उत्पादने, सेवाक्षेत्र आणि भारतीय

उपक्रमींनो,
हल्ली आपण वर्तमान पत्रात, दूरचित्रवाणीच्या बातम्यात आणि उद्योगक्षेत्रात सगळीक़डे एक मुद्दा नेहमी वाचतो वा ऐकतो. तो म्हणजे भारताची अर्थव्यवस्था बळकट होत आहे आणि भारत महासत्ता होणार आहे. आपण काही अर्थतज्ञ नाही. पण अनेक प्रश्न मनात येतात कि अर्थव्यवस्था बळकट होत आहे म्हणजे नक्कि काय होत आहे? आमच्या सारख्या सामन्यांना एवढेच कळते कि आपल्या हातात पैसा येत आहे म्हणून परिस्थिती जरा बरी वाटते आहे. आपण अनेक वर्षे जे करत होतो तेच करतो आहे. फार काही वेगळे नाही करत. एक सामान्य माणूस म्हणून आपण एकतर नोकरी करतो वा शेती. आता मग हा पैसा येतो कुठून? सरळ आहे आपल्याकडे जे काही आहे ते विकून. शेतीचे चित्र फारसे आनंददायी आहे असे वाटत नाही. जगभर विकली जावीत अशा दर्जाची आपल्याकडे किती उत्पादने तयार होतात आणि विकली जातात? स्पष्टच सांगायच तर नगण्य. जे काही वापरतो, त्यातले बहुतांश भारता बाहेर बनलेले असते. मग अलिकडचा आशेचा किरण म्हणजे संगणक क्षेत्र. तिथे सुद्धा चित्र व्यवस्थित पाहिल्यास लक्षात येइल की आपण रोजंदारीवर काम करणारे कामगार आहोत. भाव परकिय चलनात असल्याने जास्त. या क्षेत्रात सुद्धा आपली उत्पादने अशी काहीच नाहीत. असली तरी अगदि नगण्य. बहुतेक क्षेत्रात आपण जो पैसा मिळवतो तो सेवा क्षेत्रातुनच येतो. असे किती दिवस चालेल? आज पाश्चात्यांना पैसा वाचवायचा आहे म्हणून भारताकडे पाहतात. उद्या दर्जा खालावला अथवा आपण भाव वाढवला तर? परकिय चलनाच्या तुलनेत रुपया बलवान झाला तर? मग सेवाक्षेत्राला टाळे ठोकावे लागेल. आमच्याकडे आमची अशी उत्पादने नाहीत जी कोणी विकत घेइल. आमचे भारतीयांचे भांडवल एकच - बुद्धी. पण आम्ही ते दुसर्‍यांच्या सेवेला अर्पण करतो. म्हणतो, होय साहेब. मला गुलामगिरीच आवडते. माझं राज्य पण तुम्हीच चालवा. कधी आमच्याकडे येउन कधी न येता तिथुनच.

सारांश असा कि भारतायांची खात्रीने पैसा मिळवून देणारी उत्पादने नाहीत. सेवाक्षेत्रात आता भरपूर पैसा आहे. पण त्याची शाश्वते नाही. अशा परिस्थितीत येत्या काही दशकात तर सेवाक्षेत्र गोठू लागले तर भारतीयांनी काय करावे? तुम्हाला काय वाटते?

Comments

का बरे?

अशा परिस्थितीत येत्या काही दशकात तर सेवाक्षेत्र गोठू लागले तर भारतीयांनी काय करावे?

असा संशय आपल्याला का आला?
येत्या काही दशकात सेवाक्षेत्र गोठण्याचे काय कारण आहे? जर सेवाक्षेत्र मंदीमुळे वगैरे गोठणार असेल तर केवळ उत्पादनांवर आधारित अर्थव्यवस्थेवरही त्याचा मोठा परिणाम होणार नाही का?

