लोकमान्य टिळक

२३ जुलै २००७ - आज लोकमान्य टिळकांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती समारोप झाला. त्या निमित्ताने आधी एक सकाळ मधील बातमी माहीती साठी :

पाच रुपयांच्या नाण्यावर लोकमान्यांची प्रतिमा

पुणे, ता. २० - लोकमान्य टिळक यांच्या १५० व्या जयंती वर्षाची सांगता होत आहे. या वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून लोकमान्यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकमान्यांची प्रतिमा असलेले पाच रुपयांचे नाणे केंद्र सरकारतर्फे तयार करण्यात आले आहे. ........
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत २३ जुलैला आयोजित करण्यात येत असलेल्या विशेष कार्यक्रमात या नाण्याचे अनावरण होणार आहे.

लोकमान्य टिळकांच्या जीवनाचा वेध घेणारा "मेकर ऑफ मॉडर्न इंडिया' हा ग्रंथ टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आला असून, या ग्रंथाचे प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. डॉ. दीपक टिळक यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांच्या आठवणी; तसेच लोकमान्यांची दुर्मिळ छायाचित्रे आदींचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे.

डॉ. दीपक टिळक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ""नवी दिल्लीत तीन मूर्ती भवन या ऐतिहासिक वास्तूत हा कार्यक्रम होणार आहे. केसरी-मराठा संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी गृहमंत्री शिवराज पाटील, कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहेत.''

लोकमान्यांची प्रतिमा असलेले पाच रुपयांचे नाणे एक ऑगस्टनंतर पुण्यात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------

टिळकांच्या त्यांच्या सहकार्‍यांनी, विरोधकांनी, पाश्चात्यांनी आणि सामान्यांनी सांगून ठेवलेल्या आठवणी वाचायला लागले की या माणसाचे महानपण समजते. तुर्तास मी एक आठवण खाली देत आहे. ही फेरोजशहा मेहतांबद्दलची आहे. (फिरोजशहा आणि टिळक हे राजकारणात कट्टर विरोधक होते). (संदर्भः आठव्णी व आख्यायीका: खंड २, पा. ४४)

बामणगावकर यांची ही आठवण, "त्या वेळी दक्षिण अफ्रिकेत म. गांधींची सत्याग्रहाची चळवळ चालू होती. टिळक मंडालेच्या तुरूंगात होते. गोखले द. अफ्रिकेत शिष्ठाईसाठी गेले होते. फेरोजशहांनी गांधींच्या चळवळिसाठी निधी जमा करण्याचे काम चालविले होते. त्यांना वर्‍हाडच्या तरूण मंडळींनी प्रतिसाद दिला म्हणून त्यांना फेरोशहांचे अभिनंदनपर पत्र आले. टिळक तुरूंगात असताना नवी चळवळ उभी करावी व फेरोजशहांनी तिचे नेतृत्व करावे अशी या तरूणांची अपेक्षा होती. या करिता चर्चा करण्यासाठी त्यांनी फेरोजशहांची भेट मागून वेळ ठरवून घेतली. तपस्वी बाबासाहेब परांजपे, वीर वामनराव जोशी, बाबासाहेब सोमण व बामणगावकर ही मंडळी फेरोजशहांना भेटली आणि कोणत्या धोरणाने चळवळ व्हावयास हवी हे सांगून या तरूण मंडळींनी फेरोजशहांना नेतृत्व करण्याची विनंती केली. फेरोजशहांनी ही विनंती नाकारली. नकार देताना तेथे बसलेल्या वाच्छा व हॉर्निमन यांच्याकडे वळून फेरोजशहा म्हणाले, " पहा हे महाराष्ट्राचे रक्त! ... शिवाजी व टिळक जो पर्यंत महाराष्ट्राच्या तरूणात जागृत आहेत तो पर्यंत महाराष्ट्रच हिंदी स्वराज्याचा प्रश्न सोडवील." मग या तरूणांना ते म्हणाले, " तुमचे पुढारीपण स्वीकारवायला टिळक लायक, मी नाही. आम्ही आनते आहो, पण सुखाला सर्वस्वी दूर लोटून देशसेवा करण्याइतके तेज आमच्यात नाही हे मी कबूल करतो. असे जरी आहे तरी देशसेवा घडावी ही माझी इच्छा आहे. टिळकांसारखे लोक धैर्याने व त्यागाने परिस्थिती निर्माण करू शकतात; तर आम्ही लोक त्या परिस्थितीचा फायदा घेऊन देशाच्या पदरात टाकतो."

अवांतरः एका पुस्तकात वाचल्याचे आठवते, पण ते पुस्तक आत्त्ता जवळ नाही म्हणून संदर्भ देऊ शकत नाही - ऍर्नॉल्ड टॉयनबी हा प्रसिद्ध इतिहासकार भारतात फिरयला आला होता. तेंव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात चालू होती. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याशी त्याने भेट घेतली असता मोरारजी महाराष्ट्र आणि चळवळीबद्दल उलट सुलट बोलले आणि मुंबई मिळू शकणार नाही वगैरे म्हणाले. त्यावर नंतर टिपण्णी करताना टॉयनबी फेरोजशहांप्रमाणेच म्हणाला की, "जो पर्यंत शिवाजी आणि टिळकांना हा महाराष्ट्र विसरणार नाही तो पर्यंत तो (तत्कालीन चळवळीत) हरण्याची शक्यता नाही."

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्सुकता आहे

टिळक स्मारक संस्थेच्या पुस्तकाविषयी उत्सुकता आहे.

आपला
(वाचनोत्सुक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

ग्लोबल टिळक

लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त म.टा. ने ग्लोबल टिळक पुरवणी काढली आहे. बरेच वैविध्यपुर्ण लिखाण, विशेष करून त्यांच्या धाकट्या मुलाबद्दलचे, श्रीधरपंतांबद्दलचा लेख (ओळख सिंहाच्या छाव्याची!)वाचण्यासारखे आहेत असे वाटले.

आताच्या महाराष्ट्राला त्याचा पत्ताच नाही.

चांगला लेख.. गेले दोन चार दिवस मी ही या पुरवणीची वाट पाहत होते.

श्रीधरपंतांबद्दल लिहिलेले वाक्य

त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं. पण त्याकाळच्या महाराष्ट्राला तसं वाटलंच नाही आणि आताच्या महाराष्ट्राला त्याचा पत्ताच नाही.

अगदी खरं!

श्रीधर पंतासारखेच

श्रीधर पंतासारखेच दुसरे ज्यांचे थोडेतरी नावा माहीत आहे ते म्हणजे र.धों. कर्वे - धोडो केशव कर्व्यांचे सुपुत्र. काळाच्या खूप पुढे असल्याने समाजाला त्यांचे म्हणणे पचनी पडले नाही. त्यांनी खूप हलाखीत दिवस काढल्याचे माहीत आहे.

 
^ वर