वर्णमाला- शेवट

आधीच्या लेखात आवाहन केल्याप्रमाणे वर्णमालेबाहेरचे वर्ण शोधण्याचे कुतुहल एकाही वाचकाला वाटल्याचे दिसले नाही. असो, चालायचेच!

वर्णमालेमधले वर्ण आपण आधीच्या लेखापर्यंत पाहिले. पण या वर्णमालेत आहेत ते संस्कृतभाषेमधले उच्चार. अर्थात, तेच उच्चार मराठीतही आहेत. पण मराठीत केवळ हेच उच्चार नाहीत, याहूनही अधिक आहेत. या वर्णमालेबाहेरच्या उच्चारांसाठी वेगळी अक्षरचिन्हे नाहीत. पण तरीही या उच्चारांना स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे, हे उच्चार मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहेत, म्हणून आता आपण त्यांचा विचार करूया.

या वर्णांचे मी चार गट करते आहे-

  • Affricates- च़, ज़, झ़
  • Flaps- ड़, ढ़
  • महाप्राण- न्ह्, म्ह्, व्ह्, ल्ह्, ण्ह्, र्‍ह्
  • पराश्रित- अनुस्वार, विसर्ग, जिह्वामूलीय, उपध्मानीय

१) Affricates- 'च्, ज्, झ्' हा गट आणि 'च़, ज़, झ़' हा गट , या दोहोंतला फरक पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल-

पहिला गट दुसरा गट
वाचन काच़
जेवण वज़न
झकास झ़रा

व्यंजनांवरील लेखात च्, छ्, ज्, झ् ही स्पृष्ट व्यंजने आहेत हे आपण पाहिले. ज्याला पाश्चात्य उच्चारशास्त्र plosives /stops असे म्हणते. च़, ज़, झ़ ही देखील व्यंजनेच आहेत. परंतु त्यांसाठी केला गेलेला 'प्रयत्न' वेगळा आहे. अर्थातच ही व्यंजने संस्कृतमधे नसल्याने या उच्चारांचा व पर्यायाने त्यासाठी केल्या जाणार्‍या 'प्रयत्ना'चा उल्लेख कुठे सापडत नाही. (किमान मला तरी सापडलेला नाही.) पाश्चात्य उच्चारशास्त्र मात्र जगातल्या सर्व मानवी भाषांतील उच्चारांचा अभ्यास करत असल्याने या तिघांचाही अभ्यास करते व त्यांना Affricates असे नाव देते व त्यांची व्याख्या - "When a 'stop' is released into a homorganic 'fricative' " अशी करते. stop म्हणजे स्पृष्ट व्यंजने व fricative म्हणजे ईषद्विवृत्त व्यंजने हे तर आपण पाहिलेच आहे. homorganic म्हणजे सारखीच उच्चारस्थाने असलेले. म्हणजेच काय, तर जेव्हा एखादे स्पृष्ट व्यंजन त्याच्याप्रमाणेच उच्चारस्थाने असलेल्या ईषद्विवृत्तात सोडले जाते, तेव्हा Affricate निर्माण होते.
च़ निर्माण करण्यासाठी दन्त्य अघोष स्पृष्ट व्यंजन - त् हे दन्त्य अघोष ईषद्विवृत्त व्यंजनात म्हणजेच स् मधे सोडले जाते.
ज़ निर्माण करण्यासाठी दन्त्य घोष स्पृष्ट व्यंजन- द् हे दन्त्य घोष ईषद्विवृत्त व्यंजनात म्हणजेच z मधे सोडले जाते. हा z मराठीत नसल्याने तो त्याला IPA (International Phonetic Alphabet) ने नेमून दिलेल्या चिन्हानुसार दर्शवला आहे.
झ़ हा बाकी ज़ प्रमाणेच उच्चारून नंतर त्याला महाप्राण केले जाते.
छ चा मात्र छ़ असा काही बंधूवर्ण मराठीत नाही. त्याचा अभाव रोचक आहे.

२)Flaps- ड्, ढ् या एक गट व ड़, ढ़ हा दुसरा गट यांच्यातील फरक लक्षात येण्यासाठी पुढील उदाहरणे-

पहिला गट दुसरा गट
डमरू माड़
ढोंग वाढ़

हे चारही वर्ण मूर्धन्यच आहेत पण ड् व ढ् हे स्पृष्ट आहेत, तर ड़ व ढ़ यांना पाश्चात्य उच्चारशास्त्र flap अशी संज्ञा देते. या संज्ञेचे स्पष्टीकरण मी ळ् चा विचार करताना दिलेले आहेच. flap च्या वेळी दोन्ही उच्चारकांचा अत्यंत क्षणिक असा स्पर्श होतो. ळ् हा सुद्धा मूर्धन्य flap च आहे. पण तो lateral flap म्हणून गणला जातो. असो, फार तांत्रिक बाबींत शिरण्यात अर्थ नाही.