भारत

'संगणकीय सेवा/दुरुस्ती/चाचण्या/कॉल सेंटर कामे करुन घेण्यासाठी स्वस्त मजूरीचा देश भारत' हे चित्र कायम तर राहणार नाही, कारण जितके अधिकाधीक परदेशी लोक कामे देणार तितका भारताचा हळूहळू आर्थिक उत्कर्ष होणार. एस इ झेड खाली शेतजमिनी पण शेतकरी फायद्यासाठी विकून तिथे नवनवीन 'सर्व्हिस प्रोव्हाइडर' आपल्या कचेर्‍या थाटणार. हा सर्व पसारा सांभाळण्यासाठी सेवांचे भाव वाढणार. यादरम्यान पाक चीन सारखे दुसरे एखादे गरिब राष्ट्र चांगले इंग्लिश शिकून आणि चांगले तंत्र शिकून कूर्मगतीने का होईना भारतापेक्षा स्वस्त दरांत चांगल्या दर्जाची सेवा या श्रीमंत देशांना पुरवू लागणार.
प्रत्येक क्षेत्रातील आर्थिक उलाढाली ही एक लाट असते(मेड ऑफ क्रेस्ट अँड ट्रफ). आज ही लाट चढती आहे, काही वर्षात ती सर्वोच्च बिंदूला जाऊन नंतर तिची सावकाश उतरतीच्या गतीने वाटचाल कमी होत जाईल.
आजही आयसी(इंटीग्रेटेड चिप्स) बघा, जास्तीत जास्त वेळा थायलंड तैवान च्याच असतात. विन्डोज युनिक्स मॅक पण मूळचे परदेशी. परमचे उदाहरण सोडल्यास संगणक क्षेत्रात (मोठे) उत्पादन निर्मीती हा कार्यात भारताचा वाटा कमीच आहे. हां, या कामाची क्षमता असलेले आणी ही कामे करायला मिळत असलेले भारतीय आहेत, पण तेही परदेशात बसून कामे करत आहेत, जी त्यांना भारताबद्दल कितीही अभिमान असला तरी परदेशी नावावर जमा होतात. टाटा व मारुती उद्योग चा अपवाद सोडल्यास किती कारचे आराखडे पहिल्यांदा पूर्ण पणे भारतात रचले जातात?संगणक आणि इतर क्षेत्रांत उत्पादनाच्या मूळ आराखडा बनवण्यात भारतीय 'क्रिएटर' सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके आणि 'एक्झिक्यूटर','मॅकॅनिक','फॉलोअर' बरेच अशी स्थिती आहे. आपण कोणीतरी परदेशाने आधीच बनवून ठेवलेल्या एखाद्या उत्पादनाचे भाग बनवतो, या उत्पादनाची डागडुजी व दुरुस्ती करतो, याची सुधारीत आवृत्ती बनवतो. पण किती उत्पादने अथपासून इतिपर्यंत स्वतः बनवतो?
चीन,पाकिस्तान,फिलीपाईन्स किंवा पूर्व युरोपीय देश्(झेक, पोलंड,रुमानिया, स्लोव्हाकिया इ. नकाशात कदाचित गफलत असेल, सध्या आठवत नाही.) यांची स्पर्धा आपल्याला मोठी आहे. सध्या आपली मुख्य बलस्थाने 'स्वस्त भाव, बर्‍यापैकी डोके आणि इंग्लिश बोलण्यावाचण्यालिहीण्यात गती' ही आहेत आणि हे किल्ले सर करायला इतर काही देश पुढे येत आहेत.
इकॉ. टाइम्स मध्ये वाचल्याचे आठवते की 'मायक्रोसॉफ्ट प्रमाणे संशोधनासाठी वेळ व पैसे घालवण्याचे आमचे विचार नाहीत.त्यापेक्षा सर्व्हिसेस आम्हाला कमी भांडवलात चांगले पैसे लवकर मिळवून देतात.'
येत्या काही वर्षात हा दृष्टीकोण बदलून प्रॉडक्ट डिझाइन मध्ये पुढे आलो तर आपण १०-१५ वर्षांनी येणार्‍या उतरणीला चांगले तोंड देऊ शकू.
(घाईत लिहीले आहे, शु. चि वापरलेला नाही, क्षमस्व.)

