घरंगळलेले अनुस्वार

हे अंगुलिमालाप्रकाशचित्र विनोदबुद्धी बाजूला ठेवून पुनश्च पहा:

अनुस्वार

लक्षात आलं का मला काय म्हणायचंय ते? अनुस्वारांची पार बरबादी झाली आहे. इथेच नाही. जिकडेतिकडे ही प्रवृत्ती वाढते आहे. अनुस्वार कुठल्या अक्षरावर द्यायचा ह्याबाबतच मनात गोंधळ! "मडंळ", "श्रीव्यकंटेश", आणि "डोगंराची काळी मैना"! असली फल्तुगिरी मला मुबंईत, आपलं मुंबईत, ठिकठिकाणी दिसली. पूर्वी कसं छान होतं. दीर्घाचं -हस्व, आणि झालंच तर "आर्शिवाद", ह्यापलिकडे चुक्या दिसत नसत.

तर प्रस्ताव हा, की ह्या घसरलेल्या अनुस्वाराला कल्पक नाव द्या! इंग्रजीत एक greengrocer's apostrophe म्हणून संज्ञा आहे. म्हणजे नावाचं अनेकवचन शब्दावर "s" देऊन होत असेल तर गरज नसताना apostrophe देणे. जसे: fresh pumpkin's. मराठीतही गरज भासावी ही गोष्ट आपल्या ऊज्वल ईतीहासाला काळीमा फासणारि आहे.

घसरलेल्या रफारालाही नाव द्यायला हरकत नाही. पण "आर्शिवाद" हे हुकमी उदाहरण सोडल्यास मला आणखी काही दिसली नाहीत.

लेखनविषय: दुवे:

Comments

अनुस्वारांचा अतिरेक

मराठी साहित्य महामंडळाने १९६१ मध्ये सर्व अनुच्चारित अनुस्वार काढून टाकले. त्याचा फायदा प्रमुखाने खिळेजुळार्‍यांना, लेखनतपासनिकांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना झाला. वाचकांचा तोटाच झाला. अर्थनिष्पत्तीसाठीचे अनुस्वार काढून टाकल्यामुळे नाव आणि नांव, तात/तांत , पाच/पांच, का/कां, की/कीं, घाट/घांट, घोडे/घोडें, गुरू/गुरूं, नावे/नांवे/नावें, खाऊ/खाऊं इत्यादी वाचताना वाचकांचा संभ्रम होऊ लागला. कायद्याची पुस्तके लिहिणार्‍यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू लागले. इंग्रजी शिकवताना इट्‌ म्हणजे 'ते 'आणि दे म्हणजे पण 'ते' हे समजावणे कठीण झाले. नें, ईं, शीं, ंत, ईं, आं इत्यादी प्रत्ययातील अनुस्वार गेल्याने काव्ये नीरस झाली. 'जेव्हां','तेव्हां'चे अनुस्वार का काढले तर म्हणे लोक अनुस्वार व्हां च्या ऐवजी पहिल्या अक्षरावर देत होते आणि तसाच उच्चार करीत होते!

हे सर्व नियम यथातथ्य पाळणे कठीण होत चालल्याने लोक अनुस्वार घरंगळवायला लागले असावेत. जाहिरातदार आणि बरेच लेखक आपली अनुस्वारांची खुमखुमी लिखाणात बोली भाषा वापरून करायला लागले. शुद्धलेखनाच्या तेराव्या नियमानुसार वैचारिक लिखाणात नपुसकलिंगी एकारान्त शब्द अं-कारान्त लिहिणे अपराध असला तरी असे लिखाण सर्रास होते. याचा अतिरेक म्हणजे हल्ली बोलताना जिरे-मिरे या पुल्लिंगी शब्दांचा उच्चार जिरं-मिरं असा अशुद्ध ऐकू यायला लागला आहे. (जिरूं-मिरूं हे शब्द पूर्वी होते, तेव्हा हे क्षम्य होते.) तरीसुद्धा आडनावातील 'गांव'चा आणि टपालहंशील मधला अनुस्वार काढणे कुणालाही जमलेले नाही.
जगन्‍नाथरावसुद्धा असे लिखाण करून अनेक प्रतिथयश लेखकांचे भक्तिभावाने अनुशीलन करीत असल्याचे दिसते.---वाचक्‍नवी

जेव्हा तेव्हा जिरे मिरे

जेव्हा तेव्हा चा उच्चार, योग्य मार्गदर्शनाअभावी असेल, पण जेंव्हा, तेंव्हा असा केला जातो.
जिरे मिरे संबंधातील आपली टिप्पणी विशेष आहे. त्यासंबंधात जरा अधिक विस्ताराने सांगितलेत तर बरे होईल.
आपला
(मार्गदर्शनाभिलाषि) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

जिरे-मिरे

हल्ली रेडियो-दूरदर्शनवर ऐकू येणारी जिरं-मिरं ही रूपे बरोबर समजली तर लेखी भाषेत जिरें-मिरें असे नपुंसकलिंगी शब्द असायला हवेत. त्यासाठी जिर्‍या-मिर्‍याच्या एका दाण्याला जिरूं-मिरूं म्हणायला पाहिजे. जिरूं-मिरूं शब्द कालबाह्य म्हणून जिरें-मिरें हे नपुंसकलिंगी शब्द कालबाह्य आणि म्हणून जिरं-मिरं चूक.
ऊकारान्त शब्दांची अनेकवचने अशी होतात.: नपुंसकलिंगी:-गुरूं-गुरें, वासरूं-रें, पांखरूं-रें; तसे जिरूं-जिरें ..क्वचित गळू-गळवें, तारू- तारवें . ..पुल्लिंगी:-पेरू-पेरू, गडू-गडू....स्त्रीलिंगी तत्सम शब्द :- वधू-वधू...(फरक होत नाही)
परंतु मराठी शब्द:-सासू-सासवा, ऊ-उवा, जाऊ-जावा.
जिरा पुल्लिंगी असल्याने त्याचे अनेकवचन जिरे होते आणि त्याच कारणाने जिरं हे बोलीरूप होत नाही.
जिरें हा शब्द काहीजण समजतात त्याप्रमाणें नपुंसकलिंगी एकवचनी असेल तर त्याचे अनेकवचन केळें-केळीं, संत्रे-संत्रीं या प्रमाणें जिरीं व्हायला पाहिजे. असे असल्याच परत जिरं अशुद्ध. मूळ संस्कृत जीर: पुल्लिंगी म्हणून जिरा पुल्लिंगी असायला पाहिजे.

