कलाम यांना सलाम

राष्ट्रपती अब्दूल कलाम २५ जुलैला राष्ट्रपती भवन सोडणार आहेत. आजच रिडीफ मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे ते त्यांच्याबरोबर दोन सुटकेसेस आणि पुस्तके इतकेच घेऊन जाणार आहेत. राष्ट्रपती होण्या आधी ते अण्णा विश्वविद्यालयात शिकवायचे आणि तेथेच एका खोलीत राहायचे. त्यांनी तेथील कुलगुरूंना विनंती करून तिथेचे (एकाच खोलीत) राहायचे ठरवले आहे. त्यांना देऊ केलेला बंगला त्यांनी नाकारला आणि जेंव्हा ते तिथे पोअचतील तेंव्हा कुठलाही गाजावाजा करणारा स्वागत समारंभ ने करण्याची विनंती केली आहे. ते तिथे जाऊन परत अध्ययन करायला लागणार आहेत.

इस्लामीक कल्चरल सोसायटी समोर त्यांचे (राष्ट्रपती म्हणून कदाचीत) शेवटचे सार्वजनिक भाषण झाले. त्यात त्यांनी २०२० साली भारत एक प्रगत राष्ट्र असेल हे त्यांचे स्वप्न साकार व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. कुठल्यातरी अपेक्षेने दिल्या गेलेल्या भेटवस्तू स्विकारू नका आणि आपली कुटूंबे आदर्श पद्धतीने वाढवा हे सांगताना त्यांनी आदल्या दिवशी एका व्यक्तीने दिलेला पेनसेट परत केल्याचे सांगीतले. पुढे त्यांना याबाबत त्यांच्या वडिलांनी केलेल्या संस्काराची आठवण झाली शिवाय मनुस्मृतीचा संदर्भ देऊन त्यांनी श्रोत्यांना सांगीतले की, " (मनुस्मृतीप्रमाणे) अशा भेट वस्तू घेऊन आपण आपल्यातले देवत्वाचा अंश नष्ट करत असतो." "Yesterday, a well-known person gave me a gift of two pens. I had to return them with unhappiness," he said, also quoting from the ancient Hindu code of law `Manusmriti' that by accepting gifts the divine light in the person gets extinguished.

असा राष्ट्रपती आपल्याला परत कधी मिळेल कोण जाणे! पण एका गोष्टीचा आनंद नक्की होतो की उद्या आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना नक्की सांगू शकू की एखादा कलामांसारखा आदर्श माणूसपण आम्ही पाहू शकलो (नुसतेच रसातळाला पोचलेले राजकारण आणि राजकारणी नाही..).

शेवटी गीतेतला एक श्लोक आठवतो, श्रीकृष्ण म्हणतो की, "लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी, खटणार्‍यात एखादा तत्वतः मज जाणतो||" कलाम हे या अर्थाने "वन इन अ मिलीयन" आहेत.

Comments

सहमत

कलाम यांना माझाही सलाम. असा कर्मयोगी आजच्या जगात सापडणे कठीण आहे. अन्यथा राजकारण म्हटले की एकाहून एक नमुने बघायला मिळतात. अर्थात कलाम यांना राजकारणी म्हणण्यापेक्षा ऍकॅडमिक (विद्वान/पंडीत?) म्हणणे योग्य ठरेल.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सलाम कलाम

आशा आहे की ह्या पुढे देखिल त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा भारताला चांगला फायदा होईल.

त्यांना लाख लाख प्रणाम, भविष्यासाठी आणी उत्तम आरोग्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना व शुभेच्छा!

कलामांना शुभेच्छा!!

आजच रिडीफ मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे ते त्यांच्याबरोबर दोन सुटकेसेस आणि पुस्तके इतकेच घेऊन जाणार आहेत.

राष्ट्रपती भवन सोडताना राष्ट्रपतींनी तिथले फर्निचर देखिल नेण्याचा प्रघात आहे का? तसे असेल तर कलामांची कृती निश्चितच कौतुकास्पद आहे.

असा राष्ट्रपती आपल्याला परत कधी मिळेल कोण जाणे!

त्या निमित्त 'असा' राष्ट्रपती मिळाल्याने गेल्या चार पाच वर्षात काय काय प्रगति झाली? ह्याची 'माहिती' पुरवल्यास ह्या प्रस्तावाचे उपक्रमाच्या धोरणांनुसार माहितीपूर्ण प्रस्तावात रुपांतर होइल.
कलामांना अनेक शुभेच्छा!!

