तर्कक्रीडा ३६: गर्दभराज धन्वगंजाची प्रेमकहाणी

यनावालांची क्षमा मागून....

हिंदी महासागरातील अमरद्वीपावर राहणार्‍या धन्वंगजाचे रुधीरसागरातील मृत्यूद्वीपावर राहणार्‍या मृदूभाषिणीवर प्रेम होते. हा विवाह अर्थातच तिच्या वडिलांना मंजूर नव्हता. त्यांचे मन वळवण्यासाठी धन्वंगज द्वीपावर आला तेव्हा तेथील सेवकांनी त्याला पकडून सभास्थानी आणले. सभास्थानी असलेल्या श्वेतवर्णीय ध्वजदंडावरील शंखावर असलेला राजसर्पाची मुद्रा पाहताचा धन्वंगजाच्या हृदयाचा ठोका चुकला.

होय. मृदूभाषिणीचा परिवार हा नरभक्षक होता.

बर्‍याच दिवसांनी रुचकर नरमांसाचा आस्वाद आणि आपल्या आवडत्या उष्ण रक्ताचे प्राशन करावयास मिळणार हे लक्षात आल्यावर यःकश्चित ह्या मृत्यूद्वीपावरील तरुणाने तर बेभान होऊन नृत्यच सुरु केले.

सभास्थानी मृदूभाषिणीचे वडील कृष्णवर्णीय वस्त्र परिधान करुन आले होते. विवाह त्यांना मान्य नसला तरी आपल्या कन्येच्या प्रियकराला एक संधी देणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. अनुभवी अणि बुजुर्ग लोकांना कवडीमोलाचे समजून त्यांचा उर्मटपणे अवमान करण्याच्या नागरी जीवनात असलेल्या प्रथेचा अर्थातच या समाजात अभाव होता. मृदूभाषिणीच्या वडिलांच्या प्रस्तावाला सर्वांची साहजिकच मान्यता मिळाली.

मृदूभाषिणीचे वडील यज्वंधेय यांना तर्कशास्त्रामध्ये थोडीशी गती होती. शिवाय सदैव सत्यकथन करणार्‍या गंधर्वांचे मांस हे तळल्यावर जास्त चविष्ट लागते तर सदैव असत्यकथन करणार्‍या यक्षांचे मांस हे भाजल्यावर जास्त स्वादिष्ट लागते हे सूक्ष्म ज्ञानही त्यांना होते.

धन्वंगजासमोर त्यांचा कूटप्रश्न होता तो असा.

"धन्वंगजा, नीट लक्षपूर्वक ऐक.
तुझी अंतिम इच्छा म्हणून तू केवळ एक आणि एकच विधानार्थी वाक्य करु शकतोस.

ते वाक्य जर सत्यकथन असेल तर तुला आम्ही तळून खाऊ आणि असत्यकथन असेल तर तुला भाजून खाणे आम्हाला आवडेल.

आता तुझ्या मृत्यूची पद्धती स्वीकारणे केवळ तुझ्याच हाती आहे. "

हा कूटप्रश्न ऐकल्यावर हर्षभारित होऊन यःकश्चित आपले रुधिरप्राशनाचे आवडते पात्र आणण्यासाठी धावतच आपल्या कुटिराकडे निघाला आणि परत येऊन पाहतो तो काय. धन्वंगजाने असे एक विधानार्थी वाक्य निवडले होते की स्वतःचे प्राणरक्षण करणे त्याला शक्य झाले.

त्याच्या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होऊन यज्वंधेयांनी मृदुभाषिणीचा विवाहही राक्षस पद्धतीने धन्वंगजाशी लावला. या विवाहात धन्वंगजाने उपक्रमावरील कोडी सोडवण्याच्या सरावामुळे हा कूटप्रश्न सोडवणे शक्य झाले अशी कृतज्ञता व्यक्त केली आणि ग्राम्य पद्धतीचा एक उखाणाही घेतला.

"शंकराच्या पिंडीला नागोबाचा वेढा
तू माझी म्हैस आणि मी तुझा रेडा"

असो. पुढे काय झाले हे सांगणे नलगे.

तर धन्वंगजाचे प्राणरक्षण करणारे ते विधानार्थी वाक्य कोणते हे तुम्ही ओळखू शकता का?

उत्तरे कृपया व्य. नि. ने.

Comments

श्रेयअव्हेर

इदं न मम. हे कोडे मूळ माझे नाही. अस्मादिकांनी याचे केवळ गर्दभीकरण केले आहे.

(गर्दभरत्न) आजानुकर्ण

सही शब्द

श्रेयअव्हेर

मस्त शब्द आहे, आवडला !!

तोही माझा नाही

उपक्रमावर/मनोगतावर वाचला आहे. शब्द सुंदर आहे यात शंकाच नाही.

या बाबो!

या बाबो!!!

आकर्णा तू महान आहेस!!!! सा.प्र.

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र)

पहा यना पहा

या विवाहात धन्वंगजाने उपक्रमावरील कोडी सोडवण्याच्या सरावामुळे हा कूटप्रश्न सोडवणे शक्य झाले अशी कृतज्ञता व्यक्त केली

कोडी सोडवण्याचा कुणाला कुठे कसा फायदा होऊ शकतो. संभाजी गार्डन मध्ये बसल्या बसल्या कोडी सोडवताना काय धमाल येत असेल धन्वगंज-मृदूभाषिणीला...

राक्षसपद्धतीतही आजानुबाशिंग बांधतात काय?