यांचा विचार करताना एक रोचक गोष्ट लक्षात येते. ड्, ढ्, ड़, ढ़ हे उच्चार शब्दांत कुठे कुठे वापरलेत याचा नीट विचार केल्यास असे लक्षात येईल, की ड् व ढ् हे नेहमी शब्दाच्या सुरुवातीलाच येतात. जसे- डमरू, डोकं, डोळा, डाळ, ढोकळा, ढाल, ढेकळ, ढोल, ढीग वगैरे.

शब्दाच्या शेवटी मात्र ड् किंवा ढ् नसतो. त्यांच्याजागी ड़ किंवा ढ़ येतात. जसे- माड़, पड़, वड़, झाड़,लाड़, ताड़, गड़, वेड़, गाड़, कढ़, वाढ़, दाढ़, काढ़ वगैरे.
शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी न येता, मधे जर ड्, ढ् आला तर मात्र २ शक्यता असतात-
पहिली म्हणजे दोन स्वरांच्या मधे ड् किंवा ढ् जर आला (मराठीभाषेत) तर त्यांचे अनुक्रमे ड़ व ढ़ होतात. (वैदिक संस्कृतात अनुक्रमे ळ् व ळ्ह् होतात हे आपण आधीच पाहिले आहे) जसे- (नुक्ता दिलेल्या अक्षराला काना-मात्रा-वेलांटी लावता येत नसल्याने ते अक्षर व त्याला लागून आलेला स्वर वेगवेगळे लिहिण्याची कसरत करावी लागते आहे, कृपया सांभाळून घ्यावे)- वड़ई, काड़ई, वड़आ, सड़आ, बेड़ऊक, खेड़ऊत, कढ़ई, काढ़आ, वेढ़आ, आढ़ं, तिढ़आ वगैरे

दुसरी शक्यता म्हणजे जर ड् / ढ् च्या आधी एखादे अनुनासिक आले तर मात्र ते मूळस्वरूपात म्हणजेच ड्, ढ् असेच राहतात. जसे- खोंड, तोंड, सोंड, भोंडला, बंड, थंड, खंड, ओंडका, पेंढा, कोंढाणा वगैरे.

म्हणजेच शब्दात ज्या ठिकाणी ड् व ढ् उच्चारले जातात, तेथे ड़ किंवा ढ़ उच्चारले जात नाहीत. आणि जेथे ड़ किंवा ढ़ उच्चारले जातात, तेथे ड् व ढ् उच्चारले जातात. या चार वर्णांचे उच्चार अशा प्रकारे नियमबद्ध आहेत. हे नीट कळायला पुढील तक्ता पहा-

सुरुवात मध्य शेवट
डोके भोंडला तोंड
ड़ - पड़ला वड़
ढोपर कोंढाणा पेंढ
ढ़ - कढ़ई दाढ़

३) महाप्राण- स्पृष्ट व्यंजनांपैकी अननुसासिक म्हणजेच अनुनासिक नसलेल्या व्यंजनांच्या (क्, ग् वगैरे) महाप्राण व्यंजनांसाठी (ख्, घ् वगैरे) वेगळे अक्षरचिह्ने तर आहेतच, शिवाय त्यांना जोडाक्षर न मानता एकच अक्षर किंवा वर्ण मानले जाते. परंतू इतरही काही व्यंजनांचे व अर्धस्वरांचे महाप्राण होतात, पण त्यांना जोडाक्षर मानले जाते. जसे-ण्ह्, न्ह्, म्ह्, र्‍ह्, ल्ह्, व्ह्. हे वर्ण आलेले शब्द पुढीलप्रमाणे-
ण्ह्- कण्हणे
न्ह्- पुन्हा, गुन्हा
म्ह्- म्हणून
र्‍ह्- र्‍हास, कर्‍हाड
ल्ह्- कल्हई
व्ह्- व्हायला, केव्हा इ.
महाप्राण म्हणजे काय ते आधीच व्यंजनांवरील लेखात सांगितले आहेच, तेव्हा पुन्हा सांगत नाही.

४) पराश्रित- पराश्रित या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे 'दुसर्‍याचा आश्रय घेणारे'. हा अर्थ उच्चारशास्त्रात लावायचा झाला, तर जे वर्ण एकेकटे, आपलेआपण उमटू शकत नाहीत, ज्यांना स्वर किंवा व्यंजनांच्या आधाराची गरज पडते ते पराश्रित. स्वर, व्यंजने आणि अर्धस्वर हे मात्र 'स्वयंभू' असतात. उरलेले वर्ण म्हणजे अनुस्वार, विसर्ग, उपध्मानीय आणि जिव्हामूलीय हे 'पराश्रित' असतात.

अनुस्वार म्हणजे थोडक्यात सांगायचे तर एखाद्या स्वरानंतर आलेले अनुनासिक. म्, न् आणि ण् यांचे जरी स्वयंभू अस्तित्त्व असले, तरी ते ज्यावेळी आपापले, एकटे एखाद्या शब्दात येतात तेव्हा अनुस्वाराच्या अर्थाने नाही. त्यामुळे ही तीन अनुनासिके व बाकीची ङ् व ञ् ही अनुनासिके पराश्रित मानली जातात. अनुनासिकांबद्दल व कुठे कोणत्या अनुनासिकाचा उच्चार करावा याबद्दल आधीच्या एका लेखात माहिती दिली असल्याने, पुन्हा सांगत नाही.

