गौतमीपुत्र शातकर्णी

खुलासा: खालील माहितीला लेखाचे स्वरूप देण्यात आले तरी ती अतिशय अपुरी माहिती आहे त्यामुळे सदस्यांनी त्याकडे चर्चेच्या नजरेतून पाहावे ही विनंती. लेखातील काही नावे इंग्रजी लेखांतून घेतल्याने त्यांचे योग्य उच्चार लिहिले गेले नसल्यास, ते सुधारून देण्यात मदत करावी. या राजघराण्याबद्दल कथा, आख्यायिका वाचल्या असतील तर सदस्यांनी त्या येथे नमूद कराव्यात.

----

महाराष्ट्राला संपन्न इतिहास आहे असे बरेचदा वाचनात येते. प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारच थोडक्यात आपल्याला शिकवला जातो किंवा फारच कमी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, यादव आणि सातवाहन राजघराण्याविषयी त्रोटक इतिहास नजरेस पडतो. या राजघराण्यांनीही आपापल्यापरीने आपले राज्य सांभाळले आणि वाढीस नेल्याचे दिसते परंतु समग्र इतिहास सहज नजरेस पडत नाही. बरेचदा, या राजांविषयी अधिक माहिती काढायची झाल्यास पुराणांचा आधार घ्यावा लागतो. मराठी साहित्यात या राज्यांविषयी लिहिले गेले असण्याची शक्यता आहे परंतु महाजालावर समग्र लेखन दिसत नाही.

यांतील सर्व राजघराण्यांपैकी सातवाहन राजघराण्याची आठवण आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या नेहमीच काढत असतो. आजही वापरात असलेली शालिवाहन शके ही दिनमान पद्धती या राज्यकाळात सुरू झाल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या इतिहासात या राजघराण्याचे स्थान कोणते हे माहित करण्यासाठी काही वाचन केले त्याचा गोषवारा येथे देत आहे -

सातवाहन राजघराणे

सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिल्याचे पुरावे मिळतात. त्यानुसार मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले (बहुधा किल्ले) आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वत: अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्‍यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत वाढत गेली.

सातवाहन राज्य

अधिक माहितीसाठी विकिपीडियाचा हा दुवा पाहावा. याच दुव्यात पुढे या राजघराण्याचा उल्लेख कोणकोणत्या पुराणांत आला आहे त्याची उदाहरणे दिसतात. या राजघराण्यातील महत्त्वांच्या राजांपैकी गौतमीपुत्र शातकर्णी एक महत्त्वाचा राजा मानला जातो.

गौतमीपुत्र शातकर्णी (उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. .

गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्लव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.

अपरांत, अनुप*, सौराष्ट्र, कुरुक, अकारा* आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नाहपण* या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.

आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नाहपण राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नाहपणाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वागवत होता असे वाचायला मिळते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.

शातकर्णीचा चेहरा असलेली नाणी

गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजराथ आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. नंतर ७८ वर्षांनी ही कालगणना सुरू झाल्याने ग्रेगरीयन कॅलेंडरपेक्षा ७८ वर्षे उशीराने सुरू होते.

या राजाबद्दल नाशिक येथे खुद्द त्याची आई गौतमीच्या सांगण्यावरून आपल्या मुलाची स्तुती करणारा शिलालेख कोरलेला आढळतो, त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --

"क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहर्त *(kShaharat) घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."

मराठी विकिपीडियावर मला या राजाची कथा सांगणारा एक भाग मिळाला. तो येथे चिकटवत आहे..

शालिवाहनाची राजधानी (आणि इतर सातवाहन राजांची राजधानी) पैठण होती. शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे वजन किती हे नक्की सांगता येईल का? ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी उपाय असा काढला कि पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. मग हत्तीला नावेत चढवले आणि पाणि नांवेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढून त्याजागी माती भरली बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेपर्यंत. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनासकट परत पाठवला. ह्या त्याच्या बौद्धिक विजयाने त्यानी सुरु केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात मान्य झाला.

आपले एक सदस्य वाचक्नवी यांनी मला सातवाहन घराण्याची संपूर्ण वंशावळ काढून दिली होती. ती ही येथे चिकटवत आहे.

आंध्र वंशातले राजे आणि त्यांचा अंदाजे कार्यकाल(वर्षे) असा:

सिमुक(सिंधुक, शिप्रक) २३
कृष्ण(भात) १०
श्रीशातकर्णी(श्रीमल्‍लकर्णी) १०
पूर्णोत्संग(पौर्णमास) १८
स्कंधस्तंभ १८
शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी) ५६
लंबोदर १८
आपीतक(आपीलक, दिविलक) १२
मेघस्वाति १८
स्वाति(पतुमत्, अटमान्) १८
स्कंदस्वाति ७
मृगेंद्रस्वातिकर्ण ३
कुंतलस्वातिकर्ण ८
स्वातिवर्ण १
पुलोमावी ३६
अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण) २५
हाल ५
मंतलक(पत्तलक, मंदुलक) ७
पुरिकषेण(प्रविल्‍लसेन, पुरीषभीरु) २१
सुंदरशातकर्णी(सुनंदन) १
चकोरशातकर्णी ६ महिने
शिवस्वाति २८
गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र) २८
पुलोमत् २८
शातकर्णी(शिवशातकर्णी) २९
शिवश्री ७
शिवस्कंध ३
यज्ञश्री शातकर्णी २९
विजय ६
चंडश्री १०
पुलोमत् ७.

---------
विकिपीडियावर निरखून पाहिले असता हा भाग खिरें यांनी लिहिलेला आढळला. बहुधा ते आपले उपक्रमी सदस्य खिरे असावेत. नसल्यास चू. भू. दे. घे.

* या उच्चारांबद्दल शंका आहेत. योग्य उच्चार माहित असल्यास ते प्रतिसादांत लिहावेत.

या लेखातील काही शंकांचे निरसन केल्याबद्दल वाचक्नवी यांची आभारी आहे.

संदर्भ: सर्व संदर्भ आणि चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. याशिवाय, मेगॅस्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ यावरूनही ही माहिती दिली आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वागत

या विषयावर अधिक वाचायला आवडेल. राजगड ट्रेकला गेलो असताना तिथे आमच्या सोबत असणार्‍या मार्गदर्शकाच्या मते महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की आपल्याला फक्त महाराज आणि नंतर पेशवे आठवतात. महाराजांच्या आधी काय होतं आणि पेशव्यांनंतर काय हे कोणी लक्षात घेत नाही. राज्यरक्षणासाठी दुर्गांचा वापर करण्याची सुरुवात सातवाहनांनीच केली. सुरुवातीला धार्मिक पीठ म्हणून विकसित झालेले दुर्ग नंतर राज्याच्या रक्षणासाठी वापरण्यात आले.