मिर्‍याच्या एका दाण्याला मिरें(नपुं) म्हटले तर अ.व. मिरीं. मिरी पुल्लिंगी असेल तर अ.व. मिर्‍यें. मिरीं(स्त्री) असेल तर अ.व. मिर्‍या. मिरा(पु) असेल तर अ.व.मिरे. आणि मिरूं(नपुं) असेल तरच अ.व.मिरें. मिरूं कालबाह्य म्हणून मिरं अशुद्ध.
मिर्‍याला संस्कृत मध्ये मरिचम्‌, मरीचम्‌ किंवा मारीच: म्हणतात.

मारीच: उद्‌भ्रान्तहारीता: मलयाद्रे: उपत्यका: । ।--रघुवंश ४.४६

(भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या) मलय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या रानात मरीच फळांच्या उग्र गंधाने हारीत पक्षी भांबावून गेले होते.
केळ्याच्या झाडाला कोकणात केळ आणि देशावर केळी म्हणतात - आणि फळाला केळें. मिर्‍या‍च्या वेलीला मिरी किंवा मिरवेल म्हणतात. त्याचे मिरमुटले फळ म्हणजे मिरा. एवंच जिरं-मिरं हे शब्द वापरू नयेत असे माझे मत! (चू.भू.द्या.घ्या.)--
आपला
(मार्गदर्शनाभिलाषि) वासुदेवांना चुकवण्याचा प्रयत्न करणारा (वा)चक‌(न)वा
--वाचक्‍नवी

जिरे-मिरे

केळ्याच्या झाडाला कोकणात केळ आणि देशावर केळी म्हणतात - आणि फळाला केळें. मिर्‍या‍च्या वेलीला मिरी किंवा मिरवेल म्हणतात. त्याचे मिरमुटले फळ म्हणजे मिरा. एवंच जिरं-मिरं हे शब्द वापरू नयेत असे माझे मत!

हा hyper-correction चा प्रकार अाहे असं वाटतं. हा मिरा, हे मिरे, हे बरोबर असलं तरी "हे मिरे" मध्ये नसता पोक्तपणा वाटतो. म्हणून अनेकवचनी असतानाही मात्रा उडवून त्याला "बोलीभाषेत" खेचतात.

दोन पिढ्यांपूर्वी व्रण ह्या शब्दाचा उच्चार "वरण" असा व्हायला लागला, म्हणून सभ्य लोक वरण ह्या शब्दाचे "अति"-शुद्धिकरण करून "अहो वर्ण वाढा" असे म्हणायचे, असे ऐकले अाहे.

"येण्याचे निमित्य काय" असे काही लोक विचारतात. कारण त्यांना निमित्त हा उच्चार अशुद्ध वाटतो.

इथे एका वेट्रेसबाईंनी मला अापण "ब्रिन् मॉयर अॅव्हेन्यू" वर राहतो असे सांगितले होते. खरा त्याचा उच्चार ब्रिनमॉर असाच अाहे. पण अशिक्षित लोक ड्रॉवर चा "ड्रॉर", लॉयर चा "लॉर" असे उच्चार करतात. त्यांनी सभ्य माणसाशी बोलतोय म्हणून मुद्दाम "शुद्ध" उच्चार केला.

अाता मी सभ्य, हे काय नवीन काढलं विचारू नका . . .

उत्तम माहिती, धन्यवाद!

एकवचन जिरा, अनेकवचन जिरे आणि जिरं चूक हे अगदी पटले.
ही उत्तम माहिती दिल्याबद्दल आणि सोदाहरण स्पष्टीकरणाबद्दल शतशः धन्यवाद!
आपला
(आभारी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

प्रतिसाद

ह्या अनुच्चारित चा माझ्या बोलण्याशी संबंध काय मला अजून समजलं नाही . . .

बोलीभाषेचं म्हणाल तर अाधी कुठे लिहिताय ते बघा. हे सगळे संकेतस्थळ वगैरे प्रकार आहेत त्यांचे रोजच्या संभाषणाशी जास्त सादृश्य आहे. मॅट्रिकच्या निबंधाशी नाही. म्हणून टाईप करायला जड जात असतानाही आम्ही अनुस्वारच देणार. तुटक वाक्यंबिक्यं लिहिणार. नाहीतर काय होईल? "दारूचा तांब्या हे साले लफडे काय असते बोवा" असलं काहीतरी लिहिलं तर लोक वेड्याच्या हॉस्पिटलात नाही पोचवणार?

शीर्षक संपादित. प्रतिसाद देताना तो उपक्रमाच्या ध्येय धोरणांशी सुसंगत असल्याची कृपया खात्री करून घ्यावी.

प्रति: प्रतिसाद

शीर्षक संपादित. प्रतिसाद देताना तो उपक्रमाच्या ध्येय धोरणांशी सुसंगत असल्याची कृपया खात्री करून घ्यावी.