विसर्ग हा देखील स्वरानंतरच येतो. स्वराशिवाय विसर्गाला अस्तित्त्व मिळू शकत नाही. विसर्गाचा उच्चार कसा करायचा ते मात्र सांगणे आवश्यक आहे. "त्या त्या स्वरानंतर येणार्‍या विसर्गाचा उच्चार 'ह्' असा होतो आणि पूर्वीच्या स्वराची छटा त्या ह् मधे मिसळते. जसे- देवः- देवह्, जना:- जनाह्, कवि:- कविहि, भानु:- भानुहु, नदी:-नदीहि, कवे:- कवेहे, भानो:- भानोहो वगैरे. मात्र ऐ आणि औ पुढे येणार्‍या विसर्गाचा उच्चार देवै:- देवैहि, गौ:- गौहु असा केला जातो" (संदर्भ- सुगम संस्कृत व्याकरण)

जिह्वामूलीय- विसर्गाच्या पुढे क् किंवा ख् आल्यास विसर्गाच्या जागी ह् चा घशातून केलेला उच्चार केला जातो. हा उच्चार जिभेच्या मुळाशी होतो असे मानले जाते, म्हणून त्याला जिह्वामूलीय असे नाव मिळाले आहे. जसे- श्यामः करोति- श्यामह् करोति|, श्यामः खादति- श्यामह् खादति| वगैरे

उपध्मानीय- विसर्गापुढे प् किंवा फ् आल्यास विसर्गाच्या जागी ओठ मिटून केलेला ह् चा उच्चार केला जातो. त्यामुळे विसर्गाच्या पुढे येणारा प् /फ् वर्ण दोनदा उच्चारला जातो. जसे- श्यामः पश्यति- श्यामह् प्पश्यति| श्यामः फलं खादति- श्यामह् फ्फलं खादति| वगैरे.

अशाप्रकारे हे वर्णमालेबाहेरचे विविध वर्ण आहेत. जरी त्यांना आपल्या लेखी वर्णमालेत स्थान मिळाले नसले (अनुस्वार व विसर्गास सोडून, पण त्यांची गणना स्वरांत केलेली आहे), तरी आपल्या दैनंदिन वापरल्या जाणार्‍या भाषेत त्यांचे अस्तित्व दुर्लक्ष करण्यासारखे निश्चितच नाही.

वर्णमालेच्या या विशिष्ट संरचनेचा उपयोग 'संधी'चे नियम बांधताना होतो. संधी म्हणजे काय, तर दोन उच्चारांचा संयोग झाल्यावर जो तिसरा उच्चार निर्माण होतो तो. त्यामुळे संधी उच्चारशास्त्रावर व पर्यायाने वर्णमालेवर काही अंशी अवलंबून आहेत. असो. संधी हा स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. परंतू त्याची माहिती सर्वच व्याकरणसंबंधी पुस्तकांत असल्याने वाचकांना अधिक त्रास देत नाही.

या लेखमालेने बर्‍याच लोकांची बरीच सहनशक्ती पाहिली. पहिल्या भागाच्या तुलनेत या आधीच्या भागापर्यंत वाचनसंख्या एक तृतीयांश झाली आहे. पण इतक्यावेळा तरी वाचन झाले या लेखाचे, याचे समाधान आहे. त्यावर बोनस म्हणून काहींनी प्रतिसाद दिले, चांगले प्रश्न विचारले, पाठिंबा दर्शवला, शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचे इतर वाचकांसोबत आभार मानते.

दुसर्‍या लेखापासून मला तक्ते द्यायचे होते. तक्ते कसे द्यायचे ते खूप मेहनत घेऊन माझ्यासारख्या तंत्र-अज्ञ व्यक्तीला दाखवून दिल्याबद्दल प्रियाली व अनु यांचे आभार. तसेच माझे भयाण अशुद्धलेखन पाहता विनायककाकांनी माझ्या लेखांची जी 'शुद्धिचिकित्सा' केली, त्याबद्दल त्यांचे आभार.

यांच्याखेरीज मला आणखीनही महत्त्वाचे आभार मानायचे आहेत, ते म्हणजे यनावाला, वरदा, अदिती या व्याकरणतज्ञांचे! एखादी व्यक्ती जेव्हा एखादी लेख'माला' लिहीत असते, तेव्हा वाचकांनी काही भागांवर विचारलेल्या काही प्रश्नांना लेखमालेतूनच, कोणत्या वेळी, कशी उत्तरे द्यायची हे त्या लेखनकर्त्या व्यक्तीचे आधीच ठरलेले असतात. तिच्या लेखमालेच्या प्रवाहाप्रमाणे हेतुपूर्वक काही विशिष्ट प्रश्न विशिष्ट वेळी विशिष्ट प्रकारे हाताळले जातात. अशावेळी दुसर्‍याच एखाद्या व्यक्तीने तिचा त्या विषयात कितीही व्यासंग असला तरी मधेच वाचकांच्या प्रश्नांची धडाधड उत्तरे दिली, तर लेखकाच्या लेखनाचा प्रवाह बिघडतो व त्याचा हिरमोड होतो. मी उल्लेखलेल्या व्याकरणतज्ञांनी तसे केले नाही, याबद्दल त्यांचे आभार!

