घरंगळलेले अनुस्वार

हे अंगुलिमालाप्रकाशचित्र विनोदबुद्धी बाजूला ठेवून पुनश्च पहा:

अनुस्वार

लक्षात आलं का मला काय म्हणायचंय ते? अनुस्वारांची पार बरबादी झाली आहे. इथेच नाही. जिकडेतिकडे ही प्रवृत्ती वाढते आहे. अनुस्वार कुठल्या अक्षरावर द्यायचा ह्याबाबतच मनात गोंधळ! "मडंळ", "श्रीव्यकंटेश", आणि "डोगंराची काळी मैना"! असली फल्तुगिरी मला मुबंईत, आपलं मुंबईत, ठिकठिकाणी दिसली. पूर्वी कसं छान होतं. दीर्घाचं -हस्व, आणि झालंच तर "आर्शिवाद", ह्यापलिकडे चुक्या दिसत नसत.

तर प्रस्ताव हा, की ह्या घसरलेल्या अनुस्वाराला कल्पक नाव द्या! इंग्रजीत एक greengrocer's apostrophe म्हणून संज्ञा आहे. म्हणजे नावाचं अनेकवचन शब्दावर "s" देऊन होत असेल तर गरज नसताना apostrophe देणे. जसे: fresh pumpkin's. मराठीतही गरज भासावी ही गोष्ट आपल्या ऊज्वल ईतीहासाला काळीमा फासणारि आहे.

घसरलेल्या रफारालाही नाव द्यायला हरकत नाही. पण "आर्शिवाद" हे हुकमी उदाहरण सोडल्यास मला आणखी काही दिसली नाहीत.

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रथितयश

हा शब्द मी चुकीचा लिहिला होता, हे अनेकांच्या, विशेषतः यनावालांच्या लक्षात आलेच असणार; त्यांनी समजूतदारपणा दाखवून त्या प्रमादाकडे दुर्लक्ष केले असणार. जगन्‍नाथरावांचे मूळ लिखाण वैचारिक नव्हते हे माझ्या अजिबात ध्यानात आले नव्हते!--वाचक्‍नवी

प्रतिसाद

अरे एवढा साधा फरक ध्यानात येत नाही? अनुस्वार पुढच्या अक्षरावर टाकणं ह्यात गोंधळ आहे. मात्रा कापणं ठरवून केलेलं आहे.

शिवाय केले/केलं मधला फरक वेगळा, त्याने/त्यानं मधला वेगळा. तो शुद्धलेखनवाल्यांना शंभर वर्षांत समजणार नाही. कारण त्यांना चूक की बरोबर हे माहीत. लिखाणात "सोशल" छटा आणता येतात हे माहीतच नाही.

मजकूर संपादित. व्यक्तिगत रोखाचा भाग वगळला आहे.

सोशल छटा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ललित लेखनात तसेच संवादलेखनात असे मात्राहीन लेखन मान्यच आहे. आमचा (श्री. वासुदेव यांचा तसेच माझा) विरोध आहे तो वैचारिक लेखनासंबंधी. तिथे तरी प्रमाणभूत भाषा असावी ,असे मत आहे.
.......................................................................
सुधारणा:वरील प्रतिसादात श्री. वासुदेव यांचे नाव लिहिले गेले आहे. वस्तुतः तिथे श्री. वाचक्नवी यांचे नाव हवे होते.चूक झाली. क्षमस्व.

वैचारिक लेखनासंबंधी

ललित लेखनात तसेच संवादलेखनात असे मात्राहीन लेखन मान्यच आहे. आमचा (श्री. वासुदेव यांचा तसेच माझा) विरोध आहे तो वैचारिक लेखनासंबंधी. तिथे तरी प्रमाणभूत भाषा असावी ,असे मत आहे.

सहमत. आणि माझी स्वतःची तशी असावी असा माझा प्रयत्न असतो. पण ते नेहमीच जमते असे नाही. (मग त्याला वैचारिक म्हणायचे नाही ही एक तोड अाहे!)

"तुटक वाक्ये" हा जो प्रकार अाहे तो मात्र मला अावडतो. मुद्दाम करावासा वाटतो. "पण", "नंतर", "कारण" इत्यादि शब्दांनी सुरू होणारी वाक्ये, मोठ्या वाक्याला टेकू देणारी लहान लहान वाक्ये, ही मला अावडतात. त्यांना थोडासा "लीळाचरित्रा"चा वास येतो. म्हणून प्राचीन काळी मोठेमोठे पंडित लोक अशी मराठी बोलायचे, अशी एक माझ्या मनात कल्पना अाहे. शिवाय मराठीतले बरेच श्रेष्ठ वैचारिक वाङ्मय संवादरूपाने अाणि देशी भाषेत झाले अाहे हे विसरू नये!

