वर्णमाला- शेवट

आधीच्या लेखात आवाहन केल्याप्रमाणे वर्णमालेबाहेरचे वर्ण शोधण्याचे कुतुहल एकाही वाचकाला वाटल्याचे दिसले नाही. असो, चालायचेच!

वर्णमालेमधले वर्ण आपण आधीच्या लेखापर्यंत पाहिले. पण या वर्णमालेत आहेत ते संस्कृतभाषेमधले उच्चार. अर्थात, तेच उच्चार मराठीतही आहेत. पण मराठीत केवळ हेच उच्चार नाहीत, याहूनही अधिक आहेत. या वर्णमालेबाहेरच्या उच्चारांसाठी वेगळी अक्षरचिन्हे नाहीत. पण तरीही या उच्चारांना स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे, हे उच्चार मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहेत, म्हणून आता आपण त्यांचा विचार करूया.

या वर्णांचे मी चार गट करते आहे-

१) Affricates- 'च्, ज्, झ्' हा गट आणि 'च़, ज़, झ़' हा गट , या दोहोंतला फरक पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल-

पहिला गट दुसरा गट
वाचन काच़
जेवण वज़न
झकास झ़रा

व्यंजनांवरील लेखात च्, छ्, ज्, झ् ही स्पृष्ट व्यंजने आहेत हे आपण पाहिले. ज्याला पाश्चात्य उच्चारशास्त्र plosives /stops असे म्हणते. च़, ज़, झ़ ही देखील व्यंजनेच आहेत. परंतु त्यांसाठी केला गेलेला 'प्रयत्न' वेगळा आहे. अर्थातच ही व्यंजने संस्कृतमधे नसल्याने या उच्चारांचा व पर्यायाने त्यासाठी केल्या जाणार्‍या 'प्रयत्ना'चा उल्लेख कुठे सापडत नाही. (किमान मला तरी सापडलेला नाही.) पाश्चात्य उच्चारशास्त्र मात्र जगातल्या सर्व मानवी भाषांतील उच्चारांचा अभ्यास करत असल्याने या तिघांचाही अभ्यास करते व त्यांना Affricates असे नाव देते व त्यांची व्याख्या - "When a 'stop' is released into a homorganic 'fricative' " अशी करते. stop म्हणजे स्पृष्ट व्यंजने व fricative म्हणजे ईषद्विवृत्त व्यंजने हे तर आपण पाहिलेच आहे. homorganic म्हणजे सारखीच उच्चारस्थाने असलेले. म्हणजेच काय, तर जेव्हा एखादे स्पृष्ट व्यंजन त्याच्याप्रमाणेच उच्चारस्थाने असलेल्या ईषद्विवृत्तात सोडले जाते, तेव्हा Affricate निर्माण होते.
च़ निर्माण करण्यासाठी दन्त्य अघोष स्पृष्ट व्यंजन - त् हे दन्त्य अघोष ईषद्विवृत्त व्यंजनात म्हणजेच स् मधे सोडले जाते.
ज़ निर्माण करण्यासाठी दन्त्य घोष स्पृष्ट व्यंजन- द् हे दन्त्य घोष ईषद्विवृत्त व्यंजनात म्हणजेच z मधे सोडले जाते. हा z मराठीत नसल्याने तो त्याला IPA (International Phonetic Alphabet) ने नेमून दिलेल्या चिन्हानुसार दर्शवला आहे.
झ़ हा बाकी ज़ प्रमाणेच उच्चारून नंतर त्याला महाप्राण केले जाते.
छ चा मात्र छ़ असा काही बंधूवर्ण मराठीत नाही. त्याचा अभाव रोचक आहे.