मारुती

विक्री

माझ्या माहिती प्रमाणे मारूतीचा खरा आराखडा सुझुकी या जपानी कंपनीचाच आहे.
मारूती एस्टिम हे मॉडेलही सुझुकीने स्विफ्ट या नावाने जगात विकले आहेच. आपण झेन एक्सपोर्ट करतो असे म्हणतो, पण ते ही तितके खरे नाही. कारण तेच मॉडेल सुझुकी अल्टो नावाने सगळीकडे विकते.

या शिवाय मला वाटते की टाटा सुमो ही पुर्णपणे भारतीय बनावटीची नाही! ती बरीचशी मित्सुबिशीच्या डिस्कव्हरी सारखी आहे

हे असु देत असे असले तर... काही बिघडत नाही. असेही परत परत चाकाचा शोध लावण्यात
काय अर्थ आहे?

प्रश्न हा आहे की,
आपण एखादे प्रॉडक्ट किती प्रमाणात विकु शकतो?
असा ब्रँड बनवू शकतो त्याला जागतीक जनमताचा आधार देवू (बनवू?)शकतो?
म्हणजे अनेकदा जनरल मोटर्स हे कंपनी आपल्या उत्पादनांसोबत जपानी कंपन्यांच्या गाड्या आपला शिक्का लावून विकते. जोरदार जाहिरात नि विक्रीचे तंत्र या जोरावर अनेकदा मुळ कंपनी पेक्षा जास्त गाड्या विकते!
हे आपणही करू शकतोच ना? टाटांनी प्रत्येकदा नवीनच गाडी बनवण्याची आवश्यकता नाहीये. कुणी जर उत्तम मॉडेल बनवले असेल तर तेच इथे टाटांच्या नावाने विकणे कधी कधी योग्य ठरते. पण असेच हेच मॉडेल आपल्या नावाने विकण्यासाठी विक्रीचे जाळे आपण जगभरात कसे विणायचे हा खरा प्रश्न आहे.

इथे गाडी हे उदाहरण आहे, पण हा प्रयोग इतर सगळीकडे चालू शकतो. आपण जर योग्य तेव्हढे पैसे नि दबाव तंत्र वापरले तर कदाचित विन्डोज प्रणाली आपण 'इंडोज' नावानेही विकण्याची खास सुविधा मिळवू शकू. भारतीय तंत्रींनी बनवलेली म्हणून 'जास्त चांगले' असा गाजावाजा करता आला पहिजे. ती जास्तीत जास्त खपवता आली पहिजे. आजच्या घडीला महत्व प्रॉडक्ट इतकेच विक्री तंत्रालाही आहे. ते ज्याला (देशाला) जमले तो पुढे आहे.

भारतीय संगणक तंत्री चांगले ही आजची जगात विकली गेलेली कंसेप्ट आहे. त्याचा आपण कसा फायदा उचलायचा हे आपणच पाहिले पाहिजे नाही का?

त्यासाठी लागणारी कार्यपद्धती (Administration ) आपल्या विचारात, शिक्षणात येते आहे का?
आपण एखाद्या नव्या कल्पनेसाठी लागणारे 'मुक्त विचार' कितपत पचवू शकतो?

(यात अपवाद फक्त बँकींग तंत्रवाल्या घैसास यांचा!)
आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र)

बरोबर

पंत आपले बरेच् मुद्दे बरोबर आहेत.

माझा मुख्य भर या मुद्यावर आहे कि आपण उत्पादन विभागात फारच मागास आहोत. आपल्याम्ध्ये क्षमता आहे. पण आपण ते करत नाही. जर कधीच केले नाही तर भविष्यात अनेक प्रश्न उभे राहू शकतात. इंडोज करणे खरच अशक्य आहे काय? लिनक्स चा एक प्रकार म्हणून करायला काहीच हरकत नाही. भारतीय भाषांमधली प्रणाली, तात्रिकदृष्ट्या सक्षम अशी बनवली तर हा पैसा भारतात नाही का राहणार?

जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे आणि सीमा (देशाच्या) पुसट झाल्या आहेत हे मान्य. पण जेंव्हा एखादा लादेन येतो त्यावेळी जागतिकीकरण बाजूला पडते.