देवनागरी प्रत्येक संगणकावर साधीसोपी असेलच असे नाही, म्हणून अजूनतरी लोकांना "संशयाचा फायदा" (आला का लक्षात अर्थ?) द्यावा असे मला वाटते. पण काहीकाही लोकांच्या लेखनात शुद्धलेखनाचे अक्षरशः कुरुक्षेत्र झालेले दिसते ते बघून वाईटही वाटते . . .

अहून काही

"तुटक वाक्ये" हा जो प्रकार अाहे तो मात्र मला अावडतो. मुद्दाम करावासा वाटतो. "पण", "नंतर", "कारण" इत्यादि शब्दांनी सुरू होणारी वाक्ये, मोठ्या वाक्याला टेकू देणारी लहान लहान वाक्ये, ही मला अावडतात. त्यांना थोडासा "लीळाचरित्रा"चा वास येतो. म्हणून प्राचीन काळी मोठेमोठे पंडित लोक अशी मराठी बोलायचे, अशी एक माझ्या मनात कल्पना अाहे. शिवाय मराठीतले बरेच श्रेष्ठ वैचारिक वाङ्मय संवादरूपाने अाणि देशी भाषेत झाले अाहे हे विसरू नये!
जगन्नाथराव,
या विषयी अजून काही लिहावे अशी विनंती.
-- लिखाळे :)

त्यांनी दारुचा अर्धा पेला रिचवून भैरवी गायली आणि श्रोत्यांनी उरलेल्या अर्ध्या पेल्यावर चर्चा केली.

संवादरूपाने श्रेष्ठ वाङ्‌मय

ज्या काळात बोलीभाषा हीच प्रमाण भाषा होती त्या काळात सर्व वाङ्‌मय तत्कालीन प्रंमाण भाषेतच होते. भाषेत जसजसे मोठ्या प्रमाणावर लेखी वाङ्‌‌मय निर्माण होऊ लागते तेव्हाच प्रमाण भाषेची गरज पडते. इंग्रजीत कॉक्‍नी किंवा स्लॅंग बोलीत किती वैचारिक लिखाण आहे?--वाचक्‍नवी

अच्छा !

शिवाय मराठीतले बरेच श्रेष्ठ वैचारिक वाङ्मय संवादरूपाने अाणि देशी भाषेत झाले अाहे हे विसरू नये!
या बद्दल आपण दिलेली माहिती समजली. आभार.
--लिखाळ.

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

मात्राहीन लेखन.

ललित लेखनात तसेच संवादलेखनात त्याच बरोबर वैचारिक लेखनातही मात्राहीन लेखन व्हावे,तसे झाले तर त्याचे आम्ही स्वागत करू. शुद्धलेखनाच्या फेरबदलात तेराव्या नियमातील पूर्वार्ध ठेवावा,तर उत्तरार्ध नसावा, असे वाटते!

आपला.
शुद्धलेखनावरून सतत टोमणे खाणारा. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मात्राहीन वैचारिक लिखाण

मराठी लेखनातून अनुच्चारित अनुस्वार काढून टाकावेत म्हणून मराठीतील दिग्गज लेखकांनी, मुद्रकांनी, प्रकाशकांनी , राजकारण्यांनी आणि थोड्याश्या भाषासुधारकांनी धोशा लावला होता. त्यांच्या आग्रहाखातर हे अनुस्वार गेले. आता बोली भाषेच्या नावाखाली हे परत ग्रंथात डोकावायला लागले तर पुढे टाकलेले पाऊल मागे घेण्यासारखे आहे. जगातले मराठी भाषेचे सर्व एकभाषिक आणि आन्तरभाषिक शब्दकोश व व्याकरणाची पुस्तके परत लिहावी लागतील. अमराठी लोकांना मराठी शिकणे फार कठीण होईल . या अनुस्वारातला उच्चारित कुठला आणि अनुच्चारित कुठला याचा संभ्रम मराठीभाषक विद्यार्थ्यांनासुद्धा होईल. लेखन-मुद्रणाचा वेग कमी होईल आणि परत राजकारणी, यावेळी मोर्चा, लुटालूट आणि जाळपोळ करून ते अनुस्वार काढायला लावतील. आपली अशी मानसिक व आर्थिक तयारी असेल तर प्रयोग करून पाह्यला हरकत नाही.--वाचक्‍नवी

धोशा?

आता धोशा पुरेसा नाही --मोर्चा, दगडफेक, लुटालूट, जाळपोळ!--वाचक्‍नवी

सत्कार होतील.

