, घनघोर आणि मराठीला गैरलागू शाब्दिक कोलांट्या मी ऐकल्या आहेत. हे प्रकार महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकांतून आले असावेत अशी माझी कल्पना आहे.

पाठ्यपुस्तक मंडळांच्या डोळ्यांना दिसले नसले तरी गेल्या दीड-दोनशे वर्षांत मराठीचे व्याकरण शास्त्रशुद्ध मराठी दृष्टिकोणातून सांगणारे विद्वान उपजलेच.

त्यांनी उत्तम रीतीने वर्णन केलेली सकारात्मक क्रियापदांची रूपे परब [१] यांच्या "मराठी व्याकरणाचा अभ्यास" मधून येथे देत आहे:

मराठीत क्रियापदाची कोणकोणती रूपे होतात, असा विचार करता "काळ" आणि कालवाचक कल्पना फारशा उपयोगी पडत नाहीत. गुंजीकर, दामले, राजवाडे, अर्जुनवाडकर, आचार्य आणि दीक्षितांनी (सर्व संदर्भ [१] मध्ये दिले आहेत) उत्तरोत्तर फेरफार करून मान्यता मिळवलेली व्यवस्था अशी :

क्रियापदाच्या प्रत्ययसंचांना "आख्यात" म्हणतात. काळ/अर्थ, लिंग, वचन आणि पुरुष हे आख्यातरूपाचे धर्म आहेत. (टीप : यात पुरुष हा एकच धर्म क्रियापदासाठी "आख्यात"रूपांत खास दिसतो. बाकी सर्व धर्म अन्य प्रकारच्या शब्दरूपांत कधीकधी दिसतात. पुरुष म्हणजे काय? मी/आम्ही, तू/तुम्ही, तोतीते/तेत्याती, म्हणजे बोलणारी, ऐकणारी, अन्य व्यक्ती यांच्या अधिकाराने शब्दाचे रूप बदलणे, [माझे मत असे की] अशा परिस्थितीत कधीच न बदलणारे रूप म्हणजे "आख्यात" नव्हेच - धनंजय)

क्र. आख्यातवर्ग | अर्थ | उदाहरणे (अकर्मक आणि सकर्मक)
१. प्रथम त-आख्यात | वर्तमानकाळ | तो जातो, तू पोळ्या करतेस
२. द्वितीय त-आख्यात | संकेतार्थ | जर तो जाता ..., जर तू पोळ्या करतीस... (? जाणकारांनी उदाहरण चुकल्यास दुरुस्ती सांगावी)
३. ल-आख्यात | भूतकाळ | तो गेला, तू पोळ्या केल्या(स)
४. व-आख्यात | विध्यर्थ | त्याने जावे, तू पोळ्या कराव्या(स)
५. ई-आख्यात | रीतिभूतकाळ | तो जाई, तू पोळ्या करे
६. ऊ-आख्यात | आज्ञार्थ | तो जावो, तू पोळ्या करोस (? जाणकारांनी उदाहरण चुकल्यास दुरुस्ती सांगावी)
७. ईल-आख्यात | भविष्यकाळ | तो जाईल, तू पोळ्या करशील
८. च-आख्यात | रीतिभूत/विध्यर्थ | तो जायचा/त्याने जायचे, तू पोळ्या करायचीस/तू पोळ्या करायच्या(स)

(माझ्या मते वरील सूचीमध्ये आज्ञार्थ म्हणून एक अर्धवट [फक्त द्वितीयपुरुषी रूपे असलेले] आख्यात जोडायचे राहिले - तू जा/पोळ्या कर, तुम्ही जा(वा)/पोळ्या करा : पुढे मी या "आ-आख्याताचा" उल्लेख करीन.)
टीप : वरील सूचीमध्ये "तू पोळ्या केल्या(स)" वगैरे, यातील (स) हा वैकल्पिक आहे, याला कर्ता-कर्म आणि कर्ता-भावे संकर प्रयोग म्हणतात. या लेखासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल.

येथपासून पुढे माझा प्रस्ताव
आता येथे या सर्व उदाहरणांची नकारात्मक वाक्ये बघू.
१. प्रथम त-आख्यात | वर्तमानकाळ | तो जातो, तू पोळ्या करतेस
तो जात नाही, तू पोळ्या करत नाहीस
'करत' रूप पुरुषाप्रमाणे बदलले नाही, ते आख्यात नसून कृदंत आहे. "नाही/नाहीस/नाहीत" हे येथे आख्यातरूप मानले पाहिजे. म्हणजे या आख्याताला नकारात्मक वाक्यात वापरता येत नाही.
टीप : "कावळा बसतो न बसतो तर फांदी तुटते." येथे "न बसतो" हे नकारात्मक नसून "बसतो न बसतो" हा "बसताक्षणी" या अर्थी वाक्प्रचार आहे.

२. द्वितीय त-आख्यात | संकेतार्थ | जर तो जाता ..., जर तू पोळ्या करतीस... (?)
जर तू न/नाही जाता..., जर तू पोळ्या न/नाही करतीस
हे आख्यात नकाराला जुमानते. पण हे आख्यात आधुनिक मराठीत, कमीत कमी माझ्या मर्यादित ऐकिवात फारसे नाही. जाणकारांनी चूक असल्यास सुधारावी.

३. ल-आख्यात | भूतकाळ | तो गेला, तू पोळ्या केल्या(स)
तो नाही गेला, तू पोळ्या नाही केल्या(स)
हे आख्यात नकाराला जुमानते.
टीप : काही विशिष्ट संदर्भांत मात्र नकारात्मक रूप अर्थ साधायचा असेल तर ते वेगळे करावे लागते. पाय मोज्यात गेला/गेले; पाय मोज्यात जाईना/जाईनात.'जाई' रूप पुरुषाप्रमाणे बदलले नाही, ते आख्यात नसून कृदंत आहे. "ना/नात" ही या वाक्यांतली आख्याते आहेत, ती "जाई" शब्दाला जोडून लिहिण्याची प्रथा महत्त्वाची नाही.

४. व-आख्यात | विध्यर्थ | त्याने जावे, तू पोळ्या कराव्या(स)
त्याने न/नाही जावे, त्याने जाऊ नये
तू पोळ्या न/नाही कराव्या(स), तू पोळ्या करू नयेत
यांपैकी पहिला पर्याय ग्रांथिक वाटतो, म्हणजे ग्रांथिक बोलीत हे आख्यात नकाराला जुमानते. सामान्य बोलीत मात्र या आख्याताला नकारात्मक वाक्यात वापरता येत नाही. 'करू' रूप पुरुषाप्रमाणे बदलले नाही, ते आख्यात नसून कृदंत आहे. "नये/नयेत" ही या वाक्यांतली आख्याते आहेत.

५. ई-आख्यात | रीतिभूतकाळ | तो जाई, तू पोळ्या करे
तो जात नसे, तू पोळ्या करत नसे
या आख्याताला या अर्थात नकारात्मक वाक्यात वापरता येत नाही. 'करत' रूप पुरुषाप्रमाणे बदलले नाही, ते आख्यात नसून कृदंत आहे. "नसे/नसू/नसत" ही या वाक्यांतली आख्याते आहेत.

६. ऊ-आख्यात | आज्ञार्थ | तो जावो, तू पोळ्या करोस (?)
तो न/नाही जावो, तू पोळ्या न करोस. (? जाणकारांनी उदाहरण चुकल्यास दुरुस्ती सांगावी)
हे आख्यात नकाराला जुमानते.

७. ईल-आख्यात | भविष्यकाळ | तो जाईल, तू पोळ्या करशील
तो नाही जाईल, तो जाणार नाही
तू पोळ्या नाही करशील, तू पोळ्या करणार नाहीस
यांपैकी पहिला पर्याय सामान्य बोलीत वापरला जातो, पण त्यामानाने कमी, म्हणजे अजून तरी हे आख्यात नकाराला जुमानते. तरी बोलीच्या प्रवाहाची वाटचाल अशीच चालू राहिली तर सामान्य बोलीत मात्र या आख्याताला नकारात्मक वाक्यात वापरता येणार नाही. 'करणार' रूप पुरुषाप्रमाणे बदलले नाही, ते आख्यात नसून कृदंत आहे. "नाही/नाहीस" ही या वाक्यांतली आख्याते आहेत.

८. च-आख्यात | रीतिभूत/विध्यर्थ | तो जायचा/त्याने जायचे, तू पोळ्या करायचीस/तू पोळ्या करायच्या(स)
तो नाही जायचा/त्याने नाही जायचे, तू पोळ्या नाही करायचीस/तू पोळ्या नाही करायच्या(स)

९. "आ-आख्यात" | द्वितीय पुरुषी आज्ञार्थ | तू जा/पोळ्या कर, तुम्ही जा(वा)/पोळ्या करा
तू जाऊ नकोस/पोळ्या करू नकोस, तुम्ही जाऊ नका/पोळ्या करू नका.
'करू' रूप पुरुषाप्रमाणे बदलले नाही, ते आख्यात नसून कृदंत आहे. "नको/नकोस" हे येथे आख्यातरूप मानले पाहिजे.

काही काही क्रियापदरूपे नकाराला न जुमानणे हा प्रकार अन्य भाषांतही दिसतो. संस्कृतात त्याची झलक दिसते.
कुरु/मा कार्षी: (म्हणजे) कर/करू नकोस
इंग्रजीत तर खूपच -
goes/does not go; went/did not go
अरबी भाषेत हा प्रकार फार दिसतो की अर्थ जमवायचा असेल तर एका आख्याताचे नकारात्मक रूप दुसर्‍याच आख्यातात करावे लागते.
कतब/ला यक्तुब् (वाचले/नाही वाचले) जाणकारांनी चूक असल्यास दुरुस्त करावी.

म्हणजे मराठीत न-असणे (न-अस्/आह् धातू) याची वेगळी अपूर्ण रूपावली मानणे जरुरीचे ठरेल. ही अस्/आह् धातूच्या रूपांशी थोडीफार समांतर आहे.
नाही, नये, नको, वगैरे याची रूपे एका तक्त्यात देता येतील.
टीप : "नये" ची पुरातन व्युत्पत्ती "न येणे" पासून आहे, या गोष्टीचे आधुनिक मराठी व्याकरणाशी काही कर्तव्य नाही.
टीप : "नसणे" (धातू नस्) हा वेगळा प्रकार आहे. त्याची सर्व आख्यातांत पूर्ण रूपे सापडतात. अस् (पण आह् नव्हे)
टिप : नकारात्मक वाक्यात विशिष्ट परिस्थितीत वापरला जाणारा ल्-य्-स् हा मर्यादित धातू अरबी भाषेत दिसतो. येथे भलत्याच भाषेचा दाखला प्रमाण म्हणून देत नाही - माझी कल्पनाशक्ती अचाट नाही, काही प्रमाणात गतानुगतिकच आहे हे सांगायचे आहे.

संदर्भ :
[१] परब, प्रकाश, मराठी व्याकरणाचा अभ्यास (२००२) : ओरिएंट लाँगमन, मुंबई.

लेखनविषय: दुवे:

Comments

पोळ्या आणि स्त्रीमुक्ती

खूप प्रयत्न करून सुद्धा मला चांगल्या पोळ्या करायला जमत नाही. वरील उदाहरणांत "तू" या स्त्रीला सर्व प्रकारे पोळ्या करायला लावल्या आहेत, ते त्या "तू"चे हेवायुक्त कौतूक मानावे, स्त्रीमुक्तीच्या कल्पनेला माझा विरोध आहे असे मानू नये! जेवल्यानंतर मी खरकटी काढीन, भांडी धुईन!

"तो जातो/गेला/जावो" वगैरे उदाहरणे परब यांनी दिली आहेत.
माझ्या उदाहरणातील "तू" मुद्दामून द्वितीय'पुरुषी' एकवचनी स्त्री घेतली, आणि पोळ्या या मुद्दामून तृतीय'पुरुषी' अनेकवचनी स्त्रीलिंगी घेतल्या, ज्यायोगे बदलते आख्यातरूप उदाहरणात स्पष्ट दिसावे.

