गीत मेघदूत ..२

II स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी प्रसन्न II

गीत मेधदूत ..१

राम राम मंडळी,

तसिमन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ: ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श

हा मेघदूतातील श्लोक. वरील ओळींकरता मला हंसध्वनी हा राग सुचला. अगदी एक्झॅट हंसध्वनी म्हणता येणार नाही, परंतु हंसध्वनीसदृष काहीतरी सुचलं त्यात मी वरील ओळी बांधल्या आहेत. ८ महिने आपल्या बायडीचा विरह सहन करणार्‍या यक्षाच्या मनात आषाढातला मेघ पाहून थोड्याफार आशा पल्लवीत झाल्या असतील असा आपला माझा समज हो! त्यामुळे वरील ओळींना मी थोडासा हंसध्वनी टच दिला आहे असं आपण म्हणूया! :) तशातच 'कश्चितकांता विरहगुरुणा..' मधला यमन डोक्यात होताच त्यामुळे 'नीत्वा मासान्...' बांधतांना अवचित थोडासा यमनही पुन्हा डोकावला! :) चालायचंच! आपली काही कधी कुठल्या रागाला ना नसते! आणि अहो आमच्या यमनाला पुन्हा यायचं तर येऊ दे की. मी कोण त्याला अडवणारा? :)

मंडळी, मला संस्कृत जरी फारसं कळत नसलं तरी वरील श्लोक जेव्हा चाल लावायच्या दृष्टीने मी प्रथम वाचला तेव्हा 'तसिमन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी' या पहिल्या ओळीमधल्या विलक्षण नादमाधुर्यानेच मला भुरळ घातली! लयीतली अतिशय सुरेख अशी 'भर-खाली' यात आहे. 'नीत्वा मासान् कनकवलय' हे शब्द काय सुरेख आहेत! आषाढातल्या पाण्याने भरलेल्या काळ्याभोर मेघाला 'वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श' ही उपमा फक्त कालिदासच देऊ जाणे!

छया..! हा कलिदास उत्तम संगीतही जाणत असला पाहिजे. कारण याच्या शब्दाशब्दात संगीत भरलेलं आहे! वरील ओळीतल्या पहिल्या आणि तिसर्‍या व दुसर्‍या आणि चौथ्या ओळीतलं मीटर कालिदासानं काय सुरेख सांभाळलंय! आपुन तो मान गये बॉस कालिदासको. मूळ काव्य अतिशय उत्तम असेल तर त्याला चाल लावायला फारसे कष्ट पडत नाहीत हा अनुभव मला कालिदासाचं मेघदूत बांधतांना आला!

मंडळी, हा श्लोक पेश है आपकी खिदमत मे! (आमची च्यामारी संस्कृत अन् उर्दू या दोन्हीची बोंब! :)

हा श्लोक येथे ऐका आणि पाहा.

धूमज्योति: सलिलमरुतां संनिपात: क्व मेघ:
संदेशार्था: क्व पतुकरणै: प्राणिभि: प्रापणीया: ।
इत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे
कामआर्ता हि प्रक्रतिक्रपणाश्चेतनाचेतनेषु ॥

वरील प्रथम दोन ओळींकरता मला केदार राग सुचला. आमचा केदार म्हणजे काय विचारता मंडळी! स्वरांचा साक्षात उत्सवच तो! केदारात दोन्ही मध्यम फार सुरेख लागतात. केदारातला मध्यम कसा आहे? तर गुंगवून टाकणारा आहे! मंडळी, केदार रागाने एकदा मैफलीचा ताबा घेतला की श्रोता एका वेगळ्याच दुनियेत विहार करू लागतो, वास्तवापासून थोडा दूर जातो, कल्पक जगात जातो, स्वप्न रंगवू लागतो! आणि म्हणूनच धनश्रीकडून मी जेव्हा 'धूमज्योति: सलिलमरुतां संनिपात: क्व मेघ:, संदेशार्था: क्व पतुकरणै: प्राणिभि: प्रापणीया:' या ओळींचा अर्थ समजून घेतला तेव्हा मला केदारच सुचला!

वरदाने केदारची सुरवातीची इंट्रोडक्टरी आलापी छानच केली आहे. 'संनिपात: क्व मेघ:' मध्ये केदारचं एक वेगळंच दर्शन होतं. मंडळी, केदारामध्ये काय किंवा एकूणच आपल्या रागसंगीतामधील प्रत्येक रागाला खूप सुरेख सुरेख छटा आहेत. त्या शोधायला गेलं तर सात जन्म अपुरे पडतील एवढं आपलं रागसंगीत श्रेष्ठ आहे, ऐश्वर्यसंपन्न आहे! 'संदेशार्था: क्व पतुकरणै:' हा अगदी पारंपारिक केदार बरं का मंडळी. अगदी आपल्या ग्वाल्हेराचा केदार! :) 'संदेशार्था: क्व पतुकरणै:' नंतरची आलापीही वरदाने फार सुरेख केली आहे.

इत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे
कामार्ता हि प्रक्रतिक्रपणाश्चेतनाचेतनेषु ॥

याचा अर्थ मी जेव्हा समजून घेतला तेव्हा मात्र माझ्या डोळ्यासमोर बसंतच उभा राहिला. बसंत रागाची ख्याती मी काय वर्णावी महाराजा! आपण तर पहिल्यापासूनच बसंतच्या प्रेमात आहोत.

'और राग सब बने बाराती,
दुल्हा राग बसंत!'