हॅ . . . अमृतांजन हवंय . . . असो, ते "विसंगत" शीर्षक सर्वांनी अाधीच पाहिलेले असल्यामुळे हा खुलासा: ह्या संबोधनांत कुठलाही छुपा हल्ला नाही. चुका दाखवून देण्या-यांस वापरलेली ती कौतुकाची संबोधने आहे. नेमकी तीच का ते तुम्ही ओळखा. कुणी तक्रार केली असली तर माफी मागतो. पण इतके सेन्सिटिव्ह कोणी असतील असं वाटत नाही.

मजकूर संपादित. चुका दाखवून देण्यासाठीही सदस्यांनी शिष्टसंमत भाषेचा वापर करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी लेखनविषयक मार्गदर्शन वाचावे.

शेवटचे

मजकूर संपादित. चुका दाखवून देण्यासाठीही सदस्यांनी शिष्टसंमत भाषेचा वापर करणे गरजेचे आहे.

म्हणजे "ह्याने शिव्या दिल्या. तो म्हणतो त्या शिव्या नव्हेत. पण तो काय म्हणाला हे अाम्ही सांगू शकत नाही, कारण त्या शिव्या अाहेत."

शिव्या देण्याचा अारोप करणे हे शिष्टसंमत, काय?

वाचक्नवी, यनावाला ह्यांना: काही म्हटलं नव्हतं.

माझ्या लेखी हा विषय खलास.

दादानां हार्दिक शुभेच्छा

पुणे जिल्ह्याचे थोर नेते श्री. अजितदादा पवार (एकच वादा, अजित दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपवड परिसरात सर्वत्र खालील शब्दांचे फलक लावले आहेत.


दादानां
हार्दिक शुभेच्छा

मला प्रथम हा नाम् ताम् सारखा संस्कृत प्रत्यययुक्त शब्द वाटून, 'जीवेत् शरदः शतम्' प्रमाणे संस्कृतातच शुभेच्छा दिल्याचे वाटले.

दुसरी एक गंमत म्हणजे डांगे चौकात महाराष्ट्राचे कार्यकारी नेते उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांसोबत कतृत्त्ववान विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला आहे.

थोडक्यात हल्लीच्या मराठीत रफार आणि अनुस्वार त्रासदायक आणि निरुपयोगी ठरत आहेत असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अनुस्वार कुठे

खूप जुन्या मराठी प्रमाणे दादानां हे शुद्ध आहे. माझे आजोबा व वडील असे लिहीत असत. (ते अशुद्ध लिहीत असणे संभवत नाही).

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

कल्पना नाही

इतरांची मते वाचण्यास उत्सुक. दादानां हे शुद्ध असेल असे मला वाटत नाही. (माझा जुन्या मराठीशी फारसा संबंध आलाच नाही. माझे आजोबा कसे लिहीत असत हे मी पाहिले नाही आणि वडील कसे लिहीत असत हे त्यांनी पाहू दिले नाही. :-) )


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तसेच

इतक्या ठिकाणी दुध लिहीतात की त्याची दखल घेऊन दूध ऐवजी दुध बरोबर आहे असे जाहिर करावे असे वाटते.

उपचर्चा : र्‍हस्व दीर्घचा कितपत उपयोग आहे. मला बरेचदा ऐकून ठरवता येत नाही.

ऐकावे जनाचे?

उच्चार कोण करते त्यानुसार ठरविण्यातील सुलभता बदलत असावी का?

भाषा

भाषा जनमत, लोकप्रियता, सोय यांच्यापुढे बरेचदा वेडीवाकडी वळणे घेते आणि कालांतराने ती वळणे संमत होतात. अमेरिकन इंग्रजी* हे एक उदाहरण.
उच्चारांविषयी असा नियम लावता येईल का नाही शंका आहे. अर्थात काही बाबतीत हे नक्कीच खरे आहे. काही लोक जात्याच भाषेविषयी जागरूक असतात. काहींनासुद्दनायीलि।इलेतरीतरीचालते. कालांतराने यातील बहुमत बहुधा टिकत असावे.

अवांतर : *अमेरिकन आणि ब्रिटीश इंग्रजीविषयी असलेला एक मोठा गैरसमज नुकताच दूर झाला. गैरसमज हा की अमेरिकन लोकांनी राणीच्या देशातील इंग्रजी भ्रष्ट केले. प्रत्यक्षात असे झाले नव्हते. जेव्हा ब्रिटीश लोक अमेरिकेत उतरले तेव्हा त्यांचे उच्चार इंग्लंडातील लोकांसारखेच होते (Duh!) आणि त्यात गेल्या शतकांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. मात्र इंग्लंडमधील उच्चारांमध्ये बराच फरक पडला आणि आज जो फरक जाणवतो त्याचे कारण ब्रिटीश उच्चार बदलले हे आहे.
दुवा.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

घंगरळलेले अनुस्वार

टगोजीराव

आपले विचार जुळतात की. म्हणजे घरंगळलेलेवरचा अनुस्वार घरंगळवण्याबाबतीत. ;-)

कसं डोक्यात घरंग घरंग व्हायलंय की नाही?

अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.

यर्जुवेद

आणि अव्दैत...

अव्दैतवरुन

कन्नडा लिपीमध्ये जोडाक्षरे लिहिताना जे अक्षर अर्धे उच्चारतो ते पूर्ण लिहितात व पूर्ण उच्चाराचे अक्षर अर्धे.
देवनागरीमध्ये याच्या उलट आहे.

बाल्य = ಬಾಲ್ಯ
यात देवनागरीतील ल हा अर्धा आणि य पूर्ण तर कन्नडामधील ल (ಲ) हा पूर्ण आणि य(ಯ) अर्धा आहे.

- ಆಜಾನುಕರ್ಣ

कन्नडा लिपी

हा फॉंट कुठून मिळवावा?

फाँट

ही अक्षरे गमभनकॄत आहेत. तिथून घेऊन इथे चिकटवली आहेत.