द्वितीय'पुरुषा'ला वाटेल तेव्हा स्त्री बनायला लावणारे मराठी व्याकरण स्त्रीमुक्तीच्या बाबतीत पूर्वीच्या काळापासून कितीतरी पुढारलेले होते, असे मानावे!

धनंजय

हा हा हा!

सुंदर प्रतिसाद! तुमच्या विनोदबुद्धीची दाद द्यावी लागेल.
आपला
(कौतुकमिश्रित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

नकारात्मक क्रियापदे :)

संस्कृतात क्रियापदाला 'आख्यात'म्हणतात,लिंग,वचन व विभक्ती यामुळे नामाच्या रुपात जसा बदल होतो तसाच लिंग,वचन,व पुरुष यामुळे क्रियापदाच्या रुपातही बदल होतो उदा.बसतो(पुल्लिंग),बसते(स्त्रीलिंग),बसतात(अनेकवचन),बसतोस(द्बि.पुरुष)बसतात(अनेकवचन)धातूला प्रत्यय लागून क्रियापदांची रुपे बनतात हे तर सर्वश्रूत आहे.

प्रथम त,द्बितीय त,ल,व,ई,ऊ,इल,च, वगैरे प्रत्यय लागून विविध काळ व अर्थ यांची रुपे तयार होतात आणि त्यांना आख्यातप्रत्यय म्हणतात.आता आमचा प्रश्न हा आहे की, नकारात्मक वाक्य असू शकतात.पण नकारात्मक क्रियापदे आली कुठुन ? हे आम्हाला नक्की माहित नाही कृपया नकारात्मक वाक्य रचनेतील क्रियापदांवर अधिक खुलासा झाला पाहिजे.आणि ते कोणत्या भाषेच्या व्याकरणात आहे
जमल्यास त्यावर अधिक विवेचन झाले पाहिजे.किंवा आमचे म्हणने चूकीचे असेल तर आम्हाला हा विषय समजला नाही,असे म्हणून सोडून द्यावे !

अवातंर ;) आमचा अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून कोणीही आम्हाला ऑर्कूट वर फ्रेंड रिक्वेष्ट पाठवू नये,अनोळखी लोकांशी मैत्री करण्यास आम्ही घाबरत आहोत.मात्र महिला आणि मुलींनी फ्रेंड रिक्वेष्टपाठवायला हरकत नाही,त्यावर सहानूभुतीपूर्वक विचार केला जाईल.;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नकारात्मक क्रियापदे

प्रश्न नीट समजला नाही.

नकारात्मक क्रियापदे संस्कृतात नाहीत. त्या भाषेत कुठल्याही सकारात्मक वाक्याला "न" हे अव्यय जोडले की नकारात्मक वाक्य तयार होते. "मा" अव्यय जोडले तर काही विशिष्ट क्रियापदरूपे चालू शकत नाही. चालतात ती थोडीच. (अवांतर : संस्कृतात आख्यात-क्रियापदे केवळ पुरुष आणि वचनानुसार बदलतात, लिंगाप्रमाणे नव्हे. पण संस्कृताचे व्याकरण तिथेच ठीक आहे.)

मराठीतील काही आख्याते लिंगाबरोबर बदलतात हे तुमचे म्हणणे तंतोतंत बरोबर आहे. लेख मराठी भाषेच्या व्याकरणासंबंधीच आहे, दुसर्‍या भाषेचे दाखले उपमानस्वरूप दिलेले आहेत, प्रत्यक्ष प्रमाणे मराठीतलीच आहेत.

लेखात मराठी उदाहरणांसह हे दाखवले आहे की मराठीत अनेक क्रियापद-रूपे "न/नाही" शब्दांबरोबर वापरता येत नाही (कुठल्याच बोलीत नाही). अशी क्रियापद-रूपे वापरलेल्या सकारात्मक वाक्यांतील तथ्याचा निषेध-अर्थ सांगण्यासाठी "नाही/नये/नको" अशी शब्दरूपे वापरावी लागतात. ही "नाही/नये/नको" शब्दरूपे प्र/द्वि/तृ पुरुषासह बदलतात. अर्थात, त्या वाक्यांत तीच आख्यातरूप क्रियापदे आहेत असे माझे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत सकारात्मक वाक्यात जे आख्यात असते, त्या मूळ धातूपासून उत्पन्न झालेले पद नकारात्मक जोडवाक्यात प्र/द्वि/तृ पुरुषासह बदलत नाही. अर्थात ते आख्यातरूप नाही.

मराठी व्याकरणात या परिस्थितीचे वर्णन करण्याचा लेखाचा प्रस्ताव आहे.

(अवांतर : हे वर्णन करणारे व्याकरण आहे, नियामक नाही. मराठी मातृभाषा बोलणार्‍यांना कसे बोलायचे ते नियम न सांगता कळते. "असे बोलू नका, तसे बोला" म्हणणार्‍या व्याकरणकाराकडे एकतर दुर्लक्ष होईल, नाहीतर त्याचे हसे होईल. स्वभाषा म्हणून मराठी सहज आणि अस्खलित बोलणार्‍यांच्या खुबी आणि लकबींचे यथार्थ वर्णन करणे हेच व्याकरणकारांचे काम.)

अभ्यासपूर्ण विवेचन

धनंजयमहोदय, तुम्ही केलेले विवेचन अभ्यासपूर्ण आणि माहितीप्रद आहे. अश्याच आणखी अभ्यासपूर्ण आणि रोचक लेखांच्या प्रतीक्षेत.
आपला
(वाचक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

आख्यात आख्यान

लेख अतिशय सुरेख आहे. तुमचे जवळजवळ सर्व विचार पटण्यासारखे आहेत. फक्त...
केवळ लिंग बदलल्याने रूप बदलत नसेल तर ते कृदंत असते हे पटले नाही. उदाहरणार्थ:--
१. त-आख्यात | वर्तमानकाळ | तो जातो, तू पोळ्या करतेस. या आख्याताच्या अनेकवचनी रूपात लिंगभेदाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. ते/त्या /तीं जातात. तरी जातात हे कृदंत नाही.
२. द्वितीय त-आख्यात | संकेतार्थ | जर तो जाता ..., जर तू पोळ्या करतीस... (? जाणकारांनी उदाहरण चुकल्यास दुरुस्ती सांगावी)...करतीस हे रूप शुद्ध आहे.
३. ल-आख्यात | भूतकाळ | तो गेला, तू पोळ्या केल्या(स)... हा कर्मणी प्रयोग आहे. कर्तरीचे उदाहरण द्यायला हवे होते..तू बसलीस.
४. व-आख्यात | विध्यर्थ | त्याने जावे, तू पोळ्या कराव्या(स)..परत तेच. तू बसावेस.
५. ई-आख्यात | रीतिभूतकाळ | तो जाई, तू पोळ्या करे..शुद्ध रूप तू पोळ्या करस/करीस.
६. ऊ-आख्यात | आज्ञार्थ | तो जावो, तू पोळ्या करोस (? जाणकारांनी उदाहरण चुकल्यास दुरुस्ती सांगावी)... शुद्ध रूप: तू पोळ्या कर. काव्यात करीं/करें. पहा:..करीं मस्तक ठेंगणा । लागें संतांच्या चरणा । ।--तुकाराम... इथे करीं म्हणजे कर; लागें म्हणजे लाग.
७. ईल-आख्यात | भविष्यकाळ | तो जाईल, तू पोळ्या करशील. ..अभिप्राय नाही.
९. आ-आख्यात . हा वेगळा आख्यात नाही, ऊ-आख्याताचाच एक प्रकार. द्वितीय पुरुषासाठी वेगळा प्रत्यय नाही.
जे आख्यात संस्कृतमधील त, तव्य अशा अर्थाचे असतात त्यांची रूपे लिंगाप्रमाणे बदलतात. (कार्यंम्‌ कृतम्‌ । हत्या कृता । वर्षा भवितव्या । पर्जन्यम्‌ भवितव्यम्‌ । ) मराठीत ऊ, ई आणि ईल या आख्यातांची रूपे तशी नसल्याने ती लिंगाप्रमाणे बदलत नाहीत. (तिन्ही लिंगी
तू जा/जाशील. तो/ती जाई. रूपे न बदलण्यासाठी कृदंत असण्याची गरज नाही
फक्त नकारार्थी वाक्यातच नाही तर इतर वाक्यातसुद्धा करत हे कृदंत असते. तू करत आहेस/नाहीस.
४. व-आख्यात | विध्यर्थ | त्याने जावे, तू पोळ्या कराव्या(स)
त्याने न/नाही जावे, त्याने जाऊ नये
तू पोळ्या न/नाही कराव्या(स), तू पोळ्या करू नयेत
यांपैकी पहिला पर्याय ग्रांथिक वाटतो......
अजिबात नाही. बोली भाषेतसुद्धा "तू पोळ्या न कराव्यास (असे मला वाटते)"वापरात आहे. -- वाचक्‍नवी

काही स्पष्टीकरणे/काही आभारप्रदर्शन

केवळ लिंग बदलल्याने रूप बदलत नसेल तर ते कृदंत असते हे पटले नाही.

तुमचा गैरसमज झाला - लिंग महत्त्वाचे नाही. भरपूर कृदंतांची बदलतात. चाचणी पुरुषाची आहे. प्रपु/द्विपु/तृपु पुरुष बदलून जर रूप बदलले नाही तर कृदंत. म्हणून उदाहरणांत एक तृपु, एक द्विपु घेतले. वाचकांनी प्रपु करून बघावे, विस्तारभयास्तव केले नाही. द्विपुमधील फरक ठसठशीत व्हावा म्हणून स्त्रीलिंगी घेतले, कर्मणि प्रयोग चटकन कळावा म्हणून "पोळ्या" कर्म स्त्री/अनेक घेतले.

३. ल-आख्यात | भूतकाळ | तो गेला, तू पोळ्या केल्या(स)... हा कर्मणी प्रयोग आहे. कर्तरीचे उदाहरण द्यायला हवे होते..तू बसलीस.

ल-आख्यातात सकर्मक धातूंना कर्तरी रूप होत नाही. (दिलेले पोळ्यांचे उदाहरण कर्तरी बनवायचा प्रयत्न तुम्ही केलाच असणार.) अकर्मक धातूंना होते. "तो गेला" हे उदाहरण दिलेले आहे. (तुमच्या "तू बसलीस" उदाहरणासारखेच.) तसेच प्रथम त-आख्यातात सकर्मक धातूंना कर्मणी रूप होत नाही. म्हणून प्रत्येक आख्यातात एक सकर्मक आणि एक अकर्मक उदाहरण दिले आहे.

४. व-आख्यात | विध्यर्थ | त्याने जावे, तू पोळ्या कराव्या(स)..परत तेच. तू बसावेस.

"तू बसावेस" हा भाव-कर्तृ संकर फक्त द्विपु मध्येच दिसतो. तू = तू-(ने). कर्तरी हवेच असेल तर "तो जावा, ती बसावी, त्या बसाव्यात" असे अकर्मकांमध्येच शक्य आहे. सकर्मक नेहमी या आख्यातात कर्मणीच असतात.

कर्तरी/कर्मणी/भावे साठी वेगळा लेख हवा.
"भावाने बहिणीला मित्राला (लग्नात) दिली." असा प्रयोग मराठीमध्ये आढळतो. काही व्याकरणकार त्याला अशुद्ध मानतात, पण ते थोडेच. तो नेहमीच्या कर्तरी/कर्मणी/भावे पैकी कुठलाच नाही, पण कर्मणी चा एक खास मराठी प्रकार आहे.
"त्याने तिला फुटवली", हे उदाहरण "ती फुलराणी" नाटकामध्ये सभ्य मराठी पण गटारातील विषय असलेल्या प्रवेशात आलेले आहे. हे वाक्य अशांचपैकी.

५. ई-आख्यात | रीतिभूतकाळ | तो जाई, तू पोळ्या करे..शुद्ध रूप तू पोळ्या करस/करीस.

धन्यवाद

६. ऊ-आख्यात | आज्ञार्थ | तो जावो, तू पोळ्या करोस (? जाणकारांनी उदाहरण चुकल्यास दुरुस्ती सांगावी)... शुद्ध रूप: तू पोळ्या कर.

