एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक अती त्रोटक ओळख

एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक अती त्रोटक ओळख

साधारण पणे एखाद्या कंपनीमध्ये वेगवेगळे विभाग कार्यरत असतात. प्रत्येक विभागाची एक कार्य पद्धती असते. पण हे विभाग कोणत्याही व्यवसायात असले तरी साधारण पणे एकच काम करत असतात. म्हणजे विक्री विभाग ग्राहक मिळवणे व ग्राहकाची मागणी उत्पादन विभागाकडे देणे. हे काम सगळीकडेच सारखे आहे. कदाचित त्याचे स्वरूप काहीसे बदलत असेल पण काम तेच उरते. पुढे उत्पादन विभागाने उत्पादन गोदामात आहे का ते तपासणे नसल्यास खरेदीविभागाला कळवणे. उत्पादन गोदामात असल्यास वाहतूक विभागाला कळवून शिपींग वगैरे ची व्यवस्था करायला सांगणे.

ऐंशी च्या दशकात प्रत्येक विभाग आपले काम चालवण्यासाठी आपली स्वतःचे प्रणाली वापरत होता. या प्रणाल्या त्या त्या कामांसाठी बनवलेल्या होत्या. त्यांना ते काम कंपनीच्या व्यवसाय पद्धतीप्रमाणे करण्यासाठी विकसीत केले गेले होते. याचे काही चांगले भाग होते की, व्यवसायाच्या त्या विभागाला लागणारे योग्य ते स्वातंत्र्य त्या त्या विभागाला होते. पण त्याच बरोबर हे विभाग एखाद्या बेटासारखे होते.
वेगळे विभाग वेगळी प्रणाली
म्हणजे जर लेखा विभागाला विक्री विभागाची माहिती हवी असेल तर मिळायची - ती गरजच आहे. पण त्यांना तंत्रज्ञान विभागाची माहिती मिळण्याची सोय नव्हती. थोडक्यात दोन प्रणाल्या एकमेकांशी पुर्णपणे संवाद साधू शकत नव्हत्या. याचा व्यवसायाच्या संपूर्ण कार्यावर परिणाम होत होता.

यावर उपाय म्हणून व्यवसायाचे सर्व विभाग एकमेकांशी जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. यामध्ये व्यवसायाचा मुख्य गाभा असलेली माहिती एका ठिकाणी ठेवायची आणि इतर ती माहिती खणून पाठवण्याची यंत्रणा वेगळी ठेवायची अशी कल्पना उदयाला आली.
सगळ्या व्यवस्था एका प्रणाली खाली

या पद्धतीमध्येही काही दोष होतेच. एकूण एकावेळी किती लोक मुख्य गाभ्या ला जाणार याला मर्यादा होती. मग पुढची पायरी म्हणजे तीन स्तरीय व्यवस्था. यात गाभा वेगळा ठेवायचा, गाभा पाठवायला म्हणून एक स्वतंत्र यंत्रणा द्यायची आणि वापरकर्ते वेगळे करायचे असे झाले. यामुळे जास्त लोकांना मुख्य माहितीसाठ्या पर्यंत जाण्याची सोय झाली. पण अर्थात प्रत्येक वापरकर्त्याची किंमतही वाढतीच होती आणि आहे. सगळे विभाग एकमेकांशी बोलतील अशी प्रणाली विकसीत झाली.

परंतु काही व्यवसायांना सगळ्या प्रणालीची गरजही भासत नव्हती. मग गरजे प्रमाणे हवे ते विभाग बनवले गेले. हे विभाग सहजतेने जोडता येतील (प्लग अँड प्ले) अशी व्यवस्था केली गेली.

आता एक प्रणाली तयार झाली. पण आधीच्या वेगवेगळ्या विभागाच्या माहितीसाठ्यांना व प्रणाल्यांना (ओरॅकल, आय बी एम वगैरे) सामावणे महत्त्वाचे होते. ते करण्यासाठी या प्रणालीला बोलते केले गेले. म्हणजे टिसिपीआयपी व जावा या द्वारे इतर प्रणाल्या बोलता येणे शक्य झाले. याचा फायदा असा झाला की महाजाल वापरून व्यवसायाचे काम जागतिक स्तरावर करणे सुलभ झाले.

या विषयावर काम करण्यासाठी जर्मनीमध्ये साधारणपणे ८०च्या दशकात आय बी एम मधले काही संगणक तज्ञ एकत्र आले व त्यांनी व्यवसायाला एकत्र बांधण्यासाठी एक प्रणाली विकसित करायला सुरुवात केली. हे काम करण्यासाठी त्यांना सोपी भाषा मिळेना तेव्हा त्यांनी आपलीच भाषा लिहून काढली. ए.बी. ए. पी. नावाची. सद्या या भाषेची चौथी पिढी वापरली जाते आहे. ही भाषा वापरून त्यांनी लिहिली सॅप प्रणाली लिहिली.