मराठीत लिहा. वापरा.

बलवान रुपया

रुपया बलवान होत आहे. डॉलर अलिकडे ४० रु. वर् स्थिरावला आहे. वर्षाखेरीस तो ३६ पर्यंत येइल असे भाकित आहे. सेवाक्षेत्रात असलेल्या सर्वांची कमाइ जास्त करून डॉलर मध्ये आहे. तसेच जर रुपया वाढीस लागला तर भारताकडून सेवा घेणे इतरांना परवडेल का? तसेच सेवाक्षेत्रासाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा कशा आहेत ते सर्वांना माहित आहेच.

जागतिकीकरणाच्या रेट्यात आता त्या त्या देशातले लोक जागे होत आहेत. उद्या त्यांनी कमी मोबदल्यात काम करायचे मान्य केल्यास भारतीय कामगारांची मागणी कमी होईल असे वाटत नाही का?

मराठीत लिहा. वापरा.

सेवाक्षेत्र

सेवाक्षेत्र म्हणजे फक्त औटसोर्सिंग एवढेच गृहीत धरायचे का?

माझा समज मॉल्स, रिटेल शॉपिंगची दुकाने, ब्यांका, विमा कंपन्या वगैरे ठिकाणी मिळणार्‍या सेवा व त्याचा अंतर्भाव होणारे क्षेत्र ते सेवाक्षेत्र असा आहे.

आणि रुपया जसा डॉलरच्या तुलनेत बलवान होत आहे तसाच पौंड आणि युरोही रुपयाच्या तुलनेत बलवान होत आहे. भारतीय औटसोर्सिंग कंपन्या ह्या प्रदेशात कामे मिळवण्यासाठी प्रयत्न करतच आहेत.

औटसोर्सिंग

औटसोर्सिंग जर बंद झाले तर अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही का? औटसोर्सिंग जर बंद होउन अर्थव्यवस्था बलवान राहणार असेल तर मग आमची भीती नक्किच फोल ठरेल.

मॉल्स, रिटेल शॉपिंगची दुकाने, ब्यांका, विमा कंपन्या वगैरे यामध्ये किती कंपन्या १००% भारतीय आहेत?

मराठीत लिहा. वापरा.

भारतीय कंपन्या / औटसोर्सिंग

औटसोर्सिंगचा जीडीपी मधील वाटा हा २००८ मध्ये ७ ते ८ टक्क्यांपर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ८ टक्के हा शेअर अगदी नगण्य नसला तरी अर्थव्यवस्था मोडकळीस येण्याइतका महत्त्वपूर्ण नाही किंवा भारतीय अर्थव्यवस्था केवळ याच क्षेत्रावर अवलंबून नाही असे वाटते. मात्र या क्षेत्रामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत हे खरे आहे.

आता भारतीय कंपन्या म्हणजे नक्की काय हे ओळखणे खूप अवघड आहे. जगात सर्व प्रवाह एकमेकांमध्ये इतके मिसळत असताना त्यातून अमुकतमुक कंपनी भारतीय आणि अमुकतमुक अभारतीय असे ओळखणे खूप अवघड आहे. (उदा. संगम पूल गेल्यावर हे पाणी मुळेचे आणि ते मुठेचे किंवा क्रांतीवीरमधील इसमेसे मुसलमानका खून कौनसा अउर हिन्दूका कौनसा ये बता असे झाले आहे.)
एखादी कंपनी भारतीय आहे हे ओळखण्याचा निकष काय असावा?