फॉंट हा शब्द कसा उच्चारणार? तुम्ही याचे टंकन कसे केले?

फॉर्मॅट

एफ ओ आर एम ए टी या इंग्रजी शब्दाचे टंकन मराठी लिपीत नीट करता येत नाही (म्हणजे करता येते, पण विचीत्र दिसते)ही समस्या मला नेहमी येते.

फॉर्‌मॅट्‌, नॉर्‌दॅम्‌प्टन्‌

फॉर्‌मॅट, नॉर्‌दॅम्‌‌प्टन हे शब्द गमभन मध्ये टंकता येत नाहीत. बराहमध्ये येतात. मनोगतवरपण येतील, पण ते असे दिसतील. रफारच्या चिन्हावर चंद्र काढला तर तो कसा दिसून येईल? दीर्घ ई वर अनुस्वार कुठेच देता येत नाही. बाई ला अनेकवचनी द्वितीयेचा प्रत्यय कसा लावायचा की जेणेकरून शब्दाचा उच्चार बाईन्‍ना असा होईल? अ वरचा चंद्र, शेंडीफ़ोड्या श, संस्कृत ख आता विसरावेत. गमभन वरचा ढ पण तिरप्या ळ सारखा दिसतो. ख्रस्ता, ख्‌रिस्तमधल्या ख ला र कसा जोडायचा? हिंदीमध्ये ईसा मसीह म्हणतात आणि ख्रस्ता शब्दच नाही म्हणून ते सुटले. . आपल्या या सर्व फॉन्ट्‌स मधल्या र्‍हस्व वेलांट्या फार अरुंद आहेत. स्ट्यिची वेलांटी य पर्यंत यायला पाहिजे , ती 'ट' पर्यंत पण येत नाही. हे कुठलेही फॉन्ट्‌स मराठीकरिता बनविलेले नाहीत--वाचक्‍नवी

ख्रस्ता

ख्रस्ता म्हणे अशुद्ध लिहिलेला खस्ता. बाकी दोन्ही शब्दांच्या लिखाणात काही फरक दिसत नाही आहे, र जोडला काय आणि न जोडला काय दोन्ही एकच! मात्र मी दिलेले उदाहरण चुकलेच, तिथे फ़ख्र सारख्या अरबी शब्दाचा दाखला द्यायला हवा होता.
ताठ शेंडीच्या विष्णुगुप्त आर्यासारख्या दिसणारा मराठी श सोडून केशलुंचनाच्या वेदना सहन करीत खाली मान घालून चालणारा क्षपणक श, बैठक मारलेल्या भरतनाट्यम्‌ करणार्‍या नर्तिकेप्रमाणे दिसणार्‍या ल ऐवजी एका पायाने फेंगडा आणि दुसर्‍या पायाच्या जागी कुबडी असलेला ल, तसेच 'व' ला कमरेखाली खंजिराने वार करत असलेला ख आपण का स्वीकारावा? असे करणे म्हणजे हिंदीचे दास्यत्व पत्करण्यासारखे आहे. बराह फॉन्ट्‌स मला सुरुवातीला अजिबात भावले नव्हते. चिखलात लोळून आलेल्या डुकराचे पांढर्‍या सिमेंटच्या रस्त्यावर उमटलेले पाय जसे दिसतात तशी ही अक्षरे मला वाटायची. म्हणूनच या फॉन्टना वराह ठसे म्हणतात की काय? आता पाहून पाहून सवय झाली. ई-लिपी किंवा श्री-लिपी चे सुबक टंक सोडून केवळ युनिकोडसाठी ह्या टंकांकडे वळावे लागले. जाताजाता एक सांगावेसे वाटते. श्रीलिपीत ख मधले बिलगलेले र आणि व, पुढे जोडायचा र दिसताच विलग होतात.

विकीवरचा सम्राट अलेक्झांडर समाट होतो. सॉक्रेटिसची जान खाणारी झान्टिपी हिंदीत जानटिपी होते. डोळ्यावरची झापड हिंदीत थप्पड होते. कारण हिंदीत मराठीतला झ नाही . जुन्या मराठी अक्षरलेखनाचा वापर हणजे चाकाचा नव्याने शोध लावणे नाही, तर अस्तंगत होत चाललेल्या मराठी संस्कृतीचे पुनरुज्‍जीवन करणे आहे. केवळ नवीन आहे म्हणून तकलादू चाक वापरण्यापेक्षा तहहयात टिकणारे जुने मजबूत देखणे चाक गाडीला लावणे अधिक रास्त.
लावण्या(तमाशागीते) आणि लावण्या(सुंदरी) याचे उच्चार वेगळे असणारच. मराठीत जोडाक्षर वाचताना आधीच्या अक्षरावर आघात होत नाही. संस्कृतात होतो. ह्या जोडाक्षरातले दुसरे अक्षर य, व,र, ह पैकी असले की हा उच्चारफरक जास्त जाणवतो. मराठी शब्द लिहिण्यातली ही त्रुटी(लिहिता येतो की, ट्र होत नाही ) दूर करायची असेल तर मुळाक्षरे अतोनात वाढतील. त्यापेक्षा शब्द संस्कृत आहे की मराठी हे जाणून उचित उच्चारण करणे हेच आपल्या हाती(की तोंडी?)--वाचक्‍नवी

लावण्य

लावण्य हा संस्कृत शब्द आहे, त्याचे लिखाण बदलता येणार नाही. पुट आणि बट मधल्या बटचे बी ए टी करता येणार नाही तसे.
फार रुंद नावांप्रमणे(छत्रपती शिवाजी टर्मिनस्‌) रुंद जोडाक्षरे लोकप्रिय होत नाहीत. म्हणूनच क्‍ष चे क्ष, ज्‍ञ चे ज्ञ, ट्‍ट चे ट्ट, क्‍क चे क्क, न्‍न चे न्न वगैरे केले गेले. छपाईसाठी फार अरुंद अक्षरांचे टंक बनवणे पण जिकीरीचे असे. टाइम्ज न्यू रोमन मध्ये एफ़्‌ आय्‌ चे लिगेचर होते. तसेच आर्‌ एन्‌ चे. कॉर्न हा कॉम दिसतो. कोरियर मध्ये असे होत नाही. एम्‌ ची रुंदी एन्‌ च्या दुप्पट. म्हणूनच इंग्रजीत डॅशचे दोन प्रकार-एन्‌ डॅश आणि एम्‌‌ डॅश. तिसरा हाय्‌फ़न.