-निनाद
(लेख घाईत लिहिला आहे. शिवाय मी यात तज्ञ नाही... तेंव्हा सांभाळून घ्या... मला समजलेली एखादी संकल्पना योग्य नसल्यास कृपया सुधारा!)

Comments

छान

निनाद, असे विषय इथे येणे गरजेचे आहे. लेख अती त्रोटक आहे हे खरे. पण या विषयाचा आवाका पण खुप मोठा आहे. यात कोणी तज्ञ असतील तर त्यांनी लेखन करावे हि विनंती. उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन हा सुद्धा असाच एक विषय आहे. लिहायचे आहे. पण जमणे अवघड वाटते आहे.





मराठीत लिहा. वापरा.

हो!

उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन - नक्की लिहा.
उपयोगी होईलच यात शंका नाही.
मलाही लिहितांनाच कळले की की आपल्याला काय समजले आहे नक्की.
खुपश्या गोष्टी नंतर वाचल्यावर समजताहेत.
असो!
-निनाद

लेख

लेख चांगला उतरला नाहीये असे दिसते आहे. घाईघाईमध्ये लिहिण्याचा परिणाम... :(

असो,

हा विषय मोठा आहे. यावर खरं एक लेख माला होवू शकते. पण जसे जमेल तसे. शिवाय दर वेळी पॉवर पॉईंट मध्ये स्लाईड बनवा मग ती फ्लिकर वर टाका हा भागही आहेच. त्यात मला रेसोर्स साठी मराठी शब्द सापडत नाहीये. मागच्यावेळी इतिवृत्त हा शब्द सुचवणार्‍या नारदाचा पत्ता नाहीये कुठे! असं खरं अनेकच शब्दांचं झालं. खुपदा इंग्रजी शब्द वापरायचा मोह टाळला आहे, पण हे लेखन जर वाचह्ण्यायोग्यच नसेल तर ईंग्रजी शब्द योजनाच करणे योग्य राहील. पण आपले सगळ्यांचे मत यावर महत्वाचे वाटते आहे मला.

लेखन माहितीयोग्य आहे असे वाटत असेल तरच पुढचा भाग लिहितो.

पुढचा भाग 'बरा लिहायचा' प्रयत्न करेन हे आश्वासन देतो.

-निनाद

सामुग्री ?

लिखाण उत्तम, आवडले.

रिसोर्स् = सामुग्री ?
अगदी चपखल नाही, सर्व छटा व्यक्त होत नाहीत असे वाटते. पण सावरकर म्हणायचे की शब्द निवडून वापरायला लागा म्हणजे त्याला छटा आपोआप येतील.
(आणखी चांगला प्रतिशब्द मिळायची वाट पाहूया.)

- दिगम्भा

अगदी

अगदी हाच शब्द होता माझ्या मनात पण तो मेळ खात नाही बरोबर्.
असेही इ आर पी मधे आता फक्त एंटरप्राइज उरले आहे. रिसोर्स - विसरा!
प्लानिंगन इंप्लिमेंटेशन केलेल्यांना विचारा काय हाल असतात ते.
नवीनचह शब्द काढला पाहिजे या टर्म साठी!

अजून सुचवा काही???

-निनाद

उद्यम

एंटरप्राईज ला उद्यम वापरून पाहा, आन्थ्रोप्रेन्योर्शिप (कायपण हे फ्रेन्च!) साठी आपण उद्योजकता वापरतोच. (उद्योग म्हणजे इंडस्ट्री होईल :( )

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

येऊ द्या.

पण हे लेखन जर वाचह्ण्यायोग्यच नसेल तर ईंग्रजी शब्द योजनाच करणे योग्य राहील

सहमत. अशक्य असेल तर इंग्रजी शब्द वापरा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. ;) अजून माहिती वाचायला आवडेल.

खालील पुस्तक ईआरपी-एमआरपी साठी अतिशय उत्तम आहे.

- ईआरपीकर्ण


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

ठीक

चांगले जमले आहे. बर्‍यापैकी माहिती कळली. 'लेखा विभाग' म्हणजे 'अकाउंट विभाग' का 'डॉक्युमेंटेशन टीम' याबाबत जरा मनाचा गोंधळ झाला.
लेख चांगला आहे पण विस्तार हवा. भाग २, ३ इ.इ. येणार आहेत ना?

'लेखा विभाग' म्हणजे 'अकाउंट विभाग'

'लेखा विभाग' म्हणजे 'अकाउंट विभाग' असेच म्हणायचे होते मला.
त्या विभागाल लेखा विभागच म्हणतात. बहुदा हा शब्द हिंदीतून आला आहे आपल्या कडे.
अर्थात इतर कोणता घेतला तरी हरकत नाही..!