आउटसोर्सिंग

आउटसोर्सिंग ही सध्या कंपन्यांची गरज आहे. संगणक क्षेत्र वगळता इतर कोणत्याही क्षेत्रात असलेल्या कंपनीला आपल्या संगणक प्रणाल्या, त्यांची निर्मिती, देखभाल या गोष्टी करण्यासाठी आपापले आयटी युनिट ठेवावे लागत असे आणि आजच्या स्पर्धात्मक युगात चांगली/जाणकार माणसे निवडणे आणि टिकवणे अवघड आहे आणि खर्च कमी करणे अत्यावश्यक आहे. अश्यावेळी हे सर्व काम दुसर्‍या एखाद्या कंपनीस दिल्याने स्वतःच्या आयटी युनिटची गरज राहात नाही, खर्च कमी होतो आणि ज्या कंपनीला हे काम दिले आहे त्यांचा संगणक क्षेत्रातला अनुभव जास्त असल्याने आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने एकूणच कार्यक्षमतेत वाढ होते. हे वास्तव आता सर्वांना पटू लागले आहे. ज्या कंपन्या आतापर्यंत 'कंझर्वेटिव्ह' राहिल्या (प्रामुख्याने युरोपातील आणि काही अमेरिकेतीलही) त्याही आता यादृष्टीने विचार करत आहेत. पण या क्षेत्रात झालेला महत्त्वाचा बदल असा की 'अश्या' कंपन्या आउटसोर्सिंगच्या कल्पनेला जवळ करताना फक्त किमतीला (कॉस्ट) महत्त्व न देता अनुभव आणि क्षमता यांना अधिक महत्त्व देत आहेत. या बाबतीत भारतीय कंपन्यांच्या अनुभवाइतका अनुभव इतर कोणत्याही देशातील कंपन्यांना नाही. त्यामुळेच आयबीएम, ऍक्सेंचर, इडीएस सारख्या अग्रगण्य संगणक सेवा कंपन्यांना भारतात यावे लागले. तात्पर्य असे की 'लो कॉस्ट' चा फायदा आपल्याला झाला (आणि आणखी १०-१५ वर्षे होत राहील) हे खरे पण या काळातील अनुभवामुळे मोठा आवाका असलेली कामेही (जिथे कॉस्ट कमी महत्त्वाची असते) मिळत राहतील.
आणखी एक सुखावह बदल म्हणजे भारतातील चांगल्या शिक्षणपद्धतीचा आणि अधिक संख्येने उपलब्ध तज्ज्ञ लोकांचा उपयोग करून घेण्यासाठी बर्‍याच परदेशी कंपन्यांनी आपापली संशोधन केंद्रे (उदा. गूगल, इंटेल, मासॉ) इथे उघडली आहेत. हा प्रवाहही भविष्यात वाढत राहील असे संकेत आहेत.
ज्या कंपन्या आउटसोर्सिंग करताना कॉस्टला अनन्यसाधारण महत्त्व देतात त्यांच्यासाठी भारतीय संगणक कंपन्या कमी खार्चिक देशात विस्तार करण्यासारखे मार्ग स्वीकारत आहेत. पूर्व युरोप, दक्षिण अमेरिका आणि अग्नेय आशियात भारतीय कंपन्यांनी आपली कार्यालये थाटली आहेत. चीन मधील प्रचंड मनुष्यबळाचा उपयोग करण्यासाठी चीनमधूनही बरेच काम चालते.
तात्पर्य असे की "कॉस्ट ऍडवांटेज" अजून काही वर्षे (१०-१५ वर्षे) टिकेल पण त्याचबरोबर कौशल्य (एक्सपर्टिझ) आणि कौशल्याचे महत्त्व वाढत राहील. भारतीय संगणक क्षेत्रातील धुरिणांना याची जाणीव आहे असे वाटते.

सुरेख प्रतिसाद!

सुरेख प्रतिसाद!
त्याचबरोबर कौशल्य (एक्सपर्टिझ) आणि कौशल्याचे महत्त्व वाढत राहील.

हे वाक्य आवडले, महत्वाचे वाटले!