अनु, प्रियाली, वरदा यांनी खर्‍या कुतुहलाने काही प्रश्न विचारले, छिद्रान्वेषीपणा करायचा म्हणून नाही, या कारणास्तव त्यांचेही आभार!

धन्यवाद.

Comments

उत्तम लेखाचा उत्तम समारोप.

मागील लेखांइतकाच हाही अभ्यासपूर्ण लेख आहे.वर्ण मालेचा भाषेचा अभ्यास करतांना भाषाभ्यासकांना या लेखांची नक्की मदत होईल. सुदैवाने चांगल्या मांडणीमुळे चांगले लेख आम्हा वाचकांना वाचायला मिळाले,उत्तम लेखांचा उत्तम समारोप असे म्हणालो असलो तरी,भाषाशास्त्रावरील आणखी काही लेख भविष्यात वाचावयास मिळतील असे वाटते.पुन्हा एकदा आपले मनापासून अभिनंदन.


अवांतर;) काहीच नाही.

उत्तम !!

उत्तम जमलाय लेख !!

आभारप्रदर्शनही आवडले !! काय करायला हवे पे़क्षा काय करायला नको हे कळणेच प्रगल्भता दाखवते. आपण त्यांचे जाहिरपणे आभार मानलेत आणि त्याची कारणे लिहिलीत यावद्दल धन्यवाद. वरील सर्वांचे ह्या प्रगल्भपणासाठी अभिनंदन

उत्कृष्ट लेखमाला

वा! शेवटचा भागही आवडला. च आणि च़ यांच्या उच्चारातील फरक समजले तरी ड आणि ड़ आणि बाकीचे तसे उच्चार आणि त्यातील फरक कधी लक्षातच आले नव्हते. (किंबहुना, लक्षात घेतले नव्हते.) परंतु दिलेले शब्द उच्चारल्यावर त्यात किती डिस्टींक्ट फरक आहेत ते समजून गेले. महाप्राणांबद्दल जुजबी माहिती होती परंतु परिश्रित वर्णांबद्दल कल्पना नव्हती.

अतिशय सुंदर लेखमाला... व्यासंगाचे अभिनंदन!

अवांतरः

तक्ते कसे द्यायचे ते खूप मेहनत घेऊन माझ्यासारख्या तंत्र-अज्ञ व्यक्तीला दाखवून दिल्याबद्दल प्रियाली व अनु यांचे आभार.

इतकी मदत तर कोणीही कोणालाही करेलच. परंतु याबरोबर हे ही खरे की मला संस्कृताचे कोणतेही ज्ञान नसल्याने राधिका यांची मी वारंवार मदत घेते. याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, हे कोणी लिहिले असे अनेक प्रश्न त्यांना विचारले आहेत. त्यांची एक चांगली सवय म्हणजे जर त्यांना एखादी गोष्ट ताबडतोब आठवत नसेल तर त्या शोध काढून ती हमखास सांगतात. आत्तापर्यंत त्यांनी कधीही मला विन्मुख केलेले नाही, हे ही येथे नमूद करावेसे वाटले.

काही शंका

व्यंजनांवरील लेखात च्, छ्, ज्, झ् ही स्पृष्ट व्यंजने आहेत हे आपण पाहिले. ज्याला पाश्चात्य उच्चारशास्त्र plosives /stops असे म्हणते.

संस्कृतमध्ये या वर्णांना Palatal किंवा Velar असे म्हणत असावेत.

च़, ज़, झ़ ही देखील व्यंजनेच आहेत. त्यांना पाश्चात्य उच्चारशास्त्र Affricates असे नाव देते.

सामान्य व्याकरणाच्या पुस्तकात Affricate चे भाषांतर ईषत्स्पर्श, Fricative (or Spirant)चे स्पृष्ट, Stopचे शोषवर्ण आणि दंततालव्य व्यंजनाला Dentopalatal असे दिलेले आहे. या लेखात वापरलेले शब्द बरेच वेगळे आहेत. विवृत्त (Open), संवृत्त म्हणजे Closed ?

छ चा मात्र छ़ असा काही बंधूवर्ण मराठीत नाही. त्याचा अभाव रोचक आहे.

छ चा दंत्य उच्चार वत्स, उत्सव या मराठी शब्दांत दिसतो असे अनेक मराठी व्याकरणकारांचे मत आहे(उदाहरणार्थ: कै. विजया श्रीधर चिटणीस, इत्यादी). संस्कृतमध्ये त्स चा उच्चार त्‌स असा होतो, तो मराठी उच्चारापेक्षा भिन्न आहे. .