मार्गदर्शकांनी केलेले एक विधान म्हणजे सातवाहनाच्या घरातील बहुसंख्य राजे हे अतिशय चांगले राज्यकर्ते व खूप कर्तूत्त्ववान होते. सलग ५०० वर्षे एकाच घराण्याचे राज्य जगात कुठेही नव्हते. सुसंस्कृत व कल्याणकारी राज्याची संकल्पनाही सातवाहनांची.

राजगड

राजगडाचे जे फोटो टाकले होते त्यातील फलकावर लिहिलेल्या माहितीत सातवाहनांचे नाव नमूद केले आहे. ते वाचल्यावरच एकदम ही चर्चा/ लेख टाकायचे डोक्यात आले. तसे बोलणे अभिजीतशी झाले होते. वरील लेखात ते वाक्य टाकायचे राहून गेले.

नाणेघाटातही या राजघराण्याचे काही शिलालेख आढळतात असे सांगितले जाते. या वंशात नागनिका नावाची राणीही होऊन गेली. तिने येथे शिलालेख कोरल्याचे सांगितले जाते. त्याकाळच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची कल्पना यावी असे हे शिलालेख असावेत.

तुम्ही सगळे नाणेघाटात गेला होता तेथे अशा गुंफांना भेट दिली होती का?

अवांतर:

ट्रेकला गेलो असताना तिथे आमच्या सोबत असणार्‍या मार्गदर्शकाच्या मते महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की आपल्याला फक्त महाराज आणि नंतर पेशवे आठवतात. महाराजांच्या आधी काय होतं आणि पेशव्यांनंतर काय हे कोणी लक्षात घेत नाही.

ह्यॅ! अमेरिकेला काय ३००-४०० वर्षांचा इतिहास... यासारखं वाटतं की नाही हे वाक्य. ;-) ह. घ्या.

जुन्नर

ही देखील सातवाहनांची एक राजधानी होती असे पुसटसे वाचले आहे. ते कसे?

जुन्नर - पैठण

ही राजधानी असल्याचे संदर्भही मिळाले. मला वाटतं की काही सातवाहन राज्यकर्त्यांच्या काळात राज्यावर स्वार्‍या, हल्ले, राज्याचा भाग आधिपत्याखालून जाणे असे घडले असावे आणि त्याकाळात राजधानी बदलली असावी. किंवा राज्य मोठे झाल्यावर पैठण क्षेत्र राजधानीचे म्हणून ठरवण्यात आले असावे. अर्थात, हा फक्त अंदाज आहे, पुरावा नाही.

पैठणबद्दल म.टा. मधील एक जुना लेख मिळाला त्यातील काही भाग येथे चिकटवते.

बौद्ध व जैन संस्कृतीच्या कारभारानंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झाला. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदिप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली , ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली. हे राजे वैदिक धर्माभिमानी होते. सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरुळ , अजिंठा लेणी खोदली गेली.

पैठणच्या दक्षिणेला गोदावरी काठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. त्या काळातील नगररचना ही सर्व सोयींनी युक्त अशी होती. विविध नमुन्याच्या पक्क्या भाजलेल्या विटा , छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले , भूमिगत गटार- योजना , कोरीव नक्षीची कामे , अशा सुविधांनी ही नगररचना आदर्श होती. याचा पुरावा बाळासाहेब पाटील यांच्या वस्तुसंग्रहालयातील वस्तूंमधून येतो.

मूळ लेख येथे वाचा.

वा !

छान अभ्यासपूर्ण लेख.
प्रतिसादांतूनही नवीन माहिती समजेल त्यामुळे लक्ष ठेवून आहे.

विक्रम संवत आणि शालिवाहन शक या व्यतिरिक्त अजून कोणत्या कालगणना भारतात होत्या?

शालीवाहनाने मातीच्या पुतळ्यांतून सैनीक निर्माण केले (भित्रट लोकांना बळ देवून लढवले) अशी त्याची प्रसिद्धी आहे. त्याविषयी काही लिहावे ही विनंती.

--(मातीचा पुतळा ) लिखाळ.

त्यांनी दारुचा अर्धा पेला रिचवून भैरवी गायली आणि श्रोत्यांनी उरलेल्या अर्ध्या पेल्यावर चर्चा केली.

चांगला प्रश्न

विक्रम संवत आणि शालिवाहन शक या व्यतिरिक्त अजून कोणत्या कालगणना भारतात होत्या?

याखेरीज कोणत्या कालगणना होत्या त्या येथे आणि येथे वाचा. बाकीचा लेखही वाचनीय आहे. खालील चित्र पाहा. कालच पाहण्यात आले पण ही कालगणनेची पद्धत कोणती ते नीट वाचता येत नाही. कोणाला कळले तर जरूर लिहावे.

पुरातन हिंदू कॅलेंडर

आभार

आपली कालगणना फार मोठ्या काळाला विचारात घेते असे दिसते. त्या दुव्यावर कलियुगातील शककर्ते आहेत. दुव्या बद्दल आभार.
धर्मराज युधिष्ठिरापासून कालगणना सुरु झाली म्हणजे तो कलीयुगाचा प्रारंभ होता असकाहे का ?
(चर्चा भरकटत असेल तर क्षमा करा.)
-- लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

कलीयुग

धर्मराज युधिष्ठिरापासून कालगणना सुरु झाली म्हणजे तो कलीयुगाचा प्रारंभ होता असकाहे का ?

श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वापरयुग संपून कलीयुग सुरू झाल्याचे सांगतात असे वाटते. असे असल्यास युधिष्ठिराने कालगणना सुरू केली असूही शकते. तशी याबाबत खोलवर किंवा उथळही माहिती नाही. :)

अच्छा !

हे शक्य वाटते.
-- (कलियुगातील) लिखाळ.

पाळामूळांच्या लोणच्याचे चाहते आणि पुराणातल्या वांग्याच्या भाजीचे वाढपी.

थक्क!

छान अभ्यासपूर्ण लेख.

हेच म्हणतो..

चित्रही सही आहेत. अगं प्रियाली, तू इतिहासाचा एवढा अभ्यास केलास तरी केव्हा? :)

शाळेत असतांना मी तर इतिहासाच्या तासाला बर्‍याचदा डुलक्या काढत असे किंवा मागल्या बाकावर गाढ झोपत तरी असे.

तुझा मात्र इतिहासाचा एवढा अभ्यास पाहून खरोखर थक्क व्हायला होते. औरभी लिख्खो. चांगली आणि इंटरेस्टींग माहिती मिळत आहे.