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र)

आमचे भाकित

'अवो जो शेवा कर्नार् त्यो म्यवा खानार ' हेच
आमचे सेवाक्षेत्राबद्द्लचे भाकित.
अवांतर - अशाप्रकारची सामाजिक भाकिते समाजमनाच्या कुंडलीवरुन आम्ही अनेकवेळा वर्तवली आहेत.
प्रकाश घाटपांडे

अर्थशास्त्र

अर्थशास्त्राचा अभ्यास मी नुकताच सुरु केला आहे, त्यामुळे माझे हे मत पूर्ण अचूक असेलच असा दावा नाही.
भारतातील जीडीपी मध्ये सेवाक्षेत्र व उत्पादनक्षेत्र या दोन्हींचा महत्वाचा वाटा आहे. अनुक्रमे ५६ व २७ टक्के. या दोन्हीच्या तुलनेत शेतीचा वाटा कमी म्हणजे १८.५ टक्के आहे. पण या तीन्ही क्षेत्रांच्या विकासाचा दर विचारात घेतला तर तो उत्पादनक्षेत्राचा ११ %, सेवाक्षेत्राचा १४% तर शेतीचा केवळ २.६% इतका आहे. पण भारतातील ६०% लोकसंख्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या शेतीवर अवलंबून आहे. खरा प्रश्न आहे तो हा. त्यामुळे अर्थव्यवस्था बळकट करायची असेल तर शेतीवर विसंबून रहाणार्‍या लोकसंख्येची टक्केवारी कमी करणे (जे रातोरात करणे शक्य नाही) आणि शेतीच्या विकासाची टक्केवारी वाढवणे या दोन गोष्टींना प्राथमिकता देणे गरजेचे आहे.
आता रहातो प्रश्न तो रुपया बलवान होत असल्यामुळे आपल्या सेवा आणि आपली निर्यात अधिकाधिक महाग होत असल्याचा. त्यासाठी रुपया का बलवान होतो आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. ज्या चलनाला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असते, ते चलन अधिकाधिक बलवान होत जाते. भारतात गुंतवणूक करण्यास इतक्या आंतरराष्ट्रीय कंपन्या (फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स) उत्सुक आहेत की त्यामुळे रुपयाची मागणी वाढते आहे. परदेशस्थ भारतीयांनी भारतात डॉलर्स पाठवण्याचे प्रमाणही वाढले आहे (२६ बिलियन डॉलर्स?) त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होतो आहे. याचा निर्यातीवर आणि सेवाक्षेत्रावर परिणाम होत असला तरी (पहा: इन्फोसिसचा पहिल्या तिमाहीतला परफॉर्मन्स) त्यामुळे आपली परकीय चलनाची गंगाजळी वाढते आहे आणि आयात अधिकाधिक स्वस्त होते आहे. त्याचा उत्पादनक्षेत्रावर चांगला परिणाम होईल. निर्यातीवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन सरकारने नुकतेच निर्यातदारांसाठी एक विशेष पॅकेज जाहीर केले आहे. रुपया अधिक वधारला की आपोआपच भारतातील गुंतवणुकीचा दर कमी होईल, रुपयाच्या तुलनेत डॉलरची मागणी वाढेल आणि निर्यातही वाढेल. त्यामुळे यात घाबरुन जाण्यासारखे काही नाही. फक्त प्रश्न आहे तो त्या साठ टक्के जनतेचा आणि घसरत चाललेल्या शेतीच्या विकासदराचा. जोवर ते सगळे सुधारत नाही तोवर भारत 'विकसनशील' च राहील, असे मला वाटते.
सन्जोप राव

फक्त

फक्त प्रश्न आहे तो त्या साठ टक्के जनतेचा आणि घसरत चाललेल्या शेतीच्या विकासदराचा.
भारताच्या लोकसंख्येचा ६० टक्के म्हणजे किती? शेतीचा विकास दर वाढला पाहिजे हे खरे. पण जिथे पिकाउ जमीन सेझला, कृषीमंत्री क्रिकेटला वाहिले आहेत तिथे हे ६० टक्के काय करणार. यांचा प्रक्षोभा आता जाहिर होत आहे. जमीनीची पाहणी करायला गेलेल्या अधिकार्‍यांची काय हालत होते ते आम्ही बघतो आहोत. आता यात त्या अधिकार्‍यांचा काय दोष? भारतीयांची मानसिकता अशीच आहे. एखाद्या समस्येचे तात्पुरते समाधान शोधायचे. समाजाला शांत करायचे कि झाले. मग अश्याने आपण येथे जे बोलतो आहोत तो फक्त बुद्धीवाद बनुन राहतो.
आला आपण फक्त एक प्रश्न एवढ्यावर सीमीत ठेवायचे का? हे असे अनेक प्रश्न उभे आहेत. आपण फक्त राजकिय निर्णय पहायचे आणि सोनियाची प्रतिभा कशी आहे याचे गुणगान करायचे...