इतकेच नव्हे तर मराठीत ञ चासुद्धा दंततालव्य उच्चार आहे असे काही व्याकरणकार मानतात. (पहा पृष्ठ ७१, 'मराठी व्याकरणाचा पुनर्विचार' (अ.वा. मंगरूळकर), पुणे विद्यापीठ १९६४ . मात्र मंगरूळकर अशा उच्चारांना दंतमूलीय किंवा वर्त्स्य (Alveolar) म्हणतात, ती गोष्ट वेगळी.

(नुक्ता दिलेल्या अक्षराला काना-मात्रा-वेलांटी लावता येत नसल्याने ते अक्षर व त्याला लागून आलेला स्वर वेगवेगळे लिहिण्याची कसरत करावी लागते आहे, कृपया सांभाळून घ्यावे)- वड़ई, काड़ई, वड़आ, सड़आ, बेड़ऊक, खेड़ऊत, कढ़ई, काढ़आ, वेढ़आ, आढ़ं, तिढ़आ वगैरे.

मला वाटते ही लेखात वापरलेल्या टंकांमधली त्रुटी असावी. ड़, ड़ा, ड़ि, ढ़, ढ़ा, ढ़ि, ढ़ी वगैरे टंकणे शक्य आहे.

ड,ढ चेच असे दोन उच्चार आहेत असे मानणे कितपत योग्य आहे? काही भाषाशास्त्रज्ञ प्रत्येक व्यंजनाचे असे स्थानपरत्वे/स्वरपरत्वे वेगळे उच्चार होतात असे मानतात. कस, कीस, कूस, कूळ, केळ, कोळ या सर्व शब्दांत क चा उच्चार एकसारखा आहे असे मानणे अवघड आहे.
स्पृष्ट व्यंजनांपैकी अननुसासिक म्हणजेच अनुनासिक नसलेल्या व्यंजनांच्या (क्, ग् वगैरे) महाप्राण व्यंजनांसाठी (ख्, घ् वगैरे) वेगळे अक्षरचिह्ने तर आहेतच, शिवाय त्यांना जोडाक्षर न मानता एकच अक्षर किंवा वर्ण मानले जाते.
महाप्राण व्यंजन हा फार चांगला शब्द वापरला आहे. क + ह चा सन्धी ग्घ होतो, ख नाही. (वाक् + हरि = वाग्घरि)' त्यामुळे ख हे जोडाक्षर नाही, हे सहज कळून येते.
मराठीत अशीही काही जोडाक्षरे आहेत त्यांना व्याकरणकार मूलवर्ण मानतात. अशी अक्षरे अनेक आहेत. पहा: पक्याने सगळ्या वह्या सख्याला दिल्या. यातील जोडाक्षरे उच्चारताना मागील अक्षरावर आघात होत नसल्याने यांना मुळाक्षरासारखे मानावे असे त्यांचे मत आहे.

ओष्ट्य व(उ + अ)-W आणि दन्त्य .व-V यांच्याबद्दल लेखात काही लिहिलेले सापडले नाही. --वाचक्नवी

कै च्या कै

या प्रतिसादाला असे शीर्षक दिल्याबद्दल माफ करा. परंतू माझ्या लेखांना उत्तरे देण्यापूर्वी आपण माझे लिखाण नीट वाचता का, असा प्रश्न पडला. असाच प्रश्न आपण माझ्या खरडवहीत विचारलेल्या शंका वाचूनही पडला होता. असो.

संस्कृतमध्ये या वर्णांना Palatal किंवा Velar असे म्हणत असावेत.

कृपया आपण माझे उच्चारक्रिया व व्यंजने हे दोन लेख नीट वाचा. एक तर च वर्ग हा तालव्य व्यंजनांचा वर्ग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे plosives /stops या संज्ञा 'प्रयत्नां'बद्दल आहेत, तर Palatal किंवा Velar या संज्ञा 'उच्चारस्थानां'बद्दल आहेत. प्रयत्न आणि उच्चारस्थाने यांच्यातला फरक आपल्याला स्पष्ट झाला नसावा असे वाटते.

सामान्य व्याकरणाच्या पुस्तकात Affricate चे भाषांतर ईषत्स्पर्श, Fricative (or Spirant)चे स्पृष्ट, Stopचे शोषवर्ण आणि दंततालव्य व्यंजनाला Dentopalatal असे दिलेले आहे. या लेखात वापरलेले शब्द बरेच वेगळे आहेत. विवृत्त (Open), संवृत्त म्हणजे Closed ?

मी संदर्भासाठी घेतलेली पुस्तके केवळ 'सामान्य' 'व्याकरणा'ची नसून त्यांत संस्कृत उच्चारशास्त्र अंतर्भूत आहे. व्याकरण आणि उच्चारशास्त्र यांत फरक आहे. मी वाचलेल्या दोन्ही पुस्तकांत मी दिलेल्या संज्ञाच दिल्या आहेत. आपण दिलेल्या संज्ञा वेगळ्या आहेत, व त्यांचा परस्परसंबंध अर्थाच्या दृष्टीने लागत नाही. हो, विवृत्त आणि संवृत्त यांचा शब्दशः अर्थ जरी आपण म्हणता तसा काहीसा आहे.