अशी आपल्या बसंताची महती! अहो वरील बंदिशीतून प्रेरणा घेऊन आम्ही तर 'बसंतचं लग्न' या नावाने एक लेखमालिकाच 'त्या तिथे पलिकडे...तिकडे' लिहायला घेतली होती! :)

मंडळी, आपण कृपया नीट लक्ष देऊन ऐका अन् समजून घ्या. इत्यौत्सुक्यादपरिगणयन् मधील इत्यौत्सुक्या पर्यंत गाडी म्हटलं तर केदाराच्याच रुळांवरून धावते आहे. परंतु 'दपरिगणयन् पासून गाडी रुळ बदलून एकदम बसंतच्या राज्यात जाते! आणि मग पुढे 'गुह्यकस्तं ययाचे' च्या माध्यमातून मैफलीत बसंतचेच साम्राज्य सुरू होते! ते थेट 'कामार्ता हि प्रक्रतिक्रपणाश्चेतनाचेतनेषु' पर्यंत! कामर्ता मध्ये बसंतचा पल्ला आपल्याला अनुभवता येईल असे वाटते! हा श्लोक खाली देत आहे, ऐकून कसं वाटलं ते सांगा हां! :)

हा श्लोक येथे ऐका आणि पाहा.

धनश्रीचं निवेदनही ऐकण्यासारखं आहे, अगदी रसाळ आणि अभ्यासपूर्ण आहे. लिहितेही छान. 'त्या तिथे पलिकडे..तिकडे' तिचे 'संस्कृती' या नावाने एखाद दोन लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आता आपल्या आगामी मिसळपाव डॉट कॉम वर मी तिला लय भारी भारी लेख लिहायला सांगणार आहे! :)
या बयेला नवर्‍याची आणि शाळेत जाणार्‍या मुलीची सगळी तंत्र सांभाळून चारा चार , पाच पाच तास लायब्ररीत जाऊन वाचन करताना आणि अभ्यास करताना पाहिलं की खरंच कौतुक वाटतं! आपण तर साला शाळेपासूनच साफ ढ होतो! :) आपण फक्त मित्रांसोबत गप्पांचे अड्डे अन् गाण्याच्या तांब्यापितळेच्या मैफली ऐकतच आजपर्यंतचा वेळ घालवला! :)

असो! धनश्री, वरदा, आणि निलिमा या तिघींनीही आपापली कामगिरी उतम बजावली आहे. या तिघीही माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत याचा मला अभिमान वाटतो. आणि या तिघींमुळेच माझ्या चालींना उत्तम न्याय मिळाला असं मी कृतज्ञतापूर्वक म्हणेन!

आपला,
(कालिदसाचा संगीतकार) तात्या अभ्यंकर.

उपक्रमावर चित्रफिती दाखवल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात असे दिसून आले आहे. सध्यातरी यावर उपाय मिळालेला नाही. सर्व सदस्यांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि चित्रफितींचे दुवे द्यावेत. या अडचणीबद्दल संपादन मंडळ दिलगीर आहे.

Comments

सुंदर !

तात्या,
गीत मेघदूत सुंदर लेख (माझ्यासाठी माहिती)संस्कृत कळत नाही,संगीतातले विविध बारकावे माहित नाही.त्यामुळे कालिदासाच्या श्लोकाला दिलेल्या चाली,हंसध्वनी,यमन,बसंत,या बद्दल बोलणे जरी घाईचे होईल.पण कानाला गोड वाटणा-या चाली आहेत इतकेच आमचे ज्ञान त्यामुळे थांबतो आणि आपल्या 'गीत मेघदूत' टीमला पुढील कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देतो .!

अवांतर ;) आगामी मिसळपाव डॉट कॉम येणार केव्हा ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटेसाहेब,

पण कानाला गोड वाटणा-या चाली आहेत इतकेच आमचे ज्ञान

अहो तेच महत्वाचं! गाणं कळावं लागत नाही, तर ते आवडल्याशी कारण! खरं की नाही? :)

माझी आई पुरणपोळी करते. ती कशी करते, काय प्रमाण घेते हे मला कुठे माहीत असतं? पण तरीही मला तिच्या हातची पुरणपोळी अतिशय आवडते! तसंच आहे रागदारीसंगीताचं. ते कळावं लागत नाही, तर आवडावं लागतं इतकंच! :)

अवांतर ;) आगामी मिसळपाव डॉट कॉम येणार केव्हा ! :)

काम सुरू आहे. अहो त्या आमच्या नीलकांताला सध्या जरा सवड नाहीये. तो करतोय ते काम! चांगलं पोरगं आहे हो! स्वभावाने अगदी गरीब अन् विनम्र!

तात्या.

तात्या !

माझी आई पुरणपोळी करते. ती कशी करते, काय प्रमाण घेते हे मला कुठे माहीत असतं? पण तरीही मला तिच्या हातची पुरणपोळी अतिशय आवडते! तसंच आहे रागदारीसंगीताचं. ते कळावं लागत नाही, तर आवडावं लागतं इतकंच! :)
वा ! वा ! तात्या हे मात्र् १०० % मान्य.
अहो मला देखील काही संगीत शास्त्रातील काही कळत नाही पण जे कानाला आवडेल तेच आमच्या मनाला आवडते.
जसा तुमचा हा दुवा श्लोक दुवा मला आवडला.
तात्या येतो तुमच्या कडे एक दिवशी व बसू तुम्ही शिकवा काहीतरी व मी शिकतो तुमच्या कडून काही तरी !

अहो त्या आमच्या नीलकांताला सध्या जरा सवड नाहीये. तो करतोय ते काम! चांगलं पोरगं आहे हो! स्वभावाने अगदी गरीब अन् विनम्र!

हा किती संकेतस्थळाचे काम तो पाहणार आहे त्यालाच ठाऊक.
;)

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

कुठे मिळेल का?