आणि महत्त्वाचे. शुद्धलेखनाचे नियम फक्त तेरा नाहीत, अठरा आहेत. लमाणांना बरेच पाठांतर करावे लागेल!--वाचक्‍नवी

उपमा

"ताठ शेंडीच्या विष्णुगुप्त आर्यासारख्या दिसणारा मराठी श सोडून केशलुंचनाच्या वेदना सहन करीत खाली मान घालून चालणारा क्षपणक श, बैठक मारलेल्या भरतनाट्यम्‌ करणार्‍या नर्तिकेप्रमाणे दिसणार्‍या ल ऐवजी एका पायाने फेंगडा आणि दुसर्‍या पायाच्या जागी कुबडी असलेला ल, तसेच 'व' ला कमरेखाली खंजिराने वार करत असलेला ख आपण का स्वीकारावा? असे करणे म्हणजे हिंदीचे दास्यत्व पत्करण्यासारखे आहे. बराह फॉन्ट्‌स मला सुरुवातीला अजिबात भावले नव्हते. चिखलात लोळून आलेल्या डुकराचे पांढर्‍या सिमेंटच्या रस्त्यावर उमटलेले पाय जसे दिसतात तशी ही अक्षरे मला वाटायची."
हाहाहा.
वाचक्नवींच्या उपमा मजेशीर आणि भाषाविषयक प्रतिसाद माहितीपूर्ण असतात. हे श चे कळले नाही. मी बहुधा विष्णुगुप्त श पाहिलाच नसावा.

विष्णुगुप्त श

म्हणजे एक छोटी सुबक रेघ काढून त्याला मान शेळीप्रमाणे खाली घातलेला र जोडावयाचा. दिसायला अतिशय सुंदर व ताठ मानेचा दिसतो तो.
सध्या प्रचलित असलेला गोल गोळीचा हा श काढायला आम्हाला कधी जमलेच नाही. आणि त्यात शिक्षा म्हणजे आमचे नावही श ने संपते.

काय दैवदुर्विलास हा... त्यामुळे श शी दुरान्वयेही संबंध न येणारे आजानुकर्ण हे नाव आम्ही समारंभपूर्वक घेतले.

- वरील प्रतिसाद वाचल्यानंतर आम्ही वाचक्नवींचे फ्यॅन झालो आहोत.

होय.

वरील प्रतिसाद वाचल्यानंतर आम्ही वाचक्नवींचे फ्यॅन झालो आहोत.
अजानुकर्णांशी सहमत.
वाचक्नवींचा प्रतिसाद फारच सुरेख .
-- लिखाळ.

त्यांनी दारुचा अर्धा पेला रिचवून भैरवी गायली आणि श्रोत्यांनी उरलेल्या अर्ध्या पेल्यावर चर्चा केली.

बराह नव्हे बरहा - थोडे अधिक

भारतीय लिप्यांमध्ये वापरण्यात येणार्‍या संगणकावर प्राणप्रतिष्ठा केलेल्या प्रणालीचे नाव बरहा असे आहे. बराह नव्हे.

कानडीतील बरेयुवदु - लिहिणे या क्रियापदापासून 'बरहा' सिद्ध होतो. उपक्रमावर दक्षिण भारतीय उच्चारांबाबत आधीच चर्चा झाली आहे. द्राविडी लोक शब्दाच्या शेवटी येणारा अ लांबवतात त्यामुळे महाराष्ट्र - महाराष्ट्रा, आंध्र - आंध्रा, कर्नाटक - कर्नाटका असे उच्चार होतात.

महाराष्ट्रीयांना शेवटचा अ उच्चारता येतो मात्र रामा, गणेशा, योगा वगैरे ठिकाणीही आता आपल्या मराठी उच्चारांचे वेगळेपण पुसले जात आहे. हा देखील दास्यत्वाचाच नमुना म्हणावयाचा का?

- आजानुकर्ण
आमचे प्रेम पुण्यावर आहे.
पापावर नाही.

बरह,दास्य/दासत्व, नर्तकी

कानडीत बरपण्ण म्हणजे लेखनपंडित. बरवणिगे म्हणजे हस्ताक्षर. बरह किंवा बरेहप म्हणजे लिखाण किंवा लिपी. यात 'हा' कुठेच आला नाही. बराहा या टंकनामातल्या कुठल्या ए चा आ करायचा हे स्पष्ट नाही. शेवटचा साधारणपणे नाही, तेव्हा हे नाव बरह/वरह/वराह म्हणजे बंगाली बराह असण्याची शक्यता अधिक!
शेवटचा सोडून द्या, मराठी-गुजराथी आणि महाराष्ट्रालगतचे थोडे कन्नड-तेलुगू सोडले तर उरलेल्या भारतीयांना गमभन किंवा सारेगम म्हणता येत नाही. ते गामाभाना, सारेगामापा म्हणतात. एका मल्याळी माणसाला गुजराथी शिकवताना माझी अशीच पंचाईत झाली होती. पुढे त्याच्या उच्चारदोषांचा स्वीकार केल्यावर अडचण आली नाही.