हे ठीक वाटत नाही.
उदा:
राजाची इच्छा होती की मी येवो.
राजाची इच्छा होती की आम्ही येवोत.
राजाची इच्छा होती की ती येवो.
राजाची इच्छा होती की त्या येवोत.
राजाची इच्छा होती की तुम्ही येवोत. हे ठीक वाटते. "यावेत" नाही चालणार, ते ४.व-आखात आहे. मग तू ये/तुम्ही या ही रूपे चालतील का?
?? राजाची इच्छा होती की तुम्ही या ?? हे या चौकटीत खटकते.
?? राजाची इच्छा होती की तू ये ?? हेदेखील या चौकटीत खटकते.
चौकटीत बसण्यासाठी "तू" पुढे दुसरे कुठलेतरी रूप आहे असे वाटते. मी अनुमानधपक्याने जे लिहिले ती चूक सुधारल्याबद्द्ल धन्यवाद.

राजा म्हणाला की तू ये. हे ठीक वाटते. पण या चौकटीत प्रपु आणि तृपु मला बसवताच येत नाही.

?? राजा म्हणाला की मी येवो. ?? असे वाक्य वाचले तर राजा स्वतःच्या येण्याबद्दल बोलत असल्याचा अर्थ निघतो.
म्हणून "तू ये" या रूपासाठी एक अपूर्ण आख्यात सांगावे असे मला वाटले. लॅटिनोद्भव अनेक भाषांमध्ये असे अपूर्ण आख्यात मानतात.

काव्यातील आज्ञार्थ रूपे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

८. च-आख्यात | रीतिभूत/विध्यर्थ | तो जायचा/त्याने जायचे, तू पोळ्या करायचीस/तू पोळ्या करायच्या(स)...हे रूप योग्य नाही. कर्तरी प्रयोग असल्याने तू पोळी/पोळ्या करायचीस. (करायच्यास चूक)... एक शंका..याला विध्यर्थ का म्हटले आहे ? हा तर साधा रीतिभूतकाळ वाटतो.

हे आख्यात कर्तरी वापरले तर रीतिभूतकाळ होतो, कर्मणी/भावे वापरले तर विध्यर्थ होते. (संदर्भ लेखात सांगितलेले व्याकरणकार, माझे नवीन मत नव्हे.)

रीतिभूत : तू पोळ्या करायचीस.
विध्यर्थ : वरपक्षाची कल्पना होती की खुद्द नव्या नवरीने पोळ्या करायच्या, मोदक करायचे; दुकानातून आणलेले चालणार नव्हते.
नवरीने पोळ्या करायच्या = तू पोळ्या करायच्या(स) (स - कर्तृ-कर्म संकर वैकल्पिक द्विपु रूप)
तू-(ने) = तू

फक्त नकारार्थी वाक्यातच नाही तर इतर वाक्यातसुद्धा करत हे कृदंत असते. तू करत आहेस/नाहीस.

अगदी बरोबर. 'करत' कृदन्त आहे हा नवीन प्रस्ताव नाही. प्रथम त-आख्यात नकारात दिसत नाही, आणि "करत नाही" मध्ये करत त-आख्याताचे विकृत रूप नाही हा नवीन प्रस्तावाचा भाग आहे.

पण

तू करत आहेस/तू करत नाहीस.

ही एकाच तथ्याची सकारात्मक /नकारात्मक जोडी नाही हे लक्षात घ्यावे.
तू करतो / तू करत नाहीस.
ही एकाच तथ्याची सकारात्मक /नकारात्मक जोडी आहे.

"तू करतो" आणि "तू करत आहेस" यांच्या अर्थात फरक आहे.
तू काय करतो? उत्तर : मी पोळ्या करतो - पोळपाट-लाटणे मुदपाकखान्यात, इथे नाही!
तू काय करत आहेस? मी पोळ्या करत आहे - पहा हे पोळपाट-लाटणे. ("मी आचारी-व्यवसाय करत आहे" कसेसेच वाटते.)

"तू करत आहेस" या तथ्याचा नकार करण्यासाठी आमच्या घरच्या बोलीत आम्ही म्हणतो :
"तू करत नाही आहेस" (उच्चार "फोका मारू नको, तू कैपण करत नईयेस" असा.) हे बहुधा प्रमाणमराठीतही लागू आहे, पण माझ्या तोकड्या वाचनाच्या संदर्भात आलेले नाही.

अवांतरः "मी करतो आहे" (उच्चार "मी करतोय्") असेही रूप मराठीत दिसून येते. त्याचे विवेचन म्हणजे खूपच मोठा पसारा! तो विषय (सहायक क्रियापदांबद्दलचा वाद) वेगळ्या लेखात हाताळला पाहिजे!

आख्याताख्यान-चालू

"तू करत नाही आहेस" (उच्चार "फोका मारू नको, तू कैपण करत नईयेस" असा.) हे बहुधा प्रमाणमराठीतही लागू आहे,"..सहमत.
'तू करतो आहेस/करते आहेस किंवा तुम्ही/आपण करतां आहांत' अशीपण रूपे आहेत. यांची नकारार्थी रूपे करता येत नाहीत.. इथे करतो-करतां कृदंत नाही ?
"तू करतो / तू करत नाहीस.
ही एकाच तथ्याची सकारात्मक /नकारात्मक जोडी आहे." ... मला वाटते , 'तू करतो' चे नकारार्थक 'तू नाही करत' असे होईल.....
पहा: नाही मी बोलत नाथा.
"तू काय करत आहेस? मी पोळ्या करत आहे - पहा हे पोळपाट-लाटणे. ("मी आचारी-व्यवसाय करत आहे" कसेसेच वाटते.)"... तुम्ही, आम्ही, सर्व पोळ्याच लाटत आहोत. शब्दांचे हे पीठ, शब्दांची कणीक, शब्दांच्याच पोळ्या आम्ही लाटू.-वाचक्‍नवी

'नाही' शब्दाचा वाक्यातील क्रम

> > "तू करतो / तू करत नाहीस.
> > ही एकाच तथ्याची सकारात्मक /नकारात्मक जोडी आहे." ...
> मला वाटते , 'तू करतो' चे नकारार्थक 'तू नाही करत' असे होईल.....

मूळ लेख लिहिताना लक्षात आले होते की वाक्यातील 'नाही' शब्दाच्या धातुरूपाच्या आधी की नंतर या क्रमावरून आख्यातरूप बदलते. त्या उपविषयावर नंतर वेगळा उपलेख लिहिण्याचा विचार होता. कारण उदाहरणांचा विस्तार आधीच खूप वाढला होता. आणि प्रस्तावाचे सूतोवाच करण्यासाठी फार उदाहरणे द्यायची नव्हती.
प्रस्ताव हा: भाग १) वाक्यात नकार असला तर काही आख्यातांची रूपे करता येत नाही
भाग २) नाह् या धातूची अपूर्ण आख्यातरूपे वर्णन करून सांगितली पाहिजेत, असे मांडावे, तो धातू नस् धातूपेक्षा वेगळा आहे, हेही सांगावे

शंका : येथे 'तू नाही करत' हे 'तू करतो' चे एकुलते एक नकारार्थी रूप मानता की वैकल्पिक? एकुलते एक मानत असाल तर 'तू करत नाहीस' हे कशाचे नकारात्मक? 'तू करत आहेस'चे नव्हे हे खास.

पुढच्या चर्चेचा विषय :
'तू पोळ्या नाही खात' / 'आम्ही आंबा नाही खात'
येथे आख्यातरूप कुठले? दृश्य आख्यातरूप कुठलेच नाही. येथे 'अस्/आह्' धातूची रूपे वैकल्पिक मानावी का? पण यातही दोष येतो.

'तू पोळ्या नाही खात' (तुला नेहमीच भात हवा.)
'तू पोळ्या नाही खात आहे.' (तुला आता भात वाढू का?)
अर्थातच 'आहे' ने अर्थ बदलतो, त्याचा लोप वैकल्पिक नाही.

वगैरे वगैरे. विचार करण्याजोगे आहे.

काव्यातील आज्ञार्थ

"काव्यातील आज्ञार्थ रूपे सांगितल्याबद्दल धन्यवाद."..काव्यातच नाही तर गद्यातसुद्धा ई प्रत्यय लावून आज्ञार्थी रूप बनू शकते.
पहा: तू लिही. --वाचक्‍नवी

मा लिख मा लिख इति

> पहा: तू लिही.
हे बहुधा ईं-प्रत्ययांत रूप नसून (लिहि-) चे शून्य-प्रत्ययांत रूप आहे.
अंतीचा स्वर (अंत्य 'अ'चे नियम वेगळे) आपोआप दीर्घ होतो.
शिवाय हकारांती (म्हणजे पुढे लघुतम/लुप्त 'अ' असलेले) शब्द मराठीत फार कमी दिसतात

आधुनिक रूप/पुराणरूप:
जा/जाईं
कर/करीं
पोहो/पोहीं (पोह चालणार नाही, जिभेला जड जाते)
पाहा/पाहीं (पाह चालणार नाही, जिभेला जड जाते)
लिही/लिहीं (लिह चालणार नाही, जिभेला जड जाते)

अवांतरः मा लिख हे नियमाप्रमाणे मा लेखी: (पुस्तकात बघून!) असे काहीसे प्रमाण आहे वाटते. वेगळी भाषा! इथे लुङ्लकार येतोय् कोणाला...

सकर्मक कर्तरी?

तो पोळ्या करता झाला, ती पोळ्या करती झाली अशा प्रकारची रूपेही ऐकली वाचली आहेत. अर्थात् बहुधा ग्रांथिकच, बोलीमध्ये नव्हे.
कन्नड वगैरे भाषांत (बोलीत) असे वाक्प्रयोग अधिक रूढ आहेत असे वाटते.
- दिगम्भा

तो पोळ्या करता झाला

असे रूप बोलीतही ऐकले आहे.

तो पोळ्या करता झाला, ती पोळ्या करती झाली
येथे करता/करती कृदंते आहेत
आख्यातरूपे झाला/झाली ही आहेत. ही रूपे 'हो-' या अकर्मक धातूची ल-आख्यातात कर्तरी रूपे आहेत.

कर्तरी/कर्मणी/भावे बद्दल वेगळी चर्चा हवी. हा विषय मोठा आहे.

करुन राहणे/करुन सोडणे

उत्तर महाराष्ट्रातील "काय करुन राहिलास बे.", ""आत्ताच जेवण करुन राहिलो ना" किंवा दक्षिण महाराष्ट्रातील. "करुन सोडा की वो" "खाऊन सोडा की वो" किंवा पूर्व महाराष्ट्रातील "घेऊन घेणे" "देऊन देणे" वगैरे वाक्यप्रयोगांसाठीही व्याकरणात काही नियम आहेत का?

(प्रश्नांकित) आजानुकर्ण.

करुन राहणे/करुन सोडण

या सर्व प्रयोगांबाबत "संयुक्त क्रियापदे आहेत की नाहीत" हा वाद होऊन गेला आहे.

हे सर्व संयुक्त क्रियापदाचे प्रकार नसून, यात कृदंत+आख्यात असा प्रयोग आहे, अशा निष्कर्षाला खूप पुष्टी आहे.

"काय करुन राहिलास बे."
करून - कृदंत, राहिलास - आख्यात
(शंका : याचे नकारात्मक कसे होते सांगाल काय? "तू पोळ्या करून राहिलीस."
"तू पोळ्या नाही करून राहिलीस" की "तू पोळ्या करून नाही राहिलीस." की "तू पोळ्या करून राहिली नाईयेस. तीन पर्यायांत अर्थछटांचा फरक आहे हे जाणावे.) "बे" संबोधनाचे पद आहे, यांची वर्णने आधीच चांगल्या प्रकारे झाली आहेत.

"खाऊन सोडा की वो"
"खाऊन सोडा" हे वरीलप्रमाणेच.

"की" शब्दाने अर्थ बदलतो. "तुम्ही आलात की" मध्ये सौम्य आश्चर्य आणि तात्कालिकता आहे वाटते - तुम्ही आताच आलात, येणार होता त्यापेक्षा वेगळ्या वेळी आलात, किंवा वाटले नव्हते की याल, पण आलात, असा काहीतरी अर्थ आहे, तो "तुम्ही आलात" मध्ये नाही. अधिक अभ्यासाअंती याचा अन्वय-प्रकरणाशी संबंध आहे असा निष्कर्ष निघू शकेल. पण आख्यात आणि नकारप्रकरणांपेक्षा ही चर्चा वेगळी आहे.