हेच!
बिरुटेसाहेब म्हणालेच आहेत... आम्ही सहमत म्हणतो इतकेच!

बाकी लेख आवडला...
"श्लोक आपकी खिदमत मे" हे खास!

मेघदूत मराठी मध्ये वाचावे अशी अशी मनिषा जागृत झाली आहे.
(आम्ही सुसंस्कृत नाही त्यामुळे माय मराठीला पर्याय नाही!)

जालावर कुठे मिळण्याची शक्यता?
कृपया दुवा द्याल का?

आपला
गुंडोपंत

मेघदूत वाचावे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. गुंडोपंत यांसी,
सप्रेम नमस्कार.
सहृदय रसिकाला मेघदूताचे आकर्षण वाटतेच. त्यामुळे मेघदूत वाचण्याची मनीषा तुमच्या मनात जागृत झाली हे सहजिकच आहे.
मेघदूत हे काही महाकाव्य नव्हे. ते एक खण्डकाव्य आहे. त्यातील पूर्वमेघात ६४ श्लोक +उत्तरमेघात ५४ श्लोक असे केवळ १२८ श्लोक आहेत.प्रत्येक श्लोक चार ओळींचा असून मन्दाक्रान्ता वृत्तात आहे.हे लिहायचे कारण असे की मराठी भाषांतरासह मेघदूताचे पुस्तक साधरण १०० पानांचे असते. ते आपण वाचू शकतो. (फार मोठा ग्रंथ असेल तर कंटाळा येईल.) माझ्याकडे
डॉ. सी.डी देशमुख यांनी केलेले मराठी भाषांतर आहे. ते ९६ पानी आहे.किं.५० रु, सरिता प्रकाशन, पुणे १६.
विचारणा केली असता समजले की मेघदूताची मराठी भाषांतरे ३७ आहेत. त्यांतील सर्वच उपलब्ध नसतील. पण शांताबाई शेळक्यांचे उपलब्ध असावे. चिंतामणराव देशमुखांचे आहेच.
पण खरी अडचण अशी आहे की ही सर्व भाषांतरे पद्यात आहेत. सीडींचे समजण्यास क्लिष्टच आहे.
तेव्हा पुस्तकालयात जाऊन प्रत्यक्ष पाहून,वाचून योग्य ते घ्यावे हे चांगले.श्री. शैलेश यांचे मनोगतावर असलेले मी वाचले. त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे,प्रशंसनीय आहे. पण माझ्यामते समाधानकारक नाही. त्यानी शब्दशः गद्य भाषांतर केले असते तर
अधिक उपयुक्त ठरले असते असे माझे मत आहे.असो.
......आपला ..यनावाला

हा कोणता दूत?

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
गीत मेधदूत ..१

तात्या हा कोणता दूत?

तोच

तोच असावा...
सुमेध... अश्वमेध वगैरे म'ध'ला... ;)

आपला
धुंडोपंत

म्हणजे?

आपला प्रश्न समजला नाही! मी चुकून मेघदूतच्या ऐवजी मेधदूत लिहिलंय असं आपल्याला म्हणायचं आहे का?

ज्या हिरिरीने ही लेखनातली चूक दाखवून दिलीत, त्याच हिरिरीने गीतमेघदूताच्या दुसर्‍या भागातल्या श्लोकांच्या चालींबद्दल बरेवाईट मत लिहिले असतेत तर खूप मोठे ठरला असतात तुम्ही प्रमोदराव!

असो..

तात्या.

तसे नसल्यास...

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
खरा प्रकार काय आहे हे आपण सांगावे अशी विनंती! कारण 'मेधदूत' चा अर्थबोध झाला नाही.
तसदीबद्दल क्षमस्व!

खरा प्रकार..

खरा प्रकार काय आहे हे आपण सांगावे अशी विनंती! कारण 'मेधदूत' चा अर्थबोध झाला नाही.
तसदीबद्दल क्षमस्व!

आपण बर्‍यापैकी सेन्सिबल असाल असा माझा समज होता, त्यामुळे मेघदूताऐवजी मेधदूत ही टायपिंगची चूक आपण समजून घ्याल अशी अपेक्षा होती!

असो, या विषयावर मी अधिक काही बोलूही इच्छित नाही!

तात्या.

प्रवचन

तात्या लेखाचा हा भाग पहिल्या भागाइतका जमला नाही असे प्रामाणिकपणे वाटते. ह.भ.प. तात्यामहाराजांनी प्रवचन सांगावे तसा सगळा मामला झालाय. शिवाय मध्ये मध्ये मनोगताचे लावलेले पाल्हाळ अनावश्यक आहे असे वाटते.

यू-ट्यूब अग्निभिंतीआड असल्याने गाणे ऐकता आले नाही. मात्र ते चांगलेच असेल यात काही शंका नाही. :)

______

कर्णा,

तात्या लेखाचा हा भाग पहिल्या भागाइतका जमला नाही असे प्रामाणिकपणे वाटते.

तुझ्या प्रामणिक मताबद्दल मनापासून आभार..

ह.भ.प. तात्यामहाराजांनी प्रवचन सांगावे तसा सगळा मामला झालाय.

म्हणजे नक्की काय रे बाबा? जरा समजून सांग तरी! :) आणि तशीही मला प्रवचनं करायची सवय आहेच म्हणा! आणि बाय द वे, तुला महित्ये का कर्णा, अरे आजकाल प्रवचनं आणि सत्संग हा सर्वात बेष्ट धंदा झाला आहे! त्यात जाम पैसा मिळतो बाबा! आमच्या गाडगेबाबांसारखे सच्चे लोक आहेत कुठे आता?