इंग्रजी स्पेलिंग करताना रामा, योगा असे करावे लागते. नाहीतर उच्चार रॅम्‌, यॉग्‌ असे होतील. इतर भाषक मूळ इंग्रजीतून त्यांच्या भाषेत रूपांतर करत असल्याने असे होते. हे दासत्व /दास्य नाही-पुनर्भाषांतराचा परिणाम आहे. मराठीत लिहिताना रामा योगा करणे वेडेपणाचे!

दासत्व, नर्तकी या शब्दांचे टंकन करताना माझी झालेली चूक दिगम्भांनी कानात कुजबुजून सांगितली. त्यांचे जाहीर आभार!--वाचक्‍नवी

बरहाच - हे पहा

विस्तृत व माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

बरहाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन घेतलेले हे चित्र पहा.

यात लिहिलेला शब्द बरह असा आहे. कानडी उच्चारशास्त्रानुसार शेवटच्या ह चा हा होतो. म्हणून बरहा असे म्हटले.

आपल्याला अभिप्रेत असलेला बरहा/बरह/बराह/वराह/बारह हाच आहे हे गृहीत धरुन हा प्रतिसाद दिला आहे.

चू.भू.दे.घे.

- आजानुकर्ण

बरह

आजानुकर्ण,
त्या टंकप्रणालीचे नाव बरह किंवा बरहा आहे हे शंभरटक्के पटले. मुळात या टंकांची रचना कर्नाटकनिवासींनी केली आहे मला ठाऊक नव्हते. खरे म्हणजे त्यातल्या र्‍हस्व एकार ओकारांवरून फॉन्ट्‌सचा उगम कर्नाटक किवा आंध्रात आहे हे समजायला हवे होते. मूळ बंगाली असते तर वराहचे स्पेलिंग बराह केले असे म्हणता आले असते. तरीसुद्धा ती अक्षरे फार सुबक आहेत असे सिद्ध होत नाही.
जाता जाता एक- कानडीमध्ये वरह ह्या शब्दाचे-- वराह, रानडुक्कर हे अर्थपण होतात. आता मी आपल्याला हे सांगायला पाहिजे असे नाही. पण एकूण काय, गैरसमज दूर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद! --वाचक्‍नवी

बरहाविषयी थोडे अधिक

शिवाय बरहा ही टंकलेखन पद्धत टीएसआर (टर्मिनेट अँड स्टे रेसिडन्ट) प्रकारची एक प्रणाली (सॉफ्टवेअर) आहे असे वाटते. फॉन्ट/चित्रलिपी नाही.

बरहा वापरत असलेला व आपल्याला समोर दिसत असलेला मंगल हा फॉन्ट मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेला आहे असे मंगल फाँटबाबत अधिक शोध घेतला असता कळाले.

बरहा पद्धती केवळ तुम्ही वापरत असलेल्या कळींची नोंद घेऊन त्यानुसार एक कोड तयार करते व तो कोड कसा दाखवायचा हे चित्रलिपी/फॉन्ट ठरवते असा माझा समज आहे.

ओंकार, शंतनू, लमाण वगैरे इतर तज्ज्ञांनी यावर खुलासा करावा.




शुद्धलेखनाच्या १७.५ नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा व पालन न केलेला अर्धा नियम ओळखा.

होय

महाराष्ट्रीयांना शेवटचा अ उच्चारता येतो मात्र रामा, गणेशा, योगा वगैरे ठिकाणीही आता आपल्या मराठी उच्चारांचे वेगळेपण पुसले जात आहे. हा देखील दास्यत्वाचाच नमुना म्हणावयाचा का?
असेच म्हणावे लागेल.

आमचे प्रेम पुण्यावर आहे.
पापावर नाही.
हा हा हा..ते पाप पुढे आल्यावर आधीचे गाव नाही ते समजले. (श्लेश असेल तर तो सुद्धा आकर्षकच.) ते वरचे लावण्या आणि लावण्या वरुन पुढे चालू .

आमचे पुण्यावर प्रेम आहेच. आता भेट सुद्धा घडणार आहे.:)
-- लिखाळ.

त्यांनी दारुचा अर्धा पेला रिचवून भैरवी गायली आणि श्रोत्यांनी उरलेल्या अर्ध्या पेल्यावर चर्चा केली.

कुबडी घेतलेला 'ल' च बरोबर?

बैठक मारलेल्या भरतनाट्यम्‌ करणार्‍या नर्तिकेप्रमाणे दिसणार्‍या ल ऐवजी एका पायाने फेंगडा आणि दुसर्‍या पायाच्या जागी कुबडी असलेला 'ल'
-मराठीतला मूळ 'ल' असाच कुबडी घेतलेला आहे - पहा

shrI chaamuMDaraaye
मराठीतील पहिला शीलालेख : प्रकाशचित्र विकीवरून साभार

हा मराठीतील पहिला शीलालेख

यात दोन्ही ओळीत शेवटची अक्षरे कुबडी घेतलेले 'लेले' आहेत. ;)

शिलालेख मोडीतील असावा

हा शिलालेख मोडीतील असावा असे वाटते. आणि मोडीला आपण कधीच मोडीत काढले आहे. वाचक्नवींचा दावा देवनागरी ल बद्दल असावा.


शुद्धलेखनाच्या १७.५ नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा व न पाळलेला अर्धा नियम शोधा.

मोडीत नाही.

मोडीत 'ल' मराठी ४ सारखा लिहितात.
पहा -

मोडी बाराखडी 'ल' : चित्र येथून साभार

मोडी बाराखडी

पहिला शिलालेख

विसूनाना,

श्री चावुण्डराजे करवियलें
श्री गंगराज सुत्ताले करवियले


ब्राह्मी लिपीतून मराठी लिपी(देवनागरी ) बनताना कुबडी-ल अगोदर झाला आणि नर्तकी-ल नंतर हे मी वरील व अन्य शिलालेख पाहून खातरजमा करून घेतली आहे. ही माहिती मला खरोखरच नव्हती. दिल्याबद्दल मनापासून आभार. तरीसुद्धा नर्तकी-ल जास्त सुबक आहे हे मत मी सोडायला तयार नाही.
नर्तकी-ल इसवी सन १३९५ मध्ये मढगांव(वेंगुर्ले )येथील शिलालेखात पहिल्यांदा वापरलेला दिसतो आहे.