मराठीत लिहा. वापरा.

महत्त्वाची माहिती

तुमचा प्रतिसाद थोडक्यात फारच महत्त्वाची माहिती देतो.

विवेचनात्मक!

वा विवेचनात्मक प्रतिसाद!
आवडला.
पण शेती संदर्भात काय करता येईल असे आपल्याला वाटते? हा मोठाच प्रश्न आहे.
यात
१. शेती संघटीत करून मोठ्या प्रमाणात उत्पादन (नि उद्याची आखणी)
२. उत्पादनाचे प्रक्रिया करून हवाबंद डब्यात (वा तत्सम) रुपांतरण सुविधा
३. विपणनाचे भक्कम जाळे
४. उत्पादने (जास्तीत जास्त नफा काढून परदेशी विकण्यासाठी) सरकार कडून सर्वतोपरी दीर्घकालीन आखणी

असे काहे ढोबळ उपाय दिसतात.
(यात कापुस उत्पादक, ऊस यांचा विचार केलेला नाही.)

पण तरीही हे करण्यासाठी/घडवण्यासाठी लागणार्‍या जबरदस्त राजकिय इच्छाशक्तीची कमी सहजतेने दिसते आहे.
पण मी आशा वादी आहे. फक्त भारतातीय शेतकर्‍याला योग्य त्या, आकडेवारीची, मार्केटींगची व हवामानाच्या माहितीची गरज आहे!

काय वाटते आपल्याला?

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?)

एवढा निराशावाद नको....

आर्य, सध्यपरिस्थिती ही फक्त आजच्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आहे असे समजण्याचे कारण नाही. स्वातंत्र्यानंतर कितीतरी वर्षे खुळचट समाजवादी कल्पनांच्या मागे लागून वाया घालवली. आता जाग आल्यावर एरवी ज्याची कॅपिटॅलिस्ट म्हणून कुचेष्टा केली त्याचीच कास धरण्याची वेळ आली आहे. पण गेल्या दहा वर्षांत सकारात्मक बदल होत आहेत. सेझचा मुद्दा वेगळा आहे. सेझ असो किंवा नसो, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण यांना आता पर्याय नाही. कैक वर्षे लाल फितीत अडकलेला शासकीय कारभार आता थोडाथोडा मोकळा होतो आहे. (त्यातही तिसर्‍या आघाडीचा खोडा आहेच, पण ती सत्तेसाठी केलेली अपरिहार्य तडजोड आहे असे समजू.) मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांच्याकडे किमान विकासाची दृष्टी तरी आहे असे वाटते. भविष्यात कधी तरी निर्गुंतवणूक पूर्ण होईल, मूलभूत सुविधा उपलब्ध होतील, सरकारी 'बाबूं'च्या हातात या देशाचे भवितव्य रहाणार नाही (समाजवादी म्हणतात, 'म्हणजे तुम्ही देश 'रिलायन्स' ला विकून मोकळे व्हाल!') आणि आर्थिक महासत्ता वगैरे सोडा, पण पन्नास टक्क्याच्या आसपास असलेल्या दारिद्र्यरेषेखालील भारतीयांना किमान अन्न, वस्त्र आणि निवारा मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. आशावादी रहाणे एवढे तरी आपण करु शकतो, नाही का?
सन्जोप राव

नक्किच

आशावाद गरजेचा आहे. पण भोळाभाबडा नाही.
शेती हा अत्यंत नाजूक विषय आपल्याकडे खुप दुर्लक्षीत केला जातो आहे. कार्पोरेट शेती उदयास आली तर हे चित्र नक्किच बदलेल. पण त्यासाथी जबरदस्त राजकिय इच्छा हवी. भारताची सध्याची राजकिय अवस्था पाहता हे चित्र खरच खुप निराशाजनक आहे.

मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांच्याकडे किमान विकासाची दृष्टी तरी आहे असे आपण म्हणतो. पण आजच्या घडीला ते पैसा उभा करत आहेत तो सामान्यांचे कंबरडे मोडुन. शेतकर्‍याचा वापर फक्त निवडणुकीसाठी होतो. जे सधन शेतकरी आहेत तेच राजकारणी नेते आहेत. अथवा आयात केलेले नेते आहेत. मला कोणत्या पक्षाची बाजू घ्यायची नाही. पण एन डि ए सरकारचे अनेक पायाभुत सुविधांचे प्रकल्प यु पी ए सरकार ने बासनात बांधून ठेवले आहेत. भारतातली शेती एका सक्षम उद्योगासारखी राबवली तर हे चित्र लवकरच बदलेल. पण आत्ताचे राजकिय नेते ते करताना दिसत नाहीत.

एक एकरापेक्षा कमी जमीन असलेले जे शेतकरी आहेत त्यांना एकत्र करणे, त्यांना योग्य तो विचार करण्यास भाग पाडणे आणि आजची शेती कार्पोरेट शेती बनवणे हा खरतर सर्वात चांगला उपाय वाटतो. शेती म्हणजे अशिक्षीतांचे काम या जुन्या विचारसरळीमुळे आज ग्रामिण भारत मागास राहिला आहे. यात बदल होणे गरजेचे आहे. उद्याचा शेतकरी हवामानचा अंदाज वाचून/समजून शेती आणि जोड धंदा करणे अपेक्षीत आहे. मग आपला समतोल विकास होईल असे वाटते.

मराठीत लिहा. वापरा.

शहरी आणि ग्रामीण

मला असे वाटते की शहर आणि गाव वेगवेगळ्या पद्ध्तीने (ऊपायांनी) विकसीत करावीत.
शहरे - ऊद्योजक - जागतिकरण एकमेकांच्या सहाय्याने आपला विकास करतील, घडवुन आणतील्. सरकारने कमीतकमी हस्तक्षेप करावा.

सरकारने, गावात मात्र युध्दपातळीवर नव्या हरीतक्रांतीची सुरवात केली पाहीजे. पाण्याचे योग्य नियोजन. पिकांचे योग्य नियोजन जेणेकरुन
१. शेतकरी तरला पाहीजे व देशाला व्यवस्थित पुरेल ईतका अन्नपुरवढा (वाढत्या गरजा लक्षात घेऊन) तयार झाला पाहीजे.
२. प्रायोगिक स्वरुपात ज्याला व्यावसायीक शेती म्हणता येईल असा प्रयत्न केला पाहीजे. विचार करा जर २०% लोक जागतिकरणातुन एवढे परकिय चलन मिळवतात तर ६०% "जागतिक शेती" करुन.... ( असे बहुतेक नारायण मूर्ती साहेब म्हणाले...)
अर्थात "जागतिक शेती" तुन मिळणारे ऊत्पन्न हे ग्रामीण विकासासाठीच वापरले पाहीजे. मला वाटते ईंजीनीयर मंडळी भरपुर तयार करता येतील पण शेतकरी करणे अवघड आहे म्हणुन शेतकरी हा वाचलाच पाहीजे.

जगात वेळप्रसंगी लोक LCD TV नाही घेणार पण अन्न तर सर्वांना रोज हवेच. मग भले, ते मोठे शोध , उत्पादने आपल्याला न का जमेना. रोज जेवण आपल्याकडुन घेतले की झाले.

विकसनशील भारताला विकसीत भारत व्हायचे असेल तर शेतीचे जागतिकरण झाले पाहीजे व देशातील सर्व शहरे पुर्ण जगाला जोडली गेली पाहीजे. (अरेरे माझ्या ह्या चांगल्या वाक्याला राजकीय सभेतल्या भाषणातिल वाक्याचा वास येतो.)

उत्पादने, सेवाक्षेत्र , पर्यटन, "जागतिक शेती" + योग्य नियोजन = from विकसनशील भारत to विकसीत भारत

छान

प्रतिसाद चांगला आहे.

मराठीत लिहा. वापरा.
 
^ वर