लगे हाथ तुला एक सूचनावजा विनंती -

उद्या जर तू मराठी संकेतस्थळांचा इतिहास लिहायला घेतलास किंवा त्याचा अभ्यास करायला घेतल्यास (तसा तुझा बराचसा अभ्यास आहेच!:) "तात्या-मैत्रीपार्क पर्व" ह्या प्रकरणावर वाचायला आवडेल! :)

आपला,
(शककर्ता!) तात्या बोनापार्ट.

इतिहासाच्या तासाला

शाळेत असतांना मी तर इतिहासाच्या तासाला बर्‍याचदा डुलक्या काढत असे किंवा मागल्या बाकावर गाढ झोपत तरी असे.

मीही शेवटच्या बाकावर बसून झोपाच काढायचे बहुधा कारण हा इतिहास शाळेत शिकवलाच गेला नव्हता. असा इतिहास शिकवला गेलातर आपल्याकडेही लोक इतिहासाकडे प्रेमाने पाहू लागले असते. तसे मार्क बरे मिळायचे.

अवांतरः

उद्या जर तू मराठी संकेतस्थळांचा इतिहास लिहायला घेतलास किंवा त्याचा अभ्यास करायला घेतल्यास (तसा तुझा बराचसा अभ्यास आहेच!:) "तात्या-मैत्रीपार्क पर्व" ह्या प्रकरणावर वाचायला आवडेल! :)

ते लिहिणारे इतिहासतज्ज्ञ कधीच जन्माला आले आहेत असे वाटते. :) ह. घ्या.

माहीतीपुर्ण लेख

लेख चांगला माहीतीपूर्ण आहे. धन्यवाद! महाराष्ट्रात (सातवाहनच असे नव्हे पण कदाचीत वेगवेगळी राजघराणी) मिळून इ.स. २र्‍या शतकापासून ते रामदेवरायपर्यंत म्हणजे १३व्या शतकापर्यंत स्थैर्य होते, असे बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या "राजा शिवाजी" मधे सुरवातीस वाचल्यासारखे आठवते.

मधे अविनाश धर्माधिकारींच्या भाषणात ऐकल्याप्रमाणे इंग्रज आल्यावर त्यांच्यातील सनदी गोर्‍या लोकांनी एतद्देशीयांची संस्कृती समजून घेण्यासाठी म्हणून इतिहास शोधाला. त्यांची सर्वांची नावेपण दिली आहेत. ती नंतर इथे मांडायचा प्रयत्न करीन.

लेख आवडला.

सातवाहन राजघराणे,गौतमीपुत्र शातकर्णी ,आणि पुरातन हिंदू कॅलेंडर या बद्दलची माहिती आवडली.
आपल्या लेखनातून अनेक विषयांची तपशीलवार माहिती आमच्यासहित अनेक उपक्रमींना मिळत असते.
असेच झक्कास लेखन येऊ द्या !

अवांतर :) अनेक विषयांची तपशीलवार माहिती,अभ्यासपूर्ण प्रतिसाद आणि हे सांभाळून अनुदिनी वरील "म्हसोबा"सारखे उत्तम विडंबन,
वा क्या बात है !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण्

प्रियाली,

लेख छान, नेहमीप्रमाणेच.
सविस्तर नंतर.

प्रियालींच्या 'पैठणी'नंतर माझी एक गोधडी.

गौतमीपुत्र शातकर्णी (उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. .
इसवी सन १९४५ पर्यंत गौतमीपुत्र हा २३ वा राजा अशी कल्पना होती. पण त्या साली पहिल्या सातवाहन राजाची नाणी सापडली. तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची कुणाला कल्पनासुद्धा नव्हती. त्यामुळे तोच ह्या घराण्याचा मूळ पुरुष आणि आद्य राजकर्ता असला पाहिजे असे महामहोपाध्य वा. वि. मिराशी यांनी सिद्ध केले आणि ते अनेक विद्वानांनी मान्य केले.(पहा:संशोधन मुक्तावली, सर २ रा, पृष्ठ ६४ ).
वर दिलेल्या यादीतील पहिला राजा सिमुक हा त्याचा नातू. त्यामुळे गौतमीपुत्र हा २५ वा सातवाहन असावा.(चू.भू. दे. घे.)
दुसरा राजा कृष्ण ऊर्फ कान्ह ऊर्फ भात हा सिमुकाचा भाऊ. तिसरा सिरीसातकर्णी(श्रीसातकर्णी) हा सिमुकाचा मुलगा. हा त्या कुळातला पहिला सम्राट‌. त्याने उत्तरेला चाल करून पश्चिम माळवा, अनूप-(नर्मदेचे खोरे) आणि विदर्भ मौर्यांकडून जिकून घेतले. यावरून सातवाहन अशोकाचे मांडलिक नसावेत असे वाटते. (चू.भू. द्या. घ्या.) श्रीसातकर्णीची राणी नागनिका(नायनिका). ही नागवंशीय होती. त्रणकयिरो नावाच्या सरदाराची कन्या. पतीच्या मृत्य़ूनंतर हिने राज्यकारभार केला. ही आपली पहिली अहिल्याबाई! हिने नाणेघाटात मोठा शिलालेख कोरवून घेतला आहे.

या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्‍यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत वाढत गेली.