अथश्री सालीवानसकु कु १३१७ वरीसे चीत्र भानु
सवसेन आदीक बाउकृ ३ गुरुवारी चांदगडाजजीपती नेर्‍यसी
देवाथी दळवै यानें याचा पीता भाम सावंतु त्य दीद्दीसी उपभोगा
सी दत वीडा ध्रुपाते ला देया उपभोगा सीदत
नौका टाके १४ आखेर तो पी टांके १४ उपभोगासी

अधोरेखित केलेले ल नर्तकी-ल आहेत. --वाचक्‍नवी

ख्रस्ता

अप्रतिम

फॉंट

बराह मध्ये पी, एच्‌ ,स्वंग-डॅश(टिल्ड), ओ आणि पुढे कॅपिटल एम्‌ टंकला की 'फॉं' उमटते. याचा उच्चार फ़ंव्वॉ.--वाचक्‍नवी

अव्दैत...

बास! हे मला सुचलं नाही. द्व चा व्द, द्ध चा ध्द, हे सगळीकडे दिसतं.

पण त्यांच्यात जोडाक्षर काढावं कसं ह्याबाबत गोंधळ आहे. यर्जुवेद व मडंळ ह्यांच्यात पोझीशनचा गोंधळ आहे.

मी स्वतः "डोगंराची काळी मेना" आणि "माऊशीबाईंचा आर्शिवाद" असा डबल विक्रम करणा-या रिक्षात बसलो आहे! ती मिळावी म्हणून तीन रिक्षा सोडल्या. आहे कुणाकडे अशी डिव्होशन?

रूपक

मी स्वतः "डोगंराची काळी मेना" आणि "माऊशीबाईंचा आर्शिवाद" असा डबल विक्रम करणा-या रिक्षात बसलो आहे! ती मिळावी म्हणून तीन रिक्षा सोडल्या. आहे कुणाकडे अशी डिव्होशन?

जगन्नाथ,
असली डिव्होशन् थँकलेस् असते. मी एकदा जसराजचे गायन ऐकून त्या धुंदीत रूपक तालात १|| किमी चालत गेलो होतो त्याची आठवण झाली.
लोक वेडा (किंवा त्याच अर्थाचा अर्वाच्य शब्द) म्हणतात हे सोडून दुसरे काही मिळत नाही यातून.
- दिगम्भा

पुरस्कृत

मी स्वतः "डोगंराची काळी मेना" आणि "माऊशीबाईंचा आर्शिवाद" असा डबल विक्रम करणा-या रिक्षात बसलो आहे! ती मिळावी म्हणून तीन रिक्षा सोडल्या. आहे कुणाकडे अशी डिव्होशन?
जगन्नाथ,
असली डिव्होशन् थँकलेस् असते. मी एकदा जसराजचे गायन ऐकून त्या धुंदीत रूपक तालात १|| किमी चालत गेलो होतो त्याची आठवण झाली.
लोक वेडा (किंवा त्याच अर्थाचा अर्वाच्य शब्द) म्हणतात हे सोडून दुसरे काही मिळत नाही यातून.
- दिगम्भा

ह्या बिनतोड रूपकाबद्दल आपल्याला अाजचा श्रीअतुलचंद्ररावजी शेरतुकडे पुरस्कार ... !

अर्वाच्य???

बै द वे, "अर्वाच्य" हा शब्द म्हणजे हे रूप चूक असून "अवाच्य" हे रूप बरोबर आहे असे काही वर्षांपूर्वी ललित वा तत्सम मासिकात वाचलेले आठवते आहे. रफार हा शिवीचा "जोर" दर्शविण्यासाठी चिकटला असावा. आधी उच्चारी आणि मग लिखाणात.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

गंमत आहे

मोल्सवर्थच्या शब्दकोशातही तुमच्या संदर्भासारखेच लिहिले आहे.

आजवर मी हा शब्द संस्कृतोद्भव मानत असे - म्हणजे रफार तरी. वैदिक वाङ्मयात "अर्वाच्" हा शब्द आढळतो. त्याचा अर्थ "जवळ येणारा, ऐलतिरावर, संख्येच्या-या-बाजूला" वगैरे होतो. त्याच्या अर्थात "जवळच्या गोटातच बोलण्यासारखे" असा काहीतरी बदल होऊन मराठीत "अर्वाच्य" असे रूप घडले असेल, असा माझा आजवर गैरसमज होता.

+१, असाच गैरसमज , मात्र

+१ माझाही असाच गैरसमज होता असे दिसते.
मात्र आता अर्वाच्य रुळल्यावर जर मी 'अवाच्य' लिहिलं तर ते चूकीचं नाही होणार का? मराठी पुरते बोलायचे तर आता, चिकटलेल्या रफारासकट अर्वाच्यच योग्य समजले पाहिजे नाहि का?

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

संदर्भावर अवलंबून आहे

"अवाच्य" हा सामासिक शब्द इच्छा असेल तर वापरता येतो. (उदाहरणार्थ "असंग्राह्य" हा शब्द मी आजवर वाचला किंवा ऐकलेला नाही. पण मराठीतील "नञ्-तत्पुरुष" साच्यातून तो शब्द बनवून मी इच्छेनुसार वापरू शकतो. त्याच प्रमाणे "अवाच्य" हा शब्द रूढ नसला, तरी मी यौगिक - नियमांनी बनवलेला - म्हणून वापरू शकतो.)