शिवाय मध्ये मध्ये मनोगताचे लावलेले पाल्हाळ अनावश्यक आहे असे वाटते.

खरं आहे! अरे अजून मनोगत मनातून जात नाही बाबा! हम आज भी उससे बहोत मोहोब्बत करते है, और करते रहेंगे! मी तर काल भावनेच्या भरात येऊन मनोगताच्या प्रशासकाला विरोप पाठवून वर्धापनदिनाच्या शुभेच्छाही कळवल्या! :) असो.. मनोगत ही आता माझी कायमचीच भळभळती जखम राहील असे वाटते!

यू-ट्यूब अग्निभिंतीआड असल्याने गाणे ऐकता आले नाही.

धत तेरीकी! मग काय उपयोग? अरे तात्याच्या प्रवचनापेक्षा अन् बडबडीपेक्षा गाणंच महत्वाचं! आणि तेच तू ऐकायला हवं होतंस! कारण जिथे गाणं सुरू होतं तिथे सर्व शब्द संपतात. एखाद्या रागावर दहा पानं लिहून जे काम होणार नाही, ते काम तोच राग ऐकून अवघं दोन मिनिटात होईल!

आपला,
(गाण्या-खाण्या अन् पिण्यातला) पितळी तांब्या.

बरुबर !

हा भाग पहिल्या भागाइतका जमला नाही असे प्रामाणिकपणे वाटते. ह.भ.प. तात्यामहाराजांनी प्रवचन सांगावे तसा सगळा मामला झालाय. शिवाय मध्ये मध्ये मनोगताचे लावलेले पाल्हाळ अनावश्यक आहे असे वाटते.

बरुबर !
मनातला बोलला भाऊ ! तात्याबासंग भांडना पेक्सा बोलाचं कशाला म्हून जीब रेटना !

वा!जियो!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
समयोचित रागयोजना आवडली.

मस्त

तात्या, लेख आवडला. दोन्ही व्हिडिओज मस्त आहेत. श्लोक ऐकत ऐकत लेख वाचून राग बदलताना ओळखता येतो का ते पाहिले, पण एकंदरीत 'रागरंग' काही ओळखता आला नाही :). अर्थात, पुलंनी म्हटल्याप्रमाणे 'मिठाई बनवता येण्यापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक भाग्याची' :)

क्या बात है..

अर्थात, पुलंनी म्हटल्याप्रमाणे 'मिठाई बनवता येण्यापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक भाग्याची' :)

क्या बात है! भाईकाकांचा विजय असो.. :)

--
"स्थितप्रज्ञ दिसतो कसा? अरे स्थितप्रज्ञ ना, तो बघ, तो रस्त्यावरऊन गधा चालला आहे ना, तसा दिसतो स्थितप्रज्ञ! जो कागद आणि आंब्याच्या फोडी एकाच चवीने खातो त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ!" -इति काकाजी, नाटक तुझे आहे तुजपाशी.

वा तात्या

वा तात्या,
निवेदन, संगीत, गायन आणि नृत्य सर्वच अतिशय सुंदर आणि सरस. आपल्या सर्वांचेच कौतूक वाटते. आपले अभिनंदन आणि पुढच्या अश्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना अनेक शुभेच्छा. आणि ते इथे मांडा ही विनंती.
--लिखाळ.

यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्‍यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)

सहमत आहे

निवेदन, संगीत, गायन आणि नृत्य सर्वच अतिशय सुंदर आणि सरस. आपल्या सर्वांचेच कौतूक वाटते.

शास्त्रीय संगीत, गायन आणि नृत्य यातील काही कळत नाही म्हणून फारसे बोलता येत नाही. श्रवणीय आणि देखणा कार्यक्रम वाटला. सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. निवेदन करणार्‍या धनश्रीताईंच्या बोलण्यातली सहजता आणि हुकमीपणा वाखाणण्याजोगा. विषयाची जाण असल्यावरच इतके हुकुमी निवेदन करता येते.

सर्व रसिकांचे आभार..:)

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांचे मनापासून आभार..

राज,

तात्या येतो तुमच्या कडे एक दिवशी व बसू तुम्ही शिकवा काहीतरी व मी शिकतो तुमच्या कडून काही तरी

नक्की! मस्तपैकी बसू, थोडं थोडं तीर्थ पिऊ आणि गाऊ. हम आपको किरानेका यमन सिखायेंगे! :)

गुंड्या,

मेघदूत मराठी मध्ये वाचावे अशी अशी मनिषा जागृत झाली आहे.
(आम्ही सुसंस्कृत नाही त्यामुळे माय मराठीला पर्याय नाही!)

जालावर कुठे मिळण्याची शक्यता?
कृपया दुवा द्याल का?

हो, मी पण तो दुवा शोधतो आहे.

बाबुराव,

मनातला बोलला भाऊ ! तात्याबासंग भांडना पेक्सा बोलाचं कशाला म्हून जीब रेटना !

अरे त्यात काय झालं? भांडुया की मस्तपैकी! अरे इथे तर तात्यावर राग काढण्याकरता पेशल ब्लॉग उघडणारे काही तात्याप्रेमी महाभाग आहेत! :)

प्रियाली, देवकाका, लिखाळराव, आपलेही मनापासून आभार..

आपला,
(आभारी) तात्या.

जालावर मेघदूत

नमस्कार,
मेघदूत पूर्ण कोठे आहे ते माहित नाही.