"वो" संबोधनाचे पद आहे, यांची वर्णने आधीच चांगल्या प्रकारे झाली आहेत.

किंवा पूर्व महाराष्ट्रातील "तू घेऊन घे" "तू देऊन देणे"
कृदंत+आख्यात असेच वर्णन.
पण एक विवक्षित अर्थ प्रतीत करण्यासाठी एकाच धातूचे -ऊन कृदंत आणि त्याच धातूचे आख्यात योजणे, या प्रयोगाचे वर्णन करण्यालायक आहे.
"तू करून कर." असे फारसे ऐकायला येत नाही.
येऊन च्या बाबतीत "तू येऊन जा." असे आहे.
हासुद्धा प्रकार अभ्यास करण्यालायक आहे.

वा!

धनंजयराव,
समाधानकारक उत्तर व अगदी समजेल इतक्या सोप्या भाषेत. मानलं. अत्यंत धन्यवाद.

माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे,
घेऊन घेणे/देऊन देणे या वाक्यप्रयोगांप्रमाणेच कानडीभाषेत एखाद्या क्रियेवर भर देण्यासाठी (एम्फॅसाईज) क्रियापदाची अशी द्विरुक्ती केली जाते.
माडुवदु: करणे
माडुत्तेने : (मी )करतो चा वापर माड-माडुत्तेने असा केला की त्याचा अर्थ (मी ) करतोच असा होतो.

खाऊन सोडा/घेऊन सोडा असा दक्षिण महाराष्ट्रातील वापरही कानडीच्या प्रभावाने आहे. बिडु - सोडा (क्रियापद - खाण्याचा-पिण्याचा-धुण्याचा पदार्थ नाही) चा मुक्त वापर उत्तर कर्नाटकात होतो. माडु- करा याला बिडु लावले की माडबिडु- करुन सोडा. म्हणजे पुणेरी मराठीत च प्रत्यय लावल्याप्रमाणे कराच असा आहे.

चू.भू.दे.घे.

सोडणे. रहाणे, डालना, देना

कानडीच्या प्रभावाने जसे खाऊन सोडा होते, तसेच हिंदीच्या प्रभावाने करून राहणे, मार डाला(मारून टाकले), कह दिया(सांगून दिले)
असे प्रयोग स्थानिक बोलीभाषेत होतात. पण असे लिहिणे ही शुद्ध मराठीची परंपरा नाही.--वाचक्‍नवी

अन्य भाषांचा प्रभाव खरा, पण येथे अशुद्ध नाही

माझ्या मते मराठी कृदंते आणि आख्याते मराठीतल्यासारखी वापरली तर शुद्धच.
-ऊन(कृ) + आख्यात असा क्रम मराठीतला आहे (बाकी भाषांत असो-नसो, असला तरी चालेल).

जर कोणी कन्नडाच्या प्रभावाने "करून सोडरी" (माडुबिडरी सारखे) असे सम्मानार्थ करू लागले तर मी ते "अशुद्ध" मानतो. "तुम्ही करून सोडा/आपण करून सोडावे" असे शुद्ध.
बाईने पोळ्या करून सोडलं (कन्नडात काही क्रियापदांना लिंग नाही) असे कोणी म्हटले तर ते अशुद्ध मानतो.

अन्य भाषांचा प्रभाव मराठीशी सुसंगत शब्दरचनेत आला तर शुद्धच.

काही विशिष्ट वाक्यप्रयोग स्थानिक शैलीतले आहेत हे तुमचे म्हणणे योग्यच आहे. ते वापरल्यास "दूरदूरच्या मराठी वाचकांना अर्थ नीट समजणार नाही, स्थानिक जिव्हाळा/टवाळकी/वातावरणनिर्मिती अभिप्रेत नसेल, तशी वाक्यरचना करू नकोस," असा शैलीबाबत सल्ला विद्यार्थ्याला शिक्षिकेने, किंवा लेखिकेला संपादकाने दिला तर ते योग्यच आहे.

पण शैली बाबत योग्य सल्ला एक, आणि व्याकरणातले शुद्धाशुद्धत्व दुसरेच काही.

चौफेर बोलीभाषांचा नीट अनुभव नसलेले (माझ्यासारखे) लोक वेगवेगळ्या स्थानिक बोलींची सरमिसळ करू लागले तर ते बहुतेक शैलीच्या दृष्टीने सर्वथा अयोग्य, पण कधीकधी व्याकरणाच्या दृष्टीनेही अशुद्ध होऊ शकते.

"काय करून सोडून राहिलास?" व्याकरणदृष्ट्या ठीक, शैलीच्या दृष्टीने नेहमीच हसे व्हावे - ना कर्नाटकसीमा, ना विदर्भ.
"काय करून राहात्येस?" स्थानिक सरमिसळ व्याकरणदृष्ट्या सुद्धा चूकच. (यापेक्षा चपखल उदाहरण शोधले पाहिजे.)

मा लिख

अवांतरः मा लिख हे नियमाप्रमाणे मा लेखी: (पुस्तकात बघून!) असे काहीसे प्रमाण आहे वाटते.
ही माहिती मला नवीन आहे. लिख्‌ चे विध्यर्थी द्वितीय पुरुषी एकवचन 'लिखे:' असे होते पण आज्ञार्थी मा लिखी: कधी वाचले नाही. क्वचित आशीर्वादासाठी तात्‌ प्रत्यय लागतो. उदा. 'त्वम्‌‌ लिखतात्‌' म्हणजे तुझ्या हातून लिखाण होवो असा माझा आशीर्वाद आहे. नाहीतर एरवी 'त्वम्‌ लिख'.--वाचक्‍नवी

मा लिख मा लिख इति

'मा लिख मा लिख" असे कुठेतरी "लिहू नको, लिहू नको" या अर्थी संस्कृत साहित्यात वाचल्यासारखे वाटते.
'मा'पुढे लुङ्लकाराची (अ सुरुवात नसलेली) रूपे प्रमाण आहेत. (सूत्र : माङि लुङ् | ३.३.१७५) बाकी आख्यातरूपे काही अति-विशिष्ट परिस्थितीतच चालतात.

कुरु = तू कर / मा कार्षी: = तू करू नकोस
तसेच
लिख = तू लिही / मा लेखी: = तू लिहू नकोस

(येथे संदेशाचा विषय मला स्वतःला उद्देशून होता, शिवाय 'लिही' शब्दाबद्दल संदेश होता, नकारातील आख्यात-बदलाबद्दल लेख आहे. तुमचे माहिती देणारे प्रतिसाद मला हवेच आहेत - सौम्य विनोद क्षम्य असावा.)

तरीसुद्धा मी मथळा "मा लिख" असा साहित्यात वाचलेलाच लिहिला. सूत्रप्रामाण्याचा अतिरेकी बाऊ करून घेऊ नये, असे समजावणारा संदेश तुम्ही उपक्रमावर अन्यत्र लिहिलेला आहे. मला "दुवा" चिकटवता येत नाही - तुम्ही चिकटवाल काय?

मा लिख मा लिख

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"'मा लिख मा लिख" असे कुठेतरी "लिहू नको, लिहू नको" या अर्थी संस्कृत साहित्यात वाचल्यासारखे वाटते"
या विषयीचा श्लोक पुढील प्रमाणे आहे :

इतर शापशतान्यदृच्छया वितर तानि सहे चतुरानन |
अरसिकेषु कवित्वनिवेदनम् शिरसि मा लिख, मा लिख मा लिख|

याचे मराठीकरण (स्वरचित ) असे:

ब्रह्मदेवा दे अन्य शाप काही
शेकडो ते मी मूकमुखी साही
"अरसिकाला काव्यार्थ समजवावा"
ललाटीं हे लिहू नको नको देवा |

हा हा.

ब्रह्मदेवा दे अन्य शाप काही
शेकडो ते मी मूकमुखी साही
"अरसिकाला काव्यार्थ समजवावा"
ललाटीं हे लिहू नको नको देवा |

सुंदर रचना

(रसिक) आजानुकर्ण

हम्म्म्

मी शाळेत असल्यापासून मराठी भाषा नष्ट होईल, दुरावस्था, इंग्रजीचे आक्रमण इ. इ. ऐकत आलो आहे व आज जेव्हा ही चर्चा पाहीली तेव्हा माझी तरी तशी (नसलेली) काळजी मिटली. कृपया मराठी भाषेची काळजी करणारे कोणी माहीतीत असेल तर "ह्या आंतरजालावरच्या चर्चेचा दुवा"त्यांना द्यावा.

चालू देत. सहज म्हणुन विचारतो राग मानू नये पण ह्या चर्चेत भाग असलेले सदस्य खरच आजची युवा पिढी आहे की आमची अंकल, आंटी आहेत? म्हणजे माझी काळजी नक्की मिटावी म्हणून हा.....

विषयांतराबद्दल माफी पण बोलल्याशिवाय रहावेना. तुम्हा सर्वांना वंदन.

क्-त्-ब् म्हणजे लिहिणे (वाचणे नव्हे)

उगीच अर्धवट अरबी ज्ञान पाजळले!

क्-त्-ब् म्हणजे लिहिणे, वाचणे नव्हे.
कतब/ लम् यक्तुब् ([त्याने] लिहिले / लिहिले नाही)

किताब कोणीतरी आधी लिहिते मग लोक वाचतात. फक्त वाचतात त्याला म्हणतात कुर'आन (ते अपौरुषेय म्हणजे कोणीच लिहिलेले नाही.)

ह्म्म्म्

माफ करा पण आपला प्रस्ताव व पहिला प्रतिसाद नीटसा कळला नाही. पुढील प्रश्न पडले-
१- 'हे आख्यात नकाराला जुमानते' म्हणजे नेमके काय?
२- मराठी व्याकरणात कृदन्त म्हणजे काय?
३- तो जावो, तू पोळ्या करोस या उदाहरणांना आज्ञार्थी म्हणावे की विध्यर्थी?

याशिवाय एकूणच लेख वाचताना असे वाटले, की आख्यातांनुसार वर्गीकरण करण्यापेक्षा (येथे आख्यात म्हणजे प्रत्यय असावेत असे मानून) अर्थानुसार पुरुष, लिंग, वचन असे प्रत्ययांचे तक्ते देऊन मग त्याच वाक्याच्या नकाराचेही तसेच तक्ते बनवून मग हे तक्ते बाजूबाजूल ठेवून तुलना केल्यास जास्त बरे पडेल व नकाररचनेतले 'पॅटर्न्स' आणखी चांगल्या प्रकारे नजरेत येतील.

याचे कारण असे की अर्थ तोच असला तरी पुरुषानुसार आख्यात बदलू शकतो. उदाहरणार्थ- मी पोळ्या करेन , तू पोळ्या करशील, तो पोळ्या करेल यातले आख्यात थोडे वेगळे आहेत. ई या आख्याताची ही वेगवेगळी रुपे आहेत.

याशिवाय

त्याने न/नाही जावे, त्याने जाऊ नये
तू पोळ्या न/नाही कराव्या(स), तू पोळ्या करू नयेत

या उदाहरणांत आपण म्हटल्याप्रमाणे

'करू' रूप पुरुषाप्रमाणे बदलले नाही, ते आख्यात नसून कृदंत आहे. "नये/नयेत" ही या वाक्यांतली आख्याते आहेत.

असे त्याचे स्पष्टीकरण असू शकते परंतू 'जावे' चे 'जाऊ' का झाले हा सुद्धा शोध घेण्याचा विषय आहे, असे वाटते. केवळ नयेला आख्यात मानल्यास शोधात थोड्या त्रुटी राहतील असे वाटते.