आरंभीच्या सातवाहनांचे सर्व शिलालेख कार्ले, नाणेघाट, कान्हेरी, जुन्नर, नाशिक या महाराष्ट्रातील गावीं सापडले असल्याने हे घराणे महाराष्ट्री बोलणारे महाराष्ट्रीय असले पाहिजे , आंध्रवासी नसावे. उत्तरकालीन सातवाहनांचे फक्त चार शिलालेख आंध्रात सापडले आहेत. याचा अर्थ असा की , पुराणे लिहिली गेली त्या सुमारास सातवाहनांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट होऊन त्यांची सत्ता आंध्रदेशात शिल्लक राहिली होती .
पुणे जिल्ह्यात तळेगावजवळ मावळ प्रांत आहे. त्यात बारा (उप)मावळ आहेत. त्यातला एक आंदरमावळ(आंध्र मावळ). तिथे, ज्याच्या पाण्यावर टाटांचे कर्जतजवळच्या भिवपुरी येथे विद्युत्‌निर्मिती केंद्र आहे तो आंध्रा तलाव आहे. तिथून उगम पावलेली आंध्रा नदी पुढे कार्ल्यापासून तेरा किलोमीटरवर असलेल्या राजपुरी या खेड्याजवळ इंद्रायणीला मिळते. सातवाहनांचे अनेक शिलालेख याच भागात असल्याने ते इथलेच मूळ रहिवासी असावेत.(पहा: ऍनल्ज्‌ ऑफ भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टित्यूट, सिल्व्हर ज्युबिली व्हॉल्यूम १९१७-४२, पृष्ठ १९६, येथील स. आ. जोगळेकर यांचा लेख:"दि होम ऑफ सातवाहनाज्‌").
लीलावई(लीलावती) या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने गाथासप्तसईकार(सप्तशतीकार) हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान(पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट(मराठी) होत्या असे वर्णन केले आहे. राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत सातवाहन राजा कुंतल प्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो असा उल्लेख केला आहे. या पुराव्यांवरून सातवाहन हे महाराष्ट्रीय होते हे पटायला हरकत नाही.
इसवीसनापूर्वी पहिल्या शतकात बोलन खिंडीतून हूणांची टोळधाड कुशाणांवर आणि त्यांची शकांवर कोसळून शक भारतात आले. पाठोपाठ कुशाण. शकांना राज्य करणे फारसे माहीत नव्हते. ते कुशाणांचे क्षत्रप(सरदार) किंवा सुभेदार. क्षहरातवंशीय भूमक नावाच्या क्षत्रपाने काठेवाड, गुजराथ व पश्चिम रजपुताना या प्रदेशात सत्ता स्थापन केली. नहपान हा त्याचा मुलगा(की वंशज?). हा व त्याचा हिंदू नाव धारण करणारा जावई उषवदात(ऋषभदत्त) यांनी माळवा व अनूप-(नर्मदेचे खोरे) जिंकले आणि ते महाराष्ट्रात उतरले. नहपान हा हळूळू जुन्नर, कार्ले येथपर्यंत घुसला. दोन्ही ठिकाणी त्याचे शिलालेख आहेत.
गौतमीपुत्राने गादीवर आल्यानंतर १५-१६ वर्षे तयारी करून आधी पुणे प्रांत, मावळ, नंतर उत्तरेला जाऊन नहपान आणि उषवदात यांना कंठस्‍नान घातले. दक्षिणेला जेवढे शक, पल्हव, यवन होते त्यांच्या कत्तली केल्या किंवा त्यांना उत्तरेला पिटाळले. यवन हे तोपर्यंत बौद्ध झाले होते. त्यांच्या निष्ठा परकीयांशी. त्यांचेही गौतमीपुत्राने निर्दालन केले. मुसलमानी आक्रमकांपासून महाराष्ट्राला मुक्त करणार्‍या शिवाजीच्या सोळाशे वर्षे आधी गौतमीपुत्राने तशीच कामगिरी केली होती. शिवाजीइतक्याच आदराने आणि भक्तिभावाने गौतमीपुत्र सातकर्णीचे नाव घ्यायला पाहिजे. त्याने उत्तरेला पूर्व आणि पश्चिम माळवा, नर्मदापरिसर, विदर्भ, कोकण, सर्व उत्तर महाराष्ट्र, पश्चिम रजपुताना, सौराष्ट्र, महेंद्र, मलय, आंध्र, व कलिंग हे प्रांत जिंकून आपला पराक्रम सिद्ध केला.
म्हणूनच स्वत:ला राजर्षिवधू म्हणवून घेणार्‍या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे "क्षहरातवंश-निरवशेषकर शकपल्हवनिषूदन त्रिसमुद्रतोयपीतवाहन"अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे.
--वाचक्‍नवी

अनेक धन्यवाद

प्रियालींच्या 'पैठणी'नंतर माझी एक गोधडी.

आमची कसली पैठणी हो? :) पण विषयाला सुरूवात केली की अधिकाधिक पुरावे/ माहिती/ कथा बाहेर येतात. उपक्रमावर आपण आणि इतर अनेक मंडळी आहेत की त्यांना वेगवेगळ्या विषयांतील माहिती असते, निदान ती शोधून पुढे करण्याची इच्छा तरी असते आणि सर्वात महत्त्वाचे जे लेखातून समोरच्याला कळवायचे होते ते हे की

आक्रमकांपासून महाराष्ट्राला मुक्त करणार्‍या शिवाजीच्या सोळाशे वर्षे आधी गौतमीपुत्राने तशीच कामगिरी केली होती. शिवाजीइतक्याच आदराने आणि भक्तिभावाने गौतमीपुत्र सातकर्णीचे नाव घ्यायला पाहिजे.

याबद्दल अनेक धन्यवाद. मी अर्थातच सहमत आहे.

अतिरिक्त माहिती, योग्य उच्चार आणि काही (गैर)समजांच्या निराकरणाबद्दल धन्यवाद.

सातवाहन राजांनी प्राकृत भाषेलाही महत्त्व देऊन त्यात काव्यनिर्मिती केल्याचे मागे वाचले होते. त्यात हालाचा आणि गाथासप्तसईचा उल्लेख येतो. या राजाबद्दल आणि ग्रंथाबद्दल अधिक माहिती आपल्याला मिळाली तर येथे जरूर द्यावी.

अवांतरः


याचा अर्थ असा की , पुराणे लिहिली गेली त्या सुमारास सातवाहनांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट होऊन त्यांची सत्ता आंध्रदेशात शिल्लक राहिली होती .

वाचक्नवी, या विषयांत आपल्याला बरीच माहिती आहे असा माझा ग्रह आहे. (चू. भू. द्या. घ्या.) पुराणे कधी लिहिली गेली, त्यावर प्रामुख्याने कोणत्या राजांचा, विचारधारेचा प्रभाव दिसतो आणि अशा अनेक प्रश्नांवर माहिती हवी आहेच पण ती वेगळ्या चर्चेत.

धन्यवाद.../ बभ्रुवाहन

अतिशय सुंदर माहिती... या विषयावर अधिक वाचायला आवडेल.

शिवाजीइतक्याच आदराने आणि भक्तिभावाने गौतमीपुत्र सातकर्णीचे नाव घ्यायला पाहिजे.

सहमत आहे. राजगड ट्रेकवर मार्गदर्शकांचे अगदी हेच वाक्य होते. सातवाहनांना त्यांच्या कर्तृत्त्वाइतके श्रेय पुस्तकी इतिहासात किंवा जनमानसांमध्ये मिळत नाही. अर्थात त्यामुळे त्यांचे कर्तृत्त्व कमी होत नाही.

अवांतरः बभ्रुवाहन हा कोण. ते पण सातवाहनांपैकीच का? आमच्या जुन्नरपासून जवळ असणार्‍या मूळ गावी ग्रामदैवत भैरवनाथाइतकेच बभ्रुवाहनाला महत्त्व आहे. आमच्या एका सहकार्‍याच्या बागलकोट येथील घराजवळही बभ्रुवाहनाचे मंदिर आहे.

माझ्या गावात कळाले की घोड्यावर बसणारा बभ्रुवाहन हा अर्जुनाचा पुत्र होय.

पण शालिवाहन-सातवाहन-बभ्रुवाहन या सर्वांमध्ये वाहन आहे म्हणून त्याचाही सातवाहनांशी काही संदर्भ असावा अशी शंका येते.