मात्र प्रश्नोत्तरांचा संदर्भ असेल, तर उत्तरात प्रश्नातील बरेचसे शब्द जसेच्या तसे येणे अपेक्षित असते. ते जसेच्या तसे आले नाहीत तर उत्तर सुसंदर्भ वाटत नाही. अशा परिस्थितीत प्रश्नातील "अर्वाच्य" खोडून उत्तरात "अवाच्य" म्हटले तर ठीक वाटणार नाही.

वकील : साक्षीदारसाहेब, आरोपीने फिर्यादीला अर्वाच्य शिव्या दिल्या का?
साक्षीदार : नाही, अवाच्य(?) शिव्या दिल्या नाहीत, सामान्य शब्दांत अपमान केला.

येथे ठीक वाटत नाही.

वकील : साक्षीदारसाहेब, आरोपीने फिर्यादीला अवाच्य शिव्या दिल्या का?
साक्षीदार : नाही, अवाच्य शिव्या दिल्या नाहीत, सामान्य शब्दांत अपमान केला.

येथे ठीक वाटते. (मात्र सवयीमुळे साक्षीदार "अर्वाच्य" असे ऐकून उत्तरात तोच शब्द वापरेल, ही मोठी शक्यता आहे.)

+१

आपल्याशी सहमत.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

अवाच्य हा शब्द गीतेत असावा.

अर्वाच् हा शब्द वैदिक वाङ्मयात आहे, ही माहिती नवीन होती. अर्वाचीन हा शब्द त्यावरून आला असेल का?

आणि गीतेत अवाच्य हा शब्द आहे असे त्या लेखात लिहिलेले होते बहुतेक. "अवाच्यान् दोषान्" असे काहीतरी. नीट पाहून सांगतो.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

अवाच्य हा शब्द देखील चूकीचाच वाटतोय.


"अर्वाच्य" हा शब्द म्हणजे हे रूप चूक असून "अवाच्य" हे रूप बरोबर आहे असे काही वर्षांपूर्वी ललित वा तत्सम मासिकात वाचलेले आठवते आहे. रफार हा शिवीचा "जोर" दर्शविण्यासाठी चिकटला असावा. आधी उच्चारी आणि मग लिखाणात.

वरील मत एका अंगाने चूकीचे वाटतेय.
अवाच्य ह्या शब्दाचा अर्थ 'वाचण्यास अयोग्य' असा होतो. हिंदित तसाच वापरला जातो.
'सुवाच्य' शब्द 'वाचनास सोपे असे' ह्या अर्थाने वापरला जातो.
'दुर्वाच्य' शब्द 'वाचनास दुर्बोध असे' ह्या अर्थाने हिंदित वापरला जातो.

तुम्ही प्रतिसाद दिलेल्या प्रतिसादकांस 'असभ्य भाशा' ह्या वर्गातील एक शब्द असे वर्गीकरण दर्शविणारा शब्द तेथे योजावयचा होता. प्रचलित शब्द 'अर्वाच्य' हाच आहे. तो त्यांनी वापरला. हो! जे प्रचलित आहे ते चूकीचे आहे हे मान्य. पण मुळ चूकलेल्या शब्दाच्याजागी अर्थव्यक्तीसाठी 'अवाच्य' हा शब्द देखील जुळत नाही.

बरं अवाच्य हा शब्द अर्वाच्य लिखीत प्रयोगातूनच झाला असावा. कोणत्यातरी लेखकाकडून 'असभ्य शब्द लिहू नये' हे सूचवण्यासाठी चूकून 'अर्वाच्य शब्दप्रयोग' असे झालं असण्याची शक्यता जास्त वाटते. वाचनातून मग तो चूकलेला शब्द बोलण्यात व्यक्त होऊ लागला असावा, तेही सभ्य व सुसुशिक्शीत मंडळींकडून, अशिक्शीतांकडून असा 'संस्कृतच्या तूपात' तळलेला शब्दप्रयोग झाला नसावा.

हल्ली मी इंग्रजीतील 'कर्व' करीता मराठीत शब्द शोधत असताना, वरील प्रकारचा ('रफारवाला') एक नवा शब्द सापडला.

'वट्ट' - हा प्राकृत शब्द आहे. ह्याचेच मराठी रूप 'वाट्टोळं' असं झालं असावं.
कारण 'वट्ट' हा शब्द इंग्रजी 'कर्व' हा अर्थ सांगणारा असावा असे मला वाटते.

वाटोळ्याचे संस्कृतवाल्यांनी 'वर्तुळ' केले असावे. परंतु 'वट्ट' किंवा 'वट्टू' चे संस्कृतवाल्यांनी 'वर्त' केले नाही.

प्रियंवदा _/

आणि प्रियवंदा विसरलात?--वाचक्‍नवी

अनुस्वार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वचक्नवी लिहितात "शुद्धलेखनाच्या तेराव्या नियमानुसार वैचारिक लिखाणात नपुसकलिंगी एकारान्त शब्द अं-कारान्त लिहिणे अपराध असला तरी असे लिखाण सर्रास होते." त्यांच्या या विचाराशी मी पूर्ण सहमत आहे. "त्यानं तसं केलं, त्यामुळं असं झालं." असले लेखन आता इतके रूढ झाले आहे की त्यावर आता कोणाचीच मात्रा चालेनाशी झाली आहे.अनुस्वार घरंगळले तर तो लेखनदोष मानला जातो. मात्रा कापणे हे आता सुप्रतिष्ठित झाले आहे. त्यामुळे नपु.एकारान्त शब्द मात्रेसह लिहिले तर लोक वेड्यांच्या इस्पितळात पाठवतील असे श्री. जगन्नाथ म्हणतात ते खरे आहे. पाठविले तर जायला हवे! दुसरे काय करणार !

 
^ वर