याशिवाय हे सर्व आख्यात क्रियापदनिरपेक्ष आहेत का, हे पाहणेही जरूरीचे आहे. मी मराठीच्या व्याकरणाचा नीट अभ्यास केलेला नाही त्यामुळे हे सर्व आख्यात क्रियापदनिरपेक्ष आहेतच किंवा नाहीतच असे विधान मी करू शकत नाही. परंतू इंग्रजीच्या आख्यातांचा अभ्यास करताना ते क्रियापदनिरपेक्ष नसल्याचे लक्षात आल्याने कोणत्याही भाषेत असा आख्यातांची शक्यता असू शकते. तेव्हा बरीच उदाहरणे घेऊन पडताळणी करायला हवी असेही वाटते.

आपण हा जो विषय काढला आहेत तो छानच आहे, इंटरेस्टिंग आहे. मध्यंतरी असेच बोलता बोलता मला मीच वापरलेले कोणतेतरी नकारार्थी रूप स्वतःच्याच तोंडून ऐकून थोडे आश्चर्य वाटले होते, हे नकारार्थी रूप असे कसे झाले असा प्रश्न पडला होता. पण दुर्दैवाने ते रूप आता आठवत नाही.

राधिका

जुमानणे वगैरे, कृदंत चा अर्थ

> प्रस्ताव व पहिला प्रतिसाद नीटसा कळला नाही
प्रस्ताव हा: भाग १) वाक्यात नकार असला तर काही आख्यातांची रूपे करता येत नाही
भाग २) नाह् या धातूची अपूर्ण आख्यातरूपे वर्णन करून सांगितली पाहिजेत (तुम्ही म्हणतात तशी तक्त्यात), असे मांडावे, तो धातू नस् धातूपेक्षा वेगळा आहे, हेही सांगावे

> जुमानणे
अग्निहोत्र्यांचा शब्दकोष "जुमानणे" याचे अनेक अर्थ देतो.
१. किंमत देणे, पर्वा करणे, भय बाळगणे
२. कसाला लावणे
३. उल्लंघनीय नाही असे मानणे

उदाहरणांमुळे मला काय म्हणायचे होते ते स्पष्ट व्हावे.

अमुक आख्यात नकाराला जुमानते, म्हणजे ते आख्यात वाक्यात असलेल्या नकाराचे "भय बाळगून पर्वा करते", आणि मुकाटपणे वाक्यात नांदते.
जर तो जाता / जर तो नाही जाता.

अमुक आख्यात नकाराला जुमानत नाही, म्हणजे ते वाक्यात असलेल्या नकाराचे "भय न बाळगून" त्याला "किंमत न देता" धृष्टपणे वाक्यातून चालते होते - ते प्रयोगात नकाराच्या जोडीने कधीच दिसत नाही.
तो जातो / तो नाही जात ("जातो" हे "नाही"शी भांडून वाक्यातून चालते होते) .

असा थोडा अलंकारिक प्रयोग होता. लेखात आधी अलंकारिक प्रयोग न देता उदाहरणांचे विवरण केले होते :
"१. प्रथम त-आख्यात | वर्तमानकाळ | तो जातो...या आख्याताला नकारात्मक वाक्यात वापरता येत नाही."
हे स्पष्ट आणि अनलंकारित असल्यामुळे पुढची अलंकारिक भाषा समजून घेऊन वाचकाने क्षमा करावी.

> मराठी भाषेत कृदंत म्हणजे काय?
कृदंत याची सामासिक फोड मराठीत करू नये. हा शब्द संस्कृतातून मराठीत फोड न करता अर्थासाठी तत्सम घेतला आहे. त्याचा इतिहास येथे देत आहे.
संस्कृतात धातूला अनेक प्रत्यय लागू शकतात (धातू म्हणजे काय याची चर्चा मोठीच विस्ताराची होईल - ती येथे नको). पैकी ३-बाय-३-बाय-२ (पुरुष-बाय-वचन-बाय-आत्मने/परस्मैपद) च्या तक्त्यात, असे १८-१८ प्रत्यय-संचांचे दहा तक्ते मांडता येतात. दहा हा आकडा येथे महत्त्वाचा नाही (पुढच्या परिच्छेदात याबद्दल), पुरुष-बाय-वचन तक्ते मांडता येतात हे महत्त्वाचे. जे प्रत्यय अशा तक्त्यांत मांडता येतात, त्यांना "तिङ्"प्रत्यय असे म्हणतात. कारण "ति.....ङ्" अशा लांबलचक यादीत एका पाणिनीय सूत्रात ते सांगितलेले आहेत. या विवक्षित सूचीचे, अर्थातच मराठीशी काही कर्तव्य नाही. अशा तक्त्यात ज्यांची वर्गवारी लागत नाही, त्या सर्व प्रत्ययांना "कृत्" प्रत्यय म्हणतात (कृदतिङ् | ३.१.९३). कृत्प्रत्ययांना सकारात्मक परिभाषा नाही (परिभाषा - येथे मराठी शब्दार्थ डेफिनिशन, संस्कृत व्याकरणात "परिभाषा" शब्दाचा वेगळा अर्थ "मेटाग्रॅमर" असा आहे). परिभाषा नकारात्मक "डिफॉल्ट" - तिङ् नाही ते धातूला लागणारे सर्व प्रत्यय असा आहे. असा कुठलाही कृत् प्रत्यय धातूला जोडून जमवलेले पद संस्कृतात कृदन्त.

मराठीतल्या धातूंनाही अनेक वेगवेगळे प्रत्यय लागू शकतात. पैकी काही प्रत्ययांचे २-बाय-२-बाय-३, (पुरुष-बाय-वचन-बाय-लिंग) च्या तक्त्यात, असे १२-१२ प्रत्यय-संचांचे आठ किंवा नऊ तक्ते मांडता येतात. आठ/नऊ हा आकडा येथे महत्त्वाचा नाही (पुढच्या परिच्छेदात याबद्दल), पुरुष-बाय-वचन-बाय-लिंग तक्ते मांडता येतात हे महत्त्वाचे. यासाठी पूर्वी मराठीत रूढ शब्द नव्हता (असलाच तर "प्रत्ययमाळा"). "तिङ्" शब्द का रूढ झाला नाही, कोणास ठाऊक. अशा प्रत्ययांना काहीतरी नाव असावे असे वाटणारे पहिले मराठी व्याकरणकार मोरो केशव दामले (मुख्य अभ्यासग्रंथ १९११ सालचा), त्यापुढच्या सर्व व्याकरणकारांना हा प्रस्ताव मान्य झाला. म्हणून दामल्यांनी सुचवलेला पारिभाषिक शब्द वापरात राहिला. मराठीत रूढ नसलेले आणि मराठी जिभेला तिर्‍हाईत वाटतील असे संस्कृत "तिङ्" आणि "तिङन्त" शब्द दामल्यांनी स्वीकारले नाही. तिङन्तसाठी काहीकाही संस्कृत व्याख्याकार "आख्यात" असा समानार्थी शब्द वापरतात. म्हणून "तिङ्" आणि "तिङन्त"ला समांतर, "आख्यात-प्रत्यय" आणि "आख्यात प्रत्ययांत पद" असे पारिभाषिक शब्द दामल्यांनी निवडले. "आख्यात-प्रत्ययांत पद" यालाच "क्रियापद" असाही समानार्थी शब्द आहे. का कोणास ठाऊक, "कृदंत" हा शब्द मराठीला फार जड वाटला नाही, म्हणून तो संस्कृतातून तत्सम उचलला गेला. कृत्-प्रत्यय मात्र जड वाटला - त्याचा मराठीत कृदंत-प्रत्यय असे उल्लेख करतात. याची परिभाषा सुद्धा सकारात्मक नसून डिफॉल्ट नकारात्मक आहे. पद धातूपासून थेट उत्पन्न झाले असले, आणि आख्यात प्रत्ययांत नसले, तर ते मराठीतले कृदंत.

> आख्यातप्रत्ययांचे तक्ते.
संस्कृतात तिङन्तांचे दहा तक्ते मांडता येतात. त्यांना संस्कृतात दश"लकार" असे म्हणतात. मराठीत आख्यात-प्रत्ययांचे आठ (राजवाडे यांच्यामते नऊ, पण ते एक कालबाह्य) तक्ते मांडता येतात. या आख्यात-प्रत्यय-वर्गांना आख्यात असे म्हणतात.

> ...की आख्यातांनुसार वर्गीकरण करण्यापेक्षा
> (येथे आख्यात म्हणजे प्रत्यय असावेत असे मानून)
> अर्थानुसार पुरुष, लिंग, वचन असे प्रत्ययांचे तक्ते
> देऊन ...
हे तक्ते आधीच्या व्याकरणकारांनी आधीच तयार केलेले आहेत. त्या तक्त्यांपैकी दोन ठसठशीत फरक दाखवणारी उदाहरणे देऊन वरील लेखात सकारात्मक आणि नकारात्मक तक्तेच मांडले आहेत. उरलेला तक्ता मराठी स्वभाषा म्हणून बोलणारे वाचक मनातल्या मनात भरून घेतील. पूर्ण भरून घेतलाच पाहिजे असे नाही, नाहीतरी लेख वाचता येतोच. दिलेल्या ठसठशीत उदाहरणांनी कुठले पद पुरुष-आदी विकरणांनी बदलते ते स्पष्टच दिसते. त्यामुळे कुठला आख्यातवर्ग नकारात्मक वाक्यांत दिसत नाही ("रुसून निघून जातो"/"जुमानत नाही" अलंकारिक भाषेला पुन्हा क्षमा करावी) ते स्पष्ट होते, आणि माझ्या प्रस्तावाचे परिशीलन करला येते.

>> ... 'करू' रूप पुरुषाप्रमाणे बदलले नाही, ते
>> आख्यात नसून कृदंत आहे. "नये/नयेत" ही या
>>वाक्यांतली आख्याते आहेत.
>
> असे त्याचे स्पष्टीकरण असू शकते परंतू 'जावे' चे 'जाऊ'
> का झाले हा सुद्धा शोध घेण्याचा विषय आहे, असे वाटते.
"जावे" चे "जाऊ" का झाले असे आपल्यला का वाटावे? "ऊ" हा कृदंतप्रत्यय अंती असलेली पदे अन्य आख्यात-पदाबरोबर येताना पुष्कळदा दिसतात.
"त्याने जाऊ लागावे."
"त्याने जाऊ शकावे."
तसेच
"त्याने जाऊ नये."

"जाऊ" हे "जावे" चे बदललेले रूप या तीन्ही उदाहरणांत नाही. पुढच्या आख्यातपदामुळे अनिवार्य झालेले आहे.

दोन संस्कृत उदाहरणे अनुमान काढण्यासाठी नाही, उपमास्वरूप देत आहे :
१. सीता पठति | सीता पठितुम् इच्छति |
इथे "पठति" चे "पठितुम्" झालेले नाही, "इच्छति" च्या अन्वयाने "-तुम्" रूप अनिवार्य झाले आहे.
नकारात्मक उदाहरणे संस्कृतात कमी दिसतात, पण आहेत.
२. त्वं गच्छ । (तू जा!) त्वं मा गमः । (नकारात्मक)
येथेही "गच्छ" चे "गमः" झालेले नाही. "मा(ङ्)च्या अन्वयाने लोट्-लकार प्रतिषिद्ध होऊन अट्-विरहित लुङ्-लकार अनिवार्य झाला आहे.

> सर्व आख्यात क्रियापदनिरपेक्ष आहेतच किंवा नाहीतच...
"आख्यात-प्रत्ययांत पद" यालाच "क्रियापद" असा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे तुमची ही शंका तुम्ही वेगळ्या शब्दांत मांडावी. येथे तुमचा एक महत्त्वाचा आणि अभ्यास करण्याजोगा मुद्दा आहे, असे वाटते, पण तो नीट कळला नाही.