धन्यवाद

राष्ट्रपती भवन सोडताना राष्ट्रपतींनी तिथले फर्निचर देखिल नेण्याचा प्रघात आहे का? तसे असेल तर कलामांची कृती निश्चितच कौतुकास्पद आहे.

राष्ट्रपती भवन सोडताना पुर्वीचे राष्ट्रपती त्यांना त्या पदानुसार मिळालेल्या भेटवस्तू घेऊन गेलेत तसे यांना करायचे नाही आहे. शिवाय आपण एकच वाक्य उचलून आपले उद्गार लिहीले आहेत. कारण प्रत्येक राष्ट्रपती नंतर सरकारच्या म्हणजे करदात्याच्या पैशावर मोठमोठे बंगले घेऊन दिल्लीत आणि इतर ठिकाणी राहतात. (बाकीच्या राजकारण्यांचे विचारूच नका). तथापी कलाम हे त्यांच्या पुर्वीच्या व्यवसायात जात आहेत, एका खोलीत राहात आहेत आणि मिळत असलेला बंगला नाकारत आहेत. त्याचे कौतुक करावे का त्याला टोमणे मारावे हे ज्याच्या त्याच्या मानसीक कुवतीवर अवलंबून आहे.

त्या निमित्त 'असा' राष्ट्रपती मिळाल्याने गेल्या चार पाच वर्षात काय काय प्रगति झाली?

एक सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा अपवाद सोडल्यास प्रथम नागरीक म्हणून विद्वानाची निवड असलेला राष्ट्रपती म्हणजे कलामच आहेत. आशा करतो की भारताचे नागरीक शास्त्राची आपल्याला किमान माहीती आहे. त्याप्रमाणे (घटना न वाचता देखील) आपल्याला माहीत असेल की राष्ट्रपती हा राष्ट्राचा पदसिद्ध अधिकारी असतो पण सरकार चालवताना घेण्याची निर्णयप्रक्रीया ही सर्वस्वी लोकप्रतिनिधींच्या हातात असते. केवळ अपवादात्मक परिस्थितितीत राष्ट्रपती स्वतःचे अधिकार वापरू शकतो. असे असूनही अनेक गोष्टींमधे दिशा देण्याचे लोकजागृती करण्याचे काम राष्ट्रपती करत होते. जी व्यक्ती पोखरण#२ च्या प्रमुख सुत्रधारापैकी होती आणि संरक्षण वैज्ञानिक म्हणून जगभर नावजलेली आहे ती राष्ट्रप्रमुख आणि तिन्ही सैन्याचे प्रमुख म्हणून निवांत बसली असेल असे वाटत असल्यास ते आपले मत आहे. पण आजही तमाम भारतीयांमधे या राष्ट्रपतींबद्दल लाडके झालेत याला सर्वात मोठ्या पदावरच्या व्यक्तीने जमिनीवर पाय ठेवून वागून एक जो सहज आदर्श तयार केला, हे कारण आहे.

ह्याची 'माहिती' पुरवल्यास ह्या प्रस्तावाचे उपक्रमाच्या धोरणांनुसार माहितीपूर्ण प्रस्तावात रुपांतर होइल.

या वाक्यात उपक्रम संपादकांच्या ऐवजी आपणच उपक्रमवर काय असावे हे ठरवत आहात आणि म्हणून संपादकांच्या विवेकबुद्धीवर शंका घेत आहात असे वाटले. (अर्थात आपण संपादक असल्यास कल्पना नाही.) ही चर्चा आहे , आणि आपल्यास जी काही मते मांडायची आहेत ती खुशाल सरळपणे मांडू शकता हे काही मी सांगायला नको आहे.

धन्यवाद.

उपक्रम संपादक

"कोणत्याही विशेष व्यक्तिमत्त्वाच्या किंवा लोकनेत्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या जीवनावर, कर्तृत्वावर किंवा शिकवणुकीवर एखादा माहितीपूर्ण लेख तुम्ही लिहू शकता. फक्त अभिवादनाच्या चर्चाप्रस्तावापेक्षा असा एखादा लेख अधिक चांगली श्रद्धांजली ठरेल असे वाटल्याने संपादन मंडळाने तुमचा चर्चाप्रस्ताव अप्रकाशित केला आहे."
- उपक्रम संपादक

मागे एका थोर नेत्याच्या श्रद्धांजली प्रस्तावाला इथल्या संपादक मंडळाने दिलेले हे उत्तर आहे. त्यावर आधारित आम्ही आमचे हे वरील मत मांडले होते. आपला प्रस्ताव हा थोर नेत्याच्या श्रद्धांजली अभिवादनाचा नसला तरी थोर नेत्याच्या पद निवृत्तीची बातमी उधृत करणारा आहे..त्यात त्यांच्या जीवनावर, कर्तृत्वावर किंवा शिकवणुकीवर काहिही माहितीपूर्ण न सापडल्याने वरील विचार नोंदवले.. उपक्रमाचे वरील धोरण हे थोर नेत्यांच्या श्रद्धांजली पुरतेच मर्यादित असेल तर आम्ही आमचे विधान मागे घेतो..क्षमस्व!