परंतू मागे एकदा शैलेश खांडेकर हे प्रतिभावान मनोगती, मनोगतावर मेघदूताचा मराठी अनुवाद करत होते ते अचानक स्मरले. तसा शोध घेतला असता मला १ ते २७ या श्लोकांचे दुवे मिळाले. ते खाली चिकटवत आहे.
http://groups.google.com/group/manogat_kavitaa/browse_thread/thread/f7f7...
http://www.manogat.com/node/5680
http://www.manogat.com/node/5832
http://www.manogat.com/node/6028

अजून कोठे काही मिळाल्यास ते वाचण्यास मी सुद्धा उत्सूक आहे.
--लिखाळ.

यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्‍यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)
यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्‍यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)
यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्‍यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)
यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्‍यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)
यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्‍यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)

आत्ता ऐकले

आणि आधीच्या भागाप्रमाणे (गाणे/नृत्य) आवडले. आपले आधीचे आणि आत्ताचे लेखन मी तुलना करता वाचले नसल्याने जास्त काय चांगले ते सांगू शकत नाही. पण शास्त्रीय संगीतातले काही कळत नसूनपण ह्याचे संगीत आवडले इतके नक्कीच सांगतो. एकटे बसलो असता शांतपणात ऐकायला छान वाटले.

धन्यवाद!

गीत मेघदूतः२

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. तात्या यांस सप्रेम नमस्कार.
ज्याची वाट पहात होतो तो कार्क्रमाचा दुसरा भाग आला. दुर्दैवाने मी तो आठवडाभर पाहू शकणार नाही. ऐकू शकेन. पण नृत्यातील मुद्रा लक्षपूरवक पहायला हव्यात. सप्ताहभरात सर्व ठीकठाक होईल. नवा चष्मा मिळेल. तेव्हा पाहीनच. तदनंतर लिहीन. सध्या पडद्याकडे अधिक वेळ पहाण्यास डॉ.ची संमती नाही.असो.
....श्री.तात्या लिहितात ८ महिने आपल्या बायडीचा विरह सहन करणार्‍या यक्षाच्या मनात...पण श्लोकात "कतिचित् मासान् नीत्वा"( काही महिने घालवून) असे आहे. अर्थात कालावधीचा हा मुद्दा गौण आणि अप्रस्तुत आहे.पण तात्या म्हणतात त्या अर्थी आठ महिन्यांचा संदर्भ कुठेतरी असला पाहिजे. त्या निमित्ताने 'मेघदूत' पुन्हा चाळतो.संदर्भ सापडला की लिहितो.
.....तात्या,"कनकवलभ्रंशरिक्तप्रकोष्ठः "हे वाचून एका विडंबन काव्याची काही कडवी आठवली. तुमची संमती असेल तर लिहितो.विडंबन साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकरांनी केलेले आहे.

आंतरजालसम्राट तात्यासाहेबांची परवानगी आहे! :)

विकासरावांचे त्यांच्या प्रतिसादाखातर अनेक आभार. मेघदूताच्या दुव्यांबद्दल लिखाळरावांचेही मनापासून आभार.. आमचा शैलेश खांडेकर हा आहेच मुळी अत्यंत गुणी अन् अभ्यासू मुलगा. त्याचा संस्कृत भाषेचा अभ्यास दांडगाच आहे. मनोगतावर जेव्हा त्याने ही लेखमाला लिहायला घेतली होती तेव्हा सर्वप्रथम आम्हीच त्याला भरभरून प्रतिसाद लिहिला होता असे आठवते!

वालावलकरशेठ,

आपल्यासारख्या संस्कृतप्रेमीचा अन् शब्दप्रभूचा प्रतिसाद वाचून बरे वाटले! अहो शेवटी एका कोकण्याने दुसर्‍या कोकण्याला प्रतिसाद दिला हीच माझ्या मते मोठी गोष्ट आहे! :)

सप्ताहभरात सर्व ठीकठाक होईल. नवा चष्मा मिळेल. तेव्हा पाहीनच. तदनंतर लिहीन. सध्या पडद्याकडे अधिक वेळ पहाण्यास डॉ.ची संमती नाही.असो.

आपल्याला नवीन चष्मा लवकरात लवकर मिळो हीच सदिच्छा! आपल्या विस्तृत प्रतिसादाची वाट पाहात आहे. नृत्यासोबत चाल आवडली किंवा कसे याबाबतही अवश्य लिवा! :)

पण तात्या म्हणतात त्या अर्थी आठ महिन्यांचा संदर्भ कुठेतरी असला पाहिजे. त्या निमित्ताने 'मेघदूत' पुन्हा चाळतो.संदर्भ सापडला की लिहितो

हे मी नाही, तर निवेदिका धनश्रीने आपल्या निवेदनात म्हटलेलं आहे. तिने म्हटलंय म्हणून मी म्हटलंय इतकंच. खरं काय ते आपल्याला माहीत नाय बा! :)

.....तात्या,"कनकवलभ्रंशरिक्तप्रकोष्ठः "हे वाचून एका विडंबन काव्याची काही कडवी आठवली. तुमची संमती असेल तर लिहितो.विडंबन साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकरांनी केलेले आहे.

अरे! अवश्य लिहा की राव! अहो त्यात परवानगी कसली? साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकरांचं विडंबन इथे लिहिण्यास आपल्याला आंतरजालसम्राट तात्यासाहेब अभ्यंकरांची पूर्ण परवानगी आहे! :)

आपला,
(आंतरजालसम्राट तात्यासाहेब अभ्यंकर!) :)

वि सू - 'आंतरजालसम्राट तात्यासाहेब अभ्यंकर' असे गंमतीने म्हटलेले आहे. नाहीतर स्वतःला 'आंतरजालसम्राट' म्हणवून घेतो म्हणून माझ्या काही सच्च्या विरोधकांचं पित्त खवळायचं आणि मराठी जालनिशी विश्वात दोनचार चरचरीत आणि जळजळीत लेखांची भर पडायची! असो..:)

आपला,
(विरोधकांना पुरून उरंणारा!) तात्या.