२)Flaps- ड्, ढ् या एक गट व ड़, ढ़ हा दुसरा गट यांच्यातील फरक लक्षात येण्यासाठी पुढील उदाहरणे-

पहिला गट दुसरा गट
डमरू माड़
ढोंग वाढ़

हे चारही वर्ण मूर्धन्यच आहेत पण ड् व ढ् हे स्पृष्ट आहेत, तर ड़ व ढ़ यांना पाश्चात्य उच्चारशास्त्र flap अशी संज्ञा देते. या संज्ञेचे स्पष्टीकरण मी ळ् चा विचार करताना दिलेले आहेच. flap च्या वेळी दोन्ही उच्चारकांचा अत्यंत क्षणिक असा स्पर्श होतो. ळ् हा सुद्धा मूर्धन्य flap च आहे. पण तो lateral flap म्हणून गणला जातो. असो, फार तांत्रिक बाबींत शिरण्यात अर्थ नाही.

यांचा विचार करताना एक रोचक गोष्ट लक्षात येते. ड्, ढ्, ड़, ढ़ हे उच्चार शब्दांत कुठे कुठे वापरलेत याचा नीट विचार केल्यास असे लक्षात येईल, की ड् व ढ् हे नेहमी शब्दाच्या सुरुवातीलाच येतात. जसे- डमरू, डोकं, डोळा, डाळ, ढोकळा, ढाल, ढेकळ, ढोल, ढीग वगैरे.

शब्दाच्या शेवटी मात्र ड् किंवा ढ् नसतो. त्यांच्याजागी ड़ किंवा ढ़ येतात. जसे- माड़, पड़, वड़, झाड़,लाड़, ताड़, गड़, वेड़, गाड़, कढ़, वाढ़, दाढ़, काढ़ वगैरे.
शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी न येता, मधे जर ड्, ढ् आला तर मात्र २ शक्यता असतात-
पहिली म्हणजे दोन स्वरांच्या मधे ड् किंवा ढ् जर आला (मराठीभाषेत) तर त्यांचे अनुक्रमे ड़ व ढ़ होतात. (वैदिक संस्कृतात अनुक्रमे ळ् व ळ्ह् होतात हे आपण आधीच पाहिले आहे) जसे- (नुक्ता दिलेल्या अक्षराला काना-मात्रा-वेलांटी लावता येत नसल्याने ते अक्षर व त्याला लागून आलेला स्वर वेगवेगळे लिहिण्याची कसरत करावी लागते आहे, कृपया सांभाळून घ्यावे)- वड़ई, काड़ई, वड़आ, सड़आ, बेड़ऊक, खेड़ऊत, कढ़ई, काढ़आ, वेढ़आ, आढ़ं, तिढ़आ वगैरे

दुसरी शक्यता म्हणजे जर ड् / ढ् च्या आधी एखादे अनुनासिक आले तर मात्र ते मूळस्वरूपात म्हणजेच ड्, ढ् असेच राहतात. जसे- खोंड, तोंड, सोंड, भोंडला, बंड, थंड, खंड, ओंडका, पेंढा, कोंढाणा वगैरे.

म्हणजेच शब्दात ज्या ठिकाणी ड् व ढ् उच्चारले जातात, तेथे ड़ किंवा ढ़ उच्चारले जात नाहीत. आणि जेथे ड़ किंवा ढ़ उच्चारले जातात, तेथे ड् व ढ् उच्चारले जातात. या चार वर्णांचे उच्चार अशा प्रकारे नियमबद्ध आहेत. हे नीट कळायला पुढील तक्ता पहा-

सुरुवात मध्य शेवट
डोके भोंडला तोंड
ड़ - पड़ला वड़
ढोपर कोंढाणा पेंढ
ढ़ - कढ़ई दाढ़