हल्ली सर्वांकडे स्वतःची वाहने आल्यामुळे नावात वाहन लावणे बंद करुन घरासमोर वाहने लावणे सुरु केले असावे. क्षमस्व

बभ्रुवाहन

बभ्रुवाहन हा अर्जुन आणि चित्रांगदा (ईशान्य भारतातील बहुधा मणिपूरमधील) या राजकन्येचा मुलगा असून अर्जुन-चित्रांगदा भेट अर्जुनाला वनवास झाला असता झाली. बभ्रुवाहनाचा सांभाळ त्याच्या आजोबांनी केला व पुढे अर्जुन आणि बभ्रुवाहनाचे युद्ध झाले अशी कथा आहे असे वाटते. (आठवणीतून लिहिते संदर्भ तपासले नाहीत.)

अवांतरः

आमचे 'हे' मध्यंतरी मोठ्या प्रेमाने त्यांच्या राज्याचे सुप्रसिद्ध (लोक)नायक डॉ. राजकुमार यांचा बभ्रुवाहन या चित्रपटाची एक फीत आनंदाने पाहत होते असे नजरेस आले.

http://www.youtube.com/watch?v=0RY_S57O7Ms

एक महत्त्वाचा इशारा: डॉ. राजकुमार यांच्या विरुद्ध जाणारे कोणतेही विधान कृपा करून येथे करू नये. विषयांतराचा धोका आहेच परंतु उपक्रमावर दगडफेक होण्याची दाट शक्यता वाटते. तसेच, इतरत्र चाललेली एखादी चर्चा ज्यांत दाक्षिणात्य हिरो कोवळे दिसतात याला छेद देण्यासाठी हा दुवा दिला, असा समज झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. ;-) ह. घ्या.

उपक्रमावर < ऑबजेक्ट > टॅग दिला असता, त्या चर्चेला नवे प्रतिसाद देणे अशक्य होते आणि फॉरमॅटींग ऑप्शन्स निघून जातात असे वाटते. तात्या आणि विकास या दोघांच्याही चर्चेत/ लेखात अशा फीती लावल्या होत्या आणि तेथे नवे प्रतिसाद देता येत नव्हते. बभ्रुवाहन चित्रपटाची क्लिप येथे लावत असता हेच झाले म्हणून साधा दुवा देत आहे.

आता समजले!

उपक्रमावर < ऑबजेक्ट > टॅग दिला असता, त्या चर्चेला नवे प्रतिसाद देणे अशक्य होते आणि फॉरमॅटींग ऑप्शन्स निघून जातात असे वाटते.

आता कळले काय होतयं ते. पण मला असाच काहीसा अनुभव राजगडला प्रतिसाद द्यायला गेलो तेंव्हा एकदा झाला होता, अर्थात नंतर परत देता येतोय का ते पाहायला १-२ दिवसांनी गेलो तर तो देऊ शकलो. पण तरीही ऑब्जेक्ट टॅगचे लक्षात ठेवायला हवे.. धन्यवाद!

धन्यवाद

माहितीपूर्ण् चर्चेसाठी प्रियालीताईंचे धन्यवाद्.
त्यात् मोलाची भर् घातल्याबद्दल आणि संदर्भ् दिल्याबद्दल् वाचक्‍नवी यांचेही आभार्.

अपरान्त, अवंती, कुरुक, अकारा.

यापैकी अपरान्त म्हणजे उत्तर कोकण, अवंती म्हणजे उज्‍जयिनी हे सांगायची फारशी गरज नाही. कुरुक, अकारा हे कोणते प्रदेश याचा पत्ता लागला नाही. --वाचक्‍नवी

शातकर्णी की सातकर्णी?

या नावाचा उच्चार सातकर्णी असा केला जातो असे ऐकले होते.
तसेच आपल्या "गुढीपाडवा" अर्थात आंध्र "युगादि" हा सण सातकर्णी / सातवाहन / शालिवाहन याने पैठण जिंकून तेथे आपले राज्य स्थापन केल्यापासून सुरू झाला असे वाचल्याचे स्मरते.
गौतमी ही शकांबरोबरच्या एका युद्धात हरलेल्या आणि धारातीर्थी पडलेल्या राजाची पत्नी होती . ती रानावनात अत्यंत हालाखीत रहात होती. तिने आपल्या मुलात शौर्याचे स्फुल्लिंग जागवून सामान्य - वनवासी लोकांतून सैन्य निर्माण केले, शकांचा पराभव करवला आणि त्याला पुन्हा राजा बनवले. ज्या दिवशी त्याने विजयी योद्धा म्हणून पैठणच्या राजधानीत प्रवेश केला त्या दिवशी तेथील प्रजेने गुढ्या-तोरणे उभी करून त्याचे स्वागत केले. हीच प्रथा आपण गुढीपाडव्याला पाळतो. तेंव्हापासून "शालिवाहन शके"(शक पराभव संवत्सर) अस्तित्वात आले. त्यामुळे सातकर्णी नेहमी स्वतःला गौतमीपुत्र अशी उपाधी लावत असे - अशी कथा लहानपणी वाचलेल्या एका मराठी गोष्टीच्या पुस्तकात वाचली होती. (संदर्भ अर्थातच आठवत नाही ):(
असा इतिहास कोठे नमूद असल्यास अभ्यासकांनी माहिती द्यावी.

लेख अर्थातच नेहमीप्रमाणे उत्कृष्ट. आणखी माहितीची भर घालून पुन्हा येथे आणि विकीवर प्रसिद्ध व्हावा ही अपेक्षा.
वाचक्नवी यांचा प्रतिसादही उल्लेखनीय.

शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी)

या नावाच्या उच्चाराबद्दल माझ्या मनात संदेह होताच म्हणून मी वाचक्नवींना मी व्य. नि. तून पहिला प्रश्न हाच (खालील) विचारला आणि नंतर ते काही अधिक माहिती देत गेले -

सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याचे नाव योग्य रीतीने कसे लिहावे? मराठी विकिवर ते सत्कारणी असे लिहिले आहे. ते तसे नसावे असे मला वाटते. मूळ शब्द आपल्या वाचनात आला आहे का?
सत्कारणी/ शतकर्णी/ सातकर्णी/ शातकर्णी यापैकी एखादा असावा का?

त्यांनी दिलेल्या वंशावळीतून मी शातकर्णी हा शब्द उचलला इतकेच. मराठी विकिवर यावर पूर्वी चर्चा झाली होती कारण नाव सत्कारणी नसावे हा मुद्दा मी उचलून धरला होता.

असो.

तुम्ही दिलेली माहिती अतिशय उत्तम. धन्यवाद. अशाच कथा/ आख्यायिकांची गरज होती. याला पुष्टी देणारे संदर्भ कोणाला सापडले तर अत्युत्तम.