धन्यवाद

आपला प्रस्ताव व जुमानणे चा येथे अपेक्षित अर्थ समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
त्याचप्रमाणे कृदन्त म्हणजे काय हे समजावून सांगितलेत त्याबद्दलही आभार. मला तिङ्न्त म्हणजे काय ते माहित होते व त्यावरून धातूला प्रत्यय लागून त्याचे नाम किंवा विशेषण झाल्यास त्याला कृदन्त म्हणावे असा तर्क मी केला होता. परंतू आपल्या या स्पष्टीकरणामुळे माझा गैरसमज दूर झाला.
आख्यात म्हणजे काय ते सांगितल्याबद्दलही धन्यवाद. लहान तोंडी मोठा घास घेऊन एक सूचना करते. लेखाच्या सुरुवातीला आपल्या पारिभाषिक संज्ञा व त्यांचे अर्थ दिल्यास वाचताना बरे पडेल. कारण आपण ज्या पारिभाषिक संज्ञा वापरता त्या प्रत्येकाला माहित असतीलच असे नाही. शिवाय माझ्यासारख्या काहींच्या मनात त्या संज्ञांबद्दल गोंधळ असतो. (जसे कृदन्त)
तक्त्यांबद्दल मी आधीच्या प्रतिसादात लिहिले तेव्हा छिद्रान्वेषीपणा करण्याचा हेतू नव्हता. परंतू मला स्वतःला असे नीट तक्ते मांडून काय बदल झाला आहे ते पहायला आवडते. त्यामुळे अधिक चांगल्याप्रकारे समजते असा अनुभव आहे. बर्‍याचदा आपण आपल्या भाषेला गृहित धरतो त्यामुळे सूक्ष्म बदल झाल्याचे आपल्या कधीही लक्षात येत नाहीत. असे होऊ नये म्हणून प्रत्येक उदाहरण नीट विचारात घ्यावे लागते असे मला वाटते. राग नसावा.

इथे "पठति" चे "पठितुम्" झालेले नाही, "इच्छति" च्या अन्वयाने "-तुम्" रूप अनिवार्य झाले आहे.
येथे जाऊ आणि तुम् ची अनुमान काढण्यासाठी किंवा उपमा देण्यासाठीही तुलना करता येणार नाही असे वाटते. दोन्हींमधे प्रोसेसेस् वेगळ्या आहेत.

"आख्यात-प्रत्ययांत पद" यालाच "क्रियापद" असा समानार्थी शब्द आहे.
माफ करा , मी धातुनिरपेक्ष हा शब्द वापरायला हवा होता. माझ्या म्हणण्याचे स्पष्टीकरण करायला संस्कृतमधील उदाहरणे देते.-
तुमन्ताचीच उदाहरणे घेऊ. तुम् प्रत्ययाची धातुप्रमाणे वेगवेगळी रुपे होतात, त्यांचे पुढील गट पडतात.-
१) तुम्- धातुच्या शेवटी आ स्वर आल्यास नुसतेच तुम् लागते- पा- पातुम्, ज्ञा- ज्ञातुम्
२) एतुम्-धातुच्या शेवटी इ/ई स्वर आल्यास स्वराचा ए होतो व पुढे तुम् लागते- नी- नेतुम्, जि- जेतुम्
३) अर्तुम्- धातुच्या शेवटी ऋ स्वर आल्यास स्वराचा अर् होतो व पुढे तुम् लागतो. स्मृ- स्मर्तुम्, कृ- कर्तुम्
४) आतुम्- धातुच्या शेवटी ऐ स्वर आल्यास स्वराचा आ होतो - ध्यै- ध्यातुम्. गै- गातुम्
५) इतुम्- धातुच्या शेवटी काही विशिष्ट व्यंजने आल्यास त्यांना पुढे इतुम् लागते.- लिख्- लिखितुम्, धाव्- धावितुम्
६) क्तुम्- धातुच्या शेवटी च् आल्यास त्याचा क् होतो व पुढे तुम् लागते- वच्- वक्तुम्, पच्- पक्तुम्
असे आणखीही प्रकार काढता येतील. इथे 'तुम्' हा आख्यात व 'इतुम्' वगैरे आख्यातरुपे मानायला हवीत. ही आख्यातरुपे धातुंवर अवलंबून आहेत. आता मराठीत जर अशी धातुंवर अवलंबून आख्यातरुपे असतील तर त्यांचा नकार करताना काय होते, हे पाहणे रोचक ठरेल. त्यामुळे बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारचे धातू घेऊन वेगवेगळ्या प्रकारे चाचण्या करून पहाव्या लागतील. त्याशिवाय कोणताही निष्कर्ष अपूरा राहिल असे माझे वैयक्तिक मत आहे.
मी या सगळ्याचा फारच कीस काढतेय का? परंतू अशा अनेक शक्यता असू शकतात ही शक्यता लक्षात घ्यायला हवी एवढेच माझे म्हणणे आहे.
राधिका

तुमन्ताची उदाहरणे

-तुम् हे संस्कृतात कृदन्त आहे. ते पुरुषाच्या विकरणाने बदलत नाही. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर ते ति....ङ् या यादीत सांगितलेले नाही.
पूर्वी सांगितले तसे - तिङ् नव्हे ते सवे प्रत्यय कृत्
मराठीशी सामांतर्य साधायचे असेल तर -तुम् हे मराठीतल्या आख्यातप्रत्ययासारखे नसून, मराठीतल्या कृदंतप्रत्ययांसारखे आहे.

पण कृत् प्रत्यय म्हणून तरी त्याचे वेगवेगळे प्रकार सांगावे का?

१) तुम्- धातुच्या शेवटी आ स्वर आल्यास नुसतेच तुम् लागते- पा- पातुम्, ज्ञा- ज्ञातुम्
२) एतुम्-धातुच्या शेवटी इ/ई स्वर आल्यास स्वराचा ए होतो व पुढे तुम् लागते- नी- नेतुम्, जि- जेतुम्
३) अर्तुम्- धातुच्या शेवटी ऋ स्वर आल्यास स्वराचा अर् होतो व पुढे तुम् लागतो. स्मृ- स्मर्तुम्, कृ- कर्तुम्
४) आतुम्- धातुच्या शेवटी ऐ स्वर आल्यास स्वराचा आ होतो - ध्यै- ध्यातुम्. गै- गातुम्
५) इतुम्- धातुच्या शेवटी काही विशिष्ट व्यंजने आल्यास त्यांना पुढे इतुम् लागते.- लिख्- लिखितुम्, धाव्- धावितुम्
६) क्तुम्- धातुच्या शेवटी च् आल्यास त्याचा क् होतो व पुढे तुम् लागते- वच्- वक्तुम्, पच्- पक्तुम्

नाही. त्याचे उत्तर तुम्हीच दिले आहे : "धातुच्या शेवटी ऋ स्वर आल्यास स्वराचा अर् होतो व पुढे तुम् लागतो." वगैरे
तुम् प्रत्यय लावता ज्या धातूतील "अङ्ग"स्वराचा गुण होऊ शकतो, त्याचा गुण होतो.
"सार्वधातुकार्धधातुकयो: | ७.३.८४" (आणि त्यातील विशेष/अपवाद प्रकरण) हे सर्व धातुप्रत्ययांना सामान्यतया लागू आहे. -तुम् चा तो खास प्रकार नाही.
नी धातूपासून नेतुम् तसेच नेतृ (नेता), कृ धातूपासून कर्तुम् तसेच कर्तृ (कर्ता)
त्याच प्रकारे यथायोग्य पदांतर्गत-संधिनियम-प्रकरण लागू करून :
ध्यै पासून ध्यातुम् तसेच ध्यातृ (ध्याता)
वच् पासून वक्तुम् सारखे वक्तृ (वक्ता)

तसेच काही धातूंना आर्धधातुकात "इट्" आगम लागतो. हे त्यात्या धातूचे विशेष धातुपाठात (म्हणजे शब्दकोषात म्हणा ना!) सांगितले आहे, आर्धधातुकासाठी हा सामान्य नियम आहे, -तुम् साठी खास नव्हे.
लिख् पासून लिखितुम् सारखे लिखित्वा

(टीप : सार्वधातुक आणि आर्धधातुक हे धातु-प्रत्ययांचे महा-वर्ग आहेत. याहून अधिक विस्तार या मराठीविषयीच्या चर्चेत [संस्कृत केवळ उपमास्वरूप] अप्रस्तुत आहे असे वाटते.)

संधि-वगैरे पूर्ण भाषेला लागू असलेले सामान्य नियम आपोआप शब्दरूपांत दिसून येतात. प्रत्ययाचे खूप प्रकार सांगितले काय, आणि न सांगितले काय, शब्दरूप एकच निघणार. जो नियम सांगून न सांगून काही फरक पडत नाही (सामान्य नियमांनी तेच कार्य आपोआप होते) ते नियम न मानण्यातच सुटसुटीतपणा (संस्कृत शास्त्री ज्याला लाघव म्हणतात) आहे. शास्त्र आणि विज्ञानात याला फार महत्त्व आहे.

मराठीची समांतर चर्चा, उदाहरणे:
कृदंत :
खावयास/प्यावयास
एकच -आवयास प्रत्यय मानणे पुरे. "पी"चे "प्य्" असे सामान्य संधिनियमांनी होते.

आख्यात :
तू कर/पाहा/पोहो
येथे एकच शून्य प्रत्यय मानणे पुरे. ०/आ/ओ असे तीन मानण्याची जरुरी नाही.
ह्-कारांती धातु-जन्य पदांना हच्या आदल्या स्वराचा पुनरुच्चार होतो असा सामान्य संधिनियम पुरतो.
येथे लाघवासाठी "धातु-जन्य" शब्द काढून सर्व पदे (अपवाद, डोह आणि लोह असे थोडे) असा संधिनियम असावा काय? नाही असे वाटते.

सारांश : धातुसापेक्षत्व संधि-आदी सामान्य नियमांनी कळत असेल तर वेगळे प्रत्यय सांगू नयेत, ते आख्यातप्रत्यय असोत की कृदंतप्रत्यय असोत.

पहिला प्रतिसाद नीटसा कळला नाही - बद्दल

पहिला प्रतिसाद एवढ्यासाठी की तू स्त्रीलिंगी का घेतली आणि पोळ्या स्त्रीलिंगी अनेकवचनी का घेतल्या ते कारण सांगावे.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्ण तक्ता द्यायला हवा होता. पण त्याने विस्तार वाढून प्रस्तावाला जागा राहिली नसती. तक्त्यातली दोन रूपे दिलीत, वाचक मराठीभाषक आहे असे गृहीत धरून, वाचक तक्ता मनातल्या मनात भरेल, किंवा भरलेला असल्याची कल्पना करू शकेल.

तृपु पुल्लिंगी कर्ता अकर्मक धातु असे उदाहरण परब यांच्या पुस्तकात उदाहरण म्हणून दिले आहे. त्यांचीही अशीच अपेक्षा की कुठलाही मराठीभाषक वाचक एका उदाहरणावरून पूर्ण तक्ता कल्पून घेईल.

मला नकारात्मक वाक्यातील आख्यात कोणते ते उदाहरणात स्पष्ट दाखवायला हवे होते. म्हणून पुरुष बदलला की कुठले पद बदलते ते सहज दिसून येण्याकरिता एक परबांचे उदाहरण आणि एक वेगळे उदाहरण दिले.

द्विपु उदाहरण घेतले कारण पुष्कळदा "स" अंत असलेली वैशिष्ट्यपूर्ण रूपे द्विपु मधे दिसतात, परबांच्या तृपु उदाहरणांशी सहज तुलना करता येते.

नपुं एकवचन आणि पुं बहुवचन यांची आख्यातरूपे पुष्कळ तक्त्यांमध्ये दिसायला एकसारखी दिसतात. या कारणास्तव ती उदाहरणे म्हणून निवडली नाहीत.

काही आख्याते सकर्मकांत फक्त कर्तरी/फक्त कर्मणी अशी चालतात. तिथे आख्यातबदल स्पष्ट दिसून यावा म्हणून कर्म स्त्रीलिंगीअनेकवचनी घेतले.

स्त्रीमुक्ती-वगैरे सौम्य विनोद. माझा पहिलाच लेख आहे. जात्याचा टाका नवीन आहे. पोळ्यांतली विनोदाची कचकच पहिल्या दळणातली म्हणून मोठ्या मनाने पोटात घालावी.

अच्छा

पोळ्यांतली विनोदाची कचकच पहिल्या दळणातली म्हणून मोठ्या मनाने पोटात घालावी.

हा हा हा. तसे नाही. तो प्रतिसाद खरेच कळला नव्हता म्हणून विचारले.

राधिका

आज्ञार्थी म्हणावे की विध्यर्थी?

