लंपन

लंपन या छोट्याश्या पण विलक्षण संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपल्यात आणणारे प्रकाश नारायण संत याच महिन्यात २००३ साली आपल्याला सोडून गेले.

महाराष्ट्र - कर्नाटकाच्या सीमेवरच्या गावातले लंपनचे भावविश्व, संगीत, त्याचे आजीआजोबांच्या कडे असणे, बाबूराव, चंब्या, कणबर्गी गंग्या, परळ्या, यमज्या आणी इतर ही सगळीच पात्र सुरेख रीतीने एक अप्रतिम अनुभव विश्व आपल्या समोर प्रकाश नारायण संत उभे करतात. हे सगळे 'मॅड सारखे कितीही वेळा वाचले तरी त्याचा फेस काही डोक्यातून जात नाही.'

मी पाहिली कथा एका मासिकात वाचली, पण त्यावेळी काही कळलेच नाही. सुमी काय? हे पात्र सारखे प्रत्येक ठिकणी 'मॅड' का म्हणते? काय लिहिलेय हे? असा विचार करत राहिलो.

अचानकपणे काही दिवसांनी 'पंखा' हा कथा संग्रह अश्विनी कुलकर्णीने हातात ठेवला 'अरे हा घेऊन जा जसे काही तुझ्यासाठीच लिहिलेय हे पुस्तक अस समज' असं म्हणून!

एका दमात पुस्तक वाचले. नि वाचले नि परत परत वाचले. लंप्यानी त्यातल्या सावकाराच्या गोष्टीने एकदम मोहिनीच घातली. मग वनवास मिळवले, वाचले. अजून अजून लंपन हवाहवासा होत गेला. त्याचे निर्मळ विचार, सुमी चे असणे प्रगल्भ आजी-आजोबांची सोबत हवी हवीशी वाटायला लागली. मग शारदा संगीत. संगीताच्या सुरावर लंपनचा विहार, त्याची घसरगुंडी, यमज्याच्या 'टिंब' चे क्रिकेट. सगळ्याचे अगदी वेडच लागले म्हणाना!

शेवटी झुंबर! सगळे पुस्तक वाचले पण शेवटची 'स्पर्श' नावाची कथा एकदाच पूर्ण वाचली. मग ते नीट सगळ्या पुस्तकांच्या खाली ठेवूनच दिले. नकोच वाटायला लागले एकदम. लंपनचे मोठे होणे नकोसे वाटले! त्याच्या त्या 'नकादु' च्या मनोहर विश्वातून बाहेर येऊन विक्राळ प्रत्यक्षाची झालेली टक्कर खूपच त्रासदायक गेली मनाला. अजूनही मी ते वाचत नाही. सगळी पुस्तके कधीही काढतो. परत परत वाचतो, पण शेवटची कथा सोडून!

असे उमलणारे भावविश्व अगदी साध्या शब्दातून सामर्थ्यशालीपणे मांडणारे संत आज आपल्यात नाहीत. त्यांचे लिखाण वाचल्यावर जाणवत राहते की एका थोर लेखकाला मराठी मुकली आहे.

अगदी मॅड सारखे काहीतरी आता वाचत जावे असे वाटत असेल, तर लंपन ला नक्की भेटा एक वेगळाच अनुभव असेल तो.

प्रकाश नारायण संत यांचे कथा संग्रह - वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर.

( किंमती अगदीच ठीक आहेत रु.१०० ते रु.१५० च्या दरम्यान)

प्रकाशक - मौज प्रकाशन गृह

खटाववाडी, गिरगाव, मुंबई.

या शिवाय ही पुस्तके ऑनलाईन मायबोली डॉट कॉम वर उपलब्ध आहेत.

-निनाद

Comments

मंत्र!

वा 'लंपन वाचणे म्हणजे एक मंतरलेला' अनुभव आहे!!
त्यातही परचक्र या कथेत बंक्याने लंपन ला दिलेले कथा नि मंत्र तर अफलातून आहेत.
------------
मंत्र - पाव चिश्टी मिष्टी घोडा फुक डोळा झिल
एक मंत्र म्हणजे विटी दांडूचा एक झिल. असा एक झिल झाला की की एक मणी मिळतो, असे हजार मणी मिळ्वले की अंधारात दिसायला लागते, दुसर्‍याच्यामनातले विचार ओळखता येतात, परिक्षेला अभ्यास न करता पास व्हायला होतं.
------------
विचार करा दुसरी तिसरीच्या मुलांना काय सॉलीड वाटणार ही आयडिया!!?
आणी हे सगळं कसं मिळणार तर विटी दांडू खेळून! वा अजून काय पाहिजे?