परवानगी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.तात्या यांचा हा चर्चा प्रस्ताव गीत मेघदूत कर्यक्रमाविषयी आहे.ती चित्रफीत पहावी,नृत्यगायनादिकांचे रसग्रहण ,आस्वादन,त्यातील सौंदर्यस्थळे,वैशिष्ट्य इत्यादिविषयी चर्चा इथे अपेक्षित आहे.
असे असता "मला एक विडंबन आठवले ते लिहिले."तर विसंगत ठरेल.चर्चेत रसभंग केल्याचा दोष माझ्या माथी येईल अशी स्वाभाविक शंका आली. यास्तव अशा विषयांतरा साठी श्री.तात्यांची अनुमती विचारणे आवश्यक वाटले.आता त्यानी परवानगी दिली आहे. लिहितो.

बल्लवदूत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
साहित्यसम्राट न.चिं.केळकर यांचे 'बल्लवदूत' हे मेघदूतावरील विडंबन आहे.थोडक्यात गोष्ट अशी;
.........मुंबईतील एका धनिक बापचा मुलगा कॉलेजच्या अंतिम वर्षाला असताना त्याचे(म्हणजे त्या मुलाचे) लग्न होते.सहजिकच त्याला अभ्यासाला वेळ मिळत नाही. नापास होतो. बाप चिडतो. मुलाचे नाव पुण्यातील कॉलेजात घालतो.तिथे वर्षभर होस्टेलवर रहायचे. मुंबईला यायचे नाही. असे मुलाला बजावतो. मुलगा पुण्यात येतो. पत्नीचा विरह असह्य होतो. होस्टेलचा मेसच्या आचार्‍याच्या हाती बायकोला निरोप पाठवतो. या बल्लवदूतातील काही कडवी.:-
.............................................................................
आणा कानी हृदय जनहो! वृत्त ऐका पुढील |
नेत्रांबूते त्वरित पुसण्या हाती घ्यावे रुमाल |
**
एका पुत्राकडुनी अपुल्या दोष कामात झाला |
तेणे त्याच्या अदय जनका क्रोध अत्यंत आला |
**
बोले"मूढा! प्रणय करिता नित्य नापास होशी |
कान्तेचा त्या विरहचि अता वर्षपर्यंत सोशी |
*
*
*
होई त्याचा मुखशशी फिका बैसती गाल साच |
हातातोनी हळु हळु गळों लागले रिस्टवॉच |
*
......यातील शेवटची ओळ म्हणजे "कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्टः " चे विडंबन.तिथे सोन्याचे कडे आहे . इथे सोन्याचे घड्याळ!

सुरेख

तात्यासाहेबांच्या काव्याला आणि आपल्या रसिकतेला दाद द्यावी तेवढी थोडीच.

मस्त! ;)

बोले"मूढा! प्रणय करिता नित्य नापास होशी |
कान्तेचा त्या विरहचि अता वर्षपर्यंत सोशी |

विडंबन मस्तच आहे! :)

धन्यवाद वालावलकरशेठ!

तात्या.

हा हा हा

हे विडंबन भलतंच धमाल आहे.

नेत्रांबूते त्वरित पुसण्या हाती घ्यावे रुमाल
हातातोनी हळु हळु गळों लागले रिस्टवॉच

ह ह लो पो. आता हे विडंबन कुठूनतरी मिळवून वाचायला हवे.
राधिका

सेफ गेम..:)

असे असता "मला एक विडंबन आठवले ते लिहिले."तर विसंगत ठरेल.चर्चेत रसभंग केल्याचा दोष माझ्या माथी येईल अशी स्वाभाविक शंका आली.

आयला!

यनावालाशेठ, तुम्ही तर फारच सेफ गेम खेळता बुवा! अहो आम्ही तर बिनधास्त विषयांतर वगैरे करून मोकळे होतो. अर्थात, त्यामुळे आमच्या माथीही अनेक दोष येतात म्हणा, पण त्याची साला कोण पर्वा करतो? मराठी माणूस हा एकमेकांना दोष देणारच! :)

त्यामुळे दोषांचे विशेष काही वाटत नाही! :)

आपला,
(माथी अनेक पापं घेऊन मराठी संकेतस्थळांवर वावरणारा) तात्या.

पुन्हा समर्थन

मेघदूताच्या दुव्यांबद्दल लिखाळरावांचेही मनापासून आभार.. आमचा शैलेश खांडेकर हा आहेच मुळी अत्यंत गुणी अन् अभ्यासू मुलगा.

ह्यावर आम्ही दिलेला एक निरुपद्रवी प्रतिसाद प्रशासनाने का उडवला ते कळल्यास मंडळ आभारी राहील.

मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

संपादकिय पुस्ती: उपक्रमी सदस्यांबद्दल चौकशी करणारे प्रतिसाद जाहिर स्वरुपात देण्यापेक्षा सदस्यांनी खरडवही आणि व्यक्तिगत निरोप या सुविधांचा वापर करावा. सर्व सदस्यांनी सहकार्य करावे ही विनंती.

वा

मला राग, मध्यम वगैरे काही समजत नाही. पण वाचायला आवडले. आपल्याला संस्कृत आवडले हे पाहून खूप आनंद झाला. :ड्
राधिका

धन्यवाद,

धन्यवाद मॅडम,

तुझ्यासारख्या संस्कृतच्या विदुषीने दाद दिली त्याचे बरे वाटले.

आपल्याला संस्कृत आवडले हे पाहून खूप आनंद झाला.