अवांतर

उपक्रमाचे वरील धोरण हे थोर नेत्यांच्या श्रद्धांजली पुरतेच मर्यादित असेल तर आम्ही आमचे विधान मागे घेतो

आपला वरील प्रतिसाद हा या चर्चेसंदर्भात अवांतर वाटत आहे. आपल्याला जर संपादकांच्या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित करायचे असल्यास ते त्यांच्याशी सरळ आणि खाजगी संवाद (आणि अर्थातच इतर चर्चेत न करता) केला तर गैरसमज अथवा गोंधळ होणार नाही.

थोर नेत्याच्या पद निवृत्तीची बातमी उधृत करणारा आहे..त्यात त्यांच्या जीवनावर, कर्तृत्वावर किंवा शिकवणुकीवर काहिही माहितीपूर्ण न सापडल्याने वरील विचार नोंदवले..

मी ही चर्चा "संस्कृती , प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे, राजकारण" या ३ विषयांतर्गत चालू केली होती. हा लेख नव्हता तर सद्य घडामोडींपैकी एका बातमीवर आधारीत माझे मत होते - ते ही अशा व्यक्तीसंदर्भात जी भारताची प्रथम नागरिक आहे आणि तिचे निदान आताचे वर्तन हे इतर सर्व राजकीय (राजकारणी - अराजकारणी) पदांवरील व्यक्तीसंदर्भात अपवादात्मक आहे. म्हणून या "प्रसारमाध्यमे व वृत्तपत्र" लिहून आलेल्या "राजकारण्या"च्या "संस्कृतीबद्दल इतरांना काय वाटते हे समजून घेण्यासाठी ही चर्चा चालू केली होती.

अवांतर नाही

"आपणच उपक्रमवर काय असावे हे ठरवत आहात"
ह्या आपल्याच आक्षेपाचे खंडन करण्यासाठी दिलेला हा प्रतिसाद आहे.

आपल्याला जर संपादकांच्या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित करायचे असल्यास ते त्यांच्याशी सरळ आणि खाजगी संवाद (आणि अर्थातच इतर चर्चेत न करता) केला तर गैरसमज अथवा गोंधळ होणार नाही

.

संपादकांच्या निर्णयाबद्दल ह्या चर्चेत आम्ही कोठेही प्रश्न उपस्थित केलेला नाही तरी गैरमज नसावा!

इतर मुद्दे

राष्ट्रपती भवन सोडताना पुर्वीचे राष्ट्रपती त्यांना त्या पदानुसार मिळालेल्या भेटवस्तू घेऊन गेलेत तसे यांना करायचे नाही आहे

त्यात पुर्वीच्या राष्ट्रपतींचे काही चुकले का? आमच्या मते हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. उद्या एखादा राष्ट्रपती त्याचे कपडे देखिल ठेउन गेला तर तो अधिक श्रेष्ठ का?

कारण प्रत्येक राष्ट्रपती नंतर सरकारच्या म्हणजे करदात्याच्या पैशावर मोठमोठे बंगले घेऊन दिल्लीत आणि इतर ठिकाणी राहतात.

काही संदर्भ?

आपल्याला माहीत असेल की राष्ट्रपती हा राष्ट्राचा पदसिद्ध अधिकारी असतो पण सरकार चालवताना घेण्याची निर्णयप्रक्रीया ही सर्वस्वी लोकप्रतिनिधींच्या हातात असते. केवळ अपवादात्मक परिस्थितितीत राष्ट्रपती स्वतःचे अधिकार वापरू शकतो.

असे असेल तर "असा राष्ट्रपती आपल्याला परत कधी मिळेल कोण जाणे!" ह्याला फारसे महत्व रहात नाही.. "असा पंतप्रधान आपल्याला कधी मिळेल" हे कदाचीत जास्त योग्य ठरेल

से असूनही अनेक गोष्टींमधे दिशा देण्याचे लोकजागृती करण्याचे काम राष्ट्रपती करत होते.