> ३- तो जावो, तू पोळ्या करोस या उदाहरणांना आज्ञार्थी म्हणावे की विध्यर्थी?
आज्ञार्थ असे दामले आणि त्यानंतरच्य अनेक मराठी व्याकरणकारांनी अर्थ-वर्णन दिले आहे.

मराठीतून संस्कृत शिकताना "आज्ञार्थ" म्हणून एक लकार शिकतात. त्याला मूळ संस्कृतात आज्ञार्थ म्हणत नाहीत. लोट् लकाराचा अर्थ, आणि लिङ्लकार सार्वधातुक वापरला, दोन्हींचा अर्थ एकच (विध्यर्थ = विधि-आमंत्रण-निमंत्रण-वगैरे). अर्थात याचे मराठीशी काही एक कर्तव्य नाही.

मला वाटते, की आज्ञार्थ म्हणून एक द्वि-पुतच चालणारे अपूर्ण आख्यात सांगावे. तसे सांगू नये असे मत येथेच वर वाचक्नवींनी दिले आहे. त्यांच्या मते "तू करोस" अशुद्ध आहे, "तो जावो"ला समांतर रूप "तू कर" असे आहे. तुम्ही "करोस" किंवा असेच कुठलेसे रूप ऐकले आहे काय? तसे असल्यास, आणि आणखी मराठीभाषकांसही असेच वाटल्यास, माझ्या मताला पुष्टी मिळते.

एक उदाहरण

मराठीतून संस्कृत शिकताना "आज्ञार्थ" म्हणून एक लकार शिकतात. त्याला मूळ संस्कृतात आज्ञार्थ म्हणत नाहीत.

दोन्हींत फरक काय आहे, हे जाणून घ्यायला फारच आवडेल. संस्कृत व्याकरण ज्याप्रकारे मला शिकवले गेले आहे, त्याप्रकारे मराठी व्याकरण शिकवले गेले नसल्यामुळे माझी संस्कृत-मराठीच्या व्याकरणात बरीच सरमिसळ होते. (त्याचा फटका मराठीतले प्रयोग समजावताना चांगलाच बसतो.) त्यामुळे आपण वेगळा लेख करून मराठीतले अर्थ, काळ समजावून सांगितलेत तर फार म्हणजे फारच आवडेल.

तुम्ही "करोस" किंवा असेच कुठलेसे रूप ऐकले आहे काय?

तू करोस असे नाही ऐकलेले. परंतू तृ.पु. तले "देव करो आणि त्याचे सगळे चांगले होवो" यातला जो करो आहे, त्याचा काळ कोणता? वेदांमधे सर्व अर्थांच्या जोडीने एक जो अर्थ वापरला जातो ना, देवाला आज्ञार्थ की असा काहीतरी, दुर्दैवाने मला त्या अर्थाचे तपशील, नाव काहीच आठवत नाही आहेत. तोच हा अर्थ आहे का?
राधिका

"आज्ञार्थ" आणि "विध्यर्थ"

"विध्यर्थ" हा शब्द संस्कृतातून तत्सम आला आहे. त्याची सामासिक फोड मराठीत करू नये.
"विध्यर्थ" हे आमंत्रण, निमंत्रण, प्रार्थना, "आज्ञा" या सर्व अर्थात (थोडक्यात प्रेरणा) वापरतातच, पण "हेतुहेतुमद्भाव" (परिभाषा पुढे देत आहे) या अर्थाने देखील वापरतात.
"आज्ञार्थ" आमंत्रण, निमंत्रण, प्रार्थना, "आज्ञा" या सर्व अर्थात (थोडक्यात प्रेरणा) वापरतात (पण "हेतुहेतुमद्भाव" या अर्थाने नाही)
आमंत्रण, निमंत्रण, प्रार्थना, "आज्ञा" या सर्व अर्थात, सांगितलेली क्रिया झाली पाहिजे अशी वक्त्याची इच्छा व्यक्त होते.

"हेतुहेतुमद्भाव" म्हणजे "एक क्रिया व्हावी म्हणून दुसरी क्रिया व्हावी." हा अर्थसंबंध. येथे पैकी कुठलीही क्रिया झाली पाहिजे अशी वक्त्याची इच्छा असेल किंवा नसेल.

येथे मराठी "विध्यर्थ" आणि मराठी "आज्ञार्थ"ची उदाहरणे देत आहे.
प्रेरणा या अर्थी :
"विध्यर्थ" : कैर्‍या पडाव्यात (अकर्मक धातू, कर्तरी प्रयोग). कैर्‍यांनी पडावे (अकर्मक धातू, भावे प्रयोग), त्याने झाड हलवावे (सकर्मक धातू, फक्त कर्मणी प्रयोग शक्य)
"आज्ञार्थ" : कैर्‍या पडोत. (अकर्मक धातू, फक्त कर्तरी प्रयोग शक्य), तो झाड हलवो (सकर्मक धातू, फक्त कर्तरी प्रयोग शक्य)
आमंत्रण, निमंत्रण, प्रार्थना, "आज्ञा" या सर्व अर्थात, कैर्‍या पडल्या पाहिजेत, त्याने झाड हलवले पाहिजे, अशी वक्त्याची इच्छा व्यक्त होते. दोन्ही रूपे चालतात.

हेतुहेतुमद्भावात "विध्यर्थ"च योग्य :
"कैर्‍या पडाव्यात म्हणून त्याने झाड हलवावे." येथे कैर्‍या पडल्याच पाहिजे असे वक्त्याला वाटत असेल किंवा नसेल वाटत.
"समाजात नाचक्की व्हावी म्हणून शेण खावे लागते - लोक उगीच नाही बोलत!" बहुधा वक्त्याला समाजात कोणाची तरी नाचक्की झालीच पाहिजे असे वाटत नाही खास!

"आज्ञार्थ" वापरले तर काय होते?
"कैर्‍या पडोत म्हणून तो झाड हलवो." येथे कैर्‍या पडल्या पाहिजे अशी वक्त्याची इच्छा ध्वनित होते. तरीसुद्धा त्यातल्या त्यात कानाला बरे वाटते ते हे :
"कैर्‍या पडाव्यात म्हणून तो झाड हलवो." म्हणजे ज्या क्रियेत वक्त्याची इच्छा गुंतली नाही तिथे विध्यर्थ, इच्छा गुंतली आहे तिथे आज्ञार्थ
"समाजात नाचक्की होवो म्हणून शेण खावे लागते - लोक उगीच नाही बोलत!" ??? हा वापर खटकतो. झालेच तर "शेण खाणार्‍याची" इच्छा नाचक्की होण्यात गुंतली आहे, असा ओढूनताणून अर्थ निघतो.

हे झाले अर्थाबद्दल.
व-आख्यातात अकर्मक धातू कर्तरी किंवा भावे प्रयोगात वापरात दिसतात, सकर्मक धातू कर्मणी प्रयोगात वापरात दिसतात. (ज्याचा अर्थ "विध्यर्थ" म्हणून सांगतात ते.)
ऊ-आख्यातात अकर्मक आणि सकर्मक धातू कर्तरी प्रयोगातच वापरात दिसतात. (ज्याचा अर्थ "आज्ञार्थ" म्हणून सांगतात ते.)
ऊ-आख्यात हे व-आख्याताचे कर्तरी रूप नाही हे खास. त्यांचा बहुतेक अर्थ सारखा असला तरी ती आख्याते वेगवेगळी म्हणून सांगावी लागतात.

योगायोगाने जवळजवळ असाच फरक असलेली दोन आख्याते (तिथे "लकार" म्हणतात) संस्कृतातही आहे. हेतुहेतुमद्भावात तसेच आमंत्रण, निमंत्रण, प्रार्थना, इ.इ. मध्ये लिङ्-लकार वापरतात.
हेतुहेतुमद्भावात नाही पण आमंत्रण, निमंत्रण, प्रार्थना, इ.इ. मध्ये लोट् लकार वापरतात.

वेदांमध्ये लिङ्लकाराच्या ठिकाणी यदृच्छेने लेट्लकार वापरतात. देवाच्याच साठी नाही.

हेतुहेतुमद्भाव आणि संकेतार्थ

> "हेतुहेतुमद्भाव" म्हणजे "एक क्रिया व्हावी म्हणून दुसरी क्रिया व्हावी," हा अर्थसंबंध.

पण पहिली आणि दुसरी कुठलीच क्रिया खरी नाही (तथ्य नाही) असे वक्त्याला सांगायचे असेल, तर त्याला "संकेतार्थ" म्हणतात. अशा परिस्थितीत द्वितीय त-आख्यात वापरतात.
"जर तो झाड हलवता तर कैरी पडती."
(त्याने झाड हलवलेले नाही, आणि कैरीही पडलेली नाही, अशा तथ्याचा संकेत वक्ता देत आहे.)
आधुनिक बोली मराठीत :
"जर त्याने झाड हलवले असते, तर कैरी पडली असती."
टीप : अस् धातू द्वितीय त-आख्यातातच.

क्रम असा की आधी कारण-क्रिया, मग परिणाम(कार्य)क्रिया. यात "जर" आणि "तर" पैकी एक किंवा दोन्ही बहुतेकवेळा वाक्यात प्रकट म्हणतात.

आणखी एक मुद्दा

माझा आताचा प्रतिसाद वाचताना आणखी एक मुद्दा लक्षात आला.
पुढील वाक्ये वाचा.
१- तू पोळ्या केल्या नाहीस.
२- तू पोळ्या नाही केल्यास.
दोन्ही वाक्यांत वेगवेगळ्या शब्दांना 'स' हा आख्यात लागलेला आहे. व 'स' हा आख्यात लागलेले शब्द वाक्याच्या शेवटी आहेत. हीच वाक्ये
१- तू पोळ्या नाहीस केल्या.
२- तू पोळ्या केल्यास नाही.
असी म्हणता येत नाहीत. म्हणजेच किमान या दोन उदाहरणांत तरी आख्यात नकारवाचक शब्दाला किंवा क्रियापदाला दोन्हींला लावतो येतो, पण ज्याला लावला जातो तो शब्दाच्या शेवटीच राहतो असे असल्याचे दिसून येते.
हे फक्त याच विशिष्ट उदाहरणांच्या बाबतीत शक्य आहे का, असे का, असे केल्याने वाक्याच्या अर्थात काही फरक पडतो का असे बरेच प्रश्न तदनुषंगाने पडतात. त्यांचीही उत्तरे शोधायला हवीत.

राधिका

ता.क. हा प्रतिसाद लिहून झाल्यावर आपल्या अशाच उदाहरणांवर आधारीत प्रतिसाद वाचला. परंतू त्यावरून आपण मांडलेल्या मुद्द्यात व माझ्या मुद्द्यात थोडा फरक असावा असे वाटल्याने हा प्रतिसाद तसाच ठेवते आहे.

नकारक्रमाची उदाहरणे

उत्तम आणि अभ्यास करण्याजोगा मुद्दा मांडलात.

बाऽबाऽरे माझ्या..;)

आज प्रथमच हा लेख सहज चाळून पाहिला!

बाऽबाऽरे माझ्या.. एक शब्दही समजला नाही हो!

जरा सवडीने हा लेख पुन्हा वाचला पाहिजे आणि प्रतिसाद जरा अभ्यासपूर्वकच दिला पाहिजे! :)

आपला,
तात्या परब!:)

धन्यवाद तात्या परब!

बाऽबाऽरे माझ्या.. एक शब्दही समजला नाही हो!

माझेपण तेच झाले, ना धड (उकरून पण) वाद घालता/काढता येईना, ना काहीतरी माहीत आहे असे दाखवण्याइतके लिहीता येईना! ;) तरी वाचतोय...

फक्त त्यात टपाटप पडणारे प्रतिसाद पाहून मात्र खर्‍या अर्थाने चांगले (appreciation करण्यासारखे) वाटले इतकेपण नक्कीच...

विकासराव,

माझेपण तेच झाले, ना धड (उकरून पण) वाद घालता/काढता येईना, ना काहीतरी माहीत आहे असे दाखवण्याइतके लिहीता येईना! ;) तरी वाचतोय...

हो, माझेही तेच झाले. लेकीन कुछ भी बोलो बॉस, आपले धनंजयराव लई भारीच लिहितात राव! मानना पडेगा..