विकिवर लेख प्रसिद्ध करण्यासाठीच माहिती गोळा करत होते कारण काही स्नेही 'अहो तुम्ही फक्त परकीयांचे इतिहास लिहिता... आपलाही लिहा' असे सांगतात :) पण मला जगाच्या या कोपर्‍यात बसून पुरेशी माहिती मिळत नाही. :( या चर्चेच्या रुपाने ती मिळाली हे चांगले झाले. हा लेख सुधारून विकिवर टाकण्याचा मनोदय आहेच.

अवांतरः विकिवरील माहिती विश्वसनीय नसते (गणित/ विज्ञान/ तंत्रज्ञान आणि काही इतर विषय सोडून) अशी ओरड माझ्यासकट इतर अनेकांची असते. परंतु चारजण आपल्याकडून खरी माहिती इतरांनी मिळावी या उद्देशाने एकत्र आले की दिशाभूल/ फसवणूक करण्याचा त्यांचा हेतू नसतो असेलच तर ती त्यांची गैरसमजूत असते आणि ती दूर करणारी इतर डोकी आपणहून पुढे सरसावतात, हे ही, ही चर्चा विकिवर नसूनही येथे पाहायला मिळाले. सर्वांची आभारी आहे.

विकीवर येऊ द्या

परिपूर्ण आहे लेख...प्रतिसादांतून आलेली माहिती संकलित करून कृपया लेख विकीपेडीयावर टाकावा..मी पण राजगड लेख लिहीण्याचा प्रयत्न करतो.

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

शक पराभव संवत्सर

गौतमीबद्दल आपण सांगितलेली कथा एक अविश्वसनीय दंतकथा वाटते. बौद्धधर्मीय शकराजा कनिष्क याच्या नावाने हा शक सुरू झाला असे दिसते . म्हणूनच त्या वर्षगणनेला शक म्हणतात. या राजाने काश्मीर व पश्चिम हिंदुस्थान काबीज करून आपली सत्ता स्थापन केल्यावर हा शक प्रचारात आला असावा. तिबेट, ब्रम्हदेश, जावा, सिंहलद्वीप(श्रीलंका) वगैरे ठिकाणी हा शक चालू होता. मुळात इसवी सन १००० पर्यंतच्या लेखात शालिवाहन शकाचा उल्लेख नाही. प्राचीन लेखात याला शकनृपकाल, शकेंद्रकाल, शकनरपते: अतिताब्द अशी नावे होती. शेवटचे नाव अजूनही बंगाली पंचांगात वापरात आहे. तेव्हा बर्‍याच उत्तरकाळी मूळ शकराजांनी स्थापिलेल्या या शकाला कोणीतरी शालिवाहनाचे नाव देऊन पावन करून घेतले असे महामहोपाध्याय वा. वि. मिराशी, डॉ. के. गोपाळाचारी या इतिहाससंशोधकांचे मत आहे. --वाचक्‍नवी

पांडवलेणी

नाशिकला पांडवलेणी नावाची एक बौद्ध लेणी व कोरीव काम असलेली टेकडी आहे. (येथुन बहुतेक सर्व नाशिक शहर सुरेख दिसते. दिवसा जाणे, वर जाण्याला फी आहे.)
तेथे काही या संदर्भातले उल्लेख वाचल्याचे आठवते. ही लेणी सातवे शतक ते तेरावे शतक (चुभुदेघे) या काळात सातवाहन घराण्यांनी कोरली - असा उल्लेख आहे.

याशिवाय नाशिकच्या 'वचन' च्या लायब्ररीमध्ये ही एक मराठी इतिहासाचे वर्णन करणारे पुस्तक वाचल्याचे आठवते. (पण आता नाव विसरलो.)
त्यात सातवाहनांनी महाराष्ट्र नुसताच स्थिर केला नाही तर व्यापारातही पुढे आणला. नाणेघाटात सुरक्षा व्यवस्था बसवली. त्या काळच्या युरोपीय व्यापाराला योग्य ती चौकट व व्यवस्था दिली. व्यापाराचा मार्ग आंध्र प्रदेश ते महाराष्ट्र असा होता असे ही काहीसे वाचल्याचे आठवते. मात्र ते सम्राट अशोकाचे मांडलीक होते असा काही उल्लेख वाचल्याचा आठवत नाहीये.

एकुण लेख आवडला. कंबोडीयाच्या राजांचे नि सातवाहन घराण्याचे संपर्क होते हे वाचून मजा वाटली. आपण आपलाच(?) हा भाग विसरूनच गेलो आहोत नाही का?

-निनाद

अख्म्म्म् !

आपण आपलाच(?) हा भाग विसरूनच गेलो आहोत नाही का?
अह्म्म् ! अख्म्म् ! साम्राज्यवादाचा वास येतोय इथे. कोण आहे रे तिकडे ?
ह.घ्या. हे सांगणे नलगे
(असे म्हणावे तर बौद्ध धर्मीय जपान आणि इतर भाग् पण आपलाच म्हणावा लागेल. :)
-- (उगीचच ) लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

एक अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा शोधनिबंध

या विषयावर शोध घेत असता एक अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा शोधनिबंध सापडला.
त्यातील सातवाहन घराण्याच्या मूळ भूमीबद्दलच्या मतांशी महाराष्ट्रीय जरी सहमत होणार नसले तरी या माहितीतील बारकावे मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.
प्रियाली, आपण या शोधनिबंधाचा वापर करून सातवाहनावरील आपला लेख आणखी परिपूर्ण करू शकता - या निबंधात सातवाहनांची वंशावळ राजांची नावे , त्यांचे मत्स्य आणि वायु पुराणांतील राज्यकाल आणि सनावळ्या यांसह दिली आहे.
कृपया हा निबंध वाचून पहावा ही विनंती.
या निबंधात अन्य राजवंशांचाही सखोल उहापोह आहे. त्यामुळे असेच लेख इतर राजांबाबत लिहिता येतील.

धन्यवाद विसुनाना

सुंदर माहिती आहे.


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

छान

अजानुकर्ण,

तुमची अनुदिनी (त्यातील माहीती/लेखांप्रमाणेच) खूपच चांगली दिसते.

बापरे २८७!

बापरे! २८७ पानांचे आहे हो ते बाड!
येवढे मला तरी स्क्रीनवर वाचणे अवघड आहे... आणी छापता येणे ही शक्य दिसत नाही... बघु कसे जमते ते. पण एकुण अभ्यासपुर्ण दिसते आहे.

हा शोध कसा लागला? कसा घेतला?