३) महाप्राण- स्पृष्ट व्यंजनांपैकी अननुसासिक म्हणजेच अनुनासिक नसलेल्या व्यंजनांच्या (क्, ग् वगैरे) महाप्राण व्यंजनांसाठी (ख्, घ् वगैरे) वेगळे अक्षरचिह्ने तर आहेतच, शिवाय त्यांना जोडाक्षर न मानता एकच अक्षर किंवा वर्ण मानले जाते. परंतू इतरही काही व्यंजनांचे व अर्धस्वरांचे महाप्राण होतात, पण त्यांना जोडाक्षर मानले जाते. जसे-ण्ह्, न्ह्, म्ह्, र्‍ह्, ल्ह्, व्ह्. हे वर्ण आलेले शब्द पुढीलप्रमाणे-
ण्ह्- कण्हणे
न्ह्- पुन्हा, गुन्हा
म्ह्- म्हणून
र्‍ह्- र्‍हास, कर्‍हाड
ल्ह्- कल्हई
व्ह्- व्हायला, केव्हा इ.
महाप्राण म्हणजे काय ते आधीच व्यंजनांवरील लेखात सांगितले आहेच, तेव्हा पुन्हा सांगत नाही.

४) पराश्रित- पराश्रित या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे 'दुसर्‍याचा आश्रय घेणारे'. हा अर्थ उच्चारशास्त्रात लावायचा झाला, तर जे वर्ण एकेकटे, आपलेआपण उमटू शकत नाहीत, ज्यांना स्वर किंवा व्यंजनांच्या आधाराची गरज पडते ते पराश्रित. स्वर, व्यंजने आणि अर्धस्वर हे मात्र 'स्वयंभू' असतात. उरलेले वर्ण म्हणजे अनुस्वार, विसर्ग, उपध्मानीय आणि जिव्हामूलीय हे 'पराश्रित' असतात.

अनुस्वार म्हणजे थोडक्यात सांगायचे तर एखाद्या स्वरानंतर आलेले अनुनासिक. म्, न् आणि ण् यांचे जरी स्वयंभू अस्तित्त्व असले, तरी ते ज्यावेळी आपापले, एकटे एखाद्या शब्दात येतात तेव्हा अनुस्वाराच्या अर्थाने नाही. त्यामुळे ही तीन अनुनासिके व बाकीची ङ् व ञ् ही अनुनासिके पराश्रित मानली जातात. अनुनासिकांबद्दल व कुठे कोणत्या अनुनासिकाचा उच्चार करावा याबद्दल आधीच्या एका लेखात माहिती दिली असल्याने, पुन्हा सांगत नाही.

विसर्ग हा देखील स्वरानंतरच येतो. स्वराशिवाय विसर्गाला अस्तित्त्व मिळू शकत नाही. विसर्गाचा उच्चार कसा करायचा ते मात्र सांगणे आवश्यक आहे. "त्या त्या स्वरानंतर येणार्‍या विसर्गाचा उच्चार 'ह्' असा होतो आणि पूर्वीच्या स्वराची छटा त्या ह् मधे मिसळते. जसे- देवः- देवह्, जना:- जनाह्, कवि:- कविहि, भानु:- भानुहु, नदी:-नदीहि, कवे:- कवेहे, भानो:- भानोहो वगैरे. मात्र ऐ आणि औ पुढे येणार्‍या विसर्गाचा उच्चार देवै:- देवैहि, गौ:- गौहु असा केला जातो" (संदर्भ- सुगम संस्कृत व्याकरण)

जिह्वामूलीय- विसर्गाच्या पुढे क् किंवा ख् आल्यास विसर्गाच्या जागी ह् चा घशातून केलेला उच्चार केला जातो. हा उच्चार जिभेच्या मुळाशी होतो असे मानले जाते, म्हणून त्याला जिह्वामूलीय असे नाव मिळाले आहे. जसे- श्यामः करोति- श्यामह् करोति|, श्यामः खादति- श्यामह् खादति| वगैरे

उपध्मानीय- विसर्गापुढे प् किंवा फ् आल्यास विसर्गाच्या जागी ओठ मिटून केलेला ह् चा उच्चार केला जातो. त्यामुळे विसर्गाच्या पुढे येणारा प् /फ् वर्ण दोनदा उच्चारला जातो. जसे- श्यामः पश्यति- श्यामह् प्पश्यति| श्यामः फलं खादति- श्यामह् फ्फलं खादति| वगैरे.