छ चा दंत्य उच्चार वत्स, उत्सव या मराठी शब्दांत दिसतो असे अनेक मराठी व्याकरणकारांचे ममाहे.

मी सुद्धा छ़ चा उच्चार कधी कधी त्स च्या जागी करते. परंतू बर्‍याच जणांना 'त्स' चा अक्षरचिन्हाबरहुकूम उच्चार करताना ऐकले असल्याने, मी माझ्या उच्चाराचे generalization केले नाही.

इतकेच नव्हे तर मराठीत ञ चासुद्धा दंततालव्य उच्चार आहे असे काही व्याकरणकार मानतात.

उच्चारस्थानांबद्दल बोलताना एखाद्या वर्णाच्या उच्चारस्थानाच्या शेजारील उच्चारस्थानावर तोच उच्चार बर्‍याचदा केला जातो. मी आधीही एकदा म्हटल्याप्रमाणे कधी कधी दोन्ही उच्चार एकसारखेच वाटतात,पण त्यांच्यात गुणात्मक फरक असतो.
शिवाय आपण ज्या पुस्तकाचा संदर्भ देता आहात, ते १९६४ चे आहे. तर मी ज्या पुस्तकाचा संदर्भ देते आहे, ते १९९६ चे आहे. काळानुसार आणखी खोलात जाऊन शोध लावले जातत. तेव्हा ६४ साली असे म्हटले होते, व तुम्ही असे म्हणता, वगैरे म्हणण्यात फारसा अर्थ नसावा.

मला वाटते ही लेखात वापरलेल्या टंकांमधली त्रुटी असावी. ड़, ड़ा, ड़ि, ढ़, ढ़ा, ढ़ि, ढ़ी वगैरे टंकणे शक्य आहे.

आपल्याला बरी ही अक्षरचिह्ने सापडतात. आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्हाला कशी बरे सापडत नाहीत? नक्की कोणती टंकनसुविधा वापरता आपण?

क + ह चा सन्धी ग्घ होतो, ख नाही.

कृपया, आपण माझा महाप्राणांवरील म्हणजेच व्यंजने नावाचा लेख परत एकदा वाचाच. मी कधीही असे म्हटलेले नाही, हे आपल्या लक्षात येईल. 'ख म्हणताना क् मध्ये ह् मिसळल्याचा भास होतो, पण प्रत्यक्षात तसे नसते' या विधानात व 'क्+ह्= ख्' यात जमीन-आस्मानाचा फरक आहे हो!

यातील जोडाक्षरे उच्चारताना मागील अक्षरावर आघात होत नसल्याने यांना मुळाक्षरासारखे मानावे असे त्यांचे मत आहे.

जर ते मुळाक्षरासारखे मानले, तर ते कोणत्या प्रकारचे व कोणत्या प्रयत्नांतून सिद्ध झालेले मुळाक्षर आहे, हे आधी शोधून काढावे लागेल. सध्या तरी मराठीच्या 'उच्चारशास्त्रा'वरील पुस्तकांत तसे मानले जात नाही.

ओष्ट्य व(उ + अ)-W आणि दन्त्य .व-V यांच्याबद्दल लेखात काही लिहिलेले सापडले नाही.

ओष्ट्य व् बद्दल व्यंजने या लेखात पहायची तसदी घ्यावी. अर्धस्वरांवर लिहिताना व ची चर्चा केली आहे. आणि दन्त्य व' आपण मला काढून दाखवा, मी आपल्याला ५०० रु. देईन. दन्त्य 'व्' नसतो. आणि आपण जो V म्हणता आहात, तोही दन्त्य नाही. दन्तोष्ठ्य 'व्' असतो. V हा फ्रिकेटिव्ह आहे. तर मराठीतल्या दन्तोष्ट्य व् साठी एक वेगळाच approximant नावाचा प्रयत्न वापरला जातो. तेव्हा V व मराठीतला दन्तोष्ठ्य व् दोन्ही वेगळे आहेत. या मराठी दन्तोष्ठ्य 'व्' बद्दल मात्र लिहायचे राहिले. ते आणि संदर्भ ग्रंथांची नावे लिहायची राहिली आहेत ती नंतर प्रतिसादातून देते.

राधिका

५०० रुपयांसाठी !

दन्त्य व' आपण मला काढून दाखवा, मी आपल्याला ५०० रु. देईन.

पाचशे रुपयांसाठी आम्ही प्रयत्न केला की, दन्त्य 'व' सापडतो का ?
पण तो मराठीत तर नक्की नाही ! दन्तोष्ठ्य 'व्' असतो याच्याशी सहमत.

संपूर्ण प्रतिसाद डिलीट करणे हा संपादक मंडळाच्या अधिकाराचा अतिरेक आहे, असे प्रा.डॉ.दिलीप बिरुटेंना वाटते.