फक्त त्यात टपाटप पडणारे प्रतिसाद पाहून मात्र खर्‍या अर्थाने चांगले (appreciation करण्यासारखे) वाटले इतकेपण नक्कीच...

नक्कीच! व्याकरणविषयक इतक्या कठीण अन् वरवर कंटाळवाण्या वाटणार्‍या लेखाला तो लेख समजून प्रतिसाद देणारे काही विद्वान सदस्यही येथे आहेत ही नक्कीच कौतुकाची बाब आहे!

आपला,
तात्या परब!

एक अक्षरही समजले नाही!, सपशेल शरणागती! :)

"वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषण",

म्हणजे काय?

"चालू भविष्यकाळ",

चालू भविष्यकाळ? हा काय प्रकार असतो? आम्ही चालू वर्तमानकाळ ऐकला होता!

हे प्रकार महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकांतून आले असावेत अशी माझी कल्पना आहे.

पाठ्यपुस्तक मंडळांच्या डोळ्यांना दिसले नसले तरी गेल्या दीड-दोनशे वर्षांत मराठीचे व्याकरण शास्त्रशुद्ध मराठी दृष्टिकोणातून सांगणारे विद्वान उपजलेच.

I see!

त्यांनी उत्तम रीतीने वर्णन केलेली सकारात्मक क्रियापदांची रूपे परब [१] यांच्या "मराठी व्याकरणाचा अभ्यास" मधून येथे देत आहे:

परब (१) म्हणजे काय? असे एकूण किती परब आहेत?

मराठीत क्रियापदाची कोणकोणती रूपे होतात, असा विचार करता "काळ" आणि कालवाचक कल्पना फारशा उपयोगी पडत नाहीत. गुंजीकर, दामले, राजवाडे, अर्जुनवाडकर, आचार्य आणि दीक्षितांनी (सर्व संदर्भ [१] मध्ये दिले आहेत) उत्तरोत्तर फेरफार करून मान्यता मिळवलेली व्यवस्था अशी :

कालवाचक कल्पना म्हणजे काय?

गुंजीकर, दामले, राजवाडे, अर्जुनवाडकर, आचार्य आणि दीक्षित ही सगळी मंडळी कोण आहेत?

कुणाची मान्यता मिळवली आहे असं म्हणताय आपण? आम मराठी माणसाची का?

क्रियापदाच्या प्रत्ययसंचांना "आख्यात" म्हणतात.

अहो पण मुळात क्रियापदांचे प्रत्ययसंच म्हणजे काय?

काळ/अर्थ, लिंग, वचन आणि पुरुष हे आख्यातरूपाचे धर्म आहेत.

वरील वाक्यातील एकही शब्द समजला नाही!

(टीप : यात पुरुष हा एकच धर्म क्रियापदासाठी "आख्यात"रूपांत खास दिसतो. बाकी सर्व धर्म अन्य प्रकारच्या शब्दरूपांत कधीकधी दिसतात. पुरुष म्हणजे काय? मी/आम्ही, तू/तुम्ही, तोतीते/तेत्याती, म्हणजे बोलणारी, ऐकणारी, अन्य व्यक्ती यांच्या अधिकाराने शब्दाचे रूप बदलणे, [माझे मत असे की] अशा परिस्थितीत कधीच न बदलणारे रूप म्हणजे "आख्यात" नव्हेच - धनंजय)

पुन्हा काहीही समजले नाही. धनंजय साहेब, जरा आम्हा सामान्य माणसाला समजेल असं काहीतरी साधं आणि सोपं लिवा की राव! की आमच्या अभिजात संगीतातील काही शब्द जसे फक्त अभिजात संगीतवाल्यांनाच समजतात तश्यापैकी हा काही प्रकार आहे? :)

[माझे मत असे की] अशा परिस्थितीत कधीच न बदलणारे रूप म्हणजे "आख्यात" नव्हेच - धनंजय)

आपणही व्याकरणावर पुस्तक लिहिले आहे काय?

असो! धनंजयराव, संपूर्ण लेख पुन्हा पुन्हा वाचून पाहिला पण दुर्दैवाने काहीच समजले नाही! व्याकरण हा विषय इतका अगम्य, कठीण आणि झोप आणणारा तसेच क्वचित प्रसंगी गरगरायला लावणाराही असू शकतो हे आज आपला लेख वाचून पुनश्च एकदा नव्याने समजले! आपला आणि परबांचा व्याकरणाचा अभ्यास आणि व्यासंग खरोखरच थक्क व अचंबित करणारा आहे!

उपक्रमावर आपली वाटचाल सुखाची व आनंददायी होवो हीच शुभेच्छा!

आपला,
(शरणागत!) तात्या.

जार्गन (पारिभाषिक शब्द)

पारिभाषिक शब्दांमुळे अभ्यासपूर्ण लेख वाचायला कधीकधी कठीण जाते हे खरेच.

याविषयी एक गमतीदार चर्चा येथे वाचावी.
(मी दुवा चिकटवण्याचा प्रयत्न केला आहे - तो बहुतेक फसला आहे. न्यू यॉर्क टाइम्स च्या संकेतस्थळावरील फ्रीकिनॉमिक्स ब्लॉग चा दुवा आहे.)

होय, त्या दृष्टीने तुमचे म्हणणे ठीकच आहे. तुम्ही विचारलेल्या प्रत्येक मुद्द्याचे उत्तर देणे खूप विस्ताराचे होईल.

व्याकरण शाळेत शिकवले जात नसल्या कारणाने सुरुवातीपासून पारिभाषिक शब्द समजावून सांगणारे लेखसत्र लिहायला पाहिजे. हा प्रकल्प प्रासादिक वाणीच्या कोण्या शिक्षकाने हाताळावा.

सुरेख!

पारिभाषिक शब्दांमुळे अभ्यासपूर्ण लेख वाचायला कधीकधी कठीण जाते हे खरेच.

अहो धन्याशेठ, तेच तर आम्हीही म्हणत होतो! पण आमचा वासुदेव रागावला ना हो आमच्यावर! :)

व्याकरण शाळेत शिकवले जात नसल्या कारणाने सुरुवातीपासून पारिभाषिक शब्द समजावून सांगणारे लेखसत्र लिहायला पाहिजे.

Exactly..

हा प्रकल्प प्रासादिक वाणीच्या कोण्या शिक्षकाने हाताळावा.

धन्याशेठ, ही जिम्मेदारी तुम्ही किंवा वासुदेवानेच अंगावर घ्यावी असे मी सुचवीन..:)

असो, सुरेख खुलाश्याबद्दल धन्यवाद धन्याशेठ..

तुझा,
तात्या.

मजकूर संपादित. व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत. सदस्यांनी विषयांतरासाठी खरडवही किंवा व्य. नि.चा वापर करावा. - संपादक.

लंगडी गाय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
माझे मराठी व्याकरणविषयक ज्ञान बर्‍यापैकी आहे आणि मी या विषयावर अधिकारलेखणीने लिहू शकतो असा माझा समज होता. इतरांपेक्षा मला बरेच व्याकरण कळते असेही वाटत होते.
परंतु श्री. धनंजय यांचा प्रस्तुत लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचल्यावर माझे व्याकरणाचे ज्ञान किती तोकडे आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली.त्या संदर्भात भर्तृहरीच्या नीतिशतकातील एक श्लोक आठवला तो असा:

यदा किंचित्ज्ञो$हं द्विप इव मदान्धः समभवम् |
तदा सर्वज्ञो$स्मीत्यभदवलिप्तं मम मनः|
यदा किंचित् किंचित् बुधजनसकाशादवगतम् |
तदा मूर्खो$स्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः|

याचे वामन पंडित कृत मराठीकरण असे:

यदा काही काही हरि कवि असे शब्द शिकलो |
तदा मी सर्वज्ञ द्विपसम मदें याच भरलो|
यदा "काही नेणे "म्हणुनि वदले पंडित मला|
तदा माझा गर्वज्वर सकळही हा उतरला |

(द्विप=हत्ती)
गद्य अनुवाद (किंचित् स्वैर) :
....जेव्हा मला (व्याकरणाचे) थोडे काही (पुस्तकी) ज्ञान झाले,तेव्हा मदांध हत्ती प्रमाणे मला (त्या ज्ञानाचा) माज चढला.
"मी सर्वज्ञ आहे" या विचाराने माझे मन व्यापले.
(पण) ज्ञानी लोकांच्या सहवासात थोडे थोडे काही समजू लागले तेव्हा "मी मूर्ख आहे" याची जाणीव होऊन;जसा (अंगात आलेला) ताप उतरतो ;तसा माझा गर्व उतरला.

द्विप की हरी?

अहो, असे कसे? मागे एकीकडे "प्रयोग" हा प्रकार तुम्ही छान समजावून सांगितला होता. तुमचे मत येथे आतापर्यंत वाचले नाही, म्हणून येथील गजाली गिरिकुहराकडे पुन्हापुन्हा वळून बघत होती.

गजाली म्हणजे कोकणीत "गप्पा" ही अनायासे कोटी.

कुचेष्टास्वरूपी प्रतिसाद

मराठी मातृभाषक आपली भाषा व्याकरणशुद्ध बोलतात. त्यातले बहुसंख्य संवयीने व्याकरणशुद्ध लिहितात. लिहिताना काही किरकोळ प्रमाद झाले असतील तर त्यातले बहुतेक, लिखाण र्‍हस्व-दीर्घ उच्चारानुसार परत परत वाचले की दूर करता येतात. त्यामुळे एखाद्याला व्याकरणातल्या संज्ञा उमजत नसतील तर तो व्याकरणात ढ आहे असे बोलणे उचित नाही. शालेय शिक्षणात व्याकरण जेमतेम दहा-पंधरा गुणांचे असते. शाळा सोडल्यानंतर व्याकरणातील पारिभाषिक शब्द परत कधीच ऐकू येत नाहीत. त्यांचा अर्थही पूर्णपणे विस्मरणात गेल्यास आश्चर्य नाही. अशा परिस्थितीत शरणागत होऊन तात्यांनी आपले गार्‍हाणे मांडले तर त्याला कुचेष्टा म्हणून लेखू नये. इंग्रजी व्याकरणातली कॉम्प्लिमेन्ट ही संज्ञा विसरल्याने एकदा मला 'तो (एक) राजा आहे' या इंग्रजी वाक्यातला कर्ता-कर्म नसलेला'राजा' काय काम करतो ते सांगता येईना. मराठी व्याकरणाचे एखादे पुस्तक आणवून(घरी ते नसण्याची शक्यता जास्त) सहज चाळले तरी बुद्धीवर बसलेली भासमान अज्ञानाची धूळ सहज झटकता येईल.
तात्या तसे चलाख आहेत. त्यांनी हे केव्हाच केले असेल. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांचा हा तथाकथित कुचेष्टापूर्ण प्रतिसाद असेल. कुणी सांगावे?--वाचक्‍नवी

विषयान्तर

मराठी व्याकरणाचे एखादे पुस्तक आणवून सहज चाळले तरी बुद्धीवर बसलेली भासमान अज्ञानाची धूळ सहज झटकता येईल.
अहो खरोखर सध्या अशी परिस्थिती नाही.
तात्या किंवा अन्यही कुणाला जर व्याकरणाच्या संकल्पनांचा विसर पडला असेल तर ते साहजिक आहे. त्यात वाईट वाटून घेण्याचे काहीच नाही. पण सध्याची महाराष्ट्रात मिळणारी मराठी व्याकरणाची बहुतांश पुस्तके ही जिज्ञासू माणसाला अधिकाधिक गोन्धळात टाकणरी आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे.
बहुतांश व्याकरणकार आन्धळेपणाने एकतर संस्कृत व्याकरणाचे किंवा इंग्लिश व्याकरणाचे अनुकरण करतात. मराठीचा स्वतन्त्रपने विचार फार थोडे लोक करतात.
त्यामुळे वर लिहिल्याप्रमणे, या संकेतस्थळावर एखाद्या जाणकाराने पुढाकार घेऊन व्यकरणातील काही संकल्पना स्पष्ट करणे जास्त बरे पडेल.

 
^ वर