संस्कृत आवडले किंवा नाही हे माहीत नाही, परंतु कालिदास मात्र खूपच आवडला. आता केवळ कालिदास समजून घेण्याकरता, आणि त्याच्या प्रतिभासंपन्न काव्याचा, मेघदूताचा आस्वाद घेण्याकरता संस्कृत शिकावं लागणार असं दिसतंय! :)

राधिका, मी मागे एकदा वालावलकरशेठना एक विनंती केली होती, तिच आता तुलाही करतो. आमच्यासारख्या लेम्यॅन मंडळींना संस्कृत भाषेची तोंडओळख होईल, किंवा 'कमल नमन कर', 'अजय भजन कर', 'मुलांनो आंबे खा', 'आम्ही चौपाटीवर भेळ खाल्ली' यासारखी काही सोपी सोपी वाक्ये संस्कृतमधून कशी लिहावीत, बोलावीत हे सांगणारी एखादी लेखमाला तुम्ही इथे लिहिलीत तर बरं होईल म्हणजे आमच्यासारख्या मंडळींनाही संस्कृत भाषेची गोडी लागेल आणि ती भाषा शिकता येईल.

(की सदर लेखमाला मिसळपाव डॉट कॉम वर सुरू करावी म्हणतेस?:)

असो, शाळेत संस्कृत शिकायचा प्रयत्न केला होता पण तेव्हा त्यातल्या व्याकरणाची भयंकर भिती वाटली होती ती आजपर्यंत टिकून आहे! :)

असो, तू माझ्या विनंतीचा विचार करशील अशी अपेक्षा करतो..

अवांतर - काही कट्टर मनोगतींनी इथे जाहीर न लिहिता व्य नि पाठवून आम्हाला दाद दिली आहे, त्यांचेही आभार..:)

तात्या.

अनुमोदन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
राधिका मॅडॅम समोर श्री. तात्या यांनी एक प्रस्ताव मांडला आहे तो असा:
आमच्यासारख्या लेम्यॅन मंडळींना संस्कृत भाषेची तोंडओळख होईल, किंवा 'कमल नमन कर', 'अजय भजन कर', 'मुलांनो आंबे खा', 'आम्ही चौपाटीवर भेळ खाल्ली' यासारखी काही सोपी सोपी वाक्ये संस्कृतमधून कशी लिहावीत, बोलावीत हे सांगणारी एखादी लेखमाला तुम्ही इथे लिहिलीत तर बरं होईल म्हणजे आमच्यासारख्या मंडळींनाही संस्कृत भाषेची गोडी लागेल आणि ती भाषा शिकता येईल.
...माझे या प्रस्तावाला अनुमोदन आहे.......यनावाला

अनुमोदन

आमच्यासारख्या लेम्यॅन मंडळींना संस्कृत भाषेची तोंडओळख होईल, किंवा 'कमल नमन कर', 'अजय भजन कर', 'मुलांनो आंबे खा', 'आम्ही चौपाटीवर भेळ खाल्ली' यासारखी काही सोपी सोपी वाक्ये संस्कृतमधून कशी लिहावीत, बोलावीत हे सांगणारी एखादी लेखमाला तुम्ही इथे लिहिलीत तर बरं होईल म्हणजे आमच्यासारख्या मंडळींनाही संस्कृत भाषेची गोडी लागेल आणि ती भाषा शिकता येईल.

बाबूरावचे या प्रस्तावाला अनुमोदन आहे...........बाबूराव

बाबूराव

प्रस्ताव

यासारखी काही सोपी सोपी वाक्ये संस्कृतमधून कशी लिहावीत, बोलावीत हे सांगणारी एखादी लेखमाला तुम्ही इथे लिहिलीत तर बरं होईल म्हणजे आमच्यासारख्या मंडळींनाही संस्कृत भाषेची गोडी लागेल आणि ती भाषा शिकता येईल.

हा तात्यांचा प्रस्ताव आणि त्यावरची अनुमोदने (अनुमोदनचे अनेकवचन असेच करायचे का?) आता वाचली त्यामुळे उत्तर द्यायला थोडा उशीर होतो आहे.
आपला प्रस्ताव खूपच चांगला आहे, परंतू तो पूर्ण करण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. मला संस्कृत 'बोलता' येत नाही. मी संस्कृत वाचू शकते, थोडेफार समजतेही. म्हणजे थोड्या प्रयत्नाने मला बोलताही येईल पण ते शिकवता येणार नाही. मुख्य म्हणजे संस्कृत भाषेचे व्याकरण व ही भाषा कशी काम करते, तिचे सौंदर्य कशात आहे, हे जाणून घ्यायला मला आवडते. एखादी भाषा चालते कशी यासाठी ज्याप्रकारचा अभ्यास करावा लागतो त्याहून वेगळ्या प्रकारचा अभ्यास ही भाषा कशी वापरावी यासाठी करावा लागतो. मी पहिल्या प्रकारचा अभ्यास करते आहे, दुसर्‍या प्रकारचा नाही. यनावालामहोदय, धनंजयमहोदय, वरदा यांपैकी ज्यांनी या दुसर्‍या प्रकारे अभ्यास केला असेल त्यांच्याकडे हा प्रस्ताव मांडणे उचित राहील.

राधिका

आठ महिने

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. तात्या यांच्या विधानाच्या संदर्भात मेघदूत पुन्हा चाळले. उत्तरमेघात (मेघदूताचे पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे दोन भाग आहेत) :
शापान्तो मे भुजगशयनादुत्थिते शार्ङ्गपाणौ |
शेषान्मासान्गमय चतुरो लोचने मीलयित्वा |
...........
अर्थ : श्रीविष्णू (चातुर्मास्यनिद्रा संपवून) शेषशय्येवरून उठतील तेव्हा माझ्या शापाचा शेवट होईल. (म्हणून) उर्वरित चार महिने तू डोळे मिटून घालव.
.............
हा यक्षाचा त्याच्या पत्नीस निरोप आहे. विरहाचे चार महिने उरले म्हणजे आठ महिने गेले. या वरून तात्यांचे विधान पुराव्यानिशी खरे आहे.