कळला

हा भागही वाचला. बराचसा कळला.
बोलताना यामागे इतकी तंत्रे असतील असे जाणवत नाही.
अवांतरः खाली नुक्ता वाली अक्षरे आणि साधी अक्षरे यांचे उच्चार करुन पाहिले. फरक आहे खरा. पण ड् आणि ड(खाली टिंब,मी ते टंकण्याचे कष्ट आळशी असल्यानी घेतले नाहियेत.), आणि ढ आणि ढ खाली टिंब यांच्या उच्चारात फरक मात्र उच्चार करुन कळले नाहीत.
ही नुक्ता वाली अक्षरे हिंदीत नाहीत असे दिसते. इंग्लिश मध्ये पण नाहीत ना?

नुक्ता... आभार

नुक्ता वाली अक्षरे हिंदीत नाहीत असे दिसते

हिंदीत आहेत ना.
१. ये जीवन है.. उस जीवन का.
२. ये जिंदगी उसी की है... जो किसीका हो गया
या दोहोंच्या उच्चारात फरक आहे ना.

(येथे नुक्ता कसा देतात?)

राधिकाताई अतिशय सुंदर लेखमाला लिहिली आहे. कोणताही उच्चार करताना या लेखाची आठवण आता दातामध्ये अडकेल. (म्हणजे लेख आठवेल!).
ड, (नुक्ता वाला) ड, ढ, (नुक्ता वाला) ढ यांचे वेगळे उच्चार तर कधी लक्षातही आले नव्हते. ते इथे कळाले.

(ढ) आजानुकर्ण.

जिंदगी

जिंदगी हा जीवन हा हिंदी शब्दाला समानार्थी उर्दू शब्द असावा. भारतीय सिनेसृष्टीतील गीते हिंदूस्थानी भाषेतील असावीत.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

नुक्तावाली अक्षरे

ही नुक्ता वाली अक्षरे हिंदीत नाहीत असे दिसते. - अनु
कमाल करता बाई! हिन्दी आणि उर्दूतच नुक्तावाली अक्षरे आहेत. ..
क़ ख़ ग़ ज़ ड़ ढ़ फ़ व़ .... पहा:
क़सम, ख़याल, ग़म, गज़ब, लड़का, रूढ़, फ़जूल ...
मराठीत असली तरी आपण नुक्ता न वापरता ती लिहितो.

पण ड् आणि ड(खाली टिंब,मी ते टंकण्याचे कष्ट आळशी असल्यानी घेतले नाहियेत.), आणि ढ आणि ढ खाली टिंब यांच्या उच्चारात फरक मात्र उच्चार करुन कळले नाहीत.

वाडा आणि डावा यांचा उच्चार करताना जीभ कुठेकुठे जाते ते पहा. लगेच फरक कळेल.
उगीच नाही इंग्रजांनी खड़की, रूड़की, रूड़केला, कुपवाड़ा च्या स्पेलिग्जमध्ये आर् वापरला आणि डमडमचे स्पेलिंग रमरम नाही केले.--वाचक्‍नवी

आभार/तरी नाही

आभार. नुक्ता हिंदीत आहे.
उच्चारांतला फरक उच्चार करुन् पाहूनही नाही कळला.असो.

शतशः प्रणाम

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
राधिका यांचे सर्व लेख वाचले.त्यांच्या विद्वत्तेला आणि या क्लिष्ट विषयासंबंधीच्या त्यांच्या व्यासंगाला शतशः प्रणाम! माझी तर लेख वाचतानाच दमछाक होते. त्यांचे लेख उच्च दर्जाचे आहेत. पण आकृत्या इ. चे साहाय्य घेऊन उच्चार प्रयत्न कितीही समजावून सांगितले तरी गुरुमुखातून प्रत्यक्ष ऐकल्याशिवाय ते यथार्थतः कळणे दुरापास्तच.
प्रियाली यांचे लेख (त्यानी पाठविले तर) नियतकालिकातून प्रसिद्ध होऊ शकतील. पण राधिका यांच्या लेखांना अशी प्रसिद्धी संभवत नाही. कारण ते हलके फुलके लेखन नव्हे. व्याकरण तञ्ज्ञांच्या (म्हणजे खरे तञ्ज्ञ,राधिका यांनी लेखात उल्लेख केलेले नव्हे!) परिषदेत वाचावयाचे आणि स्मरणिकेत छापावयाचे ते शोधनिबंध आहेत.

छान..

राधिका,

मला व्याकरणातले काहीच कळत नाही व तो विषय अत्यंत कंटाळवाणा आणि नीरस व रटाळ वाटतो.

आम्ही आपलं प्रथम आईवडिलांचं, आणि नंतर इतर शिक्षक मंडळींचं बोलणं ऐकून ऐकूनच शब्द बोलायला, लिहायला, वाचायला शिकलो. पण त्यामागे इतकं कठीण आणि किचकट शास्त्र आहे याची कल्पना नव्हती. शाळेत असतानादेखील कधी व्याकरणावर आधारित प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला नाही आणि मराठी विषयातील व्याकरणाच्या २० मार्कांवर दरवर्षी पाणी सोडावे लागले!