म्हणजे नक्की काय केले हेच तर जाणून घेण्यासाठी वरील विचारणा केली.

यावरुन

अशा भेट वस्तू घेऊन आपण आपल्यातले देवत्वाचा अंश नष्ट करत असतो.

जीएंच्या स्वामी मधील खालील आशयाचे वाक्य आठवले.

"एखाद्या गोष्टीची अभिलाषा किंवा आसक्ती बाळगणे जसे चूक तसेच एखादी गोष्ट सहज समोर आली असता तिला नाकारणे देखील एक प्रकारचा अहंकारच आहे."

- आजानुकर्ण गटणे

अयोग्य विचार

एखाद्या गोष्टीची अभिलाषा किंवा आसक्ती बाळगणे जसे चूक तसेच एखादी गोष्ट सहज समोर आली असता तिला नाकारणे देखील एक प्रकारचा अहंकारच आहे.

यातील "एखादी गोष्ट सहज समोर आली असता तिला नाकारणे देखील एक प्रकारचा अहंकारच आहे" हा भाग योग्य नाही हे थोडा विचार केल्यावर कोणाच्याही लक्षात येईल. 'सहज समोर' आलेल्या कित्येक गोष्टी आपण नाकारतो. या नकारामागे दरवेळी अहंकारच असतो असे नाही. क्षमा असावी पण हे वाक्य अपूर्ण विचारांतून आल्यासारखे वाटले. समोर आलेल्या गोष्टींपैकी योग्य गोष्ट निवडावी आणि अयोग्य गोष्ट टाळावी यालाच विवेक म्हणतात.
आपला
(विवेकवादी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

आदरणीय व्यक्ति!

कलाम ही एक आदरणीय व्यक्ती आहे ह्यात तीळमात्र शंका नाही. पण आताच्या राष्ट्रपतींच्या निवडीच्या वेळी राजकारण्यांनी भरीला घातले म्हणून का होईना क्षणमात्र कलाम साहेब आपल्या तत्वापासून नक्कीच ढळले होते हेही सत्य आहे.माणूस कितीही तत्वनिष्ठ असला तरी ह्या मोहमयी दुनियेत कधी कधी त्याच्याकडून अशी चूक होऊ शकते ह्याचे हे एक उदाहरण आहे.हा एक प्रसंग सोडला तर कलामसाहेबांसारखे आदर्श सद्याच्या परिस्थितीत शोधावेच लागतील हेही तितकेच खरे.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

बरोबर आहे.

माणूस कितीही तत्वनिष्ठ असला तरी ह्या मोहमयी दुनियेत कधी कधी त्याच्याकडून अशी चूक होऊ शकते ह्याचे हे एक उदाहरण आहे.

अगदी योग्य वाक्य आहे. मला वाटते आपल्याकडे सर्वानुमते गोष्ट झाली तरच आदर्श हा कुठेतरी विचार असतो. एकप्रकारचरचा आपल्या पद्धतीतून आलेला अहंकारच तो की सर्वानुमते झाले पाहीजे. "ऍग्री टू डिसऍग्री" हा प्रकार कुठेतरी पचायला अवघड जातो. तोच प्रकार आत्ता प्रतिभा पाटील बाई आहेत म्हणून बिनविरोध निवडल्या गेल्या पाहीजेत या हट्टात होता. असाच प्रकार व्हि.पी.सिंग पंतप्रधान होताना झाला(कॉन्सेसस) आणि त्याची परीणती भांडणांमधे तात्काळ झाली होती.

पण या खेरीज त्यांनी अनेक गोष्टी आपल्या वर्तनातून दाखवल्या ज्या राजकारणात आणि समाजात दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. (मला वाटते सियाचेनला भेट देणारे ते पहीलेच राष्ट्रपती होते). गेल्या निवडणूकीच्या निकाला नंतर त्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता तत्कालीन कायद्याचे (रेसिप्रोसिटी) काटेकोरपणे पालन करत सोनीया गांधींना पंतप्रधान होण्यापासून दूर ठेवले. त्यावेळच्या घडलेल्या घटना कधीतरी जनतेसमोर येतील अशी आशा करतो. पण सोनीयांनी "मला पंतप्रधान होयचेच नव्हते", असे स्वतःला काँग्रेसच्या आणि इतर घटकपक्षाच्या खासदारांसमवेत स्वनामांकीत (सेल्फ-नॉमिनेशन) करून राष्ट्रपतींना भेटून आल्यावर सांगीतले होते.