अभिजित...
उनके देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है |

उत्तरे येत आहेत/ स्पष्टीकरण

आमचे सन्मित्र श्री. बिरमुट्या यांनी उत्तर पाठवले आहे. ते अर्थातच बरोबर आहे.
श्री. विसुनाना यांनी चांगला प्रयत्न केला आहे. मात्र उत्तर योग्य नाही. ते लिहितात "विधानार्थी म्हणजे काय? विद्यर्थी का?"

येथे विधानार्थी /विद्यर्थी म्हणजे साधे सोपे विधान असे अपेक्षित आहे . जे विधान प्रश्नार्थी/उद्गारार्थी वगैरे प्रकारचे नाही अशा प्रकारचे.

उत्तर!

:) गंमत होती!मला उत्तर येतच नाहीये.
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

प्रमोदकाका.. व्य. नि.

प्रमोदकाका...
उत्तर चुकले आहे... पुढचा प्रयत्न व्य. नि. ने करा. :)

शक्य असल्यास प्रतिसाद संपादित करा.

वाह वाह

फारच छान, सुंदर प्रयत्न !! कथा आणि नावे (हे तर यनावालांचं होम पिच) सुद्धा आवडली.
उखाणा म्हणजे केकवरचं टॉपिंग !! बहार आली

उत्तर व्यनिने पाठवतेच आहे !!

अजून एक उत्तर

आवडाबाई यांनी योग्य उत्तर पाठवले आहे. अभिनंदन.
त्यांना कोडे सोडवण्यापेक्षा ते वाचण्यात अधिक मौज वाटली.

धन्यवाद.

अजून काही

आमचे सन्मित्र श्री. शॉर्ट सर्किट हे कोड्याचे योग्य उत्तर शोधण्यात यशस्वी ठरले आहेत.
अभिनंदन.

श्री. तो . यांचा व्य. नि. आला आहे. त्यांनी योग्य उत्तर दिले आहे. अभिनंदन.

अनु, मीरा फाटक आणि श्री. यनावाला याची उत्तरे आली आहेत. सर्वांनी योग्य उत्तर दिले आहे. अभिनंदन.

विसुनाना हे योग्य उत्तर शोधण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे बोलके आहे.

प्रियाली यांनी दिलेले उत्तर योग्य आहे. अभिनंदन.

राजेंद्र यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आधी पाठवलेले उत्तर योग्य आहे. विशेष म्हणजे इतर सर्वांपेक्षा राजेंद्र आणि विसुनाना यांची उत्तरे वेगळी आहेत. :)

विसुनानांनी २ योग्य उत्तरे पाठवली आहेत. अभिनंदन.

सन्जोप राव व मीरा फाटक यांनी कोडे वाचताना विदूषक या कथेची आठवण झाल्याचे आवर्जून कळवले आहे. कथासरित्सागर मधील कथांच्या शब्दशैलीवर आधारित शब्दयोजना असणार्‍या जीएंच्या या कथेची येथे आठवण होणे हा माझा मोठाच गौरव आहे. :))

धन्वंगज-मृदुभाषिणी विवाह

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आजानुकर्ण यांनी गोष्ट छान लिहिली आहे. त्यांचे शब्दज्ञान चांगलेच आहे. मागे एका प्रतिसादात त्यांनी गुप्त या अर्थी 'छन्न' असा समर्पक शब्द वापरला होता. 'प्रच्छन्न' शब्द परिचित आहे. पण त्याचा उपसर्ग गुप्त ठेवून त्यानी त्याचा अर्थच एका अर्थी छन्न केला होता.
मात्र हा राक्षस विवाह नव्हे. राक्षस विवाहात वधूला जबरदस्तीने पळवून नेऊन लग्न करतात.

छन्न

हा शब्द मनोगतीय प्रशासनाचा शोध आहे असे वाटते. राक्षसविवाहाबद्दलची माहिती नसल्यामुळे कथेमध्ये गोंधळ झाला आहे. :(

चांदोबा,

वा! कोडे मस्तच आहे. खुलवलेलेही उत्तम आहे.

बा अजानुकर्णा,

चांदोबा वाचतोस का रे अजूनही?

असो. असे कोडे अकबर बिरबलाच्या गोष्टीत आल्याचे आठवते, बादशहा म्हणतो की तू खरे बोललास तर तुला हत्तीच्या पायी देईन खोटे बोललास तर कडेलोट... असे काहीतरी वाचल्याचे आठवते. याचा अर्थ मला उत्तरही आठवते असा नाही. काहीतरी फुटकळ प्रयत्न केला आहे... जरा अधिक विचार करते.

अवांतरः

मृदूभाषिणीचा परिवार हा नरभक्षक होता. हे वाक्य
"प्रियंभाषिणीचा परिवार हा मत्यभक्षक आहे" यावरून सुचले का?
खरे बोललास तर बोंबील खायला मिळेल खोटे बोललास तर धारवाडी पेढा.

अतिअवांतरः हे वाक्य प्रियंभाषिणीचा परिवार हा नरभक्षक होता या वाक्याशी साधर्म्य साधत असेल तर एकदा घरी ये जेवायला.

चांदोबा आणि मस्तकाची शंभर शकले

...तर तुझ्या मस्तकाची शंभर शकले होऊन तुझ्या पायावर लोळू लागतील.. ही वेताळाची धमकी आठवून अजूनही उरात धडकी भरते.

कोड्याचे उत्तर

कमीतकमी दोन उत्तरे संभवतात. कोड्यात काही खास दम नव्हता म्हणून उत्तरे पाठवत नाही. --वाचक्‍नवी

तर्कक्रीडा उत्तरे

१. मी नेहमी खोटे बोलतो. (विसुनाना)
२. मी खरे बोलत नाही. (राजेंद्र)
३. तुम्ही मला भाजून खाणार. (इतर सर्व)

 
^ वर