खतरनाक, जबरी

अत्यंत प्रतीभावान अश्या कालीदासाला (त्याच्या विशाल कल्पनाशक्तीची मदत असून) देखील ह्या पुढे काही शतकांनी (मला माहीत नाही किती साली हे महानुभाव होते खूप खूप वर्षांपुर्वी असतील असे वाटते म्हणून शतके लिहीले.) तर अशा ह्या श्रेष्ठ साहीत्यकाराला स्वप्नात तरी वाटले असेल का की, खूप काल लोटल्यावर काही हरहुन्नरी मंडळी माझ्या काव्यावर कार्यक्रम करतील, त्यातील भाग "चित्रीत"करुन कोणी "आंतरजालावर" टाकेल. त्यातील ८ महीने असलेल्या विरह कालावधीबद्दल काही क्षण संदेह निर्माण होईल व चटकन श्लोक वाचुन कोणीतरी पंडीत शंकानिरसन करतील :-)

वा!

त्यातील ८ महीने असलेल्या विरह कालावधीबद्दल काही क्षण संदेह निर्माण होईल व चटकन श्लोक वाचुन कोणीतरी पंडीत शंकानिरसन करतील :-)

क्या बात है..:)

तात्या.

नवरत्ने

मला माहीत नाही किती साली हे महानुभाव होते खूप खूप वर्षांपुर्वी असतील असे वाटते म्हणून शतके लिहीले.

कालिदासाच्या काळाबद्दल अनेक शंका आहेत तरी सुप्रसिद्ध आख्यायिकेनुसार तो राजा विक्रमादित्य (तोच तो, सिंहासन बत्तीशी, वेताळ पंचविशी आणि शालिवाहनाने पराभूत केलेला) याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक मानला जातो. काळ अदमासे ख्रि. पू. १ ले शतक. अर्थात ही आख्यायिका गणली जाते.

इतर काही तज्ज्ञांच्या नुसार तो गुप्तकालीन राजा विक्रमादित्याच्या पदरी असल्याचे म्हटले जाते.

"तन्वी श्यामा शिकरिदशना..." चे इंग्रजी रूप्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
(हे थोडे विषयांतर आहे. पण श्री.तात्या यांची अनुमती गृहीत धरून लिहितो.)
मागे लिहिल्या प्रमाणे मेघदूत पुन्हा चाळताना "तन्वी श्यामा शिखरिदशना..."हे यक्षपत्नीचे बहुपरिचित वर्णन पुन्हा वाचले.
माझ्या जवळील मेघदूतात प्रत्येक पानावर संस्कृत, मराठी (डॉ.सी.डी. देशमुख) आणि इंग्रजी अशी तीन पद्ये आहेत.(गद्य अनुवाद नाही.)इंग्रजी पद्य मी अद्यापि वाचलेच नव्हते.पण या श्लोकाचे भाषांतर सहज वाचले.ते पुढील प्रमाणे आहे.:
.......................................................................................

द सुप्रीम वुमन फ्रॉम गॉडस् वर्कशॉप गॉन-
यंग,स्लेंडर,लिटल टीथ,अयँड रेड रेड लिप्स,
स्लाइट वेस्ट अयँड जंटल आईज ऑफ टिमिड फॉन,......(एफ-ए-डब्लू-एन्..हरिणीचे पाडस)
अयॅंड आय्ड्ली ग्रेसफुल मुव्हमेंट, जनरस हिप्स,
फेअर बॉसम इंटु व्हिच द स्लोपिंग शोल्डर स्लिप्स् .

....................
तर असे हे इंग्रजी रूप!
..................
अशी वर्णने अभिजात संस्कृत साहित्यात ठायी ठायी आढळतात.याला अश्लील मानले जात नाही.यक्ष आपल्या पत्नीचे वर्णनः"श्रोणीभारादलसगमना" असे करतो.

यथावकाश,

वालावलकरशेठ,

तन्वी शामा हा श्लोकही मी यथावकाश येथे देईनच!

आयला! यक्षाने आपल्या बायकोचं लय भारी वर्णन केलं आहे हो! आपण तर साला वाचूनच खल्लास झालो! :) चामारी या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे बायको असावी! :)

(आपली नाही हो, शेजार्‍याची! :))

आपला,
(चावट) तात्या.

शास्रीय संगीत

कुणाला शास्त्रीय संगीत महाजालाहून उतरवून घ्यायचे असल्यास ऑरकुट वर इन्डीयन क्लासिकल म्युझीक नावाचा कट्टा आहे. तेथे भरपूर दूवे मिळतील.
नीलकांत

वा... तात्या.

अप्रतिम.. आणि हो संगिताचा थोडासा अभ्यास् केला असल्याने राग् केदार आणि बसंत समजले.
आपण अष्टावधानी आहात ..
निवेदन, गायन आणि नृत्य सगळच सुंदर. बाकीच्या श्लोकांचे ही असे दुवे मिळाले तर बरं होईल तात्या..

आपली,
प्राजु

लवकरच..

निवेदन, गायन आणि नृत्य सगळच सुंदर. बाकीच्या श्लोकांचे ही असे दुवे मिळाले तर बरं होईल तात्या..

धन्यवाद, बाकीच्या श्लोकांचे दुवेही लवकरच देणार आहे...

तात्या.

 
^ वर