हो हो पुढील भाग टकण्याची मनिषा आहे. पाहु या कसे जमते ते.

-निनाद

आधी

आधी एक तुम्ही नक्की कशावर लिहिता आहात यावर एक प्रिअँबल लिहा... म्हणजे माझ्यासारख्या माठांच्या डोक्यात काही तरी शिरेल.

मला फक्त इतकेच कळले की,
आधी वेगवेगळी डिपार्टमेंट होती त्यांची वेगवेगळी माहीती एकाच छपराखाली आणली. त्यामुळे ती कुणालाही कुठेही पाहता यायला लागली... बरोबर?

म्हणजे आधी लोटस वन् टू थ्रि होते, वर्ड स्टार ७ होते शिवाय मोठी नावे लिहायला बॅनर नावाचा एक प्रोग्राम होता. कुणाला आठवते आहे का हे? २८६ चा काळ!!! .२५ रॅम म्हणजे मोठी गोष्ट होती राजा तो काळ आहे हा!
असो, मा.सॉ. ऑफीस मध्ये ते सगळे एकत्र मिळाले तसेच तुमच्या इआरपी मध्ये सगळे डिपार्टमेंट एकत्र असेच ना? पण मग यात बर्‍याच भानगडी असणार हो! इतके काही सोपे नसणार...

मी माझे काम कशाला पाहु देईन इतरांना? आणी माझ्या खालच्यांना पण??
छट!! तुम्हीच ठेवा तुमची नवीन सिस्टीम! कोण शिव्या खाईल? आणी सगळ्यांना कळणार गुंडोपंताला काही काम येत नाही ते ;)

आपला
काम चुकार
गुंडोपंत

वा!

वा!
संकल्पना मोजक्या शब्दात मांडल्या बद्दल धन्यवाद!

तुमच्या इतर प्रश्नांना इंप्लिमेंटेशन या भागात नक्की उत्तर देईन!
पण मुख्यतः कंपन्यांध्ये इंप्लिमेंटेशन १२च्या भावात जाण्यामागे हीच भावना असते... असावी.

-निनाद

स्तुत्य उपक्रम

निनादराव, अश्या आधुनिक विषयाविषयी माहिती देण्याचा आपला उपक्रम कौतुकास्पद आहे. यावर अधिक विस्ताराने लिहावे अशी विनंती.
आपला
(वाचक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

सहमत

वाचक वासुदेवांशी सहमत आहे. लेख/लेखमालिका अतिशय उपयोगी आहे. पुढील भागांची प्रतीक्षा आहे.

काही कळले नाही.

लेखा विभागाच्या कामाच्या पध्द्ती,संगणकाच्या प्रणाली बद्दल,की व्यवस्थापनाबद्दल चर्चा आहे,
काहीच कळले नाही.पण या विषयातले जाणकार म्हणताहेत लिहा,तर लिहा !

चांगली माहीती

निनाद,

चांगला लेख आहे जरी आपणच म्हणल्याप्रमाणे त्रोटक असला तरी. अशी माहीती मराठीत संकलीत होणे आवश्यक वाटते.

उपक्रम आवडला

लेख आवडला. त्रोटक असला तरी तो योग्य लांबीचा आहे असे वाटले. लेखाचे पुढील भाग लिहावे परंतु लांबी हीच ठेवावी (किंवा थोडीफार जास्त), जेणेकरून लोकांना ते किचकट वाटणार नाहीत. मराठी चित्रांनी लेखाची शोभा वाढवली.

आता एक फुकटची सूचना:

लेख मराठीत असल्याने मराठी शब्द वापरणे योग्यच आहे परंतु रोजच्या जीवनात लेखा विभाग यासारखे शब्द वापरत नसल्याने वाचकाची सुई अशा शब्दांवर अडकून राहणे साहजिक वाटते. असे झाल्यास लेखातील मुख्य आशय हरवतो. अर्थात, म्हणून लेखात सरळसरळ इंग्रजी शब्दांचा भडिमारही योग्य नव्हे. यावर सुवर्णमध्य म्हणून लेखा विभाग (अकाउंट्स डिपार्टमेंट) असे कंसात इंग्रजी शब्द टाकल्यास वाचकांच्या मनात शंका उरणार नाही असे वाटते.

सहमत

सुवर्णमध्य म्हणून लेखा विभाग (अकाउंट्स डिपार्टमेंट) असे कंसात इंग्रजी शब्द टाकल्यास वाचकांच्या मनात शंका उरणार नाही असे वाटते. या बद्दल सहमत.





मराठीत लिहा. वापरा.
 
^ वर