यासम हाच

आजच्या काळात असे समर्पित देशभक्त दुर्मिळ आहेत. एक वैज्ञानिक, भारताच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचे जनक, विचारवंत अशी त्यांची ओळख आधी होती. राष्ट्रपती पदावर बसल्यानंतर आपल्या पदाचा उपयोग त्यांनी भारतीय जनतेच्या मनात प्रेरणेचा स्फुल्लिंग चेतवण्यासाठी केला. विशेषतः लहान मुले जी भारताचे भविष्य आहेत, त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत करण्यात ते यशस्वी ठरले, त्यामुळेच लहान मुलांमध्ये ते विशेष प्रिय आहेत. त्यांच्या खुल्या आणि नवीन तंत्राविषयी स्वागतशील स्वभावामुळे भारतीय तरूण आणि उद्योजकांनाही त्यांचे आकर्षण आहे.

पण यामुळे त्यांनी आपल्या पदाच्या जबाबदारीवर काही परिणाम होऊ दिला नाही हे विशेष. तिन्ही सेनांचा प्रमुख या पदाला न्याय देणारे ते बहुतेक एकमेव राष्ट्राध्यक्ष असावेत. जगातील सर्वात उंच आणि खडतर युद्धभूमी सियाचिनला भेट देणे असो किंवा सुखोई या अतिवेगवान विमानात बसणे असो किंवा पाणबुडीतून प्रवास करणे असो.

झाले बहु होतील बहु पण यासम हाच! इतकेच आपण म्हणू शकतो. कलाम यांना त्यांच्या भावी उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

आपला
(कलामप्रेमी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

केवळ सलामच नव्हे तर दंडवत सुध्दा!

राष्ट्रपती पदावर बसल्यानंतर आपल्या पदाचा उपयोग त्यांनी भारतीय जनतेच्या मनात प्रेरणेचा स्फुल्लिंग चेतवण्यासाठी केला. विशेषतः लहान मुले जी भारताचे भविष्य आहेत, त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत करण्यात ते यशस्वी ठरले.

वासुदेव यांच्या वरील विधानाशी मी १०० टक्के सहमत आहे. राजकारण करत बसण्यापेक्षा लिखाणाद्वारे, भाषणांच्या माध्यमातून आणि शालेय विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटीतून् र्डॉ. कलामांनी सकारात्मक विचारांची प्रेरणा जागवली आहे. राष्ट्रपती म्हणून जरी त्यांचे अधिकार् मर्यादित होते, तरी राष्ट्रप्रमुख या नात्याने त्यांनी भविष्यातील महासत्तेचे वैचारिक नेतृत्व नक्किच केले आहे आणि तेच त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे.
आज समाजात वातानुकुलीत महागड्या गाड्यांमधून फिरणारे अनेक तथाकथित संत, महंत आणि भोंदुबाबा, लोकांना मोहमायेपासून दूर राहण्याचा उपदेश करीत असतात. कलाम यांनी प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घालून दिला आहे.

माणूस कितीही तत्वनिष्ठ असला तरी ह्या मोहमयी दुनियेत कधी कधी त्याच्याकडून अशी चूक होऊ शकते ह्याचे हे एक उदाहरण आहे.

मला वाटतं सदर घटना मोठ्या परिप्रेक्ष्यामध्ये पाहण्याची गरज आहे. त्यांनी आधी निवृत्त व्हायचे ठरवले होते. परंतु जर नंतर विचार बदलला म्हणजे मोह झाला असे म्हणता येणार नाही. ते काही कसलेले राजकारणी नाहित. मतांचा घोडेबाजार आणि गोळा बेरजेचे राजकारण त्यांना मान्य नसावे, म्हणूनच बहुमत असले तरच पुन्हा उमेदवारी दाखल करेन असे सांगितले. बरं जरी ते पुन्हा निवडुन आले असते तरी त्यांनी या पदाचा उपयोग त्यांच्या मिशनसाठीच केला असता यात तिळमात्र शंका नाही.
एक छोटेसे उदाहरणः या लोकशाही देशातील राष्ट्रपतींसाठी अजूनही ब्रिटीश पध्दतीप्रमाणे पायात मोजे व बूट घालण्यासाठी राष्ट्रपती भवनात एक नोकर असतो. आतापर्यंतच्या सर्व महामहीम राष्ट्रपतींनी या सेवेचा लाभ घेतला आहे. कलाम जेंव्हा राष्ट्रपती भवनात राहण्यास गेले आणि जेंव्हा तो कर्मचारी प्रथेप्रमाणे त्यांचे मोजे व बूट घालण्यास गेला, तेंव्हा त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. त्यांची अशी अनेक आदर्श उदाहरणे आपल्याला वाचावयास मिळतील.
माझा त्यांना केवळ सलामच नव्हे तर दंडवत सुध्दा!
-जयेश