मी ही संपूर्ण लेखमाला वाचली पण त्यातल्या फारच कमी गोष्टी समजल्या. बर्‍याचश्या डोक्यावरूनच गेल्या. पण एक गोष्ट मात्र खरी की संपूर्ण लेखमाला वाचताना ती अत्यंत विद्वत्तापूर्ण आणि अभ्यासपूर्ण लिहिली गेली आहे एवढे मात्र सतत जाणवत होते.

असो,

एका उत्तम लेखमालेबद्दल मला तुझे विशेष कौतुक वाटते. यापुढेही असेच उत्तमोतम लेखन तुझ्याकडून होत राहो हीच शुभेच्छा..

आपला,
(वाचक) तात्या.

उत्तम

हा लेख आणि संपूर्ण लेखमालिका अतिशय उत्तम झाली आहे.

उत्तम

हा लेख वाचण्यास उशीर झाला, म्हणून उत्तर देण्यासही उशीर. लेखमाला उत्तम जमली आहे. लेख संग्रही ठेवणार आहे.
उच्चारशास्त्राचा तुझा अभ्यास उत्तरोत्तर जसा वाढत जाईल तसतसे अनेकानेक उत्तम लेख आम्हाला वाचायला मिळतील अशी आशा आहे.

आभार

पूर्ण लेखमालेच्या प्रतिसादींना व प्रश्नकर्त्यांना धन्यवाद.

माझी तर लेख वाचतानाच दमछाक होते.

आणि

पण त्यामागे इतकं कठीण आणि किचकट शास्त्र आहे याची कल्पना नव्हती. बर्‍याचश्या डोक्यावरूनच गेल्या.

हे वाचून आपल्याला सोप्या भाषेत लिहिता येत नाही हे कळले. मी तसा प्रयत्न केला होता, परंतू जमले नाही. :( पुढच्या वेळी अधिक सोपे करून लिहायचा प्रयत्न करीन.
धन्यवाद.
राधिका

शंका

ओष्ट्य व(उ + अ)-W आणि दन्त्य .व-V यांच्याबद्दल लेखात काही लिहिलेले सापडले नाही.

यावर उत्तर देताना आधीच्या प्रतिसादात मी ओष्ठ्य 'व्' बद्दल लिहिले नसून ओष्ठ्य 'व्' बद्दल लिहिले आहे असे म्हटले होते. खरे म्हणजे उलट केले आहे. दन्तोष्ठ्य 'व्' बद्दल लिहिले आहे, ओष्ठ्य 'व्' बद्दल लिहायचे राहिले आहे. पण त्यात लिहायला फारसे काही नाही. दोन ओठ एकत्र आणून ते न मिटता त्यांची चंबूसदृश रचना करून हवा बाहेर सोडली असता ओष्ठ्य 'व्' चा उच्चार होतो. हे दोन्ही 'व्' आपण वापरतो.

ही नुक्ता वाली अक्षरे हिंदीत नाहीत असे दिसते. इंग्लिश मध्ये पण नाहीत ना?
इंग्लिश भाषेत हे उच्चार नाहीत. म्हणूनच साड़ई वगैरे सारख्या शब्दांचे स्पेलिंग saree असे करून उच्चारही सारी असाच केला जातो.
हिंदीबद्दल आजानुकर्ण महोदयांनी योग्य असे स्पष्टीकरण दिलेले आहेच. वाचक्नवी यांना सर्वसाधारणपणे उर्दूचे देवनागरीकरण करताना नुक्ता लावून वापरलेली अक्षरे व मी या लेखात दोन उच्चारांतील फरक करण्यासाठी म्हणून नुक्ता दिलेली अक्षरे यांतला फरक समजून घेण्याची विनंती.
राधिका

संदर्भग्रंथ

लेखमालेच्या शेवटी संदर्भग्रंथांची यादी देण्याचे ठरवले होते, परंतू अनवधानाने राहून गेले. शिवाय मी केवळ या लेखमालेसाठीच वेगवेगळी पुस्तके वाचली नाहीत. तर आधीच वेगवेगळी पुस्तके वाचून मग मला ते जसे समजले होते तसे लिहून काढल्याने संदर्भग्रंथांची नावे आठवून लिहून काढण्याइतका वेळ नंतर झाला नाही. ती आता आठवतील तशी देते आहे.
१- A course in modern Linguistics - Hockett
२- A course in Phonetics- Ladefoged
३- An introduction to Sanskrit Linguistics- Murti
वगैरे.
याखेरीज मला पुढील पुस्तकांची नावे मिळाली होती, परंतू ही पुस्तके मात्र मिळू शकली नाहीत. वाचू इच्छिणार्‍यांच्या सोयीसाठी त्यांचीही नावे देते आहे. मिळाल्यास जरूर वाचावीत, व 'मला मिळाली' असे मलाही व्य. नि. ने कळवावे :)
१-Sanskrit Phonetics- विधाता मिश्रा
२-Phonetics in Ancient India- W.S.Allen
शुभेच्छा!
राधिका

व्यासंग!

व्यासंग म्हणजे काय ते ही लेखमाला वाचून समजले! आपला हा व्यासंग उत्तरोत्तर वाढत राहो, आणि आम्हाला अनायसा त्याचा लाभ होत राहो ही प्रार्थना!

 
^ वर