अशाप्रकारे हे वर्णमालेबाहेरचे विविध वर्ण आहेत. जरी त्यांना आपल्या लेखी वर्णमालेत स्थान मिळाले नसले (अनुस्वार व विसर्गास सोडून, पण त्यांची गणना स्वरांत केलेली आहे), तरी आपल्या दैनंदिन वापरल्या जाणार्‍या भाषेत त्यांचे अस्तित्व दुर्लक्ष करण्यासारखे निश्चितच नाही.

वर्णमालेच्या या विशिष्ट संरचनेचा उपयोग 'संधी'चे नियम बांधताना होतो. संधी म्हणजे काय, तर दोन उच्चारांचा संयोग झाल्यावर जो तिसरा उच्चार निर्माण होतो तो. त्यामुळे संधी उच्चारशास्त्रावर व पर्यायाने वर्णमालेवर काही अंशी अवलंबून आहेत. असो. संधी हा स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. परंतू त्याची माहिती सर्वच व्याकरणसंबंधी पुस्तकांत असल्याने वाचकांना अधिक त्रास देत नाही.

या लेखमालेने बर्‍याच लोकांची बरीच सहनशक्ती पाहिली. पहिल्या भागाच्या तुलनेत या आधीच्या भागापर्यंत वाचनसंख्या एक तृतीयांश झाली आहे. पण इतक्यावेळा तरी वाचन झाले या लेखाचे, याचे समाधान आहे. त्यावर बोनस म्हणून काहींनी प्रतिसाद दिले, चांगले प्रश्न विचारले, पाठिंबा दर्शवला, शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचे इतर वाचकांसोबत आभार मानते.

दुसर्‍या लेखापासून मला तक्ते द्यायचे होते. तक्ते कसे द्यायचे ते खूप मेहनत घेऊन माझ्यासारख्या तंत्र-अज्ञ व्यक्तीला दाखवून दिल्याबद्दल प्रियाली व अनु यांचे आभार. तसेच माझे भयाण अशुद्धलेखन पाहता विनायककाकांनी माझ्या लेखांची जी 'शुद्धिचिकित्सा' केली, त्याबद्दल त्यांचे आभार.

यांच्याखेरीज मला आणखीनही महत्त्वाचे आभार मानायचे आहेत, ते म्हणजे यनावाला, वरदा, अदिती या व्याकरणतज्ञांचे! एखादी व्यक्ती जेव्हा एखादी लेख'माला' लिहीत असते, तेव्हा वाचकांनी काही भागांवर विचारलेल्या काही प्रश्नांना लेखमालेतूनच, कोणत्या वेळी, कशी उत्तरे द्यायची हे त्या लेखनकर्त्या व्यक्तीचे आधीच ठरलेले असतात. तिच्या लेखमालेच्या प्रवाहाप्रमाणे हेतुपूर्वक काही विशिष्ट प्रश्न विशिष्ट वेळी विशिष्ट प्रकारे हाताळले जातात. अशावेळी दुसर्‍याच एखाद्या व्यक्तीने तिचा त्या विषयात कितीही व्यासंग असला तरी मधेच वाचकांच्या प्रश्नांची धडाधड उत्तरे दिली, तर लेखकाच्या लेखनाचा प्रवाह बिघडतो व त्याचा हिरमोड होतो. मी उल्लेखलेल्या व्याकरणतज्ञांनी तसे केले नाही, याबद्दल त्यांचे आभार!

अनु, प्रियाली, वरदा यांनी खर्‍या कुतुहलाने काही प्रश्न विचारले, छिद्रान्वेषीपणा करायचा म्हणून नाही, या कारणास्तव त्यांचेही आभार!

धन्यवाद.