लाभाचं पद

लाभाच्या पदासंबंधीचं विधेयक त्यांनी संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवले होते. आपल्या अधिकारकक्षेत राहून त्यांनी बर्‍याच अशा गोष्टी केल्या.
सलग बारा तास उभे राहून काढलेले विमानाचे ड्रॉईंगवगैरे घटना अभियंते लोकांना नक्कीच जवळच्या वाटतात.
आपण नेहमी बोंब मारतो की आजकाल आदर्श घ्यावा असं कुणी शिल्लक नाही. पण कलाम नक्कीच प्रेरणादायी आहेत.

अभिजित...
उनके देखे से जो आ जाती है मुंहपर रौनक़ |
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है |

कलाम शेवटी एक व्यक्तिच

कलाम ही प्रथम एक व्यक्ती आहे, नंतर राष्ट्रपती, वैज्ञानिक वगैरे... हे एकदा मान्य केले कि विचार व भावना यांची रस्सीखेच यांचा अन्वयार्थ लागतो. व्यक्तिपूजेचा अतिरेक झाला आणि काही अपेक्षाभंग झाला कि मग कलाम तुम्ही सुद्धा .. असे म्हणण्याची वेळ येते, कलाम ही आदरणिय व्यक्ती आहे याबद्द्ल दुमत नसावे. साधेपणाचा आग्रह विशेष भावला. जयेश यांची टिप्पणी पटली,

प्रकाश घाटपांडे

व्यक्तिपूजा

व्यक्तिपूजेचा अतिरेक झाला...

अगदी बरोबर बोललात. त्या एका गोष्टीमुळे मला त्यांनी परत राष्ट्रपती होण्यासाठी तयार होणे अथवा लोकांनी पण "वन्स मोर" म्हणणे मान्य नव्हते. आपली व्यक्तिनिष्ठ राज्यपद्धती सामान्यांच्या मनातून जाण्याची खूप गरज आहे. गांधी घराणे आणि काँग्रेस व्यतिरिक्त दुसरेपण पाच (की साडेचार?) वर्षे राज्य करू शकतात यातून हे जनतेच्या धान्यात येणे महत्वाचे होते. (तेच राज्य पातळीवर होत आहे).

यावरून (व्यक्तिपूजा) आठवले: मार्क टली (माजी बीबीसी वार्ताहार) याच्या "defeat of a congressman" (ह्या नावाने अमेरिकेत) अथवा "no full stops to India" (या नावाने भारतात) एक पुस्तक प्रकाशीत झाले आहे. त्यात त्यांनी राजीव गांधी जाण्याच्या आदल्या दिवशी पासून ते नंतरचा काळ वर्णन करून सुरवातीस सांगीतला आहे. त्यात पण आपल्या व्यक्तिपूजेच्या सवयीमुळे (त्याच्या म्हणणयाप्रमाणे) जगभरच्या राजकीय पंडीतांना वाटले की भारतातील लोकशाहीचे आता खरे नाही आणि टली मात्र त्याला विरोध करून सांगत होता की असे काही नाही, भारत हा वेगळा देश आहे आणि वाटत असले तरी तो फक्त एका व्यक्ती अथवा घराण्यावर चालणार नाही. मला नीटसे आठवत नाही पण पुढे जाऊन त्याने असे म्हणले होते की, "Indians know the importance of Banyan tree and also know that nothing grows under banyan tree..."

वर म्हणलेला वटवृक्षाचा अर्थ लक्षात घेता, अब्दूल कलामांच्या अनेक गोष्टींचे जाणीव पूर्वक कौतूक करावेसे जरी नक्की वाटले तरी त्यांच्या आरत्या करण्याची कुणाला गरज वाटावी असे वाटत नाही...

विसंगती

त्यांनी तेथील कुलगुरूंना विनंती करून तिथेचे (एकाच खोलीत) राहायचे ठरवले आहे. त्यांना देऊ केलेला बंगला त्यांनी नाकारला आणि जेंव्हा ते तिथे पोअचतील तेंव्हा कुठलाही गाजावाजा करणारा स्वागत समारंभ ने करण्याची विनंती केली आहे.