आपला
गुंडोपंत

बापरे! २८७ नाही हो! धन्यवाद -

विसुनाना, दुव्याबद्दल धन्यवाद. हा दुवा मी वाचलेला होता , विचारात घेतलेला होता, परंतु तो विकिवरच दिलेला असल्याने आणि त्यात आंध्रातील अनेक वंशावळींची माहिती असल्याने आणि गौतमीपुत्राच्या कालखंडाविषयी लेखकाने मांडलेल्या मतांचा अधिक माहितीशिवाय उहापोह करणे कठिण वाटल्याने त्यावर लिहिणे टाळले. सखोल लेख लिहिताना या लेखाचा वापर करायला हवाच.(वरील लेख लिहिताना, ह्या लेखात मोजकी शोधाशोध केली होती त्यामुळे सरळसोट, संदर्भ विकिवरून असे लिहिले. खूप खोलवर अभ्यास केलेला नाही. ) हा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.

गुंडोपंत,

बापरे २८७ कसलं? कॉपी नेटावर आहे, ती ही पीडिएफ बांधणीत. घाईत असाल तर, "फाईंड"मध्ये "गौतमीपुत्र सातकर्णी" टाका, ज्या ज्या पानांवर हा शब्द येतो ती ती तुमच्यापुढे येतील. नंतर फक्त योग्य संदर्भ शोधून वाचन करायचे. ;-)

हा शोध कसा लागला? कसा घेतला?

विकिपीडियावर 'एक्सटर्नल लिंक्स' किंवा बाह्यदुव्यांवर अशा माहितीपूर्ण लेखांची सूची दिलेली असते.

उत्तम लेख, चर्चा/नाणी

उत्तम लेख आणि अतिशय माहितीपूर्ण चर्चा.

चित्रात दाखवलेल्या नाण्यांवरील मजकूर (मुळात काही मजकूर आहे का? असल्यास) कोणत्या भाषेत आहे?

प्राकृत भाषा/ ब्राह्मी लिपी/ ग्रीक पद्धत

मला वाटतं नाण्यांवर ब्राह्मी लिपीत आणि एखाद्या प्राकृत भाषेत मजकूर आहे. (ती भाषा महाराष्ट्री असावी का याबाबत कोणी माहिती पुरवली तर उत्तमच.) लिपीबाबत बोलायचे तर शातकर्णीच्या काळात देवनागरी वापरत असावेत का यावरही प्रश्नचिन्ह आहे.

तसेच नाण्यावर चेहरा कोरणे ही ग्रीक धाटणी आहे. पोर्ट्रेट स्टाईल.

विकिवरील या दुव्यावर नाण्याच्या चित्राखाली मजकूराचे स्पष्टीकरण दिले आहे

छान

शातकर्णीबद्दल विशेष माहिती नव्हती. लेख आणि चर्चेमुळे बरेच अज्ञान दूर झाले :).

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

उत्तम लेख - सातवाहनाची आख्यायिका माझीच

उत्कृष्ट लेख लिहिलात. हा विकीपीडियावर सुद्धा ठेवावा ही विनंती.

सातवाहनाची आख्यायिका मीच लिहिली होती. दोन ठिकाणाहून ही माहिती मिळवली होती - एक म्हणजे पैठणचे नाथ महाराजांच्या वंशजांपैकी भैयासाहेब जाहगिरदार (जे इ.स. १९९० च्या सुमारास वारले) ह्यांनी मला व्यक्तिश: पैठणची सहल करवली आणि नाग घाटावर नेऊन ही गोष्ट सांगितली. आणि लहानपणी 'किशोर' मासिकातसुद्धा ही गोष्ट वाचल्याचे आठवते. हे भैयासाहेब प्रख्यात वकील आणि इतिहासाबद्दल खूप जाणकार होते.

सातवाहनांबद्दल अजून एक गोष्ट मी पुण्याच्या प्र. के. घाणेकरांच्या पुस्तकात वाचली आहे, ती म्हणजे जुन्नर जवळच्या नाणेघाटात सातवाहन वंशाच्या 'नयनिका' राणीचा एक ब्राह्मी शिलालेख आहे. ह्या राणीबद्दल मला काही माहिती नाही, पण तो शिलालेख मी बघितला आहे (त्यावर काही ट्रेकर मंडळींनी आपापले शिलालेखही रंगवले होते).

खिरे

कोणती आख्यायिका?

सातवाहनाची आख्यायिका मीच लिहिली होती.

"सातवाहनाचा पैठणविजय आणि गुढीपाडवा" ही तुम्ही लिहिलेली आख्यायिका आहे काय? आपण किती साली ही आख्यायिका लिहीलीत याचा खुलासा व्हावा.

(आपण याच आख्यायिकेबद्दल बोलत असाल तर काही स्पष्टीकरण-
ही आख्यायिका मी माझ्या आईच्या बालपणाच्या काळात छापलेल्या आणि माझ्या आजोबांनी जपून ठेवलेल्या ट्रंकेतील पुस्तकात माझ्या लहानपणी १९८०-८२ साली वाचली आहे. म्हणजे मूळ छापील आख्यायिका सन १९४७ ते ५२ साली छापली गेली असावी. दुर्दैवाने माझ्या 'कुमार वाचनालय' काढण्याच्या नादात ते पुस्तक आमच्या वाचनालयाच्या कोण्या एका वाचकाकडे राहून गेले. :( असो.)

धन्यवाद - खिरे, विसुनाना

खिरे,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हा लेख विकिवर टाकायला सुरुवात केली आहे. अद्याप अपूर्ण आहे. येथील प्रतिसादांत असणारी महत्त्वाची माहितीही तेथे टाकायची आहे.

म्हणजे जुन्नर जवळच्या नाणेघाटात सातवाहन वंशाच्या 'नयनिका' राणीचा एक ब्राह्मी शिलालेख आहे. ह्या राणीबद्दल मला काही माहिती नाही, पण तो शिलालेख मी बघितला आहे

हा नाणेघाटात नेमका कोठे आहे इ. बद्दल थोडी विस्तृत माहिती देता येईल का? कारण आपल्या उपक्रमी ट्रेकर्सना त्याबाबत फारशी माहिती दिसली नाही. ती मिळाली आणि पुन्हा त्यांना नाणेघाटात जायचा योग आला तर या शिलालेखाची प्रकाशचित्रे आणायला सांगता येतील. :)

विसुनाना,

"सातवाहनाचा पैठणविजय आणि गुढीपाडवा" ही तुम्ही लिहिलेली आख्यायिका आहे काय? आपण किती साली ही आख्यायिका लिहीलीत याचा खुलासा व्हावा.

माझ्या लेखात निळ्या रंगात उद्धृत केलेली आख्यायिका, खिरेंनी विकिपिडियावर लिहिली होती, हत्तीचे वजन करण्याबद्दलची. त्या लेखाचा इतिहास पाहिला तेव्हा मला त्यांचे नाव तेथे दिसले म्हणून ती मी उचलून येथे टाकली आणि माझ्या लेखात तसे नमूद केले आहे. तुम्ही सांगितलेली आख्यायिका वेगळी. ती ही विकिवर टाकायची आहे.