दुसरा गोट्या खेळतांना चा भन्नाट मंत्र
-----------
पंचापांडू - सह्यादांडू - सप्तपोपडे - अष्ट जिंकिले - नऊनऊ किल्ले - दश्शा पेडा - अकलकराठा बाळू मराठा - तिरंगी सोटा - चौदा लंगोटा - पंधराशी परिवळ - सोळी घरिवल - सतरम सीते - अठरम गरुडे - एकोणीस च्यकच्यक - वीसा पकपक - एकवीस कात्री - बावीस रात्री - तेवीस त्रिकाम फुल - चोवीस चोर - पंचवीस मोर
---------------
(असा एखादा मंत्र इथे ही हवा आहे खरं आम्हाला!)
संतांनी शेवट दु:खद का केला असवा अस प्रश्न मलाही पडला.
अनेकदा वाचतांना जाणवतं, वाटतं की संत स्वतःविषयी तर लिहीत नसावेत.
असो, आम्हाला लंप्या इतकाच त्यांचा जंब्या कटकोळही प्रिय आहे. आणी सुमीच्या तर गुंडोपंत कायमचे प्रेमात पडले आहेत. बाबुराव त्यांना अगदी मित्रासारखा भासतो. आजीआजोबा अगदी शेजारी राहतात असे वाटते. जमखंडीकर शारदा संगीत मध्ये असणारच असं वाटतं. त्या यप्पड ख'टां'गळे च्या नकादु मध्ये जाउन केस कापावेसे वाटतात. पण त्याचाच शेवट...?
त्यांच्या झुंबर या कथा संग्रहातली 'ज्यामिन' असाच चटका लावून जाते.
असो, त्यांच्या कथा मॅड सारख्या वाचाव्यात अशा आहेतच.

इतक्या लहान मुलांचा आयुष्यात इतक्या सहजतेने डोकावून दाखवणारा भन्नाट चित्रकार, लेखक आज आपल्यात नाही याचे आम्हालाही मनस्वी दु:ख आहे.

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायलाहे नको?)

दुवा मिळेल का?

या शिवाय ही पुस्तके ऑनलाईन मायबोली डॉट कॉम वर उपलब्ध आहेत.

ही पुस्तके मायबोली डॉट कॉम वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत की वाचनासाठी?
या पुस्तकांचा दुवा मिळेल का?

(फुकट्या) आजानुकर्ण

बहुतेक विकायलाच असावीत

बहुतेक विकायलाच असावीत... मला तरी कुठे अजून मिळाली नाहीत.
मिळाल्यास मलाही आवडतील!
बाकी दारूवरच्या लिखाणासाठी एखादा मंत्र मिळाला तर पहा बॉ! ;)
आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायलाहे नको?)

मलाबी वाचाचं

कुढं मीळन् हे बुक्,मलाबी वाचाचं हाय्.

वनवास

एकदा त्या पुस्तकाची लय सापडली की सोडवत नाही. एकदा मला आवडले म्हणून आमचा मित्र वाचत होता म्हणून त्याला वाचायला दिले पण त्याला ती लय त्यावेळी सापडली नसावी.

लंपनला ताप येतो तेव्हाची गोष्टही मनात घर करून आहे. सुमी तर खासच.

चित्रा

अगदी मनातलं!

हो खरंय... त्या पुस्तकाची 'लय' सापडणं महत्वाचें आहे.
एकदा सापडली की खरंच संतांच्या गावातनं बाहेर पडावेसे वाटत नाही!

प्रत्येकाने वाचावं असंच आहे ते!

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायला नको?)

खुप दिवस झाले

खुप दिवस झाले वाचून् पण आता इथे वाचल्यावर् आठवले परत्.
छान आहेत् कथा त्या.

शिवानी

 
^ वर