सकाळ मध्ये कालच आलेली बातमी पहा -

डॉ. कलाम अजूनही निवासस्थानांच्या शोधात

नवी दिल्ली, ता. ११ - माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानांचा अजूनही पत्ता नाही. देशातील सर्वोच्च स्थान भूषविलेले डॉ. कलाम सध्या एका साध्या अतिथिगृहात राहत आहेत.
कलाम यांना मध्य दिल्ली, १०, राजाजी मार्ग हे निवासस्थान देण्यात आले आहे; मात्र अजूनही त्याला नूतनीकरणाचा मुहूर्त सापडलेला नाही. सुरक्षेला धोका असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये तयार करण्यात आलेल्या अतिथिगृहात सध्या कलाम राहत आहेत. राष्ट्रपतिपदाचा कार्यकाल संपल्यानंतर लष्करप्रमुख मेजर जनरल जे. जे. सिंग यांनी कलाम यांना या तात्पुरत्या निवासस्थानाचा प्रस्ताव दिला होता. कलाम यांनी तो तत्काळ मान्य केला. त्यांना मिळालेल्या बंगल्याचे नूतनीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी त्यांचे कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार करत आहे. कलाम यांना "लष्करे तैयबा'सहित अनेक अतिरेकी संघटनांकडून धोका आहे. त्यामुळे कलाम यांच्या निवासस्थानामध्ये सुरक्षा संस्थांनाही विविध सुरक्षाविषयक उपकरणे बसवायची आहेत; मात्र निवासस्थानच तयार नसल्याने त्यांनाही काही हालचाली करता येत नाहीत, अशी स्थिती आहे. या बंगल्यात सध्या केवळ वाळू आणि इतर बांधकाम साहित्याचे ढिगारे आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------
ह्याचा अर्थ काय??

कदाचीत

ह्याचा अर्थ काय??

याचा अर्थ, वार्‍याशी भांडणे अथवा वाद उकरत् बसणे असा असेल.

आपणही वृत्तपत्रातील बातमी दिलीत आणि मी ही. बाकी कुणाला सलाम करायचा आणि कुणाची खेटराने पुजा करायची हे ज्याचे त्याला ठरवूदेत. आणि हो बाकीचे राष्ट्रपती तेथून निघताना तेथील कपबशांसहीत हेवे ते घेऊन गेल्याचे नंतर वाचले पण वाद उकरायचा नव्हता म्हणून विषय काढला नाही.

वाद उकरणे

वार्‍याशी भांडणे, वाद उकरत बसणे आणि वैयक्तिक पातळीवर उतरणे हे तेव्हाच होते जेव्हा मुद्दे संपलेले असतात ह्या तात्यांच्या मताशी सहमत.

बाकी कुणाला सलाम करायचा आणि कुणाची खेटराने पुजा करायची हे ज्याचे त्याला ठरवूदेत

हेच खरे ना? मग कशाला सार्वजनिक चर्चा प्रस्ताव मांडून लोकांची मते मागवता?? (असे तुमच्याच ष्टाइलीत आम्ही देखिल म्हणू शकतो पण ते आमच्या तत्वात बसत नाही!!)

राष्ट्रपती तेथून निघताना तेथील कपबशांसहीत हेवे ते घेऊन गेल्याचे नंतर वाचले पण वाद उकरायचा नव्हता म्हणून विषय काढला नाही.

मुद्याला धरून पाहिजे तेवढे विषय काढा पटले तर आम्ही जाहिर स्वागत करु... त्याला वाद उकरणे आणि वार्‍याशी भांडणे असले रूप का देता??

बा़की तुमच्या प्रस्तावातील 'त्यांना देऊ केलेला बंगला त्यांनी नाकारला' वगैरे गोष्टी रेडिफवरच्या दुव्यावर नाहीत भांडतच बसायचे असते तर असले मुद्देही काढू शकलो असतो

कोण व्यक्तिगत होतयं?

वार्‍याशी भांडणे, वाद उकरत बसणे आणि वैयक्तिक पातळीवर उतरणे हे तेव्हाच होते जेव्हा मुद्दे संपलेले असतात ह्या तात्यांच्या मताशी सहमत.

तात्यांशी मी ही सहमत आहे. जुन्या झालेल्या चर्चेत वाद काढून बोलणे, उपक्रममंडळाने दिलेल्या जुन्या प्रतिसादाला आत्ता प्रतिसाद (हा हा हा)देऊन मी चालू केलेल्या आणि तुम्हाला न आवडलेल्या विषयावर संपादकमंडळाला उलट प्रश्न करणे, "लेखन करताना-२" या चर्चेत मला आत्ताच मारलेले टोमणे म्हणजे माझ्या बाबतीत आपण वैयक्तिक पातळीवर उतरलात असेच आहे.