खुलाशाबद्दल धन्यवाद.

माझ्या गैरसमजूतीबद्दल खिरे साहेबांनी माफ करावे.

नाणेघाट

नाणेघाट हा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जुन्नर जवळून थेट पश्चिमेकडे आहे - म्हणजे हा माळशेज घाटाच्या दक्षिणेला आणि जिवधन ह्या किल्ल्याच्या उत्तरेला येतो. सातवाहन कालात हा घाट रोमन व इतर दलाल कल्याण बंदरापासून पैठण पर्यंत आपल्या मालाची ने आण करण्यासाठी वापरत. क्लॉडियस् टॉलेमी सुद्धा इथे येऊन गेला आहे. त्याने ह्या नाणेघाटाचे वर्णन 'एका वाहत्या नदी इतकी वाहतूक असलेला' असं केलं आहे. आज तिथे प्रवाशांसाठी बांधलेली गुहा आणि त्यातील शीलालेख्, व पठारावर पोहोचलं की कर वसूलीसाठी वापरात येणारा एक मोठा दगडी रांजण आहे. जवळच्या 'घाटघर' ह्या गावापर्यंत बस येते, तिथून पायी जावं लागतं. पायी रस्ता घाट माथ्यापासून खाली साधारण १ किलोमिटर दगडांनी 'कॉबल्ड' आहे (ह्याला मराठीत काय म्हणतात?)

ह्या घाटाबद्दल म्हणतात की परदेशी दलालांसाठी सातवाहन राजांना एक 'हमरस्ता' बांधायचा होता, तेंव्हा त्यांनी फर्मान काढलं की जो माणूस लवकरात लवकर प्रशस्त घाट बांधेल त्याला राजा बक्षीस देईल. दोन 'कॉन्ट्रॅक्टर' स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाले - एकाचं नाव होतं 'नाना' आणि दुसरा 'गुणा'. नाना नि बांधलेला घाट आधी पूर्ण झाला - तो नाणेघाट, आणि गुणाचा घाट अर्धवट राहिला कारण सरकारी बक्षीस नानाला मिळाले. हा 'गुणाघाट' जीवधन किल्ल्याच्या दक्षिणेला येतो. मी ती जागा जीवधन वरून बघितली आहे, पण तिथे गेलो नाहिये.

एक अधिक प्रश्न - अवांतरः क्लॉडिअस टोलेमी

माहितीबद्दल धन्यवाद, नाणेघाटाला भेट देणार्‍यांना उपयोगी ठरेल. सातवाहनांच्या राजवाड्याचे अवशेषही पैठणला आहेत असे वाचले होते. ते आपण पाहिले का किंवा त्याबद्दल काही माहिती आहे का?

क्लॉडियस् टॉलेमी सुद्धा इथे येऊन गेला आहे. त्याने ह्या नाणेघाटाचे वर्णन 'एका वाहत्या नदी इतकी वाहतूक असलेला' असं केलं आहे.

हे वर्णन कोठे वाचायला मिळेल. दुवा असेल तर कृपया द्यावा.

क्लॉडियस टोलेमीने बनवलेले नकाशे ख्रिस्तोफर कोलंबसने वापरल्याचे म्हटले जाते, तो भूगोलतज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता अशी थोडीफार माहिती सोडली तर मला याविषयी माहिती नाही. त्याने लिहिलेले ग्रंथ इ. अस्तित्वात आहेत का?

टॉलेमीबद्दल दुवा नाही

मी हा दुवा शोधायचा मध्ये कधितरी प्रयत्न केला होता, पण मला तो विश्वजालावर सापडला नाही. ही माहीती मी नाणेघाटात फिरायला गेलो असता मला एका मित्राने सांगितली. ही माहितीसुद्धा बहुदा प्र.के. घाणेकरांच्या पुस्तकातून आली असू शकेल. 'टॉलेमी इन् इंडीया' हे पुस्तक मिळवायला पाहिजे. ते इथे विकत मिळते : https://www.vedamsbooks.com/no15532.htm कदाचित ह्या पुस्तकात मूळ माहिती असेल.

धन्यवाद

खिरे साहेब,
माहितीबद्दल अतिशय धन्यवाद. ही कथा ऐकायला मिळाली होती पण नाना वरुन नाणेघाट हे पटत नव्हते. :(
शिलालेख आम्हाला दिसला होता. पण प्रकाश अतिशय कमी असल्याने त्याचे छायाचित्र घेता आले नाही.

कॉबल्ड ला चिरेबंदी/फरसबंदी म्हणता येईल का?

पुळुमावी

पुलोमत् २८ च्या ऐवजी पुळुमावी असं पाहिजे बॉ यानं २५ वरीस राजगादी संभाळली.
रुद्रदामनाच्या लेकावर् अन कान्हेरीच्या लेकावर याचा उल्लेख येते म्हण्ते बॉ.
मंग यज्ञश्री इसवी सन् १६५ ला गादीवर आला.
नाशकात अन ठाण्यात सापल्डलेल्या नाण्यावरुन् अंदाज करतेत् बॉ.

बाबूराव येथे पाहा !

दुवा आणि एक प्रश्न - त्रिपिटकांवरून

दुसरीकडे हीच चर्चा नुकतीच झाली म्हणून तेथला दुवा देत आहे. विसुनाना यांनी तिकडे येथील चर्चेचा दुवा दिला आहे. (हे सर्व विकिपिडियावर लिंक करता आले तर बरे होईल).

http://misalpav.com/node/19395

तेथील माझा प्रतिसाद इथल्या कोणी अधिक प्रकाश टाकावा म्हणून इथे दुवा देत आहे.

गौतमी आपल्या मुलाला एकब्राह्मण म्हणते यावरून सातवाहन कुळ ब्राह्मण असावे यावरून चर्चा सुरु झाली होती. यासंबंधी एक वेगळा संदर्भ त्रिपिटकांमधून समोर आल्यासारखे वाटले म्हणून हे इथे डकवत आहे. कोणास यावर प्रकाश पाडता आला तर आवडेल.

http://misalpav.com/node/19395#comment-347379

(हे मी अजूनपर्यंत जी पुस्तके चाळली तेथे कोठेही वाचलेले नाही, सहज चाळताना संबंध जाणवला, यात तथ्य वाटते का असे विचारावेसे वाटले). तसेच असे इतर कुठे वाचले आहे काय? नसल्यास आणि तथ्य वाटत असल्यास लहानसा शोध लागू शकण्याचा आनंद होईल, हे नक्कीच. :)

 
^ वर