मोर्चा, दगडफेक, लुटालूट, जाळपोळ

शुद्धलेखनाच्या नियमात बदल होतील तेव्हा होतील पण शुद्धलेखन नियम कमी करण्याचा विचार सुरु झाला हे काय कमी आहे.आणि नियम कमी झाले तरी वरील पैकी काहीच होणार नाही,असे वाटते.

अवांतर :) शुद्धलेखनाच्या फेरबदलात तेराव्या नियमातील पूर्वार्ध ठेवावा,तर उत्तरार्ध नसावा, असे वाटते!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

न-नासिकाचा फायदा

देवनागरी प्रत्येक संगणकावर साधीसोपी असेलच असे नाही, म्हणून अजूनतरी लोकांना "संशयाचा फायदा" (आला का लक्षात अर्थ?) द्यावा असे मला वाटते. पण काहीकाही लोकांच्या लेखनात शुद्धलेखनाचे अक्षरशः कुरुक्षेत्र झालेले दिसते ते बघून वाईटही वाटते .

हा फायदा आम्हाला नेहमीच मिळणार. अर्थाचा अनर्थ न झाल्याशी मतलब.
प्रकाश घाटंपाडे

न-नासिकाचा फायदा

अहो, कसे का होईना, लोक मराठीत लिहायचा प्रयत्न करताहेत, हेही नसे थोडके.

बालगंर्धव

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या (जिजाऊ ब्लॉक) बाजूला असणार्‍या प्रवेशद्वारासमोर पुणे महानगरपालिकेचा पांढर्‍या रंगात अक्षरे असलेला हिरव्या रंगाचा दिशादर्शक फलक आहे. तेथे रंगमंदिराची दिशा दाखवताना "बालगंर्धव" असे लिहिले आहे.

द्वार.

देहूला तुकारामाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि पुण्यात कसबा गणपतीच्या प्रवेश कमानीवर प्रवेशव्‌दार असे आहे. शिर्डीला व्‌दारकामाई!--वाचक्‍नवी

म्म्

प्रवेशव्‌दार असे आहे
म्हणजे प्रवेश व दार एकाच ठिकाणी आहे :)
-- लिरवाळ :)

आमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)

अतिअनुस्वार

मधल्या काळात कोल्हापुरात "कैलासगडची स्वारी" नावाच्या एका तथाकथित भव्य मंदिराची निर्मिती झाली. वर्तमानपत्रांतही मोठमोठयाने डिंडिम वाजवण्यात आले, तर्‍ह्तर्‍हेच्या कहाण्या छापून आल्या ("कलायोगी"कांबळेला स्वारीने नमवले इ.), वगैरे.
सांगायचा मुद्दा हा की त्या मंदिरात

"सत्यंम् शिवंम् सुंदरंम्"

असे दगडावर कोरून आपल्या चुका अमर करून ठेवल्या होत्या (अजूनही तो दगड तसाच असण्याची शक्यता आहे).
बहुधा दगडाची प्रुफे तपासण्याची सोय नसावी.
- दिगम्भा

शुद्धलेखन

कही वर्षांपूर्वी, गुजरात सरकारपुढे काही गुजराती साहित्यिकांनी आणि भाषशास्त्रज्ञांनी 'गुजराती भाषेतील र्‍हस्व इकार काढून टाकावा' असा प्रस्ताव ठेवला होता. सध्या तरी खरोखरच सर्वसामान्य गुजराती लोक, गुजराती लिहिताना र्‍हस्व इकार केवळ काही संस्कृत शब्द स्पष्ट कळवेत एवढ्यापुरताच वापरतात. म्हणूनच हा प्रस्ताव केला गेला होता.
त्यांचा प्रस्ताव चूक की बरोबर हा वाद बाजूला पडला, 'र्‍हस्व-इकार विरोधक' आणि 'र्‍हस्व-इकार समर्थक' असे सामान्य लोकांमध्ये दोन तट पडले आणि दंगा, धुडकूस, दगडफेक, मारामार्‍या इ.इ. सग्ळ्या गोष्टी झाल्या. शेवटी सरकारने ' या प्रस्तावावर यापुढे चर्चा होणर नाही' अशी घोषणा केल्यावर परिस्थिती नियन्त्रणात आली.
महाराष्ट्रातही भाषेच्या प्रश्नांची (एवढेच नव्हे, सर्वच मतभेदजन्य प्रश्नांची) परिस्थिती सध्या अशीच आहे. एखादा मतभेद हा केवळ शान्ततापूर्ण चर्चेतून सोडवता येतो यावरचा आपल्या समाजाचा विश्वासच उडालाय. त्यामुळे नियम कमी झाले तरी वरील पैकी काहीच होणार नाही हे पटत नाही.

 
^ वर