हेच खरे ना? मग कशाला सार्वजनिक चर्चा प्रस्ताव मांडून लोकांची मते मागवता??
उपक्रम संपादकमंडळाने आजपर्यंत कधी मला विचारले नाही. आपल्याच भाषेत चर्चेचा रतिब टाकला तरी त्यावर प्रतिसाद देणारेपण आहेत. प्रत्येकाचे विचार आणि प्रतिक्रीया मला पटतील अशा असतील अशातला भाग नाही की त्यांना माझ्या पटत असतील असे नाही. थोडक्यात इतर सर्वांना चालते, सहभाग घेताना काही वाटत नाही, तुम्ही काही करून प्रतिसाद द्या असे काही निमंत्रण करायला तुमच्या दाराशी निवेदन करत बसलो नाही. पण असले उलट बोलण्याचा काय हेतू स्वतःला काय स्वयंघोषीत उपक्रमावरचे पोलीस समजता की काय?

मुद्याला धरून पाहिजे तेवढे विषय काढा पटले तर आम्ही जाहिर स्वागत करु... त्याला वाद उकरणे आणि वार्‍याशी भांडणे असले रूप का देता??

आम्ही रूप देत नाही आहोत तर जे रूप आहे त्याचे फक्त वर्णन करतोय...

बा़की तुमच्या प्रस्तावातील 'त्यांना देऊ केलेला बंगला त्यांनी नाकारला' वगैरे गोष्टी रेडिफवरच्या दुव्यावर नाहीत भांडतच बसायचे असते तर असले मुद्देही काढू शकलो असतो

मी दोन दुव्यातील एक दुवा दिला होता. हा घ्या दुसरा दुवा. आणि हो मी बंगला नाकारले म्हणले ते अण्णा युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंनी दिलेला:

The President also told the VC that he preferred to stay in the room at the University guest house where he used to stay earlier. "We offered him an independent bungalow or some other big house, but he insisted that he would stay only in the same room. He also told me that he would like to have the same office as before."

असो या प्रतिसादाबरोबर आपल्याशी संवाद संपवत आहे.

विकास आणि कोलबेर,

अरे भाडू नका रे असे...

आपला,
तात्यामामा! :)

ठीक आहे

एक तर लोकांना दुवे द्या दुवे द्या असे सल्ले देताना स्वतःच्या लेखनात अर्धे दुवे देत नाही पण ते जाऊ दे..

तुमच्या प्रस्तावात असणार्‍या माहितीशी विसंगत असणारी माहिती कालच आढळली असता ती इथे देउन 'ह्याचा अर्थ काय?' असा सोपा प्रश्न विचारला असता त्यावर मुद्याला धरुन प्रतिसाद न देता 'वाद उकरतो आहोत''भांडण करत आहोत?' ही विधाने करणे म्हणजे सदर प्रश्नाला साळसुदपणे दिलेली ही बगलच नाही का? इथल्या एखाद्या चर्चे विषयी नवी माहिती मिळाल्यासा त्याविषयी प्रश्न उपस्थित करणे म्हणजे वाद उकरणे होते काय? चर्चा प्रवर्तक ह्या नात्याने ही भुमिका योग्य आहे का?

त्याच बरोबर तुमची तीन नट्यांची चर्चा आम्हाला आवडली नाही ह्या निष्कर्शाप्रत तुम्ही कसे आलात हे ही एक आश्चर्यच आहे. तसेच उपक्रमाच्या उद्दिष्टात न बसणार्‍या गोष्टी इथल्या संपादनाच्या नजरेस आणुन दिल्यास आम्ही स्वयंघोषीत पोलित होतो हा एक् विनोदच आहे. मागे तात्यांच्या एका लेखा विषयी देखिल आम्ही अशीच तक्रार केली होती त्यातुन तात्यांनी मला तो लेख आवडला नाही असा निष्कर्श काढला नाही की आमच्यावर आगपाखडही केली नाही. उलट 'उडवा लेको तो लेख नसेल बसत तर!' अशी खास त्यांच्याच शैलीत खिलाडू प्रतिक्रिया दिली होती

असो या प्रतिसादाबरोबर आपल्याशी संवाद संपवत आहे.

जशी आपली इच्छा! पण आम्ही आपल्या चर्चा प्रतिसादांवर "मुद्याला धरुन" आमच्या कुवती प्रमाणे लिहितच राहणार.

शुभेच्छा
कोलबेर

 
^ वर